Monday 25 March 2019

मद्यपी चालकाची गाडी जागेवरच थांबणार…

‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ची अनेक प्रकरणे आपल्याकडे गाजली. त्यातल्या काहींना शिक्षा झाली तर काही निर्दोषपणे सुटलेही. अर्थात, अशा अपघातात हकनाक बळी गेले त्यांच्या कुटुंबाच्या वाट्याला केवळ दुःख आलं. असा हा ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ प्रश्न खरंतर जगभरात सर्वच ठिकाणी आढळणारा आहे. याच गोष्टीचा विचार करून नाशिक येथील अजिंक्य जाधवने ‘मद्यपान केले तर कार जागेवरून हलणारच नाही’ असं आगळंवेगळं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. सध्या हॉवर्ड विद्याापीठात तो शिक्षण घेत आहे.
जगातील काही समविचारी युवक एकत्र आले. त्या त्या भागात भेडसावणाऱ्या स्थानिक प्रश्नांवर त्यांच्या पातळीवर ते उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहे. युवकांच्या याच गटात १९ वर्षीय अजिंक्यही सहभागी झाला आहे. अमेरिकेतील हॉवर्ड विद्याापीठात विज्ञान शाखेत शिकणाऱ्या अजिंक्यने वेगळी वाट धुंडाळली. शिकत असतानाच त्याला शिष्यवृत्ती मिळाली. आणि यंगस्टाऊन विद्यापीठात त्याने संशोधनाला सुरूवात केली. सामाजिक प्रश्नांवर काम करू इच्छिणारी समविचारी मंडळी त्याने जमवली. यात वेगवेगळ्या देशांतील २५० हून अधिक युवक एकत्र आले. त्यांनी ‘वी ऑल टीन’ या कंपनीची स्थापना केली. आता या कंपनी वेगवेगळ्या प्रश्नांवर काम सुरू केलं. त्यात दहशतवाद, जागतिक तापमानवाढ, आंतरराष्ट्रीय राजकारण, गरिबी, कुपोषण, भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांचा समावेश आहे. समविचारी मंडळी एकत्र असल्याने एकाच प्रश्नांवर वेगवेगळ्या पध्दतीने विचार होतो, याकडे अजिंक्यने सर्वांचं लक्ष वेधले. मद्यपी चालकांमुळे होणारे अपघात, हा असाच एक प्रश्न त्यांच्या समोर आला.
अमेरिकेतील ओहयो राज्यात ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यात अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले. यावर उपाय शोधण्याच्या दृष्टिकोनातून विचार सुरू झाला. त्यातून हे अनोखे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. मद्यपान केल्यावर शरीरात अल्कोहोलचे प्रमाण जास्त असल्यास मोटार चालणार नाही, असं हे तंत्रज्ञान. चार चाकी वाहनात हे तंत्रज्ञान उपयोगात आणल्यास अपघातांचे प्रमाणही कमी करता येईल. कारण, मद्यप्राशन केलेल्या व्यक्तीने गाडीचे ‘स्टिअरिंग’ हाती घेतल्यास संबंधिताच्या शरीरात अल्कोहोलचे प्रमाण किती आहे, याची चाचपणी होईल. हाताला येणाऱ्या घामातून ही प्रक्रिया पार पडेल. आणि शरीरात ६० टक्के वा त्याहून अधिक अल्कोहोल असल्यास गाडी चालणार नाही, अशी ही व्यवस्था. म्हणजे अतिरिक्त मद्यपान करून चालक मोटार चालवू शकणार नाही. एकतर त्याला आपली मोटार चालवण्यासाठी मद्यपान न केलेल्या अन्य चालकाची मदत घ्यावी लागेल. किंवा आपली गाडी आहे तिथेच ठेवून अन्य मोटारीचा पर्याय निवडावा लागेल. अर्थातच यामुळे रस्त्यावरील अपघातांना पायबंद घालता येईल. या विलक्षण तंत्रज्ञानाला अमेरिकन सरकारने दाद दिली. अजिंक्यला वॉशिंग्टन डीसी येथे ‘एशियन एमरजिंग युथ इन यु एस’ पुरस्कार देऊन नुकतंच सन्मानित करण्यात आलं. तसंच अजिंक्यच्या संस्थेची वाटचाल पाहता २०१९च्या ‘फोर्ब्स अंडर ३०’ यादीत त्याचं नामांकनही झालं आहे.

- प्राची उन्मेष, नाशिक

कुलूपबंद घर.... (सदा आबाची ऐका वाणी भाग ७)

नमस्कार दोस्तांनू? कस चाललयं? बर हाय नव्ह‌ं? 
हा आता पाण्याचे हाल हैत तुमचं हे माहितै न्हाई का या सदाआबाला. पर सद्या बर हायं, लै गावं सद्या रिकामी हायतं. मजूर तोडीला गेलतं नव्हं का! आता तुम्हास्नी गोष्ट सांगतो ती राणीउंचेगावची (जि.जालना). 
जिथं अनेक घरं कुलूपबंद झालेती. तुम्ही आज गावास भेटलास तर तुम्हास कळनं.
औंदा पीक पाणी नसल्यानं तिथालले बी लोकं मोक्कार झाले. शिवारात काम नसल की हाताची अन् पोटाची गाठ होते का? ह्यो सवाल. यंदा पाऊस ईल ईल म्हणता दगा दिला. मंग काय, राणीउंचेगावातलं शेतमजूर, कामगार, निघालं उसतोडीला.
इशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यास्नी धा-ईस एकर जमीन हाय, त्यास्नी बी काय कराव कळना गेलयं. पाणी नाही मंग बैल, बारदाणा कसा सांभाळायचा. पावसाच्या भरोशावर तूर लावली. पर त्याला शेंगा सुदीक न्हाईत. मग पळहाट्या तोडून आता ते पेंढ करून गुरास्नी टाकीत हायेत.
मह्यासारखे भूमीहीन लोकं काय करतेल. गावात काम न्हाईत. निघाले शहराकडे. बंजारा, भिल्ल वस्ती रिकामी झाली. काही बिऱ्हाडं उसतोडीसाठी गेली तर काही शहराकडे कामधंद्यासाठी. या बिऱ्हाडातील पोर बाळं जी गावातील आश्रमशाळा, झेडपीच्या शाळेत व्हती, ती शाळा सोडून मायबापासंग गेली. काय करत्यात ते आधी पोटाेबा येतो नव्हं का?
ऑक्टोबरपासून गाव मोकळं होत गेलं. वस्त्या ओस पडू लागल्या. आता गाव, शिवारात फिराल तर अनेक घरांना टाळ लागलेलं दिसलं. हे चित्तरचं तुम्हास्नी दुष्काळ असा माणसाला पळवीतो हे सांगन. अजूक ५ महिनं जायचेत. ज्यांच्या हातास्नी काम नव्हत ती गाव सोडून गेली आता ज्यांना पियाला पाणी मिळणार न्हाई ते गाव सोडतील... घर कुलूपबंद करून, लेकरांच पाटी, पेन्सीलवर वरवंटा फिरवूनच. 
 
- अनंत साळी, जालना

यंदा कमी पाण्यातही चांगलं भातपीक आलं


अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील पाटीलवाडी(धामणवण). अकोले तालुक्यातल्या बहुतांश गावांप्रमाणे आदिवासीबहुल. भरपूर पाऊस पडत असल्यामुळे भात हे मुख्य पीक. मात्र अलीकडे भातासह अन्य पिकांच्या गावरान जातींची लागवड कमी झालेली. उत्पन्नाची फारशी साधनं नसल्यानं नगर, पुणे, नाशिक इथं मजुरी.
या परिस्थितीवर मात करण्यासाठी गावातल्या १४ आदिवासी महिलांनी तीन वर्षांपूर्वी कावेरी महिला बचतगट सुरू केला. सखुबाई धराडे(अध्यक्ष), शशिकला धिंदळे (सचिव), कमल धिंदळे, उषा धिंदळे, ललिता धिंदळे,गंगुबाई धिंदळे, सीताबाई करवंदे, रुक्‍मिणी धराडे, कांता धराडे, सुगंधा करवंदे, सुरेखा धिंदळे, उषा धराडे, कविता भांगरे, सविता धिंदळे अशा या १४ जणी. महिन्याला १०० रुपये बचत. वार्षिक उलाढाल २५ ते ५० हजार. विविध पिकांच्या देशी बियाणांची बँक गटानं सुरू केली आहे. त्यासाठी प्रोत्साहन मिळालंय लोकपंचायतच्या सारंग पांडे यांचं. लोकपंचायत ही संगमनेर इथली सामाजिक संस्था. परिसरातल्या आदिवासींसाठी अनेक वर्षांपासून काम करणारी.
कावेरी बचतगट त्यांच्या बियाणं बँकेतून परिसरातल्या शेतकऱ्यांना दीडपट परतीच्या अटीवर पेरणीसाठी बियाणं देतो. यंदा गटानं २५० च्या वर शेतकऱ्यांना किफायतशीर दरात बियाणं दिलं आहे.उत्पादनानंतर परत आलेलं बियाणं योग्य असल्याची खात्री करून आवश्‍यकतेनुसार साठवण करतात. बियाणात काही त्रुटी आढळली तर त्याचा तांदूळ करून विक्री केली जाते.
गटाकडे सध्या भातामधील काळभात, टायचन भात,इंद्रायणी, आंबेमोहर, ढवूळ, तामकुडाई, वरगळ, खडक्‍या, रायभोग, कोळपी,नाचणीमधील मुटकी, फरंगाडी, शितोळी; गव्हातील कल्याण सोना, बक्षी, बोटका; भुईमूगातील कुंड्या, घुंगऱ्या, लाल्या, एरंड्या; वाटाण्यातील काळा,हिरवा, ढवळा; उडीदामधील उडदया, उडीद. ज्वारीमधील उतावळी ज्वारी,
पांढरी व लाल चवळी; वालातील कडूवाल, गोडवाल, काळावाल; घेवडयामधील श्रावणी, पेरवेल, पतडा, आबई, काळाघेवडा, वाडवल, गुडघ्या यांचे वाण आहेत. शिवाय औषधी वनस्पतीमध्ये कोंबडकंद, अमरकंद, अर्जुन सादडा, रगतरेहडा, सतापा, बाळ हिरडा, बेहडा, गावरान तुळस. याचबरोबर हावरी (तीळ),पपई, मोहरी, सूर्यफूल, मिरची, कारले, चंदनबटवा, दोडका, डांगर,काकडी,बळुक, भेंडी, गोरानी गवार, कोंबडीभाजी, तेराभाजी, कुरडूभाजी, बडदा,धापा, फांदीची भाजी, भोकरभाजी, काटेरी वांगी, घोसाळे, खुरासणी, वरई,राळा, भादुली, हरभरा, मसूर, हुलगे यांचेही बियाणं आहे.
राजूर इथं आदिवासी विभागामार्फत आयोजित डांगी पशुप्रदर्शनात उत्कृष्ट महिला गट म्हणून गटाला गौरवलं आहे. पुणे, हरियाणा, नगर, जळगाव, बंगलोर,मुंबई, बिहार आदी भागांतील शेतकरी, महिलांनी बियाणं बँकेला भेट दिली आहे. यावर्षी या भागात पहिल्यांदाच पावसाचं प्रमाण कमी आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी गावरान वाणाचा भात पेरला तो कमी पाण्यात चांगला आला, असं महिला सांगतात.

