Saturday 28 April 2018

पोलीस झाले मित्र

नाशिक शहर. इथला फुले नगर भाग. गेल्या काही वर्षात शहर परिसरातील बाल गुन्हेगारीचा वाढता आलेख आणि त्यात विनयभंगापासून लुटमारीपर्यंत लहान मुलांचा सहभाग वाढतो आहे हे पोलिसांच्या लक्षात येऊ लागलं.
यामुळेच वेगवेगळ्या कोम्ंिबग ऑपरेशन किंवा मोहिमांच्या माध्यमातून पोलिसांचा फुलेनगर वस्तीतला शिरकाव नित्याचा आहे. हे सगळं पाहूनच पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र सिंगल यांना या मुलांसाठी काहीतरी करावंसं वाटू लागलं. विचार करता त्यांना उन्हाळी बाल वर्ग घ्यायची कल्पना सुचली.
वस्तीत गेल्यावर एरवी मुलं घाबरून पळून जातात, हा त्यांचा नेहमीचा अनुभव. तरीही काही न घाबरणारी, स्वतःहून बोलायला येणारी मुलं सिंगल यांनी हेरली. आणि त्यांच्याशीच बाल वर्ग या कल्पनेविषयी बोलायला सुरुवात केली. वाचन, व्यक्तिमत्त्व विकास आणि कार्यानुभव असं काहीसं स्वरूप ठरलं.
                                                           पालकांशीही त्यांनी चर्चा केली. मुलांचे आयुष्य वाया घालवायचं की त्यांना काही वेगळं आणि चांगलं शिकवायचं हा विचार करा असं डॉ. सिंगल व पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश बर्डीकर यांनी सांगितलं. पालकांनाही दोघांचं बोलणं पटलं. मुलं उनाडक्या करत फिरत आहेत तर चांगलं बोलायला शिकतील, लिहायला शिकतील या विचाराने त्यांनी वर्गात दाखल केलं आहे. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल म्हणाले की, “उन्हाळी सुट्टी म्हणजे पालकांच्या डोक्याला ताप ठरतो. वेगवेगळी शिबिरं तसंच छंद वर्गांमध्ये मुलांना पाठवून काही कुटुंब आपली सुटका करून घेतात. पण झोपडपट्टी परिसर अशा काही पर्यायांपासून कोसो दूर आहे. या ठिकाणी ११ ते १८ वयोगटातील बालकांची संख्या लक्षणीय आहे. त्यांच्या पालकांना मुलांच्या शिक्षणाचे महत्त्व नसल्याने छंद वर्ग, त्यांचा व्यक्तीमत्व विकास या संकल्पना त्यांच्या पर्यंत पोहचलेल्याच नाहीत. मात्र अशा विचित्र वातावरणात वाढणारी ही लहान मुलं त्यांच्याही नकळत त्या वस्तीतील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या सानिध्यात येतात व गल्लीत भांडणे, मारामाऱ्यापासून पाकीट मारण्यापर्यंत मजल मारतात. वस्ती परिसरातील बालकांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दुर ठेवण्यासाठी आम्ही गेल्या तीन महिन्यांपासून ‘बाल बिरादरी प्रकल्प’ सुरू केला आहे. उपक्रमाच्या पहिल्या टप्पात पंचवटी येथील संवेदनशील असलेल्या फुले नगर परिसरातील बालकांना उन्हाळी शिबीरात सामावून घेतलं आहे. सध्या १५० मुलं या शिबिरात येत आहेत”.
प्रवरा मेडिकल ट्रस्ट, नॅशनल असोसिएशन फार ब्लाईंड, बाल हक्कांसाठी आग्रही असणाऱ्या शोभा पवार अशी समविचारी मंडळी व सामाजिक संस्थांना यात सहभागी करून घेण्यात आलं.
सर्वांच्या सोयीनुसार वर्गाची वेळ सकाळी १० ते १२ अशी ठरली असून त्यात वाचन कौशल्य, व्यक्तीमत्व विकास, कार्यानुभव, स्वसंरक्षण आदी विषयांवर भर देण्यात आला आहे.
काही मुलं या वर्गातून पळून जातात त्यावेळी वस्तीतील वडीलधारी मंडळी त्यांना पुन्हा आणून सोडतात. तर काहीवेळा त्यांच्या सोबत असणारी मुलेच ‘काका आम्ही त्याला घेऊन येतो. आम्हाला माहितीये तो कुठे लपला असेल’. असं सांगत आपल्या सवंगड्याचं मन वळवत त्याला वर्गात बसवतात.
लवकरच या मुलांसाठी ‘लायब्ररी ऑन व्हील’ सुरू करणार असून त्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी प्रयत्न करणार आहोत. शहरातील अशा संवेदनशील ठिकाणी लवकरच हे वर्ग भरतील असंही डॉ. सिंगल यांनी सांगितलं.
इथं येणारा रोहित म्हणतो, “आम्हाला या वर्गात छान वाटतं. शाळेसारखं कोणी ओरडत नाही. इथंच बस, बाजुला हो अशा सूचनांचा मारा नसतो त्यामुळे कुठंही, कसंही उंडरता येतं. पण इथल्या सरांचा थोडा धाक वाटतो अशी कबुली मुलांनी दिली”.
- प्राची उन्मेष.
 

