Tuesday 29 May 2018

सांगायला आनंद वाटतो की...



नवी उमेद फेसबुक लाइव्हमध्ये सहभागी झालेल्या गरीब कुटुंबातल्या मुलांच्या जेवणाचा खर्च उचलणार खासदार सुप्रिया सुळे. 
२६ मे रोजी नवी उमेदचं फेसबुक लाईव्ह पुण्याहून झालं. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या समवेत मुलांच्या गप्पांचं आयोजन करण्यात आलं होतं. या फेसबुक लाईव्हदरम्यान सुप्रियाताईंनी सुमारे पाऊण तास लहान मुलांशी विविध विषयांवर गप्पा मारुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मुलांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. 
या वेळी ही मुलं झोपडपट्टी भागातील असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या लहान मुलांचा अधिक वेळ जेवणासाठी भीक मागण्यात जात असल्याने मुलांना शाळेत जाता येत नसल्याचंही खा.सुप्रिया सुळे यांच्या ध्यानात आलं. यावर, "जर तुम्ही भीक मागणं बंद करणार असाल आणि नियमितपणे शाळेत जाणार असाल, तर तुम्हा सर्व मुलांच्या दोन वेळ जेवणाची सोय करण्याची जबाबदारी मी घेते" असं त्यांनी सांगितलं. यावर मुलांनी एक सुरात, "होय ...आम्ही इथून पुढे भीक न मागता नियमित शाळेत जाऊ" असं कबूल केलं. सुप्रिया सुळे यांनी या मुलांपैकी अक्षय पंच या मुलाला त्याच्या परिसरातल्या भीक मागणाऱ्या सर्व मुलांची यादी तयार करुन चार दिवसात देण्याची जबाबदारी दिली.
या मुलांचा जेवणाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. नवी उमेद पाठपुरावा करेलच.
या तत्पर निर्णयासाठी सुप्रियाताईंचे नवी उमेदतर्फे आभार.

Monday 28 May 2018

आधी रक्तदान, मग विवाहाची शान

एक मेचा दिवस. यवतमाळमध्ये लग्नसोहळा सुरू होता. नवरदेव कौस्तुभ लिंगनवार आपल्या कुटुंबासोबत आनंदाचे क्षण लुटत होते. तोच एक व्हॉट्स ॲप मेसेज आला. महाराष्ट्रदिनानिमित्त वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयातल्या मातोश्री प्रतिक्षालयात रक्तदान शिबिर आयोजलं होतं. माँ आरोग्य सेवा समिती आणि केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांचा हा उपक्रम. राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि त्यांच्या पत्नी शीतल यांनी स्वत: रक्तदान केलेलं. गरजू रूग्णांसाठी रक्तदान करा, असं आवाहन स्वतः राठोड यांनी जनतेला केलं. ते समाजमाध्यमातून पसरलं. 525 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. 
या आवाहनाला प्रतिसाद म्हणू्न कौस्तुभ यांनाही भावी पत्नी समीक्षासह शिबिरात भाग घ्यावा, असं वाटलं. त्यांनी आपली इच्छा काकांकडे व्यक्त केली. काका हरिहर लिंगनवार शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख. त्यांनी आयोजकांशी संपर्क साधला. वधूवरांची इच्छा कळवली. बोहल्यावर चढण्यापूर्वी संध्याकाळी ४ च्या सुमाराला मुंडावळ्या बांधूनच वधुवर रक्तदान शिबिरात पोहोचले. संजय राठोड यांच्यासह सर्वांनीच त्यांचं कौतुक केलं. ''आजचा दिवस संस्मरणीय आहे. दरवर्षी लग्नाचा वाढदिवस रक्तदान करून आम्ही साजरा करणार", कौस्तुभ आणि समीक्षा यांनी सांगितलं. त्यांच्या रक्तदानानंतर विवाहसोहळा शानदारपणे पार पडला. 
लग्नाचा दिवस. जगाचा विसर पडण्याचा, दोघांनी मिळून गुलाबी स्वप्नं पाहाण्याचा. अशा खास दिवशीही कौस्तुभ आणि समीक्षा यांनी सामाजिक भान जपलं. 
-नितीन पखाले.

पूर्ण मजुरी दिली शाळेला

राज्यात ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’चा कार्यक्रम लागू झाला आणि प्रत्येक जिल्हा परिषद शाळा प्रगत होण्यासाठी धडपडू लागली. शाळा प्रगत होण्यासाठी जसे विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेत सक्षम बनवायचे आहे तसेच शाळाही डिजिटल आणि देखणी बनविणे अपेक्षित आहे. पण यासाठी आर्थिक पाठबळही तसेच मजबूत हवे आणि हे तितके सोपे नाही. कारण सगळी सोंगं आणता येतात, पण पैशांचे नाही.
याच आर्थिक पाठबळासाठी महाराष्ट्रात गावांकडून लोकसहभागाची प्रथा चालू झाली आहे. धुळे जिल्ह्याने यात आणखी एक पाऊल पुढं टाकत लोकसहभागासाठी ‘प्रेरणा सभा’ घेण्याचा पायंडा पाडला आहे. धुळ्याच्या जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या (DIECPD) प्राचार्या डॉ. विद्या पाटील यांच्या या संकल्पनेने धुळे जिल्ह्यात जणू क्रांती घडविलेली आहे. थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 1 कोटी 51 लाख 31 हजारांची रक्कम एकट्या धुळ्यात लोकसहभागातून जमा झालेली आहे आणि जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा डिजिटल करणारा धुळे हा पहिला जिल्हा ठरला आहे.
या प्रेरणा सभांची सुरुवात मार्च 2016 पासून झाली. पाटील मॅडम सांगतात, “शाळा आणि पालक यांच्यातला औपचारिक बंध गळून पडावा आणि गावानेही शाळेच्या विकासात रस घ्यावा, म्हणून नियोजित पद्धतीने लोकसहभाग जमा करण्यासाठी ही प्रेरणा सभांची कल्पना सुचली.” सभा शक्यतो सकाळी सातच्या सुमारास किंवा संध्याकाळी सातच्या सुमारास आयोजित केल्या जातात. जेणेकरुन गावातल्या शेतकरी किंवा कामगार ग्रामस्थांचे कामाचे तास वाया जाऊ नयेत.
ही सभा होण्यापूर्वी आठवडाभर शिक्षक घरोघरी जाऊन या सभेची माहिती देतात आणि पालकांना निमंत्रण देतात. या सभा अनौपचारिक वातावरणात होतात. सभेत शक्यतो कोणत्याही राजकीय नेत्याला व्यासपीठावर स्थान दिलं जात नाही. सभेसाठी मंडप, टेबल- खुर्ची, पुष्पगुच्छ, आदर- सत्कार या गोष्टींना फाटा दिला जातो. टेबल- खुर्ची असेल तर ठीकच नाहीतर थेट गावकऱ्यामध्ये बसून ही सभा होते.
डॉ. विद्या सांगतात, “आर्थिक मदत प्रत्येक ग्रामस्थाला शक्य असेल असं नाही, त्यामुळे आमचा भर केवळ आर्थिक मदतीवर नसतो. बरेचदा आम्ही गावकऱ्यांना आवाहन करतो की तुमच्या शेतात पिकलेली ज्वारी, बाजरी, मका किंवा ताज्या भाज्या एखाद्या आठवड्यात शाळेला पोषण आहारासाठी द्या. सुतार, लोहार, कुंभार अशा कारागिरांनी त्यांचे कौशल्य आणि व्यवसायाची माहिती शाळेला सांगावी. महिलांनी मुलांसाठी पोषण आहार तयार करायला मदत करावी किंवा एखादीला चांगली रांगोळी काढता येत असेल, तर ती मुलांना शिकवावी, कुणी बागकाम शिकवावं. जेणेकरुन पालकांचा शाळेतील आणि मुलांच्या शिक्षणातील रस कायम राहावा.”
त्या पुढं म्हणतात, “धुळे हा काही तसा संपन्न जिल्हा नाही. पण आमच्या प्रेरणा सभेच्या उपक्रमाला धुळेवासियांनी भरभरुन साथ दिली आहे. शिरपूर तालुक्यातील बाळदे या गावी आमची प्रेरणा सभा सुरू होती. संध्याकाळी चालू असलेल्या या सभेतील भाषण मजुरीवरून घरी जाणाऱ्या रांजण भिल्ल याच्या कानावर पडलं. त्याने सायकलवरुन उतरून ती सभा ऐकली आणि त्या दिवशी मिळालेली 200 रुपयांची पूर्ण मजुरी शाळेला दिली, हा प्रसंग तर मी विसरूच शकत नाही.”

- स्नेहल बनसोडे-शेलुडकर

असं एक गाव, गणिताशिवाय बातच नाही राव!