- सूर्यकांत नेटके, अहमदनगर

रत्नागिरीतल्या रुग्णांना आता न्यूरोसर्जरीसाठी कोल्हापूर- मुंबई गाठायची गरज नाही

रत्नागिरीचं जिल्हा शासकीय रुग्णालय. गेल्याच महिन्यात लांजा इथल्या रुग्णावर मणक्यावरची पहिली शस्त्रक्रिया रुग्णालयात यशस्वीरीत्या पार पडली. यापूर्वी रुग्णालयात मणक्यावरच्या काही शस्त्रक्रिया झाल्या आहेत मात्र त्याही खूपच कमी आणि बाहेरच्या तज्ज्ञांकडून झालेल्या. रुग्णालयातल्या तज्ज्ञाकडून झालेली ही पहिलीच शस्त्रक्रिया. ती केली डॉ श्रीविजय फडके यांनी. गेल्या महिनाभरात जिल्हा रुग्णालयात अशा ११ मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. 
''लहानपणापासूनच मला डॉक्टर व्हायचं होतं. वडील अनिरुद्ध हेसुद्धा डॉक्टर. ते करत असलेली रुग्णसेवा पाहून आपोआपच या क्षेत्राबद्दल आस्था निर्माण झाली.'' न्यूरोसर्जन डॉ श्रीविजय सांगत होते. '' ग्रामीण भागातले कितीतरी गरीब रुग्ण इथे उपचारासाठी येतात. मात्र न्यूरोसर्जन नसल्यामुळे त्यांना कोल्हपूर, मुंबईला पाठवावं लागत असल्याचं कानावर आलं होतं. जिथे लहानाचा मोठा झालो तिथे रुग्णसेवा करून काही प्रमाणात ऋणनिर्देश व्यक्त करावे असं वाटलं.''
डॉ श्रीविजय दापोलीचे. शाळा- महाविद्यालयात गुणवत्तायादीत. एमबीबीएस, एमएस, एमसीएच. वर्ष २०१८ मध्ये न्यूरोसर्जरीत कोलकाता विद्यापीठातून त्यांनी सुवर्णपदक पटकावलं. कोलकाता इथं तीन वर्षात ५०० शस्त्रक्रिया. शक्य तितक्या कमी पैशात रुग्णसेवा देण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. न्यूरोसर्जरीसाठी लागणारी साधनसामग्री रुग्णालयात उपलब्ध नसल्यामुळे श्रीविजय यांनी स्वतः ती आणली. साधनसामग्री नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होता कामा नये असं त्यांना वाटतं. साधनसामग्रींसाठी पाठपुरावा ते करत आहेत. 
-जान्हवी पाटील, रत्नागिरी

गोष्ट राधाबाईंची

शहादा बसस्थानक. इथंच एका पेपर स्टॉलवर एक पासष्ठीच्या बाई बसलेल्या दिसतात. थोड्या तापट आणि बोलणंही थोडं कटू. असं असलं तरी गेली जवळपास ४० वर्ष त्या न चुकता शहाद्याच्या पेपर स्टॉलवर पेपर विक्री करत बसलेल्या दिसतात. रोज त्यांना बघत होतोच. आज मात्र त्यांच्याशी गप्पा झाल्या.
ऊन, वारा, पाऊस व थंडीला न जुमानता आजही घरातील सर्व कामे करून सकाळी ७ वाजता त्या बसस्थानकातील स्टॉलवर हजर असतात. कुठलंही शिक्षण नसतांना, आकडेमोड येत नसतांना स्वतःच्या हिंमतीवर परिस्थितीवर मात करून या अवघड व्यवसायात स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण करणाऱ्या या राधाबाई.
१८ व्या वर्षीच राधाबाईंचं शिवदास बेलदार यांच्याशी लग्न झालं. शिवदास बेलदार यांचा वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय. तेव्हा नवऱ्यासोबत बाईने व्यवसायात सहभागी होणं मोठं धारिष्ट्याचं काम. तरीही, आपल्या पतीला व्यवसायात मदत करण्याच्या निर्णय राधाबाईंनी घेतला. जळगाव, नाशिक व धुळे येथून एसटीने वृत्तपत्रांची बंडले शहादा बसस्थानकात येत. शिवदास पहाटे चारलाच घराबाहेर निघत. वृत्तपत्रांची बंडले ताब्यात घेतल्यानंतर ती प्रत्येक वाचकाच्या घरापर्यंत पोचविण्यासाठी सायकलचा वापर करीत. त्यातून बऱ्यापैकी कमाई होत असली तरी ती भविष्याच्या दृष्टीने ती अपुरी असल्याची जाणीव राधाबाईंना झाली. शिवाय वृत्तपत्र वाटपाचं काम सकाळी नऊलाच संपतं. त्यानंतर करायचं तरी काय? असा स्वतःशीच सवाल करीत राधाबाईंनी शिवदास यांना बस स्थानक परिसरात वृत्तपत्राचा कायमस्वरूपी स्टॉल लावण्याची सूचना केली. सुरुवातीला बेलदार यांनी दुर्लक्ष केलं. स्टॉल सुरू केला तर तिथं कायमस्वरूपी बसणार कोण हा प्रश्न त्यांनी उपस्थित केल्यानंतर स्टॉल सांभाळण्याची जबाबदारी मी स्वीकारते असं राधाबाईंनी ठामपणे सांगितलं. आणि १९७७ साली शहादा बस स्थानकात वृत्तपत्राच्या स्टॉल सुरू झाला.

पतीला व्यवसायात मदत करण्यासोबत घरातील दैनंदिन कार्य सुरूच होते. यातच राधाबाईंना हरिश्चंद्र, पुरूषोत्तम व दिवाकर अशी तीन मुलं आणि चंद्रकला, कल्पना अशा दोन मुली अशी पाच अपत्यं झाली. आता कुटुंब वाढलं होतं. अर्थात जबाबदारीही वाढली होती. मुलांना सांभाळण्यासह त्यांचं शिक्षण ही जबाबदारी पार पाडत राधाबाई नियमितपणे बसस्थानकातील स्टॉलवर हजेरी लावत. येणाऱ्या प्रवाशांना वृत्तपत्र देणे, वृत्तपत्राच्या प्रतिनिधींना मासिक बिल देणे करणे ही जबाबदारी राधाबाई नियमित पार पाडतात. राधाबाईंची मुलं आणि मुलींनी व्यवसायात साथ द्यायला सुरुवात केली आहे. दिवसभरात विविध वृत्तपत्रांचे पाच ते सहा हजार अंक वाटप व विक्री करण्यासह विविध नियतकालिके, साप्ताहिके, धार्मिक व स्पर्धा परीक्षांची पुस्तके या स्टॉलवर विक्री केली जात आहे. घरात नातवंडे आली तरीही राधाबाईंचे काम काही थांबलेलं नाही. आजही त्या सकाळी सात वाजता स्टॉलवर येतात. दिवसभर आलेली वृत्तपत्रे व शिल्लक राहिलेली वृत्तपत्रे त्यांच्या हिशोब ठेवतात. दुपारी दोनपर्यंत त्या थांबतात. त्यानंतर जेवण. वयाच्या पासष्ठीतही इतक्या कार्यरत असणाऱ्या राधाबाईंचं कौतुक व्हायला हवं.
- रूपेश जाधव, नंदुरबार

तू खचून जाऊ नकोस...

गावातील अनाथ मतिमंद मुलीवर झालेल्या अत्याचारातून मूल जन्माला आलं. गावतल्या लोकांसाठी ते एक संकट ठरलं. मात्र, त्याच मुलीला मातृत्वाची जाणीव करून देत दोघांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या त्या शिल्पा आघाव. 
पाच वर्षांपूर्वीची गोष्ट. शिल्पा आघाव अंगणवाडी सेविका म्हणून काम करत होत्या. विविध वस्त्यांत महिला बालकांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्या आरोग्य आणि सामाजिक प्रश्नांसाठी काम करायचं, त्यांना माहिती द्यायची हे त्यांचं काम. असंच काम सुरू असताना एका ग्रामीण भागात बकऱ्या चारणाऱ्या अठरा वर्षाच्या गतिमंद मुलीला मुलगा झाल्याची माहिती त्यांना मिळाली. घरात अठरा विश्व दारिद्र्य, आई-वडील नाहीत. त्यामुळे तिचा सांभाळ आजवर आजी आजोबांनीच केला होता. एकीकडे कुणाचा आधार नाही, पाठिंबा नाही आणि प्रसंग असा आलेला. पीडीत तरुणीला ते नवजात शिशु नकोसं वाटत होतं. बाळाची स्वच्छता वेळोवेळी होत नसल्याने बाळाला संसर्गजन्य आजार होत होते. एकीकडे बाळ नकोसं होतं तरी दवाखान्यात घेऊन गेले तर बाळाला हिसकावून घेतील अशी भीती. त्यामुळे ती कोणाच्या हातातही बाळाला द्यायची नाही. घरात बाळाला एकटं सोडून बाहेरून कुलूप लावून बकऱ्या चारण्यास निघून जायची. अशातच शिल्पाताईच्या कानावर बातमी आल्याने त्यांनी आधी संबंधित तरुणीचा विश्वास संपादित केला. तिच्या बाळावर सर्वांचंच प्रेम आहे हे तिला पटवून दिलं. तिला सोबत घेऊन बाळावर उपचार सुरू केले. त्यानंतर त्याचे लसीकरण, कपडे घेऊन देत जास्तीत जास्त स्वतःच्या सहवासात ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
आता शिल्पा ताईंचं काम बघून गावातील दानशूर सरसावले. पोषक आहार आणि योग्य देखभालीत वाढणाऱ्या या बाळाचे मोल खूप आहे. तू खचून जाऊ नकोस असा पाठिंबा बाळाच्या आईला देत शिल्पाताईनेच त्याचे नाव अमोल ठेवले. आज अमोल सर्व मुलांमध्ये मिसळतो. रोज अंगणवाडीत जाऊन अभ्यास करतो. आता तो पाच वर्षांचा झाला आहे. आणि त्याला शाळेत घालण्यासाठी शिल्पाताईंचे प्रयत्न सुरू आहेत. आता सामाजिक पाठिंबा मिळत असला तरी अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शिल्पाताईंचे मुलींना खंबीर बनवायचे प्रयत्न सुरू आहेत. परिस्थितीने गरीब, अशिक्षित असले तरी कुणाच्याही छळाला बळी पडू नका. तुम्ही खंबीर व्हा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे बाळकडू या वस्तीतील मुलींना मिळत असल्याने शोषणाचं प्रमाण तिथं फारसं दिसत नाही. आता शिक्षण आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांनी पाऊल उचललं असून अंगणवाडी कार्यक्षेत्रातील अनेक महिलाही त्यांच्या या मोहिमेत सहभागी होत आहेत. शासकीय योजनांचा लाभ अमोलला मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू पण समाजात असे अमोल पुन्हा जन्माला येणार नाहीत यासाठीही तरुणींना सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं, शिल्पा सांगतात.
शिल्पा आघाव म्हणतात, “मागासवर्गीय वस्तीत शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. अमोलच्या प्रश्‍नावर आवाज उठवताना त्याच्या पुनर्वसनासाठी मी पुढाकार घेतला. यामागील व्यक्तीचाही शोध घ्यायचा प्रयत्न केला. पण यश मिळालं नाही. प्रत्येक वेळी असे अमोल आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यासाठी तरुण-तरुणींनी सक्षम व्हावं असं मला वाटतं. आता गावातील महिलांची हळूहळू साथ मिळू लागली आहे. त्यामुळे महिलांचे आरोग्य शिक्षण यावर काम सुरू आहे.”


- चेतना चौधरी, धुळे

प्रगतीची सायकल

सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या व्होळे गावातल्या साक्षी महावीर चोपडेला आता पुढल्या वर्षी वरवडे इथल्या माध्यमिक शाळेत जाता येणार आहे. अरण गावातल्या
साक्षी विष्णु काळेची शाळा अडीच किलोमीटरवर. दुष्काळामुळे घरची स्थिती बेताची. आता तिला रोज शाळेत जाता येणार आहे आणि वेळ वाचल्यामुळे अभ्यासासाठी वेळ मिळणार आहे. या दोघींसह माढा तालुक्यातल्या २५० मुलींच्या जीवनात आता बदलाची आशा करायला हरकत नाही.
महिला सक्षमीकरणात शिक्षण हा सर्वात महत्त्वाचा टप्पा. ग्रामीण भागात मात्र आजही अनेक मुलींना शिक्षणासाठी अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागतं. ते दूर करण्यासाठी प्रयत्न करणारेही आहेतच. सोलापूर जिल्ह्यातल्या निमगाव इथल्या माढा वेलफेअर फाऊंडेशननं परवा ग्रामीण भागातल्या २५० मुलींना सायकली दिल्या. माढा तालुक्यातल्या मोडनिंब इथं हा कार्यक्रम झाला.

"ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विद्यार्थिनींसाठी घर ते शाळा प्रवास फारच खडतर, प्रगतीतला अडसर."सचिव युवराज शिंदे सांगतात."सायकलचा मुलींना उपयोग होतो आणि त्याचा परिणाम गुणवत्तावाढीवर होत असल्याचं अशा काही प्रयोगातून दिसून आलं आहे." 
शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, शासकीय यंत्रणा, शिक्षक, पालक, मुली यांच्याशी संस्थेने चर्चा केली. मुलभूत सर्वेक्षण, माहिती संकलन, देणगीदारांच्या भेटी, सामजिक दायित्वांतर्गत देणगी देणाऱ्या कंपन्यांसमोर सादरीकरण. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धनराज शिंदे यांच्यासह २५ कार्यकर्ते १५ महिने यासाठी प्रयत्न करत होते. 
-गणेश पोळ, सोलापूर

बीडमध्ये दामिनी आता दुचाकीवर

महिला आणि मुलींची छेडछाड रोखणारं पोलिसांचं दामिनी पथक. बीडमधल्या दामिनी पथकानं वर्षभरात सुमारे तीन हजार टवाळखोरांवर कारवाई केली. दामिनी पथकासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी केलेल्या उपक्रमाचं कौतुक खुद्द राज्याच्या अपर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांनी केलं आहे. 
सरवदे यांच्या हस्ते गेल्याच महिन्यात पथकाला १२ दुचाकी देण्यात आल्या. दुचाकी लोकसहभागातून घेतलेल्या. श्रीधर यांनी जिल्हा पातळीसोबतच प्रत्येक तालुक्यात एक अशी १२ पथकं स्थापन केली. सरकारी वाहन उपलब्ध नसणं, अरुंद गल्लीबोळ अशा काही अडचणी या पथकांना यायच्या. यावर दुचाकी उत्तम पर्याय. पण त्यासाठी निधी नाही. मग सामाजिक संस्था, उद्योजक, दानशूर व्यक्ती मदतीसाठी पुढे आल्या. 'बॉडी ऑन कॅमेरा' असलेलं हे राज्यातलं एकमेव दामिनी पथक. पथकातील पोलिसांच्या गणवेषावर कॅमेरा. कारवाईचं चित्रण पोलीस नियंत्रण कक्षात रेकार्ड. त्यामुळे पुरावा उपलब्ध होत असल्यानं पुढची कारवाई शक्य होते. शिवाय पथकाला स्मार्ट फोनही दिले आहेत. 

