Monday, 31 July 2017

हिरव्या ऋतुचा मॉल

 औरंगाबादहून पैठणच्या दिशेने निघालं की संताजी पोलीस चौकीसमोर अर्धा किलोमीटरवर एक तीन मजली मॉल दिसतो. हा मॉल नेहमीसारखा वस्तू, कपड्यांचा नाही. मग कशाचा? तर झाडांचा आहे. तब्बल पाच लाख झाडं इथं उपलब्ध आहेत. हा आगळावेगळा मॉल सुरु झाला जूनमध्ये. रोपांबरोबर झाडं लावण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूही आहेत. अत्यंत सुबक, आधुनिक रचना हे ‘पल्लवांकुर’ मॉलचं वैशिष्ट्य.
झाडांचा मॉल सुरु केला सुहास वैद्य यांनी. तब्बल चाळीस वर्षांपूर्वी त्यांनी नर्सरी चालू केली. आणि इथंच मॉलचा पाया घातला. सुहास वैद्य म्हणतात, “माझे वडील लक्ष्मणराव वैद्य हे सर्वोदयी कार्यकर्ते, त्यांना हिंदी राष्ट्रभाषा सभेने औरंगाबादेत नोकरी आणि संस्थेच्या आवारातच राहायला घर दिलं. घराच्या परिसरात खूप मोठी रिकामी जागा होती. तीच माझ्यासाठी पर्वणी ठरली. माझं शालेय शिक्षण पूर्ण झालं. इंजिनिअरिंगची चारही वर्षे मी फास्ट क्लासमध्ये पास झालो. पण पाचव्या वर्षी परीक्षाच दिली नाही. कारण पास झालो असतो आणि नोकरी करावी लागली असती. आणि नंतर झाडांकडे कधीच वळलो नसतो. सोयीचे सगळेच दोर कापून टाकले. आणि 1977 साली घराच्या आवारातच नर्सरी सुरु केली.”
सुहासने आईवडील आणि भाऊ यांनी दिलेल्या 450 रुपयातून व्यवसाय सुरु केला. आता थेट 5 लाख झाडांपर्यंत हा व्यवसाय पोचलाय. सुरुवातीच्या दिवसांत सायकलवर फिरून त्यांनी रोपांची विक्री घरोघरी केली. सुहास सांगतात, “मी ज्या काळात या व्यवसायाला सुरुवात केली तो काळ झाडं विकत घेऊन लावण्याचा नव्हता, त्यामुळे झाडं विकत घ्यायची सवय लोकांमध्ये रुजवावी लागली.” सुहास यांच्या या श्रमाला यश आलं. कारण आज या मॉलमधून रोज किमान 1 हजार झाडांची विक्री होऊ लागली आहे.
प्रत्यक्ष मॉल तीन मजली दिसत असला तरी याचा व्याप सहा एकरात पसरलेला आहे. इथं 3 हजार प्रजातींची तब्बल पाच लाख रोपं एकाच वेळी उपलब्ध आहेत. या रोपांना दररोज 2 लाख लिटर पाणी लागतं. हा पाणीपुरवठा एका विहिरीतून होतो. देखभालीसाठी पन्नास मजूर इथं काम करतात. तर दहा गुंठ्याचे तीन पॉलिहाऊसही इथे आहेत. महिन्याकाठी जवळपास तीस हजार झाडांची विक्री या मॉलमधून होत असते. गार्डन डेव्हलपमेंट, आणि कंपन्यांचा परिसर सुशोभीकरणाचंही काम या मॉलमधून चालतं. औरंगाबाद शहरातले सत्तर टक्के बगिचे सुहास वैद्य आणि त्यांच्या ‘पल्लवांकुर’ने सुशोभित केल्या आहेत.
खरं तर व्यवसाय कशाचा करावा यावर कुणाचंही बंधन नाही. समाजाला घातक ठरणारे व्यवसाय करून वारेमाप संपत्ती कमावणारेही असतात. म्हणूनच हिरव्या ऋतुचा मॉल उभारून समाजहित जपणारे सुहास वैद्य आदर्श ठरावेत.


- दत्ता कानवटे.

अपमानातून सन्मानाकडे१४ जुलै. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातलं दांडेगाव. विद्यार्थ्यांची अदालत भरलेली. उघड्यावर शौचाला बसणार्‍या २३ जणांना पकडून विद्यार्थ्यांसमोर हजर करण्यात आलं. या सर्वांना प्रत्येकी २०० रुपये दंडासह परिसर स्वच्छ करण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. या कारवाईचा धसका घेऊन गावकऱ्यांनी शौचालय उभारणीचं नियोजन सुरू केलं. ३६ कुटुंबांनी ३० शौचालयांसाठी, त्याच रात्री उशिरापर्यंत खड्डे खोदून बांधकामास सुरुवात केली. त्यानंतर अशीच कारवाई १५ ते १८ जुलैदरम्यान सुकटा, भवानवाडी, पाडोळी या गावांत करण्यात आली. आता तिकडेही शौचालय बांधण्याच्या कामाला जोरदार सुरूवात झाली आहे.
उघड्यावर शौचाला जाण्याची मानसिकता बदलावी म्हणून आपल्याकडे अनेक युक्त्या-प्रयुक्त्याशोधून काढल्या जातात. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ आनंद रायते यांनी संपूर्ण जिल्ह्यात हागणदारीमुक्त अभियान कार्यक्रम सुरू केला असून, यात उघड्यावर शौचाला जाणाऱ्या गावकऱ्यांसाठी अदालत भरवली जाते. अदालतीत गावातले विद्यार्थी अशा गावकर्‍यांना शिक्षा बजावतात. पालकांत बदल घडवून आणण्यासाठी मुलांना सक्रीय करण्याचा पर्याय लागू पडतो आहे.
जिल्ह्यांत अधिकारी-नागरिक यांची गुडमॉर्निंग पथकं तयार केली आहेत. प्रत्येक गावात भल्या पहाटे पथक पोचतं. सोबत एक-दोन पोलीस असतात. उघड्यावर शौचासाठी गेलेल्या नागरिकांचे फोटो काढून त्यांना फुलं भेट देत ‘गांधीगिरी’ करण्यात येते. त्यानंतर या गावकऱ्यांची ‘लोटापरेड’ गावच्या पारावर आणली जाते. तिथे विद्यार्थ्यांची अदालत सुरू होते. विद्यार्थ्यांपैकीच कोणी वकील, न्यायाधीशाची भूमिका वठवतात आणि खटल्याची सुरूवात होते. कधी रोख रकमेच्या दंडाची तर कधी गावातील सार्वजनिक ठिकाणी झाडू मारण्याची शिक्षा सुनावली जाते. दंडाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा केली जाते. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांनी गावस्तरावर असा उपक्रम राबवावा, अशा सूचना सीईओ रायते यांनी दिल्या आहेत.
आतापर्यंत ४०६ लोटाबहाद्दरांवर कारवाई करून त्यांच्याकडून प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे ८१, २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. शिक्षेचा सुपरिणाम म्हणून गावाची, मंदिराची आणि शाळेच्या परिसराची स्वच्छता झाली आहे. कारवाई करण्यात आलेल्या ४०६ लोटाबहाद्दरांपैकी ३५० जणांनी शौचालय बांधकाम तातडीने सुरुवात केली आहे.
विद्यार्थी अदालत या उपक्रमाचं जिल्ह्यात कौतुक होत आहे. विद्यार्थी अदालत उपक्रमाला पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व्ही. जे. वाघमारे मार्गदर्शन करतात. सीइओ रायते म्हणतात, "देशाने विविध क्षेत्रात प्रगती साधली. मात्र, स्वच्छतेच्या बाबतीत अजूनही आपण मागे आहोत. गावकऱ्यांना आपल्या मुलांकडूनच स्वच्छतेचं महत्व सांगितलं जावं, त्यांच्याकडून गावकऱ्यांसमक्ष अपमान झाल्यानंतर ईर्षेने पालकांनी घरी तात्काळ स्वच्छतागृह बांधावं, असा या उपक्रमामागचा हेतू आहे."
दांडेगावतील अन्नपूर्णा भोगील म्हणाल्या, “गावकऱ्यांच्यासमोर विद्यार्थी न्यायालयाने शाळेतील परिसर झाडण्याची शिक्षा दिल्यामुळे मला अपमान झाल्यासारखं वाटलं. म्हणून मी शौचालय बांधायला सुरुवात केली आहे. शौचालयाच्या गरजेकडे मला आहे. मी दुर्लक्ष केलं होतं. आता मला शौचालय बांधण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यातच माझा सन्मान आहे.”

- चंद्रसेन देशमुख.

Sunday, 30 July 2017

'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र'ची दोन वर्षे


सुजाण शिक्षक; जाणत्या शाळा : 'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र'ची दोन वर्षे
देशात शिक्षण हक्क कायदा 2010 सालापासून अंमलात आला. मात्र प्रत्येक मूल केवळ शाळेत दाखल होऊन चालणार नाही तर वयानुरुप त्याला अपेक्षित गुणवत्ताही गाठता यायला हवी. म्हणूनच 22 जून 2015 पासून महाराष्ट्र सरकारने 'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र' हा कार्यक्रम हातात घेतला. राज्यात शाळेत येणारं प्रत्येक मूल वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि गणिती क्रियांमध्ये तरबेज व्हावं असा प्रयत्न याद्वारे होत आहे.
हे सगळं घडवू शकणारी एकमेव व्यक्ती म्हणजे शिक्षक. या कार्यक्रमाने शिक्षकांना आपली शाळा प्रगत करण्यासाठीचं स्वातंत्र्य आणि स्पेस दिली. पारंपारिक घोकंपट्टी, मुलांना छडीचा- शिक्षेचा धाक दाखवणं बंद केलं. महाराष्ट्रातील बहुतांश शाळा आता 'ज्ञानरचनावादी' शिक्षणपद्धती वापरु लागल्या आहेत. यात हसत- खेळत, मुलांना समजून घेत शिकविलं जातं. त्यासाठी साध्या-सोप्या शैक्षणिक साहित्याचा वापर केला जातो. शिक्षक आता 'सुलभक' म्हणून काम करतात.
'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ ने जशी शिक्षकांना आपली ‘स्पेस’ दिली, तसेच साचेबद्ध भूमिकेतून बाहेर पडण्याचं स्वातंत्र्य अधिकाऱ्यांना दिलं. अधिकाऱ्यांची भूमिका बदलून ती ‘शिक्षक संवादी’ बनवली गेली. शिक्षकावर देखरेख करणं यापेक्षा वर्गातील मुलं किती सक्षम आहेत? गणित, भाषेच्या साध्यासोप्या क्रिया त्यांना जमतात का, मुलं आनंदी आहेत का? याची तपासणी करण्याचं काम अधिकाऱ्यांवर सोपविलं गेलं.
'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ अंतर्गत विद्यार्थ्यांची प्रगती तपासण्यासाठीचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे पायाभूत चाचण्यांचे आयोजन. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या वयोगटानुसार वाचन, लेखन, संख्याज्ञान क्षमता किती आहे, याची पडताळणी या पायाभूत चाचण्यांद्वारे होते. राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि आर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी चाचण्या घेण्यात येतात.
विद्यार्थ्यांने किती गुण मिळवले, हे तपासून पाहणं हे या चाचण्यांचं उद्दिष्टच नाही. तर विद्यार्थ्याला नेमकं किती समजलेलं आहे, त्याला कोणता भाग अजिबातच कळलेला नाही, कोणता भाग जास्त सुलभ करुन शिकवणं आवश्यक आहे, हे चाचण्यांच्या मूल्यमापनातून कळावं, अश्या प्रकारे प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्या. या चाचणीच्या उत्तरपत्रिका तपासताना बोलीभाषेतील उत्तरांचा स्वीकार करावा, स्व- अभिव्यक्तीमध्ये लेखनाच्या चुका न दाखवणं, केवळ स्मरणावर आधारित प्रश्न न विचारता आकलन आणि ज्ञानाचा प्रत्यक्षात वापर कसा करावा, यावर भर देण्यात येतो.
या चाचण्या सोडवतानाही मुलांचं शिकणं व्हावं, यासाठी काही नमुना प्रश्न, उदाहरणं, प्रश्नपत्रिकेतच सोडवून दिलेली असतात उदा.
पायाभूत चाचणी: भाषा विषय
शिवाय ज्ञानरचनावाद समजून घेण्यासाठी शिक्षक स्वखर्चाने ‘प्रगत’ शाळांना अभ्यास भेटी देऊ लागले आहेत. त्यात 100 टक्के प्रगत झालेलं सातारा जिल्ह्यातील कुमठे बीट, वाई, चंद्रपूरमधील ताडाळी, नाशिक जिल्ह्यातील निफाड, पुण्यामधील हवेली, सांगलीतील मिरज, कोल्हापुरातील गडहिंग्लज, लातूर तसेच रत्नागिरीतील चिपळूणला भेट देणाऱ्या शिक्षकांची संख्या सर्वाधिक आहे.
आता हा कार्यक्रम 'जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र' झाला असून राज्यातील सर्व शाळा प्रगत करण्याचं आणि 100 टक्के शिक्षक तंत्रस्नेही बनविण्याचं या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे.
लेखन: स्नेहल बनसोडे- शेलुडकर.