Tuesday 24 April 2018

सामाजिक संदेश देणारा राष्ट्रपाल

बीड जिल्ह्यातलं अंबेजोगाई. सामाजिक संदेश देणाऱ्या वेगवेगळ्या घोषणांनी रंगलेला कुर्ता, अशाच घोषणा असलेली डोक्यावर टोपी अन् हातात एक डफली असा पेहराव असलेला माणूस बसस्थानक, एखादा चौक, शाळा, महाविद्यालय, सरकारी दवाखाना आणि दहा पाच माणसं जिथे कुठे एकत्रित दिसतील अशा प्रत्येक ठिकाणी जातो अन् सुरु होतो सामाजिक प्रश्नांचा जागर! मग कधी विषय असतो स्त्रीभ्रूण हत्येचा, कधी पर्यावरणाचा, जल बचतीचा, संविधानाच्या जागृतीचा तर कधी हेल्मेटच्या वापराचा.
या माणसाचं नाव राष्ट्रपाल पडुळे. 10 वर्षांपूर्वी पत्नी अर्चना गर्भवती होती. तिला नियमित तपासणीसाठी घेऊन जात असताना गावातील इतर तीन-चार बायकाही त्या सुमारास तपासणीसाठी यायच्या. कालांतराने मात्र त्या यायच्या बंद झाल्या. पडुळे दाम्पत्याला मुलगी झाली. आपल्याबरोबर येणाऱ्या इतर बायकांच्या प्रसूतीविषयी चौकशी केली तेव्हा त्या बायकांनी गर्भलिंग निदान करून गर्भपात केल्याचं समजलं. हे रोखण्यासाठी काहीतरी करायला हवं, असा आग्रह अर्चना यांनी धरला. अन् त्या दिवसापासून सुरु झाला स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठीचा जनजागृतीचा उपक्रम!
संधी मिळेल तिथे राष्ट्रपाल यांनी कधी एकट्यानं तर कधी इतर सहकाऱ्यांसाेबत जिल्हाभर जनजागृती करायला सुरुवात केलं. सुुरुवातीला हा विचित्र वाटणारा पेहराव पाहून अनेकांनी हेटाळणी केली, हसले, वेडा झाल्याच्या निष्कर्षापर्यंतही काही जण पोहचले. पण राष्ट्रपाल डगमगले नाहीत. पुढे २०१० मध्ये जिल्ह्यात स्त्रीभ्रूण हत्याप्रकरणे समोर आली. स्त्री जन्मदराच्या बाबतीत बीड देशात रेडझोनमध्ये गेला आणि लोकांना त्यांच्या जनजागृतीचं महत्त्व पटलं. राष्ट्रपाल यांनी बीडसह पुणे, सातारा, सोलापूर इथंही जागृती केली. खासदार सुप्रिया सुळेंबरोबर ‘जागर जाणीवांचा, तुमच्या आमच्या लेकींच’ अभियानातही राष्ट्रपाल आघाडीवर होतेे. दरवर्षी ते 'लेक वाचवा वारी पंढरीच्या दारी' अशी अंबाजोगाई ते पंढरपूर दिंडीही आषाढी वारीच्या वेळी काढतात.

जनजागृती करत असतानाच काही तरी कृतीशील करावं या भावनेतून त्यांनी गरीब, एचआयव्ही बाधित, अनाथ मुलींचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारलं. त्यांना इतर दात्यांच्या मदतीनं शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिलं. जवळपास 50 ते 60 अनाथ ,गरीब, परित्यक्ता महिलांच्या मुलांना त्यांनी शैक्षणिक साहित्य पुरवलं आहे. सध्या लोकसहभागातून अनाथ मुलींसाठी वसतिगृहाचं काम सुरू आहे. त्यांचं काम, प्रामाणिकता, धडपड पाहून समाजातून त्यांना वस्तू आर्थिक स्वरूपात मदत मिळते.
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत विविध संस्थांकडून १० पुरस्कार मिळाले आहेत.
सतत होणारे अपघात पाहून, जानेवारी- फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रपाल यांनी हेल्मेट वापराबाबत जनजागृती अभियान राबवलं. त्यातून ३१ जण नियमित हेल्मेट वापरासाठी तयारही झाल्याचं राष्ट्रपाल सांगतात.
राष्ट्रपाल यांची थोडी फार शेती आहे. काही काळ त्यांनी बार्टीचा (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचा) समतादूत म्हणूनही काम केले आहे.
या सगळ्या कामात पत्नी अर्चना पाठीशी खंबीर आहे म्हणूनच काम करू शकत असल्याचं राष्ट्रपाल म्हणाले.

 अमाेल मुळे.

Monday 23 April 2018

अडचणी सोडवण्यासाठी धाव घेणारे हरीभाऊ

वासुदेव पांडुरंग उर्फ हरीभाऊ जोशी यांची नांदेड जिल्ह्यातल्या भोकर तालुक्यातल्या बल्लाळ गावी वडिलोपार्जित शेती. उमरीला राहणारे हरीभाऊ मार्च 2014 मध्ये राज्य विद्युत वितरण कंपनीमधून सहायक लेखापाल पदावरून निवृत्त झाले आणि बल्लाळला आले. कडक उन्हाळ्याचे दिवस. लोकांना पिण्यासाठी पाणी नव्हतं. हरिभाऊंनी स्वतःच्या शेतात बोअर खणली. त्याला भरपूर पाणी लागलं. हरीभाऊंनी स्वखर्चाने बोअरवेलला पाईपलाईन केली आणि पाणी गावच्या विहिरीत सोडलं. त्या उन्हाळ्यात बल्लाळच्या लोकांचा पाण्याचा प्रश्‍न मिटला. सरकारी अधिकार्‍यांना याबाबत कळलं . बोअरवेलचे अधिग्रहण करून त्याचा मोबदला देण्याचा प्रस्ताव ठेवला. बोअरवेलच्या अधिग्रहणाला हरीभाऊंनी परवानगी तर दिलीच पण पैसेही नाकारले.
2015 च्या ग्रामपंचायत निवडणुकीत हरीभाऊ स्वतः निवडणुकीसाठी उभे राहिले नाहीत पण सात अपक्षांचं त्यांनी उभं केलेलं पॅनल सत्तेत आले. सत्तेत आल्याबरोबर 91 हजार रूपये खर्च करून गावातील रस्त्यांवर एलसीडी लाईट बसले. गावातील ओढयाकाठी असलेल्या स्वतःच्या शेतातील दोन गुंठे जमीन देऊन जिल्हा परिषदच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंर्तगत मोठी विहीर खोदून घेतली. विहीरीला भरपूर पाणी लागलं. त्यावर जलवाहिनी बांधली. बल्लाळ गावातील 1300 घरात या नळयोजनेचं पाणी पोहोंचत असून गाव टँकरमुक्त झालं. त्यामुळे आजूबाजूच्या दोन तांड्यांनाही नळ योजनेव्दारे पाणीपुरवठा झाला.