पथकानं बचतगटांशी संवाद साधला. शाळा-महाविद्यालयातल्या मुलींना बोलतं केलं. ''अनेकदा मुली स्वतःहून तक्रारीसाठी पुढे येत नाहीत.'' श्रीधर सर सांगतात. ''कुटुंबाकडून शाळा, महाविद्यालय, शिकवणी बंद होण्याची भीती त्यांना असते. त्यावर आम्ही पथकातल्या सदस्यांना प्रशिक्षण दिलं. ठिकठिकाणी जाऊन मुलींसोबत चर्चा केली. पोलीस सोबत असल्याचा विश्वास त्यांच्यात निर्माण केला. तक्रारदार मुलीची ओळख गुप्त ठेवली जाऊ लागली. परिणामी तक्रार करण्यासाठी पुढे येणाऱ्या मुलींची संख्या वाढू लागली.'' पोलीस उपनिरीक्षक भरत माने यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा दामिनी पथकातील रंजना सांगळे, सुनील गर्जे, रमा भालेराव, गणपत पवार तक्रार करताच कारवाई करू लागले. ''मुली तर पुढे येऊ लागल्या. पण जिल्ह्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनाही सातत्यानं घडत होत्या.अनेकदा आरोपी परिचयातलाच.'' रंजना सांगळे सांगतात. यावर पथकानं १८ वर्षांखालील मुलींसाठी विशेष मोहीम राबवली. जिल्ह्यातल्या सर्व शाळांमध्ये स्पर्शज्ञानाबाबत मार्गदर्शन केलं. 'स्वयंसिद्धा' पुस्तिका शाळा-महाविद्यालयांमध्ये मोफत देण्यात आली.
त्याचबरोबर महिलांविषयक कायदे, दाखल होणारे गुन्हे, करिअरवर होणारा परिणाम, याची जाणीव मुलांना करून देण्यात येते.
- अमोल मुळे, बीड

दुष्काळात माणूस बनतो आधार (सदा आबाची एैका वाणी...भाग क्रमांक ६)

दुष्काळात समदीकडून अडचणी येतात. पण काही चांगलं बी घडतं आसपास. तुम्ही म्हणसाल ह्यो सदा आबा फकस्त नकारात्मक बोलतो. तर आता सांगतो एक सकारात्मक गोष्ट...
पुण्याच्या 'निरंजन' सेवाभावी संस्थेने दुष्काळी भागातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, गरजू आणि गरीब मुलांचे शैक्षणिक पालकत्त्व घ्यायाचं ठरीवलं. त्याचा लै लेकरांना आधार होणार हाये.
शिरूर कासार (जि.बीड) येथील जयेश कासट १९९७ साली व्यवसायासाठी पुण्याला गेले. व्यवसायात चांगला जम बसल्यावर तिथंच स्थायिक झाले. परंतु, त्यांस्नी गावचा लळा व्हताच. दुष्काळी परिस्थितीमुळे गावच्या शेतकऱ्यांची दैना जयेश यांना बघवत नव्हती. त्यांच्यासाठी काही करता येईल का असा विचार, प्रयत्न जयेश सतत करत.
यातून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना आधार देण्याचं त्यांनी ठरीवलं. जयेश यांनी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेऊन आधार व्हायाचं ठरीवलं. मंग काय पाहता पाहता विराज तावरे (बारामती), स्वप्नील देवळे (पुणे), अभय जाजू (सोलापूर), अतुल डागा (नगर), जगदीश मुंदडा (हडपसर), नवनीत मानधनी (धर्माबाद, नांदेड), ब्रम्हानंद लाहोटी, अमित गायकवाड, आनंद जाखोटीया, भरत लढे, प्रतिम जगताप (अमेरिका), रमेश तोष्णीवाल (लातूर) यांच्यासह ५० तरुण म्होरं आले. 'निरंजन'सेवाभावी संस्था स्थापून ७ वर्षांपूर्वी २०११ साली शिरूर कासार येथील २५ मुलांना दत्तक घेतले. गरजूंना दत्तक घेण्याचा ह्यो उपक्रम आत्तापर्यंत सुरू हाये. नगर जिल्ह्यातील १०० मुलांना दोन वर्षांपासून, पुणे जिल्ह्यामधील नांदगाव (ता. मुळशी) येथील पाच वर्षांपासून ६० मुले तर रायगड येथील ९८ शेतकऱ्यांच्या मुलांना सहा वर्षांपासून शैक्षणिक मदत ते देतायेत.  
२५ मुलांपासून सुरू केलेला हा उपक्रम ५०० मुलापर्यंत पोचला आहे. यंदा (२०१९) राज्यभरातील एक हजार मुलांना संस्था आधार देणार हाय. 'निरंजन'मधील सर्व सभासद पदरमोड करत हा उपक्रम राबवत आहेत. दत्तक घेतलेल्या मुलांना गणवेश, बूट, दप्तर, पुस्तके, वह्या आणि वर्षभर पुरेल इतके शैक्षणिक साहित्य देतात.
हमाल, मापाडी यांच्या मुलांसाठीही हे युवक काम करत आहेत. रायगड झेडपी शाळा हिरकणीवाडी शाळेतील ९८ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्त्व संस्थेने स्वीकारलं. गड, किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या गावांतील शेतकऱ्यांची मुलंही दत्तक घेऊन त्यांना आधार दिला जाईल, असं विराज तावरे यांनी सांगितलं. अनेक शेतकरी नैराश्यातून आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. त्यामुळे त्याच्या मागे असणाऱ्या कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेतकरी आत्महत्या थांबाव्यात यासाठी 'निरंजन' संस्थेकडून जनजागृती केली जाते. याशिवाय तंबाखूविरोधी जनजागृती रॅली, अस्थमा अवेरनेस कॅम्प, मधुमेह, ज्येष्ठ नागरिक आरोग्य जागृती, पोलिसांसाठी हास्ययोग तसेच पुण्यातील पोलिस स्टेशनमध्ये प्रथमोपचार पेट्यांचे वाटप, आळंदी देवस्थान पालखी सोहळ्यासोबत जाणाऱ्या दिंड्यांना प्रथमोपचार पेट्या, आरोग्य शिबिरे घेतली जातात, अशी माहिती त्यांनी दिली.
संस्थेचे अध्यक्ष जयेश कासट सांगतात, "ग्रामीण भागात दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. शेतकऱ्यांची मुलं शिकली तर त्या कुटुंबाचं भवितव्य बदलेल हा उद्देश ठेवून आम्ही आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील मुलं, शेतकऱ्यांची मुलं, अनाथांना मदत करतो. दरवर्षी विद्यार्थी संख्या वाढवत आहोत. यातून मानसिक समाधान मिळतं."
लोकहो, तुमास्नी या संस्थेच्या कार्यात खारीचा वाटा उचलायचा असलं तर जयेश कासट, (मो.क्र.8007884483) यांच्याशी संपर्क करू शकता. 
- सूर्यकांत नेटके, अहमदनगर

पकोडे विकणारी नगरसेविका

    कुठलाही नगरसेवक म्हटला की त्याच्या गळयात एक जाडजूड सोन्याची चेन, बोटात तीन-चार अंगठ्या, खादीचे कडक पांढरे शुभ्र कपडे, एक मोठी चारचाकी गाडी आणि अवती भोवती दहा बारा कार्यकर्त्याचा गराडा असं चित्र सहसा आपण बघत असतो, कारण काही मोजके नगरसेवक सोडले तर इतर सर्व याचं ‘कॅटेगिरी’त मोडतात. महिला नगर सेविका असेल तर तिचाही ‘थाट’ बघण्यासारखा असतो. छान भारीची साडी, गळ्यात जाडजूड मंगळसूत्र हातात सोन्याचे ब्रेसलेट, बांगड्या, लॉकेट वगैरे आणि दिमतीला एक आज्ञाधारक ड्रायव्हर व चकाचक चारचाकी.
मात्र वर्धेला एक असंही नगरसेवक जोडपं आहे जे आळीपाळीने मागील 25 वर्षांपासून सतत नगरसेवक असूनही चक्क भाड्याच्या घरात राहतात. त्यांचा मुलगा मराठी माध्यमाच्या शाळेत शिकतो. आणि उदरनिर्वाहाकरीता हे नगरसेवक इंगोले चौकातील एका कोपर्‍यात हातगाडीवर पकोडे विकतात. हे ऐकून कुणाचाही विश्‍वास बसणार नाही पण हे सत्य आहे.
1995 सालची गोष्ट आहे, वर्धा नगरपरिषदेची निवडणूक जवळ आली होती. विविध पक्ष आपआपल्या उमेदवाराची मोर्चेबांधणी करीत होते. अशातच मालगुजारीपुरातून विनोद लाटकर या तरुणाने आपली उमेदवारी लोक आग्रहास्तव दाखल केली आणि ती सुध्दा अपक्ष. विनोदने उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला तेव्हा तो एका दवाखान्यात कंपौंडरचं काम करत होता. पण सर्वांच्या मदतीला धावून जाणे, लोकांची छोटी मोठी कामे करणे व सगळ्यांशी आपुलकीने व सौजन्याने वागणे या त्याच्या गुणांमुळे परिसरातील लोकांनीच त्याला निवडणुकीला उभं केलं. एवढंच नाही, तर त्याच्या निवडणुकीच्या खर्चासाठी चक्क वर्गणी गोळा केली गेली. आणि असा हा सर्वांचा लाडका विनोद लाटकर चक्क एका मोठ्या पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करून भरघोस मतांनी निवडून आला.
त्या निवडून येण्याचं त्याने ‘सोनं’ केलं. वॉर्डातील कामं होऊ लागली. नगरसेवक स्वतः लोकांच्या समस्या समजावून घेण्यासाठी रोज फिरु लागला आणि बघता बघता वॉर्डाचा कायापालट झाला. दरम्यान नगरसेवक झालो म्हणून हुरळून न जाता, विनोदने आपली दवाखान्यातील नोकरी सुरूच ठेवली. त्यात त्यांना कसलाही कमीपणा कधी वाटला नाही. त्यांच्या याच स्वभावाने त्यांना पुन्हा २००० साली नगरसेवक बनवले आणि त्यानंतर २००५ साली त्यांची नगरसेवक पदाची चक्क ‘हॅट्रीक’ झाली.
विनोद लाटकर तीन टर्म नगरसेवक राहूनही जमिनीवरच होते. आता ते दवाखान्याच्या ऐवजी एका हार्डवेअरच्या दुकानात कामं करू लागले. नगरपालिकेतून मिळणार्‍या तुटपुंज्या मानधनावरच समाधान शोधणार्‍या विनोदने कधीही भ्रष्टाचार केला नाही. कंत्राटदारांनी घरापर्यंत आणलेले कमिशनचे पैसे त्यांनी अतिशय नम्रपणे नाकारले. अतिशय वाईट परिस्थितीत दिवस काढल्यावरही सहज मिळणारा पैसा परतवण्यासाठीचं ‘जिगर’ विनोदकडे आहे.
तशीच मोठ्या मनाची बायको विनोदला मिळाली तिने तीन टर्म नगरसेवक असणार्‍या पण भाड्याच्या घरात राहणार्‍या आपल्या जोडीदाराला पसंत केलं. बरं, विनोदच काही छोटं कुटुंब नाही, आई-बाबा, एक विधवा बहीण व तिची दोन मुलं एवढ्या सगळ्यांना विनोद आनंदाने कुठलाही भ्रष्टाचार न करता सांभाळतो.
पुढे २०१० साली विनोदचा वॉर्ड आता तीन वॉर्डाचा मिळून प्रभाग झाला होता आणि महिलांसाठी राखीव सुध्दा आणि यावेळी विनोदची पत्नी शिल्पा लाटकर निवडणुकीला अपक्ष उभी राहिली आणि पुन्हा एकदा प्रस्थापित पक्षांच्या दिग्गज उमेदवारांना पराभूत करून प्रचंड मतांनी विजयी झाली. ही नगरसेवक पदाची चक्क चवथी टर्म. तरीही हे दोघे इमानदार नवरा बायको आपल्या उदरनिर्वाहासाठी पकोडे विकतात तेही चक्क एका हातगाडीवर, कुठलीही लाज न बाळगता.
आता मात्र विनोदला किंवा शिल्पा लाटकर यांना पराभूत करणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यावर २०१५ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने शिल्पा लाटकर यांना आपली अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलं आणि तब्बल पाचव्यांदा लाटकर परिवाराला नगरसेवक पद मिळालं.
२५ वर्षांच्या कार्यकाळात कुठलाही भ्रष्टाचार न करता, कुठलाही कामात पैशाची मागणी न करता, कसलंही कमिशन न घेता घरची परिस्थिती बेताचीच असल्यावरही, आपला व परिवाराचा उदरनिर्वाह फक्त पकोडे विकून चालवणारी ही जोडी बहुदा एकमेव असावी.
- नीरज आवंडेकर, अकोला

कांदामुळाभाजीचा छंद

भाजीपाल्याच्या १५, फळभाज्या आणि वेलवर्गीय भाज्या ६०, कडधान्य आणि तृणधान्य प्रत्येकी २०, आणि इतर १०. अशा एकूण १२५ देशी बियाणांचा संग्रह केला आहे अनिल गवळी यांनी. सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ-पंढरपूर रस्त्यावर मोहोळपासून पाच किलोमीटरवरील पोखरापूर इथे त्यांची शेती. 
गवळी यांची घरची १५ एकर शेती. गेली ९ वर्ष ते देशी बियाणांवर काम करत आहेत. पिगेली वळी मोहरी,काळा गहू,काळा हुलगा,पांढरे कारळ, सोलापूरची दगडी ज्वारी,मराठवाड्यातील देशी तूर, लाल, पिवळी ज्वारी, जळगावची दादरा अशा एकाहून एक मौल्यवान बियांचा संग्रह. यात मदत मिळाली मोहोळ इथल्या कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. दिनेश नांद्रे यांची.
देशी बियाणे राहिले तरच अन्नसुरक्षा आणि सुरक्षित अन्नदेखील. बदलत्या वातावरणात देशी बियाणेच तग धरू शकतं,असं गवळी यांना वाटतं. त्यामुळे पैसे किती मिळतात,यापेक्षा देशी बियाणे वाचले पाहिजे, असा त्यांचा ध्यास. याच ध्यासापायी त्यांनी सहा एकर क्षेत्र राखीव ठेवले आहे. बियाणे द्या आणि देशी बियाणे घ्या, या तत्त्वावर राज्यभरात विविध ठिकाणी होणार्‍या कृषी प्रदर्शनात,स्वयंसेवी संस्थाच्या वतीने होणार्‍या कार्यक्रमात ते सहभागी होतात. एखाद्याकडे वेगळे बियाणे मिळाले तर ते घेऊन त्या बदल्यात आपल्याकडचे बियाणे त्याला मोफत देतात. या सूत्रातूनच बियाणेसंग्रह वाढण्यास मदत होत आहे. बियाणांचा प्रसार होण्यासाठी दहा ग्रॅमचे पाऊच बनवून त्याची २० रुपयात विक्री केली जाते.