भूम तालुक्यातील सुकटा हे छोटंसं गाव. गावात शिरताच प्रत्येक घराची भींत आकड्यांनी रंगलेली, वर्तुळ, चौकोनांनी सजलेली दिसते. गावकऱ्यांनी अगदी मनापासून जपलेल्या या भींतीवरील मजकूर गावातल्या प्रत्येक व्यक्तीच्या ज्ञानात भर पाडणारा आहे. छोट्याशा खेड्यातील माध्यमिक शाळेचे शिक्षक प्रकाश यादगिरे यांच्या अभिनव कल्पनेतून ही जादू झाली आहे. यादगिरे यांनी विद्यार्थ्यांना गणित-भूमितीची सूत्र सोप्या पध्दतीने समजावून सांगण्यासाठी ही क्लृप्ती लढवली. त्यातून गावकऱ्यांनाही फायदा झाला.यादगिरे सुकटा येथील विद्यालयात १९९९ पासून कार्यरत आहेत. त्यांना विद्यार्थ्यांच्या गरजा आणि उणिवांची जाणीव होती. गणित विषयात कमी गुण मिळत असल्याने मुलं आणि पालकही निराश. त्यामुळे या विषयावर अधिक जोरकसपणे शिवाय वेगळ्या पध्दतीने काम करण्याची इच्छा यादगिरे यांच्या मनात घोळू लागली होती. या विचारातूनच गणिताची सूत्रं सोप्या पध्दतीने विद्यार्थ्यांना समजावण्यासाठी गावातील घरांच्या भिंतींनाच फळा बनविण्याची संकल्पना त्यांना सुचली. कामाला सुरुवात झाली. 
                                                                  गावातील सुमारे १५० घरांच्या भिंतींसह पाण्याच्या टाकीवरही गणिताची सूत्रं ऑइलपेंटने रेखाटली आहेत. पाचवी ते दहावीपर्यंतची गणितातील बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि समीकरणांसह बीजगणित व भूमितीमधील मूलभूत सूत्रांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे खेळताना-बागडताना, गावात फिरताना, शेतामध्ये जाताना सर्वत्र गणिताची सूत्रं विद्यार्थ्यांच्या दृष्टीस पडतात. या भिंती विद्यार्थ्यांच्या मनात कोरल्या गेल्या आहेत. त्यामुळे गावातील मुलांची गणिताची बौद्धीक क्षमता वाढून त्यांच्यात गोडी निर्माण झाली आहे. 
विद्यार्थ्यांच्या स्वप्नातील गणिताचं गाव त्यांनी प्रत्यक्षात आणलं आहे.
प्रकाश यादगिरे म्हणतात, ‘मी निरीक्षण करीत होतो. विद्यार्थ्यांशी चर्चा करीत होतो. तेव्हा सहज लक्षात आलं की शाळेत गणिताच्या तासाला विद्यार्थी घाबरतात. ही भीती दूर झाली पाहिजे, म्हणून मी हे काम हाती घेतलं. आता भिंतींवर रखाटलेली गणिताची सूत्रं विद्यार्थ्यांना शाळेत आल्यावर पुस्तकात दिसतात. त्यामुळे आपण कोणतेही गणित सोडवू शकतो, असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे. हे काम हाती घेतले तेव्हा मला शासकीय फंड मिळाला असेल, असं ग्रामस्थांना वाटायचं. मात्र हे सगळं स्वखर्चातून सुरू होतं. भिंती रंगवण्यासाठी पेंटरचा शोध, त्यांच्याकडून अचूक काम करून घेणं खूप कठीण होतं. काही पेंटर स्क्वेअर-फूटाप्रमाणे दर सांगायचे. त्यामुळे तीन-चार पेंटर बदलत कितीतरी दिवस उन्हात थांबून गणिताची सूत्रं रेखाटून घेतली. हे काम पूर्ण करण्यासाठी दोन महिने लागले. मात्र, मी मागे वळून पाहिले नाही. मला विद्यार्थ्यांसाठी हे काम पूर्ण करायचंच होतं. आज विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत असल्यामुळे माझ्या परिश्रमाचे चीज झालं आहे’. 

- चंद्रसेन देशमुख.

Thursday 24 May 2018

चार घास सुखाचे...

जिल्हा सातारा. माण तालुक्यातील म्हसवड. साधारण ३५ हजार लोकसंख्येचं गाव. इथल्या ‘निर्भीड फौंडेशन’ आणि ‘कला फ्रेंड्स’ या संस्थांचा उपक्रम म्हणजे ‘चार घास सुखाचे’. निर्भीड फौंडेशनचे डॉ. चेतन गलांडे म्हणतात, “भारतातील एकूण धान्य उत्पन्नाच्या एक तृतीयांश अन्न वाया जातं आणि तरीही लाखो लोक रोज उपाशी झोपतात. बऱ्याच लोकांना वाटतं की हे फक्त शहरापुरते मर्यादित आहे. काही सेवाभावी संस्था बेंगळूरू, दिल्ली, मुंबई, जयपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये अन्नदान तसेच समारंभामध्ये जादाचे राहिलेले अन्न गरीब भुकेल्या लोकांना पुरवण्यासाठी काम करतात. पण छोटी शहरे आणि गावं यामध्ये अन्न वाया जात नाही का? लोक उपाशी झोपत नाहीत का? असं अनेक प्रश्न मला पडत होते. नव्हे, वास्तव समोर दिसत होतं. कारण गावामध्ये भीक पण मागता येत नाही लाज आडवी येते! कित्येक वृद्ध, म्हातारे लोक ज्यांची मुले मोठ्या हुद्द्यावर शहरात काम करतात त्यांच्या जेवणाची पंचाईत झालेली असते. ‘आई जेवण घालत नाही आणि बाप भीक मागू देत नाही’ अशी त्यांची अवस्था झालेली असते. विविध कारणांमुळे आता इथंही वृद्ध, म्हाताऱ्या लोकांची संख्या वाढते आहे.



 अर्थातच त्यांच्या रोजच्या जेवणाचा प्रश्नही आ वासून उभा आहे”. डॉ गलांडे यांना या सगळ्या परिस्थितीने विचार करायला भाग पाडलं. कला फ्रेंड्स संस्थेच्या दत्ता गोंजारी यांच्याशी चर्चा झाली. आणि ‘चार घास सुखाचे’ या उपक्रमाने आकार घेतला. 
म्हसवडच्या एसटी बस स्थानकापासून चार-पाच मिनिटांच्या अंतरावर चार घास सुखाचे हे केंद्र आहे. सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत येणाऱ्या प्रत्येक गरजू, भुकेल्या व्यक्तीला केवळ पाच रुपये आकारून जेवण दिलं जातं. एखादी व्यक्ती तेवढेही पैसे देऊ शकत नसेल तर अर्थातच तिला मोफत. गेले अडीच-तीन महिने एकही दिवस सुट्टी न घेता हा उपक्रम सुरु आहे. रोज साधारण ५० लोकांचं जेवण इथं बनवलं जातं. या केंद्राचं काम बघणारा सारंग लोंढे सांगतो की, “एक पथ्य आम्ही पाळलं आहे, दारूचं व्यसन असलेल्या व्यक्तींना आम्ही कटाक्षाने इथं जेवण देत नाही”. 



या योजनेत रोज एका अन्नदात्याच्या मदतीने अन्नदान केले जाते. केंद्रावर लावलेल्या बोर्डवर ‘आजचा अन्नदाता’ नावाने त्याचा गौरव केला जातो. काही लोक फूल ना फुलाची पाकळी म्हणून कुवतीप्रमाणे धान्य, भाज्या, थंड पाणी दान स्वरुपात देतात. 



डॉ. चेतन म्हणतात, “चार घास सुखाचे या नावाप्रमाणेच, पंचपक्वान जेवण न देता पोटभर होईल असं दोन चपात्या व भाजी दिली जाते. ज्यामुळे गरजू लोक त्या वेळेमध्ये येऊन जेवण घेतात. सध्या दोन महिला स्वयंपाक करतात. त्यासाठी त्यांना मानधनही दिलं जातं. त्यांना भाजीपाला व धान्य पुरवण्याचे काम संस्थेचे सभासद करतात. शिजवलेले अन्न केंद्रापर्यंत पोहोचवण्याचं कामही हे सभासद करतात. त्याचे आम्ही वेळापत्रक बनवले आहे.”



डॉ. चेतन सांगतात, “आमच्या नंतर आता सातारा शहर, कोल्हापूर शहर येथे असे उपक्रम चालू झाले आहेत”.
निर्भीडची स्थापना २००९ झाली असली तरी गेल्या वर्षभरापासून त्यांनी सामाजिक कामाला जोरदार सुरुवात केली आहे. या वर्षभरात त्यांनी जिल्हा परिषद शाळा पुळकोटी येथे ११ कॉम्प्यूटरची डिजिटल क्लासरूम चालू केली आहे. तसेच विविध गावांमध्ये रोग निदान शिबीर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये दंतचिकित्सा शिबीर, जंत निर्मुलन व पोलिओ लसीकरण, महिला सक्षमीकरण यासारखे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
सारंग सांगतो की, “रोजच्या जेवणाचा खर्च साधारण १३०० ते १४०० रुपये खर्च येतो. महिन्याचे अंदाजे निम्मे दिवस आम्हाला अन्नदाते उपलब्ध होतात. वाढदिवस, जयंती, वर्षश्राध्द त्या दिवसाचा अन्नदानाचा खर्च करतात. उरलेल्या दिवसाचा खर्च डॉ. चेतन गलांडे स्वत: करतात.

लिंबाच्या झाडाखालची शिक्षणसाधना

शिरूर तालुक्यातील मातोरी गावाजवळील भालेकश्वर मंदिराचा पायथा. इथंली भिल्ल वस्ती. हा भारतातील एक मुख्य आदिवासी समूह. त्यांना भिला किंवा भिल्ल गारसिया असंही म्हटलं जातं. या समाजाची वस्ती महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, आंध्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थान या राज्यात आढळून येते. बीड जिल्ह्यातही हा समाज विखुरलेला आहे. भालकेश्वर मंदिराच्या पायथ्याशी १३ भिल्ल कुटुंबं शासनाच्या गायरानात राहत आहेत. 



यांना रोजगाराचं ठराविक साधन नाही. उसतोडणी किंवा वीटभट्टीवर काम करून या कुटुंबांची गुजराण होते. साहजिकच आई- बाप कामावर गेल्यानंतर मुलं घरात आजी आजोबांजवळ राहतात. वस्तीच्या जवळपास शाळा नाही. मात्र, शिक्षणाची गरज वस्तीप्रमुख शहाबाई बाजीराव बरडे यांनी जाणली. आणि दोन महिने त्या आठ मुलांना घेऊन अडीच किमीवरील मातोरी जिल्हा परिषद शाळेत जात राहिल्या. परंतु वस्तीजवळ एका बाजूला तलाव आणि नदी तर दुसऱ्या बाजूला हायवे असल्याने पालकांना मुलांना शाळेत पाठवणे धोकादायक वाटू लागलं. दुसरी ते आठवीतील ही १७ मुलांची शाळा बंद झाली. ही मुलंही वीटभट्टीवरच काम करू लागली. 



एकदा गेवराई तालुक्यातील तांदळा येथील साहेबराव पाटील विद्यालयाचे शिक्षक धर्मराज जरांगे भालकेश्वराच्या दर्शनासाठी आले. दर्शन घेऊन परतताना ही मुलं त्यांच्या नजरेसं पडली. मुलं शालेविना अशीच मोकाट फिरत आहेत हे पाहून त्यांनी पत्नी मीना यांना सांगितलं की, “तू या वस्तीवर मुलांना शिकव. ही मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आली पाहिजेत”. एवढ्यावरच न थांबता तिथं शाळा सुरू करण्याचा निर्णयही त्यांनी घेऊन टाकला. आता मुलांना पुन्हा एकदा शाळेची गोडी लावणं आवश्यक होतं. तेव्हा धर्मराज व मीना दोघंही आठ दिवस रोज या वस्तीवर आले. मुलांना चॉकलेट, बिस्कीट देऊन त्यांनी त्यांचे विविध खेळ घेतले. 