गावातील पाणीप्रश्‍न कायमचा संपवण्यासाठी हरीभाऊंच्या सल्ल्यानुसार पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणाला गंगाधर बलिलवाड, बाजाजी राचेवाड, दत्ता, लक्ष्मण पाटील, मारोती पुवडवाड गेले. लोकसहभागातून पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी बल्लाळ गावाने घेतलेल्या पाणी ग्रामसभेला जिल्हा परिषद, पंचायत समितीचे अधिकारी व 400 लोक उपस्थित होते.
स्वतःच्या शेताजवळ हरीभाऊंनी स्वखर्चाने नाला खोदून वन्यप्राण्यांच्या पाण्याचीही सोय केली आहे. भोकर इथल्या उपजिल्हाधिकारी दीपाली मोतियाळ यांनीही पाहणी करून त्यांच्या कामाचं कौतुक केलं.
कोणाच्याही कोणत्याही अडचणीबद्दल कळलं की हरीभाऊ तिथे धाव घेतात. गरीब, आदिवासींच्या मनात त्यांना विशेष स्थान आहे. सरकारी योजना, कागदपत्र याबाबत मार्गदर्शन मिळण्यासाठी हक्काचं माणूस म्हणजे हरीभाऊ. सर्व समुदायांमध्ये सलोखा राहावा यासाठी वेगवेगळ्या उपक्रमातून ते कार्यरत असतात. गावाच्या तंटामुक्त समितीचे ते अध्यक्ष आहेत. गावाच्या विकासाच्या ध्यासानं ते झपाटलेले आहेत. जिल्हा परिषद , पंचायत समितीच्या काही अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा त्यांचा आरोप आहे. त्याविरोधात ते स्वखर्चानं लढा देत आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री , पंतप्रधान कार्यालयाकडे त्यांनी तक्रार केली असून पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांना सकारात्मक प्रतिसादही लाभला आहे.
पुत्रशोक, स्वतःचं ब्रेन हॅमरेज , शस्त्रक्रिया अशा वैयक्तिक दुःख-अडचणींवर मात करत हरीभाऊ खंबीरपणे उभे आहेत. स्वतःच्या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णालयात येणाऱ्या इतर रुग्णांची विचारपूस करून त्यांचं मनोबल उंचावत असत. आपल्याला बोनस आयुष्य मिळालं असून त्याचा जास्तीत जास्त लोकांसाठी वापर करण्याचं हरीभाऊंनी ठरवलं आहे. 
- उन्मेष गौरकर.

‘अक्कलहशेदोन’ची गंमत

जिल्हा जालना. इथल्या मंठा तालुक्यातील कानफोडीची जिल्हा परिषद शाळा. वर्ग पहिली ते चौथीपर्यंतच. छोटीशीच, दर्शनी कमान, सुंदर बाग, मुलांना आणि झाडांना ऊन लागू नये म्हणून घातलेली ग्रीन नेटची शेड, आणि नीटनेटक्या गणवेषातील विद्यार्थी असं प्रसन्न रूप. शाळेचा भवताल सुंदर बनविण्यासाठी कानफोडीच्या ग्रामस्थांनी आर्थिक, वस्तूरूप मदत आणि वृक्षदान केलेलं आहे, आणि शिक्षकांनी प्रसंगी सिमेंट, विटा वाहून मिस्त्रिकामही केलेलं आहे.
भौतिक रूप सुंदर बनविताना शिक्षकांनी गुणवत्तेकडेही दुर्लक्ष केलं नाही. शाळेची वेळ सकाळी 9.30 – दुपारी 4.30 अशी आहे. पण कानफोडीच्या शाळेत शिक्षक सकाळी 7.30 वाजताच हजर असतात. शाळा भरण्याआधी आणि शाळा सुटल्यानंतरही एखादा तास मुलांचा जादा अभ्यास घेतला जातो. याविषयी मुख्याध्यापक किशन जाधव सांगतात, “आम्ही विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा पाया पक्का करण्याच्या प्रयत्न करतो. त्यामुळे मुळाक्षरे, 1 ते 100 अंक, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रियांचा जास्तीत जास्त सराव करुन घेतला जातो. वाचन, वाक्यविस्तार, गोष्ट तयार करणे असे भाषेशी संबंधित खेळही घेतले जातात. अभ्यासात मागं असणाऱ्या मुलांसाठी आम्ही हे जादा तास घेतो. याचा परिणाम म्हणून आमच्या शाळेतला पहिलीतला विद्यार्थीसुद्धा दीड महिन्यात वाचायला लागतो. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी वजाबाकी आणि भागाकारासारख्या अवघड गणिती क्रियांमध्ये तरबेज आहे. इतकंच नाही, तर कोणताही विद्यार्थी अब्जापर्यतची संख्या लिहून त्याची स्थानिक किंमतही सांगू शकतो.”
आणि खरोखरच पहिली- दुसरीच्या विद्यार्थ्यांनी अब्जाच्या आपण सांगू त्या संख्या लिहून दाखवल्या, हातच्याची वजाबाकी करुन दाखवली. तीन शब्द दिले असता या शाळेतले विद्यार्थी त्यावरुन गोष्टही तयार केली, तेव्हा जाणवले- ये तो लंबी रेसका घोडा है! अब्जाची संख्या येण्यामागची गंमत जाधव सरांनी सांगितली, “आम्ही मुलांना ‘अक्कलहशेदोन’ हा शब्द लक्षात ठेवायला सांगितला आहे. या शब्दाच्या आद्याक्षरांनुसार मुलं अब्ज, कोटी, हजार, शेकडा, दशक, एकक यांचा क्रम लक्षात ठेवतात आणि त्यावरुन कोणतीही संख्या लिहून दाखवितात. तसेच त्यांची स्थानिक किंमतही सांगू शकतात.”
2016 सालापासून कानफोडीची शाळा एबीएल (Activity Based Learning) शाळा झाली आहे. त्यामुळे इथं कृतियुक्त शिक्षणावर भर दिला जातो. मुलांचा स्तर निवडून त्यांच्या शैक्षणिक स्तरानुसार अभ्यास घेतला जातो. कानफोडी शाळेतले विद्यार्थी आता इतके तयार झालेले आहेत की अगदी पहिलीचा विद्यार्थीसुद्धा तिसरीच्या स्तराचा अभ्यास करुन दाखवतो. याचाच परिणाम म्हणून की काय गावात माध्यमिक शाळेत जाणारे अभ्यासात मागे राहिलेले काही विद्यार्थी सुद्धा कानफोडी शाळेच्या जादा तासांना अभ्यासासाठी येतात. आणि जाधव सर, नेवरे सर ही अधिकची कटकट, असं न म्हणता ज्ञानरचनावादी पद्धतीने त्यांच्याही समस्या सोडवून त्यांना अभ्यासाची गोडी लावत आहेत.