सूक्ष्म निरीक्षणांद्वारे देशी बियाण्याची ओळख करून घेता येते, असं गवळी सांगतात. ''मेथी, पालक किंवा अन्य भाज्यांच्या पानाच्या कडेला बारीक लाल रेषा किंवा खालील बाजूच्या मुळ्या लाल असतात. एक जून ते एक ऑक्टोबरच्या दरम्यान पावसाच्या परिस्थितीनुसार देशी टोमॅटो लागवड करतो.तीन-साडेतीन महिन्यांच्या कालावधीनंतर तो चांगला पिकतो. त्याला चिऱ्या पडतात,देठ सुकतात. तेव्हा तो मध्यभागी चिरायचा. दोन भाग करून रात्रभर पाण्यात भिजवायचा. दुसऱ्या दिवशी पाण्याने स्वच्छ धुवून चांगल्या प्रतीचे बियाणे गोळा करून ते राखेत ठेवायचे. किमान दोन वर्षांपर्यंत ते टिकून राहते. हाच निकष काकडी, वांगीसाठी लागू होतो.'' काटेरी, भरताचे, हिरवे, काटेरी, वांगे, तूप वांगे,हिरवी, पांढरी-काटेरी काकडी,काशी भोपळा,काळा आणि लाल पावटा,पांढरा, लाल मोठा वाल ,गोल, काशी, चेरी टोमॅटो,काळा वाटाणा, लाख,लाल-काळी-पांढरी फररसबी,लाल-काळा-पिवळा झेंडू,झुडपी चवळी, लाल वेलीची चवळी,एरंड, जवस, कारळे, पिवळी, काळी मोहरी, लाल कांदा, राजगिरा, खपली गहू, काळा कुसळीचा गहू अशा काही परंपरागत बियाणांविषयी गवळी सांगतात. ''पूर्वी फक्त मीठ आणि कापड एवढंच बाजारातून विकत आणाव लागायचं. घरी गरज भागवून धान्य, भाजीपाला विक्रीसाठी बाजारात नेलं जायचं. आज संकरित बियाणांचा वाढलेला वापर आणि रासायनिक खतांमुळे जमिनी खराब झाल्या आहेत. परिणामी, प्रत्येक वस्तू आज विकत आणावी लागते. मला हे थांबवायचे आहे. त्यासाठी देशी बियाणे संवर्धनाचा माझा प्रयत्न आहे. ''
(संपर्क : अनिल गवळी - ९७६७७६७४९९)

-संतोष बोबडे

Thursday 14 March 2019

और कारवाँ बनता गया...

साल १९९१. केंजळच्या जिल्हा परिषद शाळेत रूजू झालो, सात जणांचा स्टाफ, पहिली ते सातवीपर्यंत वर्ग. आमच्या केंजळ शाळेचा तेव्हाचा परिसर म्हणजे एक बाभळीचे झाड आणि १९५७ साली गावकऱ्यांनी श्रमदानातून बांधलेली तीन खोल्यांची दगडी इमारत. अत्यंत ओबडधोबड, खडकाळ परिसर, पण तब्बल २ एकर १ गुंठा जमीन शाळेच्या नावावर होती! या शाळेचा विकास करायचं स्वप्न मात्र मी रूजू झालो तेव्हापासूनच पाहिलं. खरंतर माझं मूळ गाव कोल्हापूरच्या सीमाभागातलं. त्यामुळे माझ्या आणि मुलांच्या भाषेत फरक होता. मात्र भाषेवर विशेष मेहनत घेत, मुलांशी संवाद साधत शालेय परिसरात एक वेगळं आनंददायी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागलो. शाळेत मुलांना मजा वाटेल, त्या बरोबर त्यांचं अध्ययनही घडेल असे अनेक उपक्रम आजतागायत सुरूच आहेत. विविधगुण दर्शन, शाळेचं स्नेहसंमेलन तर १९९२ सालापासून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. प्रौढ साक्षरता वर्गांच्या पाच वर्षांच्या काळात (१९९२ ते १९९६) गावात रात्री ११ वाजेपर्यत आम्ही सगळे शिक्षक हजर असायचो. तसेच गावातील अखंड हरिनाम सप्ताहातील प्रवचनांची धाटणी बदलण्याचा मी प्रयत्न केला. प्रा. शिवाजीराव भोसले, प्रा. यशवंत पाटणे, असे अनेक वक्ते आणून शिक्षण किती महत्वाचं आहे, शिक्षणानेच उज्ज्वल भविष्य घडणार आहे, याबाबत गावात जागृतीचा प्रयत्न केला.

मुलांना प्रात्यक्षिकातून अनुभव मिळावेत, यासाठी मी आग्रही होतो. उदा. खगोलशास्त्रज्ञ डॉ प्रकाश तुपे आणि टीम यांच्या उपस्थितीत एकदा दुर्बिणी शालेय प्रांगणात सेट करून, रात्रभर अवकाश निरिक्षणाचा उपक्रम आम्ही घेतला होता, याला केवळ केंजळच नव्हे तर पंचक्रोशीतील विद्यार्थी आणि पालकांनी सुद्धा गर्दी केली होती. सुरूवातीला स्नेहसंमेलनासाठी तात्पुरते संगीत मार्गदर्शक आणून काम भागवायचो. पण आज शाळेचा स्वतंत्र गायन-वादन समूह आहे. त्याकरिता २०१० सालापासून शाळेत शास्त्रीय संगीत शिकविण्याकरिता ग्रामस्थांच्या आर्थिक सहकार्यातून संगीत विशारद असलेल्या सुरेश खोपडे सरांची नेमणूक केली आहे. सांगायला आनंद वाटतो की ३५ विद्यार्थी आज शाळेच्या माध्यमातून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत आहेत.
शाळेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे केंजळ ही 'अॅक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग' उपक्रम राबविणारी राज्यातील अग्रगण्य शाळा आहे. घोकंपट्टीपेक्षा कृतीतून शिकण्यासाठी सर्व विषयांचे सुमारे ४५०० ‘अॅक्टिव्हिटी शीटस्’ बनविले आहेत, त्याचा आमच्या प्रत्येक वर्गात प्रत्यक्ष वापर केला जातो. आमच्या शाळेत इयत्ता- तुकड्या नाहीत तर प्रत्येक विषयाच्या प्रयोगशाळा आहेत. उदा. गणित लॅब, इंग्लिश लॅब, मराठी लॅब इ. मुलं ज्या विषयाचा तास असेल त्या लॅबमध्ये येतात आणि प्रत्यक्ष कृतीमधून अध्ययन शिकतात. शिवाय इतर शाळांप्रमाणे आमच्या शाळेत वर्गशिक्षक ही संकल्पना नाही, तर आमच्याकडे विषयशिक्षक आहेत. तसेच इतर शाळांप्रमाणे आमच्या शाळेत केवळ ३५ मिनिटांचा घड्याळी तास नसतो, तर एखादी संकल्पना विद्यार्थ्यांना पूर्ण समजून त्यानुसार कृती करता येण्यासाठी कधी- कधी दोन- दोन तासही एखाद्या विषयाला घेण्याचं स्वातंत्र्य आम्हांला आहे.
याशिवाय शाळेत अपारंपरिक उर्जास्रोतांचे महत्त्व शिकविणारे 'विघ्नहर्ता उर्जा पार्क' आहे, शाळेच्या संपूर्ण परिसरात वायफाय असून केंजळ शाळा आज राज्यातील अग्रगण्य शाळा म्हणून ओळखली जाते.
विघ्नहर्ता उर्जा पार्क आणि शाळेच्या अन्य उपक्रमांबद्दल जाणून घेण्यासाठी क्लिक करा: https://bit.ly/2RKPTTE
- जयगोंडा कलगोंडा पाटील, सहायक शिक्षक, जि.प. शाळा केंजळ, ता. भोर, जि.पुणे.

प्रकाशाच्या वाटेवर...

सातारा येथील श्रीकांत शहा, अविनाश बी.जे. यांचं अंधांसाठी काम सुरू होतं. १९८७ मध्ये त्यांनी अंधांसाठी हस्तलिखित शुभेच्छा कार्ड तयार करुन निधी जमा केला. त्यावेळी हेमा सोनी यांनी शुभेच्छापत्रं तयार करून करमाळा (जि. सोलापूर) सारख्या ग्रामीण भागातून ६ हजार रुपयांचा निधी मिळवून दिला होता. त्यावेळी खरंतर हेमा जेमतेम १५-१६ वर्षांच्या. पण, यातूनच त्यांना अंधांसाठी काहीतरी चांगलं काम करावं, हे ध्येय मिळालं. पुढं सातारा येथील श्रीकांत शहा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर व्यवसायाकडे न वळता त्यांनी पूर्ण वेळ समाजकार्यासाठी देण्याचा निर्णय घेतला. ‘सत्यशोध’ संस्थेच्या माध्यमातून प्रथम नर्मदा बचाव आंदोलन, कोयना जीवन हक्क अभियानातून सक्रिय सहभाग घेतला. हे करत असतानाच त्यांनी अंधांसाठी काम सुरू ठेवलं.
सत्यशोध अंध सहयोग संस्थेची स्थापना अविनाश बी.जे यांनी केली. मात्र, २००० साली त्यांचं निधन झालं. तरीही संस्थेचं काम थांबलं नाही. सोनी आणि इतर कार्यकर्त्यांनी संस्थेचं काम पुढं चालू ठेवलं.
हेमा सोनी अंध मुला-मुलींच्या शिक्षणासाठी, रोजगारासाठी सतत धडपड करत असतात. त्यांनी शाळांमध्ये अंध विद्यार्थ्यांना शिक्षण कसं देता येईल, यासाठी विशेष प्रयत्न केले. सर्वसामान्यांच्या बरोबरीने अंधांना एकत्र शिक्षण द्यावे, अशी एकात्मिक शिक्षणाची योजना राबविण्याचा आग्रह त्यांनी १९८७ पासून धरला होता. पुढे ही संकल्पना केंद्र शासनाने स्वीकारून अंधांसाठी एकात्मिक शिक्षण सुरू केलं. हे त्यांच्या संघर्षाचेच यश.
पुढं संस्थेने अंध मुलांच्या रोजगारासाठी द्रोण तयार करण्याची मशीन घेतली. त्यामुळे अंध मुलांमुलींना रोजगार मिळाला. तसेच संस्थेतर्फे भात सडणी यंत्र, विविध सिझनच्या वस्तू विक्रीस उपलब्ध करून दिल्या. शहरात रोजगारासाठी स्टॉलची जागा उपलब्ध करून देणे, अंधांना रोजगारासाठी आटाचक्की, किराणा मालाचे दुकान काढून दिले आणि त्यांना स्वावलंबी बनवले.
सातारा जिल्ह्यात २००५ सालापूर्वी एकाही अंध व्यक्तीला नोकरी नव्हती. जिल्ह्यात अंधांचा अनुशेष भरला जात नव्हता. यामुळे त्यांनी अंधांना नोकरी मिळावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे सातारा जिल्हा नंतर महाराष्ट्रभर अपंग अनुशेष भरती सुरू झाली. अनेक अंध युवक-युवतींना सरकारी नोकरी मिळाली.
अंध मुला-मुलींची लग्नं होत नाहीत. त्यामुळे सोनी यांनी अंधांची लग्न लावून देण्याचा उपक्रम सुरू केला. काही अंध जोडप्यांची सत्यशोधक पद्धतीने लग्न लावून दिली. या लग्नांमध्ये अनेक आंतरजातीय विवाहांचा समावेश होता. हे सर्व करत असताना या अंध जोडप्यांना आर्थिक चणचण भासू नये, यासाठी समाजातून वस्तू रुपात व आर्थिक सहभाग संस्था मिळवते.
आता त्यांनी सातारा जिल्ह्यात फिरती शाळा सुरू केली आहे. या शाळेतील शिक्षक आठवड्यातून एक दिवस अंध मुलांच्या घरी जाऊन त्यांना शिक्षण देतात. अंध मुलांना ब्रेललिपीचं ज्ञान दिलं जातं. त्यांना ब्रेल लिपीतील पुस्तकं उपलब्ध करून दिली जातात. या कामाशिवाय त्या अंध युवक-युवतींना 'एमएससीआयटी'सारखे व्यवसायपूरक प्रशिक्षण, अंधत्त्वाचं प्रमाणपत्र मिळवून देणे, सरकारी योजनांच्या सवलती मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करत असतात. तसेच अंध मुलांमध्ये आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, अशी भावना निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी ट्रेकिंग, सहलीचं आयोजन केलं जातं.
हेमा सोनी यांचा रचनात्मक आणि परिणामकारक काम करण्यावर भर आहे. पैसे देऊन मदत करण्यापेक्षा व्यक्तीला स्वावलंबी बनवण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. अंधांना मदत करण्याबरोबरच त्यांनी नर्मदा बचाव आंदोलन, कोयना जीवन हक्क अभियान, वांग-मराठवाडी धरणग्रस्त कृती समितीच्या कार्यकर्त्या म्हणून काम केलं आहे. हेमा सोनी यांना चित्रकलेची आवड आहे. त्यामुळेच अनेकांच्या आयुष्यातील चित्रात रंग भरण्याचे काम करत आहेत.
हेमा सोनी  (संपर्क क्र.- ९२२५६४५९५६)
- रोहित आवळे, सातारा