मीना यांचं मतीमंद या विषयात डीएड झालं आहे. मागील सहा महिन्यापासुन त्या बीडहून दररोज ये- जा करून भिल्ल वस्तीवर मुलांना शिकवतात. वस्तीवरील एका लिंबाच्या झाडाखाली हे ‘साधना ज्ञानमंदिर’ सुरु आहे. केवळ एक फळा, खडू आणि डस्टर हीच शाळेची मालमत्ता. सकाळी दहा वाजता शाळा भरते. राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, कविता त्या घेत असून मुलांना अआइई मुळाक्षरांपासून पाढेही आता तोंडपाठ झाले आहेत.
३ ऑक्टोबर २०१७ मध्ये धर्मराज जरांगे यांनी ‘स्नेहग्राम’चे महेश निंबाळकर व जामखेड येथील ‘प्रयोगवन परिवार’चे सत्तार शेख यांना भिल्ल वस्तीवर आणलं. त्याच दिवशी फेसबुक लाईव्ह करून मीना जरांगे यांनी भिल्ल समाजाच्या मुलांसाठी वस्तीवर शाळेची अनौपचारीक घोषणा केली. सध्या या शाळेत अंकुश बरडे, युवराज पवार, रामेश्वर बरडे, योगेश बरडे, कार्तीक बरडे, गोविंद पवार, सुनील बरडे, लक्ष्मा बरडे, धनराज पवार, अर्चना बरडे, पायल बरडे ही मुलं शिकत आहेत. यातील १७ मुलांना जून २०१८ मध्ये मातोरी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. खरंतर ही शाळा घरापासून दूर म्हणून मुलं शाळेविना राहिली होती. आता मुलांना शाळेत जाण्या येण्यासाठी आम्ही स्कूलबसची मोफत व्यवस्था केली आहे. शाळाबाह्य झालेली मुलं पुन्हा शाळेत जात असल्याने अानंद वाटत असल्याचं धर्मराज जरांगे सांगतात.
मीना जरांगे संपर्क क्र. - 9527349777

एका, नव्हे दोन लग्नांची गोष्ट

''लग्न म्हटलं की अजूनही खर्च मुलीकडच्यांनाच जास्त पडतो. यामुळे मुलींचे आईवडील कर्जबाजारी होतात. कोणतीही अपेक्षा न ठेवता, एका अनोळखी मुलासाठी, त्याच्या कुटुंबासाठी आपलं घर सोडून मुलगी दुसऱ्या घरी येते. याची जाणीव ठेवायची सोडून तिच्या घरच्यांना खर्चात का बरं पाडायचं? असा प्रश्न आम्हाला पडायचा.'' रत्नागिरीतले विद्यानंद आणि अनमोल कोत्रे हे दोघे चुलत भाऊ बोलत होते. नुकतंच विद्यानंदचं मयुरी मांडवकरशी तर अनमोलचं सुप्रिया गुडेकरशी लग्न झालं. हे दोन विवाह आगळेवेगळे ठरले. 




धर्मादाय आयुक्त कार्यालयानं पटवर्धन प्रशाळेत आयोजित केलेला सामुदायिक विवाह सोहळा. एकूण 10 जोडपी. त्यापैकी 8 जोडप्यांनी धार्मिक विधिवत विवाह केला तर 2 जोडप्यांनी हे सगळे विधी, परंपरा आणि रूढी बाजूला ठेवले. केवळ हार आणि मंगळसूत्र घातलं. आपण मनानं एकमेकांना स्वीकारल्यानं विधींची गरज नाही, असं सांगत लग्न केलं.
"कुंडलीतल्या आकड्यांची जुळवाजुळव नव्हे. दोन मनांचं सुंदर मिलन, दोन मनांचा समजुतदारपणा, एकमेकांवरचा विश्वास म्हणजे लग्न. कर्तव्यबंधन नव्हे, तर दोन मनांचं अतूट बंधन. मंगलाष्टकातील सावधानता नव्हे, तर चुका पोटात घालणं, म्हणजे लग्न. दोन जीवांचं हे मिलन आई-वडील आणि समाजाच्या साक्षीनं शेवटपर्यंत निभावणं.'' लग्नाबद्दलचे आपले विचार विद्यानंद आणि अनमोल यांनी यावेळी मांडले. धर्मादाय आयुक्तांसह उपस्थितांनीही टाळ्यांच्या कडकडात नवदांपत्यांचं कौतुक केलं. या विवाहाचा आदर्श इतर तरुणांनीही घेण्याचं आवाहन धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी केलं.
कोत्रे बंधू कोतवडे इथले. आर्थिक परिस्थिती बेताचीच. महिनाभरापूर्वी त्यांनी रजिस्टर पद्धतीनं लग्न करण्याचा निर्णय घेतला. याच सुमाराला सामाजिक कार्यकर्ते सत्यवान कोत्रे आणि श्रद्धा कळंबटे यांनी त्यांना सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न करण्याचं सुचवलं. विद्यानंद आणि अनमोल यांनी सर्व नातेवाईक, गावपंचायतीसमोर आपले विचार मांडले. त्यांच्या आधुनिक विचारांचा सर्वानी खुलेपणानं स्वीकारही केला.
प्रत्येक तरुणानं असा विचार केला तर हुंडाबळीसारखे प्रकार घडणारच नाहीत असं नववधू मयुरी आणि सुप्रियाला वाटतं. 

Monday 21 May 2018

चिमुकल्यांची गगनभरारी !

कोणीही विमान जवळून पाहिलंच नव्हतं. मुलांनीच काय, त्यांच्या घरातल्यांनी,आजूबाजूच्यांनी, अगदी शिक्षकांनीसुद्धा. पण मुलांना गगनभरारी घ्यायची होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातली, सावंतवाडी तालुक्यातली कुणेकरी गावची शाळा. त्यातली सातवीतली १२ मुलं. 'स्वप्न पाहणारा माणूस' हा धडा वर्गात शिकणं सुरू होतं. मुलांच्या स्वप्नांबाबत गप्पा सुरू झाल्या. यातूनच विमानप्रवासाचं स्वप्न पाहिलं गेलं. मुंबईपर्यंत रेल्वेनं प्रवास तर मुंबई- गोवा विमानप्रवास. शाळेची साथ होतीच. मुलांनी आपलं स्वप्न जेव्हा घरी सांगितलं, तेव्हा पालकांनी मुलांना आणि शाळेलाही वेड्यातच काढलं. 




मुलांचा मात्र स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा ठाम निश्चय. त्यासाठी मग सुरू केलं 'शिवाजी मिशन'. पालकांना परवानगीसाठी तयार करणं आणि विमानप्रवासासाठी पैसा मिळवणं, तोही स्वकमाईतून. मिशन कठीण होतं पण सोबत होती शिक्षकांची. कमाईसाठी भातकापणी, नारळ-फुलं विकणं , शिमगोत्सवात नाचगाणी अशी धडपड सुरू होती. ती पाहून पालक , ग्रामस्थ , शिक्षक सर्वांनाच हुरूप येत होता. हळूहळू मुलांच्या स्वप्नाला प्रसिद्धी मिळू लागली. चर्चा रंगू लागली. पालकमंत्री दीपक केसरकरांपर्यंत ती पोहोचली. त्यांनाही कौतुक वाटलं . मुंबईत राहण्याची आणि पर्यटनस्थळं पाहण्याची व्यवस्था त्यांनी केली.
मुंबईतल्या कुणेकरी गावच्या मंडळानंही मदत केली. गावातल्याच राकेश गुंजाळ ,राहुल आणि हर्षल कदम यांनी तिकीट बुकिंगसाठी मदत केली . विमान तिकीट २२०० रुपये. शिवाजी मिशनमधून पैसे जमले होते. थोडे पालकांनीही दिले. मार्चमध्ये मुलांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं. गोव्याला पोहोचल्यावर सावंतवाडीपर्यंत येण्यासाठी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांनी बसची व्यवस्था केली.
स्वप्न साकारण्यासाठी मेहनतीची जोड दिली तर ते सहजसाध्य होऊ शकतं. हा चिमुकल्या वयात मिळालेला अनुभव मुलांना भावी आयुष्यात कामी येईल.

Saturday 19 May 2018

समाजशास्त्राला रंजक बनविताना

लातूर शहराला लागून असलेली वरवंटी जिल्हा परिषद शाळा. शाळेचा स्टाफ महिलाकेंद्री- ७ शिक्षिका आणि एक मुख्याध्यापक. या शाळेत इयत्ता आणि तुकड्यांचे वेगवेगळे वर्ग नाहीत, हेच इथलं वेगळेपण. त्याऐवजी आहेत समाजशास्त्र, गणित, भाषा अशी दालनं. या शाळेत मुलं दिवसभर एकाच वर्गात बसून राहत नाहीत. त्याऐवजी ज्या विषयाचा तास असेल त्या दालनात दाखल होतात आणि ज्ञानरचनावादी पद्धतीने अभ्यास करतात.
वरवंटी शाळेतील ही विषयदालने पाहण्यासारखी आहेत. समाजशास्त्र हा विषय शिकविणाऱ्या सविता धर्माधिकारी यांनी समाजशास्त्र दालनात अनेक अभिनव प्रयोग केले आहेत. त्यात मानवी उत्क्रांतीच्या अवस्थेनुसार निअँडरथल, होमो इरेक्टस, होमो सेपियन अशा अवस्थेची चित्रं काढलेली आहेत. त्या चित्रांवर त्या मानवांची वैशिष्ट्ये दाखविलेली आहेत. ती चित्रं विद्यार्थी गळ्यात अडकवितात आणि मग उत्क्रांतीच्या अवस्थेनुसार क्रमानं उभं राहण्याचा खेळ खेळतात किंवा चित्रावरून उत्क्रांतीची अवस्था ओळखून त्याच्या वैशिष्ट्यांची चर्चा करतात.जबाबदार नागरिकांची पायाभरणी करणाऱ्या ‘नागरिकशास्त्र’ या विषयाकडे तसं दुर्लक्षच केलं जातं. पण धर्माधिकारी यांनी हा विषय प्रात्यक्षिके, अभिरुप संविधान समिती आणि निवडणुकीद्वारे एकदम रंजक करुन टाकला आहे. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना आपलं संविधान कसं तयार झालं, याबाबतचा अभ्यास आहे. ते फक्त पुस्तकातून शिकवण्यापेक्षा धर्माधिकारी मॅडमनी 'अभिरुप संविधान समिती' तयार केली होती. त्यात एक विद्यार्थी संविधान समिती अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर झाला, तर कुणी राजकुमारी अमृत कौर, कुणी सरदार वल्लभभाई पटेल बनले. या विद्यार्थ्यांनी देशाच्या संविधानावर चर्चाही केली. प्रत्येक विद्यार्थ्याला पदवीपर्यंत मोफत शिक्षण मिळावे, प्रत्येक गावात अत्याधुनिक सोयींचा दवाखाना आणि कुशल डॉक्टर्स असावेत अशा शिफारशीही त्यांनी केल्या.

