Friday 22 February 2019

औषध विक्रेत्यांचे ‘अन्नछत्र’

जिल्हा बीड. माजलगाव तालुका. इथं खेड्यापाड्यातून उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची बरीच गर्दी असते. उपचारांसाठी तालुक्याला आलं की पेशंटचे आणि सोबत आलेल्या नातेवाईकांचे जेवणाचे हाल ठरलेले. कारण अर्थातच, पेशंट दवाखान्यात भरती केल्यावर गावातून जेवण कसं आणणारं? हे जाणूनच माजलगाव येथील काही औषध विक्रेते एकत्र आले. पेशंटच्या नातेवाईकांची ही स्थिती नेहमीच त्यांच्या नजरेसमोर येत होती. त्यातूनच त्यांनी या पेशंटसाठी अन्नछत्र सुरू करायचं ठरवलं. आज रोज तीनशे रुग्णांना डबा पोहचवला जात आहे. गेल्या दीड वर्षांपासून अखंडितपणे हा उपक्रम सुरू आहे हे याचं विशेष.
माजलगाव शहराचा विस्तार मोठा. लोकसंख्या 55 ते 60 हजार. आणि पूर्ण तालुक्याची लोकसंख्या 2 लाखाच्या आसपास. शहरात मोठी रुग्णालये आहेतच. शिवाय शासनाचे ग्रामीण रुग्णालयही आहे. त्यामुळे तालुकाभरातून शेकडो रुग्ण दररोज माजलगावतील विविध रुग्णालयांमध्ये दाखल होत असतात. 



नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे तर कधी रुग्णाजवळ इतर कुणीच नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना वेळेवर जेवण मिळायचं नाही. काहीवेळा माजलगावात नातेवाईक नसल्यानेही रुग्णांसाठी जेवण मिळवणं अवघड व्हायचं.
अन्नछत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप शिनगारे म्हणतात, “ज्या रुग्णांना औषधं विकून आपल्याला फायदा होतो, त्याच कमाईतील काही हिस्सा त्यांच्या जेवणावर खर्च करावा अशी कल्पना पुढे आली. आणि माजलगावातील २४ औषध दुकानदारांनी दीड वर्षांपूर्वी अन्नछत्र सुरू केलं. महिन्याला दोन हजार रुपयांचा निधी प्रत्येकजण यासाठी देतो. त्यातून किराणा साहित्य घेतलं जातं. एक बाई स्वयंपाक करतात. आणि रोज सकाळी शहरातील सर्व खासगी व ग्रामीण रुग्णालयात अन्नाचे पॅकेट पोहचवण्याचे काम केलं जातं. रोजचं एकवेळचं जेवण या रूग्णांना अन्नछत्रतर्फे दिलं जातं. हे काम पाहून लक्ष्मण डक यांनी एक गाळाही स्वयंपाक व अन्नाची पाकीटे पॅक करण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिला आहे.”  विनोद शर्मा म्हणाले, “रुग्णांची सेवा ही ईश्वर सेवा समजली जाते. ती करण्याचाच आम्ही प्रयत्न करतो आहेत. यापुढे आता शहरात अनाथालय सुरू करून मुलांसाठीही काम करण्याचा प्रयत्न आहे.”
- अमोल मुळे, बीड

कल्याणीला उभारायचा आहे स्वतःचा स्टुडिओ

अनेकांप्रमाणे तिनेही ११ वी कॉमर्सला प्रवेश घेतला. ११ वीत उत्तीर्णही झाली. पण मन काही रमत नव्हतं. मूळची चित्रकलेची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. तिचं नाव कल्याणी परदेशी. पुणे विद्यापीठातून शिल्पकलेतून पदवी घेणारी पहिली मुलगी. कल्याणी नाशिकमधली. मध्यमवर्गीय कुटुंबातली. वडील महिंद्रा कंपनीतून निवृत्त तर आई गृहिणी.
रुळलेली वाट सोडून वेगळ्या वाटेनं जायचं म्हटल्यावर त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे लोक तिच्याही आजूबाजूला होतेच. पण आईवडिलांचा मात्र पहिल्यापासूनच पूर्ण पाठिंबा.


 १२ वीला चित्रकला विषय घेऊन कल्याणीनं कला शाखेत प्रवेश घेतला. नाशिकमध्ये असलेल्या पुणे विद्यापीठाच्या कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात तिने प्रवेश घेतला. चित्रकला आणि शिल्पकला याचं प्रथम वर्षाचं शिक्षण एकत्रच व्हायचं पण त्यांचं प्रथम वर्षही वेगळं घेण्यात आलं. कल्याणीला आता शिल्पकलेविषयी आवड निर्माण झाली होती. 'शिल्पकलेला मुली प्रवेश घेत नाहीत, त्यात बरीच मेहनत असते.' असे सल्ले तिला मिळाले. पण तिचा निश्चय पक्का होता. शिल्पकलेचं शिक्षण घेणारी ती एकटीच मुलगी होती. योगेश गटकळ सरांनी खूप छान प्रोत्साहन दिल्याचं ती सांगते. बरोबरीच्या मुलांचं वागणं चांगलं होतं. स्टडी टूर, कार्यशाळा यासाठी आईवडिलांची काहीच आडकाठी नव्हती. वर्ष २०१४ मध्ये तिनं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पुढे २०१७ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून 'म्युरल्स' मध्ये कल्याणीनं अभ्यासक्रम पूर्ण केला.
नोकरी, प्रोजेक्ट मिळवण्यात काही अडथळे आले, मुलगी असणं कधी आड आलं, पण मदत करणारेही कितीतरी जण असल्याचं ती सांगते.  भारतीय हवाई दलासाठी केलेलं विमानाचं म्युरल तिचा पहिला मोठा प्रकल्प. सध्या ती काही महाविद्यालयात गेस्ट लेक्चरर म्हणून मार्गदर्शन करते. स्वतःचा स्टुडिओ उभारण्याचं कल्याणीचं स्वप्न आहे. तिचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी नवी उमेदकडून तिला शुभेच्छा. 

-विजय भोईर, नाशिक / नागपूर

शिक्षणसंस्कृतीचे सहृदय ‘वाहक’


विद्यार्थ्यांच्या शिक्षणात बरेच अडथळे असतात. बऱ्याच जणांची आर्थिक परिस्थिती खालावलेली असल्याने त्यांची आवश्यक शैक्षणिक साहित्य विकत घेण्याचीही ऐपत नसते. अशावेळी शाळेतले शिक्षक किंवा गावातील सधन व्यक्ती माणुसकीच्या भावनेतून त्या विद्यार्थ्यांना मदत करतात, हे आपण ऐकले असेल. पण तुम्हांला जर सांगितले की एसटी बसचे वाहक (कंडक्टर) म्हणून नोकरी करणाऱ्या एका व्यक्तीने सुमारे ५२ मुलांना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेतलेले आहे, तर यावर तुमचा विश्वास बसेल का? होय, हे खरे आहे आणि या व्यक्तीचे नाव आहे- राहुल आंधळे. 
  मूळचे बीडमधील गेवराईचे असलेले राहुल आंधळे सध्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनच्या आगारात वाहक म्हणून काम करत आहेत. शिक्षणक्षेत्रात नसलेला एक माणूस, स्वत:ची एस टी महामंडळातील दगदगीची नोकरी सांभाळून इतक्या मुलांना शैक्षणिक मदत करतो याचे मला आश्चर्यही वाटले आणि खूप आनंदही झाला. त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे आभार मानण्यासाठी मी त्यांचे मूळ गाव असलेल्या गेवराई तालुक्यातील रामनगरला पोहोचलो, तिथल्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका शीतल नाईकवाडे यांनीही आंधळे यांच्याकडून वेळोवेळी होत असणाऱ्या मदतीबद्दल भरभरून सांगितलं. एवढंच नाही तर गावातील एखाद्या बालकाची शाळा घरच्या जबाबदाऱ्यांमुळे अथवा गरिबीमुळे मध्येच थांबणार असेल तर आंधळे त्या बालकाचा शैक्षणिक खर्च तर उचलतातच पण त्याच्या पालकांना भेटून शिक्षणाचं महत्त्वही समजावून देतात हे आवर्जून सांगितलं. आंधळे यांचे आई, वडील, पत्नी शेतात राबणारी साधी श्रमजीवी माणसं होती.
दुसऱ्या दिवशी मी राहुल आंधळे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. एका विस्ताराधिकाऱ्याचा आपल्याला आवर्जून फोन आला आहे, हे पाहून आंधळे भारावून गेले. “काळम- पाटील सर तुम्ही माझ्या घरी गेलात, कुटुंबियांशी संवाद साधून आभारही मानले, फार बरं वाटले. पण मी जे काम करतोय ते तुमच्यासारख्या नि:स्वार्थ शिक्षकांच्या प्रेरणेतूनच करतोय”, आंधळे माझ्याशी खूप नम्रपणे बोलत होते. “सर, एसटी महामंडळात वाहक म्हणून कर्तव्य बजावताना आम्हांला अनेकांशी संवाद साधण्याची संधी मिळते. त्यात माझा स्वभाव बोलका आहे आणि मला शिक्षणाविषयी आस्था आहे, त्यामुळे बसमध्ये बसलेल्या विद्यार्थी आणि पालकांशी मी आवर्जून संवाद साधत असतो.”
आंधळेंनी पुढे सांगितलं की, “कितीतरी मुलांकडे बसचं तिकीट काढायला पैसे नसतात, पास संपलेला असतो, तेव्हा त्यांचे पैसे मी भरतो. काही मुलांची आर्थिक परिस्थिती खूपच खालावलेली असते, कधी एखाद्या मुलाचे पालक दगावलेले असतात. अशा मुलांचा शैक्षणिक खर्च मी उचलतो. त्यांना वह्या- पुस्तके, गणवेष, चपला- बूट अथवा इतर गरजेच्या शैक्षणिक साहित्याची मला होईल तेवढी मदत मी पुरवितो. माझ्या शिक्षकांनी माझ्या लहानपणी मला शिक्षणासाठी मदत केलेली आहे, त्यामुळेच कृतज्ञतेची भावना मनात ठेवून मी गरजू मुलांना मदत करतो.” राहुल आंधळे यांनी आत्तापर्यंत रायगड, नाशिक, जालना, अहमदनगर, बीड अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांतील सुमारे 52 गरजू विद्यार्थ्यांना मदत केलेली आहे, हे ऐकून मी थक्क झालो आणि त्यांच्या कायम संपर्कात राहायचे ठरविले. 