ढोलकी झाली बोलकी

जिल्हा सोलापूर. माढा तालुका. इथला निलेश देवकुळे. शिक्षण बारावी. आर्थिक परिस्थिती हलाखीची, कुठलंही शास्त्रीय संगीताचं शिक्षण नाही. केवळ २६ वर्षांच्या या तरुणाने ढोलकी वादक म्हणून महाराष्ट्रात नाव कमावलं आहे. सातव्या वर्षीच त्याला ढोलकी वाजवण्याचं वेड लागलं. पण, ढोलकी खरेदी करण्याची ऐपत नव्हती. मग हाताला लागेल ती वस्तू वाजवून तो आपली हौस भागवून घेऊ लागला. अगदी जेवणाचे डब्बे, शाळेतील बँच, टेबल यांनाच तो ढोलकी समजून बडवायचा. पाण्याच्या हंड्यांना प्लास्टिक कागद बांधून सराव केल्याचं तो सांगतो. त्याच्या वयाच्या ९ व्या वर्षी दिवंगत अभिनेते निळू फुले यांनी त्याच्या ढोलकीला दाद देत शाब्बासकी दिली होती. मागच्या वर्षी दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर झालेल्या ‘ढोलकी झाली बोलकी’ या कार्यक्रमाचा तो विजेता ठरला . 
कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी जिद्द आणि चिकाटी असेल तर साध्य दूर नाही, हे त्याने दाखवून दिलं आहे. त्याची आई नीता देवकुळे माढा नगरपंचायतीमध्ये सफाई कामगार आहेत. त्यांनाही महाराष्ट्र शासनाचा लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कार मिळाला आहे. “लहानपणापासूनची जिद्द सोडली नाही. म्हणूनच आज इथपर्यंत आलो”, निलेश सांगतो. पिंपरी चिंचवड बाल कलाकार ढोलकी वादक पुरस्कार, माढा येथील सह्याद्री विशेष गौरव पुरस्कार, टेंभुर्णी फेस्टीव्हल जीवन गौरव असे काही पुरस्कार त्याला मिळाले आहेत.

निलेश देवकुळे संपर्क क्र. – 9975117145

खणखणीत...व्हीलचेअरवरून गुजगोष्टी खणखणीत...
काल अचानक सिद्धेश, ऋजुता, प्रियांका आणि संगीता पुण्यातून कोल्हापूर फिरायचं म्हणून आले आणि घरी भेटायला आल्यावर गप्पांचा जो फड जमला की नंतर पन्हाळा, बर्फाचा गोळा, पिठलंभाकरी वगैरे कॅन्सल करून सगळे इथंच थांबले. यातली ऋजुता सिद्धेशची बायको आणि प्रियांका-संगीता विद्यार्थिनी. अर्थात ‘सर’ असणारा सिद्धेश काही फार ज्येष्ठबिष्ट नाहीये. बरेचदा त्याचे विद्यार्थी त्याच्यापेक्षा वयानं मोठेही निघतात. सिद्धेश युनियन बँक ऑफ इंडियामध्ये काम करतो. अतिशय तंत्र कुशल! तो पूर्ण अंध आहे, अगदी अंधार उजेडाची जाणीवही होत नाही. प्रेमात पडून, पळूनबिळून जाऊन त्याचं नि ऋजुताचं लग्न झालेलं. त्यानं नि ऋजुतानं कसा सगळ्याचा मेळ जुळवला हे सांगताना स्वारी भलतीच रंगात आलेली आणि संगीता व प्रियांका अस्वस्थ झालेल्या की सर, नंतर सांगा तुमची श्टोरी... आत्ता पन्हाळ्याला जाऊया.
स्वत:च्या शारीरिक अडचणींशिवाय फार काही कळत नव्हतं अशा काळात कधीतरी माझ्या मैत्रिणीला, परिमला भटला मी विचारलेलं, काय गं, अज्जिबात दिसत नसताना कस्सकाय हिमालय चढायचा? नि बघायचं काय? दिसत नाही म्हटल्यावर भीती जास्त की गं! का केलं तू हे सगळं? तर म्हणालेली, ‘‘अगं येडे, दिसत नाही म्हणून भीती कमी. दिसलं की माणूस खोल दरीकडेच आधी बघतो, मग त्याचं अवसान जातं. मी दिसत नसल्यामुळं वरही नाही नि खालीही नाही बघत. फक्त तिथं असते. जे करायचं ते करते म्हणजे फक्त जाणवणारी वाट चढते किंवा उतरते. आणि का करायचं म्हणशील तर आपल्या भोवतीची हवा कळते. तिचं विरळ होत जाणं, वारा, उंची नीट समजतं. हे अनुभवायसाठी करायचे प्लॅन्स.’’ - या उत्तराची खूण मनात नीट जपल्यामुळं सिद्धेश अचानक सुट्टी घेऊन पर्यटनाचा प्लॅन का करतो हे विचारण्याचा प्रश्नच नव्हता. फिरायची प्रत्येकाची एक वेगळी तर्‍हा असते. अनुभवण्याचा प्रत्येकाचा एक आपलासा पैस असतो. एका जागी बसून माणसं सतत फिरती व पाहती असू शकतात. एका कार्यक्रमात मेघना पेठेंना व्याख्यान संपल्यावर कुणी विचारलं होतं, ‘लेखक होण्यासाठी खूप भटकंती करावी लागते का? कारण त्यातूनच अनुभव गोळा होतात!’ तेव्हा मेघना पेठे म्हणाल्या होत्या, मला जे उमगलेलं असतं ते लिहिण्यासाठी मला घराचा उंबरा ओलांडण्याचीही गरज वाटत नाही. लिहिणं कशातून येतं याचं ज्याचंत्याचं संचित निराळं असतं. 

एक कुतूहल होतं म्हणून सिद्धेशला म्हटलं, अनेक विकलांगांची विशेषत: बँकेसारख्या व्यवस्थेशी संबंधित अंध माणसांची तक्रार आहे की त्यांच्या क्षमतेप्रमाणं त्यांच्याकडून काम घेतलं जात नाही, आवश्यक ती पायाभूत सुविधा मिळत नाही. तुझा काय अनुभव? सिद्धेशनं उत्तरादाखल जो अनुभव सांगितला त्यानं मी व्हीलचेअरमध्येच आणखी थोडी ताठ बसले नि न राहवून टाळ्याही पिटल्या. आपल्या कामाची गुणवत्ता सिद्ध केली नि आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं की सिस्टीम तुमच्यासाठी जरूर उभी राहते! काम करणारा माणूस अपंग आहे की सुदृढ यात फरक न करता व अवाजवी सहानुभूती किंवा हेटाळणी न दाखवता माणसं तुमच्यासाठी आवाज उठवतात तेव्हा कामाचा हुरुप जो काही वाढतो की बोलायची सोय नाही.
सिद्धेशनं उत्तर दिलं होतं ... ‘‘काम भर्रपूर आहे गं. उलट इतरांपेक्षा जास्तच. अलीकडचंच सांगतो, बँकेत नेहमीप्रमाणं मी एटीएम व डिफॉजिटिंगचं बघत होतो. गर्दी चिक्कार होती त्यामुळं वेळ लागत होता. एकजण तणतणत गर्दी का आहे हे बघायला आले. त्यांना दिसलं की सगळं ऑपरेट करणारा माझ्यासारखा अंध माणूस आहे. ते वैतागत मॅनेजर साहेबांकडे गेले, म्हणाले, ‘‘असली माणसं भरून तुम्ही कामाची नि वेळेची खोटी कशाकरता करता? गर्दी आवरेना झालीय, कुणीतरी व्यवस्थित माणूस नेमा नि याला बाजूला करा.’’ मॅनेजर साहेबांनी फार काही न बोलता त्या माणसाच्या हातात अकाऊंट बंद करण्याचा फॉर्म दिला नि म्हणाले, आमच्या माणसांच्या कामाची खात्री आहे म्हणून ते 'जे' काम करताहेत 'ते' करताहेत नि उत्कृष्ट करताहेत. त्याविषयी तक्रार नसताना ती निर्माण करत असाल तर तुम्ही आमच्या बँकेत नाही आलात तरी चालेल!’’
- सोनाली नवांगुळ

केल्याने मार्केटिंग...


पॉम..पॉम...पॉम... हॉर्नचा आवाज येतो. घरा-घरातील स्त्री-पुरूष ताजी भाजी खरेदी करण्यासाठी गडबडीने घराबाहेर येतात. चवळी, गवार, वांगी, टमॉटो, भेंडी, कोथींबीर अशी ताजी, स्वच्छ भाजी आणणाऱ्या गोविंद पांडुरंग गणगे यांच्या सायकलभोवती क्षणात गर्दी होते. आणि पाहता पाहता सगळी भाजी संपून जाते. 
नांदेड शहराच्या जवळच वसलेलं सायाळ गाव. येथील गोविंद पांडूरंग गणगे वीस वर्षापासून शेती आणि भाजीविक्रीचा व्यवसाय करत आहेत. सुरुवात झाली ती केवळ दीड एकर जमिनीतून. तुटपुंज्या उत्पन्नावर गोविंदरावांचे आई-वेडील, भाऊ, पत्नी, मुलं असं आठ-दहाजणांचं कुटुंब जगत होतं. गोविंदराव थोरले, त्यामुळे कुटुंबाला हालाखीतून बाहेर काढण्याची त्यांची तळमळ. पण दीड एकर शेतीतून किती आणि काय होणार? एकदा त्यांचे मामा हैद्राबादला निघाले होते. सोबत गोविंदालाही घेतलं. आंध्रप्रदेशच्या राजधानीत जायचा अनुभव गोविंदासाठी नवाच ठरला. मामाचं काम चालू राहिलं आणि सोबत महानगरातील लोकांच्या हालचाली, उद्योग-धंदा गोविंदाला पाहायला मिळाला. एका ठिकाणी काही लोक सायकलवर टोपलीतून भाजी विकताना दिसले. गोविंदाला कळलं की, ते शेतकरी आहेत आणि त्यांच्या शेतातील भाजी ते सायकलवर आणून विकत आहेत. यात त्यांना चांगला फायदाही होतो. ही कल्पनाच गोविंदाला मनापासून भावली. आपणही आपल्या दीड एकरात भाजी लावायची आणि ती नांदेडला जाऊन विकायची, हे तिथंच ठरलं. घरीही सगळ्यांनी कल्पना उचलून धरली. सगळं घर झटून कामाला लागलं. 

हा काळ होता 20 वर्षापूर्वीचा. लोक तेव्हा आठवडी बाजारातून भाजी खरेदी करत. नांदेडची तेव्हाची लोकसंख्याही तशी कमीच. पण शहर वाढू लागलं होतं. मोठ्या कुटुंबांची संख्या कमी होऊन ‘हम दो, हमारे दो’ संस्कृती नांदेड शहरात उदयास येत होती. नोकरदारांना बाजारहाटासाठी सवड मिळत नव्हती. त्याचवेळी गोविंदने नवी कोरी सायकल खरेदी केली. त्यावर टोपली ठेवण्यासाठी कॅरिअर बसवलं. शेतातल्या ताज्या भाज्या भरल्या आणि गल्लीतून भाजी विक्रीस सुरूवात केली. सायकलवर भाजी ही कल्पना नांदेडवासीयांसाठी नवीनच. त्यामुळे लोक कुतुहलाने पाहत. पण त्याची रोज ताजी, स्वच्छ भाजी पाहतापाहता गृहिणींमध्ये लोकप्रिय झाली. 
भाजीविक्रीच्या कमाईतून गोविंदने आणखी दीड एकर जमीन घेतली. घर बांधलं. गाडी घेतली. त्यांचा मोठा मुलगा शुभमं पुण्यात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतो आहे. तर धाकटा वैभव बारावीला आहे. मुलांच्या शिक्षणाचा खर्चदेखील ते शेती आणि भाजीच्या व्यवसायावर समर्थपणे पेलत आहेत.
गोविंद गणगे म्हणाले, “मी पहाटे चार वाजता कामाला सुरुवात करतो. एक एकरात सिझनप्रमाणे भाज्या लावतो. देखभालीचं काम आई-वडिल, पत्नी, भाऊ सांभाळतात. भाजी तोडण्यासाठी दोन बाया 100 रूपये रोजाने आहेत. पहाटे सर्व भाजीपाला घेऊन नांदेडला येतो. जास्तीचा भाजीपाला बिटावर विकून टाकतो. आता माझे स्वतःचे काही ग्राहक आहेत. या भाजीपाला विक्रीत मला खर्च वजा जाता रोज 700 ते 800 रूपये इतका फायदा मिळतो. तसंच उर्वरित दोन एकरात गहु, ऊस, केळी यासारख्या पिकांचं चांगलं उत्पादन मिळतं. वर्षाकाठी सात-आठ लाखाची उलाढाल होते. तर तीन-चार लाख रूपयांचा फायदा मिळतो.”
शेती व्यवसायाला जोड म्हणून गणगे यांनी भाजी विक्री सुरु केली. कल्पकता, जिद्द, चिकाटी, मेहनतीमुळे या सामान्य शेतकर्‍याचं सगळं जीवन बदलून गेलं. एक साधा शेतकरी मार्केटींगची कौशल्यं शिकून प्रगती करतो, हे उत्तम उदाहरण ठरावं.


