Showing posts with label Latur. Show all posts
Showing posts with label Latur. Show all posts

Sunday, 3 June 2018

कसरतीचे खेळ ते पाटीपुस्तक!!

अनसरवाडा, ता. निलंगा, जिल्हा लातूर इथं डोंबारी कसरती करणारा 'गोपाळ खेळकरी' समाज राहतो. या नावाचा एखादा समाज अस्तित्त्वात आहे, हेच मुळी जगाला माहिती नव्हते. या समाजाची गॅझेटमध्ये नोंद घ्यायला लावली, त्यांना आधार कार्ड, मतदान कार्ड मिळवून दिलं ते इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या नरसिंग झरे गुरुजींनी. गेल्या 22 वर्षांपासून ते अनसरवाडा वस्तीच्या सुधारासाठी शाळेच्या माध्यमातून झटत आहेत.
कसरतीचे खेळ करून, भीक मागून अन्न किंवा पैसे मिळविणे हा या समाजाचा मुख्य व्यवसाय. लोकांना दररोज आंघोळ करणे, जेवण बनविणे या साध्या गोष्टीही माहिती नव्हत्या. प्रचंड अंधश्रद्धा, एकेका बाईला 20-20 मुलं, रोगराई असं तिथलं वातावरण. सरांनी इथं संस्कारवर्ग सुरू केले. त्यात आधी मुलांना खेळ, गाणी, नाच मग हळूहळू अंक- अक्षर ओळख अशा गोष्टी सुरु झाल्या.
अर्थातच हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. मुळात शाळा म्हणजे काय, हेच या लोकांना माहीत नव्हतं. लहान मुलांना भीक मागायला नेलं की जास्त पैसे मिळतात, मग त्यांना शाळेत कशाला बसवायचं, असा प्रश्न त्यांना पडायचा. सरांनी अनेकदा शाळेत मुलांना आंघोळी घातल्या आहेत, स्वत:च्या पैशाने मुलांचे केस कापून त्यांना नवीन कपडेही घेऊन दिले आहेत. पण त्या समाजाला वाटायचं की मुलांना ते बिघडवतायत, बंडखोरी करायला शिकवत आहेत. वेळोवेळी भांडणं आणि प्रसंगी त्यांना मारण्याचही प्रयत्न झाला.
सर मात्र या कशालाच घाबरले नाहीत. त्यांनी काम चालूच ठेवलं. या वस्तीतली मुलं रोज भिकेचं शिळं अन्न खायची. आता मात्र त्यांना शाळेत शिजवलेला ताजा पोषण आहार दिला जातो. शिवाय संध्याकाळीही त्यांना खायला मिळावं म्हणून लातूरच्या काही शाळांमधून त्यांनी मूठ- मूठ धान्य गोळा करुन या लेकरांची पोटं भरली आहेत. या उपक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळाला.
सर मुलांसोबत समाजाच्या भल्यासाठीही धडपडत होते. वस्तीतील पुरुष कसरतीचे खेळ करताना ढोल- सनई उत्तमप्रकारे वाजवितात. त्यांना जर बँडचे चांगलं प्रशिक्षण मिळालं तर हा त्यांचा व्यवसाय होऊ शकतो व भिकेची सवयही सुटेल हे सरांना उमगलं. त्यांनी वस्तीतील निवडक तरुणांना हैदराबादला पाठविलं आणि वादनाचं प्रशिक्षण दिलं. आज हाच या समाजाचा मुख्य व्यवसाय झाला आहे.
शाळेच्या इमारतीचा प्रश्न मात्र कायमच होता. शाळा एका पत्र्याच्या शेडमध्ये भरत होती. लातूरच्या भयंकर उन्हाळ्यात विद्यार्थ्यांचे हाल होत होते. झरे सरांच्या प्रयत्नांमुळे या शाळेला जि.प. शाळेची मान्यता मिळाली. मात्र शाळेकडे स्वत:ची जागा नव्हती.
झरे सरांचे काम बघून गोपाळ खेळकरी समाजाने 37 हजार रुपयांची देणगी दिली. शिवाय सरांनी लातूरमधल्या दानशूर लोकांना आवाहन करून 50 हजार रुपये जमा केले. मग गावात शाळेसाठी 87 हजारांची जागा विकत घेतली. शेवटी शासनाने दिलेल्या इमारत निधीतून 2008 साली आजची शाळा उभी राहिली आहे.
आज जिल्हा परिषद शाळा झाल्यानंतर या वस्तीतील प्रत्येक कुंटुंबातले मूल शाळेत येते. लोकांना शिक्षणाचे महत्त्व समजू लागलं आहे. इथून शिकून गेलेले विद्यार्थी लिहू- वाचू शकतात, बँड पथकात सामील झालेले स्वत:च्या बिदागीचा हिशोब करू शकतात, त्यांना पावती करता येते, त्यांना कोणी फसवू शकत नाही, हे लोकांना उमजलेलं आहे.

- स्नेहल बनसोडे- शेलुडकर

Saturday, 19 May 2018

समाजशास्त्राला रंजक बनविताना

लातूर शहराला लागून असलेली वरवंटी जिल्हा परिषद शाळा. शाळेचा स्टाफ महिलाकेंद्री- ७ शिक्षिका आणि एक मुख्याध्यापक. या शाळेत इयत्ता आणि तुकड्यांचे वेगवेगळे वर्ग नाहीत, हेच इथलं वेगळेपण. त्याऐवजी आहेत समाजशास्त्र, गणित, भाषा अशी दालनं. या शाळेत मुलं दिवसभर एकाच वर्गात बसून राहत नाहीत. त्याऐवजी ज्या विषयाचा तास असेल त्या दालनात दाखल होतात आणि ज्ञानरचनावादी पद्धतीने अभ्यास करतात.
वरवंटी शाळेतील ही विषयदालने पाहण्यासारखी आहेत. समाजशास्त्र हा विषय शिकविणाऱ्या सविता धर्माधिकारी यांनी समाजशास्त्र दालनात अनेक अभिनव प्रयोग केले आहेत. त्यात मानवी उत्क्रांतीच्या अवस्थेनुसार निअँडरथल, होमो इरेक्टस, होमो सेपियन अशा अवस्थेची चित्रं काढलेली आहेत. त्या चित्रांवर त्या मानवांची वैशिष्ट्ये दाखविलेली आहेत. ती चित्रं विद्यार्थी गळ्यात अडकवितात आणि मग उत्क्रांतीच्या अवस्थेनुसार क्रमानं उभं राहण्याचा खेळ खेळतात किंवा चित्रावरून उत्क्रांतीची अवस्था ओळखून त्याच्या वैशिष्ट्यांची चर्चा करतात.जबाबदार नागरिकांची पायाभरणी करणाऱ्या ‘नागरिकशास्त्र’ या विषयाकडे तसं दुर्लक्षच केलं जातं. पण धर्माधिकारी यांनी हा विषय प्रात्यक्षिके, अभिरुप संविधान समिती आणि निवडणुकीद्वारे एकदम रंजक करुन टाकला आहे. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना आपलं संविधान कसं तयार झालं, याबाबतचा अभ्यास आहे. ते फक्त पुस्तकातून शिकवण्यापेक्षा धर्माधिकारी मॅडमनी 'अभिरुप संविधान समिती' तयार केली होती. त्यात एक विद्यार्थी संविधान समिती अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर झाला, तर कुणी राजकुमारी अमृत कौर, कुणी सरदार वल्लभभाई पटेल बनले. या विद्यार्थ्यांनी देशाच्या संविधानावर चर्चाही केली. प्रत्येक विद्यार्थ्याला पदवीपर्यंत मोफत शिक्षण मिळावे, प्रत्येक गावात अत्याधुनिक सोयींचा दवाखाना आणि कुशल डॉक्टर्स असावेत अशा शिफारशीही त्यांनी केल्या.

