Sunday 8 December 2019

मुली पुन्हा शाळेकडे वळल्या...

‘दीपशिखा’च्या या प्रेरणेचा प्रसार करणार्‍या कार्यकर्त्यांना तयार करण्याच्या मुख्य काम शारदा करते. ‘दीपशिखा’ या उपक्रमात किशोरवयीन मुलींच्या जीवन कौशल्यांवर लक्ष केंद्रित केलं जातं. तसंच स्त्रियांप्रती असलेला समाजातला सनातनी व नकारात्मक दृष्टिकोन दूर करण्याचे काम करते. शारदा अशोक साकरे ही याच ‘दीपशिखा’चं प्रेरणा स्थान.
तिच्या या ध्यासाने 2008 साला पासून जास्त जोर धरला. आपापल्या गावातल्या मुलींचे जीवन घडविण्याची तळमळ आणि धडपड करायची ईच्छा असणार्‍या स्त्रियांना ती सतत शोधत असते. त्यांना प्रेरीका म्हणून निवडण्यासाठी आणि प्रशिक्षित करण्यासाठी ती अथक प्रयत्न करत आहे. या प्रेरीकांच्या प्रशिक्षणात विविध क्षेत्रांचा समावेश आहे. जीवन कौशल्यांबद्दल प्रशिक्षण, शिक्षणाचे महत्त्व, पैशाची बचत करणं का आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे स्वावलंबी का व्हायला हवं हा विषय.
या प्रेरीका पहिल्यांदा पंचायत सदस्यांची भेट घेतात आणि मुलींसाठी किंवा 'किशोरीं'साठी उपलब्ध असणारी विविध सरकारी धोरणे व योजना समजून घेतात. त्या नंतर त्या आपापल्या गावी जाऊन तिथल्या तरुण मुलींमध्ये या योजनांविषयी जनजागृती करतात, त्या सोबतच त्यांना या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी मदत करतात.
बालविवाह ही लातूर आणि आसपासच्या परिसरातील एक गंभीर समस्या आहे. बहुतेक वेळा मुलींचे लग्न ११ किंवा १२ व्या वर्षी केलं जातं. मुलींचं लवकर लग्न केलं जाण्याचं एक मुख्य कारण म्हणजे आई वडीलांना सोबत काम मिळवता येते. ऊस तोडणी मजूर म्हणून पती-पत्नी यांना एकत्रित काम मिळतं आणि चांगले पैसेही मिळतात. अशावेळी त्यांच्या मुलींची सुरक्षा हा मोठा काळजीचा विषय असतो. मुलीला घरी एकटं किंवा इतर कुणाकडे सोडण्यापेक्षा मुलींची लवकर लग्न करणे हाच एकमेव आणि उत्तम पर्याय असल्याचं पालकांचं मत आहे. अजून एक कारण म्हणजे इयत्ता चौथी नंतरच्या शैक्षणिक सुविधांचा अभाव. शाळा खूप दूर असल्याने पालक आपल्या मुलांना सुमारे 3-10 किमी अंतरावर असलेल्या शाळांमध्ये पाठविण्याचा धोका पत्करत नाहीत.
मुलांना स्वत: च्या कमी, जास्त क्षमता आणि मर्यादा हाताळण्याची शिकवण एसडब्ल्यूओटी विश्लेषणाद्वारे शिकवून ‘दीपशिखा’ त्यांचा विकास घडवून आणते. त्यामुळे मुलींना त्यांचे स्वतःचे विशेष ओळखता येतात. आपल्यातल्या कमकुवतपणाबद्दल त्यांना जाणीव होते. आणि त्यावर मात करता येते.

ते मुलींना कामाचे मूल्य शिकवतात आणि स्वतःची उपजीविका मिळवायला शिकवतात. मुलींमध्ये आरोग्य आणि आरोग्याची काळजी घेणे यासारख्या महत्वाच्या गोष्टींबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मुलींना प्रशिक्षण दिलं जातं. ते मुलींना सेनेटरी नॅपकिन्स का वापरावे यावर आणि स्वच्छता कशी ठेवावी हे समजाऊन सांगतात. यामुळे दोन उद्दीष्टे साधली जातात. मुलींना स्वावलंबी होण्यास बळकटी देणे आणि आरोग्य व स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणे.
बहुतेक वेळा मुली सातवी, आठवीत असतानाच शिक्षणातून बाहेर पडतात. शारदा आणि तिचे सहकारी या मुलींच्या घरी भेट देतात आणि पालकांच्या अडचणी जाणून घेतात. पुन्हा त्यांचं शिक्षण चालू होईल असं मार्गदर्शन आणि मदत करतात. काही पालक आरोग्य आणि स्वच्छता जागरूकता कार्यक्रमांबद्दल खूप विरोध ही करतात. त्यांना वाटते की मासिक पाळी किंवा कुटुंब नियोजन सारख्या गोष्टींची माहिती मुलींना लग्नाआधी किंवा एकूण माहिती होणे चांगलं नाही. त्यामुळे त्या भरकटू शकतात. आणि ते त्यांच्या मुलांच्या हिताचं नाही. अशावेळी विरोध होत असतो. तरीही या सर्व समस्यांशी दोन हात करत शारदा आणि तिची टीम खेड्यात, आणि या कामगार लोकांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांची पोचपावती म्हणजे, गेल्या वर्षी 292 मुली पुन्हा शाळांमध्ये जाऊन शिकू लागल्या.
#नवीउमेद #नकोलगीनघाई