 - प्रवीण काळम- पाटील, शिक्षण विस्ताराधिकारी, पंचायत समिती गेवराई, जिल्हा बीड.

सदा आबाची ऐका वाणी...


बीड जिल्ह्यातला एक शेतमजूर सदा आबा. इतर अनेकांप्रमाणे दुष्काळाने पोळतोय. कुटुंबाला जगवायला धडपडतोय. त्याची कहाणी आणि अशाच अनेक कहाण्या तोच आपल्याला सांगतोय.
"आमचा लाडका गणू. औंदाचं गणूचं हे शाळेतलं पहिलचं वरीस. दिसभर मोलमजूरी करुन सांजवेळी घरात पाय टाकताच गणू मह्याजवळ यतो, आणिक "अाबाव आज मी दोनाचा पाढा शिकलो, आज मी कविता बी शिकलो", असं म्हणत बिलगतो, तवा जीव ओवाळून टाकावं वाटतं या पोरावर.
आमच्या समद्या घराचा गणूवर भारी जीव. दिसभरं राब-राब राबवणारे आम्ही, गणू दोन पाढे काय बोलला झोपडीत पडून पोरं चांगल नाव काढीनं हे सपान रंगवतो. हे सार रहाट गाडगं सुरुचं व्हतं. पण औंदा जरा इपरीतचं घडलं.
पीक उगली नाहीत तोवरसक पावसानं पाठ फिरीली अन‌् लोकाच्या शेतात उभं पीक करपलं. पाणी आटल्यानं रस्ता, बांधकामबी बंद पडली आणिक आमास्नी काम मिळना झालं. आठ दिस मोक्कार बसलो. पर आयतं बसून घास अन कोसभर चालून बाईलीनं आणलेल्या पाण्याचा घोट नरड्यात उतरना.
काम मिळण्याची चिन्हचं नव्हतं. इचार करीत पडलो होतो, तवा शेजारल्या वस्तीवरल्या सखाराम पवार आलान मला बोलला, "अरं मोक्कार बसुस्तर चल म्हयासंग ऊसतोडीला."
आम्हीबी काय नडल्यालो, जाऊ बोललो. तसंबी मला
इकडं जवळचं गणगोत नाय. मी, महि बायको रंजना व आमच्या काळजाचा तुकडा, गणू. हेच मह जग.
मंग काय तडक मुकादम गाठला, उचल घेतली.
झालं पैसा खिशात आला, पण सुख नव्हतं. माह्या डोळ्यापुढे गणूचा इचार. त्याच्या साळेचं कसं व्हयाच?
मधेचं मास्तरला भेटलो तवा ते बोलले, "अहो शिंदे पोरगा हुशार आहे, त्याच्या शिक्षणात नका खंड पाडू. त्याला राहुद्या इथं हंगामी वसतिगृहात."
पर माझं तर तवापास्न डोस्कचं बंद. पोरंग खाईल कुठ, लागलं, पडलं, खुपलं तर कोण बघल. नुसतं ईचारांचं वावटळ. इकडं फडावर जायाची घडी आली. बोजा, बिस्तरा, जितराब. समद ठरलं काय न्यायचं, काय ठेवायचं. फकस्त गणुच काय ठरत नव्हतं. आखरीस म्या ठरील नग एकटं सोडायला जीवाच्या तुकड्याला. तो दिस उजाडला, भल्या पहाटे आम्ही अवघा संसार ट्रॅक्टर ट्रॉलीत भरला. गाडी निघाली, गाव सूटल, पुढं सहा महिने कोयता, मी अन रंजना, आमची गाठ बसणार पर माह्या गणूची पाटी, पुस्तकाची गाठ मात्र सुटली...
(मित्रांनो, ही काल्पनिक नाही, खरीखुरी गोष्ट आहे, पारगांव (जि.बीड) च्या एका गणूची. याच केंद्रातील एका जिल्हा परिषद शाळेतून असे २२ गणू पालकांसह कारखान्यांवर स्थलांतरित झालेत. इयत्ता पहिली ते तिसरीचे हे सारे विद्यार्थी. त्यांचं दुर्दैव असं की जिल्ह्यातील ज्या कारखान्याच्या हद्दीत पालक उसतोडीला गेले तिथं ना साखर शाळा आहे, ना कुठलीही पायाभूत सुविधा. त्यामुळं यांचं भविष्य राम भरोसेचं.) llभाग 1ll
- अनंत वैद्य, बीड.

सप्तखंजेरीचा आगळा नाद

नागपूरच्या तुषार सूर्यवंशीची ही गोष्ट. एक भाऊ, एक बहीण आणि आई-वडील असा छोटा परिवार. घरातील वातावरण धार्मिक. त्यामुळे धार्मिकतेचा संस्कार पक्का झाला. लहानपणापासूनच तुषार भजन आणि कीर्तनात रमायचा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांचे विचार त्याच्या बालमनावर कोरले गेले. वयाच्या ११ व्या वर्षी भगतसिंह यांच्या जीवनावरील चित्रपट त्याने बघितला. त्यातूनच देशासाठी आपण सुद्धा काहीतरी करावं अशी संकल्पना मनात आली आणि सातवीत शिकत असतानाच त्याने सप्तखंजेरी घेऊन कीर्तनाला सुरूवात केली. खंजेरी हे वाद्य कनार्टकातील. विदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यामुळे हे खंजेरी वाद्य सर्वपरिचित झालं. तुकडोजी महाराज यांनी खंजेरी भजनाच्या माध्यमातून जनजागृती केली.
‘खं’ म्हणजे आकाश, ‘जरी’ म्हणजे त्याचा नाद. म्हणजेच ज्याचा आवाज आकाशातील ढगासारखा येतो त्यास खंजेरी असं म्हटलं जातं. विदर्भातील सत्यपाल महाराज यांनी सर्वात प्रथम एकाच वेळेस सात खंजेरी वाजवून ही आधुनिक सप्तखंजेरी परंपरा उदयास आणली. सत्यपाल महाराज, इंजी भाऊ थुटे यांच्या सीडी, केसेट्स बघून बघून तुषारने हे वाद्य वाजवण्यास सुरुवात केली. आधी तर घरातील डबे, वेगवेगळी भांडी वाजवत बसायचा. एक दिवस मात्र त्यानं खरोखरच खंजेरी वाद्य विकत आणलं आणि गंमत म्हणून तो वाजवू लागला. आणि या गमती जमतीत आणलेल्या वाद्याने त्याच्या आयुष्याची वाटच बदलली. तिथूनच त्याचा सप्तखंजेरीचा प्रवास सुरू झाला. सुरूवातीला जी खंजेरी तो स्वत:च्या मनोरंजनासाठी वाजवत होता तीच खंजेरी आता तो प्रबोधनासाठी वाजवत आहे.
तुषार म्हणतो, “कीर्तनात जे आम्ही बोलतो त्या प्रकारे प्रथम आपल्या जीवनात वागण्याचा यथायोग्य प्रयत्न करीत असतो. म्हणूनच माझ्या आजोबांचं निधन झालं तेव्हा आम्ही त्यांचं नेत्रदान केलं. आता मी स्वत: देखील देहदान करण्याचा संकल्प केला आहे.”
कीर्तनातून देहदान, नेत्रदान, अंधश्रद्धा, बुवाबाजी, व्यसनमुक्ती, वृक्षारोपण, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, निर्मलगाव यासारख्या विषयांवर तुषार प्रबोधन करत असतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता आणि भारतीय संविधान हे त्याच्या कार्यक्रमाचे आधार ग्रंथ. अनेकदा कार्यक्रमात लोक कीर्तन ऐकल्यावर व्यसनमुक्तीचा तर कोणी रक्तदान, देहदानाचा संकल्प करीत असतात. एकंदरीत सप्तखंजेरी हे नुसते वाद्य नसून ते परिवर्तनाचं फार मोठं माध्यम ठरत असल्याचं तुषारचं म्हणणं आहे. संपूर्ण महाराष्ट्र, तसेच आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पंजाब इत्यादी प्रांतात आपल्या सप्तखंजेरी प्रबोधनाचे कार्यक्रम त्याने सादर केले आहेत. शाळा, कॉलेज, अनाथालय, वृद्धाश्रम, कारागृहात देखील त्याचे खंजेरी वाद्य आणि कीर्तन प्रसिद्ध आहेत. ठिकठिकाणी १८०० च्यावर त्याच्या कीर्तनाचे कार्यक्रम झालेले आहेत..
विदर्भ गौरव पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा व्यसनमुक्ती पुरस्कार, समाज प्रबोधन पुरस्कार, महाराष्ट्ररत्न पुरस्कार, नागपूर भूषण पुरस्कार, युवा कलारत्न पुरस्कार, फुले-शाहु-आंबेडकर समता पुरस्कार, असे एकूण ४५ पुरस्कार त्याच्या नावावर आहेत. नुकताच महाराष्ट्र शासनाचा संत चोखामेळा पुरस्कार त्याला जाहीर झाला आहे.
तुषार सूर्यवंशी संपर्क क्र. – ८००७३८५९९७ / ९४२२१२७३८९
 सप्तखंजिरीचा नाद अनुभवण्यासाठी पुढील लिंकला भेट द्या.
https://www.facebook.com/sampark.net.in/videos/370690207078697/

- हर्षा रोटकर, नागपुर.