या चर्चेच्या अनुषंगाने धर्माधिकारी यांनी देशाचे संविधान आणि कायदा हा नागरिकांच्या भल्यासाठी आणि देशाच्या सुव्यवस्थेसाठी कसा आवश्यक आहे, ते समजावून सांगितले. गंमत म्हणजे यानंतर वरवंटी शाळेतील विद्यार्थ्यांनी 2016 साली त्यांच्या वर्गाचं संविधानही तयार केलं होतं. त्यासाठी संविधान समिती नेमण्यात आली, त्याच्या बैठका झाल्या आणि वर्गासाठीचे कायदे त्याद्वारे तयार झाले. त्यासाठी लिखित रूपात वर्गाच्या संविधानाचे प्रास्ताविकही विद्यार्थ्यांनी तयार केलं. महत्त्वाचे म्हणजे संविधान समितीत आवर्जून सर्व जाती- धर्मांच्या आणि बोलीभाषा बोलणाऱ्या सदस्यांचा समावेश केला गेला.
वरवंटी शाळेतील विद्यार्थ्यांच्या उत्सुकतेची आणखी एक गोष्ट म्हणजे- शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक. आता तुम्ही म्हणाल, विद्यार्थ्यांचे मंत्रिमंडळ तर अनेक शाळांमध्ये असते. पण वरवंटी शाळेत ही निवडणूक प्रक्रिया अगदी खऱ्याखुऱ्या निवडणुकीसारखीच पार पडते. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन त्याचं वेळापत्रक नोटीस बोर्डवर लागलं जातं. त्यानंतर उमेदवारांनी फॉर्म भरणे, निवडणुकीच्या प्रचारसभा, मतदानाचे चिन्ह, प्रत्यक्ष अंगठ्याचा शिक्का मारून मतदान, त्यानंतर मतमोजणी आणि मग मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ जाहीर करणे असा भरगच्च कार्यक्रम असतो. यात निवडून आलेले मंत्रिमंडळ वर्षभरासाठी शाळेची जबाबदारी घेते. प्रत्यक्ष इव्हीएम शाळेत आणणे शक्य नसल्याने ते कसे चालते याचा व्हिडिओ आणि फोटो धर्माधिकारी मॅडम यांनी मुलांना दाखविले.
समाजशास्त्राशिवाय इंग्रजी आणि गणिताचे अभिनव उपक्रम वरवंटी शाळेत घेतले जातात, 

- स्नेहल बनसोडे- शेलुडकर

Saturday, 7 April 2018

लोकल- ग्लोबलचा ताळमेळ साधणारी सुमठाणा शाळा

“वाढीच्या वयातल्या मुलांना एका जागी बसणं नकोसं होतं. त्यांच्या हाताला सतत काहीतरी काम हवं असतं. त्यामुळे पारंपारिक शिक्षणपद्धतीपेक्षा त्यांना हालचालींना वाव देणारी ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धत विद्यार्थ्यांना अर्थातच जास्त आवडते. पण त्यासोबत आमच्या शाळेत मी ओरिगामीसारख्या कागदी घड्यांनी आकृत्या बनविण्याची चिनी ‘टॅग्राम’ कार्यानुभव पद्धती वापरतो. शिवाय चुंबकीय मणी एकमेकांना जोडून वेगवेगळे आकार तयार करण्याची ‘ब्रेनी क्यूब’ ची साधनंही आवर्जून वापरतो. हे सगळं करण्यात विद्यार्थी अगदी दिवसभर रमून जातात आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला पर्यायाने मेंदूविकासालाही चालना मिळते”, संतोष लोहारे उत्साहात माहिती देत होते. लातूरच्या सुमठाणा जिल्हा परिषद शाळेत ते मुख्याध्यापक आहेत.
खरोखर, त्या दिवशी माझ्यासमोर तिथल्या विद्यार्थिनीने ब्रेनी क्यूबच्या चुंबकीय मण्यांच्या माळा आणि कानातली कर्णफुलं तयार करुन घातली. हे करताना तिला खूप मजा येत होती.
सुमठाणा शाळेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या शाळेत विद्यार्थ्यांची गणिताची भीती कमी करण्यासाठी त्यांना ‘अबॅकस’चे धडेही दिले जातात. अगदी अंध मुलांनाही सर्वोत्तम शिक्षण मिळावं म्हणून, लोहारे सरांनी ब्रेल लिपी शिकून घेतली आहे. इतकं नाही, तर त्यांच्या शाळेतील काही सामान्य मुलांनासुद्धा ब्रेल लिपी चांगल्या प्रकारे येते.


शाळेत दरवर्षी स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिनाला ग्रामपंचायतीसमोर भाषण स्पर्धा होतात. 2012 सालचा विषय होता, ‘दारुबंदी’. दारुचे तोटे, त्याचा आरोग्यावर आणि कुटुंबावर होणारा दुष्परिणाम अतिशय परिणामकारकपणे विद्यार्थ्यांनी मांडला. गावातील महिलांना यांतून प्रेरणा मिळाली. आणि त्यांनी डीवायएसपी कार्यालयावर मोर्चा नेला. त्यानंतर पोलिस पथकासोबत गावातील तीन तांड्यांवरचे हातभट्टी दारु कारखाने त्यांनी उद्धवस्त केले. महिलांमध्ये अचानक झालेल्या या जागृतीने डीवाएसपीसुद्धा चकित झाले होते. त्यावेळी महिलांनी सगळे श्रेय शाळेतील विद्यार्थिनींनी केलेल्या दारुबंदीवरच्या भाषणाला दिलं.
मुलांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी रुजाव्यात यासाठी शिक्षक आग्रही असतात. त्यातून उघड्यावर शौचाला जाऊ नये, जेवण्यापूर्वी आणि शौचानंतर हात साबणाने धुवावेत, नखं वेळेवर काढावीत या गोष्टी शिकवल्या जातात. शिक्षकांनी दिलेल्या शिकवणीमुळे विद्यार्थी आपल्या घरीही शौचालय हवं यासाठी कमालीचे आग्रही आहेत. 2015- 2016 साली लोहारे सरांच्या कल्पनेतून ‘पालकांना पत्र’ हा एक अनोखा उपक्रम घेतला गेला. त्यात विद्यार्थ्यांनी आपल्या आई- वडिलांना पोस्टकार्डवर पत्र लिहून घरी शौचालय बांधण्याची विनंती केली आणि खरोखरच्या टपालाने ही पत्रं पालकांना पाठवली गेली. त्यामुळेच आज गावातील 90% घरांमध्ये शौचालय बांधलं गेल्याचं लोहारे सर सांगतात. तसेच सुमठाणा ग्रामपंचायतीनेही, ‘ज्याच्या घरी शौचालय त्यालाच नळजोडणी’ असं अभियान राबवलं. आता सुमठाणा 100% स्वच्छतागृह असलेले गाव होण्याच्या मार्गावर आहे.

- स्नेहल बनसोडे-शेलुडकर

Saturday, 31 March 2018

वडिलांच्या श्राद्धाऐवजी शाळेला दिली देणगी

व्यक्तीच्या जन्माआधीपासून ते त्याच्या मृत्यूनंतरही सोहळे साजरे करण्याची आपली रीत. पण केवळ परंपरेच्या नावाखाली धार्मिक कृत्यांसाठी खर्च करण्याऐवजी त्याला विधायक आकारही देता येऊ शकतो. असेच एक आदर्श उदाहरण म्हणजे आपल्या दिवंगत वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ एका शिक्षकाने सुमारे दोन लाख रूपयांची कामं लातूरच्या जिल्हा परिषद शाळेसाठी करून दिली आहेत. आज ही मांजरी शाळा लातूरमधली सर्वांगसुंदर आयएसओ जि.प. शाळा म्हणून ओळखली जाते. या शिक्षकाचं नाव आहे रावसाहेब भामरे.



भामरे सर सध्या लातूरमधील मुरुडच्या डीआयईसीपीडीत तंत्रज्ञान विषय सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. पण काही वर्षांपूर्वी ते मांजरीच्या जिल्हा परिषद शाळेत अध्यापनाचं काम करीत होते. सर म्हणतात, “माझे दिवंगत वडील स्वर्गीय माणिकराव भामरे यांच्या निधनानंतर वर्षभराने वर्षश्राद्ध वगैरे धार्मिक कृत्यं करण्याऐवजी मी शाळेसाठी काही चांगलं काम करायचं ठरवलं. आमचे दिवंगत वडीलही देवभोळे नव्हते, रुढी-परंपरांसाठी पैसा खर्चण्याऐवजी एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा सामाजिक कार्याला देणगी देण्याला त्यांचं प्राधान्य असायचं. त्यामुळे पोलीस इन्स्पेक्टर असणाऱ्या आमच्या वडिलांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी मला हाच मार्ग योग्य वाटला.”