- गीतांजली रणशूर

परिस्थितीच्या ‘अडथळ्यांची’ शर्यत ‘ऑलिम्पिक’ पर्यंत

 “खरं तर मला उच्चशिक्षण घ्यायचं होतं; पण जेमतेम आर्थिक परिस्थितीने ते शक्य झालं नाही. त्यामुळे मी बारावीनंतर सैन्यात भरती झालो. तिथं माझ्यातल्या धावपटूला चालना मिळाली. आज देशासाठी खेळण्याचा आनंद शब्दांत सांगता येणारा नाही. ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदकं जिंकणं हेच एक ध्येय आता डोळ्यांसमोर आहे.” मांडवा (ता. आष्टी) येथील अविनाश साबळे सांगत होता. ३ हजार मीटर अडथळा शर्यतीत अविनाश भारताकडून ऑलिम्पिकासाठी पात्र ठरला आहे. सन १९५२ नंतर तब्बल ६७ वर्षांनी भारताला या क्रीडा प्रकारात पुरुष गटात प्रतिनिधित्व करण्याची संधी अविनाशच्या रुपाने मिळाली आहे. 
जेमतेम आर्थिक परिस्थिती, चार खडकाळ एकर शेती, उदरनिर्वाहासाठी २० वर्षं वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करणारे वडील अन् इच्छा असूनही उच्च शिक्षण न घेता आल्याने सैन्य दलाची स्वीकारलेली नोकरी.. परिस्थितीने उभे केलेल्या ‘अडथळ्यांना’ पार करून अविनाशने ‘अडथळा शर्यती’त थेट टोकिओ ऑम्लिम्पिकचं तिकीट मिळवलं आहे. 
सैन्य दलांतर्गत होणाऱ्या धावण्याच्या स्पर्धेत सन २०१५ मध्ये पहिल्यांदा त्याने सहभाग नोंदवला. धावण्याच्या वेगाने त्याने लक्ष वेधून घेतलं. प्रशिक्षक अमिरश कुमार यांनी त्याच्यातील गुणवत्ता हेरली आणि त्याला शास्त्रशुद्ध प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. २५ वर्षीय अविनाशने अवघ्या ३ वर्षांतच ३ हजार मिटर अडथळ्यांची शर्यत (स्टीपलचेस) या प्रकारात राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवत गुणवत्ता सिद्ध केली. 
अविनाशने कठोर परिश्रम घेत प्रत्येक स्पर्धेत छाप सोडली. सप्टेंबर २०१८ मध्ये राष्ट्रीय स्पर्धेत त्याने ८ मिनिटे २९.८० सेकंद वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रम केला. त्यानंतर मार्च २०१९ फेडरेशन कपमध्ये त्याने ८ मिनिटे २८.९४ सेकंद अशी वेळ नोंदवली. दोहा इथं झालेल्या स्पर्धेत पहिल्या फेरीत त्याने ८ मिनिटे २५.२३ सेकंद वेळ नोंदवून आपला रेकॉर्ड मोडला. त्यानंतर दोनच दिवसांत दुसऱ्या फेरीत ८ मिनिट २१.३७ सेकंद अशी वेळ नोंदवून वर्षांत चौथ्यांदा नवा रेकॉर्ड स्थापन केला आणि ऑलिम्पिक प्रवेशही पक्का केला. 
त्याचे वडिल मुकुंद साबळे म्हणतात, “पोरांनं कष्टाचं चिज केलं. पहिल्यांदा सैन्य दलात भरतीला गेला तेव्हा निवड झाली पण काही कागदपत्रं कमी पडले. अधिकाऱ्यांनी ३ तासांचा वेळ दिला. बायकोच्या गळ्यातील सोनं मोडून ३ हजार रुपये उपलब्ध केले अन् कागदपत्र आणली. पण यात वेळ आणि संधी हुकली पुन्हा चार महिन्यांनी भरती निघाली अन् अविनाश भरती झाला त्याचा आम्हाला अभिमान वाटतो.”
#नवीउमेद
- अमोल मुळे, बीड

माझ्या म्हणण्याकडे जरा लक्ष द्या

इयत्ता १० वी मध्ये शिकणारी पूजा यादव सांगते.. विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोचवण्याकरिता सरकारी बस योजना असाव्यात.

सैका आणि तिची कथा...