या चर्चेच्या अनुषंगाने धर्माधिकारी यांनी देशाचे संविधान आणि कायदा हा नागरिकांच्या भल्यासाठी आणि देशाच्या सुव्यवस्थेसाठी कसा आवश्यक आहे, ते समजावून सांगितले. गंमत म्हणजे यानंतर वरवंटी शाळेतील विद्यार्थ्यांनी 2016 साली त्यांच्या वर्गाचं संविधानही तयार केलं होतं. त्यासाठी संविधान समिती नेमण्यात आली, त्याच्या बैठका झाल्या आणि वर्गासाठीचे कायदे त्याद्वारे तयार झाले. त्यासाठी लिखित रूपात वर्गाच्या संविधानाचे प्रास्ताविकही विद्यार्थ्यांनी तयार केलं. महत्त्वाचे म्हणजे संविधान समितीत आवर्जून सर्व जाती- धर्मांच्या आणि बोलीभाषा बोलणाऱ्या सदस्यांचा समावेश केला गेला.
वरवंटी शाळेतील विद्यार्थ्यांच्या उत्सुकतेची आणखी एक गोष्ट म्हणजे- शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक. आता तुम्ही म्हणाल, विद्यार्थ्यांचे मंत्रिमंडळ तर अनेक शाळांमध्ये असते. पण वरवंटी शाळेत ही निवडणूक प्रक्रिया अगदी खऱ्याखुऱ्या निवडणुकीसारखीच पार पडते. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन त्याचं वेळापत्रक नोटीस बोर्डवर लागलं जातं. त्यानंतर उमेदवारांनी फॉर्म भरणे, निवडणुकीच्या प्रचारसभा, मतदानाचे चिन्ह, प्रत्यक्ष अंगठ्याचा शिक्का मारून मतदान, त्यानंतर मतमोजणी आणि मग मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ जाहीर करणे असा भरगच्च कार्यक्रम असतो. यात निवडून आलेले मंत्रिमंडळ वर्षभरासाठी शाळेची जबाबदारी घेते. प्रत्यक्ष इव्हीएम शाळेत आणणे शक्य नसल्याने ते कसे चालते याचा व्हिडिओ आणि फोटो धर्माधिकारी मॅडम यांनी मुलांना दाखविले.
समाजशास्त्राशिवाय इंग्रजी आणि गणिताचे अभिनव उपक्रम वरवंटी शाळेत घेतले जातात, 

- स्नेहल बनसोडे- शेलुडकर

Friday 18 May 2018

... आणि साहिल चालू लागला

सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम असलेला चिकारपाडा. येथील साहिल चौधरी हा जन्मतः पायाने अधू. आपल्या व्यंगामुळे त्याला अंगणात पळता आलं नाही की बरोबरीच्या मुलांसोबत खेळता आलं नाही. लहान बाळासारखे रांगत किंवा आई - वडिलांच्या खांद्यावर बसून त्याला शाळेत जावं लागत होतं. घराच्या अंगणातील खेळही तो रांगतच खेळायचा. आई वडिलांनी कधी पदरमोड करत तर कधी सरकारी योजनांचा लाभ घेत त्याच्या पायावर नाशिकच्या रुग्णालयात दोन वेळा शस्त्रक्रिया केली. मात्र त्याच्यात काही सुधारणा झाली नाही. 



सभोवताली जंगल. त्यामुळे वाहतुक व्यवस्था नाही. तरीही त्याचे वडिल दादुराम त्याला कडेवर घेऊन शाळेत सोडत. त्याची आई शाळेच्या वेळेत त्याच्या नैसर्गिक विधीसाठी तेथेच थांबून रहायची.
अर्थात साहिलच्या व्यंगाचा त्याच्या शैक्षणिक प्रगतीत कधीही अडथळा आला नाही. साहिलची अभ्यास आणि खेळाची आवड, पालकांची अवस्था पाहता मुख्याध्यापक बलराम माचरेकर यांनी पुढाकार घेतला. चिकारपाडा हे गुजरात सीमेजवळचं गाव. मग तेथील खारेल गावातील ‘ग्रामसेवा ट्रस्ट’शी संपर्क साधत माचरेकर यांनी त्यांना साहिलच्या व्यंगाची माहिती दिली. ट्रस्टच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी साहिलची तपासणी केली. आणि त्याच्यावर शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. नुकतीच ही शस्त्रक्रिया पार पडली. काही दिवसाच्या आरामानंतर साहिल आता सर्वसामान्य मुलांसारखा खेळू आणि चालू लागला आहे. त्याची ही प्रगती पाहून पालकांच्या आनंदाला पारावर उरला नाही. आपल्या भावना कुठल्या शब्दात व्यक्त करायच्या हे समजत नसल्याचं दादुराम चौधरी सांगतात. तर माचरेकर यांनी साहिलसाठी केलेल्या प्रयत्नांचे यश पाहता वर्गातील अजून एका मुकबधीर मुलासाठी आपण प्रयत्न करण्याचा मानस व्यक्त केला. 




आठ वर्षाचा साहिल नुकताच चालू लागला असला तरी त्याची जवळची जिल्हा परिषदेची शाळा केवळ पट संख्येअभावी बंद पडल्याने त्याला आता दोन किलो मीटर अंतर पायी चालत शाळा गाठावी लागणार आहे. प्रतिकूल परिस्थितीत साहिलची जिद्द कायम असून शिकून मोठ्या गाडीत फिरता येईल असं मला व्हायचं आहे असं तो आर्वजून सांगतो.

Wednesday 16 May 2018

एक आहे सुमीत...

औरंगाबाद येथे जटवाडा परिसरातील सईदा कॉलनी. इथल्या सुमीत देविदास पंडितची ही गोष्ट. त्याचं वय २४. एस.पी.जेन्टस पार्लर हे केशकर्तनालय तो चालवतो. महाराष्ट्र शासनाच्या ‘मुलगी वाचवा मुलगी शिकवा’या उपक्रमाला पाठींबा म्हणून त्यानं एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. सुमितने त्यांची कन्या लक्ष्मीच्या दुसऱ्या वाढदिवशी म्हणजे ३१ डिसेंबर २०१६ पासून एका आगळ्या उपक्रमास सुरवात केलेली आहे. कोणत्याही कुटुंबात जर मुलगी जन्माला आली तर त्या मुलीच्या वडिलांची दाढी कटिंग २ महिने २१ दिवस मोफत करतो आहे. वडिलांना शाल श्रीफळ, आईला साडी, मुलीला ड्रेस देऊन तो सत्कार करतो. मुलीचे जावळ मोफत काढून देतो. तसंच मुलीच्या नावे सुकन्या योजनेच्या खात्यात स्वखर्चाने २८१ रुपये टाकून खाते उघडून देत आहे. या योजनेचा लाभ आजपर्यत ६३ मुलींच्या पालकांनी घेतला आहे. 



याही पुढं एक पाऊल टाकत त्यानं मागील वर्षी रक्तदान शिबीराचं आयोजन केलं होतं. ३४ रक्तदात्यास एक रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. या रक्तदात्यांची १ महिना २१ दिवस दाढी कटिंगही त्यानं मोफत केलं. जून २०१७ पासून सुमितने जे कुटुंब शौचालय बांधून त्याचा नियमित उपयोग करेल त्या कुटुंब प्रमुखास शाल श्रीफळ, १ महिना ११ दिवस दाढी, कटिंग मोफत देऊन सत्कार करण्याचा नवीन उपक्रम सुरु केला आहे. आतापर्यंत २६ ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. सुमितचं आणखी एक विशेष काम म्हणजे कुठंही बेवारस पडलेल्या निराधार, अपंग, रुग्ण किंवा मनोरुग्णाना शोधून तो त्यांची दाढी- कटिंग करून देतो. त्यांना आंघोळ घालून देतो. प्राथमिक औषधोपचारही करतो. नवीन कपडे देऊन तो १०८ रुग्णवाहिकेला फोन करुन सरकारी दवाखान्यात दाखल करतो. एवढंच नाही तर त्यांची प्रकृती ठणठणीत होईपर्यंत त्यांना स्वत:च्या घरुन जेवणाचे डबेही तो पुरवतो आहे. मराठवाडा, विदर्भ, खान्देश अशा विविध ठिकाणी जाऊन आतापर्यंत ३६९ बेवारस लोकांना माणुसकीची मदत करून त्यांचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम त्यानं केलं आहे. भीक मागणा-या सुमारे १७० लोकांचं मत परिवर्तन करून त्यांना मानसिक आधार देत त्यानं त्यांना कामाला लावलं आहे.

‘स्नेहग्राम’ची शाळा

“डीएड ची पदवी घेतली आणि माझ्यातला शिक्षकच जागा झाला. लातूरला जाताना बार्शीतील स्थलांतरितांची वस्ती नेहमी पाहायचो. एकदा त्या वस्तीत शिरलो. आणि शिक्षण हक्क कायदा समजवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. शब्दांची दमदाटी करुन मी घरी परतलो. पण आपण नेमकं काय केलं..? हा प्रश्न मला सतावत होता. 
१-२ महिन्यातच त्या रस्त्यावरुन जायची संधी मिळाली. सहजच लातूर रोडच्या वस्तीकडं नजर गेली अन् काळीज चरर्र करणारं वास्तव नजरेपुढं आलं. १००-१२५ मुलांची फौज पालांभोवती घुटमळताना दिसली. काही अर्धनग्न अवस्थेत, तर काही शिळ्या भाकरीचा तुकडा मोडत होती. पुन्हा तिथं वळलो. साजंवेळ. वस्तीत चुली पेटलेल्या, भाजीला फोडणी देणं चालू. वडीलधारी माणसं झिंगाट झालेली. तरीही संवादाचं अस्त्र उपसलंच. परिस्थितीचा अंदाज घेऊन दुसऱ्याच दिवशी पुन्हा वस्तीत गेलो, सर्व्हे चालू केला. जवळच्याच घोडके प्लॉटच्या नगरपालिका शाळेत मुख्याध्यापकांना भेटलो. कांबळे सरांनी कसबसं या मुलांना शाळेत बसायला संमती दिली. हे सारं होईपर्यंत १५ दिवस उलटले”, महेश निंबाळकर समरसून सांगत होता. 



