Tuesday 4 February 2020

गेल्या पाच वर्षांपासून मुलं वाचताहेत संविधान उद्देशिका

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोहारा येथील वसंतदादा पाटील हायस्कूल ही १ ते १० वी पर्यंतची शाळा. शाळा विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी अनेक उपक्रम आखत असते. यापैकीच एक, परिपाठात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन. मागील ५ वर्षांपासून हा उपक्रम दररोज सुरू आहे.
२६ जानेवारीपासून प्रत्येक शाळेत परिपाठाच्या वेळी दररोज संविधानाच्या उद्देशिकेचे समूह वाचन घेण्यात यावे असा शासन निर्णय नुकताच झाला. मात्र, लोहारा येथील ही शाळा मागील ५ वर्षांपासून हअसं वाचन करतच आहे. सोम-मंगळ मराठी भाषेत, बुध-गुरु हिंदीत तर शुक्र-शनि इंग्रजीमधून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात येते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना लहानपणापासून संविधानाची माहिती होत आहे.
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली. या निमित्ताने प्रत्येक वर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वांची व्याप्ती व सर्वसमावेशकता सर्व नागरिकांना समजावी आणि घटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुता ही मुलतत्वे मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय होणे आवश्यक आहे.
भारतीय संविधानातील मूलतत्त्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये यांची रूजवणूक शालेय मुलांच्या मनात झाली की मोठं झाल्यावर ते जबाबदार, सुजाण नागरिक घडती, असा विश्वास वाटतो.
.-गिरीश भगत, उस्मानाबाद


व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=272696227026968

No comments:

Post a Comment