- स्नेहल बनसोडे-शेलुडकर

एक आहे उमा



उमा क्षीरसागर. जालन्यातील कडवंची गावातील एका साधारण शेतकरी कुटुंबातील मुलगी. वंशाला दिवा मिळेल या अपक्षेने या कुटुंबात जन्मलेल्या आठ मुलींपैकी सातवी. वडील नारायण क्षीरसागर यांनी 30 वर्ष सालगडी म्हणून काम केलं. उमाच्या सहा बहिणी आणि आई अशा सगळ्याजणीच दुसऱ्याच्या शेतीत राबल्या. सहाही मुलींची लग्नं झाली. नंतर नारायण यांनी गावात सहा एकर जमीन विकत घेतली. आता हक्काच्या शेतात राबण्यासाठी मात्र नारायणराव, उमाची आई, अवघ्या 12 वर्षांची उमा आणि सगळ्यात धाकटी 10 वर्षांची मतीमंद बहीण.



जमीन घेऊन झाली. आणि काही काळातच नारायण क्षीरसागर यांचा अपघात झाला. गुडघे फ्रॅक्चर झाले. तेव्हा 6 एकरपैकी एक एकरात द्राक्षबाग उभी राहिली होती. वडिलांचा अपघात झालेला. आई वृद्धत्वाकडे झुकलेली. बहीण मतिमंद. शेतीकडे कोण पाहणार? शेती ओसाड होऊन पुन्हा गरिबीत जीवन कंठायची वेळ येणार या भितीने उमा चिंताग्रस्त झाली.
कुटुंबाचा सहारा होण्यासाठी 13 व्या वर्षात उमाने कंबर कसली. द्राक्षबागेसह शेतीची सूत्र आपल्या हातात घेतली.
लहानपणापासून शेती कशी करतात, पिकं कशी घेतात, द्राक्षबागेला कोणती औषधं कशी फवारतात हे सगळं ती बारकाईनं बघत होतीच. आतापर्यंतचं निरीक्षण आणि वडिलांचं मार्गदर्शन यामुळे उमाचं मनोधैर्य वाढलं. कष्ट कामी आले आणि द्राक्षबाग बहरली. दीड लाखांपर्यंत उत्पन्न मिळालं. आता तिनं शेतात गहू, ज्वारी, कापूस आणि तुरीचंही पीक घेतलं. आत्मविश्वास दुणावला. मुलीदेखील उत्तम शेती करू शकतात, हे तिनं दाखवून दिलं. आज उमाचं वय 19 वर्ष आहे. ती म्हणते, "आई-वडिलांचं स्वप्न मी साकार केलं आहे. म्हणूनच आई-वडिल मला ‘वंशाचा दिवा’ मानतात”.
उमाच्या आवडिलांचं स्वप्न साकार झालं. पण उमाच्या स्वप्नाचं काय? तिला खूप शिकून मोठं अधिकारी व्हायचं होतं. तिच्यासारख्या अनेक उमा आहेत. त्यांची स्वप्न पुरी होतील, हे बघण्याची जबाबदारी शासनाची, समाजाची.

- अनंत साळी.

Thursday 19 April 2018

सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी

पाथर्डी तालुक्यातील मोहरी गावाजवळची डोईफोडे वस्ती. बालाघाट, गर्भगिरी डोंगरांचा आणि दऱ्याखोऱ्यांचा हा परिसर. डोंगराच्या कुशीतच अल्पसंख्याक समाजाची 45 घरांची वस्ती. बिबट्यासह जंगली श्वापदांचा या भागात नेहमीचाच वावर. म्हणूनच त्याचं नाव "वाघदरा'. वस्तीवर 1983 पासून जिल्हा परिषदेची चौथीपर्यंतची शाळा. पण वस्ती आहे ती, मेंढपाळ, ऊसतोड कामगार, हमाल यांची. त्यांचं बिऱ्हाड पाठीवर. साहजिकच मुलांचीही आई-वडिलांसोबत भटकंती. नाव शाळेच्या पटावर दाखल केलेलं; पण शाळेत हजेरी नाहीच. दीड वर्षापूर्वी इथं शिक्षक पोपट फुंदे रुजू झाले. हजर झाल्यादिवशी शाळेच्या पटावर सोळा विद्यार्थ्यांची नोंद दिसली. शाळेचा आधीचा अनुभव काही चांगला नव्हता. त्यामुळे बारा पालकांनी मुलांना शाळेत पाठवायला नकार दिला. एकूण परिस्थिती सरांच्या लक्षात आली. फुंदे सरांनी पालकांना विनंती केली. विश्वास दिला. सर पालकांना म्हणाले, "एक वर्ष मला संधी द्या. सारी स्वप्नं घेऊन या दुर्गम भागात आलो आहे. शाळेची सुधारणा करायची आहे. नाही झाला बदल, तर मी स्वतःहून मुलांचे दाखले देईन". सरांच्या या बोलण्यामुळे पालकांनी मुलांना शाळेत पाठवायला सुरुवात केली. हळूहळू शाळेत मुलं येऊ लागली. आणि आज 23 विद्यार्थी इथं शिक्षण घेऊ लागले आहेत. 



आज, पहिली-दुसरीचे विद्यार्थी सहजपणे इंग्रजी वाचतात. फुंदे यांनी अध्यापनमुक्त, दप्तरमुक्त शाळा, संपूर्ण ई-लर्निंग, टॅब्लेट शाळा आणि कृतीयुक्त सहज शिक्षण या उपक्रमांद्वारे दर्जेदार शिक्षणाचा ध्यास घेतला आहे. गावकऱ्यांनीही त्यांना साथ दिली. शाळेची इमारत लोकसहभागातून दुरुस्त झाली. लोकसहभागातून शाळेच्या विकासावर आतापर्यंत सुमारे बारा लाखांचं काम झालं आहे. त्यातून संगणक, शुद्ध पाण्याचं मशीन, बारा टॅब यांसह शाळा इमारत उभी राहिली. सध्या जिल्हा परिषदेच्या दोन लाखांच्या निधीत गावकऱ्यांनी एक लाख 80 हजार रुपयांचा लोकसहभाग दिला. आणि तीन लाख 80 हजार रुपयांतून ‘ज्ञानरचनावादातून शिक्षण' ही इमारत उभी राहते आहे.