2015 च्या नोव्हेंबर महिन्यात मांजरी शाळेच्या कायापालटाचं काम सुरु झालं. यात भामरे सरांनी दिलेल्या 1 लाख 89 हजारातून शाळेची रंगरंगोटी, इमारत दुरुस्तीची काही कामे आणि गणितपेटीसारखे रचनावादी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यात आले. हे काम मार्च 2016 मध्ये संपलं. मात्र शाळेला परिपूर्ण करण्यासाठी इतरही अनेक कामं करणं गरजेचं होतं. त्यासाठीचा वाटा शाळेतील इतर सहकारी शिक्षकांनी आणि मांजरी ग्रामपंचायतीने उचलला. शाळेतील सात शिक्षकांनी सुमारे एक लाख रुपयांचा निधी उभारला तर मांजरी ग्रामपंचायतीने वित्त आयोगाच्या निधीतून एक लाख रुपयांची देणगी शाळेला जाहीर केली. शाळेच्या शिक्षकांची सुरु असलेली धडपड पाहून ग्रामपंचायतीने स्वेच्छेने ही देणगी दिली.


 


जमा झालेल्या सुमारे चार लाख रुपयांतून मांजरी जिल्हा परिषद शाळेचा कायापालटच घडला. या शाळेत ज्ञानरचनावादी तळफळे चांगल्या दर्जाच्या ऑईलपेंटने रंगवून घेतलेले आहेत, मुलांना बसायला दर्जेदार बेंचेस, डिजिटल वर्गखोली आणि उत्तम स्वच्छतागृहांचीही सोय केलेली आहे. शाळेला आयएसओ नामांकन मिळण्यासाठीचा खर्च तत्कालीन केंद्रप्रमुख गायकवाड आणि विस्ताराधिकारी अलमले सर यांनी उचलला. त्याविषयी भामरे सर सांगतात, “शाळेच्या गुणवत्तेसाठी शिक्षक झटत असताना अधिकाऱ्यांनीही आनंदाने आपल्या खिशाला कात्री लावल्याचं कदाचित हे पहिलंच उदाहरण असेल. अधिकारी पूर्ण ताकदीने पाठीशी उभे राहिल्यानेच काम करायला आणखी उत्साह आला.”
मांजरी शाळेचा कायापालट झाल्यानंतर भामरे सर आता तंत्रज्ञान विषय सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. ‘एज्युटेक लातूर’ नावाचे यू ट्यूब चॅनेल ते चालवतात. त्यात तंत्रज्ञानाचा अध्यापनात उपयोग कसा करुन घ्यावा, याचे छोटे-छोटे मार्गदर्शनपर व्हिडिओ आहेत. याशिवाय ‘स्टेप’ आणि ‘इ-कॅलेंडर’ ही दोन नवी अॅप त्यांनी 2017 साली लॉन्च केलेली आहेत. लातूरच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्या संकल्पनेतून ही अॅप्स विकसित करण्यात आली आहेत.
भामरे सरांनी विकसित केलेल्या या अॅप्सविषयी जाणून घेण्यासाठी क्लीक करा:https://bit.ly/2Chifw6

Monday, 19 March 2018

लातुरातील समानतेचे आगळे रक्षाबंधन



रक्षाबंधन म्हणजेच राखीपौर्णिमेचा सण आपल्याकडे पारंपरिक उत्साहात साजरा होता. यामध्ये बहीण- भावाला राखी बांधते, औक्षण करते, गोड- धोड मिठाई खाऊ घालते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी म्हणून काहीतरी भेट देतो, शिवाय आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचनही देतो. पण आजच्या बदलत्या काळानुसार फक्त पुरूषांनी बायकांचे संरक्षण करावे, अशी परिस्थिती आता राहिली नाही. देशाच्या संरक्षणमंत्रीपदी एक स्त्री असताना, स्त्रिया कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. उलट बऱ्याचदा अचानक आलेल्या संकटाला अगदी सामान्य स्त्रीसुद्धा जास्त धीराने तोंड देते, हे आपण पाहतो. मग त्याही पुरूषांचे संरक्षण करू शकतातच की!“अगदी हाच विचार डोक्यात ठेवून गेल्या काही वर्षांपासून आम्ही लातूर तालुक्यात ‘कन्या सुरक्षा कवच’ अंतर्गत एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाद्वारे आमच्या जिल्हा परिषद शाळेत एक वेगळी राखीपौर्णिमा साजरी होते. या रक्षाबंधनात मुली तर मुलांना राख्या बांधतातच पण मुलगेही मुलींना राख्या बांधतात. शिक्षक- शिक्षिका एकमेकांना राख्या बांधतात, मी जर एखाद्या शाळेला भेट दिली तर शिक्षक मलाही राख्या बांधतात, मी देखिल त्यांना राख्या बांधते. आपण सगळेजण एकमेकांना सांभाळूया, आनंदाने एकत्र राहूया आणि एकमेकांचे संरक्षण करूया असा संदेश आम्ही या राखीपौर्णिमेतून देतो.” लातूरच्या गटशिक्षणाधिकारी मा. तृप्ती अंधारे सांगत होत्या.2017 सालीही अंधारे मॅडम यांनी लातूर तालुक्यातील हरंगूळ आणि जेवळीच्या जिल्हा परिषद शाळांत ही अनोखी राखीपौर्णिमा साजरी केली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी शाळेतील मुला- मुलींनी एकमेकांना राख्या बांधल्या. काही विद्यार्थ्यांनी तर शिक्षक – शिक्षिकांनाही राख्या बांधल्या. शिक्षक- शिक्षिकांनी एकमेकांना राख्या बांधल्या. शिवाय शिक्षकांनी अंधारे मॅडम यांना आणि अंधारे मॅडम यांनी शिक्षकांनाही राख्या बांधल्या. आनंदाची बाब म्हणजे या कार्यक्रमात शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायतीचे सदस्य आणि इतर ग्रामस्थही सहभागी झाले होते. लातूर तालुक्यात सर्वत्रच या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले गेले. माटेफळच्या जिल्हापरिषद शाळेत तर मुख्याध्यापक पवार यांनी आधी सर्व सहकारी शिक्षिकांना राख्या बांधल्या.
 
 नेहमी भावाला राखी बांधणाऱ्या मुली आज आपल्या हातावरची राखी पाहून खुष झाल्या होत्या. समानतेचे आगळे रक्षाबंधन साजरे करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या अंधारे मॅडम म्हणाल्या “खरंतर राखीचा धागा फक्त निमित्त आहे. त्यानिमित्ताने आपणही कुणीतरी आहोत, आपल्याकडे ताकद आहे हा आत्मविश्वास मुलींमधे निर्माण होणे मला फार महत्त्वाचे वाटते. आपल्या संरक्षणासाठी आपण केवळ पुरूषांवर अवलंबून राहणे भ्याडपणाचे आहे, हे आम्ही मुलींना ‘कन्या सुरक्षा कवच’ उपक्रमातून शिकवतोच आहोत. त्यासाठी कराटे, तायक्वांदोसारख्या आत्मसंरक्षणाच्या कलाही त्यांना शिकवितो आहोत. आपण आपले संरक्षण करण्याइतके मजबूत झालेच पाहिजे, हे वारंवार मुलींच्या मनावर बिंबविण्यासाठी हे रक्षाबंधनाचे निमित्त!”
- स्नेहल बनसोडे-शेलुडकर