सैका, सध्या वय वर्षे १९, तिचा भाऊ आरिफ, वहिनी आणि त्यांच्या मुलांसोबत राहते. सध्या तिचे पालक त्यांच्या उत्तर प्रदेशातल्या, नेपाळच्या सीमेजवळील वडिलोपार्जित गावी परत गेले आहेत. आरिफ सैकाला फारसे चांगले वागवत नाही; चूल आणि मूल हेच स्त्रीचं विश्व असतं असं त्याला वाटतं. तिच्या लग्नाची बोलणी सुरू होती तेव्हा, सैका दहावीची (एसएससी) परीक्षा उत्तीर्ण झाली होती. तिच्या मैत्रिणींनी कॉलेजला जायचा निर्णय घेतला होता. ‘तू इतक्या कोवळ्या वयात लग्न का करत आहेस? आम्ही कॉलेजला जात आहोत. काहीतरी कर, घरी बसू नकोस, त्यामुळे त्यांना तुझं लग्न लावून देण्यासाठी बहाणा मिळेल. काहीतरी कामात स्वतःला गुंतवून घे’; तिच्या चांगल्या मैत्रिणींनी तिला सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यामुळे सैका विचार करायला लागली – तिचं लग्न ज्याच्याशी ठरलं होतं तो हातमाग कामगार होता. तिचा स्वतःचा भाऊ हातमागावर काम करत होता आणि त्याला उदरनिर्वाह करणं कठीण जात होतं. ‘मला लग्न केल्यावर त्रासच होईल’, असा तिने विचार केला. दुसरं म्हणजे तिला शिकायचं होतं आणि स्वावलंबी व्हायचं होतं. सैकाला तलाकची भीती वाटत होती, तिने तिच्या परिसरात सोडून दिलेल्या बायका पाहिल्या होत्या. अशा परितक्त्या स्त्रियांमध्ये अशिक्षित स्त्रियांना सर्वाधिक त्रास होत होता. त्या त्यांच्या कुटुंबाच्या दयेवर अवलंबून होत्या. त्यांना वाईट वागवलं जाई; रोजचे कष्ट हेच त्यांचं नशीब होतं. ‘मला त्या अवस्थेत राहायचं आहे का? – नाही’, सैका म्हणाली. सैकाच्या तिला तिच्या लग्नासाठी उतावीळ झालेल्या तिच्या मोठ्या भावाशी, आरिफशी बोलण्याचा सल्ला दिला. ती त्याच्याशी बोलली आणि आणखी दोन वर्षे लग्न करायचं नाही असा निर्धार त्याच्यापाशी बोलून दाखवला. आरिफला संताप येण्यासाठी इतकं पुरेसं होतं; ‘तुला समजत नाही, हा इभ्रतीचा (कुटुंबाचा सन्मान) प्रश्न आहे’. तिचा भाऊ ‘नाही’ हे उत्तर ऐकून घ्यायला तयारच नव्हता. ‘तुला शिकायचं असेल तर, तुझ्या नवऱ्याने परवानगी दिली तर लग्नानंतर शिक’. सैका अतिशय निराश झाली, पण मग तिने मदत घ्यायची ठरवले. तिने त्या भागात काम करणाऱ्या कमिटेड कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट (सीसीडीटी) या एनजीओशी संपर्क साधला. सीसीडीटीच्या पदाधिकारी बसरीन शेख यांनी हस्तक्षेप करण्याचं वचन दिलं. त्यांनी मासिक पाळी, मासिक पाळीदरम्यान स्वच्छता, लैंगिक संबंध, संततीनियमन आणि गर्भारपणातील काळजी या विषयांवर किशोरवयीन मुली आणि स्त्रियांसाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले होते. आरिफला समोरासमोर आव्हान देण्याऐवजी, बसरीनने कौटुंबिक समुपदेशनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला. सैकाची वहिनी गरोदर होती. श्रीमती शेख यांनी गरोदरपणात कशी काळजी घ्यायला हवी यासंबंधी तिचं समुपदेशन केलं. गरोदर मातेने कोणत्या लसी घेतल्या पाहिजेत याविषयीही तिने कुटुंबाला माहिती दिली. सैकाच्या वहिनीला सल्ला दिल्यानंतर शेख यांनी तिच्या भावाशी बोलण्याचा निर्णय घेतला. ‘ती फक्त १७ वर्षांची आहे, तुला तिचं लग्न का लावून द्यायचं आहे? ती अजून लहान आहे’. आरिफ नाराज झाला, ‘हा आमच्या कुटुंबाचा प्रश्न आहे, तुम्ही लोकांच्या खासगी विषयांमध्ये नाक का खुपसता?’ त्याने विचारलं. ‘म्हणजे तुम्ही आमच्या घरातील बाबी बाहेर जाऊन सांगाल? तुम्हाला काही शरम वाटत नाही का?’, आरिफने संतापाने विचारलं. पण सैका दृढनिश्चयी होती, त्याच्या संतापानंतर तिने शांतपणे त्याला सांगितले, ‘मी अजून दोन वर्षे लग्न करणार नाही’. आरिफला तिचं म्हणणं मान्य करावं लागलं, तसंही १६ वर्षांच्या मुलीचं लग्न लावून देणं बेकायदेशीर होतं. ‘ठीक आहे, मी त्या तरुणाच्या (सैकाचा भावी पती) कुटुंबाशी बोलतो. आरिफने पालकांशी संपर्क साधला; ते चिडले आणि संतप्त झाले. आरिफने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस सैकाच्या पालकांनी तिचं म्हणणं ऐकलं आणि तिला आणखी दोन वर्षं दिली. ‘दोन वर्षं तुझं शिक्षण घे, त्यानंतर आम्ही वाट पाहणार नाही’, त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला. ‘लक्षात ठेव, माझ्याकडे तुझ्या शिक्षणासाठी पैसे नाहीत’, आरिफने जाहीर केले. मंगनी (एंगेजमेंट) रद्द करावी लागली. सैकाच्या नकाराबद्दल शेजारच्यांनी आणि समाजाने कुचाळक्या करायला सुरुवात केली, अनेकांनी ‘तिला डोके कमीच (घनचक्कर) आहे’ अशी अनेकांनी केली. सैकाने या शेऱ्यांकडे लक्ष दिले नाही, तिला तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी शांत राहायचं होतं. तिला औषधशास्त्र शिकायचं होतं. तिच्या शेजारील कुटुंबातील १७ वर्षांची किशोरवयीन मुलगी लग्न लावून दिल्यानंतर परत आली होती. तिच्या पतीचे बाहेर दुसऱ्या स्त्रीशी प्रेमसंबंध होते. या घटनेचा सैकाच्या कुटुंबावर परिणाम झाला. सैकाला पैशांच्या अभावामुळे फार्माकॉलॉजी अभ्यासक्रमात दाखला घेता आला नाही. तिने शिवणकाम शिकायचं ठरवलं. तिने कोचिंग क्लासला जायला सुरुवात केली. ‘मी शिवणकाम शिकत आहे, कारण मला माझं उत्पन्न कमवायचं आहे. मला कोणावरही अवलंबून राहायचं नाही’, सैकाला स्वतःच्या अस्तित्त्वाच्या आव्हानांची पुरेपूर कल्पना होती. ‘पण माझ्याकडे फारसा वेळ नाही, मला तडजोड करावी लागेल. मला समजून घेणारा आणि जबाबदार पती हवा आहे, त्याला जबाबदाऱ्या माहिती असतील आणि त्या समजून घेईल’, सैकाच्या आयुष्याकडून कमीत कमी अपेक्षा होत्या. ‘आपल्याला कोणाकडे भीक मागावी लागू नये. मला लोकांकडून किंवा नातेवाईकांकडून पैसे मागायचे नाहीत. मला मी किंवा माझ्या कुटुंबाने कोणावरही अवलंबून राहायला नको आहे’. ‘पालकांनी मुलींचं लग्न लावून देण्याची घाई करू नये. त्यांनी मुलींची स्वप्नं आणि आकांक्षा यांचा आदर करावा. मला माझं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली नाही. पण इतर मुलींची स्वप्ने चिरडता कामा नयेत’.सैकासारख्या तरुण स्त्रिया कोणतीही गोष्ट दुसऱ्याच्या विचाराखाली दबून स्वीकारायला तयार नाहीत. त्या त्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी लढायला तयार आहेत. 