- उन्मेष गौरकर, नांदेड

मुलांना कसं वाढवायचं, कसं शिकवायचं


मुलांना कसं वाढवायचं, कसं शिकवायचं वगैरे प्रश्नच गैरलागू होते. मुळात मी आई होण्याचा चान्सच घेणार नाही, असं माझ्यासकट मला ओळखणाऱ्याना वाटत होतं. पण, एकदा नाही, दोनदा आई झाले. दोन्ही वेळेला आम्हा दोघांसाठी हा अनुभव प्रचंड आनंदाचा, बरंच काही शिकवणारा होता.
आनंदाची सुरुवात प्रेग्नंट असल्यापासून झाली. पहिल्या वेळी मला वैद्यकीय कारणांमुळे नोकरी सोडून पूर्ण वेळ घरी बसावं लागलं. हा मोठा बदल होता आयुष्यातला. डेस्कवर नाइट शिफ्ट करून, सतत नवनवीन माणसांना भेटणारं काम सोडून घरी बसणं काहीसं कंटाळवाणं होतं. पण, बाळाशी बोलण्याचा छंद जडला... जो आजही कायम आहे. आम्ही तिघी खूप बोलतो. या दोघींना तर कधीकधी - गप्पं बसा गं बायांनो, असं सांगावं लागतं. आम्हा दोघांनाही चांगले सिनेमे, पुस्तकं, गाणी यांची आवड. त्यामुळे घरी असण्याचा काळ मस्त सत्कारणी लागला. खूप सिनेमे पाहिले, पुस्तकं वाचली, गाणी ऐकली... धमाल केली.
किमया आमच्या जगात, आमच्या घरात आल्यानंतर गोष्टी बदलल्या. तिच्या खाण्यापिण्यापासून तिने काय, कसं शिकावं याचा अभ्यास सुरू झाला. अभ्यास पुस्तकं, संस्कारवर्ग पद्धतीचा नव्हता. हे बाळ मोठं झाल्यानंतर आपल्याला सगळ्याच गोष्टींमध्ये कंपनी देणार आहे, मग तिने कसं असायला हवं, हे नकळतपणे ठरत होतं. सुदैवाने, आमची दोघांची मतं याबाबतीतही बर्‍याच अंशी जुळतात. दोन्ही मुलींना लहानपणापासून आम्ही खूप गाणी ऐकवली, चित्रांची पुस्तकं दिली, रंगही अगदी लहान असल्यापासून त्यांच्या खेळण्याचा भाग आहेत. दोघींना अनेक ब्लॅक ऍण्ड व्हाईट जमान्यातील गाणीही माहीत आहेत.
किमया लहान असल्यापासून घरी आम्ही दोघीच असायचो. तिचा बाबा रात्री बराच उशीरा यायचा. तिच्यामध्ये, कसा कोण जाणे, पण अगदी लहान वयातच समजुतदारपणा आला. छोट्याशा किमयाला चटईवर खेळण्यांच्या मध्ये ठेवून मी तिला दिसत राहीन अशा पद्धतीने सगळी कामं करायचे. आणि ही छान खेळत रहायची.
पण, आमची किमू किती शहाणी आहे, हे मला ज्या प्रसंगातून कळलं तो माझ्यासाठी सुखद धक्का होता. किमया अडीच वर्षांची असताना मी दुसर्‍यांदा प्रेग्नंट राहिले. ही पहिली मुलगी. लाडाकोडाची. आम्ही दोघी एका लग्नाला गेलो होतो. तिथून परतताना किमया प्रचंड दमली होती. तिला उचलून घेण्यावाचून पर्याय नव्हता. हे नवर्‍याला कळल्यावर त्याला जरा काळजी वाटली. त्याने एका रात्री तिला छान जवळ घेऊन समजावलं, आईच्या पोटात आता छोटं बाळ आहे. काही काळानंतर ते बाळ तुझ्यासोबत असेल. पण, आईला आता त्रास द्यायचा नाही, तिची काळजी घ्यायची, तिला उचलून घ्यायला नको सांगू. मी घेईन तुला उचलून वगैरे...
आता हे लिहितानाही डोळ्यांत पाणी येतं... या अडीच वर्षांच्या मुलीने पुन्हा मला कधी उचलून घ्यायला सांगितलं नाही. तिला खरंच ते सगळं कळलं होतं. कधीकधी तिच्या बालपणावर अन्याय करतोय का, या जाणीवेने मलाच वाईट वाटत रहायचं. पण, ही रोज आपण बाळाला पण गाणी ऐकवू म्हणून तिच्यासोबत मलाही सतत वेगवेगळी गाणी म्हणायला लावायची.
काही महिन्यांनी आमचं दुसरं पात्र आलं. हे एक वेगळंच रसायन आहे. जन्माला आल्याबरोबर रडून हॉस्पिटल जागं करणारी अनया बाबाच्या हातात आली आणि क्षणात शांत झाली. त्या क्षणाला मी निर्धास्त झाले. दोन मुलं आपण छान वाढवू शकू, हा कॉन्फिडन्स नव्याने आला. ही मुलगी किमयाच्या अगदी विरुद्ध स्वभावाची. अगदी लहान वयापासून तिची ठाम मतं आहेत. किमयाचा आज्ञाधारकपणा आणि अनयाचा बंडखोरपणा अशा दोन दगडांवर आमची पालक म्हणून कसरत सुरू असते.
मध्यतंरी मिरारोडच्या शाळेत एका लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाले. या घटनेने मी हादरून गेले. मुलींना फार न घाबरवता अशा प्रसंगांची कल्पना देणं फार गरजेचं होतं. मग, त्यांच्यासाठी नवनव्या गोष्टी रचल्या. काही दिवसांनी इमारतीतल्या एका ओळखीच्या इसमाने सांगितलं, “आपकी अनया बहोत स्मार्ट है। मैंने पूछा बाइक पे घुमा के लाता हूं तो उसने कहा नही, मम्माने कहा है किसी के साथ नहीं जाना और मुझे बहोत जोरसे चिल्लाना भी आता है।“
भविष्यात काही बरंवाईट होणं, न होणं आपल्या हातात नाही. पण, मुलींना काही शिकवण्याची जबाबदारी योग्य दिशेने चालली आहे, असं त्या क्षणाला नक्की वाटलं.
आम्हा दोघांमध्ये व्यवस्थापन हा गुण नाही. वेळ, पैसा, कामं अशा अनेक बाबतीत आम्ही काहीसे बेशिस्त आहोत. त्याचे फटकेही बसतात. पण, हे मुलींमध्ये येऊ न देणं, ही मला जबाबदारी वाटते. त्यामुळे, त्यांच्या बाबाला मी जाच करते, असं वाटत असलं तरी मी त्यांच्यासाठीचं वेळापत्रक आखते, त्यांनी आठवडाभरात काय खायला हवं वगैरे ठरवते. अजून तरी त्या दोघी हे वेळापत्रक फॉलो करतात, हे माझं नशिबच म्हणायचं. या वेळापत्रकात आमचा तिघींचा एकत्र नाचण्याचा, शिळोप्याच्या गप्पा मारण्याचा, गोष्टी सांगण्याचा वेळ माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे.
त्यांच्यासोबत वय विसरून नाचताना खरंच अनेक गोष्टींचा विसर पडतो. कदाचित त्यातून ही आपल्यासोबत नाचणारी आपली आई आपल्यासारखीच आहे, आपली मैत्रिण आहे, ही भावना मी त्यांच्यात रुजवू शकेन
प्रवास पालकत्वाचा: अमिता दरेकर

प्रयोगशील लक्ष्मीबाई !

लक्ष्मीबाई नेहमीप्रमाणे आपल्या शेतात राबत होत्या. उमरखेडचे आमदा‍र राजेंद्र नजरधने लक्ष्मीबाईंना शोधत त्यांच्या शेतात पोहचले. महाराष्ट्र शासनाने लक्ष्मीबाईंची 'जिजामाता कृषीभूषण' पुरस्कारासाठी निवड केल्याची बातमी त्यांनी लक्ष्मीबाईंना सांगितली. “शेतात प्रामाणिकपणे राबणाऱ्या सेवाव्रतीचा शासनाने सन्मान केल्याची बातमीही शेतात राबतानाच कळावी, यापेक्षा मोठा आनंद कोणता असावा,” अशी प्रतिक्रिया लक्ष्मीबाईंनी व्यक्त केली. नुकतंच ११ जुलै रोजी मुंबई येथे राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या हस्ते लक्ष्मीबाईंना जिजामाता कृषीभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या प्रयोगशीलतेची ही गोष्ट.
जिल्हा यवतमाळ. येथील महागाव तालुक्यातील सवना गावच्या लक्ष्मीबाई बापूजी पारवेकर. घरी कोरडवाहू शेती. प्रपंच चालवताना दमछाक नेहमीचीच. यावर उपाय शोधायला सुरुवात केली लक्ष्मीबाईंनी. १९९५ मध्ये त्यांनी पती बापूजींच्या मदतीने शेतात विहीर खोदली. हीच लक्ष्मीबाईंच्या प्रयोगांची सुरूवात. ऊस लावला. त्यासाठी कृषीतज्ञांचं मार्गदर्शन घेतलं आणि ऊसाचं विक्रमी उत्पन्न मिळवलं. २००५ मध्ये अंजीर शेतीचा प्रयोग. राहुरीच्या कृषी विद्यापीठातून रोपं आणली. अडीच एकरात त्याची लागवड केली.अंजीराच्या झाडांपासून ७ व्या वर्षी उत्पन्न सुरू होतं. पण २०१०च्या दुष्काळात झाडं वाळली. अंजीर शेती फसल्याने त्यांच्यावर बरीच टीकाही झाली. मात्र त्या डगमगल्या नाही. त्यानंतर त्यांनी गुलाब शेतीचा प्रयोग केला. एक एकरात अडीच हजार गुलाबाची कलमं लावली. सहा महिन्यातच गुलाब शेतीचा प्रयोग यशस्वी झाला. त्यांच्या शेतातून दररोज नागपूर, नांदेड, यवतमाळ, पुसदच्या मार्केटला फुलं जाऊ लागली. खर्च वजा जाता त्यांना मासिक २५ ते ३० हजार रुपयांचं उत्पन्न सुरू झालं.
लक्ष्मीबाईंचा आत्मविश्वास वाढला. पुढचं पाऊल होतं केळीच्या शेतीचं. एक हेक्टर क्षेत्रात केळी लागवडीला सुरुवात झाली. आज ८ एकर शेती केळीने व्यापली आहे. परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून १०० हेक्टर क्षेत्रात केळीची यशस्वी लागवड त्यांनी केली. आता त्यांचं शेत इतर शेतकऱ्यांसाठी 'मॉडेल फार्म' झालं आहे. “प्रयोगशील शेतीत पारंपरिक शेतीपेक्षा कष्ट अधिक. मात्र परिश्रमाशिवाय आणि रिस्क घेतल्याशिवाय यश मिळत नाही”, असं लक्ष्मीबाई सांगतात. शेतीमुळे सामाजिक प्रतिष्ठा मिळाली. आर्थिक स्थिती सुधारली असंही त्यांनी सांगितलं.
त्यांचा मुलगा, संभाजी पुण्यात कृषी विषयात बीएससी करतो आहे. तर दुसरा मुलगा तानाजी विदर्भ क्रिकेट असोसिएशन नागपूर क्लब, येथे प्रशिक्षण घेतो आहे. मुलगी शिवानी बारावीत आहे. तर, पती बापूजी हे राज्य परिवहन महामंडळात कार्यरत आहेत.
शेती म्हणजे नुकसान या सध्याच्या समजालाच लक्ष्मीबाईंनी छेद दिला आहे. त्यासाठी हवेत कष्ट आणि कल्पकता हेही त्यांनी दाखवून दिलं आहे

- नितीन पखाले, यवतमाळ 

सरकारी कार्यालयात वृक्ष लागवडीचा "मिसाळ पॅटर्न"धुळे इथलं प्रांताधिकारी कार्यालय. प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी कार्यालय परिसरातील एक एकर क्षेत्रात तब्बल १०८ झाडं लावली आणि जगवलीही आहेत. ठराविक चौकटीत काम न करता बँक आणि सेवाभावी संस्थांच्या सामाजिक निधीतून त्यांनी प्रांताधिकार कार्यालयात हिरवळीचे बेट उभारायला सुरुवात केली आहे.
मागील वर्षी हा वृक्ष लागवड उपक्रम सुरु झाला. मिसाळ यांनी विचारपूर्वक आणि स्थानिक वातावरणाला साजेशा रोपांची निवड केली. अमलताश, सिसव, शिरीष, बदाम पिंपळ, वड, निंब, सप्तपर्णी अशी बहुरंगी, सावली देणारी, शोभा वाढवणारी झाडं लावली. झाडं लावताना भविष्यात ती तोडली जाणार नाहीत असं नियोजन करूनच रोपांची लागवड करण्यात आली आहे.
हे सर्व वृक्ष पाच ते दहा फुटांपर्यंत वाढले आहेत. झाडं जगवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणाच त्यांनी उभारली आहे. प्रत्येक झाडाला पिंजरा, सिमिंटचे कुंडे बांधण्यात आले असून ठिबक सिंचनाची सुविधाही केली आहे. एक एकर परिसरातील १२ कार्यालयांसमोर १०८ झाड डौलाने उभी आहेत.
विशेष म्हणजे, मिसाळ यांनी कृषीतज्ञांचा सल्ला घेऊन झाडांना फवारणी आणि खतांचे डोस दिले आहेत. प्रांताधिकारी मिसाळ आणि त्यांचे सहकारी नायब तहसीलदार या संपूर्ण परिसरात दर आठवड्याला फेरफटका मारतात आणि झाडांच्या वाढीचा आढावा घेतात. एरवी सरकारी योजनांचा बोऱ्या वाजतो असं आपण म्हणतो. पण,धुळ्यात या कार्यालयात झाडं लावण्याची योजना मनापासून राबवल्याबद्दल नागरिकही समाधान व्यक्त करतात. सरकारी कार्यालयात छोट्या रोपांची झाडं बनविण्याचा हा "मिसाळ पॅटर्न" इतरांनीही अनुकरणात आणावा असाच आहे.
- प्रशांत परदेशी, धुळे 

यावर्षी नेहासुद्धा आली सहलीला!