Monday, 24 April 2017

कपड्याकडून सॅनिटरी नॅपकीनकडे

‘नवी उमेद’ने गेल्या आठवड्यात #तिचेपाचदिवसतिलापरतमिळवूनदेऊया या पोस्टची कँपेन केली, तेव्हा अनसरवाडा (जिल्हा लातूर. निलंगा तालुका) गावालगतच्या गोपाळ खेळकर या भटक्या समाजाच्या वस्तीतल्या स्त्रियांना अंतर्वस्त्र का वापरायची हे छाया काकडे समजावून सांगत होत्या. 
मासिक पाळीच्या काळातलं मुलींचं, स्त्रियांचं आरोग्य हा खूप महत्त्वाचा विषय असला, तरी त्याबद्दल उघड बोलणं शहरी समाजातही अवघड असतं. मग तिथे काय वातावरण असेल...? जेमतेम ६०० लोकवस्ती. त्यात २७५ महिला. तारेवर चालणं आणि रिंगखेळ हा त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय. वस्तीशाळेतला तरूण शिक्षक नरसिंग झरे याने इथं महिलांसाठी काम सुरू केलेलं. गेल्या सहा महिन्यांपासून छाया काकडे यांनीही आरोग्यविषयक माहिती देण्यासाठी या वस्तीत जायला सुरुवात केली. छायाताईंचं पारधेवाडीत सॅनिटरी नॅपकिन तयार करायचं एक युनिट. त्याविषयी ‘नवी उमेद’मध्ये आम्ही मागे लिहिलंच होतं. विचारधारा ग्रामीण विकास या त्यांच्या संस्थेमार्फत छायाताई अनेक कामं करत असतात.
गोपाळ वस्तीतल्या महिलांशी बोलताना जाणवलं की, आरोग्यविषयक जागरुकता नाही. केसाला ना तेल, ना साबण, ना रोजची आंघोळ. छायाताई सांगतात, "पहिल्यांदा संध्याकाळी वस्तीत गेले. अर्ध्याच तास थांबले. पण जमलेल्या महिलांपैकी दहा जणी दारूच्या नशेत. मग काय बोलणं होणार? मग तेव्हा ठरवलं की, इथं दिवसाच यायचं."
नंतर घराघरात जाऊन महिलांशी चर्चा सुरू केली. आरोग्यशिबिरं घेऊन मासिक पाळी म्हणजे काय, या काळात स्वच्छता कशी राखायची हे सांगणं सुरु झालं. छायाताई म्हणतात, "आमचा उद्देश होता, की महिलांना सॅनिटरी नॅपकिन वापराच्या प्रवाहात आणायचं." पाळीच्या काळातल्या विविध समजुती इथंही होत्याच. एकतर पालं छोटी, कपडे वाळवायलाही जागा नाही. त्यातून ती लोकांच्या नजरेस पडू नये म्हणून दुसऱ्या कुठल्यातरी कपड्याखाली ठेवलेली. कित्येकदा तर पाळी संपली की ती कापडं कुठेतरी वळचणीला, दगडाखाली ठेवली जातात. नंतर पुढच्या पाळीला ती तशीच मळलेली, धुळीची वापरायची. यातून जंतूसंसर्ग होणार, नाही तर काय? काहींना तर महिन्यातले १०-१२ दिवस रक्तस्त्राव सुरूच. त्यातून कापड वापरल्याने मांड्यांवर पुरळ, जखमा ठरलेल्या.
छायाताईंनी हळूहळू सर्वांना सॅनिटरी नॅपकिन दाखवायला सुरुवात केली. नॅपकिन कसा वापरायचा हे समजावताना पॅड निकरमध्ये लावायचं हे सांगितल्यावर कळलं की या महिला अंतर्वस्त्रचं वापरत नाहीत. आता अंतर्वस्त्र का वापरायची इथूनच सुरुवात करावी लागणार होती. सॅनिटरी नॅपकिन तर मोफत देणार होतोच. अंतर्वस्त्रासाठीही पैसे उभे करावे लागणार होते. छायाताई सोशल मिडियाचा उपयोग करत विविध क्षेत्रातल्या व्यक्तींना स्वतःच्या कामाची माहिती देत असतात. त्याचं फळ कधीतरी मिळतंच. या वेळी मदत मिळाली ती - महिलाआरोग्याबात जिव्हाळा असणार्‍या प्रसिद्ध गायिका उत्तरा केळकर यांची.
तरीही प्रश्न होता भाषेचा. या समाजाची भाषा गुजराती. वस्तीतल्या सखुबाईला चांगलं मराठी येतं. तिनं मदत केली. छायाताई सखूबाईला आणि सखूबाई बायांना सांगू लागली. बायांशी असा संवाद सुरू झाला. समजूत पटून काही जणी पॅड वापरू लागल्या आणि अनुभवही मैत्रिणींना सांगू लागल्या. एकजण म्हणाली, "कपड्यामुळे शेतात काम करताना त्रास व्हायचा, मांडीच्या बाजूला दुखायचं. आता न्यापकीनमुळे आम्हांला गादी मिळाली आहे’.
- वर्षा आठवले.

Wednesday, 1 February 2017

मेक इन पारधेवाडी

दुर्गम भागात मेडिकल दुकान असेल-नसेल. पण सॅनिटरी नॅपकिन मिळायला हवा, या निग्रहाने छाया काम करते आहे. ‘नवी उमेद’वर सॅनिटरी नॅपकिन्सविषयीच्या पोस्ट्स वाचून छाया काकडेने आमच्याशी संपर्क केला.
पारधेवाडीच्या (ता.औसा, जि.लातूर) मुली-महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स आणण्यासाठी प्रवास आणि वीस-तीस रुपये खर्च करून औशात किंवा लातुरला जावे लागायचे. आज छायाच्या प्रयत्नांमुळे अवघ्या ३० रुपयांत सहा नॅपकिन्सचे पाकिट पारधेवाडीतच मिळते. औसा तालुक्यातील २० टक्के महिला गर्भाशयविकारग्रस्त, बहुतांश विशी-तिशीच्या, मासिक पाळीतील अस्वच्छता, उघड्यावर शौचास जाणे हीच याची कारणे – स्वतःच केलेल्या अभ्यासातले हे निष्कर्ष छायाच्या कामाची प्रेरणा ठरले.
१९९३ साली, किल्लारी भूकंपानंतर १८ वर्षांची छाया समाजकार्यात गुंतली. बाबा आमटेंच्या शिबिरात भाग घेतला. ‘मानवलोक’ची कार्यकर्ती बनली. ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’च्या आरोग्यकार्यशाळेसाठी थेट अमेरिकेला गेली. तिथून नॅपकिन्सनिर्मितीची शास्त्रशुद्ध माहितीही मिळवली.
मासिक पाळीबद्दलची गुप्तता, ग्रामीण भागात मुलींची शाळा थांबण्याचे ते एक कारण, पॉलिएस्टर कापडवापरामुळे नाजुक ठिकाणी इजा होणे, वापरलेले कापड धुण्या-वाळवण्याची, अस्वच्छ पद्धत, पाणीटंचाईमुळे वाढणारी अस्वच्छता, यामुळे होणारा जंतुसंसर्ग....ही साखळी छायाला तोडायची होती. इंजिनियर नवर्‍याची साथ, मानवलोक, सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. देवेंद्रनाथ मिश्रा यांचे सहकार्य मिळाले. छायाने पारधेवाडीत ना नफा-ना तोटा तत्त्वावर ‘रिफ्रेश सॅनिटरी नॅपकीन शुअर स्टार्ट प्रकल्प’ सुरू केला.
रिफ्रेश नॅपकिन्सचा रास्त दरही ज्या मुली-महिलांना परवडत नाही, त्यांना नॅपकिन्स मोफत देण्याची छायाची योजना आहे. देणगीदारांमुळे सध्या ८०० गरीब मुलींना नॅपकीन्स मोफत वाटले जातात. ही संख्या महिन्यागणिक वाढत आहे.
यामागचे अर्थकारण काय? पारधेवाडीच्या युनिटमध्ये २५ लाख भांडवल गुंतवले आहे. ११० रु रोजंदारीवर ३० महिला काम करतात. रोज १ हजार नॅपकिन्स बनतात. एका पाकिटाच्या ३० रु विक्रीमागे २ रुपये सुटतात. पण अमेरिका आणि दुबई इथल्या मैत्रिणी आणि ‘वूमन’सारख्या अमेरिकन संस्था तेच पाकिट ६० ते ७० रु ना विकत घेतात. दरमहा ५ हजार पाकिटे अमेरिकेला पाठवली जातात. त्या नफ्यातून इथे विक्रीकिंमत कमी ठेवता येते. प्रकल्पात २५० महिला मासिक १२०० रु मानधनावर आपापल्या गावात नॅपकिनवापराचा, स्वच्छतेचा प्रसार करतात. महिलांच्या पाळीची संभाव्य तारीख माहीत करून घेऊन चार दिवस आधी तिच्या घरापर्यंत पाकिट पोचवतात. औसा तालुक्यातील ६० गावांमध्ये नॅपकिन वाटपासोबतच मासिक पाळी व संबंधित विषयांची माहिती देतात. महाराष्ट्रातल्या अशा प्रकारच्या या पहिल्याच प्रकल्पाने जाणत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
महाविद्यालयांत सॅनिटरी नॅपकिन्स वेंडिंग आणि डिस्पोजल मशीन्स हवीत या शासन निर्णयाच्या पूर्ततेसाठीही छाया प्रयत्न करते. ही मशीन्स दिल्लीहून मागवून घेते. मशीन्स महाराष्ट्रात मिळाली तर खूपच खर्च वाचेल, असं तिचं म्हणणं.
२०१५ साली प्रकल्पाची जुळवाजुळव करताना लोकांनी अज्ञातून कामाची टवाळी केली. त्याला न जुमानता छायाने मुली-महिलांमध्ये जागृती केली. सॅनिटरी नॅपकीन तयार करण्याबरोबरच नॅपकीनवापराबद्दलची जागृती करून छाया काकडेने एका मोठ्या कामाचा आरंभ केला आहे.