- सुजाता शिर्के, अलका गाडगीळ 

#नवीउमेद #नकोलगीनघाई

गुहा आणि चित्रे (इतिहासात डोकावताना)

मागच्या एका लेखात आपण मुलांनी गुहाचित्रं वाचून त्यावर गोष्टी लिहिल्याचं बघितलं. चित्रांच्या मार्फत इतिहास शिकता येईल का हे बघण्याचा तो एक लहानसा प्रयोग होता. सकल ललित कलाघराशी जोडलं गेल्यानंतर गुहाचित्रं हाच विषय घेऊन माधुरी ताई आणि मी एक थोडासा वेगळा प्रयोग करून बघायचं ठरवलं. मुलांना इतिहासामार्फत चित्रकलेचा अनुभव घेता येईल का असा विचार त्यामागे होता. हजारो वर्षांपूर्वी गुहेत चित्रं काढताना आजच्यासारखे दिवे नसायचे, आज आपण सहज वापरतो ते विविध प्रकारचे रंग नसायचे आणि तरी देखील ही चित्रं हजारो वर्ष टिकून राहिलीयेत हे मुलांपर्यंत पोहचवायचा हा एक छोटासा प्रयत्न होता 
पुण्यातील खेळघर ह्या संस्थेमधील काही मुलांसाठी ही कार्यशाळा आयोजित केली होती. ही संस्था झोपडवस्तीमधील मुलांसाठी काम करते. विविध रंजक पद्धतींनी विविध विषयांची ओळख ह्या मुलांना करून देणं, जेणेकरून ही मुलं शिक्षणापासून दूर पळणार नाहीत हा ह्या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. 
कार्यशाळेची सुरवात करताना मी मुलांशी गुहाचित्रं ह्या विषयावर खूप गप्पा मारल्या. त्यांना जगभरात गुहेत सापडणारी अनेक चित्रं दाखवली. माणसाने चित्रं का काढली असावीत , कशी काढली असावीत, कशाकशाची काढली आहेत ह्या सगळ्याबद्दल एक मस्त चर्चा झाली. भिमबेटका ह्या मध्यप्रदेशमधील गुहांमधली चित्रं दाखवली. ती गुहा सापडली कशी, तिथे विविध अभ्यासकांनी कसा आणि काय अभ्यास केला, तिथे कोणती चित्रं आहेत, चित्रांचे विषय काय काय आहेत अशा असंख्य मुद्य्यांवर आम्ही बोलत होतो. काही चित्रं मुलांनी एकत्र वाचायचा प्रयत्न केला. चित्रात दाखवलेले प्राणी ओळखण्याचा एक कार्यक्रम झाला. आणि मग, मुलांना आम्ही घेऊन गेलो त्यांच्यासाठी बनवलेल्या खास गुहेमध्ये! गुहा म्हणजे काय तर, कलाघरात एक कमी उंचीचं गोडाऊन आहे. तिथली जागा स्वच्छ करून घेऊन तिथे आम्ही मेणबत्त्या, छोटे दिवे लावले होते. मुलांना गेरू आणि कोळशाची भुकटी हे साहित्य दिलं होतं. माधुरी ताईंनी मग मुलांना गुहेच्या भिंतींवर चित्रं काढायला सांगितली. मुलांना स्वतःला काय काढावंसं वाटतंय त्या विषयांवर. कोणताही ठोस असा विषय नव्हता सांगितला आम्ही मुलांना. माधुरी ताई मुलांना चित्र रंगवायच्या विविध पद्धती समजावून सांगत होत्या, करून दाखवत होत्या. मुलं देखील असंख्य प्रश्न विचारत होती. अडेल तिथे माधुरी ताईंची आणि माझी मदत घेत होती. जोरदार कामाला लागली होती सगळी मुलं आणि मग थोड्याच वेळात विविध चित्रांनी आमचं गोडाऊनच्या भिंती भरून गेल्या! ll9ll
- डॉ.अनघा भट

महाराष्ट्र १०० टक्के साक्षर व्हावा

सरकारकडून मुलांना काय अपेक्षा आहेत, हे जाणून घेताना अर्थातच पुण्याबाहेरची मुलं काय विचार करतात, याकडे लक्ष द्यावंसं वाटलं. सोलापुरातील सरस्वती मंदिर संस्था संचालित सकुबाई हिराचंद नेमचंद (स.हि.ने.) प्रशालेतील उत्साही शिक्षक नागेश जाधव सरांच्या सहकार्याने त्यांच्या विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. नुकत्याच दहावीत गेलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींशी छान गप्पा झाल्या. त्यापैकी आज आपण नंदिनी जगदाळे आणि स्वराली पत्की या दोघींच्या मतांबद्दल जाणून घेऊया. 
दहावीत गेलेल्या नंदिनीचं स्वप्न आहे रेल्वे ड्रायव्हर होण्याचं. भारतातल्या पहिल्या लोकलच्या महिला चालक सुरेखा यादव यांच्याकडून प्रेरणा घेतली असल्याचं ती सांगते. महिला सगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडू शकतात, हे दाखवून देण्यासाठी नंदिनीला रेल्वे ड्रायव्हर व्हायचं आहे. त्यासाठी सोलापूरपासून दूर मुंबई किंवा इतरत्र कुठेही राहण्याची तिची तयारी आहे. नंदिनीच्या मते, तिच्यासारखी अनेक मुलं छोट्या शहरांतून मुंबई- दिल्लीसारख्या मोठ्या शहरात शिकण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी येतात. त्यापैकी काही विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसते. अशा गरीब परिस्थितीतील परीक्षा देणाऱ्या, होतकरू तरूण- तरूणींच्या निवास आणि भोजनाची रास्त दरात सरकारने किमान 22 व्या वर्षांपर्यंत सोय करायला हवी.
नंदिनीने आणखी एक अपेक्षा लहान मुलांच्या बाबत व्यक्त केली, ती म्हणते, "मी जेव्हा मुंबईला गेले होते, तेव्हा मी रेल्वे स्टेशनवर अनेक लहान मुलांना भीक मागताना किंवा बूटपॉलिश सारखी कामं करताना पाहिलं, मला वाईट वाटलं. शिकण्याच्या वयात असलेल्या या मुलांकडे कोण लक्ष देत असेल? त्यांना वाईट संगत लागली तर पूर्ण आयुष्याचे नुकसान होईल. त्यापेक्षा सरकार 18 वर्षे वयापर्यंतच्या अशा अनाथ मुलांसाठी निवारा, भोजन आणि शिक्षणाची व्यवस्था का करत नाही? सरकारने ते करावं, त्यातून या मुलांना बालकामगार व्हावं लागणार नाही आणि शिक्षणही मिळेल." 
त्यासोबतच नंदिनीने वयात येणाऱ्या मुलींना छेडछाडीला सामोरं जावं लागतं, याबद्दल वाईट वाटत असल्याचं सांगितलं. ती म्हणाली, "असं काही घडलं की मुली घरी सांगायला सुद्धा घाबरतात. शाळेत जर एखाद्या चांगल्या शिक्षिकेला याबाबतचा संवाद साधण्यासाठी नेमलं तर निदान मुली मनातली व्यथा बोलून तरी दाखवतील. त्यातून त्या मुलीला काही धोका असेल तर ती वाचेल. शिवाय अशा प्रकारांना तोंड देण्यासाठी समुपदेशन तसेच स्वसंरक्षणासाठी ज्युडो-कराटे हे प्रत्येक शाळेत इयत्ता सहावीनंतर मुलींना आवर्जून शिकवले जावे."
तिची मैत्रीण स्वराली पत्की हिला भविष्यात शास्त्रीय नृत्यात करियर करायचं आहे. स्वराली सध्या भरतनाट्यम शिकत असून तिच्या चार परीक्षा झालेल्या आहेत. ती म्हणते, "मला एक गोष्ट फार खटकते, आपल्याकडे फक्त अभ्यासाच्या विषयांनाच महत्त्व आहे. नृत्य-नाट्य- अभिनय इ. कलांना आपल्या शिक्षण व्यवस्थेत पुरेसे स्थान नाही. भारताला कलांचा समृद्ध वारसा आहे, या कलांचा सुद्धा शैक्षणिक जीवनात समावेश केला तर विद्यार्थ्यांचे मन चांगल्या कलेत रमेल. माझ्यासारख्या ज्या व्क्तीला त्याच्यात करियर करायचे आहे, त्यांचा पाया पक्का होईल. मला पुढे जाऊन बंगळुरूमधील रेवा विद्यापीठात नृत्यकलेचे शिक्षण घ्यायचे आहे. सोलापुरात आजही नृत्याचे संपूर्ण प्रशिक्षण मिळेल अशी संस्था नही, त्यामुळे शिकल्यानंतर मला सोलापुरात असे एखादे गुरूकुल उभारायला आवडेल. प्रत्येक जण डॉक्टर- इंजिनिअर होऊ शकत नाही, बाकीच्या गोष्टीही आयुष्यात महत्त्वाच्या असतात, हे लोकांनी लक्षात घ्यायला हवे."
स्वरालीने आणखी एक चांगला मुद्दा मांडला तो असा की, "शाळेत आम्हांला जसा इतिहास शिकवतात, तश्याच जगात, भारतात, महाराष्ट्रात घडत असणाऱ्या चालू घडामोडींबद्दल का शिकवत नाहीत? वर्तमानकाळात काय चालू आहे, ते जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हा अभ्यासक्रमातील बदल सरकारने घडवून आणावा, असे मला वाटते. तसंच महाराष्ट्रही केरळप्रमाणे 100 टक्के साक्षर व्हावा, अशी माझी येणाऱ्या सरकारकडून अपेक्षा आहे. आई-वडील शिकलेले असतील तर मुलांच्या आयुष्यात फरक पडतो असे मला वाटते. त्यामुळे निरक्षर प्रौढांना शिकविण्याचा रात्रशाळांसारखा उपक्रम सरकारने हाती घ्यावा, अशी माझी विनंती आहे."
- स्नेहल बनसोडे- शेलुडकर, पुणे.