Tuesday 12 February 2019

त्यांचं बालपण त्यांना मिळवून द्यायला हवं



तुळजापूरचं भवानी मंदिर. एकीकडे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्यांची गर्दी. तर दर्शन घेऊन बाहेर येताच भीक मागणाऱ्या मुला-मुलींची गर्दी. हे तुळजाभवानी मंदिरातलं रोजचं चित्रं. मंदिर परिसरामध्ये सर्व वयोगटातील मुलं-मुली, भक्तांचे दर्शन झाल्यानंतर त्यांचे हात पकडून, कपडे पकडून भीक मागतात. कित्येकदा तर ही मुलं भीक दिल्याशिवाय त्यांच्यापासून दूर जात नाहीत. या प्रकारामुळे भाविकांना नाहक त्रास होतो. हा प्रकार अनेक वर्षापासून सुरू आहे स्थानिक पातळीवर या मुलांना या कामापासून दूर करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र त्यांचा या भिकाऱ्यांवरती कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. दिवसेंदिवस हा प्रकार वाढत चालला आहे.
भाविकांना होणारा त्रास लक्षात घेऊन राष्ट्रीय अपराध जांच ब्युरोचे जिल्हा सूचना अधिकारी संजयकुमार बोंदर यांनी या प्रश्नांमध्ये लक्ष घालून तुळजाभवानी मंदिर समिती, तुळजापूर पोलीस स्टेशन, तुळजापूर नगरपरिषद, उस्मानाबाद जिल्हा महिला व बालकल्याण विभाग तसेच राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे यांच्याकडे तक्रार केली. गेल्या सहा महिन्यापासून याविषयी या खात्याअंतर्गत परस्परांना पत्रव्यवहार करून कारवाईचे आदेश देण्यात आले. परंतु प्रत्यक्ष कारवाई करण्यासाठी मात्र कोणताही विभाग पुढे आलेला नाही. या अंतर्गत जबाबदारी असणारे अधिकारी आणि त्यांचे प्रशासन सदर जबाबदारी आमच्या खात्याची नसल्याचे सांगून कारवाई करण्यापासून दूर जात आहेत. या भिकारी मुलांना या कामापासून दूर करून त्यांच्या शैक्षणिक आणि कौटुंबिक प्रगतीसाठी हातभार लावण्यासाठी खरे प्रयत्न व्हायला हवेत. पण, इथं मात्र, कायद्यातील तरतुदी पुढे करून प्रशासनातील मंडळी ही उपाययोजना करण्यापासून दूर राहत आहेत.

महिला व बालकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कारवाईसाठी आमच्या कार्यालयाकडे पुरेसा फंड नसल्याचे कारण पुढं केलेलं आहे. या खर्चासाठी त्यांनी राज्य सरकारच्या महिला बालकल्याण विभागाकडे मागणी केल्याचे सांगितलं. दरवेळी होणारी दिरंगाई लक्षात घेता हा प्रश्न निकाली निघणे अवघड दिसतो आहे. संजयकुमार बोंदर यांच्यासारखी व्यक्ती याकामासाठी अनेक महिन्यापासून काम करते आहे. आता प्रशासनाने याबाबत गांभीर्याने दखल घेऊन कार्यवाही करणं गरजेचं होतं. मात्र प्रशासनामधील अधिकाऱ्यांमध्ये या प्रश्नाबाबत गांभीर्य दिसून येत नाही त्यामुळे याप्रश्नी सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांला अपयशाला सामोरं जावं लागत असल्याचं हे चित्र.
 

खरतर, बालकास भीक मागण्यास लावणाऱ्या व्यक्तीसाठी किमान सात ते दहा वर्षापर्यंत सश्रम कारावास आणि पाच लाख रुपयापर्यंतची दंडाची शिक्षा होऊ शकते. तर, भीक मागण्यासाठी बालकास अपंग करणाऱ्या व्यक्तीस दहा वर्षांपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा होऊ शकते अशी तरतूद कायद्यामध्ये आहे.
कायद्यामध्ये अनेक तरतुदी असल्या तरी तुळजाभवानी मंदिर परिसरातील लहानग्यांपर्यंत त्या पोहोचू शकत नाहीत, हे इथलं खरं चित्रं. या सगळ्यातून घटनेने दिलेला चांगलं जगण्याचा, शिक्षणाचा मूलभूत हक्कच आपण या मुलांपासून हिरावून घेत आहोत. आता तरी प्रशासनाने या मुलांकडे पाहावं आणि त्यांचं बालपण त्यांना मिळवून द्यावं.
- अनिल आगलावे, तुळजापूर 

वेड्यांना जवळ करणारा ‘ध्येयवेडा’


एरवी रस्त्यात कुठं वेडा इसम दिसला की सगळेच त्याच्यापासून दूर पळतात, त्याला टाळायचा प्रयत्न केला जातो. काही टारगट मुलं त्यांना त्रास देतात, त्यांची मजा घेतात, इतकेच काय तर त्यांच्या अंगावर असले नसलेले कपडे फाडण्यातही धन्यता मानतात. मात्र वेड्यांच्या अंगावरचे हेच फाटलेले किंवा मळलेले कपडे बदलवून त्यांना चांगले कपडे घालायला देणारा एक ‘ध्येयवेडा’ अकोल्यात आहे, आणि त्याचं नाव आहे पुरुषोत्तम शिंदे.
शिंदे मूळचे पातुर तालुक्यातील चरणगांवचे. कामधंद्यानिमित्त बरेच वर्षांपासून अकोल्यातील राऊतवाडी परिसरात त्यांचा मुक्काम आहे. घाऊक औषधी विक्रीचा व्यवसाय. त्यामुळे अकोल्यासह, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यात त्यांची सतत फिरती सुरू असते.

साधारण 15 वर्षांपूर्वीची गोष्ट. शिंदे अशाच एका फिरतीवर होते. रस्त्याने जात असताना त्यांचे लक्ष रस्त्यावरील एका वेड्याकडे गेलं. शहराच्या बाहेर हायवेवर हा माणूस फाटक्या तुटक्या कपड्यात रस्त्याच्या कडेला बसला होता. थंडीचे दिवस होते. शिंदे यांच्या गाडीच्या डिक्कीत त्यांचा स्वतःसाठीचा एक जास्तीचा ड्रेस होता. तो त्यांनी काढला आणि क्षणाचाही विचार न करता त्या वेड्या इसमाला घालून दिला. त्याच्या अंगावरचा घाणेरडा झालेला ड्रेस फेकून दिला. हे सर्व सुरू असतांनाच त्या इसमाच्या डोळ्याच्या कडा पाणावल्याचे शिंदे यांच्या लक्षात आलं. याचा अर्थ त्याला हे सर्व कळत होतं. पण, आजपर्यंत इतक्या मायेने कोणी त्याची चौकशीच केली नव्हती. निघतांना त्याने पुरुषोत्तम शिंदेचा हात एवढा घट्ट पकडून ठेवला की शिंदेनाही तिथून निघवत नव्हतं. पण पुढच्या कामाच्या जबाबदारीमुळे त्यांना जावंच लागलं. पण, त्याने घट्ट पकडलेला हात मात्र शिंदेना स्वस्थ बसू देत नव्हता.
त्यानंतर जेव्हाही पुरुषोत्तम शिंदे घराबाहेर पडायचे तेव्हा गाडीच्या डिक्कीत एक-दोन पॅन्ट, शर्ट घेऊनच. आणि इथूनच त्यांचं काम सुरू झालं. जिथं कुठं त्यांना वेडा इसम दिसेल, तिथंच ते त्याला सोबत असलेल्या शर्ट-पॅन्टचा ‘आहेर’ करायचे. मगच पुढंच काम. आतापर्यंत पाचशे पेक्षा जास्त वेड्यांना त्यांनी पॅन्ट-शर्ट घालून दिले आहेत.
एकदा कुणी वेडा किंवा पागल ठरला की मग सगळे लोकं अगदी घरचे सुध्दा त्याला टाळायला लागतात. मग अंगावरच्या कपड्यानिशी जे मिळेल ते खात अशी वेडी माणसं रस्त्याच्या कडेला पडलेली असतात. त्यांच्या अंगावरचे कपडे कित्येक महिन्यांपासून असतात. मळक्या, अस्वच्छ कपड्यांमुळे त्यांना एखादा आजार होण्याची शक्यता हेरून पुरुषोत्तम शिंदे त्यांचे ‘वस्त्रदाता’ झालेत.
शिंदे म्हणतात की, “कुणीही जन्मताच वेडा नसतो. एखादा प्रसंग, एखादी घटना, त्याला वेडा बनवित असते. आणि एकदा का कोणी वेड्यासारखं वागू लागला की मग लोकंही त्याच्यापासून दोन हात दूरच राहतात.” शिंदे मात्र त्यांच्या जवळ जातात, त्यांच्याशी आपुलकीने बोलतात, त्यांना मोकळं होण्यासाठी मदत करतात. या मदतीमुळेच काही वेड्यांना समुपदेशन करून घरी पाठवण्यातही त्यांना यश आलं आहे.
बर्‍याच वेड्यांशी त्यांची चांगली मैत्री झाली आहे. पुरुषोत्तम शिंदे सहजही त्यांना भेटायला जातात. त्यांच्यासाठी खायला काहीतरी नेतात. थंडीच्या दिवसात त्यांना स्वेटर, ब्लँकेट देतात, उन्हा-पावसाळ्यात छत्री देतात.
बरेचजणं आपआपल्या परीने समाजसेवा करीत असतात. मात्र अशी आगळी वेगळी समाजसेवा करणारे पुरुषोत्तम शिंदे बहुदा एकमेव असावेत.
पुरूषोत्तम शिंदे यांचा संपर्क क्र. - ९८२३७९३८२०