- शिवाजी कांबळे, लातूर

Tuesday, 24 January 2017

ट्री बँकेला देऊ साथ, करू दुष्काळावर मात



यंदाचा पावसाळा सुरू होऊन महिना उलटून गेला तरी लातूर जिल्ह्यात अजूनही समाधानकारक असा मोठा पाऊस झालेला नाही. टँकरने पाणीपुरवठा अजूनही सुरूच आहे. ना धरणांना, ना विहीरींना, ना बोअर्सना पाणी आले. जलराणीचा प्रवासही सुरूच आहे. उन्हाळ्यातील परिस्थिती जुलैमध्येही ‘जैसे थे’ च आहे.
एक गोष्ट मात्र नक्की घडली. यंदाच्या दुष्काळामुळे सगळ्यांचे डोळे उघडले असावेत, दुष्काळावर मात करण्यासाठी लोक सहभागातून जलसंधारण, जलपुनर्भरणसारख्या मोहिमा सुरू झाल्या. पाण्याचे महत्त्व सगळ्यांच्याच लक्षात आल्यामुळे प्रत्येक नागरिक या मोहिमांमध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवू लागला आहे. आता या मोहिमांना लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. 

जमिनीत पाणी मुरविणे आणि पाऊस पडण्यासाठी वृक्षांची लागवड अत्यावश्यक आहे. वृक्षलागवडीचे महत्त्व कळाल्याने शासनाच्या दोन कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमाबरोबरच विविध संस्था, संघटना आणि व्यक्ती अशा सर्वांनीच वृक्षलागवडीचा ध्यास घेतलेला दिसून येत आहे. 
पर्यावरणात होत असलेले बदल, त्याचा शेती व्यवसायावर होत असलेला विपरित परिणाम, शिवाय पाणीटंचाईच्या दाहकतेवर या वृक्ष लागवडीमुळे मात करता येऊ शकेल. ही बाब लक्षात घेऊन लातूर शहरातील ५० हून अधिक विविध सामाजिक संस्था, संघटनांनी एकत्र येऊन ‘लातूर वृक्ष’ हा व्यापक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. लातूर हिरवेगार करण्यासाठी या शहरातील टाऊन हॉल मैदानावर ‘ट्री बँक’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमासाठी माजी मंत्री आ. दिलीपराव देशमुख, माजी राज्यमंत्री आ. अमित विलासराव देशमुख यांनी पुढाकार घेतलेला आहे. या उपक्रमाची रीतसर सुरूवात ५ जूनला करण्यात आली. आता मोहीम व्यापक झाली आहे.
लातूर शहर आणि जिल्ह्यातील वनराई वाढविण्यासाठी तब्बल १० वर्षांचा कृती कार्यक्रम आखून प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली आहे. केवळ वृक्ष लागवड नाही, तर लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन करणे हा मुख्य हेतू आहे. ‘ट्री बँक’ मधून शहरातील शाळा, संस्था, संघटना शिवाय नागरिकांना रोपांचे वाटप करण्यात येत आहे. रोप वाटीकांचे प्रदर्शन, शालेय विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप, रस्त्यांच्या बाजूला खड्डे खोदून वृक्ष लागवड करून त्याच्या संगोपनाची जबाबदारी घेणे. असे काम उत्साहात सुरु आहे.
शाळांबरोबरच महाविद्यालयीन युवक-युवतींचाही सहभाग उल्लेखनीय आहे. हा वृक्ष लागवडीचा उपक्रम आता लोकचळवळ बनला आहे. आगामी काळात लातूर हिरवेगार होऊन मुबलक पाऊस पडेल. अशी आशा सगळ्यांनाच आहे. हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी ‘लातूर वृक्ष’च्या सुपर्ण जगताप, अर्जुन कामदार, सत्यजित देशमुख, सिकंदर पटेल, कृष्णकुमार बांगड, ईश्वर बाहेती, व्यंकट गर्जे, मनोज सूर्यवंशी, रितेश चापशी, सतीश नरहरे, संगमेश्वर बोमणे, शिरीष पोफळे, डॉ. पवन लड्डा, श्रीकांत हिरेमठ, प्रा. ओमप्रकाश झुरुळे, महेश बिडवे, अमृत सोनवणे, गुरुनाथ मग्गे, श्रीकांत कर्वा, सोनू डगवाले, डॉ भास्कर बोरगावकर, रमेश शिंदे, हेमंत रामढवे, आदित्य चव्हाण, राम चलवाड, मुकेश रादंड, नयन राजमाने, स्मिता आयाचित, कांता बांगड, श्रीमती कुलकर्णी आदी शिलेदार प्रयत्नशील आहेत.
- शिवाजी कांबळे

Thursday, 19 January 2017

त्यांनाही मिळाली शिक्षणाची संधी



खोपेगाव ता. लातूर इथली ही गोष्ट. बाळू, प्रभावती व बबन मारोती रणसूळे ही तीन भावंडे वडिलांविना पोरकी. चार घरची धुणीभांडी करून आईचं त्यांचे पालन पोषण करते. प्रभावती आईसोबत कामाला जात होती. तर बाळू व बबन ही दोन मुले हॉटेलात काम करीत. या बाल मजुरांची माहिती मिळताच कला पंढरीचे बी.पी. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सविता कुलकर्णी, मधुकर गालफाडे, जयवंत गंगापल्ले, प्रतिमा कांबळे आदींनी सदर बालकामगारांच्या घरी जाऊन त्यांच्या आईस समजावून सांगितले. नंतर चाईल्ड वेलफेअर समितीच्या (सीडब्ल्यूसी) माध्यमातून या मुलांना सरकारी वसतीगृहात दाखल केले.
कलापंढरीने बालमजुरीतून सोडवलेली ही मुले आज आवडीने शिक्षण घेत आहेत. कलापंढरी ही संस्था गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात बाल हक्क आणि जागृतीचे कार्य करीत आहे. ही संस्था राष्ट्रीय पातळीवरील चाईल्ड लाईनच्या माध्यमातून बाल मजुरी निर्मूलनाचेही प्रभावीपणे काम करीत आहे. वर्षभराच्या काळात १४ वर्षे वयोगटातील ८० बाल मजुरांची त्यांनी सुटका केली आहे. तसेच त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे पुनर्वसन केलेले आहे.




या शिवाय लातूरच्या राजीवनगरात राहणारा आई-वडिलाचे छत्र हरवलेला गौतम जाधव हा छोटा मुलगा आपल्या आजोबासोबत बिगारी कामास जात होता. या चिमुकल्याचीही मजुरीतून सुटका केली. त्याला संस्थेच्या कार्यकर्त्यांनी समाजकल्याण विभागाच्या निवासी वसतीगृहात प्रवेश दिला असून तो आता आठवीचे शिक्षण घेत आहे. त्याचबरोबर अहमदपूर तालुक्यातील शिवणखेड येथील सुमन रावसाहेब साळुंके व तिच्या भावाचीही अशीच कहाणी आहे. सुमन १४ वर्षाची तर तिचा भाऊ १२ वर्षाचा. आई-वडिल नाहीत आणि दुसरे जवळचे असे कोणीच नव्हते. कुणाचाही आधार नव्हता. सुमन इतरांच्या घरची धुणीभांडी करायची. चाईल्ड लाईनवरून या दोघांचीही संस्थेने दखल घेतली. सुमनची शाळा बंद झालीच होती, पण तिचा भाऊ सहावीच्या वर्गात शिकत होता. या भावंडांना चाईल्ड वेलफेअर समितीने वर्षभर रामचंद्र बालकाश्रमात ठेवले. त्यानंतर बाल कल्याण समितीसमोर सादर केले आणि त्यांचे पुनर्वसन करण्यात आले.
 शिवाजी कांबळे

Wednesday, 28 December 2016

दुष्काळग्रस्त मुलांची भागवली तहान-भूक




लातूर जिल्ह्यात दुष्काळात पाणीटंचाई आणि वाढत्या उन्हाने सर्वांचीच होरपळ होत आहे. या दुष्काळाने शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांचे तर बालपणच हरवले आहे. ग्रामीण भागात विशेषत: बंजारा तांड्यांवरील मुलांची तर अधिकच दयनीय अवस्था आहे.
तांड्यांवर शासनामार्फत चालविले जाणारे हंगामी
वसतीगृह बंद केल्यामुळे आणि दुष्काळात कुटुंबाला जगवायचे कसे, या चिंतेने माय-बापासह निम्मी कुटुंबे मजुरीसाठी मुंबई, पुण्यात गेल्याने या मुलांना सकस जेवणही मिळत नाही. अशा परिस्थितीत अंगभर कपडे नसलेल्या, बोडक्या डोक्याने कळशी, हंडा व घागरी घेऊन पाण्यासाठी उन्हातान्हात पळापळ
करताना ही मुले दिसतात. 