भार्गवी सुमीत यांचे मनोगत (नको लगीनघाई)

मी पुरोगामी महाराष्ट्राचा अभिमान बाळगणारी आहे. आणि आत्ताच्या काळातही महाराष्ट्रात बालविवाह होत आहेत, हे माझ्यासाठी खूप दुःखद आहे. आपण सगळे या समस्येविषयी जागरूक होऊया आणि ठोस काही करता येईल, असं बघूया
- सामाजिक समस्यांबद्दल सजग असणा-या सुप्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमीत.
#नवीउमेद #नकोलगीनघाई
व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=390913031575934
Swati Mohapatra UNICEF India
Chinmayee Sumeet

एका हेडमास्तरांची गोष्ट

नागपूर जिल्हा. इथल्या काटोल तालुक्यातील कारल्याची जिल्हा परिषद शाळा. इथले हेडमास्तर मोहन रामचंद्रराव डांगोरे यांची ही गोष्ट. २०१३ साली डांगोरे सरांची इथं बदली झाली. ४ थी पर्यंतच्या या शाळेत अवघे १८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. डांगोरे सर विद्यार्थ्यांना आपल्या शाळेकडे आकर्षित करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. सरांच्या निवृत्तीला खरंतर एकच वर्ष बाकी होतं. तरीही सरांनी शाळेला नवीन ओळख मिळवून द्यायचं ठरवलं. 
शाळेच्या सभोवताली २५० पेक्षा अधिक झाडांची लागवड करून शाळेला ऑक्सिजनपार्क म्हणून ओळख निर्माण करुन दिली आहे. यात जास्वंद, गुलाब, मोगरा, चांफा, शेवंती, कन्हेरी, लिली आदी फूलझाडे तसेच पपई, केळी, पेरु, चिकू, बोरी, आवळा, जांभूळ, बदाम इत्यादी फळझाडे तर परसबागेमध्ये भेंडी, पालक, मेथी, कोथींबीर, वांगी, टमाटर, वाल, कोहळं, दोडकी, शेवगा, काकडी, तूर, मका, यांची लागवड केली आहे. या शिवाय पाम, गुलमोहर, अशोका, विद्या, शतपर्णी, ख्रिसमस ट्री अशी विविध वृक्षांचीही लागवड केली आहे. यातील भाजीपाला व फळांचा शाळेच्या पोषण आहारात वापर केला जातो. उत्पादन मुबलक प्रमाणात होत असल्याने विद्यार्थ्यांना घरी नेण्यासाठीही याचा वापर होतो. विद्यार्थ्यांना झाडांचं महत्त्व पटावं म्हणून सर त्यांना प्रत्यक्षपणे या कार्यात सहभागी करुन घेतात.
इथली लोकवस्ती जेमतेम ४००. तरीही गावकऱ्यांनी आणि सरांनी मिळून ३ लाख रुपयाची लोकवर्गणी गोळा करून शाळेसाठी एक लाउडस्पीकर, हार्मोनियम, तबला घेतला. शिवाय या पैशातून विजभरणा व ऑक्सीजन पार्कची निर्मीती सुद्धा केली आहे.
गावक-यांना लाऊडस्पीकरच्या माध्यमातून रोज राष्ट्रगीत, पसायदान, परिपाठ, गीत गायन ऐकविण्यात येतं. याच लोकवर्गणीतून शाळेत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. संपूर्ण साक्षरता अभियानाच्या जिल्हास्तरीय कला पथकातून जगजागृती, व्यसनमूक्ती, अंधश्रद्धा, निर्मूलन शिबीराचे ठिकठिकाणी आयोजन करुन समाज प्रबोधन व कुटूंबनियोजनाचा प्रचार करुन पूरोगामी महाराष्ट्राच्या जडण घडणीत खारीचा वाटा उचलला आहे.
या उपक्रमासाठी मोहन डांगोरे सरांना २ वेळा आदर्श शिक्षक तसंच उपक्रमशील शिक्षक पुरस्कार मिळाला असून त्यांचं राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन झालं आहे. डांगोरे सरांचं “गुरुजींच्या गोष्टी” हे पुस्तक प्रसिद्धी मार्गावर आहे. 
शैक्षणिक कार्यासोबतच डांगोरे सर सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. त्यांनी आधार संस्था स्थापन करुन बाहेरील गुणवत्ता प्राप्त गरीब, गरजू, होतकरु विद्यार्थ्यांना आर्थीक, शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून मदत व मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांचे शिक्षणाप्रती मनोबल टिकवून ठेवत असतात. 