सुजाण शिक्षक जाणत्या शाळा
, जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा मोहगाव तिल्ली, तालुका गोरेगाव, जिल्हा गोंदिया.
2016 साली आमच्या मोहगाव तिल्लीच्या शाळेची सहल नागपूरच्या 'फन अन्ड फूड पार्क' मध्ये गेली होती. विद्यार्थ्यांनी वॉटर पार्क खूप एन्जॉय केला. तिथून परतल्यावर मी आमच्या वर्गातील विद्यार्थ्यांसोबत सहलीत केलेल्या मजेविषयी बोलत होतो. सहलीला आलेले विद्यार्थी मजा रंगवून सांगत होते, तर येऊ न शकलेले विद्यार्थी डोळे विस्फारुन ऐकत होते. "मला तर वाटतंय की दरवर्षी जावं तिथं सहलीला!" असं मी बोललो आणि वर्गात विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवल्या.
त्या विद्यार्थ्यांमध्ये नेहाही होती. ती एकीकडे टाळ्या वाजवत होती, तर दुसरीकडे तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. " नेहा, बेटा काय झालं? " मी नेहाला विचारलं. ती म्हणाली, सर, मलाही सहलीला यायचं होतं. पण मला घरून पैसे नाय मिळाले. मीपण मजा केली असती खूप’. असं म्हणून ती हुंदके देऊ लागली. मी तिच्या डोक्यावरुन हात फिरवला आणि "पुढच्या वर्षी तुलासुद्धा सहलीला नेणार" असं आश्वासन देऊन तिला शांत केलं.
यापुढे वर्गासमोर आठवडाभर तरी सहलीचा विषय काढायचा नाही असा निश्चय मी केला. नेहासारखी जी मुलं गरिबीमुळे सहलीला येऊ शकली नाहीत, त्यांना नक्कीच वाईट वाटत असणार. नेहाच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. सहलीला जावंसं वाटणं साहजिक आहे. पण ग्रामीण भागात हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे बहुतांश पालकांना सहलीसाठी एकरकमी चार-पाचशे रुपये देणं कठीण जातं.
मी सतत नेहाचाच विचार करत होतो. आनंद मिळवणं हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी प्रत्येकाला सहलीला येता यायला हवं, असं माझं मन मला सांगत होतं. शेवटी हा विषय मी माझ्या वर्गासमोर काढला. त्यासाठी विद्यार्थ्यांनीच उपाय सुचवला- सहलीसाठीचे पैसे वर्षभर आधी साठविण्याचा आणि त्यातून सुरु झाला- पिकनिक फंड.
मी विद्यार्थ्यांना सांगितलं, "तुम्हांला महिन्यातून एकदा- दोनदा खाऊसाठी मिळणारे 10-20 रुपये आणि अधून मधून येणाऱ्या पाहुण्यांनी दिलेले 25-50 रुपये फंडात जमा करा. मात्र या फंडासाठी पैसे द्याच असा हट्ट घरी करायचा नाही, जेवढे पैसे सहज मिळतील ते जमा करायचे." ही कल्पना झकास लागू पडली. खाऊचे पैसे पिकनिक फंडात जमा होऊ लागले. त्यामुळे बाहेरचं अरबट चरबट खाणं थांबलं. शिवाय फेब्रुवारी 2017 पर्यंत फंडात तब्बल 13 हजार रुपये जमा झाले.
विशेष म्हणजे नेहानेसुद्धा या फंडात जवळपास चारेकशे रूपये जमा केले आहेत. गेल्या वर्षी नेहाला दिलेलं वचन आम्हांला पूर्ण करता आलं. यावर्षी ३५ विद्यार्थ्यांनी छत्तीसगडच्या भिलाईमधील ‘मैत्री बागे’ला भेट दिली. बागेमधील हिरवळ, फुले, संगीताच्या तालावर डोलणारी कारंजी, छोटीशी टॉय ट्रेन याचा आनंद मुलांनी घेतला. यापूर्वी कधीच सहलीला न आलेल्या नेहा आणि तिच्यासारख्या इतर विद्यार्थ्यांच्या डोळ्यातला आनंद मला कुठल्याही पुरस्कारापेक्षा जास्त महत्त्वाचा वाटतो.
लेखन- अशोक चेपटे, पदवीधर शिक्षक

कर के देखो


निर्माण - १८ ते २८ वर्षांच्या मुला-मुलींसाठी
सोलापूरची सीए झालेली सारिका. तिने निर्माण उपक्रमाच्या पाचव्या तुकडीत भाग घेतला. आता महिलांना आर्थिकदृष्ट्या कसं स्वतंत्र होता येईल, महिलांनी व्यवसाय कसा सुरु करायचा, बँकेमार्फत निधी कसा मिळवायचा याचं मार्गदर्शन ती पुण्यात राहून करते. सारिकासारख्यांना समाजासाठी काही करावसं वाटलं, तरी नक्की काय करायचं, हे कळत नाही. 
`निर्माण’ उपक्रम हा असं काही करण्याची इच्छा असणाऱ्या १८ ते २८ वर्षांच्या मुला-मुलींसाठी नक्कीच चांगला पर्याय आहे. `निर्माण’मध्ये निव्वळ व्यक्तिमत्वविकास नाही, तर सामाजिक बदल घडवण्याला दिशा दिली जाते.
`निर्माण’चे एक संस्थापक सदस्य अमृत बंग यांच्याशी `नवी उमेद’च्या मुंबई प्रतिनिधी मेघना धर्मेश यांनी केलेली बातचीत.
`निर्माण’ची गरज का वाटली ?
- १९७०-८० मध्ये महाराष्ट्रात सुरु झालेली सामाजिक चळवळ १९९० च्या सुमारास बऱ्यापैकी थंडावली होती. सामाजिक संस्था दुय्यम स्थानावर गेल्यासारखं झालं. एक प्रकारची पोकळीच निर्माण झाली होती म्हणा ना..दुसरं म्हणजे युवकांची अवस्था शिक्षण घेऊनही काही हेतू, लक्ष्य नसल्यासारखी झाली होती. भरकटलेपण आलं होत. युवकांना न्यूनगंड, निराशा, निरुद्देशा यांनी घेरलं होतं. माहिती, कौशल्य असून सुद्धा Sense of Purpose हरवलं होतं. समाजातल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी युवा पिढीच्या माहिती, कौशल्याचा समन्वय साधण्याच्या उद्देशाने `निर्माण’ अस्तित्वात आलं.
कर के देखो हा `निर्माण’चं सूत्र आहे. आपण चाकोरी सोडायला घाबरतो, असं वाटतं का?
- हो नक्कीच. `निर्माण’ हे मुला-मुलींना चाकोरी सोडून स्वतःचे रस्ते, पायवाट शोधायला सांगतं. आयुष्याचा खऱ्या अर्थाने अनुभव घ्या. समाजाचे प्रश्न समजून घ्या, उपाय शोधा हे सांगतं.
`निर्माण’ शिबिराच्या आतापर्यंत ७ तुकड्या (batches)झाल्या आहेत. आता १५ ऑगस्ट सुरु होणारी आठवी batch असणार आहे. म्हणजे `निर्माण’ला मागणी आहे ही आपल्या समाजाची गरज झाली आहे, असं म्हणायचं का ? आणि मुलींचा प्रतिसाद कसा आहे?
- आता पर्यंत ७ तुकड्यामध्ये मिळून ८७३ मुलं शिबिरात येऊन गेली. आता एका तुकडीत १५० मुल असतात ज्यात ४०% मुली आहेत. महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यापैकीं ३४ जिल्ह्यामधुन मुलं येतातं .इथे युवा पिढीला हेतू, दिशा मिळते. त्यामुळे त्यांना `निर्माण’चा भाग होणं आवडू लागलंय. एक अतिशय वेगळ्या जीवनशैलचा अनुभव `निर्माण’ देतय. `निर्माण’मधून शिक्षित झालेली मुलं-मुली वेगवेगळ्या संस्थांत किंवा स्वत:ची संस्था काढून सामाजिक समस्या सोडवतायत यापेक्षा समाधानाची गोष्ट कुठली ? आपणसुद्धा बदल घडवू शकतो याची खात्री त्यांना पटतेय.
मुलाखतीच्या शेवटी अमृतचं एकचं सांगणं होतं की जर आपण मानसिकता बदलली, मी इथे देण्यासाठी आहे, घेण्यासाठी नाही, असं मनाशी पक्कं केलं तर सकारात्मक बदल नक्कीच घडून येईल.

 मेघना धर्मेश 

इन्सानियत की बरकत दिल्ला...


व्हीलचेअरवरून गुजगोष्टी : इन्सानियत की बरकत दिल्ला...
शाळा नं ३. चौथीपर्यंत. त्यावेळी जातीधर्म वगैरे काही कळत नव्हतं. अनेक मैत्रिणींप्रमाणेच नफिजा आणि हसीना सुद्धा. फक्त इतकंच की त्या इतरांपेक्षा थोड्या वेगळ्या आहेत असं जाणवायचं. त्यांना इतक्या लहानपणी ओढणी नि सलवारकमीज घालायला मिळायचा यामुळं त्यांचा दुस्वास वाटायचा. आम्हाला फारच सहन नाही झालं तर आम्ही टॉवेलवर ओढणीची तहान भागवायचो. - त्यांच्या घरापाशी कुतूहल म्हणून घुटमळायचो. कधीतरी आतही जायचो. घर घरासारखंच. परिस्थिती बेताची असणार्‍यांचं असतं तसं. मात्र घरामध्ये एक विशिष्ट वास जाणवायचा. तो कशाचा किंवा चांगला की नकोसा हे कळायचं नाही. पण पुढे कधी मुस्लिम मुलामुलींना भेटले तेव्हा तो विशिष्ट वास शोधत राहिले. त्या बाळबोध वयात वाटायचं की कुणी मुसलमान असेल तर असा वास असणार त्यांच्या घरात नि अंगाला. कुणीतरी मुलींपैकीच सांगितलं की ते दर शुक्रवारी अंघोळ करतात वगैरे नि त्यांना पाच वेळा नमाज पढावा लागतो. मी त्यावेळी मनात म्हटलं होतं, एकावेळी शुभंकरोती म्हणताना इतकं बोलणं खायला लागतं, पाच शुभंकरोत्या कुणी पढाव्यात! मग पुढे माझ्या आयुष्याला निराळं वळण लागलं नि त्या मुली भेटल्याही नाहीत. गावातल्या मशीदीतून अजान यायची ती ऐकायला आवडायची, सवयीची होती. मोठं होत जाताना बाबरी मशीदीविषयी नि निमित्तानं फार दिसत गेलं, दहशतवाद्यांचं जगभरचं जाळं नि त्यातल्या मुसलमान लोकांची संख्या वगैरे बातम्यांमधून पोहोचत गेली. तरीही मुसलमानांविषयी काही टोकाचं मनात तयार झालं नाही. बातम्यांमधून जे नकारात्मक दिसायचं तसं गावात मुळात नव्हतंच. अजूनही तसं चित्र नाही.

खूप वर्ष वाटायचं की मुसलमान कुटुंबाशी आपण जोडलं जायला हवं होतं. त्यांच्याकडच्यांना गणपतीगौरीदिवाळीदसर्‍यापासून सगळं ठाऊक असतं, आपल्याला त्यांच्या सणवारांचे तपशील ठाऊक नाहीत. हे काही बरोबर नाही. कामाच्या रगाड्यात ते तसंच राहिलं. पुढे खलील मोमीन सारखे अब्बू आणि नवं कुटुंब मिळालं, पण ते फार लांब. रोजचं काही समजणं शक्यच नाही. त्यांची मुलगी-माझी बहीण नासरीन मला टिपिकल शिरखुर्मा शिकवून गेली तितकंच. महाद्वाररोडवर खरेदीची हौस भागवताना एक दिवस अनिस भेटला. कितीतरी दिवस मी त्याला अनिल नि पुढे अंनिस म्हणून हाक मारायचे. त्याच्या कॉस्मॅटिक्सच्या दुकानात मी येऊ शकावे म्हणून त्यानं रॅम्प बनवला नि तिथंच आमची मैत्री सुरु झाली.
कैक वर्ष राहिलेली हौस यावर्षी आपसूक भागायची होती. अनिसच्या कुटुंबानं मला इफ्तारीसाठी बोलावलं. रोजाचा तो सोळावा दिवस होता. ७ वाजून १० मिनीटांनी रोजा सोडायचा म्हणून गडबड करत त्याच्या घरी जेमतेम दहा मिनिटं आधी पोहोचलो. त्याची आजी महाबुब्बी, आई रझिया, आत्त्या लतिफा, आत्तेबहीण आयेशा, आत्तेभाऊ जुनैद, चुलतभाऊबहिण अकिब आणि आफिया असे सगळे आमची वाट बघत बसले होते. हॉलमध्ये मध्यभागी एक सुंदर मंद रंगाचं टेबलक्लॉथसारखं कापड बिछवलेलं नि त्यावर सगळे पदार्थ मांडलेले. या कापडाचं खूप महत्त्व. दस्तरखान म्हणतात त्याला. अन्नाला देवासारखं मानून आदराच्या भावनेनं दस्तरखान बिछवून मग त्यावर कलाकुसरीनं अन्न मांडलेलं असतं. मी इराणी सिनेमांमध्ये असं गोल करून खाताना पाहिलं होतं, पण त्यात दस्तरखानचं वेगळं महत्त्व लक्षात नव्हतं आलं. अनिसची आई आज खर्‍या अर्थानं दमलेली कारण पहिल्यांदाच सगळं काही शाकाहारी रांधण्याचं बरंच टेन्शन तिनं घेतलेलं. अनिसच्या भावानं ‘नियत’ केली नि दुवॉं म्हणायला लागला. मी, रामदास नि मंदा वगळता सगळेच दुवॉं म्हणू लागले. ‘बिस्मिल्लाह वालहा बरकत दिल्ला' - या अल्लाह हमारे खाने में बरकत अदा फरमा.. नंतर तीन घोट पाणी पिऊन खजूर खाऊन आम्ही रोजा सोडला. लालचुटुक सरबतासह दिमतीला बरंच खानपान सजलेलं होतं. हेच जेवण वाटल्यामुळं आम्ही उभाआडवा हात मारलेला, पण अस्सल शाकाहारी जेवण इतकं भारी होतं की ठिक्याला आपटून धान्याला जागा करतात तसं आम्ही ठाकूनठोकून पुन्हा दोन तासांनी खाण्यासाठी सज्ज झालो.
नुकतीच भारतपाक मॅच झाली होती. पुढं गप्पा मारताना अनिस म्हणाला, आम्ही इथलेच, पण मॅच पाकिस्ताननं जिंकल्यावर नमाजला जाताना घातलेला नक्षीदार कुर्ता बदलून साधा शर्ट घातला. उगीच कुणाला वाटू शकतं की मला पाकच्या जिंकण्याचा आनंद झालाय.
- आपलं मिसळून जाणं सिद्ध करण्यासाठी कुणाला काही करावं लागतं यानं माझ्या मनात तेव्हापासून अपराधीपण तयार होत गेलंय... 
- सोनाली नवांगुळ