"गड सर करावा, अशा आनंदात वस्तीत गेलो. आणि सदाशिव मुळेकरांची भेट झाली. काकांना म्हणालो, उद्यापासून पोरांना शाळेत घेऊन जा, फक्त रस्ता ओलांडायचा." काका म्हणाले, "बरंय, एकट्या गड्याला दीस जातोया, सर. म्या हाय जायाला तयार. मंग माज्या बिगारीचं काय. ती तुमी द्या." शाळा शिकणार यांचीच मुलं अन् मी दिवसाची हजेरी देणारा कोण..? या विचारानं प्रचंड संतापलो. रागानं म्हणालो, "काका, आता फक्त या वस्तीत येऊन शिकवायचं तेवढं राहिलंय." काकानं लगेचच होकार दिला, "लय बेस हुईन." थोडा विचार करता मलाही हे पटलं. शेवटी २० सप्टेंबर २००७रोजी या अनौपचारिक शाळेचं उद्घाटन झालं. पोटापाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या मुलांच्या शाळेचं नाव ‘भटक्यांची शाळा’ ठेवलं. भीक मागायची, चोऱ्या करायची, कचरा गोळा करायची, ती मुलं शाळेत अक्षरं गिरवू लागली.



डीएडला शिकणारी मुलं शिकवायला येऊ लागली. सकाळी त्या मुलांना हॉस्टेलवरुन दुचाकीवरुन न्यायचं. नंतर स्वत:च्या शाळेत जायचं. स्वतःच्या पगारातील मानधनही त्यानं या छात्रशिक्षकांना द्यायला सुरुवात केली होती. महिनाकाठी ३००-४०० रुपये खिशात रहायचे. त्यात सोसायटी काढलेली, भाड्याचं घर, किराणा, भाडं, दवाखाना सारी गणितं बिघडली. ३-४ दिवस पाण्यावर आणि बिस्कीटावर काढले. शाळेला जाणंही होईना. कारण पुरेसे पैसे जवळ नसायचे. अशावेळी रात्री १२ वाजता घरमालक चव्हाण काकुंच्या मुलींनी जेवायला आणलेलं ताट आजही आम्ही विसरलेलो नाही. माझ्या पत्नीनं, विनयानं कधीही तक्रार केली नाही”. 
महेश आणि विनया झटून काम करत राहिले. आणि अनेकांचे हात सहकार्यासाठी पुढे येऊ लागले. त्यामुळे या वस्तीत शिक्षणाबरोबर धान्य, कपडेवाटप, आरोग्यशिबीरं, रेशन कार्ड आधार कार्ड शिबीर, बँक खाते, प्रसूती, हॉस्पीटल खर्च, मुलांचे वयाचे दाखले, पाण्याच्या टाक्यांचे वाटप अशा विविध गोष्टी घडू लागल्या. 
देणगी मिळायची ती फक्त वस्तुरुप. साहजिकच प्रपंचाची ससेहोलपट सुरु झाली. जवळच्या नातलगांनी महेशच्या कामाला विरोध सुरु केला. नातलगांचे दरवाजे दोघांसाठी कायमचे बंद झाले. वडिलांनीही घराबाहेर काढलं. उपासमारीचे दिवस आले. तरीही त्यांनी कामात खंड पडू दिला नाही. २०१२ मध्ये महेशनी नोकरीला रामराम ठोकला. हे मोठं धाडस होतं. कारण मिळकतीचा शाश्वत पर्याय त्यानं स्वत:हून बंद केला होता. एकदा त्याला जाणवलं, “आपण खरंच शाश्वत बदलासाठी काम करतोय का?” मग मुलांना वस्तीतून बाहेर काढून गुणात्मक शिक्षण द्यावं असा विचार आला आणि त्यातूनच जून २०१५ ला खांडवीत शाळा सुरु झाली. पण वस्तीतलं एकही पोरं शाळेला आलं नाही. शेवटी पारध्याकडं मोर्चा वळवला. २५ मुलं मिळाली आणि काम सुरु झालं. 
महेश सांगतो, “निवासी प्रकल्पाचा कसलाही अनुभव नव्हता. तरी केलं धाडस. फासेपारधी समाज कायमच भटकं जीवन जगणारा. पाली, बेडय़ांवर वास्तव्य करणारा. जन्मजात गुन्हेगार म्हणून इतर भटक्यांप्रमाणेच फासेपारधी समाजाकडे बघितलं जातं. गरिबी, गुन्हेगारीची दलदल यात अडकलेल्या कुटुंबातल्या भटक्या मुलांसाठी ‘स्नेहग्राम’ ही निवासी शाळा सुरू केली”.
आणि नुकत्याच रुजू झालेल्या दांपत्यानं मानधन वाढवून मागितलं. ही अपेक्षा मान्य करणं शक्य नव्हतंच. अचानक रात्री ८ वाजता ते दोघं काम सोडून गेले. तब्बल २ महिने २५ मुलांना शिकवणं अन् स्वयंपाक करणं, या दुहेरी चक्रव्युहात विनया अडकली. रात्रीच्या मुक्कामाची जबाबदारी एकट्या महेशवर आली. सकाळी ६ वाजता ती बार्शी सोडायची अन् धावपळीत प्रकल्प गाठायची. मुलांसाठी न्याहारी, दोन वेळचे जेवण अन् अध्यापन ही कसरत तिनं साधली. प्रसंगी भाजीला फोडणी देत पोळ्या लाटत तिनं मुलांना शिकवलं. अशातच एकदा मुलांना पिवळं पुरळं आलं. हात-पाय आणि अगदी बसण्याच्या जागेवरही फोड. कुणी औषध लावायला धजावत नव्हतं. तेव्हा ३-४ दिवस विनयानं मायेनं काळजी घेतली. त्या दिवशी शाळेतल्या छोट्या सुरेशनं विनयाला माई म्हणून हाक मारली. आणि तिथूनच विनया मुलांची ‘माई’ झाली.
वर्षाच्या आतच जागा मालकानं दुप्पट भाडेवाढ केली. शेवटी महेश-विनयाने कोरफळे इथं घेतलेल्या जागेत शाळा हलवली गेली. पण ९० च्या दशकात बांधलेल्या या वास्तुची पडझड सुरु होती. सप्टेंबर २०१६ मध्ये पडलेला पाऊस अन् मुलांचं आजारपण यामुळे पालकांची मनस्थिती बिघडली. मुलं वजा होऊ लागली. सारं संपलं, असं म्हणून कित्येक रात्री विनया व महेशनं जागून काढल्या. आता पुढं काय..? 
अशातच महेश व विनया यांच्याविषयीचा लेख कौस्तुभ आमटे यांच्या वाचनात आला. त्यांच्याकडून बोलावणंही आलं. त्या भेटीनं अन् आनंदवन समाजभान अभियानाच्या सहकार्यानं स्नेहग्रामच्या प्रश्नांवर तात्पुरता मार्ग निघाला. सुरुवातीला ५ रुम. त्याही टिनशेडच्या. ना कंपाऊंड ना एकही झाडं ! नंतर सुमारे ४६० झाडे लावली. आजही परिसरात हरणांचा वावर आहे, तसा लांडग्यांचाही. सोबतीला महेश, विनया अन् ३६ मुलांची फौज. सुरुवातीला बोअर मारुनही पाणी उपसायला वीज नव्हती. शिक्षक उपलब्ध नव्हते, ना स्वयंपाकी. पाण्यासाठी ५०,०००/- रुपये मोजावे लागले. ही बातमी कळताच डॉ. विकास आमटे यांनी २,७०,०००/- रुपयांचा जनरेटर पाठवून दिला. बोअरचं पाणी उपसतेवेळी व्हर्च्युअल क्लास चालवण्याची कल्पना समोर आली. त्यासाठी प्रोजेक्टर, लॅपटॉप मिळाला. व्हर्च्युअल क्लॉसनंतर व्हीआर लायब्ररी साकारली अन् गेल्या महिन्यात टॅबस्कूलही. एका स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात, एक सोलर पॅनल सर्किटवर तात्पुरता प्रकाश, मोबाईल व टॅब चार्जिंगचा प्रश्न मार्गी लावला.
सध्या इथं २१ मुलगे, १५ मुली आहेत. १ली ते ४थी अशा ४ वर्गाची आवश्यकता असतानाही २ वर्गखोल्यांवर बहुवर्गअध्यापन पद्धतीनं विनया मुलांना शिकवते. मुलांचा पाया पक्का करुन क्रमिक अभ्यासक्रमाकडे वळण्याची दुहेरी कसरत इथं करावी लागतेय. तरीही ९५% मुलांना लिहिता-वाचता येतं. मुलांना कौशल्याधिष्ठीत शिक्षण मिळावं, यासाठी कुकिंग, शेती, मातीकाम यासह बालसंसद, बालन्यायालय, स्नेहग्राम बँक, व्हर्च्युअल ट्रीप, पुस्तकाबाहेरचं जग मुलांना दाखवणे. यात स्मशानभेट, पोलीस कार्यालय अशा क्षेत्रभेटीचं घडवून आणल्या जातात. “शिक्षण असो की जबाबदारी, कामाची रोटेशन पद्धत आम्ही अवलंबली आहे. भविष्यात स्नेहग्राममध्ये ‘लोकल ते ग्लोबल’ असा शिक्षणप्रवास आम्ही सुरुवात करतोय”, महेश सांगतो. 

Tuesday 15 May 2018

यशवंताची वारी रुग्णांच्या दारी

वर्धा जिल्ह्यातलं सेलू तालुक्यातलं जुवाडी. तिथे राहणारे यशवंत वाघमारे. अत्यंत गरीब कुटुंबातले. २००५ मध्ये शेतीची कामं करून ते बारावी झाले. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे पुढचं शिक्षण शक्यच नव्हतं. घरच्यांना काही कळू न देता त्यांनी सेलूच्या बाजारात हमाली सुरू केली. त्यावेळी सुशांत वानखेडे, यांनी दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे कार्यकारी अधिकारी अभ्युदय मेघे यांच्यासमोर यशवंत यांची परिस्थिती मांडली. सावंगी रुग्णालयात यशवंत परिचर म्हणून काम करू लागले. ते काम करताना त्यांनी ईसीजी टेक्निशिअनचा अभ्यासक्रम पूर्ण केला. काही गरीब रुग्ण डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी सावंगी रुग्णालयात येत. त्यांना दुचाकीवर बसवून सेवा पुरवण्याचं काम त्यांनी सुरू केलं. यशवंतची पत्नी मीनल. ती वरिष्ठ परिचारिका. यशवंत यांनी नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याबाबत मीनल आग्रही होत्या. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मनिषा मेघे यांचं सहकार्य लाभलं. २०१३-१४ मध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण करताना ६३ हजार रुपये शुल्क हप्त्यानं भरण्यासाठी यशवंत रात्री पेंटिंगची कामं करू लागले.