- निता सोनवणे, नागपूर 

जरा आमच्या म्हणण्याकडे लक्ष द्या

१० वी त शिकणारी झोशा खान म्हणते.. लोकांना 'संडास' या शब्दाचा उच्चार करताना अवघड वाटते मात्र शौचालयाकरिता उघड्यावर बसतील.
व्हिडिओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=471683110094553 
#voteforme #नवीउमेद #मुलांचाजाहिरनामा #विधानसभानिवडणूक19
UNICEF India Swati Mohapatra

नूतनच्या समुपदेशनामुळे थांबले बालविवाह

जालना जिल्हा. इथल्या नंदापूर गावतली सुनीता उबाळे. ती सातवीत असतानाचं तिच्या घरच्यांनी तिचं लग्न ठरवलं. तिला मात्र शिकायचं होतं, मोठ व्हायचं होतं. पण आई-वडिल व घरच्या मोठ्या लोकांसमोर तिचं काय चालणार होतं? ग्रामीण भागात मुलगी दहा-बारा वर्षाची झाली, म्हणजे मोठी झाली. मग आईवडिलां 
गावात गेल्यानंतर सुनीताचे आई-वडिल, सरपंच चव्हाण यांना भेटून या वयात लग्न न करण्याविषयी त्यांना संमजावलं. सरपंच, केंद्र प्रमुख हराळकर, शिक्षक, मुख्याध्यापक आणि गावकरी यांनी देखील याकामात पुढाकार घेतला. नूतन यांनी तिच्या सासरच्या मंडळींना बालविवाह का करू नये याबद्दल समुपदेशन केलं. अनेक प्रयत्नांनंतर सुनीताच्या आईवडिलांनी हा विवाह न करण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु नवरा मुलगा सुनीता अठरा वर्षाची झाल्यावर मी हिच्याशीचं लग्न करणार असं म्हणून अडून बसला. तो मुलगा वयानं मोठा होता. कायद्यानुसार त्याचं लग्नाचं वय झालं होतं. नूतन यांनी त्याला दोघांच्या वयातील अंतर दाखवलं. तुझी आता लग्न करण्याची इच्छा असेल तर अठरा वर्ष पूर्ण झालेल्या दुसऱ्या मुलीशी लग्न करावं असा सल्लाही दिला. त्या मुलाला तो पटला, त्यानं अठरा वर्ष पूर्ण झालेल्या दुसर्‍या तरूणीशी विवाह केला. तर सुनीताच्या पुढील शिक्षणाची सोय कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात केली. गावातील सर्व लोकांसमोर प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या हस्ते सुनीताच्या आईवडिलांनी बालविवाह न करण्याच्या निर्णय घेतला म्हणून ग्रामसभेत त्यांचा जाहीर सत्कार केला गेला. याचे सकारात्मक परिणाम पुढे जिल्ह्यात झाले. बालविवाहाचं प्रमाण घटलं. सध्या सुनीता आहे पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. तसंच ती स्पर्धा परिक्षेची तयारी करत आहे.
ना तिचं ओझ वाटू लागतं. तिला परक्याचं धन समजल जातं, त्यामुळं जितक्या लवकर तिचं लग्न लावलं तितक्या लवकर, जबाबदारी संपली. अशातच एक दिवस जिल्हास्तरावर प्रश्‍नमंजूषेच्या स्पर्धेत नंदापूर शाळेला प्रथम पारितोषिक मिळालं, बक्षीस देण्यासाठी आलेल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.राधाकृष्ण आले. त्यांनी शिक्षणात काहीही अडचण आली की, आपल्या टीमला मदत मागा असं आवाहन विद्यार्थ्याना केलं होतं. यावेळी जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत राबविण्यात येणार्‍या लिंगसमभाव व मुलींचे शिक्षण या कार्यक्रमाच्या जिल्हा समन्वयक असलेल्या नूतन मघाडे यांची तिच्याशी भेट झाली होती. काही दिवसानंतर घरी साखरपुड्यातच लग्न करायचं तिच्या कानावर आलं. शिकायचं आहे; लग्न करायचं नाही हे तिने शाळेच्या वर्गशिक्षकांना सांगितलं. दोन तीन दिवस ती सतत रडत होती, तिची परिस्थिती पाहून वर्गशिक्षकानी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचा फोन नंबर मिळवून सुनिताचं आणि त्यांचं बोलणं करून दिलं. त्यांनाही सुनीताने सांगितलं की मला लग्न करायचं नाही खूप शिकायचं आहे, तुमच्या सारखं मला पण सीईओ व्हायचं आहे, तुम्ही काही तरी करून माझ्या घरच्यांना समजावून सांगा. त्यानंतर त्यांनी ही घटना सर्व शिक्षा अभियानातील उपशिक्षणाधिकारी अशोक राऊत, सहायक कार्यक्रम अधिकारी सुनील मावकर व नूतन मघाडे यांना यावर कार्यवाही करायला सांगितली. बालविवाह थांबविण्यासाठी पूर्ण पाठींबा त्यांनी दर्शविला.
जालना जिल्ह्यात काम करत असताना प्रशासनाच्या माध्यमातून नूतन मघाडे यांनी अनेक बालविवाह समुपदेशनाने थांबविले आहेत. त्यासाठी तत्कालिन जिल्हा परिषदचे सीईओ बी.राधाकृष्ण, प्रेरणा देशभ्रतार, जिल्हाधिकारी श्याम देशपांडे, रंगा नायक, जालना पोलीस अधिक्षक ज्योती प्रिया सिंह, यांचं विशेष सहकार्य नूतन यांना लाभलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने व प्रोत्साहनानेच अनेक बालिकांची बालविवाहच्या जाचक प्रथेपासून सुटका झाली, असं त्या आवर्जून सांगतात. 