ब्रेल लिपीतलं सुंदर कॅलेंडर...

२०१९ साल सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी एक सुंदर डेस्क कॅलेंडर ‘नवी उमेद’ला मिळालं. तशी अलिकडे विविध कॅलेंडर्सची रेलचेल असते. पण आम्हाला मिळालेलं हे खासच होतं. ते ब्रेल लिपीतलं कॅलेंडर होतं. आमचे मित्र स्वागत थोरात यांच्या कल्पनेतून साकारलेलं. स्वागत थोरात हे स्पर्शज्ञान आणि रिलायंस दृष्टी या नियतकालिकांचे संपादक आहेत. सध्या ते अंध कलाकारांच्या नाटकांचं दिग्दर्शन आणि निर्मिती यातही गुंतले आहेत.
जगभरातील अंधांना शिक्षण, ज्ञान, माहिती, मिळवण्‍यासाठी अतिशय उपयुक्त ठरलेल्या ब्रेल लिपीचा शोध लावणारे लुई ब्रेल. ४ जानेवारी ही त्यांची जयंती. लुई ब्रेल यांची यंदाची २१० वी जयंती विशेष ठरली. कारण संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेने दिनांक १७ डिसेंबर २०१८ रोजी ठराव संमत करून ४ जानेवारी हा दिवस ‘जागतिक ब्रेल दिन’ म्हणून घोषित के्ला. अंधांच्या आयुष्यातील ब्रेलच्या उपयुक्ततेविषयी जागरुकता वाढविणं आणि जगभरातील अंधांच्या कल्याणासाठी ब्रेलच्या अधिकाधिक वापरास उत्तेजन देणं हा या ठरावाचा मुख्य उद्देश. ब्रेल लिपी म्हणजे अंधांसाठी साक्षरतेचं माध्यम. साक्षरता हा शिक्षणाचा मुळाधार. आणि अंधांना सक्षम करणार्‍या ज्ञानाकडे त्यांना घेऊन जाण्यात ब्रेल खूप महत्त्वाची. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ब्रेल लिपीचा वापर करणं सोपं झालं आहे. नव्या स्मार्ट जगातही ब्रेल लिपीने ‘ऑर्बीटरिडर’, ‘ब्रेलमी’ अशा अत्याधूनीक उपकरणांच्या माध्यमांतून अंधांच्या जीवनात नवं स्थान निर्माण केलं आहे. ब्रेल लिपीच्या वापरामुळे अंधांचे जीवन सुकर होण्यासही सुरुवात झाली आहे.
ब्रेलमधल्या सुरेख, कलात्मक कॅलेंडरच्या निर्मितीची कथा स्वागत थोरात यांनी सांगितली, ती अशी.
"अगदी अंधांसाठी ब्रेल लिपीतील कॅलेंडरही तयार केलं जात होतं. परंतु त्यांचा वापर फक्त अंध बांधवच करू शकत होते. अंधांना आणि डोळस व्यक्तींनाही एकच कॅलेंडर वापरता येईल, असं कॅलेंडर उपलब्ध नव्हतं. असं कॅलेंडर करण्याची कल्पना मला सहा वर्षांपूर्वी सूचली. परंतु अंध आणि डोळस व्यक्तींनाही वापरता येईल, असं एकच कॅलेंडर प्रत्यक्षात आणणं अवघड होतं. प्रचलीत ब्रेल छपाई पद्धतीने ते शक्य नव्हतं. गेलॉर्ड आर्टचे अरविंद पुरंदरे यांच्या सहकार्याशिवाय असं ब्रेल टेबल कॅलेंडर तयार करणे शक्य झालं नसतं. त्यांच्या सहकार्याने ब्रेल छपाईचं नवीन तंत्र विकसित केलं गेलं आणि २०१३ साली भारतात प्रथमच अंधांसाठी ब्रेल टेबल कॅलेंडर तयार झालं. तरीही, हे कॅलेंडर सर्व अंध बांधवांपर्यंत कसं पोचवायचं, असा प्रश्न होता. ही कल्पना मी रिलायंस फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती निता अंबानी यांच्यापुढे मांडली. ती त्यांना आवडली आणि रिलायन्स फाउंडेशनने २०१३ पासून दरवर्षी संपूर्ण भारतभर हे ब्रेल टेबल कॅलेंडर अंध व्यक्ती, अंधांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना भेट म्हणून पाठवण्याचा निर्णय घेतला."
या ब्रेल टेबल कॅलेंडरचं हे सहावं वर्ष आहे.
- वर्षा आठवले जोशी, संपादक #नवीउमेद

विना स्थलांतर नाही गत्यंतर... (सदा आबाची ऐका वाणी...)

...तर मित्रांनो स्थलांतर ही काय मराठवाड्यापुरतीच बाब नव्हं. तिकडे नंदुरबारातही हीच गत हाय.
तसा नंदुरबार जिल्ह्याच्या निर्मितीला दीड तपाहून अधिक काळ लोटलेला. ह्यो जिल्हा राज्यात दरडोई उत्पन्न व मानव निर्देशांक क्रमवारीत पार शेवटच्या क्रमांकावर हाये. जिल्ह्याच्या विकासात रोजगाराची परिस्थिती किती भयाण हाय याचे साक्षीदार म्हणजे स्थलांतरित होणारे हजारो आदिवासी बांधव. दिसामाग शेकडोंच्या संख्येने जिल्ह्याभरातील विविध ठिकाणाहून एकत्र होत आदिवासी कुटुंबं, मजुरीच्या शोधात स्थलांतरित होताहेत. स्थलांतरीत होणाऱ्या कुटुंबातील सदस्यांची संख्या दरवर्षी दुप्पटीने वाढतेय. उदरनिर्वाहासाठी, आपल्या पोटाची खळगी भरावी, यासाठी घरातील साऱ्यांनाच बिऱ्हाड उचलून दूरदेशी जाव लागतंय. तज्ज्ञांना विचारलं तर ते म्हणतात, "जिल्ह्यातील आदिवासी आज शिक्षणाच्या प्रवाहात येत असले तरी त्यांना मिळणाऱ्या शिक्षणाचा दर्जा हा चांगली नोकरी देणारा निश्चितच नाही. त्यामुळे आजही रोजगाराच्या शोधात परप्रांतात गुजरात, सौराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान येथे स्थलांतरीत होणाऱ्या आदिवासी कुटुंबांची संख्या हजारोंवर आहे.
जिल्ह्यात अद्याप पर्यंत एम.आय.डी.सी. ही फक्त कागदावरच विकसित झाली आहे. जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र विकसित झालेले नाही. उद्योग व्यवसाय नसल्याने जिल्ह्यात रोजगार निर्मिती नगण्य आहे. जिल्ह्यात शहादा तालुक्यातील श्री सातपुडा साखर कारखाना व लोकनायक जयप्रकाश नारायण सूतगिरणी, डीसलरी प्लान्ट आदी प्रकल्प कै.पी.के.आण्णा पाटील यांनी परिसरातील शेतकरी व बेरोजगारांना रोजगार मिळावा ह्या हेतूने सुरू केले. मात्र जिल्ह्यात कुठल्याही अन्य ठिकाणी असे उद्योग उभे राहिलेले नाहीत. ह्या साऱ्या समस्यांमुळे अनेक घरात आजही एकावेळीसच्या पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न गंभीर आहे. ह्या अशा अनेक बिऱ्हाडातील बालकांचं शिक्षणाचं वय स्थलांतराच्या दुष्टचक्रात अडकलं आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा खरा आकडा ही तपासणं गरजेचं आहे. सध्या केंद्र शासन व राज्य शासन जिल्ह्याच्या विकासावर कोट्यावधी खर्च करीत असले तरी फलित किती हे सांगणं अवघड आहे. स्थलांतर, शाळाबाह्य मुलांचा प्रश्न सुटू शकलेला नाही."
तर अशी हाय चित्तरकथा. आधीच ह्या जिल्ह्याच्या मानगुटीवर कुपोषण, सिकलसेल, बालमृत्यू ही भुतं बसलेली हायेत. ह्या स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांची पोटासाठीची धडपड साऱ्यांनाच चिंता करायला लावणारी आहे. यालाच विकास म्हणावा का..? नंदुरबार जिल्हा बनवताना नेत्यालोकांनी लई विकासाची सपान दाखिलती. पर आज पोटासाठी जिल्हा सोडून पोटासाठी जावं लागतंय, पहा आता तुम्हीच. llभाग 5ll
- रुपेश जाधव, नंदुरबार

या झाडांशी मुलं गप्पा मारतात...

सोलापूर जिल्ह्यातला माळशिरस तालुका. तिथली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवस्ती(पिरळे), छोटीशी वस्ती शाळा. शाळेतली आवळा, आंबा, पिंपळ, कडुनिंब आणि जांभूळ यांची पाच रोपं आनंदानं डुलत आहेत. खरं तर इथं पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या. शाळेसमोरचा हातपंप वर्षानुवर्षे बिघडलेलाच. मुलांना प्यायला लागलंच तर इथल्या भातवल्या मावशी स्वतःच्या घरात साठवलेलं पाणी देतात. पण बाकी वापरासाठी पाणी नाहीच. पण अशातही ही झाडं जगली ती शाळेतल्या चिमुकल्यांमुळे.
नोव्हेंबर महिन्यात तिसरी- चौथीच्या विद्यार्थ्यांनी ही पाच रोपं आणली. त्यांना मार्गदर्शन वर्गशिक्षिका सुप्रिया शिवगुंडे यांचं. मुलांनी शेतातून माती आणली. खड्डे खणले, रोपं लावली. संध्याकाळी घरी जाताना आपल्या पाण्याच्या बाटलीतील शिल्लक पाणी मुलं रोपांना घालू लागली. शाळा सुटायच्या पाच मिनिटं आधीचा हा नित्यक्रम झाला. जेवणाच्या आधी झाडांमध्ये हात धुणं मुलांनी सुरू केलं. त्यामुळे झाडांना आणखी पाणी मिळू लागलं. त्यांनी चांगलं मूळ धरलं. या पाच झाडांपैकी आवळ्याचं झाड मुलांचं सर्वात लाडकं आहे. हे झाड खुललंयही छान. या झाडाशी मुलं गप्पा मारतात.
मुलांना शाळेसाठी दोन किलोमीटरवर वणवण करत जावं लागू नये म्हणून पालकांनी स्वतः ची जमीन देऊन मोठया कष्टानं सुरू केलेली ही शाळा आहे. गेली 12 वर्ष इथल्या मुलांना दर्जेदार शिक्षण शाळा देत आहे.

-गणेश पोळ, सोलापूर

आठवी ब च्या मुलांचं शंकासमाधान... !!शेवटचा भाग!!