ज्वारीचं शेत पक्ष्यांना अर्पण


साडेचार एकर ज्वारीचं पीक चौथ्या वाटणीने करायला
घेतलेलं. शाळू पोटरीला आलेला..अगदी मोत्यासारखे दाणे. सकाळी सकाळी शेताकडे फेरी मारायला ते दोघं गेले. पोटरीला आलेली कणसं पाहून मन हरखलं. अचानक पक्ष्यांचा थवा आला आणि कणसावर बसून इवल्याशा चोचीने कोवळे दाणे टिपू लागला. खाण्यात रमलेल्या पक्ष्यांना हुसकावण्याचं धाडस दोघांना होईना. दोघांच्याही मनात एकच विचार आला. आपण ही कणसं त्यांच्यासाठीच ठेवली तर! मिनीटभराचा अवकाश. आणि दोघांनी ठरवलं. तब्बल साडेचार एकरवरचा शाळू पाखरांसाठी ठेवायचा आणि फक्त धाटे विकूनच उत्पन्न मिळवायचं.
कोल्हापूर जिल्हा. शिरोळ तालुका. उदगाव इथली ही गोष्ट. सतीश चौगुले आणि पंकज मगदूम या तिशीतल्या शेतकऱ्यांची. गावातली किरण पाटील यांची आठ एकर शेती दोन महिन्यांपूर्वी या दोघांनी चौथ्या वाटणीने करायला घेतली. यापैकी अडीच एकर क्षेत्रात वांगी आहेत. तर साडेचार एकरात शाळूचं (ज्वारी) पीक आहे. सतीश आणि पंकज शाळकरी मित्र. सतीश एम.सी.ए. तर पंकज बारावी झाले आहेत. दोघांनाही शेतीची आवड. सतीश यांनी नोकरीचा नाद सोडून शेती करण्याचं ठरवलं.
यंदा त्यांनी शाळूचं पीक घेतलं. पोटरी फुटल्यानंतर सुरवातीला चांगलं उत्पादन येईल या अपेक्षेने त्यांना आनंद झाला. परंतु एका क्षणी दोघांच्याही मनात पक्ष्यांप्रती आपुलकी निर्माण झाली. आणि त्यांनी फारशी चर्चा न करता फक्त धाटातूनच उत्पादन मिळविण्याचं ठरविलं. कोल्हापुरातला हा भाग सध्या औद्योगिकरकणाकडे वळतो आहे. यामुळे पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे.
सतीश म्हणतो, “पक्ष्यांसाठी शेत सोडल्यानंतर लोकांनी अक्षरश: वेड्यात काढलं. पण कोणाचंही न ऐकता आम्ही हे पाऊल उचललं. नोकरी सोडून इतरांची शेती करण्याचा निर्णय घेतला त्यावेळीही लोक नकारात्मक बोलले. पण ते मनावर न घेता मी शेती करायचा निर्णय पक्का ठेवला. आता तो मला फायदेशीर ठरत आहे. पंकजबरोबर शेती करताना वेगळाच आनंद मिळतो आहे”.
खाऊ लुटण्यासाठी गेल्या दोन महिन्यात अनेक पक्षी त्यांच्या शिवारात दाखल झाले. वाइल्ड लाइफ कांझर्वेशन ऍन्ड रेसक्यू संस्थेचे सदस्य संगमेश्‍वर येलूरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पहाटेपासून दुपारपर्यंत पक्षीनिरीक्षण केलं तेव्हा पंचवीसहून अधिक प्रकारचे पक्षी दाणे टिपण्यासाठी आल्याचं आढळून आलं.
पक्ष्यांना जगविण्याचं समाधान मोठं आहे. या उपक्रमामुळे आर्थिक नुकसान होत असलं तरी आम्ही इतर शेतीतून उत्पन्न काढू शकतो. भविष्यातही पक्ष्यांच्या खाण्यांना प्राधान्य देतच शेती करणार असल्याचं सतीशने सांगितलं.

- सी. सत्यजित, कोल्हापूर

स्वतःचं एक मूल जन्माला घालून दुसरं दत्तक घ्यायचं


लग्नाआधीच आम्ही सहजीवन, एकमेकांच्या सवयी, स्वभाव, मुलं याविषयी चर्चा केली होती. तेव्हाच हर्षदानं एक मूल दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मलासुद्धा ही कल्पना आवडली. स्वतःचं एक मूल जन्माला घालून दुसरं दत्तक घ्यायचं, असं लग्नाआधीच ठरवून टाकलं आम्ही. जे मूल होईल त्याच्या भिन्नलिंगी मूल दत्तक घ्यायचं, म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघांना वाढवल्याचा समान आनंद घेता येईल, हेही नक्की केलं.
लग्नानंतर दोन वर्षांतच मनस्वीच्या संगोपनात आम्ही गुंतलो. पहिली मुलगी असल्यामुळे तिचं कौतुक, तिच्याबरोबर पालक म्हणून रोज नव्याने शिकणं! हर्षदानं तिच्यासाठी नोकरीतून काही काळ विश्रांती घेतली होती. `जे जे उत्तम उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते` तिला दाखवण्याचा आग्रह होता. त्यातलं चांगलं-वाईट तिनं ठरवावं, असं वाटत होतं.
दोन मुलांमध्ये तीन-चार वर्षांचं अंतर असावं म्हणून मनस्वी तीन वर्षांची झाल्यावर दत्तक मुलासाठी प्रयत्न सुरू केले. `श्रीवत्स` संस्थेत नाव नोंदवलं. दत्तक प्रक्रिया लगेच पूर्ण होणार नव्हती. मुलांची संख्या कमी आणि दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांची संख्या जास्त, असं व्यस्त प्रमाण सध्या असल्याची माहितीही मिळाली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन बाळ ताब्यात मिळायला दोन वर्षं गेली. हा काळ कसोटीचा होता. दोन मुलांमध्ये तीन-चार वर्षांचं अंतर असावं, हा विचारही कोलमडून पडला होता. मनस्वी पाच वर्षांची झाल्यानंतर निमिष घरी आला.
मनस्वीला नवीन बाळ आल्याची उत्सुकता आणि तोवर घरात तिचंच राज्य असल्यामुळे आपल्या आनंदातला वाटेकरी आल्याची भावनाही होती. घरी कुणी मोठं माणूस नव्हतं. हर्षदा पुन्हा नोकरी करू लागली होती. निमिषला सांभाळण्यासाठी आम्ही बाई ठेवली. काही प्रमाणात ती मुलगा-मुलगी भेद करणारी होती, हे उशिराने लक्षात आलं. तोपर्यंत तिच्याकडून निमिषचे लाड आणि मनस्वीकडे कळत-नकळत दुर्लक्ष झालं होतं. त्या काळात मनस्वी थोडी बिथरलीही होती. आम्ही आवर्जून तिच्यासाठी वेळ देऊन तिला समजावण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न केला. दोन्ही घरच्या आईवडिलांची आमच्या निर्णयाला आधी पसंती नव्हती, पण नंतर आमचं प्रेम बघून त्यांचा विरोध मावळला. आता त्यांनीही नातंवडांना आपलंसं केलं आहे.
दत्तक घेतलेल्या मुलांना मोठेपणी अचानक धक्का नको, म्हणून लहानपणापासूनच त्यांच्या जन्माबद्दलची जाणीव हळूहळू द्यावी, याची कल्पना होतीच. संस्थेनेही तसं मार्गदर्शन केलं होतं. त्यामुळे निमिषला लहानपणापासूनच देवकी, कृष्ण आणि यशोदाच्या गोष्टी सांगितल्या. `श्रीवत्स`मध्ये जाऊन दरवर्षी आम्ही त्याचा वाढदिवसही साजरा करतो. त्याला वेगळेपणाची जाणीव होणार नाही, याची काळजी घेण्याची कसरतही कधीकधी करावी लागते.
जगताना कायम आजूबाजूच्या समाजाचं, त्यांच्या आर्थिक परिस्थितीचं भान बाळगावं, हे आम्ही मुलांना पहिल्यापासून शिकवलं. अन्न टाकू नये, निष्कारण उधळपट्टी करू नये, हे वेगवेगळ्या माध्यमांतून शिकवलं. मुलांना स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्थान देण्याचा पहिल्यापासूनच प्रयत्न केला.
आता मनस्वी बारा वर्षांची झाल्यानंतर तिचे विचार, स्वभाव, व्यक्तिमत्त्व पुन्हा वेगळ्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागत आहे. काही मुद्दयांवरून तिच्याशी खटके उडायला लागल्यानंतर तिला कुठलीही गोष्ट थेट करायला न सांगता आपोआप समजेल, अशा पद्धतीने पोचवण्यावर आमचा भर असतो. पुढच्या आयुष्यातही तिचं करिअर तिनं निवडावं, आम्ही फक्त मार्गदर्शकाच्या स्वरूपात असावं, अशीच आमची भूमिका आहे. पालक म्हणून शिकण्याची ही प्रक्रिया निरंतर सुरूच राहणार आहे.

प्रवास पालकत्वाचा : हर्षदा आणि अभिजित पेंढारकर

देवदासीच्या मुलींची ही कथा


गाव कोळे, तालुका सांगोले, जिल्हा सोलापूर. इथल्या मंडळे कुटुंबात तीन पिढ्यांपासून देवदासीची प्रथा सुरू असलेली. याच कुटुंबातल्या जुळ्या मुली उषा आणि आशा. ८ वी पर्यंत शिकल्या. उषा-आशाला आपल्या घरातल्या या प्रथेची लाज वाटायची. कोले गावात, शाळेत त्यांना मुलंमुली चिडवायची, टोमणे मारायची. आपल्या आईचं देवदासी असणं हा त्यांना शाप वाटायचा. शेवटी दोघींचं शिक्षण सुटलंच. पित्याने लेकींना आपलं नाव तर नाहीच दिलं. आणि तो दोघींच्या वाढत्या वयात कुटुंबाला वार्‍यावर सोडून निघून गेला. 
दोघींची लग्न अवघ्या १२- १३ व्या वर्षी करून दिलेली. उषाचा दारुड्या नवरा तिला त्रास द्यायचा. हिंमत करून उषाने घर सोडलं आणि मुलांना घेऊन ती माहेरी परतली. शेती करू लागली. मुलांना वाढवणं अवघडच होतं. आशाचा नवरा मोठ्या वयाचा नातलग होता. तो मरण पावला. लेकरांची जबाबदारी एकट्या आशाकडेच राहिली. दोघींचं खडतर आयुष्य सुरूच राहिलं. तिशीत पोचल्या, तेव्हा प्रथम संस्थेच्या स्किल डेव्हलपमेंट उपक्रमाविषयी कळलं. दोघींनी नाव नोंदवलं. ३ महिन्याचा कोर्स पूर्ण केला. एव्हाना त्यांना शिक्षणाचं महत्व कळू लागलं होतं. तिथेच रुग्णसहाय्यक कोर्सबद्दल समजलं. पाठ्यक्रम इंग्रजीत असल्यामुळे, जमेल की नाही अशी भीती होतीच. पण मनात ध्येय असलं की काहीही अशक्य नसतं. उषा-आशाने पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण होत कोर्स पूर्ण केला. त्यांच्या प्रशिक्षकांनादेखील दोघींचा अभिमान होता.
चौतीस वर्षांच्या उषा आणि आशा सांगोल्यात भोसले हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून महिना सहा हजार रु मिळकतीवर काम करू लागल्या. हॉस्पिटलमध्ये रुग्णांशी त्या आपुलकीने वागतात. गरजेपुरतं इंग्रजीत बोलू शकतात. हॉस्पिटलमध्ये कोणीही त्यांना कमी लेखत नाही, चिडवत नाही की टोमणेदेखील मारत नाहीत. आयुष्याच्या प्रवासात उषा-आशाने अनेक अडथळे पार केले. आता दिवस पालटले आहेत. उषाची मुलं हर्षदा आणि साहील. आशाची मुलं पंकज आणि करण. यातले मुलगे सांगली जिल्ह्यात तासगावला वसतीगृहात राहून शिक्षण पुरं करत आहेत. उषा अलिकडेच आपल्या लेकीसाठी पुन्हा कोळे गावात येऊन राहिली आहे. मुलीला डोळ्यात तेल घालून वाढवते आहे. आणि गावाजवळपास काम शोधते आहे. उषा-आशाने कुटुंबातली अमानुष देवदासी प्रथा खंडित केली. उशिरा का होईना, शिक्षण घेतल्याने, कौशल्य अवगत केल्याने त्यांचं आयुष्य चांगल्या मार्गाने सुरळीत चाललं आहे.
आईचा विषय निघाला की उषा-आशाचे डोळे पाणवतात. आईविषयीचा आदर त्यांच्या शब्दाशब्दातून व्यक्त होतो, “आमच्या आईने धार्मिकतेने देवदासीपण स्वीकारलं. पण आम्ही मुलींनी देवदासी व्हावं, हे तिला मुळीच मान्य नव्हतं.”
प्रथम संस्थेच्या पेस या कौशल्य विकास उपक्रमाने अशा अनेक उषा-आशांच्या आयुष्याला अर्थ मिळवून दिला आहे. 

एका डॉक्टरच्या जिद्दीची गोष्ट


शासकीय रुग्णालय. एक व्यक्तीला कारमधून उतरवून व्हीलचेअरमध्ये बसवलं जातं. 
असेल एक पेशंट म्हणून कुणी दुर्लक्ष करतं. पण थोड्या वेळातच कळतं की ही व्यक्ती इथं डॉक्टर आहे. त्यांचं नाव आहे रवींद्र ढाकणे. एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला असतानाच चालता, धावता येत नाही हे लक्षात आलं. पुढच्या चार-पाच महिन्यातच मायोपॅथी आजाराचं निदान झालं. आणि हातापायांना अपंगत्व आलं. आजारावर कायमस्वरूपी उपचार नाहीत. शिवाय वय वाढत जाईल तसं आजार वाढत जाणार हेही कळलेलं.
ढाकणे सांगतात, “हातापायाचं काम थांबलं हे लक्षात आल्यानंतर मी पूर्णपणे शून्य झालो. आता पुढं काय? या विचाराने निराश झालो. मात्र पुढच्या काही तासांतच या आजारावर मात करायची, रडत बसायचं नाही असा निर्णय घेतला आणि जिद्दीनं एमबीबीएस पूर्ण केलं.”
प्रत्येकाच्या आयुष्यात कधी काय होईल हे सांगता येत नाही. आरोग्याची पूर्णपणे काळजी घेतली तरी एखादा मोठा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
डॉक्टर मूळचे लातूरचे. 
डॉक्टर व्हायचं हेच त्यांचं स्वप्न. नवी मुंबईतील तेरणा मेडिकल कॉलेजचे ते विद्यार्थी.
ढाकणे यांना पहिलं पोस्टिंग मिळालं रत्नागिरीत 2010 साली.
गेली सात वर्षे ते सकाळी 9 ते 2 या वेळेत शासकीय रुग्णालयात काम करत आहेत. रुग्णालयात डॉक्टरांची केबिन आहे पहिल्या मजल्यावर. शिपाई व्हिलचेअरमधून त्यांना अक्षरश: तिथवर उचलून नेतात. आणि डॉक्टरांचं काम सुरू होतं.
डॉक्टर म्हणतात, ‘‘या आजारात माझ्या कुटुंबियांनी आत्मविश्वास वाढविला. पत्नी सुनिताने खंबीर साथ दिली. आणि छोट्याशा सोहमने जगण्याची उमेद दिली. म्हणूनच ही लढाई मी हसतमुखाने लढतोय. वय वाढेल तसा हा आजार वाढत जाणार ही वस्तुस्थिती पत्नी सुनितालाही माहीत आहे. ती दररोज मला रूग्णालयात न्यायला आणि सोडायला येते, कुटुंबाची ही इच्छाशक्ती माझी ताकद आहे", असही ढाकणे यांनी सांगितलं. जोपर्यंत मी व्यवस्थित आहे, तोपर्यंत रूग्णांना सेवा देत राहणार असंही ते म्हणतात.
एकीकडे शासकीय रूग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याच्या बातम्या आपण वाचतो. आणि इथं तर स्वतः आजारी असताना रुग्णांची गैरसोय होवू नये यासाठी धडपडणारा डॉक्टर आहे.