- नीरज आवंडेकर, अकोला

संक्रातीचं वाण यंदा बालग्रामला







परभणीमधल्या गजानन नगरातलं विठ्ठल मंदिर. गेल्या आठवड्यातल्या रविवारची गोष्ट. श्रीहरी गोविंद प्रतिष्ठान आणि ज्ञानेश्वरी महिला मंडळाचा कार्यक्रम. कार्यक्रम संक्रातीच्या हळदीकुंकूवाचाच पण काहीसा वेगळा. वाण सामूहिक. बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथं असलेल्या बालग्राम संस्थेला. अनाथ मुलांच्या संगोपनाचं काम ही संस्था करते. संस्थापक संतोष गर्जे यांना मान्यवरांच्या हस्ते ४१ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.
मंडळात ३३ महिला. वाणासाठी प्रत्येकी एक हजार रुपये किंवा इच्छेनुसार त्यापेक्षा अधिक. अध्यक्ष सुजाता भंडारे यांनी या मंडळाची स्थापना केली. मंडळ गेल्या १० वर्षांपासून वाणासाठी पैसे खर्च न करता जमा झालेली रक्कम एखाद्या गरजू संस्थेला देत आहे. अशा प्रकारे आतापर्यंत शहरातल्या ज्ञानदीप विद्यालयातले गरजू विद्यार्थी, मनीष बालसदन, पुण्यातील अपनाघर वृद्धाश्रम, उदगीर इथली स्नेहाधार संस्था, नाम फाऊंडेशन, औरंगाबादमधलं सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ यांना मदत देण्यात आली आहे. सामाजिक ऋणातून उतराई होण्यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचं महिला सांगतात.
या मंडळाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही राजकीय पदाधिकार्‍यांकडून देणगी स्वीकारली जात नाही. त्यांचे शुभेच्छाफलकही लावले जात नाहीत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक राजेंद्र पोकर्णा. महापौर मीनाताई वरपूडकर, भाजपा महिला कार्यकारिणी सदस्य मेघना बोर्डीकर, नगरसेविका माधुरी बुधवंत , त्वचारोगतज्ञ डॉ स्मिता चिलगर, जयभवानी महिला सहकारी सूतगिरणीच्या अध्यक्ष डॉ संप्रिया पाटील आणि मान्यवरांची उपस्थित होते.

-बाळासाहेब काळे, परभणी 

इतिहासातली ठेव मुलांनी आणली जगासमोर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातलं असरोंडी गाव. गावाच्या सीमेलगतच्या किर्लोस सड्यावरचा अश्मयुगीन कातळशिल्पांचा खजिना. हा खजिना माध्यमिक विद्यामंदिर असरोंडी शाळेच्या 45 मुलांनी परिश्रमपूर्वक शोधून काढला आहे. विद्यार्थी 10 वीचे. इतिहासाच्या पुस्तकातला 'ऐतिहासिक ठेव्याचे जतन' हा धडा. इतिहास शिक्षक कमलेश गोसावी. वर्गातील अध्यनाव्यतिरिक्त मुलांना प्रत्यक्ष क्षेत्रभेटीवर घेऊन जाता येईल का? यावर डोक्यात विचार सुरू झाला.
जिल्ह्यात विर्डी (दोडामार्ग), कुडोपी, बुधवळे, हिवाळे, वडाचा पाट (मालवण), पोखरण (कुडाळ), दाभोळे (देवगड) याठिकाणी या अगोदर कातळशिल्पे सापडली आहेत. 



चार ते पाच हजार वर्षांपूर्वीचा हा ठेवा. अश्मयुगातल्या प्राचीन आदिमानवाने निर्माण केलेला. किर्लोस सड्याबाबतही स्थानिकांकडून काही माहिती कानावर आली होती. असरोंडी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व्ही. के. सावंत यांनीही पुढाकार घेतला.
दीड महिन्यापूर्वी एका रविवारी सकाळी सात वाजता व्ही. के. सावंत, कमलेश गोसावी, प्रभारी मुख्याध्यापक सुशांत पाटील, शिक्षक भगीरथ इंदरकर, प्रदीप सावंत, कुडाळमधल्या समानवता ट्रस्टचे नितीन तळेकर आणि विद्यार्थी निघाले. जंगलातून खडतर पायवाटेने चालत चार किलोमीटरवरच्या ऐकीव स्थळापर्यंत सर्व पोहोचले. परिसराची साफसफाई केली. तब्ब्ल साडेचार तास परिसर पिंजून काढण्यात आला. डुक्कर, घोरपड, ससा, गाय,बैल, उभ्या-आडव्या रेषांचा समतोल साधत साकारलेला मानव, विशेष भौमितीय प्रतिकृती अशी 12 कातळशिल्पे मुलांनी शोधली. कातळशिल्पांचा शोध घेताना मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. जिज्ञासा जागृत होत होती. या परिसरात मोठ्या प्रमाणावर कातळशिल्पांचं अस्तित्व असून ती अजूनही दुर्लक्षित असल्याचे स्थानिक सांगतात. मुलांनी त्यातली 12 जगासमोर आणली आहेत.
''गोव्याने आपल्या राज्यात सापडलेल्या कातळशिल्पांचे जतन आणि संवर्धन करून पर्यटकांसाठी ठेवा उपलब्ध केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कातळशिल्पांचेही असेच संवर्धन केले गेल्यास अभ्यासूंना त्याचा लाभ होईल,'' असं मत कमलेश गोसावी यांनी व्यक्त केलं.


-विजय पालकर, सिंधुदुर्ग

लैंगिक शिक्षण मार्गदर्शन कार्यशाळा’

सातवीच्या बाई वर्गात शिकवतायत. मधल्या बाकांवरच्या दोन मुलांचं काहीतरी चालल्याचं त्यांच्या लक्षात आलं. दुर्लक्ष करत त्या शिकवत राहिल्या. ७-८ दिवसांनी ही मुलं पँटच्या चेनमध्ये हात घालत असल्याचं त्यांना पुन्हा आढळलं. आणि मग सर्व ओळीनं बाथरूमला जायचं सांगून उठली. दुसऱ्या दिवशीही परत तेच...
- आठवीतली नेत्रा वर्गात उत्तर द्यायला उभी राहिली आणि बाजूने मुलांच्या रांगेतून आवाज “ए विनोद, ए विनोद”. मुलं जोरात हसतायत. नेत्राला कसंसच झालं. ती उत्तर न देता खाली बसली. तीन-चार वेळा असं झालं. कॉरिडॉरमधून येता-जातानाही हाच प्रकार. तिने घरी आईला सांगितलं, “मी उद्यापासून शाळेत जाणार नाही”.
- नववीतला अंगद. त्याच्या घरी कार्यक्रम होता. त्याचे चार मित्रही आले होते. पाचही मुलं अंगणात फोनमध्ये डोकं घालून होती. एकमेकांना काही दाखवत होती. ही मुलं देहभान विसरून फोनमध्ये काय एवढं डोकं घालून बसलीत, पाहायला अंगदची आत्या त्यांच्याजवळ गेली आणि हादरलीच. मुलं फोनमध्ये ‘पोर्न सिन्स’ पाहत होती.
हे तीनही प्रसंग अपवादात्मक नाहीत. उलट नेहमीचेच आहेत. किशोरवयात अर्थात ‘टिन एज’मध्ये प्रवेश करताना, मुलामुलींना शारिरीक आणि मानसिक पातळीवर खूप बदल जाणवत असतात. लैंगिकतेशी संबंधित गोष्टी जाणून घ्यायची त्यांना ओढ वाटू लागते. हा विषय कुटुंबात, घरात बाद असतो. मग, मित्र-मैत्रिणींबरोबरच्या गप्पाटप्पा, कधी सिनेमा, टीव्ही आणि इंटरनेट ही माहिती मिळवण्याची माध्यमं वापरतात मुलं. पण या सर्वच माध्यमांतून मिळणारी माहिती किती खात्रीशीर असते? तिथे मुलामुलींच्या शंकांना कितपत खरी उत्तरं मिळतात?
अलिकडे, मुलींची मासिक पाळी हा विषय बराच चर्चेत आलाय. त्याविषयी मुलींच्या कार्यशाळाही होत असतात. काही प्रमाणात तरी मुलींमध्ये जागृती सुरू झालीये. पण ‘मुलग्यांचं’ काय? आपल्याकडे अजूनही बहुतांश पालक मुलांशी या गोष्टींवर मोकळेपणाने बोलत नाहीत. यानं मुलांचा गोंधळ वाढत जातो. मुलं आपलेआपले बरेवाईट मार्ग शोधू लागतात. काही गोष्टी ‘ट्राय’ केल्या जातात. कधी एकट्याने तर कधी मित्रांसोबत. यातला धोका त्यांना कळत नाही. या धोक्यापासून मुलांना वाचवण्याचा उपाय – त्यांना लैंगिक शिक्षण देणं. मुलांना त्यांच्या अवघड नाजुक वयात मदत करण्याच्या हेतूने ‘नवी उमेद’ इयत्ता सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांकरता ही ‘लैंगिक शिक्षण मार्गदर्शन कार्यशाळा’ आयोजित करत आहे. यात पुरूष आणि महिला डॉक्टरांची स्वतंत्र टीम मुली आणि मुलग्यांचे वेगळे गट करून मुलांना माहिती देतील. स्लाईड शो, व्याख्यान आणि सहभागींचे शंकानिरसन असं या कार्यशाळेचं स्वरूप आहे. अशी पहिली कार्यशाळा आज, 28 जानेवारीला आयोजली आहे.
स्थळ: ठाण्यातील वर्तक नगर भागातील श्रीमती सावित्रीदेवी थिराणी विद्यामंदीर शाळा.
मार्गदर्शक: डॉ नितीन जोगळेकर, डॉ रेखा थोटे आणि त्यांचे सहकारी.
कार्यशाळेत काय सांगितलं गेलं ते आणि सहभागींचं मनोगत आम्ही नंतर इथे शेअर करूच.
- साधना तिप्पनाकजे, ठाणे

उजेडची अनोखी गांधीबाबा यात्रा

“सर्वांना सुखाचा घास अन श्वास मिळावा म्हणून निःस्वार्थी भावनेने उभे आयुष्य कारणी लावणारा माणूस देवापेक्षा वेगळा नसतो. इंग्रजांच्या जुलमी जोखडातून देश स्वतंत्र करण्यासाठी महात्मा गांधींजीनी उभे आयुष्य कारणी लावले. तेच आपणा सर्वांचे देव आहेत...” लातूर जिल्ह्यातील उजेड गावचे अजित कदम त्यांच्या गावातील अनोख्या गांधीबाबा यात्रेबद्दल सांगत होते. महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ लातूर जिल्ह्यातील उजेड या गावी २४ ते २७ जानेवारी दरम्यान गांधीबाबा यात्रा भरते.