काही वर्षांपूर्वीची घटना. एका शाळेत गेलो. सातवी, आठवी आणि नववीच्या मुलांशी त्यांच्या एकंदरीतच आरोग्यविषयक प्रश्नाबाबत चर्चा केली. मुलींबद्दल आकर्षण असणारं हे वय. सेक्सशी संबंधीत अनेक प्रश्न मुलांनी विचारले. बरेचसे प्रश्न मला अनपेक्षित होते. त्यामुळे मी थोडा अस्वस्थच झालो. विचार केला की, मुलांच्या मनात मुलींबद्दल आकर्षण असतं हे ठीक आहे. पण, काही मुलांनी भलतेच प्रश्न विचारले असंही वाटून गेलं. एड्ससारख्या लैंगिक संबंधातून लागण होणाऱ्या आजाराबद्दल जाणून घेण्याची त्यांची उत्सुकता मी समजू शकतो. पण 'पूर्वीच्या काळात, राजा महाराजांचे चार ते पाच बायकांसोबत विवाह व्हायचे, मग त्यांना एड्स न होण्याचं कारण काय?, समलिंगी संभोग केल्याने काय होऊ शकतं?, मुलींची मासिक पाळी असताना तिच्याशी संभोग केल्यास काय होईल? या प्रश्नांची योग्य उत्तरे तर मी दिली पण एवढ्या लहान वयात मुलांच्या मनात असे प्रश्न असतात याचं मला खूप आश्चर्य वाटलं. त्यांच्याकडे असणाऱ्या चिकित्सक बुद्धीचं कौतुक करावं की त्यांचं मन शाळा-अभ्यास सोडून भलतीकडेच भरकटतंय यासाठी त्यांची कानउघाडणी करावी हा संभ्रम माझ्या मनात निर्माण झाला.
काहीही असो, या मुलांच्या मनात अभ्यासाशिवाय असं पण काही चालू असतं, याची कल्पना त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या आई-वडिलांना आणि शिक्षकांना असली पाहिजे, हा विचार मनात घेऊन मी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे गेलो. त्यांनी पालक आणि शिक्षकांची एकत्रित मिटिंग घ्यावी अशी विनंती केली. मुख्याध्यापक असं काही करण्यासाठी उत्सुक नव्हते. मी त्यांना डायरीत चिकटवलेले त्यांच्याच शाळेतील, मुलांच्या हस्ताक्षरातील प्रश्न वाचायला दिल्यानंतर, मुख्याधापक अवाक झाले. त्यांनी दुसऱ्याच दिवशी मिटिंग ठरवली. त्या मिटिंगमध्ये पालकांशी बरीच चर्चा झाली.
काही आई-वडिलांनी विचारलं, की शाळेतून इतक्या लहान वयापासून सेक्स एजुकेशन देण्याची खरचं गरज आहे का? या प्रश्नाचं उत्तर 'हो' असंच आहे. लोकांमध्ये एक फार मोठा गैरसमज आहे की, सेक्स एजुकेशन देणं म्हणजे सेक्स कसं करतात हे शिकवणं. हा अत्यंत चुकीचा समज. मुलां-मुलींच्या मनात किशोरवयीन वयातच लैंगिक भावना उत्तेजित होतात. या विषयाच्या संदर्भात त्यांच्या मनात प्रश्नांचा महासागर उसळत असतो. असं होणं निसर्ग नियमाला धरूनच आहे. त्यांच्या मनात निर्माण झालेल्या शंकांचं वेळीच समाधान नाही झालं तर मुलं नको त्या वयात नको ते करून बसतील. त्यांना त्यांच्या शरीरात आणि मनात होणाऱ्या बदलांना कसं हाताळायचं हे त्यांना समजेल अशा उत्तेजित न होणाऱ्या भाषेत समजावून सांगितल्यास त्यांची या बद्दलची उत्सुकता कमी होईल. त्यांचं लैंगिक जीवन अधिक जबादारीचं व्हावं यासाठी Education in Sexuality ची गरज आहे.
हे युग तंत्रज्ञानाचं आहे. आपण स्वतःला आणि आपल्या मुलांना तंत्रज्ञानापासून दूर ठेवू शकत नाही. टीव्ही, मोबाईल, इंटरनेट सारख्या गोष्टीपासून 'त्रास' पण होतो आणि उपयोग पण होतो. या तंत्रज्ञानाचा योग्य तो उपयोग करवून घेण्याचं मोठ्यांनी लहानांना शिकवलं पाहिजे. दहावी-बारावीच्या वेळेस अनेक पालक टीव्ही बंद करून माळ्यावर टाकून देतात. असं करण्याने समस्या सुटणार नाही. मुलांचं अनावश्यक टीव्ही पाहणं बंद करायचं असल्यास आई किंवा वडिलांनी त्यांच्या सोबत बसून तो कोणता कार्यक्रम टीव्हीवर बघतोय त्यात रस घेऊन पहिला पाहिजे. असं करण्याने त्या मुलांशी मैत्री करणं सोपं होईल. त्या वेळेस तुम्ही काय पहायचं आणि काय नाही हे समजावून सांगू शकाल. फक्त येता जाता 'अरे, टीव्ही बंद कर, अभ्यास कर अशा सूचना देऊन काही होणार नाही. पण हे सर्व संयम ठेऊन करण्यासाठी त्यांना 'वेळ' द्यावा लागतो, जो आजकालच्या आई-वडिलांकडे नाही.
- डॉ. किशोर अतनूरकर, नांदेड

कळवण्यास समाधान वाटत आहे की..

तुळजापूरमधल्या तुळजाभवानी मंदिर परिसासमोरील बालभिक्षेकऱ्यांची समस्या नवी उमेदनं ३१ जानेवारीला ( https://m.facebook.com/story.php?story_fbid=2266443430345477&id=1487663018223526 ) मांडली होती. राष्ट्रीय अपराध जाँच ब्युरो ही स्वयंसेवी संस्था यासाठी प्रयत्न करत होती. वर्षभर न सुटलेल्या समस्येवर पोस्ट प्रकाशित होताच चक्र हलू लागली.
२१ फेब्रुवारीला उस्मानाबाद जिल्हा बालकल्याण समितीनं पोलिसांच्या सहकार्यानं पहिली यशस्वी कारवाई केली. भीक मागणाऱ्या १३ वर्षांच्या मुलीला महिला पोलिसांनी ताब्यात घेतलं. तिला उस्मानाबाद बालकल्याण समितीसमोर हजर केलं. तिच्या पालकांना बोलावलं. चौकशी केली. मुलीचे वडील सोबत राहत नाहीत. आईशी चर्चा झाली. तीन मुलींमध्ये १३ वर्षांची मुलगी मोठी. जिल्हा परिषद कन्या प्रशालेत सहावीच्या वर्गात शिकणारी. मुलीची इच्छा खरं तर शिक्षक होण्याची. पण परिस्थितीमुळे भीक मागायला लागत होती.
आता शासकीय यंत्रणा या तिघी बहिणींची राहण्याखाण्याची सोय करणार आहे. नळदुर्ग इथल्या 'आपलं घर ' संस्थेत त्यांना ठेवण्याचं नियोजन आहे. १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत शासनाच्या देखरेखीखाली त्यांचं शिक्षण होणार आहे.
तत्पूर्वी चार दिवस आधी राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी मंदिर प्रशासन कार्यालयात सर्व प्रशासकीय यंत्रणांची बैठक घेतली. सविस्तर चर्चा झाली. गेलं वर्षभर ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणारे राष्ट्रीय अपराध जाँच ब्युरोचे संजयकुमार बोंदर, तहसीलदार योगिता कोल्हे , महिला बाल कल्याण अधिकारी अशोक सावंत, नगरपालिकेचे प्रतिनिधी एम आय शेख, तुळजापूरचे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, तालुका बालकल्याण अधिकारी दिनेश घुगे, जिल्हा परिविक्षा अधिकारी बाळकृष्ण शेळके, जिल्हा बालकल्याण समिती अध्यक्ष आश्रुबा कदम , तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास समितीचे सदस्य नागेश नाईक, राष्ट्रतेज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गुलचंद व्यवहारे, नागेश शितोळे, नितीन ईरकल आदी मान्यवरांची बैठकीला उपस्थिती.
कृतीदल स्थापन करा आणि कठोर पण संवेदनशीलपणे बालभिक्षेकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करा असे निर्देश घुगे यांनी बैठकीत दिले. प्रत्येक अधिकाऱ्यानं काम करण्याचं, आपल्या अधिकारांचा वापर करण्याचं महत्त्व घुगे यांनी समजावलं. तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर पोलीस यंत्रणा, तुळजापूर नगरपरिषद बालकल्याण समिती, महिला व बालकल्याण विभाग, चाईल्ड लाईन यांचं कृती दल स्थापन करावं. प्रशासनाला लागेल ते सहकार्य राज्य बाल हक्क आयोग देईल, अशी ग्वाही घुगे यांनी दिली.
मुंबईमध्ये सर्वधर्मीय 20 धार्मिक स्थळांना समोर ठेवून आयोगानं भिकाऱ्यांच्या व लहान मुलांच्या भीक मागण्याच्या समस्येबाबत सविस्तर अभ्यास करून मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं घुगे यांनी सांगितलं. बिलाल मशीद इथल्या समस्येबाबत मशिदीच्या विश्वस्तांकडून मिळालेल्या प्रतिसादाचं अनुकरण तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या विश्वस्तांनीही करावं असं त्यांनी सुचवलं. भीक मागण्यापासून मोठ्यांना आणि लहानग्यांना परावृत्त करण्यासाठी प्रशासनालाच जबाबदारी उचलावी लागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
या कारवाईबाबत समाधान व्यक्त होत आहे.
कोणतीही समस्या सोडवण्यात सोशल मीडियाचा हातभार आज गरजेचा आहे. नवी उमेद तेच काम करत आहे, याचं समाधान आहे.
- अनिल आगलावे, उस्मानाबाद

आठवी ब च्या मुलांचं शंकासमाधान.. llभाग ५ll

एकदा दहावीत शिकणाऱ्या आपल्या मुलाला आई-वडील घेऊन आले. तक्रारीच्या सुरात सांगणं सुरू झालं, “आमचा प्रतीक अजिबात अभ्यास करत नाही. सारखा टाईमपास करतो. कितीदा सांगा पण टीव्हीसमोरुन उठत नाही, मोबाईलवर गेम्स खेळत बसतो. तुम्ही सांगा डॉक्टर, दहावीचं इतकं महत्वाचं वर्ष अन् अभ्यास नाही केला तर कसं होईल?” मी त्यांना काही ठराविक प्रश्न विचारून सांगितलं, “तुम्ही जरा बाहेर थांबा, मला प्रतिकशी बोलायचं आहे.” मी विचारायला सुरुवात केली- काय रे प्रतीक? काय प्रॉब्लम आहे? “काही नाही डॉक्टर.” मग? “खरं सांगू का, प्लीज माझ्या आई-बाबांना सांगू नका. मला अभ्यास करावा वाटतो पण सतत मनामध्ये सेक्सचेच विचार येतात, अभ्यासात मन लागत नाही. मी काय करू?” मी म्हटलं, “प्रतीक, काळजी करू नकोस. तू एक चांगला मुलगा आहेस. मी तुला काही सूचना देतो, त्याचं पालन कर. प्रतिकला मी काही सूचना दिल्या. पहा, या सूचना तुम्हाला लागू पडतात का?
१. मनात सेक्स बद्दलचे विचार येतात, त्यामुळे अभ्यास करत असताना एकाग्रता भंग पावते, याबद्दलची अपराधी भावना मनातून काढून टाका. सेक्स बद्दलचे विचार मनात येणं वाईट नसतं.
२. ही परिस्थिती बदलून आपण संपूर्ण एकाग्रतेने अभ्यास करू शकतो असा आत्मविश्वास महत्वाचा.
३. अभ्यासावर प्रेम करा.
४. पलंगावर बसून अभ्यास करू नका, टेबल-खुर्चीचा वापर करा.
५. असे विचार कोणत्या परिस्थितीत जास्त 'त्रास' देतात याचा विचार करा. उदा. मुलींचे अर्धनग्न अवस्थेत चित्र असलेलं मासिक, स्मार्ट फोन, सीडी वगैरे बघणं टाळा.
६. सेक्स संबंधी विचार मनात येऊ नये याचा निश्चय करून मनगटावर एखादा बँड बांधा. मनात विचार आल्यानंतर त्या बँडकडे बघा म्हणजे आपण केलेल्या निश्चयाची आठवण होईल.
७. अभ्यासाशिवाय काहीतरी असं करा की काही निर्मिती होईल. आपण काहीतरी क्रिएटिव्ह केलं पाहिजे असा सतत विचार करा.
८. एखादा खेळ खेळण्यात, बागकाम करण्यात, स्वयंपाक करायला शिकणे अशी कामं करून देखील तुम्ही तुमचं मन सेक्सच्या विचारापासून वळवू शकता.
९. शालेय जीवनापासूनच योगासने आणि मेडिटेशन करण्याची सवय लावून घ्या.
१०. आपल्या मनाला असं ट्रेनिंग द्या जेणेकरून, मनातील कोणत्याही विचारांचा कप्पा आपल्याला पाहिजे तेव्हा उघडता किंवा बंद करता आला पाहिजे. योगासने, ध्यानधारणा, संगीताचा आस्वाद या गोष्टी केल्याने मनाची ही क्षमता वाढवता येते. 

- डॉ. किशोर अतनूरकर, नांदेड

लातूरचे विद्यार्थी पोहोचले विधिमंडळात!