रुग्णालयातून परतल्यानंतर काही रुग्णांना तपासणीसाठी पुन्हा रुग्णालयात जावं लागतं. काही जणांना ते शक्य होत नाही. अशा व्यक्तीनी संपर्क केल्यास यशवंत आणि त्यांचे सहकारी मदत करतात. त्यांना, त्यांच्या कुटुंबाला मानसिक आधार देतात. कुटुंबाचा एक सदस्य बनून हे सर्व काम यशवंत आणि त्यांचे सहकारी करतात. रुग्णालयातलं आपलं काम करत असतानाच प्रत्येक रुग्णाच्या घरी ते सकाळ-संध्याकाळ भेट देतात. आस्थेनं विचारपूस , उपचार करतात
रुग्णसेवेचा वसाच त्यांनी घेतला आहे. 




दुर्धर आजार असलेल्या रुग्णांना डॉक्टरांचे सर्व प्रयत्न संपल्यावर घरी पाठवलं जातं. मुलं लांब राहणाऱ्या, अत्यंत व्यस्त जीवनशैली असलेल्या मुलांच्या आईवडिलांची अशा वेळी आबाळ होते. यशवंत अशा रुग्णांच्या घरी जाऊन आपुलकीनं सेवा सुश्रुषा पुरवतात. विशेष म्हणजे या सेवेचे ते पैसे मागत नाहीेत किंवा अगदी नाममात्र घेतात. आतापर्यंत १५ रुग्णांना त्यांनी सेवा पुरवली आहे.
लहानपणापासून कीर्तन ऐकत आल्याने, त्यातून रुग्णसेवेची आवड निर्माण झाल्याचं यशवंत सांगतात. सप्तखंजेरी वादक दीपक भांडेकर यांच्या कीर्तनात त्यांनी तबलावादनही केलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारानं प्रभावित होऊन रुग्णसेवेलाच आता सर्वस्व मानत असल्याचं यशवंत सांगतात.
यशवंत वाघमारे -९९२३२४१२३०

Monday 14 May 2018

शेती विकली,दुसऱ्यांची कसली, मुलाला आयएएस बनवलं!

उस्मानाबाद जिल्ह्यातलं उमरगा तालुक्यातलं दोन हजार वस्तीचं कसगी गाव. २७ एप्रिल. संध्याकाळचे सव्वासात वाजलेले. शेतातली कामं आटपून दिलीपराव घराकडे येत होते. घरासमोर मोठी गर्दी जमली होती. दिलीपराव येताच गावकऱ्यांनी त्यांना उचलून घेत जल्लोष केला. त्यांचा मुलगा गिरीश आयएएस झाला होता. पंचक्रोशीतला तो पहिलाच आयएएस. यूपीएससीच्या परीक्षेत यंदाच्या निकालात डॉ गिरीश बदोले राज्यात पहिले तर देशात २० वे आले. दिलीपरावांच्या नजरेसमोर झर्रकन भूतकाळ तरळला. 
दिलीपराव बदोले यांची वडिलोपार्जित ६ एकर जमीन. त्यांचं शिक्षण दहावीपर्यत. मात्र मुलं गिरीश आणि आशिष यांनीे भरपूर शिकावं, मोठं व्हावं, असं त्यांचं स्वप्न. शेतीचा धंदा तर आतबट्ट्याचा. मग संसाराचा गाडा चालण्यासाठी १९ वर्षांपूर्वी त्यांनी ३० एकर जमीन वाटा पध्दतीनं (बटईनं) घेतली. 
गिरीशच्या शिक्षणाची गाडी सुरू झाली. पहिली- दुसरीपर्यंत कसगीमध्ये. तिसरी-चौथी आजोळी कासारशिरशी इथं. चौथीत तुळजापूरच्या सैनिक स्कुलमध्ये निवड. तिथे दहावीपर्यंत मोफत शिक्षण. नंतर लातूरच्या दयानंद महाविद्यालयात विज्ञान शाखेतून बारावी. पुढे मुंबईच्या जेजे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश. इथे मात्र, फी भरण्यासाठी पैसे नव्हते. दिलीपरावांनी ४ एकर जमीन विकली. उमरगा इथल्या बँक ऑफ हैदराबादमधून अडीच लाख रुपये शैक्षणिक कर्ज घेतलं. अनंत अडचणी पार करून २०१४ मध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं. तरीही गिरीश समाधानी नव्हते. त्यांना आयएएस व्हायचं होतं. कुटुंबावर कर्जाचा वाढता भार. स्पर्धा परिक्षेत यश मिळण्याची शक्यता कमी. तरीही गिरीशला आई-वडिलांनी निर्णयस्वातंत्र्य दिलं . गिरीशने तयारी सुरू केली. २०१४ च्या दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळ होता. शेती पिकत नसल्यानं घर चालणं मुश्किल होतं. त्यामुळे मुंबईतल्या एका कंपनीत २०१४ ते २०१७ अधूनमधून गिरीशने नोकरी केली. सोबतच दहा-बारा तास अभ्यासही.
पुण्यातल्या युनिक अकॅडमीचे तुकाराम जाधव यांचं मार्गदर्शन घेतलं. २०१४ पासून तीनदा अपयश आल्यानंतर चौथ्यांदा गिरीशने यशाला गवसणी घातली. 'या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांनी कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवावी , सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. प्रत्येक वेळी यश मिळतंच असं नाही, मात्र प्रयत्नात सातत्य ठेवलं पाहिजे ', गिरीश सांगतात. परिस्थितीचा बाऊ न करता कठोर परिश्रमांनी, जिद्दीनं परिस्थितीवर मात करणाऱ्या गिरीश यांचं यश संपूर्ण गाव साजरं करत आहे.

-चंद्रसेन देशमुख .

Sunday 13 May 2018

लिहिता- वाचता न येणारा विद्यार्थी दाखवा आणि 5000 रुपये मिळवा!!

नंदुरबारमधील आदिवासी पाड्यावरची डाकणपाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. केवळ दोनच शिक्षकी. इथं सुरुवातीपासूनच मुख्य प्रश्न भाषेचा होता. भिल्ल जमातीच्या बहुतांश मुलांना मराठी भाषा अवघड वाटायची. पण इथले मुख्याध्यापक सुभाष सावंत सर आणि त्यांचे सहकारी नानासाहेब बेडसे यांनी मुलांची भाषेची भीती घालवून टाकण्याचा निश्चय केला. मुलांशी त्यांच्या मातृभाषेत संवाद साधून हळूहळू रोजच्या वापरातल्या मराठी शब्दांची ओळख करुन दिली.
शब्दांची आगगाडी, एका शब्दावरुन अनेक वाक्ये रचणे, शब्दपट्ट्या, चित्र- शब्द कार्डे अशा अभिनव उपक्रमांचा वापर करत हळूहळू शाळेतील मुलांना मराठी भाषेची गोडी लागली. शाळेतील बहुतेक सर्व मुलं उत्तम लिहू- वाचू लागली. केवळ दोन मुलं अभ्यासात मागे होती. त्यापैकी एक मुलगी कुपोषित, तर मुलगा अप्रगत होता. दोघांच्याही पालकांशी बोलून त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देण्याची विनंती सावंत सरांनी केली. कुपोषित विद्यार्थिनीला घरी आणि शाळेतही पौष्टिक आहार मिळेल, तिला अभ्यास करायला मजा येईल असं वातावरण त्यांनी तयार केलं.




हळूहळू हे विद्यार्थीदेखील प्रगती करु लागले. तत्कालीन केंद्रप्रमुख ललिता भामरे 2014 साली एकदा शाळेला भेट द्यायला आल्या. त्यांनी अप्रगत विद्यार्थ्यांबाबत सावंत सरांकडे चौकशी केली, तर आता हे विद्यार्थीही प्रगत झाले असल्याचे सरांनी सांगितलं. भामरे मॅडम यांनी खरोखरच काही विद्यार्थ्यांचे वाचन घेतले तर प्रत्येक विद्यार्थी वयानुरुप उत्तम वाचन- लेखन करत असल्याचं त्यांना आढळून आलं. याबाबत केंद्रप्रमुख भामरे मॅडम यांनी सावंत सरांना शाबासकीही दिली.
त्यावेळी सावंत सर भामरे यांना म्हणाले, “शाळेतील विद्यार्थ्यांवर आम्ही कष्ट घेतच आहोत. पण जिल्हा परिषद शाळांबाबत सामान्य नागरिकांमध्ये खूप गैरसमज आहेत. मुलांना साधं स्वत:चं नाव लिहिता येत नाही, बेरीज वजाबाकी करता येत नाही असं लोकांना वाटतं. हा गैरसमज मिटविण्यासाठी ‘लिहिता- वाचता न येणारा विद्यार्थी दाखवा, आणि 5000 रुपये मिळवा’ असं जाहीर आव्हान द्यावं, असं मला वाटतं” मॅडमनेही सावंत सरांची कल्पना उचलून धरली आणि 2014 साली झालेल्या केंद्रसंमेलनात हे अनोखं आव्हान इतर अनेक शिक्षकांपुढे मांडलं गेलं.