या यात्रेमागची कहाणी मोठी रंजक आहे. याबाबत अजित म्हणाले, “पूर्वी हिसामाबाद नावाने ओळखलं जाणारं उजेड हैदराबाद संस्थानात होतं. चांदपाशा पटेल यांच्याकडे गावचा कारभार होता. त्यावेळी गावात पिराचा उरूस भरत असे. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झालं. नंतर ऊरूस बंद पडला. स्वातंत्र्यानंतर तो पुन्हा सुरू करण्याची इच्छा चांदभाईंना झाली. यासाठी त्यांनी पंचायत बोलावली. पण हिंदूना महादेवाची यात्रा तर मुस्लिमांना पिराचा उरूस हवा होता. दोन गट पडले. शेवटी हा तिढा सोडवण्याची जबाबदारी ग्रामस्थांनीच चांदभाई, राम रेड्डी, गोविंद मास्तर, भीमराव रेड्डी, वामनराव पवार, मल्लिकार्जुन बिराजदार, नारायण खोडदे, धोंडीराम बिराजदार, राजाराम कांबळे, बाजीराव पाटील, शिवलिंग स्वामी, दिगंबर पटवारी यांच्यावर सोपवली. ही मंडळी जो निर्णय घेतील तो सर्वमान्य राहील असं ठरलं. एक दिवसानंतर पुन्हा पंचायत बसली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे गांधीबाबा हेच आपले देव आहेत. त्यांच्या नावाने यात्रा सुरू करावी असा सल्ला या मंडळींनी दिला. काही तासांपूर्वी गंभीर असलेल्या गावकऱ्यांनी या निर्णयाचं साखर वाटून स्वागत केले. वर्गणी काढली गेली. आणि हैदराबाद येथून गांधीजींचा पुतळा आला. २६ जानेवारी १९५४ पासून गांधीबाबा यात्रा सुरू झाली.

या यात्रेसाठी सासुरवाशिणी माहेरी येतात. त्यांना मानाची साडी - चोळी केली जाते. नातेवाईकानाही आग्रहाचे निमंत्रण मिळतं. नोकरी-धंद्यानिमित्त बाहेरगावी असलेल्या व्यक्ती उजेडला येतात. पंचक्रोशीतील गावकरीही सामील होतात. घरा-घरात गोडधोड होते; चौकात बाजार भरतो. दीपावलीचं वातावरण गावभर तयार होतं. २४ जानेवारीला ग्रामपंचायतीतील महात्मा गांधींचा पुतळा वाजत गाजत चौकात स्थापन केला जातो. त्याचं पूजन केलं जातं. आणि प्रजासत्ताक दिनी त्यास पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. राष्ट्रभक्ती जागवणारे कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेतल्या जातात. जिल्हा परिषदेच्या वतीने पशुप्रदर्शन भरते. आणि कुस्ती स्पर्धेने यात्रेची सांगता होते.
यात्रा सुरू झाली तेव्हा गावात विजेची सोय नव्हती. चांदभाईंचे बंधू अब्दुल यांनी पाण्याच्या इंजिनवर वीज निर्माण करून अनेक बल्ब सुरू केले होते. यामुळे गांधी चौक लखलखत होता. पहिलं गांधी पूजन आणि ध्वजारोहणासाठी त्यावेळच्या उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. हा माहोल पाहून ते आश्चर्यचकित झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील या गावातच असा उजेड मी पाहिला त्यामुळे या गावाला आता उजेड म्हणावं लागेल, असं ते सहज बोलून गेले. तेव्हापासूनच हिसामाबादचं नाव उजेड झालं.
इथली माहेरवाशीण ज्योती कदम म्हणते, “दिवाळी, पंचमीसारखीच आम्हाला गांधीबाबा यात्रेची ओढ असते. त्यानिमित्ताने माहेरला जाणं होतं. मैत्रिणींना भेटणं होतं. ख्यालीखुशाली कळते. मानाची माहेरची साडीही मिळते.”

- प्राजक्ता जाधव, लातूर 

असंही वाण

नुकतीच संक्रांत झाली. त्यामुळे आता रथसप्तमीपर्यंत सर्वत्र हळदी कुंकू, लुटायचे वाण यांची नुसती रेलचेल बघायला मिळते. नाशिकच्या आत्मजा या महिला गटानेही असं वाण लुटायचं ठरवलं. पण, परिस्थितीनुसार त्याचं स्वरूप त्यांनी बदलायचं ठरवलं.
गटातील यशश्री रहाळकरने नाशिक येथील ‘पडसाद’ या कर्णबधीर विद्याालयात गरजेचे साहित्य देण्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेला अर्चना काळे, आरती गरूड, कीर्ती मांगळे, गीता साळसकर, स्वाती कुलकर्णी, रुपल मेहता यांनी प्रत्यक्षात आणलं. शैक्षणिक साहित्याच्या पलीकडे विद्यार्थ्यांच्या काही गरजा असतात हे लक्षात घेत प्रत्येकीने आपल्या आर्थिक क्षमतेनुसार २०० रुपये प्रत्येकी अशी रक्कम गोळा केली. या जमा झालेल्या रकमेतून या गटाने मुख्याध्यापिका सौंदाणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेतलं. विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. मुलांना कपडे धुण्याचा साबण आणि ब्रश, तर मुलींना सॅनिटरी पॅड घेण्यासाठी मदत देण्यात आली.

याविषयी यशश्री रहाळकर म्हणाल्या, “वाण लुटणं म्हणजे केवळ वस्तुंची देवाण घेवाण नसते. त्यातून स्त्रीत्वाचा सन्मान केला जातो. प्लास्टिकच्या किंवा अन्य वस्तू ज्या आपल्याकडे आहेत. त्या वस्तू जमा करण्यापेक्षा गरजवंताला मदत करणे महत्त्वाचे आहे, ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. ही शिकवण रुजवण्याचाच हा छोटासा प्रयत्न. पडसादमधील विद्यार्थी हे वंचित समाजातून आले आहेत. सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत आणि त्या खूप साध्या आहेत. याचा विचार करत हे पाऊल आम्ही उचललं. मुलांना साबण आणि मुलींना सॅनिटरी नॅपकिन घेण्यासाठी पैसे देत या सणाचा वेगळ्या पध्दतीने आनंद लुटला याचं समाधान वाटतं.”
एरवी संक्रातीचा सण आला की महिला आपल्या परिसरातील सुवासिनींना बोलावून वाण लुटण्यात दंग होतात. यात प्रामुख्याने प्लास्टिक बरण्या, वाट्या, चमचे, शोभेच्या वस्तु, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, पापड, लोणचे, सौंदर्य प्रसाधने अशा विविध वस्तुंचे वाण लुटले जाते. काही वर्षापासून पर्यावरणपूरक संक्रातचा संकल्प करत काही महिला कापडी पिशव्या, पुस्तकं, शोभेची फुलझाडं, चिमणीचं घरटं, तुळशीचं रोप अशा पर्यावरणपूरक पर्यायाचा अवलंब करत सुवासिनीला वाण देत आहेत. मात्र ‘आत्मजा’ महिलांच्या समुहाने संक्रातीचं वाण लुटण्यात सामाजिकदृष्ट्या अजून एक पाऊल पुढं टाकलं. सुमारे २० महिलांचा हा गट ‘स्व ते समाज’ या शीर्षकाखाली एकमेकींशी जोडला गेला आहे. स्वत:चे व्यक्तीमत्व खुलवत असतांना आपण समाजाचे काही देणे लागतो, त्यासाठी काय करू शकतो या विचाराने प्रेरित होत आत्मजाचे काम सुरू आहे. महिन्याकाठी शहर परिसरातील वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना भेट द्यायची, तेथील समस्या समजून घ्यायच्या त्यावर काम करायचं हा यांचा दिनक्रम.