राज्याचे विधानसभा अधिवेशन म्हणजे सगळा झेड सिक्युरिटीचा कारभार. मात्र या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला प्रवेश मिळणे तसे अवघडच. पण लातूर जिल्ह्यातील निवळी नावाच्या छोट्या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना २०१६ च्या ऑगस्ट महिन्यात चक्क विधिमंडळात चालू असलेले कामकाज प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली.
या सहलीविषयी शाळेचे मुख्याध्यापक दिलीप जाधव सांगतात, “विद्यार्थ्यांना आम्ही शाळेत नागरिकशास्त्राचे धडे देतच असतो. पण राज्याचा कारभार कसा चालतो? विधानसभा, विधानपरिषदेचे कामकाज कसं चालतं? आपले प्रतिनिधी प्रश्न कसं मांडतात? हे सगळं प्रत्यक्ष पाहायला मिळावं, असं आम्हांला वाटत होतं. त्यासाठी आम्ही नियोजन बैठका घेतल्या, प्रधान शिक्षण सचिवांशी संपर्क साधून विनंती केली. एके दिवशी तत्कालीन प्रधान सचिव नंदकुमार यांनी विधिमंडळ दौऱ्याची परवानगी देणारं पत्र दिलं आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवणूक करण्याची चांगली संधी आम्हांला मिळाली.”

दिनांक ३ ऑगस्ट २०१६ रोजी निवळी शाळेची सहल निघाली. आम्ही रात्री मुक्कामासाठी बेलापूरला थांबलो. चार ऑगस्टचा दिवस खूपच महत्त्वाचा होता. सकाळी स्वच्छ आंघोळ करून, शाळेचा इस्त्री केलेला गणवेष आणि गळ्यात ओळखपत्रे अडकवून विद्यार्थी तयार झाले. पुन्हा बसमध्ये बसून ते विधिमंडळाकडे निघाले आणि वाटेत मुलांसाठी एक मोठे सरप्राईझ होते- पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवणाचे. पुढचा दिवसभराचा कार्यक्रम गच्च भरलेला असल्याने सकाळी १० वाजताच मुलांना एका प्रशस्त हॉटेलमध्ये श्रीखंड- पुरी, पुलाव- गाजर हलवा असं सुंदर भरपेट जेवण देण्यात आलं. त्या हॉटेलचा चकचकाट, छानसे पदार्थ, हात धुवायला फिंगर बोल हे कित्येक विद्यार्थ्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं. बच्चेकंपनी या जेवणावर जाम खुश झाली.
त्यानंतर बस थेट विधिमंडळात पोहोचली. विधानसभेत जाण्याआधी सर्वांची काटेकोर तपासणी झाली आणि सूचना देऊन सर्वांना आत सोडण्यात आलं. विधानसभेच्या दालन क्रमांक ४११ मध्ये हे विद्यार्थी पोहोचले. तिथल्या प्रेक्षक गॅलरीत संपूर्ण कामकाज दिसेल, अशा प्रकारे उंच जागी त्यांची बसण्याची सोय करण्यात आली. प्रत्येक तीन विद्यार्थ्यांमध्ये एक सर अथवा मॅडम यांना बसविले गेले. विद्यार्थी अतिशय कुतुहुलाने कामकाज पाहत होते. हळू आवाजात शिक्षकांना प्रश्न विचारीत होते. शिक्षक त्यांना अधिवेशन म्हणजे काय, विधानसभा- विधानपरिषदेतला फरक, आमदारांच्या जबाबदाऱ्या समजावून सांगत होते.
त्या दिवशी मुलांना विधानसभेत शिक्षणमंत्री विनोद तावडे ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार नारायण राणे आणि इतरही आमदार पाहायला मिळाले. टीव्हीवर बघायला मिळणाऱ्या व्यक्ती प्रत्यक्षात पाहायला मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आश्चर्यमिश्रित कौतुक होते. त्यानंतर विधानभवनाबाहेर आल्यावर लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी विद्यार्थ्यांची खास भेट घेतली. विधानसभा आवडली का, पुढील नियोजन असे प्रश्न विचारून शाळेला शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आमदारांसोबत फोटोही काढून घेतले. दरम्यान इतरही काही आमदारांनी मुलांना भेटून शाळेचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या.
- स्नेहल बनसोडे- शेलुडकर, लातूर

आठवी ब च्या मुलांचं शंकासमाधान... llभाग ४ll


किशोर वयापासून मुलांना मुलींबद्दल आकर्षण किंवा एक प्रकारची 'ओढ' निर्माण होते, हे ठीक आहे. शाळा-कॉलेजात जाऊन मुलांशी संवाद साधल्यानंतर,या बाबतीत अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. मुलीकडे एका विशिष्ट नजरेने पाहिल्यानंतर किंवा तिची फक्त आठवण झाली तरी माझ्या लैंगिक भावना चाळवल्या जातात आणि माझ्या लिंगात ताठरपणा येतो. तसं मुलीने माझ्याकडे पाहिल्यानंतर तिच्या मनात देखील माझ्याप्रती लैंगिक भावना उत्तेजित होतात का, अशा अवस्थेत तिला नेमकं काय वाटत असतं, ती या भावना कोणत्याप्रकारे व्यक्त करत असेल, अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या प्रयत्नात मुलांचं मन अस्वस्थ असतं. याविषयी मुलांनी थेट प्रश्न विचारले. 'मुलांना मुलींबद्दल जास्त आकर्षण असतं का मुलींना मुलांबद्दल जास्त आकर्षण असतं?'; ‘ मी जसं हस्तमैथुन करतो तसं मुलीदेखील करत असतील का?; ’ मुली हस्तमैथुन करतात म्हणजे नेमकं काय करतात? असे प्रश्न देखील मुलांना पडतात. अगदी त्यांच्याच भाषेत सांगायचं म्हणजे 'मुलांना जास्त सेक्स असतो का मुलींना? ' यातील बहुतेक प्रश्न आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विचारले आहेत.
सर्वप्रथम हे लक्षात घ्या की मुलांना मुलींबद्दल आकर्षण वाटणं ही एक नॉर्मल गोष्ट आहे, उलट तसं न वाटणं हे अबनॉर्मल. मुलांनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देताना असं म्हणता येईल- मुलीच्या मनात देखील मुलांबद्दल ओढ असते, त्यांच्या मनात देखील लैंगिक भावना उत्तेजित होत असतात. एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की, लैंगिक भावनेच्या कल्पना विश्वात मुलींपेक्षा मुलं दुपटीने रममाण होतात. शब्दाने, स्पर्शाने आणि शारीरिक संबंध ठेवण्याच्या दृष्टीने मुलींपेक्षा मुलांचा पुढाकार निसर्गतःच जास्त असतो. लहानपणापासून मुलीच्या मनावर केले जाणारे संस्कार, त्यांना याबाबतीत 'लिबरल' राहण्यापासून परावृत्त करतात. मुलींबद्दल मुलांच्या मनात विचार आले, त्यांच्या लैंगिक भावना उत्तेजित झाल्या की त्यांच्या लिंगात निसर्गतःच ताठरपणा येतो. असा कुठलाही अवयव निसर्गाने मुलींना दिलेला नाही. पुरुषाच्या लिंगाशी साधर्म्य असणारा एक अतिशय छोट्या आकाराचा अवयव मुलींच्या गुप्त भागात असतो, त्याला क्लायटोरीस ( clitoris ) असं म्हणतात. काही मुली क्लायटोरीसला अलगदपणे हाताळून आपल्या मनात निर्माण झालेल्या लैंगिक भावनांचं शमन करतात. हस्तमैथुनाचे प्रमाण मुलांच्या तुलनेत मुलींमध्ये कमी असतं.
किशोरवयीन मुलींशी जेंव्हा संवाद साधण्याची संधी मिळाली तेव्हा मला पाहिल्यानंतर मुलांच्या मनात कोणते विचार येत असतील, त्यांच्या शरीरात काही बदल होत असतात का अशा अर्थाचा एकही प्रश्न मुली विचारत नाहीत असा अनुभव आहे. याचा अर्थ त्यांना मुलांबद्दल आकर्षण नसतं असं नाही. त्यांची या बाबतीत व्यक्त होण्याची पद्धत निराळी असते. फार कमी मुली अशा अर्थाने 'बिनधास्त' असतात हे मुलांनी लक्षात घेतलं पाहिजे. 

- डॉ. किशोर अतनूरकर, नांदेड 

आठवी ब च्या मुलांचं शंकासमाधान... ll भाग ३ll

आमच्याकडे दररोज संध्याकाळी एका बँकेचा पिग्मी एजंट येतो, पैसे घेऊन पासबुकमध्ये नोंद करून जातो. त्या दिवशीही तो नेहमीसारखा आला, आपलं काम केलं आणि जाण्यापूर्वी जरा थबकला. मी प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहिलं, तर तो म्हणाला जरा पर्सनल बोलायचं होतं! म्हटलं ‘बोला.’ तो म्हणाला, “माझा मुलगा दहावीला आहे. आजकाल जरा नर्व्हस असतो, म्हणतो अभ्यासात लक्ष लागत नाही.” मी कारण विचारलं तर म्हणतो की, “माझ्या सर्व मित्रांना गर्लफ्रेंड आहे, मलाच नाही.” मग? तुम्ही काय बोललात त्याला? मी काय म्हणणार? म्हटलं नाही तर नाही, काय बिघडतंय? तू तुझा अभ्यास नीट कर! त्यावर तो बोलला - याचा अर्थ मी काय संन्यासी बनून रहायचं?
मी एका शाळेत जाऊन आठवी-नववीच्या मुलांशी संवाद साधत होतो तेंव्हा त्यांनी गर्लफ्रेंड असावी का नको या संदर्भात जे प्रश्नविचारले ते शेयर करतो. 1. Having a girl friend in this age is good or bad? 2. Is it good to kiss girl friend? 3. What will happen if we do sex with two girl friends? 4. How can I propose (पटाना) my girl friend? 5. When can we do romance with girls?
पिग्मी एजंटचा दहावीत शिकत असलेल्या मुलाशी झालेल्या संवादावरून त्याच्या मित्रांना गर्ल फ्रेंड आहे आणि त्याला नाही ही त्याच्यासाठी निराशाजनक बाब आहे, वास्तविक; त्यात निराश होण्याचं काही कारण नाही. समजा या कारणाने तो निराश होणं स्वाभाविक आहे हे थोड्यावेळासाठी मान्य केलं तरी, त्याचं मी संन्यासी होऊन बसू का ही प्रतिक्रिया बरंच काही सांगून जाते. वर नमूद केलेले प्रश्न विचारात घेतल्यास काही मुलांना गर्ल फ्रेंड असणं योग्य का अयोग्य अशी शंका आहे, तर काहींना गर्ल फ्रेंडच चुंबन घ्यावं का नको किंवा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवावेत का नको असे प्रश्न आहेत. यावरून मुलांना शारीरिक सलगी करण्यासाठी गर्ल फ्रेंड असावी असं वाटत असेल तर ते गर्ल फ्रेंड या नात्याकडे चुकीच्या पद्धतीने बघत आहेत असं मी म्हणेन. मुलांच्या मनात शारीरिक संबंधासाठी मुलीशी मैत्री असावी असं वाटणारं हे वय असतं. तशी नैसर्गिक उत्तेजना त्यांच्या मनात असते. मुलींशी मैत्री जरूर असावी पण उद्देश 'तो' नसावा. मैत्री मुलाशी असो व मुलीशी, त्या मैत्रीपूर्ण नात्याचा उपयोग आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी झाला पाहिजे. गर्ल फ्रेंडच्या अभ्यासाची पद्धत काय आहे, तिचे छंद काय आहेत, ती जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, या बद्दल तिच्याशी प्रामाणिकपणे संवाद साधता आला पाहिजे. विचारांची देवाण-घेवाण करून, आपल्या किंवा तिच्या काही गोष्टी चुकत असतील तर त्यावर चर्चा होऊन त्यात सुधारणा होऊ शकते का हे बघितलं पाहिजे. गर्ल फ्रेंडशी नातं जबाबदारीचं असलं पाहिजे. शारीरिक सुखासाठी गर्ल फ्रेंड नको. गर्ल फ्रेंड असण्याचा किंवा नसण्याचा आपल्या करियरवर विपरीत परिणाम व्हायला नको. गर्ल फ्रेंड असली तर छान नाहीतर आपल्या जीवनाला काही अर्थ नाही असं वाटायला नको. 