फोटोतील दृश्य आहे रेणापूर आणि चाकूर तालुक्यातील
बंजारा तांड्यांवरचे. लहान मुलांच्या प्रश्नावर देशपातळीवर काम करणारी मुंबई येथील क्राय संस्था आणि बालहक्क, महिला हक्कांसाठी काम करणाऱ्या
पानगाव येथील कलापंढरी या सामाजिक संस्थेची नजर पाण्यासाठी उन्हातान्हात भटकंती करणाऱ्या लहान मुलांवर पडली. तेव्हा त्यांना वाटले की, आपण या
मुलांसाठी, त्यांचे बालपण सावरण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे.
कलापंढरी संस्थेचे बी.पी. सूर्यवंशी व क्रायचे कुमार निलेंदू, निर्मल परमार यांनी रेणापूर आणि चाकूर तालुक्यातील प्रत्येकी पाच तांड्यांवरील
लहान मुलांसाठी मोफत शुद्ध पिण्याचे पाणी आणि दररोज एकवेळचे सकस जेवण (वरण,भात, भाजी आणि चपाती ) देण्याचा उपक्रम १३ मे पासून सुरू केला. तो
अखंडपणे सुरू आहे. या उपक्रमातून रेणापूर तालुक्यातील बिटरगाव तांडा, सेवानगर तांडा, दामोदर तांडा, खणी तांडा, गरसुळी तांडा अशा पाच
तांड्यांवरील एकूण २९० मुले आणि चाकूर तालुक्यातील सेवापूर तांडा, गणेशनगर तांडा, फतरूनाईक तांडा, शंकरनगर तांडा, बोकनगाव तांड्यांवरील
एकूण ४१८ बालकांना मोफत जेवण आणि मोफत शुद्ध पाण्याचे जार दररोज दिले जात आहेत.
ज्या तांड्यावर जेवण दिले जाते, तिथे पाच लोकांची कमिटी नेमून सर्व व्यवस्था पाहिली जाते. जेवण बनविण्यासाठी त्या त्या तांड्यावरीलच दोन
महिलांची नियुक्ती केली आहे.
या कामासाठी समन्वयिका सविता कुलकर्णी
त्यांचे सहकारी गौतम दुरेवाले, रामभाऊ उफाडे आणि क्राय संस्थेचे कार्यकर्ते योगदान देत आहेत. 
कलापंढरी संस्था गेल्या १५ वर्षांपासून क्रायसोबत काम करीत आहे. लातूर जिल्ह्यातील १० तालुक्यात ही संस्था बालहक्क, महिलांच्या प्रश्नांवर काम करीत आहे. त्याअंतर्गत बालगट, किशोरी गटाच्या माध्यमातून बाल संवाद, चर्चा, वस्तीशाळा, मुलांमध्ये जागृती, संरक्षणासह विविध विषयावर काम करीत आहे. या शिवाय पाणलोट
क्षेत्रासंबंधीचे प्रशिक्षण, तसेच बालहक्क अभियानाचे कामही ही संस्था करीत आहे. लोकांचे स्थलांतर थांबावे यासाठी, आपल्या गावीच रोजगार कसा
मिळवू शकतो, स्थलांतराचे धोके काय आहेत, याबद्दलही जाणीव जागृती केली जाते.
सामाजिक बांधिलकीतून आणि बंजारा तांड्यांवरील मुलांना दुष्काळाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठीचा प्रयत्न म्हणून या दोन सामाजिक संस्थांनी त्यांना मदतीचा हात दिला आहे. यातून या मुलांचे बालपण
जोपासण्यास मदत होत आहे.

शिवाजी कांबळे

Saturday, 24 December 2016

तृप्तीताई अंधारे ह्यांनी घेतलेले हे कौतुकास्पद निर्णय

 पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी तृप्तीताई अंधारे ह्यांनी घेतलेले हे कौतुकास्पद निर्णय
सरकारी शाळा, जिल्हा परिषद शाळा आणि महापालिकेच्या शाळांकडे लोकांचा
पाहण्याचा दृष्टिकोन फारसा चांगला नाही. अशा शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण
मिळत नाही असा समज सर्वश्रूत झालेला दिसून येतो. शिवाय सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेणे कमीपणाचे, दरिद्रीपणाचे समजले जाते. त्यातूनच खाजगी शाळांकडे पालक-विद्यार्थी ह्यांचा कल वाढलेला दिसून येतो. पण लातूर पंचायतसमितीच्या गटशिक्षणाधिकारी तृप्तीताई अंधारे यांनी हा जिल्हा परिषद शाळांबद्दलचा समज चुकीचा आणि खोटा असल्याचे सिद्ध करून दाखविले आहे.
शिक्षण क्षेत्रात सध्या जीवघेणी स्पर्धा सुरू झालेली आहे. खाजगी शिक्षण
संस्था, खाजगी शाळा मोठ मोठी जाहिरातबाजी करून, विविध प्रकारची अमिषे
दाखवून विद्यार्थ्यांना आपल्याच शाळेत प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहन
देतात. केवळ विद्यार्थ्यांच्या संख्याबळावर शाळेचे अस्तित्व टिकवून ठेवणे
 हाच एकमेव उद्देश बहुतांश खाजगी शाळांचा असतो. शिवाय कॉन्व्हेंट
संस्कृतीमुळे यात आणखीनच भर पडली आहे. शिक्षक विद्यार्थ्यांसाठी दारोदार
 फिरताना दिसतात. विद्यार्थ्यांच्या संख्येअभावी वर्गतुकड्यांची संख्या
कमी होऊ नये म्हणून त्या परिसरात विद्यार्थ्यांची पळवा पळवी मोठ्या
प्रमाणात सुरू झालेली आहे
अशा परिस्थितीत लातूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने एक अनोखा उपक्रम राबवून हायटेक शाळा आणि आनंददायी शिक्षण जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू केले. त्यासाठी गटशिक्षणाधिकारी तृप्तीताई अंधारे यांनी पुढाकार घेऊन या शाळांमध्ये विविध वैशिष्टयपूर्ण उपक्रम सुरू केले आहेत. एवढेच नाही तर या उपक्रमांची लातूर तालुक्यातील विविध ठिकाणी मोठ मोठे होर्डींग्ज लावून जाहिरातही केली जात आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवतापूर्ण शिक्षणमिळत असून विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश आजच निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अशा पद्धतीने शाळा प्रवेशाची जाहीरात करणारी लातूर पंचायत समिती ही पहिलीच असावी.
‘केवळ करिअर नव्हे, माणूस घडविणाऱ्या आमच्या जिल्हा परिषद शाळा' असे या जाहिरातीचे शिर्षक आहे. तसेच व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास... प्रगत
शिक्षण हाच आमचा ध्यास, असा उल्लेख केला आहे. जिल्हा परिषदेंच्या
शाळांमध्ये सर्वांसाठी मोफत शिक्षण, मोफत पाठ्य पुस्तके व स्वाध्याय
पुस्तिका, सकस पोषण आहार, मोफत गणवेश, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती,
इयत्ता पहिलीपासून इंग्रजी विषय, संगणक शिक्षण, विज्ञान प्रयोगशाळा, मोफत
आरोग्य तपासणी व सेवा, अनुभवी व समृद्ध शिक्षक वृंद, ई-लर्निंगद्वारे
शिक्षण आणि १०० टक्के गुणवतेची हमी, असे विविध सुविधा-सवलती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या अनोख्या आणि स्तुत्य उपक्रमाबद्दल लातूर पंचायत समितीचे पर्यायाने
गटशिक्षणाधिकारी तृप्तीताई अंधारे यांचे सर्वत्र कौतूक केले जात
आहे.त्यांचा हा उपक्रम शिक्षण क्षेत्रात चर्चेचा व कुतुहलाचा विषय बनला
आहे
शिवाजी कांबळे

यांच्याकडून आपण सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे!