- प्राची उन्मेष, नाशिक

मोकाट कुत्र्यांपासून त्यांनी केली नांदेड शहराची सुटका

मोकाट, भटकी कुत्रे ही अनेक गावातील खूप मोठी गंभीर समस्या. दरवर्षी पिसाळलेल्या कुत्र्यांच्या चाव्यामुळं, अनेकांना प्राण गमवावे लागतात किंवा रेबिजपासून वाचण्यासाठी अनेक इंजेक्शन टोचून घ्यावे लागतात. नांदेड शहर मात्र या मोकाट कुत्र्याच्या त्रासापासून २०१३ पासून मुक्त झालं आहे. याचं श्रेय जातं, त्यावेळचे नांदेड मनपाचे मानद पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय वसंतराव लाड यांना.
२०१३ पूर्वी नांदेड शहरातील लोक व मनपा मोकाट कुत्र्यांच्या त्रासाने गांजलेलं होतं. रेबिज आजार झाला की कुत्रा पिसाळत असे आणि दिसेल त्या व्यक्तीवर हल्ला करून त्याला चावा घेई. या हल्ल्यात अनेक वेळा लोकांना आपले प्राण गमवावे लागत असतं. हा रेबिज झालेला कुत्रा दुसर्‍या कुत्र्याला चावला की, दुसरे कुत्रे देखील या रोगाने ग्रस्त होत असतं. परिणामी शहरात असं कुत्रं आढळलं की, पूर्वी मनपा अशा कुत्र्यांना विष घालून मारे. त्यावेळी शहरातील रस्त्या रस्त्यावर मेलेल्या कुत्र्यांचे ढीग पडत असतं. तसंच रेबिज झालेल्या कुत्र्‍याबरोबरच निरोगी कुत्री व इतर अनेक प्राणी विषबाधा होऊन मरत असत. हा साराच प्रकार अतिशय क्रूर आणि भयंकर असा होता.
२००२ साली, चेन्नई येथे भारत सरकारच्या जिवजंतू कल्याण बोर्डातर्फे अशिया खंडातील पशू चिकित्सकांची एक परिषद घेण्यात आली होती. त्यात डॉ. लाड सहभागी झाले होते. तेथे बाली या बेटावरील डॉक्टरांचा एक गट आला होता. त्यांनी कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचं ट्रेनिंग दिलं. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, त्यांचा बाली हा देश संपूर्णपणे रेबिजमुक्त देश आहे. या गोष्टीचं डॉ. विजय लाड खूप कौतुक वाटलं. नांदेड शहरातील मोकाट कुत्रे व रेबिज आजार यावर काही काम करता येईल का? असा विचार करतच ते चेन्नईचं ट्रेनिंग पूर्ण करून परतले. त्यावेळी त्यांचे मित्र डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार उपायुक्त म्हणून नांदेड मनपात कार्यरत होते. डॉ. लाड यांनी शहरातील मोकाट कुत्रे व रेबिज आजार या पासून नांदेडवासियांची मुक्तता करण्यासाठी ‘मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण’ करण्याचा प्रस्ताव त्यांच्या समोर मांडला. पुलकुंडवार हे स्वतः प्राण्यांचे डॉक्टर. त्यांना ही कल्पना आवडली. त्यांनी व डॉ. लाड यांनी याचा रितसर प्रस्ताव तयार करून तो त्यावेळचे नांदेड मनपा आयुक्त किरण कुरूंदकर यांच्या समोर मांडला. त्यांनी तो लगेच मंजूर केला. आणि डॉ. लाड यांची या कार्यासाठी मनपाचे मानद पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक केली. २००२-२००४ या तीन वर्षाच्या कालावधीत केंद्र सरकारच्या पशू वैद्यकीय सेवा संस्थाने देखील ‘मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरण’ योजनेस पाठिंबा देऊन ७५ हजार रूपयांचे अर्थसहाय्य नांदेड मनपा व डॉ. लाड यांना दिलं. या अर्थिक सहाय्याच्या मदतीने डॉ. लाड यांनी कुत्रे पकडण्यासाठी कर्मचारी, तीन चाकी गाडी, पिंजरे, जाळे, स्वतःच्या दवाखान्यात ऑपरेशन रूम तयार केली. डॉ. लाड यांच्या निर्बिजीकरण टिममधील कर्मचारी रोज शहरातील विविध भागात, वस्त्यात जाऊन तेथील मोकाट कुत्रे पकडून आणत असतं. डॉ. लाड त्यांच्यावर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रीया करत असत. नंतर शस्त्रक्रीया झालेल्या त्या श्‍वानास दवाखान्यात ठेवून त्याची सेवासुश्रूषा करून त्यांना परत जेथून आणलं होतं तिथं सोडलं जायचं. याचं कारण सांगाताना, डॉ. लाड सांगतात, की प्रत्येक कुत्र्याचा परिसर ठरलेला असतो. एका कुत्र्याच्या परिसरात दुसर्‍या कुत्र्याला प्रवेश करता येत नाही, अशा वेळी जर एके जागी पकडलेला कुत्रा दुसर्‍या जागी सोडला तर त्याला इतर कुत्रे मारून टाकतात. त्यामुळं निर्बिजीकरण झालेल्या कुत्र्याला परत त्यांच्या एरियात सोडणं भागं होतं. डॉक्टर सांगतात, “कुत्रं परत त्याच्या पूर्वीच्या परिसरात सोडण्यास जात असू तेव्हा आमची खरी परीक्षा असायची. कारण तेथील लोक आम्हाला विरोध करत असत. तुम्ही पुन्हा कुत्रं येथे सोडू नका, म्हणून भांडत असत. मग आम्हाला त्यांना समजाऊन सांगताना नाकी नऊ येई. सुरूवातीच्या काळात आमच्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण कार्यक्रमाला वृत्तपत्रातून खूप विरोध झाला. आमच्यावर टीका झाली. परंतू मी करत असलेल्या कामचे फायदे लक्षात आल्यानंतर लोकांनी विरोध करणं सोडून, आमचं कौतुक करण्यास सुरूवात केली.”
तीन वर्ष केंद्राची मदत आली, नंतर ती बंद झाली. त्यानंतर हा कार्यक्रम कसा चालवायचा? खर्च कसा भागवायचा? हा प्रश्‍न होता. अशावेळी नांदेड मनपा आणि डॉ. लाड यांची ‘सोसायटी फॉर प्रिव्हेंन्शन ऑफ क्रुयालिटी टु अ‍ॅनिमल्स’ यांनी पुढाकार घेतला. आणि २००२ पासून सुरू झालेला हा कार्यक्रम २०१३ पर्यंत न थकता चालू राहिला. या कालावधीत त्यांनी शहरातील १०, ००० पेक्षा अधिक कुत्र्यांचे निर्बिजीकरण केलं.
या निर्बिजीकरण कार्यक्रमाचा फायदा आजतागायत नांदेडवासियांना मिळतो आहे. याचा परिणाम म्हणून शहरातील मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आलं. कुत्रे माजावर आल्यानंतर त्यांची आपसात होणारी भांडणं थांबली. परिणामी त्यांना होणार्‍या जखमा, त्यातून रेबिजसारखे आजार फैलावणं देखील थांबलं. आज नांदेड शहरात मोकाट कुत्री आहेत. पण त्यांची संख्या नियंत्रित आहे. या सगळ्याची सुरूवात झाली ती डॉ. विजय लाड यांच्या प्रयत्नातून.

एक चांगला पशूचिकित्सक डॉक्टर मनात आणल्यावर किती मोठं काम करू शकतो याचं हे आदर्श उदाहरण ठरावं. १९८६ साली परभणी येथील कृषी विद्यापीठातून पशूवैद्यकीची पद्वी त्यांनी घेतली आहे. डॉन्की सेंचुरी, ब्रिटन यांनी आयोजित केलेलं गांढवांच्या आरोग्यासाठीचं १५ दिवसाचं विशेष ट्रेनिंग त्यांनी २००२ साली घेतलं. ब्रिटनमधील त्या डॉक्टरांचं गाढवांविषयीचं प्रेम, त्याची काळजी घेण्याची पद्धत, या सर्वांचा डॉ. लाड यांच्यावर सखोल परिणाम झाला. हे लोक स्वतःचा देश सोडून इतक्या लांब येऊन गाढव प्राण्याच्या आरोग्यासाठी एवढे प्रयत्न करतात, हे पाहून त्यांनी पुढील आयुष्यात गाढव असो किंवा इतर कोणताही प्राणी त्याची सेवा करण्यास नेहमी तत्पर राहण्याचं व्रत घेतलं आणि ते कसोशीने पाळत आहेत. पाळीव प्राण्यांपासून, साप, विविध पक्षी, बिबटे यांच्यावर उपचार करण्यात, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ. विजय लाड नेहमीचं तत्पर असतात. त्यामुळे शहरातील सर्व प्राणी मित्रांच्या मनात डॉक्टरांविषयी विशेष आदर व प्रेम आहे.
२०१७-२०१८  मध्ये जम्मु-काश्मीरमध्ये भारतातील इतर डॉक्टरांबरोबर त्यांनी ४५ हजार कुत्र्यांच्या निर्बिजिकरणाच्या शस्त्रक्रियेत सहभाग घेतला. डॉग हॉस्टेलचा उपक्रमही अनेक वर्षापासून ते व त्यांचे बंधू चालवतात. पशुचिकित्सेचं कार्य समर्थपणे सांभाळतचं, ते ग्राहक पंचायत, महाराष्ट्रचे सचिव म्हणून कार्य करतात. डॉ. विजय लाड यांच्या कार्याची नोंद घेऊन नांदेडच्या प्राणी क्लेश निवारण समितीवर शासनाने नोव्हेंबर २०१८  साली त्यांची नेमणूक केली आहे.
विजय लाड यांचा संपर्क क्र. - ९४२२१७०५८२