- जान्हवी पाटील, रत्नागिरी 

झोपेनंतरची जाग!

व्हीलचेअरवरून गुजगोष्टी : झोपेनंतरची जाग!
अलीकडं वातावरण असं झालंय ना की खूप झोप येत असते. नव्या घराची जागा अशा मस्त अट्टल ठिकाणी आहे आणि घर असलं भारी आवडतंय की नरममऊ फिलिंग येतं नि गोधडी घेऊन झोपून जावं वाटत असतं. जे वाटतं ते मी लगेच खरं करते. उद्यापासून लवकर उठायचं, वाचायचंबिचायचं असं जे ठरवलेलं असतं ते रात्री झोप लागेपर्यंतच. सकाळी या निश्चयाचा मागमूस उरलेला नसतो आणि उठल्याउठल्याही मला खूप झोप येत असते. मी जेव्हा संस्थेतल्या कामाचा राजीनामा द्यायचा ठरवला तेव्हा स्वातंत्र्याच्या सुखाच्या ज्या सर्वोच्च कल्पना माझ्या मनात होत्या त्यात ‘खूप झोपायचं’, ‘पहाटे अज्जिबात उठायचं नाही.’ हे मुद्दे सर्वोच्च स्थानी होते. नोकरीत असताना, हॉस्टेलमध्ये लवकर उठून आवरणं, वेळापत्रकानुसार चटचट गोष्टी होणं आवश्यकच होतं, आवडतही होतं. पण वाट्टेल तितक्या लवकर उठण्याचा अतिरेकच कदाचित इतका जास्त होता की नोकरी संपल्यानंतर मी झोपेचा बॅकलॉग पूर्ण करायचा म्हणून फारफार झोपायचे. आणि झोपेत मला जी स्वप्न पडायची ती मी झोपलेय आणि कुणीतरी मला या ना त्या कामासाठी सारखं उठवतंय किंवा मी झोपलेय, शेजारी दरी आहे, ती मला कळतेय, पण झोप मोडायची नाहीये... श्वासांच्या लयीमुळं व्हीलचेअर कणाकणानं पुढे सरकतेय, मला ते बहुतेक कळतंय...मी दरीच्या अगदी टोकावर आहे, ‘हाच’ नेमका श्वास ज्यामुळं माझा कडेलोट होणारे... मी अधोन्मिलित नजरेनं दरीत बघते तर मला खाली सगळीकडे गाद्या घातलेल्या दिसतात...मग मी म्हणते, ठीकाय, खाली पडेपर्यंत मोडेल तितकीच मोडेल झोप! खाली झोपायचंच आहे... मग मी पडते नि झोपते. - ही असली स्वप्नं मी बघत असायचे.
लहानपणी शिराळ्यात बाबा पहाटे फिरायला गेले की आई उठायची. साधारण साडेसहापावणेसातला मला व धाकट्या बहिणीला संपदाला उठवायची. माझ्या चॅलेन्ज्ड असण्याची सवलत तिने मला व मी ही मला मनोमन दिली असायची त्यामुळं मी हाका मारल्या तरी दाद द्यायचे नाही. संपदा निमूट उठायची. बाबांनी वाड्याचा अगदी पहिला दरवाजा उघडला की मनातून कळायचं की बाबा चिडतील, आता उठायला हवं, तेव्हा मी उठल्यासारखं करून दहा मिनिटं पांघरुणाची घडी घातल्यासारखी करत पेंगायचे. उठून हातावर सरकत स्वयंपाकघरातल्या उंबर्‍यावर बसून दात घासायचे. बाबा लगेच छोट्या गुंडीतून बंबातलं गरम पाणी काढून द्यायचे. आवरून मी आईनं ठेवलेला चहा घ्यायचे नि परत कमरेतून मुडपून जमिनीवर हातांचं रिंगण घालायचे नि त्यावर डोकं ठेवून गुडूप व्हायचे. सेकंदात झोप लागायची. आईनं हाक मारलीच तर म्हणायचे, ‘‘झोपले नाहीये, मी नागरिकशास्त्राचा विचार करतेय... ’
झोपेचं काजळ डोळ्यांत घातलेलं असायचं असेही दिवस असायचे नि कुठाय ती उंडगी झोप, च्यायला, झोप का येत नाहीये असेही दिवस असायचे. मात्र झोपेचे दिवस जागेच्या दिवसांपेक्षा अधिक तरतरीत करायचे. परीक्षेच्यावेळी किंवा इतर ताणतणावांच्यावेळी ‘नको याला सामोरं जायला’ असं वाटत असायचं तेव्हा येणारी झोप नि आज येते ती झोप यात बराच गुणात्मक फरक आहे.
सध्या कविता महाजन किंवा अशीच खूप्प खूप्प काम करणारी जी मित्रमंडळी आहेत त्यांना मी सामोरी जात नाहीये कारण मला कळतंय की जी कामं करायची आहेत त्यांना वळसा घालून स्वत:ला शिस्तीत आणणं मी टाळतेय. केवळ चार-पाच तास झोप घेऊन कामात बुडून जाणारी ही माणसं पाहाण्याऐवजी मी सध्या ‘आठ तास झोप खूप गरजेची’, ‘शरीराला नि मनाला विश्रांतीची तितकी गरज असल्याशिवाय माणूस झोपेच्या अधीन होत नाही.’ वगैरे बोलणारी माणसं पाहातेय नि स्वत:ला झोपेचा गिल्ट येऊ देत नाहीये. कोण जाणे का, कधीकधी आपल्याला गिल्ट का येत नाही याचाही गिल्ट येतो.
सगळी गंमतजंमत जाऊदे. एक आहे, मला कळलंय, कधीही झोपण्याचं नि उठण्याचं स्वातंत्र्य मला आहे तर त्या स्वातंत्र्यानं मी उतूमातू नये यासाठी मला लख्ख जाग असणं गरचेचंय. ती आलीय मला आता! ~ मात्र याची खात्री आहे की नीट, शांत व सुखाची झोप घेतल्यामुळंच मी आता तरतरीत जागी झालेय. भरपूर काम करणारे.
विश मी लक!
- सोनाली नवांगुळ

Thursday, 13 July 2017

शेतकऱ्यांचं एटीएम

बीड - अहमदनगर रस्त्यावरचं शेरी बुद्रुक. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील जेमतेम पाच हजार लोकवस्तीचं गाव. गावातील बहुतेकांचा शेती हा मुख्य व्यवसाय. पाऊस, पाण्याच्या उपलब्धतेवर इथले शेतकरी पारंपरिक पिकं घेतात. एकेकाळी पान मळे आणि भाजीपाला उत्पादन हे इथलं वैशिष्ट्यं. सध्या मात्र कागदी लिंबांचं पीक घेणारं गाव अशी शेरीची ओळख झाली आहे. 
लक्ष्मण रामभाऊ सोनवणे, सुनील गोरे, मधुकर वाघुले, भीमराव पांडुरंग गोरे या लिंबू उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. ते म्हणाले की, “शेरीतील साधारणतः ९० टक्के शेतकऱ्यांनी लिंबोणीची बाग लावलेली आहे. नक्की कधीपासून सुरुवात झाली हे सांगता येणार नाही. पण आता बहुतेकांच्या शेतात कागदी लिंबाची झाडं आहेत.” लिंबाची शेती तशी सोपी. एकदा लिंबाचं रोप लावलं की सुरुवातीची तीन वर्ष झाडाची काळजी घ्यावी लागते. नंतर लिंबं यायला सुरुवात होते. पाचव्या वर्षांपासून चांगलं उत्पादन सुरू होतं. वर्षातून तीन बहार. म्हणजे सहा ते आठ महिने उत्पादन सुरू राहते. लिंबं तोडणी झाली की गावातील लिंबू खरेदी केंद्रावर ती विकली जातात. लिंबाचं एक झाड वीस-पंचवीस वर्ष जगतं. त्यामुळं सलग वीस वर्षापर्यंत नियमित उत्पन्न मिळत राहतं. 

वर्षभरातून एकदा शेणखत, अधून मधून वाळलेल्या फांद्या कापणे आणि दिवसाआड पाणी एवढंच काम उरतं. वर्षभरात सर्व खर्च वजा जाता किमान लाखभर रुपये प्रति एकर उत्पन्न मिळतं. हंगामाच्या काळात तर दिवसभर पिवळसर झालेली लिंबं तोडायची आणि गोणीत भरून विकायला आणायची एवढंच काम असतं. याकाळात लिंबं विकून रोज पैसे मिळत असल्याने लिंबाचे झाड शेतकऱ्यांसाठी एटीएम ठरलं आहे.
इथल्या मजुरांनाही लिंबामुळे रोजगार मिळाला आहे. अशोक वाघुले, सचिन वाघुले, सतीश गोरे हे या गावातीलच तरुण. गावातील शेतकऱ्याकडून लिंबं खरेदी करायची आणि पुणे, मुंबई, नाशिकपासून थेट दिल्लीपर्यंत त्याची तिथल्या व्यापाऱ्यांना विक्री करण्याचं काम हे तरुण करतात. त्यांच्या लिंबू खरेदी केंद्रात गावातीलच तरुण काम करतात. त्यातून त्यांनाही रोजगाराचं चांगलं साधन मिळालं आहे. पाण्याची टंचाई, भावातील चढ-उतार अशा अडचणी इथंही आहेतच. दुष्काळात विकत पाणी घेऊन बाग जगवावी लागते. परंतु त्यावर मात करून एकमेकांच्या साहाय्याने इथले शेतकरी प्रगतीकडे वाटचाल करत आहेत. लिंबाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्याने सरकारने इथं एखादं लिंबू प्रक्रिया केंद्र सुरू केलं तर शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल एवढीच अपेक्षा इथल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

- राजेश राऊत.

सोशल मिडिया फोरमची गोष्टफेसबुक, व्हॉटसअप या माध्यमांची खरी ताकद ओळखली ती नाशिकमधल्या एका तरुणाने. प्रमोद गायकवाड, ‘सोशल नेटवर्किंग फोरम’चे ते संस्थापक. प्रमोद यांना सामाजिक कार्याची आवड. या माध्यमांची बलस्थाने लक्षात घेत त्यांनी कामाची सुरूवात केली. समाजातील वंचित घटकांची आणि दानशूर व्यक्तींची गाठभेट उपक्रम घेत असतांना फोरम आकारास आला. आदिवासी पाड्यांवर आरोग्य शिबीरं, बालकांसाठी शाळा, शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत असे अनेक उपक्रम. 
त्याचवेळी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाने प्रमोद अस्वस्थ झाले. तेथील पाणी टंचाई लक्षात घेऊन फोरमने आपल्या संकेतस्थळावरून मदतीसाठी आवाहन केलं. निधी जमा झाला आणि बीड जिल्हातील राजपिंप्री गावात पाण्याच्या तीन टाक्या आणि टँकर आला. तिथल्या हरणांच्या अभयारण्यासाठीही त्यांनी सिंमेटच्या टाक्या बसवून दिल्या. हे काम करत असतांना दुष्काळाचे चटके सर्वत्र सारखेच असतात हे त्यांना जाणवलं. प्रमोद यांनी फोरमच्या माध्यमातून दुष्काळ हटविण्यासाठी काय करता येईल यासाठी तज्ञांची समिती स्थापन केली. ग्रामीण भागात अभ्यासदौरे, अडचणी, त्यामागील कारणं शोधणं सुरू झालं.
निधीची जमवाजमव सुरूच राहिली. संकलित निधीतून नाशिक जिल्हातील पेठ तालुक्यात गढईपाडा येथे १० हजार लिटर पाण्याचा स्टोरेज टँक बसवला गेला. तोरणगावात जलशुध्दीकरण यंत्रणा बसविण्यात आली. सध्या एक रुपयात २० लीटर स्वच्छ पाणी तेथील ग्रामस्थ घेत आहेत. अशाच काही समस्या शेवखंडी, खोटरेपाडा, फणसपाडा या तीन गावात होत्या.
शेवखंडी गावातील विहिरीला पाणी नाही हे लक्षात येताच कमी खर्चात कसं काम करता येईल यासाठी समितीने चाचपणी केली. पाणी मुबलक रहावं यासाठी गावात तज्ञांच्या मार्गदर्शनाने ‘पाणी आडवा आणि पाणी जिरवा’ प्रयोग करण्यात आला.
गावकऱ्यांना सोबत घेतलं गेलं. त्यामुळे आपण काम करू तर काम लवकर होईल आणि जास्त चांगल्या पध्दतीने होईल हा विचार ग्रामस्थांमध्ये रुजला. गाव परिसरात श्रमदानातून जलवाहिनी टाकण्यात आल्या. या विहिरीला जोडत पावसाचं पाणी संकलित होण्यास सुरूवात झाली. जमा झालेलं पाणी मग कोरड्या विहिरीत सोडण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर ग्रामस्थच पर्याय सुचवू लागले. समितीचा सल्ला आणि पर्याय यांची सांगड घालत फोरमने काम केलं. जवळपासच्या आठ ते दहा गावातील पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा फोरमचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.
प्रमोद गायकवाड 

- प्राची उन्मेष.