अन्यायाचा प्रतिकार करणाऱ्या ह्या चंद्रपूर आणि लातूर जिल्यातील मुलींचं उदाहरण.
यांच्याकडून आपण सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे! 
पश्चिम महाराष्ट्रातलं ३ ते ४ हजार लोकसंख्येचं एक गाव... ‘मसुचीवाडी’! गावात शिक्षणाच्या सोयी नसल्यामुळे गावातली मुलं शेजारच्या गावात शाळा –कॉलेजमध्ये जातात. पण आता गावातल्या मुलींना गावाबाहेर न पाठवायचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला – आणि त्याचं कारण आहे शाळेच्या वाटेवर होणारा लैंगिक हिंसाचार! गेल्या आठवडाभरात विविध वृत्तवाहिन्यांवर ही बातमी दाखवली जात होती. गेल्या दोन वर्षांपासून मसुचीवाडीला हा त्रास होत होता. गावातल्या लोकांनी आपल्या पातळीवर याला विरोध करायचे केलेले प्रयत्न अपुरे पडले. पोलीसही दखल घेत नव्हते आणि नेते मंडळींना देखील हा प्रश्न फारसा महत्त्वाचा वाटत नव्हता. अखेर मागच्या आठवड्यात जेव्हा ग्रामपंचायतीमध्ये मुलींचे शिक्षण बंद करायचा आणि निवडणुकांवर बहिष्कार घालायचे ठराव करण्यात आले! तेव्हा कुठे महिला आयोग, पालकमंत्री, आमदार ,पोलीस अशा सर्वांना जाग आली – आणि मुलींना त्रास देणाऱ्या चार जणांपैकी तिघांना अटक करण्यात आली.
रस्त्यावर होणाऱ्या छेडछाडीमुळे मुलींचे शिक्षण थांबवले जाण्याचे हे काही पहिलेच उदाहरण नाही - मागच्या वर्षी उत्तरप्रदेशातल्या बरेली जवळच्या एका गावात देखील २०० मुलींनी एकाचवेळी शाळा सोडलेली होती. त्याआधी हरयाणात महेन्द्रगढमधील एका गावातल्या ४०० मुलींनी याच कारणाने शाळा सोडली होती. ग्रामीण भागातच नव्हे तर अगदी मुंबईसारख्या शहरातदेखील शाळाकॉलेजकडे जाणारे रस्ते असुरक्षित असल्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये मुलींना सातवी नंतर घरीच बसावे लागते. वर्षानुवर्षे घरोघरी अनेक मुली रस्त्यावर आपल्याला होणारे त्रास पालकांपासून लपवूनच ठेवत आलेल्या आहेत. कारण एखाद्या मुलीवर लैंगिक हिंसा होणे – हा त्या कुटुंबाचा अपमान समजायची पद्धत आहे म्हणून मुलीला अशा छेडछाडीला सामोरे जावे लागल्याचे जेव्हा पालकांना समजते, तेव्हा पुढचा अतिप्रसंग टाळण्यासाठी ते मुलींचे शिक्षणच बंद करतात ! अर्थातच एकदा मुलींचे शिक्षण थांबले की तरण्याताठ्या पोरीला घरात ठेवण्याचा धोका नको म्हणून तिचे लग्न लावले जाते आणि तिच्यावरच्या अन्यायाची मालिका पुढे सुरूच राहते!
अन्यायाला प्रतिकार करण्या ऐवजी घाबरून स्वत:चेच नुकसान करून घेण्याचाच असा पायंडा पडलेला असताना जेव्हा चंद्रपूर, लातूर सारख्या मागास समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातल्या मुली संघटितपणे गुंडाचा बिमोड करतात – तेव्हा त्यांचा आदर्श सर्वांसमोर मांडणे गरजेचे वाटते.
पहिले उदाहरण आहे - चन्द्रपूर जिल्ह्यातल्या सिदूर तालुक्यातल्या दीपशिखा गटाचे. या गटाचे नेतृत्व करणारी चुणचुणीत मुलगी - वैभवी उल्माले. वैभवी जेव्हा शाळेला एकटी जायची तेव्हा वाटेवरती एक माणूस नेहमी लैंगिक हावभाव करून दाखवत असे – सुरुवातीला ती घाबरून मान खाली घालून गपचूप निघून जात असे. पण एके दिवशी शेतातून जात असताना तो माणूस तिच्या जवळ येऊ लागला , तेव्हा तिने एका शेतकरी आजोबांकडे मदतीसाठी धाव घेतली. तेव्हा तो माणूस पळून गेला आणि आजोबांनी पुन्हा कधीच एकटीने शाळेत न जायचा सल्ला दिला. वैभवी तेव्हापासून मैत्रिणींच्या सोबतच शाळेला जायला लागली. मैत्रिणींशी गप्पा मारताना लक्षात आलं की त्या माणसाने त्यांच्यापैकी सर्वांनाच कधीनाकधी त्रास दिलेला होता. मग युनिसेफ तर्फे चालवल्या जाणाऱ्या दीपशिखा वर्गात शिकवणाऱ्या ताईना त्यांनी हा अनुभव सांगितला. ताईशी बोलून त्यांना लैंगिक हिंसेला प्रतिकार करायचं बळ मिळालं आणि एक दिवस त्यांनी मुलींना जातायेता त्रास देणाऱ्या माणसाला घेरलं. त्याला पकडून ग्रामपंचायती समोर उभं केलं आणि ग्रामपंचायतीने त्याला इतका सज्जड दम भरला की तो माणूस गाव सोडून पसार झाला.
दुसरे असेच उदाहरण आहे – लातूर मधल्या बोरीवती गावातले. लातूरच्या बोरिवती गावात रहाणाऱ्या पमाताईंचे घर म्हणजे गावातल्या सगळ्याच मुलींच्या आणि बायांच्या विश्वासाची जागा! पमाताई दीपशिखा प्रेरिका म्हणून काम करतात. पण त्यांचे काम वर्ग घेण्यापुरतंच मर्यादित ठेवलेलेलं नाही. वर्गात शिकवली जाणारी मुलीच्या आत्मसन्मानाची मूल्ये प्रत्यक्षात कशी उतरवता येतील त्यासाठी देखील त्या जागरूक असतात. आपण एखादी अडचण पमाताईंना सांगितली तर गावातल्या इतर बायांच्या मदतीने त्या नक्की दूर करतील असा विश्वास दीपशिखा वर्गातल्या मुलींच्या मनात तयार झालेला होता. याच विश्वासापोटी बोलायला अतिशय अवघड अशी समस्या घेऊन काही मुली पमाताईंकडे आल्या. शाळेतून येताजाताना या मुलींना एक माणूस विचित्र खाणाखुणा करायचा. . .अचकट विचकट बोलायचा. . . नको तिथे हात लावायचा. सुरुवातीला प्रत्येक मुलगी आपल्यालाच असा घाणेरडा त्रास होतो आहे असे मानून गप्प बसत असे. पण एकमेकींशी बोलल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की आपल्या सगळ्याचजणींना हा त्रास होतो आहे. दीपशिखा वर्गात एक दिवस हा विषय निघाला आणि पमाताईंनी या त्रासाचा बंदोबस्त करायचे ठरवले. एक दिवस सगळ्या पोरींनी त्या फाजिल माणसाला बसमधेच घेरले आणि अक्षरश: हाताला धरून ओढत ओढत गावातल्या चौकात आणले. सर्वांसमोर त्याला असा काही दम दिला की पुन्हा तो माणूस गावात फिरकला देखिल नाही. आता बोरिवती गावातल्या मुलींना बिनघोरपणे शाळेत जायला मिळते आहे!
या दोन्ही उदाहरणांमध्ये म्हणजे मुलींना एकमेकींशी बोलण्यासाठी दीपशिखा वर्गांच्या निमित्ताने एक स्वतंत्र अवकाश मिळाला होता. तसेच त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाय शोधायला मदत करणारी, धीर देणारी व्यक्ती त्यांच्यासोबत होती. म्हणून त्या मुलींना शिक्षणाचा हक्क सोडून द्यावा लागला नाही! मुलींसाठी आपापल्या वस्तीमध्ये, गावामध्ये अशा जागा आपण निर्माण करायला हव्यात – तरच त्यांना आत्मनिर्भर होण्याची दिशा दिसेल
वंदना खरे.