- उन्मेष गौरकर, नांदेड

रेषेवरचं आयुष्य


मला माझ्या भावंडांना चांगलं शिक्षण द्यायचं यासाठी मी वाट्टेल तेवढे कष्ट घेण्यास तयार आहे, असं म्हणणार्‍या रुख्मिणीनं आपलं ध्येय खरंच पूर्ण करुन दाखवलं आहे. घरी केवळ दोन एकर पडीक शेती. त्यात बुलडाणा जिल्ह्यातला पाऊस बेभरवशाचा, घरात तीन बहिणी, एक भाऊ. आई-वडील दुसर्‍याच्या शेतात राबून पोटाची खळगी भरत. या परिस्थितीत आपलं शिक्षण कसं पूर्ण होणार या विवंचनेत असलेली रुख्मिणी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आली. पाठीवरच्या बहीण, भावाला योग्य शिक्षण मिळावं, परिवाराला चांगलं खायला -प्यायला मिळावं या जिद्दीतून तिने मार्ग निवडला तो सैन्यात भरती होण्याचा. फिनिश लाईनच्या पलीकडे दिसणार्‍या स्वप्नाला गाठण्यासाठी तिने जीव कंठाशी येईल एवढ्या वेगात धावत रेषा पार केली. आज तिचं आयुष्य खरंच रेषेवरचं आयुष्य झालंय. आता तिच्या कर्तृत्वाची साक्ष दिल्लीतील लाल किल्लादेखील देणार आहे, लेकीच्या या कर्तृत्वाचा अख्ख्या गावाला अभिमान वाटत आहे. ही कथा आहे, रुख्मिणी राठोडची.
      बुलडाणा जिल्हयातील छोटसं चायगाव. वडील परमेश्वर राठोड, आई कस्तुरा राठोड. या परिवाराचं जगणं मोलमजूरीचं. घरात पुजा, वर्षा व लहानगा रोशन. परिस्थितीवर मात करीत तिने १२ वीपर्यंत शिक्षणात मजल मारली अन् नागपूरमध्ये सैनिक भरतीत यशस्वी प्रवेश केला. ३१ मार्च २०१५ ला तिची आसाम रायफल्सच्या महिला कमांडंट तुकडीमध्ये निवड झाली. आसाम रायफल्सच्या शुकोवी येथील ट्रेनिंग सेंटरमध्ये तिचं प्रशिक्षण पूर्ण झालं. नागालॅन्डमध्येही तिने प्रशिक्षण घेतलं आहे. आसाम रायफलच्या १८४ वर्षाच्या इतिहासात अवघ्या चार वर्षापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या महिला कमांडंट तुकडीला ७१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील परेडमध्ये राष्ट्रपतींना सलामी देण्याचा बहुमान मिळाला आहे. या ऐतिहासिक १४७ महिलांच्या तुकडीमध्ये रुख्मिणी राठोडची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल ती म्हणते की, “खरोखर मला याचा मनस्वी आनंद होत असून अभिमानही वाटतो. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मेहकर येथील पोलिस ठाण्यात गेले होते, त्यावेळी बुलडाणा जिल्ह्यातून मी एकटीच महिलांच्या या रेजीमेंटमध्ये निवड गेल्याचं समजलं होतं. कुटुंबाकडून मिळालेल्या सहकार्यामुळेच मी इथवर पोहोचू शकले.”
आसाम रायफलच्या इतिहासातील ही ऐतिहासिक परेड ठरणार असून त्यासाठी आसाम रायफल्सच्या महिला रेजिमेंटच्या मेजर खुशबू आणि कॅप्टन रुची यांच्या नेतृत्त्वात पाच महिन्यांपासून रुख्मिणी ही दिल्ली येथे सहकार्‍यांसोबत कसून सराव करतेय. एका अल्पभूधारक शेतकर्‍याची मुलगी राजपथावर आता थेट राष्ट्रपतींना सलामी देणार असल्याने गावकर्‍यांना अभिमान वाटतो आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील परेडमध्ये राष्ट्रपतींना सलामी देणारी आसाम रायफल्सच्या महिलांची ही पहिलीच तुकडी आहे. राजपथावर प्रामुख्याने राष्ट्रपतींना सलामी (सॅल्युटींग डेस्क) देताना सुमारे ५०० मीटरचे अंतर या तुकडीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या सॅल्युटींग डेस्कदरम्यान ‘दाहिने देख’ करीत या महिला तुकडीला मार्च करावा लागणार आहे. त्यादृष्टीने साडेतीन किलोची रायफल घेऊन हा सॅल्युटींग डेस्क लिलया सांभाळण्याचे कसब अंगीकृत करण्यासाठी सध्या ही तुकडी सराव करत आहे. दररोज पहाटे चार वाजल्यापासूनच त्यांचा दिवस सुरू होत असून १५ ते १८ किलोमीटर अंतर त्यांना शस्त्रासह पार करावं लागतं. दररोज सहा ते आठ तास त्यांचा कसून सराव सुरू आहे. शारिरिक तंदुरुस्तीसोबतच शस्त्र हाताळण्याचे कठीण ट्रेनिंग त्यांना मिळालेले असून पूर्वोत्तर भागात घडणार्‍या एनकाऊंटरसह कठीण परिस्थिती कशी हाताळायची? याचे प्रशिक्षण या तुकडीला देण्यात आले आहे. रुख्मिणीच्या या कर्तृत्वाची साक्ष २६ जानेवारी रोजी लालकिल्ला देखील देणार असल्यानी तिच्या आई-वडिलांसह गावकर्‍यांनाही आनंद झाला आहे.
- दिनेश मुडे, बुलडाणा

जालन्याहून मुंबईत भाजीपाला विक्री

तर मित्रांनो हे आहे जालना रेल्वे स्टेशनवरचे दृश्य. फोटोत दिसणाऱ्या या बायका आठवड्यातून कमीत कमी 2 वेळेस मुंबईला जातात. हरभरा भाजी, बेल आणि बोरं हे सगळं विकण्यासाठी घेऊन जातात.
फोटोत दिसणार्‍या एकेका गाठोड्यात बोरांच्या १७ पिशव्या असतात. आणि प्रत्येक पिशवी साधारण एक किलो वजनाची. हे सगळं सकाळी त्या मार्केटमध्ये व्यापाऱ्यांना विकतात. यातून ३५०० ते ४००० रुपयांपर्यंत त्यांना एका दिवसाचं उत्पन्न मिळतं. काहीवेळा स्वतःच भाजी विकून मिळेल तश्या रेल्वेने परत निघतात.


 अर्थात हा प्रवास सोपा नाहीच. रात्री १० ता सकाळी ७ असा नऊ तासांचा. प्रवास करून त्या मुंबईत पोहोचतात. भाजी विकून त्याच रात्री उलटमार्गाचा प्रवास सुरु होतो. गरजेनुसार कधी वडापाववर भूक भागवतात. तर कधी येतांना सोबत आणलेली चटणी-भाकरी असतेच...
एकीकडे, बेरोजगारांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. काम नाही म्हणून हातावर हात ठेवून बसलेले तरूणही दिसतात. पण इथं, मात्र मुंबईसारख्या महानगरात काय विकलं जाईल याची चाचपणी करून या महिलांनी स्वतःचं घर सावरलं आहे.
- अनंत साळी, जालना

अवघड सोपे झाले हो!!

गणिताचं नाव काढलं की भल्याभल्यांच्या अंगावर काटा येतो. कॅलक्युलेटरशिवाय आकडेमोड करायची म्हटलं, तर मग घामच फुटतो. गणिताचा पाया हा शाळकरी वयातच पक्का होऊ शकतो, या विश्वासानं आम्ही सांगलीतील दहिवडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी Ajay Kale- Tech Guru या नावानं एक यूट्यूब चॅनल सुरु केलंय.दहिवडीच्या शाळेत मी २०१६ मध्ये तर पाटील सर २०१४ मध्ये रूजू झाले. पण आमची ओळख २००९ पासूनची. शिक्षण विभागातर्फे पहिलीच्या अभ्यासक्रमासाठीचे प्रशिक्षण घ्यायला मी आणि एन डी पाटील सर गेलो होतो. या प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षकांनी आम्हाला एक प्रश्न विचारला, “घरात पडलेली गाडगी- मडकी, चाक, मातीनं मळलेले कपडे पाहून कुंभाराचं घर सहज ओळखू येतं. शिक्षकाचं घर असं वेगळं ओळखता येतं का? त्यासाठी काय करावं लागेल?”
   या प्रश्नानं आम्हाला विचारप्रवृत्त केलं. शिक्षक म्हणून आपण आपलं ज्ञान अद्ययावत ठेवायला हवं, वेगवेगळ्या विषयांची किमान शंभरेक पुस्तके, उत्तमोत्तम मासिकं आणि काळाची गरज बनलेला कॉम्प्युटरही आपल्याकडे हवा, याची जाणीव आम्हाला झाली.आम्ही दोघांनी स्वकमाईतून दोन लॅपटॉप खरेदी केले. त्यासाठी आम्हाला सुमारे 70 हजारांचा खर्च त्या वेळी आला. आम्ही मुद्दाम डेस्कटॉप कॉम्प्युटरऐवजी लॅपटॉपची निवड केली, कारण लॅपटॉप सहज उचलून कुठेही नेता येतो आणि तो चार्जिंग असेल तर वीजपुरवठ्याशिवायही चालतो.

सुरुवातीला आम्ही दोघं आपापल्या शाळेत या लॅपटॉपचा वापर करून प्रचलित असणाऱ्या अभ्यासक्रमाच्या सीडी दाखवायचो. पण त्यापेक्षा वेगवेगळ्या विषयावरचं पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन मुलांना जास्त आवडतं हे लक्षात आलं. उदा. इतिहासातील पन्हाळगडास वेढा आणि बाजीप्रभूंचा पराक्रम.
एन डी पाटील सर म्हणजे गणित सोपे करून शिकविणारा जादूगार, अशी त्यांच्या हाताखाली शिकलेल्या विद्यार्थ्यांची भावना असते. पाटील सरांचं सुमारे १७ वर्षांचं ज्ञान आणि गणित सोपं करण्याची हातोटी आपल्या शाळेपुरती मर्यादित ठेवणं, मला योग्य वाटेना. मला तंत्रज्ञानाची खूप आवड आहे, या माध्यमातून काही करता येईल का, याचा विचार मी करू लागलो.
मग स्मार्टफोनच्या साहाय्यानं मी पाटील सरांच्या गणिताच्या छोट्या- छोट्या कलृप्त्यांचं चित्रीकरण करायला लागलो. हे व्हिडिओ आमच्या लॅपटॉपमध्ये सेव्ह करून प्रोजेक्टरवर मुलांना दाखवू लागलो. हा प्रयोग मुलांना फारच आवडला. पारंपरिक पद्धतीनं वह्या- पुस्तकं वापरण्यापेक्षा विद्यार्थ्यांचा सहभाग असलेले हे व्हिडिओ पाहून गणिताचा तो घटक समजून घेण्यात मुलं रंगून जायची.
आमचा हा प्रयोग गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांना फार आवडला. हा प्रयोग दहिवडी शाळेपुरता मर्यादित ठेवण्यापेक्षा इतर शाळांपर्यंतही कसा पोहोचवता येईल याचा विचार करा, असा सल्ला त्यांनी दिला आणि त्यातूनच आकाराला आलं आमचं - Ajay Kale- Tech Guru चॅनल.
टेकगुरू या यूट्यूब चॅनलवर गणितासंदर्भात कोणत्या क्लृप्त्या पाहायला मिळतील हे जाणून घेण्यासाठी क्लीक करा: https://bit.ly/2CouzIR

- अजय काळे आणि एन. डी. पाटील, ता. तासगाव, सांगली.