लोहाऱ्याने झुगारली अंधश्रध्दा; उभारल्या बहुमजली इमारती


उस्मानाबाद जिल्ह्यातला लोहारा तालुका. लोकसंख्या १५ हजार. घरांची संख्या १९००. इथल्या नागरिकांना घरावर मजला चढविण्याची अलिखित बंदी होती. खरं तर, त्यामागे होती अंधश्रध्दा. लोहारा शहरापासून चार किमीवर मार्डी गावात जिंदावलीचा दर्गा आहे. परिसरातील गावांमध्ये या दर्गाहच्या घुमटापेक्षा उंच घर बांधल्यास कुटुंबाची वाताहत होते, वंश बुडतो अशी अंधश्रध्दा आहे. २०१० मध्ये सर्वप्रथम लोहाऱ्यात बहुमजली इमारत बांधण्याचा निर्णय पौर्णिमा लांडगे यांनी घेतला. तेव्हा अनेकांनी त्यांना भीती घातली. मात्र, कुठलीही अंधश्रध्दा न बाळगता त्यांनी एक मजल्याचं घर बांधलं. आणि दोन वर्षात घर बांधून त्या स्वत:च्या घरात राहण्यासाठी गेल्या. 
अंधश्रध्देचे भूत उतरण्यासाठी पौर्णिमा लांडगे यांच्यासह त्यांचे पती जगदीश लांडगे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे आदींनी पुढाकार घेतला. लांडगे या शिक्षिका असून लोहारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आहेत. त्यांचे पती जगदीश लांडगे तलाठी आहेत. 
आता शहराने बदल स्वीकारला आहे. आता इथं २५ पेक्षा अधिक बहुमजली घरं आहेत. आणि नागरिकांच्या मनातली बहुमजली घरांची भीतीही संपली आहे. प्रशासकीय इमारतही आता बहुमजली झाली आहे.
लांडगे म्हणतात, “घर बांधताना आम्हालाही काही लोकांनी श्रध्दा सोडू नका, असा सल्ला दिला होता. वास्तविक, आम्ही श्रध्देच्या बाजूने आहोत. आणि अंधश्रध्देच्या विरोधात आहोत, हे दाखवून दिलं. आम्ही देवाची भक्ती करतो. मात्र, त्याचा आणि बहुमजली इमारतींचा संंबंध येत नाही. आम्ही निर्णय घेतल्यानंतर संपूर्ण शहराने आता बहुमजली इमारती बांधण्यास सुरुवात केली आहे. ही समाधानाची बाब असून, प्रत्येकाला श्रध्दा ओळखता यायला हवी, असं वाटतं”.
- चंद्रसेन देशमुख.

आदिवासी समाजातील विशू आला शाळेत!!

ही आहे गडचिरोलीतल्या विश्वनाथ सन्नू हबका या 10 वर्षांच्या चिमुरड्याची गोष्ट. माडिया- गोंड आदिवासी समाजातला विशू. वडीलांचं तीन वर्षांपूर्वी निधन झालेलं. दरम्यान आईनेही दुसरं लग्न केलं. लहानगा विशू त्याच्या आजोबांकडे नेलगुंडाला राहू लागला. वर्षं सरली. आजोबांनीही विशूला त्याच्या चुलत आजोबांकडे शिक्षणासाठी हेमलकसा- टोलाला पाठवलं. तिथं राहून त्याचं चांगलं पालनपोषण आणि शिक्षण होईल, असा आजोबांना विश्वास होता.
पण झालं उलटंच, आधीच अंतर्मुख असलेला विशू नवी जागा- माणसं पाहून आणखी गप्प झाला. जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊ लागला. घरातल्या गुरांना चारण्याची जबाबदारी त्याने स्वत:हून घेतली होती. पण त्याचं मन तिथं रमत नव्हतं. त्याला राहून- राहून पुसू आजोबांची आठवण यायची. शेवटी 2016 साली तो आजोबांना भेटण्यासाठी नेलगुंडाला परतला. नेलगुंडाला परतल्यावर विशू हेमलकसा जणू विसरुनच गेला. इथं मित्रांशी खेळण्यात तो रमला, मात्र शाळा सुटली. घरची गरिबी. त्यामुळे आजोबांनीही त्याच्या शाळेसाठी फार प्रयत्न केला नाही.
इथल्या शाळेला महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली आणि विशूचं आयुष्यच पालटलं. भामरागड- एटापल्ली दौऱ्यादरम्यान उपसंचालक विक्रमसिंह यादव यांनी नेलगुंडाला भेट दिली. विद्यार्थ्यांच्या प्रगतीची चाचपणी करत असतानाच त्यांना शाळेबाहेर मातीत खेळणारा विश्वनाथ दिसला. "हा मुलगा शाळेत का आला नाही?" विचारलं असता शिक्षकांनी, "हा मुलगा इथल्या शाळेत येतच नाही" हे सांगितलं. यादव सरांनी विशूला शाळेत बोलावून घेतलं.
घाबरलेल्या विशूने शाळेच्या अंगणातच फतकल मारली. सरांनीसुद्धा त्याचा शेजारी मांडी घालत "बेटा, शाळेत का येत नाहीस?" अशी विचारणा केली. त्यावर विशूने "शाळा..थकडं..हेमलकसा..मी..नेलगुंडा.. " अशी चाचरत उत्तरं दिली. घाबरलेल्या विशूला त्यांनी शांत केलं. आणि शिक्षकांकडून त्याच्या कुटुंब कहाणी कळली. मग मात्र यादव सरांनी त्याच्या आजोबांना भेटण्याचा निर्णय घेतला.
यादव सरांनी पुसु आजोबांची भेट घेऊन "विश्वनाथला शाळेत पाठवा" अशी विनंती केली. शाळेत त्याला त्याच्या वयाचे सवंगडी मिळतील, त्याचं दु:ख थोडंसं विसरून तो मजा- मस्ती करू शकेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं शिक्षण घेऊन भविष्यात स्वत:च्या पायावर उभा राहिल, हे सरांनी आजोबांना समजावून सांगितलं. शिवाय हेमलकसाच्या शाळेत नाव असूनही त्याला शिक्षण हक्क कायद्यानुसार इथं शिक्षण घेता येईल, याची शाश्वती दिली.
विश्वनाथला विशेष प्रेमाची वागणूक द्या, हे शिक्षकांना सांगायला यादव सर विसरले नाहीत. आणि शाळाबाह्य ठरलेला विशू पुन्हा शाळेत येऊ लागला.

सुजाण शिक्षक; जाणत्या शाळा:
- लेखन: नकुल लांजेवार

खचायचं नाही, तर लढायचंधुळे जिल्ह्यातील कापडणे गाव. इथंल्या लक्ष्मीबाई शाळीग्राम माळी. व्यवसाय शेती. लक्ष्मीबाईंचं लहान वयात लग्न लावून देण्यात आलं. लग्नाच्यावेळी लंगडत चालणाऱ्या पतीला पाहून लक्ष्मीबाईंना हसू आलं होतं. काळ पुढे जात राहिला आणि पती लंगडत चालतो हा विनोद नव्हे तर वास्तव आहे, हे त्यांना जाणवलं. त्यांच्या वाट्याला पुढे कडवा संघर्ष वाढून ठेवला होता. वाटण्या झाल्या आणि या कुटुंबाच्या वाट्याला शेती आली. अपंग पती, तीन मुली आणि दोन लहान मुलं. सहा जणांचं कुटुंब पोसायची जबाबदारी लक्ष्मीबाईंनी उचलली.
शेतातील प्रत्येक काम त्या करू लागल्या. पेरणी, निंदणी, कोळपणी, ट्रॅक्टरद्वारे मशागतीची कामं. शेतीतल्या एकूण एक कामात त्या पारंगत आहेत. त्यांनी चार मुलांची लग्न लावली. त्यांचा निकराचा संघर्ष, कमालीचा आत्मविश्वास पाहून त्यांची ओळख लक्ष्मीबाईऐवजी दुर्गाबाई अशी झाली आहे. मध्यतंरी त्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही जबाबदारी पार पाडली. परिस्थितीला दोष न देता, पती अपंग आहे म्हणून त्याची साथ न सोडता लक्ष्मीबाई यांनी संसार एकटीच्या बळावर उभा केला.
लक्ष्मीबाईचा स्वाभिमानी बाणा आणि वाईटातून चांगलं निर्माण करणाऱ्या इच्छाशक्तीचा गावकरी आदर करतात. लक्ष्मीबाईसमोर अपशब्द बोलण्याची कोणी हिंमत करत नाही, एवढा त्यांच्या व्यक्तीमत्वाचा दरारा आहे. खचायचं नाही तर लढायचं, हाच लक्ष्मीबाईंच्या जगण्याचा मूलमंत्र आहे.

- प्रशांत परदेशी, धुळे

ओ ऽऽऽऽ मी आहे!

व्हीलचेअरवरून गुजगोष्टी
कुणाचं ना कुणाचं येणंजाणं, काहीतरी काम किंवा चौकशी, कोथिंबीर नि विरजणाची देवघेव असं व्हायला लागलं नि कळलं आता खरी माणसाळायला लागलेय मी. ज्या त्या वेळच्या ‘वाढी’ची गरज वेगवेगळी! ती नेहमी एकसारखी कुठे असते!! - तर मी संस्थाळलेली होते नि आता हळूहळू माणसाळायला लागले होते. आजूबाजूचा परिसर मला कळावा म्हणून उदयबाबा मला बर्‍याचठिकाणी चालत न्यायचा. प्रत्यक्ष गेल्यामुळं मला जोडल्याचा फील यायचा. समोरच्याशी बोलता येणं ही गोष्ट माझ्यासाठी नवी नव्हती, पण सात वर्ष संस्थात्मक कामात व्यक्तीपण विरघळून गेल्यामुळं आपण समोरच्याशी नेमकं बोलायचं काय हा प्रश्न आ वासून उभा असायचा. देशभरातून येणार्‍या विकलांग व्यक्तींचे प्रश्न समजून घ्यायचे, फंड रेजिंग, त्यासंबंधातली पत्रं, इतर संस्थात्मक कामं नि सगळ्यांना प्रकल्प दाखवणं यातच मी सतततततत होते. त्यातून कितीही निग्रहानं मिळवलं तरी मिळवलेल्या स्वातंत्र्याचं नेमकं करायचं काय नि कसं याचा निश्चित काहीच आराखडा अजून केला नव्हता. शोधायचंच होतं नव्यानं सगळं. त्यावेळी निरनिराळी माणसं भेटत होती. जसं ‘स्वानंद सखी’च्या अनुराधा पोतदार. त्यांनी त्यांच्या गटाशी ओळख करून द्यायची म्हणून त्यांच्या एका मिटिंगला बोलावलं. नव्या जगात केलेलं एकप्रकारचं स्वागतच ते. तशाच उत्सुकतेनं आल्या ‘बालकुमार साहित्य सभे’च्या त्यावेळच्या अध्यक्षा रजनी हिरळीकर.
गेली दहा वर्ष साथसोबत करणारी माझी ही ज्येष्ठ मैत्रीण! उजळ रंग, चष्म्यातून पाहणारी मायाळू नजर. ताठ चालणं. साड्या एकदम फ्रेश पण बर्‍याचदा फिक्या रंगाच्या, चापून नेसलेल्या. खांद्याला छोटीशी पर्स. अशा रजनीताई एकट्या राहाणार्‍या पण अतिशय कुटुंबवत्सल. त्यांचं लिहिण्याचं जग मुख्यत: लहान मुलांशी निगडित. आज जरी कविता, कथा, ललित, एकांकिका, चिंतनात्मक अशा प्रकारातली ६० हून अधिक पुस्तकं आली असली तरी मला त्यांचं ‘कवितेचं झाड’ खूप आवडलं होतं. जवळपास ७५ कवींविषयी त्यांनी ‘सकाळ’ला लिहिलेले ते छोटेखानी लेख होते. ‘बालकुमार साहित्य सभे’तर्फे त्यांनी खूप काम केलं. छोट्याछोट्या गावांमध्ये एसटी नि वडाप अशी दगदग करून त्या कितीतरी वर्ष लहान मुलांना वाचण्याची व लिहिण्याची आवड लागावी म्हणून गप्पा मारायला जातात. आज वयाची सत्तरी उलटली तरी त्यांचं हे काम जमेल तसं चालूच आहे. माझी त्यांची ओळख झाली तेव्हा हे इतकं सगळं मला ठाऊकच नव्हतं. माझंत्यांचं जुळलं ते वेगळ्याच लिंकवर.
मी एकटी राहाण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं त्यांना खूप कौतुक. २००७ नंतर मी लिहिलेलं छापून यायचं तेव्हा आवडलं, आवडलं नाही, वगैरे सांगणारा त्यांचा सविस्तर फोन यायचा. इतकं लक्ष देऊन आपल्याकडं कुणी पाहातंय हे नवलाचं होतं त्यावेळी माझ्याकरता नि गरजेचंही. एकटं राहाणं, लग्न न करण्याचा निर्णय घेणं, त्याची जबाबदारी मानणं, लोकांच्या पूर्वग्रहांना तोट्यांची माळ लावणं वगैरे मी एका कार्यक्रमात बोलले तेव्हा त्यांचा अतिशय गदगदून फोन आला व म्हणाल्या, ‘‘सोनाली, आम्ही बोलू शकलो नाही त्यात्यावेळी, तू बोललीस तेव्हा मी बोलल्याचं समाधान मिळालं मला.’’
त्यावेळेपासून एक प्रतिष्ठित लेखक या पलीकडं रजनीताईंना मी पाहायला लागले. अत्यंत कष्टप्रद व वेदनादायी अनुभवानंतर साठच्या दशकात खूप हलाकीच्या परिस्थितीत रजनीताईंनी आपलं स्वयंपूर्ण आयुष्य बांधायला घेतलं. ते करताना त्या सुरुवातीला अत्यंत बिचकलेल्या होत्या. पण अनुभवांचा कडवटपणा त्यांनी निग्रहानं पंचगंगेत वाहायला सोडून दिला. २४ वर्ष शिक्षिकेची नोकरी केली. सडं राहायचा निर्णय घेतल्यावर माघारी काय बोललं जातं हे कळूनही त्या घट्ट राहिल्या. होणार्‍या मनस्तापाचं सावट वागवत स्वत:ला विझवलं नाही. पुस्तकांशी व लहान मुलांशी स्वत:ला जोडून घेतलं. एकटं राहून संघर्ष करताना ‘आम्ही आहोत’ म्हणणारे आवाज रजनीताईंना कमी लाभले. म्हणूनच माझ्यासारख्या छोट्या मैत्रिणीसाठी तिनं हाक मारायच्याआधी ओ द्यावी म्हणून त्या तत्पर असतात.
रजनीताईंच्या हाताला चव भारी सणसणीत! ‘सोनाली, कटाची आमची पाठवतेय...’ असं त्या म्हणतात तेव्हा त्या आमटीची चव काही फक्त नेमक्या मसाल्यांनी जमून आलेली नसते हे मला कळतंच.
सोनाली नवांगुळ