या आव्हानानंतर अनेक शिक्षक, DIECPD चे प्राध्यापक, शिक्षण विभागाचे अधिकारी डाकणपाड्याच्या शाळेला भेट देऊ लागले. प्रत्येक वेळेला मुलं मात्र उत्तम वाचन- लेखन करून यशस्वी होत राहिली. त्यावेळी तत्कालीन गटशिक्षणाधिकारी शंकरराव वळवी यांनीही शाळेला शाबासकी देऊन हा उपक्रम स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये छापून आणा, असा सल्ला दिला. आणि डाकणपाड्याची शाळा सकाळ, पुण्यनगरी सारख्या वर्तमानपत्रातून संपूर्ण नंदुरबारमध्ये कौतुकाचा विषय झाली.
सावंत सर म्हणतात, “आता अनेक शिक्षक आमची शाळा पाहायला येतात. आमची शाळा खूप श्रीमंत नाही, त्यामुळे त्यांचा खूप चांगला आदर- सत्कार आम्हांला जमेलच असे नाही. पण आमची खरी संपत्ती हे विद्यार्थी आहेत, त्यांची हुशारी पाहून प्रत्येकजण समाधानाने घरी परततो”.
एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये, म्हणून सावंत सरांची धडपड आहे, त्याविषयी अधिक वाचण्यासाठी क्लिक करा: http://samata.shiksha/…/find-student-unable-read-write-win…/

Friday 11 May 2018

वाहनचालक ते लेफ्टनंट

शहर पुणे. इथं वाहन चालक म्हणून नोकरी करणारा ओम उत्तमराव पैठणे. मूळचा बीड जिल्ह्यातील लिंबारूई गावचा तरुण. एक दिवस, निवृत्त कर्नल बक्षी त्याच्या कारमध्ये प्रवासी म्हणून बसले. आणि या प्रवासात त्यांनी ओमच्या जीवनालाच दिशा मिळवून दिली.
सेवानिवृत्त कर्नल बक्षी यांनी ओमशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. ‘संयुक्त लष्करी सेवा’ (कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस) ‘सीडीएस’ परीक्षेबद्दल माहिती दिली. लेफ्टनंट कर्नल गणेश बाबू यांचा पत्ता देऊन त्यांच्याकडे प्रशिक्षण घेण्याचा सल्लाही दिला. पुढे २०१६ मध्ये झालेल्या ‘सीडीएस’ परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात ओम उत्तीर्ण झाला. त्यानंतर त्याने भोपाळ येथे ‘सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड’ (एसएसबी)ची परीक्षा उत्तीर्ण होऊन चेन्नईमध्ये “ओटीए’मधून प्रशिक्षण पूर्ण केले. आणि तो भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर १० मार्च २०१८ रोजी रूजू झाला. 
ओमच्या यशामागे निवृत्त कर्नल बक्षी यांचा योग्य सल्ला आहे, त्याचे स्वतःचे आणि त्याच्या आई-वडीलांचे - उत्तम आणि सुशिला यांचे कष्टही आहेत. मनकर्णिका प्रकल्पात बीड तालुक्यातील लिंबारूई हे गाव विस्थापित झालं. त्यातच दुष्काळामुळे उत्तम यांना चार एकर शेती कशी करायची हा प्रश्न पडला. मुलांचं शिक्षण कसं होणार या चिंतेत त्यांनी १९८६ मध्ये गाव सोडून रोजगारासाठी पुण्याची वाट धरली. आवश्यक असलेल्या कागदपत्रांअभावी त्यांच्या तीनही मुलांना पुण्यातील बँकाकडून शिक्षणासाठी कर्ज मिळालं नाही. शेवटी ते गावी परत आले आणि खाजगी सावकाराकडून ५० हजाराचं कर्ज घेतलं. तर सुशीला यांनी स्वतःचे दागिने विकून तीनही मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवला. पुण्याजवळ सारोळ्यालगत तोंडल गावात स्थाईक झाल्यानंतर उत्तम यांनी सुरूवातीला एका कुक्कुटपालन व्यवसायाच्या गाडीवर आणि पुढे पुण्याच्या व्यंकटेश्वरा कंपनीत २२ वर्ष वाहनचालक म्हणून काम केलं. वाहन चालवतांना त्यांच्या दोन्ही गुडघ्यांना इजा झाल्यामुळे गुडघा प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करावी लागली. त्यातली एकच शस्त्रक्रिया यशस्वी झाली. सुशीला यांनीही मोलमजुरी करून कुटुंबाला हातभार लावला. ओमचा धाकटा भाऊ आदिनाथ याचं बीएसस्सी झालं आहे. तर बहिण मोनिका पदवीशिक्षण घेत आहे.
ओमची आई म्हणते, “गाव सोडले तेव्हा आमची परिस्थिती बिकट होती. घरात ओमला एकटे ठेवून मला शेतात मजुरीच्या कामासाठी जावं लागायचं. मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही खूप कष्ट उचलले. त्यातूनही मुलं घडली, हा आनंद आहे”.
लिंबारूई गावात सध्या या कुटुंबाचं पत्र्याचं घर होतं. तेही दोन वर्षापूर्वी पावसात पडलं आहे. तरीही गावातील गरीब मुलांसाठी शाळा उघडण्याचं ओमचं स्वप्न आहे. वाहनचालक ते लेफ्टनंट असा त्याचा खडतर प्रवास आजच्या तरूणांना निश्चितच प्रेरणादायी आहे.
- दिनेश लिंबेकर,.

तुम्ही खर्रा खाऊ नका, मी खर्रा आणून देणार नाही

सहावीतल्या हर्षाने वडिलांकडे नवी वही - पेन घेण्याचा हट्ट धरला. पैसे नाही, असं सांगत वडिलांनी दुर्लक्ष केलं आणि खिशातून खर्रा (तंबाखूचा एक घातक प्रकार) काढून तो तोंडात टाकत घराबाहेर निघून गेले. मुलीच्या डोक्यात विचार आला, “माझ्या वही, पेनासाठी पैसे नाहीत तर बाबांकडे खर्रा घेण्यासाठी पैसे कुठून येतात?” तिने ही बाब शाळेत येणारा सामाजिक कार्यकर्ता सुनील भेले याला सांगितली. वडील दिवसभरात किती खर्रे खातात, एक खर्रा किती रूपयांचा असतो याची माहिती काढण्यास सुनीलने हर्षाला सांगितलं. तिने पानठेल्यावर जाऊन माहिती घेतली. बाबा दिवसभरात किमान चार - पाच खर्रे खातात हे लक्षात आलं. हिशोब केल्यावर ती अवाक झाली. तिचे वडील खर्ऱ्यावर महिन्याकाठी 1200 ते 1800 रूपये खर्च करीत होते. मुलांना शिक्षणसाहित्य घेऊन न देणारे पालक दिवसभरात 40 ते 60 रूपये खर्ऱ्यावर खर्च करीत असल्याचं सुनीलला समजल्यावर त्यांनी समस्येच्या मुळाशी जायचं ठरवलं. 
जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान, यवतमाळ तसेच टाटा ट्रस्टच्या मदतीने यवतमाळ तालुक्यातील 16 गावांमध्ये 2015 पासून गुणवत्तापूर्ण शिक्षण व युवा कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत. शिक्षण घेतानाच मुलांच्या सामाजिक जाणीवा प्रगल्भ होऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी सुनील भेले व त्यांची टीम कायम अभिनव उपक्रम राबवित असते. त्यांनी सोळाही गावांमधील शाळेत विद्यार्थ्यांची ‘बालपंचायत’ स्थापन केली आहे. 
सुकळी, येळाबारा पोड, धानोरा, गणेशपूर, आकपूरी, चौकी आकपुरी, चौकी झुली, वडगाव, वरूड, वरझडी, येवती, हातगाव, कारेगाव यावली, मुरझडी आणि रामनगर या 16 गावांमधील बालपंचायतींच्या सदस्यांची बैठक घेऊन सुनीलने योजना सांगितली. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी 17 ते 23 जानेवारी 18 दरम्यान या गावांमध्ये सर्वेक्षण केले. या काळात गावात सर्वत्र आढळणाऱ्या खर्ऱ्याच्या प्लास्टिक पन्न्या एकत्र करण्यात येऊन त्या मोजण्यात आल्या. गावातील रस्त्यांचे नकाशे काढून पानठेल्यांची संख्या काढली. एका पानठेल्यावरून दिवसभरात सरासरी किती खर्ऱ्यांची विक्री होते, याचे निरीक्षण नोंदविले. सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत दर दोन तासांनी गावात किती खर्रे विकले जातात याचीही माहिती या पानठेल्यांवरून घेतली. मुलांनी आपल्या पालकांकडे ते दिवसभरात किती खर्रे खातात याची चौकशी केली.
या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 271 मुलांनी सात दिवसात या 16 गावांमध्ये खर्ऱ्याच्या 22 हजार 13 पन्न्या गोळा केल्या. या 16 गावांमध्ये दिवसाला सरासरी 4 हजार 593 खर्रे विकले जातात असं आढळलं. याचा एका दिवसाचा खर्च 46 हजार 332 रूपये होतो. महिन्याला 13 लाख 98 हजार 860 आणि वर्षाला 1 कोटी 43 लाख 24 हजार 520 रूपये एवढा प्रचंड आकडा या विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणातून पुढं आला. विद्यार्थ्यांनी एका खर्ऱ्याची सरासरी किंमत केवळ 10 रूपये इतकी गृहीत धरली. प्रत्यक्षात एक खर्रा 15 ते 20 रूपयांना मिळतो. या 16 गावांचा केवळ खर्ऱ्यावरील खर्च दीड कोटीच्या घरात असेल तर ग्रामीण अर्थकारण कसं चालत असेल याचा अंदाज यावा, असे सुनील भेले म्हणाले. मुलांना वही, पेन साठी पैसे न देणारे पालक या पद्धतीने खर्ऱ्याच्या व्यसनांवर खर्च करीत असतील तर मुलांवर काय संस्कार होतील, हा प्रश्नही निर्माण झाला आहे. या सर्वेक्षणातून काढलेले निष्कर्ष सोळाही गावातील बालपंचातीच्या सदस्यांनी शाळेतील सूचना फलकांवर लिहिले आहेत. सोबतच पालकांना या व्यसनापासून दूर राहण्याचा आग्रह केला आहे.
खेड्यामंध्ये लहान मुलांना खर्रा, पान, सिगरेट, तंबाखू आणण्यासाठी पानठेल्यांवर पाठवण्यात पालकांना काहीही गैर वाटत नाही, हे वास्तव आहे. मात्र या सर्वेक्षणादरम्यान बालपंचातीने यावर तोडगा शोधला. या सोळाही गावातील मुलांनी ‘यापुढे मी खर्रा आणून देणार नाही’ अशी शपथच प्रजासत्ताक दिनाला घेतली. ही शपथ पालकसभेत पालकांपुढे ठेवली. त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे, असं सुनील भेले म्हणाले. 
- नितीन पखाले.