लेकींच्या कल्याणा शिवणकामाची शिकवणी

"लेक वाचवा, लेक वाचवा असं नुसतं म्हणून काय फायदा ? लेकीच्या कल्याणासाठी काही तरी उपक्रम राबवला, तरच खरं लेक वाचवा अभियान यशस्वी होईल.'' बबन साबळे सांगत होते. यांचं गाव धानोरा. तालुका आष्टी. जिल्हा बीड.
मुलीच्या शिक्षणाच्या निमित्ताने बबन साबळे यांचा नगरच्या स्नेहालय संस्थेशी संपर्क आला. स्नेहालयच्या संगतीचा परिणाम असा की, समाजासाठी काही तरी केले पाहिजे असा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. त्यांनी मुली- महिलांना शिलाईकामाचे प्रशिक्षण मोफत द्यायचे ठरवले. सुरुवातीला धानोरा आणि नंतर हळूहळू आसपासच्या गावातून मुली, महिला शिकण्यासाठी येऊ लागल्या. साबळे यांचे खास कौतुक म्हणजे, एखाद्या गावातून महिला, मुली जास्त संख्येने शिकण्यासाठी इच्छुक असतील तर ते स्वतः त्या गावात जाऊन त्यांना शिकवतात. बबन आणि त्यांच्या पत्नी संगीता यांनी गेल्या दोन वर्षात १०० ते १२५ मुलींना शिवणकामाचे मोफत प्रशिक्षण दिले आहे.

बबन हे तीस वर्षांपूर्वी ते त्यांच्या मूळ डोंगरगण गावाहून धानोऱ्यात आले. स्थायिक झाले. रेडिओ, टीव्ही दुरुस्तीचा व्यवसाय त्यांनी काही काळ केला. संगीताताई घरकामासोबत ब्लाऊज शिवण्याचे काम करून संसाराला हातभार लावत होत्या. कालांतराने तेही शिवणकामाच्या व्यवसायाकडे वळले. दोघांनी मिळून चांगली प्रगती केली.  याच व्यवसायाच्या बळावर साबळे दांपत्याने त्यांच्या दोन्ही मुलांना चांगले शिक्षण दिले. त्यांची मुलगी एम फार्मसीचे शिक्षण पूर्ण करून आता प्राध्यापक म्हणून नोकरी करत आहे. मुलगा इंजिनिअर होऊन खाजगी कंपनीत नोकरीस आहे. संगीता साबळे सांगतात, ''मर्यादित प्रमाणात रोजगार उपलब्ध असण्याच्या काळात ब्लाऊज , सलवार वगैरे कपडे शिवून देण्याचा व्यवसाय महिलांसाठी एकदम योग्य आहे. घरी बसून काम करता येते आणि संसाराला हातभार लावता येईल अशी अर्थप्राप्ती सुध्दा होते.'' साबळे जोडप्याची कळकळ इतकी की, संधी मिळाली तर दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या शेतकरी किंवा मजूर महिलांनादेखील शिकवण्याची त्यांची तयारी आहे. आणि त्यांचं दातृत्व असं की, मुलाच्या लग्नात त्यांनी बस्त्याच्या खर्चाला फाटा देत अपंग व्यक्तींना नवीन कपडे, गावातील गरीब महिलांना साड्या घेऊन दिल्या होत्या. सामाजिक दातृत्व दाखवायला फक्त धनाची श्रीमंती हवी असं नाही. साबळे दंपतीसारखी मनाची श्रीमंती असायला हवी, नाही का?

-राजेश राऊत,बीड

दुर्मिळ खेळांची दुनिया साकारली टेबल कॅलेंडरवर

टायर, विटीदांडू, गोट्या, सुरपारंब्या, काच कांग्र्या, भातुकली, नवरा-नवरीचे लग्न, लपाछपी, दोरीवरच्या उड्या, झिम्मा, नदीवर पोहणे, हुतूतू, खोखो, बुक्काबुक्की, चिंध्याचा बॉल, लगोरी अशाप्रकारच्या अनेक मात्र दुर्मिळ होत चाललेल्या खेळांची दुनिया टेबल कॅलेंडरच्या माध्यमातून उस्मानाबादच्या अॅड.राजेंद्र धाराशिवकर यांनी साकारली आहे. या कॅलेंडरवर त्यांनी स्वत: काढलेले फोटो, त्याला समर्पक ओळी दिल्या आहेत. अलीकडे मोबाईलवरचे गेम आणि टीव्हीवरील कार्टून्समुळे बालपणीचे जुने खेळ विसरून जात असताना अॅड.राजेंद्र धाराशिवकर यांनी कॅलेंडरच्या माध्यमातून खेळाचं विश्व उभं केलं आहे.

कॅलेंडरच्या पानोपानी बालपणीच्या वेगवेगळ्या खेळाचे फोटो, त्यावर बालमनाची भावना मांडत नव्या पिढीसमोर खेळाचे महत्व अधोरेखित करण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे.
‘मैत्रीच्या दुनियेत आनंदाने तरंगलो होतो,
कांदाफोडीच्या गमतीमध्ये भान हरवून जगलो होतो,
ते भोळे बालपणच सुंदर होते’,
अशा अनेक बालपणीच्या विश्वात नेणाऱ्या ओळींसह विविध खेळातले भावविश्व एखाद्या टेबल कॅलेंडरच्या पानांवर अधोरेखित करण्याची अनोखी कल्पना नावीन्यपूर्ण आहे.
अॅड.राजेंद्र धाराशिवकरांना फोटोग्राफीचा छंद. भ्रमंती करताना निसर्ग, पर्यटनासह माणसांच्या, पक्ष्यांच्या वेगवेगळ्या छटा ते टिपत असतात. यातील काही बोलक्या फोटोंवर त्यांनी ५ वर्षापूर्वी टेबल कॅलेंडरचा प्रयोग केला. पक्ष्यांचे विश्व, त्यानंतर वयोमानानुसार बदलते चेहरे, निसर्गाच्या छटा, जिल्ह्यातील प्राचीन मंदिरे, बालकांच्या चेहऱ्यावरचे भाव, अशा वेगवेगळ्या थीम घेऊन त्यांनी टेबल कॅलेंडर काढलं. २०१८ मध्ये त्यांनी प्रसिद्ध केलेल्या टेबल कॅलेंडरवरील छायाचित्रांची अनोखी दुनिया होती. लहान मुलांच्या चेहऱ्यावरचे लडीवाळवाणे हावभाव आणि निरागसपणा त्यांनी टिपला. त्यासोबतच हदयाला स्पर्श करणाऱ्या फोटो ओळीतून जगण्याचा संदेशही दिला. यावर्षीच्या (२०१९) त्यांच्या कॅलेंडरची निर्मिती सर्वोच्च ठरावी, अशी आहे.
बालपणातील क्रीडाविश्व त्यांनी कॅलेंडरच्या माध्यमातून उभं केलं आहे. टायर, विटीदांडू, गोट्या, सुरपारंब्या, काच कांग्र्या, भातुकली, नवरा-नवरीचे लग्न, लपाछपी, दोरीवरच्या उड्या, झिम्मा, नदीवर पोहणे,हुतूतू, खोखो, बुक्काबुक्की, चिंध्याचा बॉल, लगोरी, अशाप्रकारच्या अनेक जुन्या खेळांपासून नवी पिढी अनभिज्ञ आहे. मोबाईलवरील गेम, कार्टून्सच्या विश्वात फसत चाललेल्या आणि शारीरिक व्यायाम घडविणाऱ्या खेळांची दुनिया काय होती, हे दाखविण्याचा पुरेपुर प्रयत्न त्यांनी केला आहे. या कॅलेंडरवर प्रत्येक खेळाचे फोटो, त्यासोबत समर्पक ओळी देण्यात आल्या आहेत. यावर्षी ३०० कॅलेंडर प्रसिद्ध केली आहेत. या कॅलेंडरच्या प्रति मित्र परिवार, अधिकाऱ्यांना मेाफत भेट म्हणून दिल्या आहेत. ते म्हणतात, “भाच्याच्या मुलांना आम्ही लहानपणी खेळत असलेल्या खेळाबद्दल माहिती सांगितली. त्यांच्यासाठी हे खेळ नाविन्यपूर्ण होते. आजच्या मुलांचं बालपण अक्षरश: कोमेजून गेलं आहे. त्याला पालक इतकं जपतात की तो मोबाईल, टिव्हीच्या बाहेरच येत नाही. आजच्या पिढीला जुने खेळ ज्ञात व्हावेत, या हेतूने ग्रामीण भागात फोटोग्राफी करून कॅलेंडरच्या रूपाने समोर आणले.”
- चंद्रसेन देशमुख, उस्मानाबाद