मुलांचं स्थलांतर रोखण्यासाठी पोपट फुंदे यांनी हातभार लावला. आता कुटुंब स्थलांतरित झालं तरी त्यांच्या तब्बल अठरा मुलांना गावात राहणारे नातेवाईक आणि अन्य कुटुंबं सांभाळतात.




फुंदे सर म्हणतात, “शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. गरिबांच्या वस्तीवरील परिस्थिती बदलण्यासाठी मी पुढे आलो. लोकांनी साथ दिली. इथली मुलं आता सहजपणे इंग्रजी वाचतात. ही च मुलंअल्पसंख्याक, गरीब कुटुंबांचं भवितव्य बदलू शकतात.” जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आमदार, खासदार यांच्यासह लोकप्रतिनिधींनीही भेटी देऊन शाळेचं कौतुक केलं आहे.
पोपट फुंदे संपर्क क्र. - 9423463874

आणि कावेरीला सायकल मिळाली

सायकल कावेरीची. ती चालवते. आणि तिचे दोघे भाऊ शंभू आणि शरद कावेरीच्या मागे सायकलवर बसून उत्साहानं आता शाळेत येतात. पण काही महिन्यापूर्वी शाळेसाठी पायपीट करावी लागत होती. 
अहमदनगर जिल्ह्यात जामखेडच्या काजेवाडी तलावाजवळ राहणारी कावेरी पवार पाचवीत शिकते. आईवडील वीटभट्टीवर कामाला जाणारे. शाळा दोन किलोमीटरवर कुसडगाव इथं. कावेरीसारख्या लहानग्यांची पायपीट सत्तार शेख पाहत होते. ते जामखेड तालुक्यातल्या हळगाव इथले रहिवासी. पेशानं पत्रकार. समाजातले प्रश्न मांडत असताना उत्तरं शोधण्यासाठी प्रत्यक्षात काहीतरी केलं पाहिजे, असं वाटत होतं. त्यातून 2016 मध्ये आकाराला आलं प्रयोगवन.



प्रयोगवनचा एक उपक्रम संडे स्कुल. वंचित घटकातली शाळेत जाणारी आणि शाळाबाह्य अशी मुलं एकत्र करून त्यांना गोष्टी, गप्पा, गाणी यातून शाळेची गोडी निर्माण केली जाते. शाळेबरोबरच त्यांच्यात शिकण्याची गोडी टिकून राहिली पाहिजे, हा हेतू.
घर ते शाळा हे अंतर, ही मुख्य अडचण असल्याचं सत्तार यांच्या लक्षात आलं. त्यावर पर्याय सुचला सायकलचा. मुलांना सायकली मिळवून देण्यासाठी मदत घेतली सोशल मीडियाची. पहिल्याच प्रयत्नात पुण्यातून चांगला प्रतिसाद मिळाला.




उपलब्ध झालेल्या १४ सायकली अकोले या आदिवासीबहुल भागातील देवगाव इथल्या राघोजी भांगरे माध्यमिक विद्यालयातील आदिवासी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनी दिल्या. त्यासाठी पुण्यातील समाधान पाटील , ह्युमन सोसायटी, कस्तुररत्न फाउंडेशन आणि अकोले इथल्या गडवाट संस्थेचे बाळासाहेब फोंडसे यांनी सहकार्य केलं.
आताही शेख यांच्याकडे पाच सायकली आहेत.मात्र त्या नादुरुस्त असल्यानं गॅरेजमध्ये आहेत. जूनमध्ये पाचशे सायकली अशा मुलामुलींना मिळवून देण्याचा सत्तार यांचा मनोदय आहे . 




सायकली जुन्या असल्या तरी चालू स्थितीतल्या असाव्यात. नादुरुस्त सायकली दुरुस्त करण्याचा खर्च परवडणारा नसतो, असं सत्तार सांगतात. वाढदिवसानिमित्त कोणी सायकल भेट दिली तर त्यावर त्या व्यक्तीचं नाव टाकून ती सायकल गरजू विद्यार्थ्यांला दिली जाणार आहे. 




मदतीसाठी सत्तार शेख यांचा संपर्क :
7875753550 , 9130138973

मैत्री संवाद “पुस्तकी शिक्षणाला जीवन शिक्षणाची जोड”

२०११-१२ मध्ये मुंबईतल्या गोरेगावमधल्या अ. भि . गोरेगावकर शाळेतल्या काही मुलांच्या शैक्षणिक गतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं . याच सुमाराला काही तरुण शाळेमध्ये सादरीकरण करायला गेले होते. शाळेनं या तरुणांनाच या मुलांची समस्या सोडवण्याबाबत विचारलं. पुस्तकी शिक्षणाबरोबरच रोजच्या जगण्यात येणारे प्रश्न सोडवण्यासाठी उपयुक्त शिक्षण मुलांना मिळालं पाहिजे , असं या तरुणांना वाटत होतं. यातूनच त्यांनी हे सादरीकरण तयार केलं होतं .
उमेश खाडे , विक्रम घाग ,संतोष नाईक,मनोज आहेर अशी या तरुणांची नावं. यापैकी उमेश, डॉ. आनंद नाडकर्णी आणि हेमंत करकरे यांनी सुरू केलेल्या जिज्ञासा उपक्रमातले. उपक्रमादरम्यानच मुलांना त्यांच्या शिक्षणापलीकडे जाऊन जग दाखवण्याची आवश्यकता उमेश यांना वाटली. 





गोरेगावकर शाळेतल्या या मुलांशी मैत्री संवादनं वर्षभर गप्पा, गाणी-गोष्टी, सिनेमा, फिरणं,यातून मैत्री साधली आणि मुलांना मार्गदर्शन केलं.त्याचा परिणाम दिसून आला. या वर्गाचा निकाल 70 टक्के लागला. 