- डॉ. किशोर अतनूरकर, नांदेड

संसार जोडणारी ‘सखी’

“काही कारणांमुळे आमच्यात गैरसमज झाले, कुरबुरी वाढल्या, संवाद खुंटला आणि आमचा सुखी संसार थेट घटस्फोटापर्यंत आला. पोलीस अधीक्षक कार्यालयातील सखी सेलकडे मी याबाबत मदत मागितली. अर्ज दिला. दोन तीन वेळा आम्हा दोघांना बोलावून कर्मचाऱ्यांनी समुपदेशन केलं. गैरसमजाच्या मुद्यांचं निराकरण केलं आणि तुटत चाललेला आमचा संसार व्हॅलेंटाईन वीकमध्ये पुन्हा जुळून आला”, हे सांगताना मीरा हावळे यांना अश्रू अनावर झाले होते. अर्थात संसार जुळल्याचे हे आनंदाश्रू होते. मीरा यांच्यासारख्या तब्बल १५० जोडप्यांच्या तुटणाऱ्या रेशीमगाठी या सखी सेलने मागच्या वर्षभरात जोडल्या आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून २०१८ मध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयात विविध स्वयंसेवी संस्था, वकील, डॉक्टर्स यांची स्वयंसेवक म्हणून मदत घेत सखी सेल सुरू करण्यात आला. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर म्हणाले, किरकोळ कारणांवरून संसार तुटतात, छळाचे गुन्हे नोंद होतात, दोन कुटुंबात कलह निर्माण होतो, अनेकदा प्रकरण हातघाईवर येऊन मारहाणीचे गुन्हे घडतात तर कधी कधी खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात याची परिणीती होते. सामाजिक, आर्थिक त्रास दोन्ही कुटुंबांना होतो. शिवाय, आई वडिलांच्या वादात मुलांची होरपळ होते, त्यांच्याही मनावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे हे संसार जोडण्याचे काम महत्वाचे आहे. राज्यात नागपूरमध्ये ‘भरोसा’, नगरमध्ये ‘दिलासा’ सेल कार्यरत आहेत. यासाठी शासनस्तरावरून अनुदान मिळते. पण बीड पोलिसांनी शासनाच्या अनुदानाशिवाय सखी सेल सुरू केला आहे. वर्षभरात दीडशे पेक्षा अधिक संसार जोडण्यात या सेलला यश मिळालं आहे. राज्याच्या अपर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांनीही या उपक्रमाचं कौतुक केलं.
समुपदेशनानंतर संसार जोडलेल्या जोडप्यांना पुन्हा नव्याने संसारासाठी शुभेच्छाही देण्यात येतात. हा कार्यक्रमही अनोखा असतो. जोडप्याला व्यासपीठावर बोलावले जाते, सर्वांसमोर पती पत्नीला गुलाबाचे फुल देत झाले गेले विसरून जाण्यास सांगतो. पत्नीही आनंदाने गुलाब स्विकारते. यानंतर पोलीस दलाकडून मान्यवरांच्या हस्ते साडीचोळी व कपडे असा आहेर करून या जोडप्याला नव्याने ‘नांदा सौख्यभरे’ शुभेच्छा दिल्या जातात.
- अमोल मुळे, बीड

..आणि लग्नाची ‘मनीषा’ पूर्ण झाली!

१९७०-८० च्या दशकात मुलंमुली एकमेकांशी फारसं बोलतही नसत. प्रेमात पडणं हा गंभीर सामाजिक गुन्हा होता. त्यातही हे प्रेम आंतरजातीय असेल तर त्याचं रूपांतर लग्नात होण्याची शक्यता फारच कमी. पण संघर्षापेक्षा सामोपचारानं अनेक गोष्टी साध्य होतात.
नागपूर इथल्या शेवाळकर डेव्हलपर्स लिमिटेडचे आशुतोष आणि मनीषा शेवाळकर यांचीही लग्नगोष्ट अशीच हटके आहे.
आशुतोष यांनी नागपूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमधून डिप्लोमा केला आणि नोकरीकरिता ते यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी इथं आले. तिथे जयस्वाल कुटुंबातील त्यांचा एक मित्र होता. त्याच्या घरी येणंजाणं व्हायचं. तिथेच आशुतोष आणि मनीषा यांनी एकमेकांना पाहिलं. २२ एप्रिल १९८१ ला आशुतोषनी मनीषाजवळ प्रेमाची कबुली दिली. तेव्हा मनीषा १७ वर्षाच्या तर आशुतोष २० वर्षाचे होते.
"मनीषा मित्राची बहीण असल्यानं प्रेम व्यक्त कसं करायचं हे दडपण होतं." आशुतोष आपली लग्नगोष्ट सांगतात. "शिवाय ती कलार समाजातील आणि मी ब्राह्मण. त्यांच्या कुटुंबाचा दारू आणि औषधीचा व्यवसाय. तिचं कुटुंब अत्यंत श्रीमंत. त्या तुलनेत मी मध्यमवर्गीय. माझे वडील प्राचार्य राम शेवाळकर. साहित्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात नाव असलेलं व्यक्तिमत्त्व. दोन्ही कुटुंबातील या आर्थिक, सामाजिक विषमतेसोबतच आमच्या प्रेमात जात आडवी येण्याची शक्यता होतीच. तरीही मी तिला प्रपोज केलंच. तिनंही मला स्वीकारलं. पण लगेचच लग्न करणं शक्य नव्हतं. थोडं स्थिरस्थावर होईपर्यंत वाट बघण्याचा निर्णय घेतला. प्रेमात पडल्यानंतर लग्न होईपर्यंतचा तो मधला काळ आम्हाला एकमेकांना समजून घेण्यासाठी मिळाला. आमच्या यशस्वी संसाराचं कारण म्हणजे जवळपास सहा वर्ष आमच्यात चाललेलं कोर्टिंग.
त्यावेळी वारंवार भेटी, बोलणं हे शक्यच नव्हतं. जे काही व्यक्त व्हायचं ते पत्रातूनच. लिहिलेलं पत्र तिच्यापर्यंत पोहचवायलासुद्धा १५-१५ दिवस वाट पाहावी लागे. जवळपास कपाटभर पत्र मी तिला त्या काळात लिहिली.
हळूहळू आमच्या प्रेमप्रकरणाबद्दल दोघांच्याही कुटुंबाला कळलं. तेव्हा दोन्ही कुटुंबातून आमच्या प्रेमाला विरोध झाला. परंतु माझ्या घरून फारसा विरोध झाला नाही. त्याचं कारण माझ्या आई-वडिलांचाही प्रेमविवाह होता. तो आंतरजातीय विवाह नसला तरी त्याला देशस्थ-कोकणस्थ ब्राह्मण अशी किनार होतीच. मी प्रेमात पडलो याची माझ्या कुटुंबियांना काळजी नव्हती. पण माझे आजोबा अत्यंत कर्मठ होते. शिवाय हभप म्हणून त्यांचा लौकीक होता. त्यांना हा आंतरजातीय विवाह मान्य झाला नसता. त्यांचं मन कसं वळवायचं, हा कुटुंबियांसमोर मोठा प्रश्न होता. मनीषाच्या कुटुंबात तिच्या आईचा आमच्या लग्नाला प्रखर विरोध होता. आता त्याच कुटुंबात मला त्यांचा जावई नाही, तर मुलगा मानतात.
 मी आंतरजातीय विवाह करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांनी मला त्यावेळच्या प्रथेप्रमाणे पळून जाऊन लग्न करण्याचा सल्ला दिला. परंतु मला धुमधडाक्यात, सर्वांसमोर लग्न करायचं होतं. अखेर ६ वर्षांनी तो दिवस उजाडला. २२ एप्रिल १९८७ ला सकाळी ६ वाजता आम्ही दोघे दोन्ही कुटुंबातील सदस्यांसह शेकडो आप्तेष्ट, स्नेही यांच्या साक्षीनं बोहल्यावर चढलो. मागणी घातल्याची तारीख २२एप्रिल असल्यानं त्याच तारखेला लग्न करण्याचं आम्ही ठरवलं होतं. आम्ही दोघे, आई, दोन मुली, एक मुलगा असं आमचं कुटुंब आहे. माझ्या व्यवसायात मनीषाचं पाठबळ असतं , मात्र हस्तक्षेप नसतो. ती मुलींसाठी नागपुरात होस्टेल चालविते."
आपल्या यशस्वी वैवाहिक आयुष्याचं श्रेय आशुतोष आणि मनीषा एकमेकांवरील खऱ्या प्रेमाला देतात. "मनापासून प्रेम असेल तर एकमेकांना सांभाळून घेण्याची मानसिकता राहते. निव्वळ शारिरिक आकर्षणातून प्रेमात पडलं तर असे विवाह फार काळ टिकत नाहीत. जगात परिपूर्ण कोणीच नसतं. प्रेम असलं की दोष पचवले जातात." आशुतोष-मनीषा सांगतात.
-नितीन पखाले. #लग्नगोष्टी

आठवी ब च्या मुलांचे शंकासमाधान... llभाग २ll

गेल्या काही वर्षात मी विविध शाळा-कॉलेजात जाऊन आठवीपासून पदवी शिक्षण घेणाऱ्या किशोरवयीन आणि तरुण मुलांच्या आरोग्यविषयक समस्या घेऊन चर्चा करत आहे. वर्गात फक्त मी आणि मुलं. त्यांच्या मनात मुलीच्या शारीरिक आकर्षणाबद्दल काय वाटतं, त्याविषयी, “ तुमच्या मनात काही शंका असतील तर मला मोकळेपणाने तुम्हाला ज्या भाषेत जमेल त्या भाषेत विचारा, संकोच करू नका. मी तुम्हाला या बाबतीत योग्य काय आणि अयोग्य काय हे सांगण्यासाठी आलो आहे. शंका विचारताना तुम्ही कोणत्याही शब्दाचा उपयोग करू शकता. मी तुम्हाला शास्त्रीय भाषेत उत्तर देणार आहे.” मी हे सांगतो. पण, खरी गंमत यानंतरच होते. कारण जवळपास प्रत्येक मुलाला या बाबतीत काही ना काही विचारायचं असतं. पण याविषयीच्या शंका मुलं वर्गात उभं पाहून विचारत नाहीत. तर, कागदावर आपला प्रश्न लिहून, माझ्याकडे देतात. त्या प्रश्नाचं मी जाहीर वाचन करतो, योग्य ते उत्तर देतो.
प्रश्नोत्तराचे असे अनेक कार्यक्रम आजपर्यंत झाले आहेत. आता असं लक्षात येतं की, लैंगिकतेविषयी मुलांना खूप काही विचारायचं असतं. इंग्रजी असो की मराठी माध्यमातून शिकणाऱ्या मुलांच्या मनातील प्रश्न विचारण्याची फक्त भाषा वेगळी होती. प्रश्नाचा आशय जवळपास सारखाच. शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या मनात लैंगिकतेशी संबंधित प्रश्न निश्चित असतात; त्यासोबत उंची वाढण्यासाठी मी काय केलं पाहिजे, शरीर पिळदार होण्यासाठी कोणता आहार घेतला पाहिजे असे लैंगिकतेशी संबंधित नसलेले प्रश्न देखील असतात.
हस्तमैथुनाबाबत मुलं खूप प्रश्न विचारतात. हस्तमैथुन करावं का करू नये? किती प्रमाणात केलं तर चालतं? मी प्रत्येक महिन्यात पाच ते सहा वेळेस करतो- चालेल ना? जास्त प्रमाणात केल्यास शरीरावर दुष्परिणाम होतात का? दररोज हस्तमैथुन केल्याने कमजोरी येते का? हस्तमैथुनापासून वाचण्यासाठी काय करावं लागेल? दररोज हस्तमैथुन केल्याने पिंपल्स येतात का? मुली हस्तमैथुन करतात का करत नाहीत हे जाणून घेण्याची मुलांना भारी इच्छा असते. त्या उत्सुकतेपोटीदेखील मुलं प्रश्न विचारतात.
हस्तमैथुनाबद्दल काही महत्वाचे मुद्दे, गैरसमज दूर करण्याच्या दृष्टिकोनातून मांडणे गरजेचे आहे. मुंबईचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेक्सालॉजिस्ट डॉ विठ्ठल प्रभू म्हणतात, मुलं आणि मुली (पुरुष आणि स्त्रिया ) दोघेही हस्तमैथुन करतात. हस्तमैथुन करण्याचं प्रमाण पुरुषांमध्ये जास्त (९३ ते ९८ टक्के) तर स्त्रियांमध्ये ते कमी (६० ते ८० टक्के) असते. फक्त किशोरवयीन मुलं किंवा अविवाहित तरुणच हस्तमैथुन करतात असं नव्हे तर काही वेळेस विवाहित पुरुषदेखील हस्तमैथुन करतात. हस्तमैथुनामुळे कमजोरी येते, चेहऱ्यावर पिंपल्स येतात, लिंगाचे आकारमान लहान किंवा मोठे होते, लिंग वाकडे होते, शरीरातील वीर्याचा साठा संपून जातो, नंपुसकत्व येतं हे सगळं काही चूक आहे. शास्त्रज्ञ सांगतात, हस्तमैथुनाचा लिंगावर अथवा शारीरिक स्वास्थ्यावर काहीही विपरीत परिणाम होत नाही, उलट हस्तमैथुनाचे काही फायदे आहेत. हस्तमैथुन करणाऱ्याच्या मनात एक प्रकारची अपराधी भावना असते, जी असण्याची गरज नाही.
अमुक इतक्या प्रमाणात हस्तमैथुन केलं तर ते योग्य असं सांगता येत नाही. फक्त अतिरेक व्हायला नको. एखादा मुलगा बाकी काहीच करत नाही, फक्त दिवसभर हस्तमैथुनच करत असेल तर ते वाईट. किशोरवयात आणि तरुणपणी हस्तमैथुन करणं ही एक नैसर्गिक बाब आहे. वाढत्या वयासोबत ते प्रमाण कमी होत असतं. हस्तमैथुन करण्याने काही तोटा नाही पण त्या सोबत येणारं नैराश्य, अपराधीपणाची भावना, मनाची बेचैनी त्रासदायक ठरू शकते. हस्तमैथुनाच्या सवयी पासून सुटका हवी असल्यास मुलांनी शारीरिक व्यायाम करणे, एखादा खेळ, संगीत अथवा चित्रकलेसारख्या छंदाची जोपासना केली पाहिजे.
- डॉ. किशोर अतनूरकर, नांदेड