Monday, 12 December 2016

‘स्वाधार’मुळे अंध शिकले जगणं

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातलं बुधोडा गाव. येथील ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानच्या स्वाधार केंद्रानं अंधांना प्रशिक्षण देत तिथेच स्वयंरोजगार उपलब्ध करून त्यांना स्वत:च्या पायावर उभं केलं आहे. स्वाधारचं वेगळेपण म्हणजे अंधपणाचे भांडवल न करता सन्मानाने अर्थाजन करीत एकमेकांना आधार देत समूहजीवन जगतात. हरिश्चंद्र सुडे हे सर्वांचे पपा तर सविता सुडे या ममा. या दाम्पत्याने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून अंधांना आधार आणि स्वाभिमानही दिला. सविता यांचं मागच्या वर्षी निधन झालं. पण त्यामुळे खचून न जाता हरिश्चंद्र सुडे स्वाधार सांभाळत आहेत. राष्ट्र सेवा दल, यदुनाथ थत्ते आणि दादा गुजर यांच्या संस्कारात हरिश्चंद्र सुडे वाढले. 

निलंगा तालुक्यात अंधांसाठी सुरू केलेला प्रकल्प नंतर त्यांनी बुधोडा येथे आणला. १९८७ ते ८८ दरम्यान सुडे यांनी आठ -दहा झोपड्या उभारून अंध प्रशिक्षण व अर्थाजनासह पुनर्वसन कामाला सुरूवात केली. संस्थेत राहून प्रशिक्षण घ्यावे आणि कमवावे, हीच काय ती इथल्या प्रवेशासाठी अट. इथे २५ हातमाग यंत्र आहेत. त्यावर सुंदर अशा सतरंज्या, गालिचे, शाळेसाठी लागणाऱ्या आसनपट्टया तयार होऊ लागल्या आहेत. आता जुन्या साड्यांपासून अत्यंत सुंदर व कलात्मक गालीचे, सतरंज्या विणण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे. लातूर शहरातील मिनी मार्केटमध्ये एका गाळ्यात विक्रीकेंद्रही उघडलं आहे.
यातून अंधांना महिन्याकाठी तीन-साडेतीन हजार रुपयांपर्यंतची मिळकत येते. शिवाय अंध व्यक्तींना अॅतक्युप्रेशर मसाज करण्याचं प्रशिक्षण देऊन मसाजसेंटर देखील सुरू केले आहे. अंध व्यक्ती अत्यंत कुशलतेने मसाज करतात. 
केंद्रात अंध स्त्री-पुरुषांना मोफत प्रवेश आहे. राहायची, भोजनाची सोय आणि रोजगारप्रशिक्षण दिलं जाते. तिथेच कामही मिळते. सुडे यांनी या ठिकाणी काम करणाऱ्यांचे आंतरजातीय विवाहदेखील लावून दिले आहेत. येथील अंधांना जगण्याचा आत्मविश्वास मिळाला की ते आपापल्या गावी परत जातात आणि सन्मानाने ताठ मानेने जीवन व्यतीत करतात.
सुडे म्हणतात, "स्पर्शज्ञानातून अंधांना स्वावलंबी बनविण्याचं काम करतो. त्यातून अनेक अंध उभे राहिले आहेत. गेल्या ३० वर्षांत हजारो अंध सन्मानजनक अर्थाजन करीत जगणं शिकले आहेत. आता मुलगा प्रशांत या कामात साथ देत आहे".


लेखक: शिवाजी कांबळे, लातूर.

Thursday, 24 November 2016

...त्याने दिली प्रेरणा

‘आम्ही सेवक’ या संस्थेच्या माध्यमातून रवी बापटले काम करीत होते. एकदा काही कारणाने ते उदगीर तालुक्यातील धोंडी हिप्परगा येथे गेले. तिथे घडलेल्या एका विचित्र घटनेने अस्वस्थ झाले आणि तिथंच खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्याला एक दिशा मिळाली. गावात एक एचआयव्हीबाधित जोडपे होते. पदरी एक मुलगा. आजाराने मुलाची आई मरण पावली. नंतर या लहानशा मुलालाही एचआयव्हीचा असल्याचे समजले. तेव्हा कुटुंबीयांनी या मुलाला त्याच्या पित्यासह वाळीत टाकले. एका पडक्या खोलीत त्यांची रवानगी झाली. काही काळातच या मुलाचा अन्नपाण्यावाचून मृत्यू झाला. आजाराचा संसर्ग होईल या गैरसमजामुळे त्याच्या मृतदेहाकडे तब्बल तीन दिवस कोणीही लक्ष दिले नाही. हे पाहून बापटले यांनी आपल्या मित्रांच्या सहकार्याने या मुलावर अंत्यसंस्कार केले. याच घटनेमुळे बापटले यांच्या मनात ‘सेवालया’चे बीज रूजले. 
हासेगाव ता. औसा जि. लातूर येथे रवी बापटले यांनी २००७ मध्ये सेवालय सुरू केले. सध्या या सेवालयात ७१ मुलं आहेत. त्यांच्या या कामाला समाजातून मोठा विरोध झाला. मात्र, त्यांनी खंबीरपणे उभे राहत सरकारी अनुदानाशिवाय हे केंद्र चालविले. स्वत: अविवाहित राहून हा प्रपंच त्यांनी व्यापक केला आहे. अशी अनेक लहान मुले त्यांनी न केलेल्या दोषाची शिक्षा भोगत असतील, अनाथ व बहिष्कृत होऊन जगत असतील या विचाराने एचआयव्हीबाधित मुलांसाठी सेवालयाची स्थापना केल्याचे ते सांगतात. 
बापटले यांनी हासेगावच्या माळरानावर नंदनवन फुलवले आहे. सेवालय उभारून ७१ मुलांचे आईबाप बनून ते संगोपन करीत आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचा शासकीय निधी, परदेशी फंड न घेता लोकांच्या दातृत्वावर हे सेवालय चालते. याच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते शांतेश्वर मुक्ता यांचे आजोबा कै. मन्मथ अप्पा मुक्ता यांनी सेवालयाला साडेसहा एकर जमीन दान केलेली आहे. समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी सेवालयाचे पालकत्व स्वीकारले आहे. 
शिकायला मिळणे हा प्रत्येक बालकाचा हक्कच. पण तो हक्कही इथल्या ग्रामसभेने डावलला होता. शेवटी लातूरमधील पत्रकार व कार्यकर्त्यांनी एकत्र येत मुलांच्या पाठीशी उभे राहत हसेगावच्या जिल्हापरिषद शाळेत या मुलांना प्रवेश देणे भाग पाडले.
आज एचआयव्हीबद्दलची दहशत काहीशी कमी झाली असली तरी एचआयव्हीबाधित व त्यांच्या मुलांचे प्रश्न अजूनही कायम आहेत. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर या मुलांचे मोठे हाल होतात. अशा मुलांना येथे आधार दिला जातो, मायेने सांभाळले जाते, एवढेच नाही तर त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाते. 
 चिमुकली मुले लवकरच १८ वर्ष पूर्ण करणार आहेत. आता पुढे काय, या विचारातून अस्वस्थ झालेल्या बापटले यांच्या चिंतनातून ‘हॅप्पी इंडियन व्हिलेज’चा (एचआयव्ही) चा जन्म झाला. सज्ञान मुलांच्या पुनवर्सनाचा हा देशातील एकमेव प्रकल्प असावा. आर्थिक पायाबांधणीला हीच मुले पुढे सरसावली. स्नेहा शिंदे यांच्या सहकार्यातून मुलांनी 'हैप्पी म्युझिक शो' सुरु केला. आणि त्यातून होणाऱ्या अर्थप्राप्तीतून संस्थेचं बरचसं कामकाज चालतं. मायेचा पदर आणि बापटले यांच्या आश्वासक खांद्यांचा आधार घेऊन हे बाळगोपाळ वाटचाल करीत आहेत.

रवी बापटले यांचा मोबा. क्र. - ९५०३१७७७००

शिवाजी कांबळे - लातूर.