नूतन यांच्या मते बालविवाहाचा प्रश्‍न हा मानसिकता बदल आणि लोकजागृतीतूनचं सुटू शकतो. कायदा मदतीला आहे. मराठवाड्याच्या अनेक भागात नेहमी दुष्काळ पडतो. या भागातील अनेक गावातील लोक ऊस तोड कामगार आहेत. त्यामुळं घरदार व गाव सोडून त्यांना स्थलांतर करावं लागतं. अशा वेळी वयात आलेली मुलगी सोबत घेऊन जाणं म्हणजे त्यांना संकट वाटतं व गावात कुठं आणि कुणाच्या जबाबदारीवर मुलीला सोडावं? हा प्रश्‍नच त्यांच्या समोर असतो. मग मुलगी वयात आली, की तिचं लग्न लावायचं आणि मुलीच्या जबादारीतून मुक्त व्हायचं हा लोकांचा मुलीकडे पाहायचा दृष्टीकोन, अशा वेळी मुलीच्या शिक्षणाची, त्यांच्या राहण्याची सोय करणं, बालविवाहामुळं मुलीचं होणारं मानसिक, शारिरीक शोषण याची जाणीव, आईवडिलांच उद्बोधन, बालविवाह रोखण्यासाठी कायदेशीर तरतूदींची माहिती लोकांना देणं, पथनाट्य, ग्रामसभा असे विविध जनजागृती करणारे कार्यक्रम त्यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषदच्या टीमने त्यावेळी राबवले. त्यात फोटोग्रॉफर, लग्न विधी लावणारे धर्मगुरू, पत्रिका छापणारे, मंडप डेकोरेटर, मंगल कार्यालय व केटरिंग करणार्‍यांच्या कार्यशाळा घेऊन त्यांना बालविवाहाचे दुष्परिणाम, ते रोखण्यासाठी उपाय, कायद्याची बाजू याची माहिती त्यांनी दिली. तसंच गावागावात अंगणवाडी ताई व ग्रामसेवक यांच्या टीम तयार करून त्यांना बालविवाह रोखण्याविषयी जनजागृती करण्याचं प्रशिक्षण दिलं. या कामासाठी पोलीस विभाग, युनिसेफचे संदीप शिंदे, महिला व बालकल्याण विभाग, बाल संरक्षण कार्यालय, उपमुख्यकार्यकारी अधिकरी वर्षा पवार, जिल्हा परिषदचा शिक्षण विभाग, विधी प्राधिकरण, चाईल्ड वेलफेअर कमिटी, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापती, सर्व शिक्षक संघटना, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक यांची विशेष मदत त्यांना लाभली. संपर्कासाठी फोन नंबर देण्यात आले. जिल्हा यंत्रणेचा व्हॉट्स अप ग्रुप तयार करून आलेल्या माहिती वरून तात्काळ उपाययोजना करण्यात येते. सर्व जिल्हास्तरावरील याचा परिणाम म्हणून लोकजागृती होऊन बालविवाह न करण्याची मानसिकता जिल्ह्यात तयार झाली.
बालविवाहाची जनजागृती करत असताना नूतन यांना सीमा(नाव बदलले आहे) नावाच्या एका हिम्मतीच्या बालिकेची गोष्ट आवर्जून आठवते. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सीमा सहाव्या वर्गात शिकत असताना तिच्या वयापेक्षा 10-12 वर्षांनी मोठया व्यक्तीशी तिचा विवाह लावून देण्यात आला. आईचं लहानपणीचं निधन झाल्यानं, आजी आणि वडिलांनी सीमाला वाढवलं. ज्या व्यक्तीशी तिचा विवाह लावण्यात आला तो दारूच्या आहारी गेलेला होता. थोड्याच दिवसात सीमा नवर्‍याचं घर सोडून माहेरी आली. वडिलांनी तिला आधार देण्याऐवजी मुलगी माहेरी निघून आली, म्हणून दारूच्या नशेत आत्महत्या केली. वडिलांच्या मृत्यूनंतर आजीने लहान मुलं जन्मली की लोकांच्या घरी जाऊन गाणी गाऊन आणि निराधार योजनेतून जे काही पैसे मिळायचे त्यावर सीमाचा सांभाळ केला. याही परिस्थितीत सीमाने हार मानली नाही. तिनं शाळेत प्रवेश घेतला. 12 वी पर्यत शिक्षण पूर्ण केलं. तिला शिक्षणासाठी केंद्र शासनाच्या उच्च अधिकारी आकाशी मॅडम यांच्या मावशींनी आर्थिक मदत मिळवून दिली. तसंच जालना जिल्ह्यातील अजय किंगरे यांनी देखील तिला मदत केली. सीमाची परिस्थिती अतिशय विपरित असताना देखील न डगमगता शिक्षण घेतलं. तिचं हे सगळं धाडस अतिशय कौतुकास्पद आहे असं नूतन सांगतात.
बालविवाहाचं हे कार्य जोमाने करत असताना नूतन मघाडे यांना अनेक वेळा लोक विरोधही सहन करावा लागला. विरोध होत असूनही मुलींना माणूस म्हणून सन्मानाने समाजात जगता यावं यासाठी ही प्रबोधनाची चळवळ जालना जिल्ह्यात प्रशासनाच्या माध्यमातून सुरू ठेवली.
नूतन यांची आई शिक्षिका व वडील पोलिस विभागात असल्यामुळे आईकडून मिळालेला प्रामाणिकपणा, शिक्षकी वसा व वडिलांकडून मिळालेली हिंमत, अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ यामुळं त्यांनी निराश न होता आधिक उंच झेप घेतली. मूळ गांव टेंभुर्णी ता. जाफ्राबाद जिल्हा जालना येथील असलेल्या नूतन मघाडे यांनी 2000 मध्ये बावनेपांगरी येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून काम सुरू केलं. पुढे सर्व शिक्षा अभियानांर्तगत त्यांनी लिंगसमभाव व मुलींचे शिक्षण समन्वयक म्हणून यशस्वीपणे काम सांभाळलं. जालना जिल्ह्याला शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने नवनवीन प्रयोग केले. बालहक्क, मीना राजू मंच, मासिक पाळी व्यवस्थापन, लोकजागृती, शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण, बेटी बचाओ बेटी पढाओ, युनिसेफचे विविध उपक्रम, शाळाबाह्य मुलांचे प्रश्न, जेंडर, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, समता विभागातील उपक्रम, पाठयपुस्तकामध्ये लिंग समभाव आणण्याससाठी प्रयत्न, गुणवत्ता विषयक उपक्रम राबविण्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

