Tuesday 4 February 2020

स्वेटर



डिसेंबर महिना सुरू झाला आणि स्टेशन जवळील रस्त्यावर स्वेटरचे ढीग दिसायला लागले. नेपाळी आणि तिबेटी विक्रेते लोकांना स्वेटर दाखविण्यात मग्न झाले. या स्वेटर विकणार्‍यांच वैशिष्ट्य म्हणजे ते "स्वेटर लेलो भाई! स्वेटर लेलो" असं कधी म्हणत नाहीत आजूबाजूला असणारे रंगीबिरंगी स्वेटर जणू ते काम करत असतात. काही लोक म्हणतात हे स्वेटर प्युअर लोकरीचे नसतात. पण मला वाटतं हे स्वेटर गरीब लोकांची थंडी पळवण्याचे काम नक्कीच करतात.
लहानपणी मला डून स्कूल किंवा तत्सम उच्चभ्रू शाळेत जाणाऱ्या मुलांच्या मरून किंवा लालसर रंगाच्या स्वेटर बद्दल खूप आकर्षण होते. किती रुबाबदार दिसायची ती मुलं! नंतर क्रिकेटची आवड निर्माण झाल्यावर क्रिकेटपटूच्या पांढऱ्या रंगाचे, निळ्या रंगाची बॉर्डर असणारे स्वेटर खूप आवडायचे.
पूर्वीच्या हिंदी चित्रपटांचे नायक तर वेगवेगळ्या डिझाईनचे स्वेटर घालायचे ते पण छान दिसायचे.
मला मात्र फुल शर्ट घालून वर हाफ स्वेटर घालायला आवडतो.

दिवाळीच्या आधीच कुठला स्वेटर घ्यायचा याबद्दल विचारमंथन चालू होते. दिवाळीला दोन्ही मुलं परदेशाहून येणार होती मनात म्हटलं मुलं आल्यावर त्यांना सांगूया इथूनच स्वेटर आणायला कारण तिथून आणायला सांगितले आणि बरोबर मापाचा झाला नाही तर पंचायत व्हायची! धाकटा मुलगा आधी आला आणि आल्याबरोबर बॅग उघडून त्यातील एकेक भेटवस्तू काढून देऊ लागला. आईसाठी आणि इतर नातेवाईकांसाठी त्याने भेटवस्तू आणल्या होत्या. मनात म्हटलं, माझ्यासाठी काही आणलं आहे की नाही, तेवढ्यात एक पिशवी पुढे करून म्हणाला "बाबा! हे तुमच्यासाठी "मी म्हटलं "काय आहे?" म्हणाला, "उघडून तर बघा" आणि उघडून बघितलं तर काय चक्क स्वेटर होता माझ्या आवडीच्या रंगाचा! "अरे खूप महाग असेल ना! इथे स्वस्त मिळाला असता"
"नाही बाबा! तुमच्या सुनेने स्वतःच्या हाताने विणलेला आहे. रोज ती कामावरून आल्यावर दोन-दोन तास महिनाभर विणत होती."
माझ्या डोळ्यात टचकन पाणी आले. दर आठवड्याला मुलाचा आणि सुनेचा फोन येतो पण ती माझ्यासाठी स्वेटर विणत होती याचा थांगपत्ता त्यांनी मला लागू दिला नाही. कारण त्यांना मला सरप्राईज द्यायचे होते ना! मी मुलाला म्हटले, "अरे! हा स्वेटर महाग नाही तर अमूल्य आहे आणि उबदार सुद्धा कारण यात माझ्या मुलीचे प्रेम आहे.'
माझ्या दोन्ही सुना म्हणजे माझ्या मुलीच आहेत हे परत एकदा मला पटले.
- सुधीर शेवडे ठाणे

No comments:

Post a Comment