Wednesday 9 May 2018

देहदानाच्या जागृतीसाठी वाहून घेतलेले जोशीकाका

“मृतदेह नाशवंत होण्याआधी जर तो कोणाच्या कामी येत असेल, तर कित्येक लोकांना त्याचा फायदा होतो. अवयवदानामुळे मरणासन्न लोकांना जीवनप्राप्ती होते तर देहदानामुळे पुढील पिढीतल्या डॉक्टर्सना अभ्यासाकरता मदत होते. म्हणजे दोन्ही दानांमधून समाजाला आपण मदत करतो”, जोशीकाका सांगतात. पूर्वी डोंबिवलीला आणि सध्या ठाण्यात राहणारे ७७ वर्षांचे विनायक जोशी. स्टेट बँकेतून निवृत्त झालेल्या जोशीकाकांनी अवयवदान आणि देहदानाच्या जागृतीसाठी स्वतःला वाहून घेतलं आहे. जोशींसह समविचारी व्यक्ती डोंबिवलीत एकत्र आल्या. त्यांनी 1987 मध्ये दधिची देहदान मंडळाची स्थापना केली. 15 ज्येष्ठ नागरिकांची कार्यकारिणी संस्थेचं काम पाहते. संस्थेचे सभासद आहेत चार हजार. आतापर्यंत संस्थेच्या ८०० सभासदांनी देहदान केलं आहे.
कर्णोपकर्णी माहिती कळलेले लोक संस्थेशी किंवा जोशीकाकांशी संपर्क साधतात. मग याविषयीच्या कायदेशीर आणि इतर प्रक्रियेची माहिती ते देतात. कार्यशाळांतून या माहितीचा प्रसार करण्यात येतो. सर्व सभासदांना त्यांच्या वाढदिवसापूर्वी शुभेच्छापत्र पाठवून संस्था त्यांच्या संपर्कात राहते. संस्थेचं त्रैमासिक आहे. यात कायदेशीर माहितीसोबत, डॉक्टरांचे लेख, एखाद्या सभासदाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या इच्छेचा मान राखत देहदान केलं असल्यास याची माहिती या त्रैमासिकात असते.
जोशीकाकांना एकच खंत वाटते ती म्हणजे, बऱ्याचदा मृत व्यक्तीने देहदानाविषयी अर्ज भरल्याची माहिती नातेवाईकांना नसते. किंवा माहिती असल्यासही ते गैरसमजुतीमुळे देहदान न करता पारंपरिक अंत्यसंस्कार करतात. काही नातेवाईक सभासदाच्या मृत्यूविषयी संस्थेला कळवत नाहीत.
देहदानअर्जाची प्रक्रिया सोपी आहे. अर्जावर दोन साक्षीदारांच्या सह्या लागतात. यातील किमान एकजण रक्ताचा नातेवाईक असावा लागतो. अर्जदाराचे 2 फोटो, नाव, पत्ता आणि फोन नंबर याची माहिती दिल्यावर आपल्याला एक नोंदणी क्रमांक दिला जातो. ठाणे विभागातील अर्जांची नोंद कळवा हॉस्पिटलमध्ये तर मुंबईतल्या अर्जांची नोंद जे.जे. हॉस्पिटलमध्ये करण्यात येते.
दधिची संस्थेसोबतच विनायक जोशी द फेडरेशन ऑफ ऑरगन अँड बॉडी डोनेशन, बँक कर्मचारी मित्र मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ, विवाहपूर्व समुपदेशन, मसाप डोंबिवली, कोमसाप अत्रे सांस्कृतिक कट्टा अशा विविध संस्थांशी जोडलेले आहेत.

-साधना तिप्पनाकजे.

म्हैसपालनातून दिवसाची कमाई 15 ते 18 हजार,बेलवाडीच्या मांडगे कुटुंबाची यशोगाथा

हिंगोली शहरापासून चार किलोमीटरवरचं बेलवाडी गाव. साधारण ५० कुटुंबांचं ६०० लोकसंख्येचं. अर्ध्या हिंगोली शहराची दुधाची गरज भागवणारं. मांडगे कुटुंबाच्या यशोगाथेमुळे गावातल्या प्रत्येक शेतकरी कुटुंबानं म्हैसपालन सुरू केलं आहे. मांडगे कुटुंबाचं खर्च वजा जाता दिवसाचं उत्पन्न आज आहे १५ ते १८ हजार. ३० वर्षांपूर्वी मात्र परिस्थितीे वेगळी होती. कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ किशनराव आता 90 वर्षांचे आहेत. एकेकाळी केवळ तीस रुपये महिन्यावर एकाच मालकाकडे तीस वर्ष सालगडी म्हणून त्यांनी काम केलं. पाच मुलं, तीन एकर शेती आणि तीन म्हशी. तुटपुंजे उत्पन्न, नापिकी याला कंटाळून किशनरावांच्या मुलानं आत्महत्या केली. 

अरिष्ट कोसळलेल्या मांडगे कुटुंबानं विचारविनिमय केला. म्हशीच्या दुधाची विक्री सुरू करून शेतीपूरक व्यवसायच मुख्य व्यवसाय बनवला. बघताबघता जम बसला. आज त्यांच्याकडे आहे शंभर एकर जमीन. मुऱ्हा आणि जाफराबादी जातीच्या शंभर म्हशी.
म्हशीसाठी वीस बाय शंभर फुटाचे तीन टीनशेड केले आहेत. या शेडमध्ये कॉक्रीट बेड, हवेसाठी पंखे, म्युझीक सिस्टिम, शॉवर्स, फॉगर्स बसवले आहेत. चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी सिमेंटच्या गव्हाणी बांधल्या आहेत. टीनशेडमधील म्हशींचं मलमूत्र एका हौदात सोडण्यात येते. यासाठी २५ बाय १०० रूंदीचा हौद बांधण्यात आला आहे. दुपारी बारा ते पाच या काळात म्हशी मनसोक्त या हौदात डुंबतात. बाहेर पडताना धुवून स्वच्छ करण्यासाठी फवारे लावले आहेत. याच हौदातील पाणी चाऱ्यासाठी वापरलं जातं. दररोज निघणारे दोन ट्रॅक्टर शेण, खत म्हणून वापरलं जातं. यामुळे जमीन सुपीक व कसदार बनली आहे. गेल्या अनेक वर्षात या शेतात रासायनिक खतं, कीटकनाशक फवारणीची गरज पडली नाही. शंभर टक्के सेंद्रिय शेती करण्यात येते. म्हशींना दररोज तीन पोतं सरकी, तीन पोती ढेप, यासह हरभरा, मका, लाल ज्वारीचं पीठ, हिरवा चारा, कडबा कुट्टी असं सुमारे दोन ट्रक खाद्य दिलं जातं.
शेतीपैकी पन्नास एकर जमीन हिरव्या चाऱ्यासाठी राखून ठेवली आहे. शेतात लसूण घास, बरसीम, गजराज गवत, ऊस लावण्यात येतो. सोबत टाळकी, मका, ज्वारीही घेतली जाते.
दररोजचं 500-600 लिटर दूध हिंगोली शहरात 60 ते 70 रुपये लिटर दरानं विकलं जातं. यासाठी एक पिकअप व्हॅन, पाच मोटरसायकली आणि सायकली वापरल्या जातात. गेल्या अनेक वर्षांपासून मांडगेंचे ग्राहक कायम आहेत.
घरातले पाच जण आणि तीन सालगडी यासाठी काम करतात. सध्या रामेश्वर मांडगे कुटुंबप्रमुख म्हणून सर्व काम पाहतात. ३४ जणांच्या या कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीनं आता श्रीखंड, खवा, आइस्क्रीम असे दूधप्रक्रिया उद्योग सुरू केले आहेत. 
-गजानन थळपते.

... आणि मलाही माझा मार्ग सापडला

नुकताच नवी उमेद पेजचा दुसरा वर्धापनदिन साजरा झाला. पेजची संपादक- समन्वयक या भूमिकेतून मी उमेदला काय दिलं यापेक्षा उमेदनी मला काय दिलं, किती समृद्ध केलं, तेच मला अधिक जाणवतं.
फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा वापर मी आधी फक्त जुने मित्रमैत्रिणी जमवणं, एकमेकांचे फोटो बघणं, लाईक करणं इतका मर्यादितच करायचे, हे तर मी मागे लिहिलंच होतं. पण या दोन वर्षात सोशल मीडियाचा सकारात्मक उपयोग कसा करता येऊ शकतो, याचा एक चांगला अभ्यासच झाला, असं म्हणता येईल. कुठल्याही गोष्टीकडे आपण कसं, कुठल्या नजरेनं बघतो, त्यावर त्या गोष्टीचा उपयोग ठरणार असतो. काहीजण कशाची जाहिरात करायला, काहीजण केवळ असंतोष पसरवायला हे माध्यम वापरतात. आपल्याला त्यातलं नक्की काय हवं ते निवडलं की आपण सुखी, आनंदी होतो.
माझंही तेच झालं. आधी टाईमपास म्हणून फेसबुक बघणारी मी नवी उमेद पेज हँडल करायला लागल्यावर आपोआपच त्यातही चांगल्या गो्ष्टी, उपक्रम, पेजेस शोधायला लागले. अशी कित्येक वेगळं काही करणारी माणसं, निसर्गासाठी काही करणारी, एखाद्या विषयाला वाहून घेतलेली माणसं, असे ग्रुप मला इथं सापडत गेले आणि मलाही एक वेगळा मार्ग सापडला.
हे झालं माझं वैयक्तिक. पण उमेदचं काम करताना इतरही काही बदल झाले. उमेदच्या पोस्टींचं एडिटिंग करता करता मला थोडक्यात, नेमकं लिहायची सवय झाली. आता एडिटिंग अधिक चांगलं करायचा प्रयत्न करते.
आमचा कामाचा मुख्य विषय आहे, बालहक्क. आत्तापर्यंत या विषयाशी मी कधीच जोडली गेले नव्हते. तो आता कळतोय. युनिसेफ मुलांविषयक दरवर्षी एक अहवाल प्रसिद्ध करतं. ते वाचून या विषयातही किती उपविषय आणि किती काळजी करायला लावणाऱ्या गोष्टी आहेत ते कळालं. आता मुलांचे प्रश्न, अडचणी काय असू शकतात याविषयी थोडी जागरूकता माझ्याही मनात निर्माण होऊ लागली आहे.
नवी उमेदच्या यशात, वाचकप्रियतेत खरा वाटा आहे तो जिल्हा प्रतिनिधींचा. नवी उमेदचा विशेष आहे - जनसामान्यांमधून वेगळं काम करणाऱ्या, समस्या सोडवणार्‍या, बदल घडवून आणणार्‍या व्यक्तींना शोधायचं, त्यांना पुढं आणायचं. हे नीट समजून घेतलं आमच्या प्रतिनिधींनी. त्यानुसार सगळ्यांनीच साथ दिली. म्हणूनच, इतक्या विविध स्टोरीज पेजवर प्रसिद्ध होऊ शकल्या. त्यासाठी जिल्हा प्रतिनिधींचे मनापासून आभार.
राज्यभरात मिळून आज जवळपास 25-26 प्रतिनिधी उमेदसाठी काम करत आहेत. आता इच्छा आहे की, केवळ जिल्ह्यापुरतं मर्यादित न राहता प्रत्येक तालुक्यात नवी उमेदचा प्रतिनिधी असावा. आणि तालुक्यातून, गावांतून तिथली माहिती, स्टोरी उमेदवर प्रसिद्ध व्हावी. अधिकाधिक वाचकांपर्यंत ती पोचावी.
- वर्षा जोशी - आठवले.