मुलींची गुणवत्ता वाढविण्यासाठी, निवासी वसतीगृहाच्या सर्व सोयी सुविधा मुलींना वेळेवर मिळाव्या यासाठी जिल्हा व्यवस्थापन समिती समोर त्या विद्यालयाचे प्रश्न जिल्हा व्यवस्थापन व सल्लागार समिती समोर मांडून त्याचा सातत्याने पाठपुरावा करत होत्या. याकामात शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी व सर्व टीम त्यांना तितकीच मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या कामाचा अनुभव व चांगल्या कामाची दखल घेऊन त्यांना सहाय्यक कार्यक्रम अधिकारी महाराष्ट्र् प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई मार्फत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे येथे राज्यस्तरावर काम करण्याची संधी देण्यात आली. महाराष्ट्र् राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) येथे समता विभागात शाळाबाह्य मुलांसाठी त्यांनी साडेतीन वर्ष काम केले आहे. या दरम्यान राज्यभरात बालरक्षक चळवळ उभी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. बालविवाह हे मुलींचे शाळाबाह्य होण्याचे एक कारण आहे. परंतु बालरक्षकाच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या शाळाबाह्य मुलांच्या प्रश्नावर अभ्यास गेल्या साडेतीन वर्षांपासून त्या करत आहेत.
#नवीउमेद #नकोलगीनघाई
UNICEF India Swati Mohapatra Nutan Maghade Unmesh Gaurkar



- उन्मेष गौरकर, नांदेड

बाजूला १२ मजली इमारत उभी राहिली असताना सुरेश यांनी जोपासली आहे आपली शेती

 पुण्यातल्या पाषाणमधल्या एका इमारतीत एक माकड येई. अतिशय रागीट असं हे माकड सर्वाना त्रास देई. वनखात्याकडे तक्रार करूनही उपयोग होत नव्हता. माकडण्याच्या तिथे येण्यामागचं, वागण्यामागचं कारण केवळ एका व्यक्तीलाच समजू शकलं. सुरेश ससार यांना. बाजूला असलेल्या राष्ट्रीय संशोधन संस्थेत प्रयोगासाठी काही काळ मादी आणली होती. विणीच्या काळात माकडीण विशिष्ठ गंध सोडते. त्या गंधाकडे आकर्षित होऊन माकडही परिसरात आलं होतं मात्र माकडीण पिंजऱ्यात असल्यामुळे माकडाला तिच्याजवळ जाता येत नव्हतं. त्यामुळे ते रागीट झालं होतं. मग हळूहळू माकडाला खायला घालून, शांत करून त्याला जंगलात पाठवण्यात आलं. सुरेश ससार प्रणितज्ज्ञ नाहीत पण निसर्गाबद्दलचं प्रेम, त्यातून केलेला अभ्यास यामुळे त्यांना या गोष्टी उमजल्या. पुणे जिल्हा वन्य प्राणी आणि सर्परक्षक संघटना, या संघटनेच्या संस्थापकांपैकी सुरेश एक. सुसगाव किंवा पाषाणमध्ये कुणाच्या घरी,शाळेत,इमारतीत साप सापडला तर पहिला फोन सुरेश यांना. सापांबद्दल जागृती ते करतात.
सुरेश पुण्यातल्या सुसगावचे शेतकरी. या परिसराचंही शहरीकरण होत आहे. बाजूला १२ मजली इमारत उभी राहिली असताना सुरेश यांनी मात्र आपली बालपणापासूनची जमीन जोपासली आहे. गेली पाच वर्ष ते दोन एकर जमिनीवर झिरो बजेट नैसर्गिक शेती करत आहेत. शेताच्या आजूबाजूला जवळपास ३५ झाडं. ''ज्या झाडांच्या अंगाखांद्यावर वाढलो, त्यांना कसं तोडणार?'' सुरेश विचारतात. घरात दोन देशी गाई आणि दोन बैल. 
साधारण दहा वर्षापूर्वी कोंडवा इथं सुभाष पाळेकर गुरुजींचा नैसर्गिक शेतीवरच्या कार्यक्रमात त्यांची ‘वसुंधरा स्वच्छता अभियान’ गटाशी ओळख झाली. हा गट बाणेर-पाषाण इथल्या टेकड्यांवर झाडं लावतो. .सुरेश आठवड्यातून अनेकदा पाणी घालण्यासाठी सकाळी या टेकड्यांवर जातात. अतिक्रमणातून आग लावण्याचे प्रकार घडतात तेव्हा संरक्षक पोशाख न घालता,कुठल्याही वेळी सुरेश आग विझवण्यासाठी एकटे जातात आणि झाडं वाचवतात. 
आपले किल्ले हा आपला वारसा. त्यांच्या संवर्धनासाठी शिखर फाउंडेशन संस्थेत सभासद म्हणून काम पाहात ते अनेक ट्रेक्सला जातात,मार्गदर्शन करतात.

-संतोष बोबडे

जरा माझ्या म्हणण्याकडे लक्ष द्या

इयत्ता ८ वी मध्ये शिकणारी श्रद्धा सरोज विचारते. विद्यार्थ्यांना फक्त ७ वी पर्यंत मिडडे मिल मिळते ते १० वी पर्यंत का नाही मिळत.
व्हिडीओ लिंक :  https://www.facebook.com/watch/?v=510408672858170
#नवीउमेद #मुलांचाजाहिरनामा #विधानसभानिवडणूक #voteforme
Swati Mohapatra UNICEF India