प्रत्येक मुलाला शिक्षणात गती असतेच असं नाही. मुलांना पुस्तकी शिक्षणापलीकडचं जग दाखवलं पाहिजे, त्यांच्याशी मैत्री करून शिकवलं पाहिजे, असं उमेश , विक्रम ,संतोष आणि मनोज यांना वाटत होतं आणि त्यातूनच साधारण 10 वर्षांपूर्वी 'मैत्री संवाद' आकाराला आला. दुर्लक्षित, दुर्गम भागातल्या शाळांमध्ये सेशन घेण्यावर आमचा भर असतो, असं उमेश सांगतात.
मैत्री संवाद ग्रुपमध्ये मुंबई परिसरातले १५ वर्षांपासून ५० वर्षांपर्यंतचे विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातले साधारण 60 सदस्य आहेत. मुलांबरोबर वावरताना प्रत्येकाचं निरीक्षण केलं जातं आणि मग त्यांना पुढे कसं मार्गदर्शन करायचं ते ठरतं.




अभ्यासाबरोबरच मुलांमधील छुपे छंद जाणून घेण्याची आणि त्यांना नवी वाट देण्याची सुरुवात या माध्यमातून होते. यासाठी सातत्यानं 3 ते 4 वर्ष प्रयत्न केले जातात. शाळांच्या गरजांनुसार हे काम चालतं. अ .भि .गोरेगावकर शाळा , रायगडच्या वरपमधील रानपाखरं आश्रमशाळा, तलासरीमधली कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या शाळांमध्ये न चुकता सेशन्स घेतली जातात. खेळ, प्रयोग-सादरीकरण यातून विषय शिकवले जातात. शाळेत निवडणुका घेऊन नागरिकशास्त्र समजावलं जातं. मुलांच्या पुढच्या वाटचालीवरही याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. अप्रगत शिक्क्याला बाजूला सारून ही मुलं पुढची वाटचाल करत आहेत. 




मैत्री संवाद :मनोज आहेर ८०९७६१५८०९

Thursday 12 April 2018

मला ओळख मिळाली

द्राक्षयनी चोथे कांदिवली येथील महाडा वसाहतीत राहतात. त्यांनी छंदाचे रूपांतर छोट्या उद्योगात कसे केले याचे कथन अगदी सोप्प्या सहज गोष्टयींमधून उलगडलंय.
मुलं मोठी झाली आणि घरातल्या जबाबदार्‍या कमी होत गेल्या. रिकाम्या वेळात काही निराळं करावंसं वाटू लागलं. एका मैत्रिणीने आमच्याच विभागात महिलांकरिता कौशल्यविकास केंद्र सुरू झाल्याची बातमी दिली. तिथे गेल्यावर बर्‍याच उपक्रमांची माहिती मिळाली. शिवणकाम, बेकरीचे पदार्थ बनविणे, मसाले बनविणे, ब्युटी पार्लर, ज्वेलरी मेकिंग हे कोर्स तिथे मोफत शिकवले जातात. बाहेर खाजगी क्लासेसमध्ये हेच कोर्स मोठ्या फिज घेऊन शिकवले जातात. मी ज्वेलरी मेकिंग निवडलं. बेसिक कोर्स महिन्याचा होता. तोही दुपारच्या, अगदी माझ्या रिकाम्या वेळात.
ज्वेलरी मेकिंग शिकवणाऱ्या पद्मिनी मॅडम यांनी दागिन्यांची घडण कशी असते, ते कसे हाताळायचे, बांधायचे याची माहिती सोप्या पद्धतीने दिली. दागिन्यांची आवड असली तरी सर्वच दागिन्यांची नावं माहीत नसतात. पद्मिनी मॅडम यांनी प्रत्येक दागिन्याची ओळख करून दिली. 



कोर्सच्या काळात मी स्वतः बनविलेले दागिने शेजारणी, मैत्रिणींना दाखवताना कोण आनंद होत असे. दागिने बनविताना आपला कस लागतो, हे जाणवलं. कळून चुकलं की फक्त आवड असून उपयोग नाही. त्यासाठी नितांत मेहनतीची गरज आहे. पद्मिनी मॅडम खूप आवडीने, संयमाने शिकवत असत. त्यांची मेहनत वाया जाऊ नये म्हणून मी त्यांचं सर्व म्हणणं टिपून घेत असे. मला तर कोर्स करता करताच पहिली ऑर्डर मिळाली. माझा दागिने बनविण्याचा विश्वास वाढू लागला. घरात मी आणखी आत्मविश्वासाने वावरू लागले. माझ्यातला बदल घरातल्यांच्या लक्षात येऊ लागला. माझी त्यांच्या कामातली नको ती लुडबुड कमी झाली म्हणून तेही खुश होते. आता मुलगीही दागिन्यांचं कौतुक करू लागली. मी बनवलेल्या दागिन्यांची जाहिरात करू लागली. घरातून उत्तेजन मिळाल्याने मी आणखी जोमाने दागिने बनवू लागले.
कानातील कुडी, बांगड्या, चिंचपेटी या दागिन्यांच्या ऑर्डर मिळू लागल्या. माझं काम आता वाढू लागलंय. वेळ आता पुरत नाही. वेळेचे नियोजन करावं लागतंय. एकदा तर मी २० दिवसात ऑर्डर पूर्ण करून सहा हजार रुपये कमवले. ऑर्डर वेळेत पूर्ण करण्याची कसोटीच असते. लोकांच्या पसंतीस माझे काम येऊ लागले . मी बनवलेले दागिने माझी ओळख बनली. अलिकडेच गणपतीसाठी लागणारी कंठी, गौरीसाठी हार, बांगड्या , कमरपठ्ठया, बाजूबंध यांसारख्या दागिन्यांची मोठी ऑर्डर मला मिळाली होती.
मी बनवलेल्या दागिन्यांचे कौतुक होतं, तेव्हा मला खूप समाधान मिळतं. फावल्या वेळात काही करावं म्हणून जे शिकले त्याला एवढं यश मिळेल, त्याने मान मिळेल, मी स्वावलंबी होईन, असं स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं. माझ्या छंदाचं रूपांतर छोट्याशा उद्योगात केव्हा झालं हे कळलंच नाही. 

आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांच्या कंदिवली पूर्व मतदारसंघात सुरू केलेल्या कौशल्यविकास प्रशिक्षण केंद्रात ही मुलाखत घेतली.