''प्रेम आणि काळजी घेणारं माणूस भेटलं की माणसाच्या आयुष्यात बदल घडतो'


१९७८-७९ चा काळ. मुंबईतल्या वर्सोव्यात एका चाळीतल्या गुजराती कुटुंबात बाळ जन्माला आलं. शेजारचं मराठी कुटुंब गुजराती कुटुंबाचा भाग असल्यासारखं. मराठी कुटुंबातली एक कॉलेजकन्या त्या बाळाला खेळवत असे. एकदा, खेळवताना बाळ वेगळं वाटतंय, अशी शंका तिला आली. तिने ते स्वतःच्या डॉक्टर ताईच्या लक्षात आणून दिलं. तपासणीत बाळ मतिमंद असल्याचं निघालं. त्या कुटुंबासाठी तो मोठा धक्का होता. पुढे, ते कुटुंब बाळाकडे लक्ष देईनासं झालं. कॉलेजकन्येला ते जाणवलं. तिने बाळाच्या आईला विचारलंदेखील, ''भाभी, असं का वागताय एवढ्या गोड मुलाशी ?'' त्या कुटुंबानं त्यांना ते मूल नको असल्याचं सांगितलं. मुलीनं क्षणात उत्तर दिलं ''तुम्हाला तो नको आहे, तर मी त्याला सांभाळेन. त्याला दत्तक घेईन.'' ती बाळाला तडक घरी घेऊन आली. विशेष म्हणजे, तिच्या वडिलांनाही याचं कौतुकच वाटलं. काही दिवसांनी मुलीच्या कुटुंबियांच्या समजावण्यावरून त्या गुजराती कुटुंबात परिवर्तन घडलं आणि ते त्या मुलाला परत घरी घेऊन गेले. कॉलेजकन्येने मुलाकडे लक्ष देणं सुरूच ठेवलं. पुढे त्या मुलामध्ये सुधारणाही झाली.
ही कॉलेजकन्या म्हणजे उत्कर्षा लाड-मल्ल्या. अंधेरीतल्या भवन्स महाविद्यालयाच्या अलिकडेच निवृत्त झालेल्या उपप्राचार्या. शंभरहून अधिक मुलामुलींना सर्वतोपरी मदत करत त्यांचं पालकत्व निभावणार्याा आणि प्रसिद्धीपासून दूर राहणार्या . त्यांचे पती विजय मल्ल्या यांचीही त्यांना मोलाची साथ आहे.
उत्कर्षा सांगतात ''आई शशिकला आणि वडील मनोहर लाड दोघेही सुधारणावादी. राष्ट्र सेवा दलातले. त्यामुळे मानवतावाद आम्हा पाच बहिणींमध्ये आपोआपच रुजला. वडिलांना आमच्या लग्नांपेक्षा आम्ही आर्थिक दृष्ट्या सक्षम होणं, महत्वाचं वाटायचं.” आई-वडिलांचाच वारसा उत्कर्षा पुढे चालवत आहेत.
''मातृत्व, पालकपण यासाठी विवाह, नवरा, स्वतःचीच मुलं असणं आवश्यक आहे, असं नाही. आपल्यामध्ये आंतरिक प्रेम, दयाभाव असला की दुसर्यां ची दुःख समजतात. मदत करावीशी वाटते,” त्या सांगतात. अंध विद्यार्थ्यांना परिक्षांसाठी लेखनिक, वाचक मिळत नसल्याची खंत महाविद्यालयात पाहुण्या म्हणून आलेल्या, अंध विद्यार्थांसाठी स्नेहांकिता संस्था चालवणार्याय परिमला भट यांनी व्यक्त केली. तेव्हा उत्कर्षा यांनी भवन्समध्ये सेंटर सुरू करून मुलामुलींना या कामासाठी प्रेरित केलं. वर्षभरातच अंध विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या लेखनिकांची संख्या ३०-४० वरून ७०-७५ वर पोचली. या आपल्या लेखनिक-वाचक मुलांचं उत्कर्षामॅडमना अपार कौतुक वाटतं. स्नेहाकिंत आणि इतर अनेक संस्थाचा त्या आधार बनल्या आहेत.
परिक्षांच्या वेळी अपंग मुलांची सोय करणं हे शाळा- महाविद्यालयांना आव्हानात्मक वाटणारं काम उत्कर्षामॅडमच्या संवेदनशीलतेमुळे आणि पुढाकाराने साध्य झालं. सहकारी शिक्षकांच्या अपंग विद्यार्थ्यांविषयीच्या मनोभूमिकेत बदल घडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
परिस्थितीमुळे गांजलेल्या कितीतरी मुलामुलींना, त्यांच्या कुटुंबांना वैद्यकीय, आर्थिक मदत देत, नैराश्यातून बाहेर काढत त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्याचं काम उत्कर्षामॅडमने केलं आहे.
''प्रेम आणि काळजी घेणारं माणूस भेटलं की माणसाच्या आयुष्यात बदल घडतो'', उत्कर्षा सांगतात. त्या स्वतः हे जगल्या आहेत. जगत आहेत.
प्रवास पालकत्वाचा : उत्कर्षा लाड - मल्ल्या
शब्दांकन: सोनाली काकडे

आगळावेगळा स्वच्छता सत्याग्रह


आंदोलन म्हणून सत्याग्रह केला जातो. पंरतु, चंद्रपुरात गेल्या दोन महिन्यांपासून काही युवकांचा स्वच्छता सत्याग्रह सुरु आहे. हा कृतिशील सत्याग्रह म्हणजे स्वच्छता अभियान. चंद्रपूरच्या ‘इको-प्रो’ संघटनेचं हे काम.
चंद्रपूरला साधारणत: पाचशे वर्षांचा इतिहास आहे. शहरात असलेले गोंडकालीन किल्ले, शहराच्या सभोवताल असलेले परकोट शहराची ऐतिहासिक साक्ष देत आहेत. १५९७ ते १६२२ या काळात चांद्याच्या परकोटाचं काम पूर्ण झालं. राजा बल्लाळशहा याने परकोटाचा पाया रचला. त्याचा मुलगा हिरशहा याने चार दरवाजे आणि खिडक्या उभारल्या. हिरशहाचा नातू कर्णशहा याच्या कारकिर्दीत तट तयार झाले. तर पुढे धुंड्या रामशहाच्या कार्यकाळात परकोटाचं काम पूर्ण झालं.
दोन मुख्य द्वार, दोन उपद्वार, पाच खिडक्या हे परकोटाचे विशेष. संपूर्ण परकोट सात किमींचे लांब असून, ऐतिहासिक चीनच्या भिंतीप्रमाणे या परकोटाला सात किमीचं रॅम्प आहे. यावरून रपेट मारून अर्ध्या चंद्रपूर शहरला भ्रमंती घालता येणं शक्य होणार आहे.
मात्र, चंद्रपूरचं हे ऐतिहासिक वैभव अस्वच्छतेच्या विळख्यात सापडलं आहे. सध्या परकोटावर राज्य आहे ते झाडाझुडुपांचं. त्यामुळं परकोटाला तडे पडू लागले आहेत. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. अतिक्रमणामुळे परकोटाचं अस्तित्वच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. चंद्रपूरचं ऐतिहासिक वैभव कायम राहावं, किल्ले, परकोटाचं संवर्धन व्हावं, यासाठी ‘इको-प्रो’चे स्वयंसेवक एकत्र आले. संघटनेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्यासोबत गेल्या ७० दिवसांपासून हा स्वच्छता सत्याग्रह सुरू आहे.
शिस्तबद्धतेनं त्यांनी परकोटाची स्वच्छता हाती घेतली. स्वयंसेवकांनी फावडे, टिकास, सबल घेत परकोटावरील झाडं-झुडुपं स्वच्छ करण्यास सुरुवात केली. ४० हून अधिक कार्यकर्त्यांनी यात भाग घेतला. या काळात परकोट बऱ्यापैकी स्वच्छ झाला. प्रसंगी विंचू, सापांचाही सामना स्वयंसेवकांनी केला. मात्र त्यांनी अभियानातून माघार घेतली नाही. ज्या बुरुजावर लोकांना चढायला भीती वाटायची तिथं आता परिसरातील लहान मुलं खेळू लागली आहेत. झाडाझुडुपांनी व्यापलेलं परकोट आता चंद्रपूरकरांच्या गर्दीनं फुललं आहे.
बंडू धोतरे म्हणतात, ‘‘चंद्रपूरला लागून ताडोबासारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्याघ्रप्रकल्प आहे. रोज शेकडो देशीविदेशी पर्यटक येथे येतात. त्यांना चंद्रपूरचा ऐतिहासिक वारसा पाहता येणं शक्य होणार आहे. त्यासाठी चंद्रपूरकरांनी हा समृद्ध वारसा जतन करणं आवश्यक असून, सर्वांनीच पुढं येऊन परकोट, किल्ले स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे’’. हे खरं स्वच्छता अभियान! या युवकांच्या स्वच्छता सत्याग्रहाची प्रेरणा सर्वांनीच घ्यायला हवी, नाही का?
बंडू धोतरे

- प्रशांत देवतळे.

...तरीही ती जिद्दीने संसार सावरतेय!


दररोज वेळेवर घरी येणारा नवरा अजून आला नव्हता. काळजीनं ती सारखी त्याला फोन लावत होती. आणि काही वेळातच पोलीस स्टेशनवरून फोन आला. ‘ताबडतोब शासकीय रूग्णालयात या.’ निरोप मिळाला. अन् तिच्या पायाखालची जमीन सरकली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पतीला पाहून ती खचून गेली. क्षणभरच. दुसऱ्याच मिनिटाला तिने स्वत:ला सावरलं. आणि सुरु झाला खडतर प्रवास. तो आजही सुरूच आहे. रत्नागिरीतील सुलतानबी खाँजा शेख हिची ही गोष्ट. 
कामावरून परतताना खाँजा शेख यांना अपघात झाला. पायावरून चारचाकी अवजड वाहन गेलं. केस गुंतागुंतीची असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं. तिचा मात्र ठाम विश्वास की, माझा नवरा काही करून बरा होणारच! म्हणूनच पुढच्या उपचारासाठी तिने कोल्हापूर सीपीआर गाठलं. इथली परिस्थिती अजूनच कठीण. हजारो रूग्ण. डॉक्टरांचं या नव्या पेशंटकडे लक्ष जाणं शक्यच नव्हतं. चार भिंतीच्या बाहेरचं जग माहित नसलेली सुलतानबी या अपघातानंतर खूप काही शिकली. बरेवाईट अनुभव घेतले. दोन्ही मुलांना माहेरी ठेवून ती महिनाभर सीपीआर या सरकारी रूग्णालयात राहिली.
खाँजा शेख यांच्या उजव्या पायाचं या अपघातात नुकसान झालं. पायामधील चरबी बाहेर आली. नसा दाबल्या गेल्या. गेल्या सात महिन्यापासून त्यावर उपचार सुरू आहे. उपचाराकरिता निधी सहाय्य मिळावं म्हणून तिने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, राजीव गांधी जीवनदायी योजनेसाठी अर्ज केला. हा अपघातप्रकार योजनेत बसत नाही म्हणून अर्ज नामंजूर झाला. सीपीआरनेही तज्ञ नसल्याचे सांगून उपचार टाळला. कोल्हापूरमधल्या खाजगी रूग्णालयात 5 ते 6 लाख रूपये प्लास्टीक सर्जरीसह इतर दोन शस्त्रकियेसाठी मागण्यात आले.
खाँजा शेख बांधकामावर मजूर. 200 स्वेअर फुटाच्या छोट्या खोलीत राहणाऱ्या या जोडप्याकडे जमापुंजी काहीच नव्हती. असं असूनही पतीवर उपचार व्हायलाच हवा, या ध्यासाने तिने कोल्हापूर नॉर्थ स्टार रूग्णालय गाठलं. डॉक्टरांना फी उशीरा भरेन, अशी विनवणी केली. नातेवाईकांच्या हातापाया पडून 50 हजार जमवले. शेवटी मंगळसूत्र गहाण ठेवलं. तरीही गरजेइतकी रक्कम जमली नव्हती. कोल्हापुरातील काही व्यक्तींनी 30 हजारांची मदत केली. खर्च आला तो 1 लाख 80 हजार. मात्र नातेवाईकांकडून घेतलेले कर्ज, मुलांचा शैक्षणिक खर्च शिवाय खाँजा शेख यांना दर महिना तपासणीसाठी कोल्हापूर वारी. हे कर्ज फेडण्यासाठी सुलतानबी जेवणाचे डबे बनविते, शिवणकाम करते. इतकं सगळं सोसूनही सुलतानबी हरलेली नाही. आजही ती परिस्थितीशी लढते आहे आणि संसार सावरते आहे.
सुलतानबी शेख, रत्नागिरी 


- जान्हवी पाटील, रत्नागिरी