Wednesday 11 April 2018

पगार नाही; पण मुलांना शिकायला मिळतंय तेच समाधान आहे

पुण्यापासून जेमतेम 8 किमीवरची महमंदवाडी. इथल्या तरवडे वस्तीतली, विद्यावर्धिनी नावाची शाळा. एकशिक्षकी. 1 ते 4 थीचे मिळून 50 विद्यार्थी. मंगला गायकवाड एमए बीएड झाल्या आणि त्यांनी इथं शिकवायला सुरवात केली. तेव्हा ही शाळा सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत सुरु करण्यात आली होती. मंगलाताई अजूनही एकट्याच ही शाळा चालवतात.
मुलांचे पालक काचपत्रा गोळा करतात आणि बरेचजण बिगारी काम करतात. मंगलाताई सांगतात की, ह्यापैकी बहुतेक मुलांचे आई वडील दोघंही कामाला बाहेर जाणारे आहेत. त्यामुळे पाणी भरुन ठेवणं, भांडी घासणं, घरातली बाकी कामं करणं आणि लहान भावंडाना सांभाळणं अशा जबाबदा-या या मुलांवर असतात. मुलं शाळेत गेली तर ही कामं कोण करणारं म्हणून सुरुवातीला पालक मुलांना शाळेत पाठवायला तयार नसायचे. अर्थातच आर्थिक परिस्थितीही नाजूक असायचीच. मग त्यांच्याशी बोलून, समजावून मुलांना शाळेत आणावं लागायचं.



2002मध्ये 10 मुलांना घेऊन ही शाळा सुरु झाली. हळूहळू विद्यार्थी संख्या 250 वर गेली. त्यावेळी मंगलाताईंबरोबर इतर शिेक्षकही होते. तेही चांगल्या नोकरीच्या शोधात शाळा सोडून गेले. मंगलाताईंनी मात्र हाती घेतलेला शिक्षणाचा वसा पुढं न्यायचा ठरवला आणि ही शाळा सुरु राहिली. अर्थात आता मात्र त्यांना विनावेतन काम करावं लागणार होतं.
या शाळेत मुलांना सर्व विषयांची ओळख करुन दिली जाते. त्यांना लिहायला वाचायला शिकवलं जातं. त्यांच्यामध्ये शिक्षणाची आवड रुजवण्याचं काम इथं होतं. साधारणपणे 6 ते 12 वयोगटातली मुलं या शाळेत येतात. तोपर्यंत पालकही त्यांच्या फी, वह्या-पुस्तकांसाठी पैसे जमवतात. आणि त्यानंतर त्यांना दुस-या मोठ्या शाळेत घातलं जातं.
नगरसेवकांनी उपलब्ध करुन दिलेल्या 2 खोल्यांमध्ये सध्या शाळा भरते. मंगलाताई सांगतात, “तरवडे वस्तीपासून साधारण तीन किमीवर महानगरपालिकेची शाळा आहे. पण पहिली ते चौथीची मुलं एवढ्या लांब चालत जाऊ शकत नाहीत. म्हणून पालक त्यांना तिथं पाठवत नाहीत. आणि ही सध्याची जागा अपुरी पडते. त्यामुळे आता मुलांची संख्या वाढवता येत नाही.”
आरोग्य तपासणी, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धांमध्ये सहभागाची संधी मुलांना उपलब्ध करुन दिली जाते. त्यांना मशाल, इनरव्हिल, रोटरी यासारख्या संस्था शालेय साहित्याचं वाटप करतात. मशाल संस्थेतर्फे मुलांना स्कॉलरशिप दिली जाते, मेहेरबाबा फाऊंडेशन मुलांना रोजचा खाऊ देतं.
क्वेस्ट ही संस्था मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी खास प्रयत्न करते. त्यांचे प्रतिनिधी ठराविक दिवशी येतात आणि मुलांना गोष्टींची पुस्तकं वाचून दाखवतात. त्यांनी मुलांसाठी पुस्तक लायब्ररीची सोय केली आहे.
मंगलाताई सांगतात, “या वस्तीतली मुलं अशीच फिरत राहून नयेत, बिघडू नयेत यासाठी माझा प्रयत्न आहे. त्यांना आता स्वच्छ राहायला आवडतं आहे. कधी कधी पाणी भरण्यासाठी या मुलांना शाळेच्या मध्ये एक-दीड तास घरी सोडावं लागतं. पण अशा अडचणी समजून घेतल्या तरच या मुलांचं शिक्षण चालू राहणार आहे. या मुलांना आता शिक्षणाची गोडी लागली आहे. मुलं आवडीने शाळेत येतात.” एकच शिक्षिका असल्याने परिपूर्ण शिक्षण देऊ शकत नसल्याची खंतही त्या व्यक्त करतात.
घरातली एक स्त्री शिकली तर पूर्ण घर साक्षर होतं असं म्हणतात. मंगलाताईसारख्या शिक्षिका सगळीकडे असतील तर सगळी छोटी मोठी गावं -वस्त्या साक्षर व्हायला वेळ लागणार नाही.

Monday 9 April 2018

पपई, डेंग्यूवर संशोधन करणाऱ्या डॉ मंजिरी कुलकर्णी टोकिओ विद्यापीठात वरिष्ठ शास्त्रज्ञपदी


मूळच्या जालन्याच्या डॉ . मंजिरी कुलकर्णी या आठवड्यात जपानच्या टोकियो कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान आणि जीवन विज्ञान विभागात वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून रूजू होत आहेत. डॉ.मंजिरी यांना परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात संशोधनाचं बाळकडू मिळालं. त्यांचं संशोधन पपई आणि डेंग्यू दोन्हीसाठी उपयुक्त ठरणारं आहे. पपईतील रिंग्ज स्पॉटमुळे देशातल्या तसंच जगातल्या पपईची 80 टक्के उत्पादनक्षमता कमी होते. हे विषाणू संपवणं गरजेचं आहे.त्याचबरोबर पपईच्या पानांच्या अर्कात काही औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे डेंग्यू बरा होऊ शकतो. अशा प्रकारचे गुणधर्म वापरून औषध किंवा लस तयार करण्याबाबत सध्या संशोधनपर चाचण्या सुरू आहेत असं डॉ मंजिरी यांनी सांगितलं. अलीकडेच परभणीच्या कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या आल्या होत्या. डेंग्यूचे चार प्रकार आहेत . त्यावर लस उपलब्ध असली तरी अद्याप ती परिपूर्ण नाही. यासंदर्भात मंजिरी यांनी केलेलं संशोधन डेंग्यूवरची लस तयार करण्यासाठी 'मूलभूत संशोधन' म्हणून वापरलं जाणार आहे. 
2008 मध्ये त्या बीएससी कृषी झाल्या. त्यानंतर तामिळनाडू कृषि विद्यापीठात पपईतील विषाणूंवर (रिंग्ज स्पॉट) संशोधन करून जैवतंत्रज्ञान शाखेत त्या एम .एस्सी. झाल्या. 2011 मध्ये जपान सरकारची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली. या शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या देशातल्या मंजिरी एकमेव होत्या. तेव्हा जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर डेंग्यूचा फैलाव झाला होता. त्याआधी जपानमध्ये डेंग्यू नव्हता. या पार्श्ववभूमीवर टोकियो विद्यापीठात डेंग्यू विषाणूवर संशोधन करून पीएच.डी. प्राप्त केली. अमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठातून पोस्ट डॉक्टरेट अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. आंतरराष्ट्रीय परिसंवादांमध्ये संशोधनपर लेख त्यांनी सादर केले आहेत. जपान सरकारनं आंतरराष्ट्रीय संशोधकाचा दर्जा त्यांना दिला आहे. केंद्र सरकारकडूनही त्यांच्या कामाची दखल घेतली जाते. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावर असताना मंजिरी यांच्या संशोधनाबाबत त्यांनी जाणून घेतलं होतं. जगातल्या तीन वैशिष्ठयपूर्ण प्रयोगशाळांपैकी एक असलेल्या सुकुबा इथल्या प्रयोगशाळेत मंजिरी काम करत असताना भारतीय राजदूतांनी तिथे खास भेट देऊन भारतीय युनिट उघडलं. पुण्यातल्या राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ शेखर मांडे यांनी त्यांच्या संशोधनाची दखल घेतली आहे. 
परभणीच्या कृषी महाविद्यालयात डॉ.हिराकांत काळपांडे व इतर प्राध्यापकांमुळे नाविन्याचा ध्यास जडला, असं मंजिरी सांगतात. कुठलीही गोष्ट अवघड नाही. आजच्या मुलींनी जगाशी स्पर्धा ठेवून सातत्यपूर्ण प्रयत्न करायला हवेत. कुठल्याही गोष्टीचा न्यूनगंड न बाळगता कठोर परिश्रम व चिकाटीने प्रयत्न केल्यास यश नक्‍कीच मिळतं , असं मंजिरी सांगतात.
-बाळासाहेब काळे .

जिल्ह्यात नाही, राज्यात नाही, देशात नाही, इंग्लंडमधल्या सुपरमार्केटमध्ये पापड

'जिल्ह्यात नाही, राज्यात नाही, देशात नाही, इंग्लंडमधल्या सुपरमार्केटमध्ये पापड पाठवायचे आहेत. ५५० किलो उडदाचे पापड.' नाशिकमधलेच उद्योजक सुरेश कपाडिया यांनी जिजाऊ महिला सेवाभावी संस्थेच्या अश्विनी बोरस्ते यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला. नाशिकमध्ये साधारण १२ वर्षांपूर्वी अश्विनीताईंनी या संस्थेच्या, बचतगटांच्या माध्यमातून स्त्रियांना स्वावलंबी करण्याचे प्रयत्न सुरू केले. दर्जेदार आणि चविष्ट पापड, लोणची, मसाले तयार करणाऱ्या जिजाऊ मार्केटिंगच्या 'जीएम ब्रँडची ख्याती संपूर्ण शहरात आहे. अनेक दुकानं, मॉल्समध्ये त्यांचे पदार्थ विक्रीला आहेत. त्यांची गुणवत्ता पाहून कपाडिया यांनी दोन महिन्यांपूर्वी हा प्रस्ताव ठेवला.
जिजाऊ मार्केटिंगनं यापूर्वीही परदेशातल्या ओळखीतल्या व्यक्तींना, महाराष्ट्र मंडळासारख्या संस्थांच्या माध्यमातून उत्पादनं पुरवली आहेत. मात्र परदेशातली, संपूर्णपणे व्यावसायिक असलेली त्यांची ही पहिलीच ऑर्डर. 
आपल्याकडे घरी लाटून मिळणारा उडदाचा पापड २७० ते ३०० रुपये प्रति किलो असा आहे. मात्र गुजरातमधला पापड २००च्या आसपास मिळतो. किंमतीतील ही तफावत भरून काढण्यासाठी एक पाऊल मागे येत २३५ रुपये किलो दर ठरवण्यात आला. पापडाचा आकार ६० मिमी. काळी मिरी, लसूण, हिरवी मिरची, पंजाबी तसेच जिरा-मुगडाळ असे पाच प्रकार नमुना म्हणून पाठवण्यात आले. या पाचही चवी आवडल्यानं कपाडिया यांनी ५५० किलोच्या पापडाची पहिली ऑर्डर जिजाऊच्या महिलांना दिली. हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी जिजाऊच्या 30 हून अधिक महिला सरसावल्या. इंग्लंडमधल्या बाजारपेठेत पापड पाठवायचे म्हणून तिथल्या गुणवत्ता, अन्न व औषध प्रक्रियेतल्या निकषांचं पालन संस्थेनं केलं. पॅकिंग, ब्रॅण्डिंगसोबत प्रयोगशाळेत त्यांच्या पोषणततत्त्वांची तपासणी करून लेबलिंग करण्यात आलं. दरम्यान, या कामासाठी येणारा खर्च पाहता भांडवल उभारणीसाठी महिलांनी आगाऊ पैसे घेतले. पुढच्या आठवड्यात जिजाऊचे पापड इंग्लडच्या बाजारात पोहोचणार आहेत. ते तिथे आवडले की इंग्लंडमध्ये वर्षभर माल पाठवण्याची संधी मिळणार असल्यानं महिलांमध्ये हुरूप आहे.
‘बचतगट म्हणजे पापड, लोणची’ अशी आमची खिल्ली उडवली जात होती. पण आम्ही नेहमीच याला आमची जमेची बाजू मानलं. इंग्लंडच्या बाजारातही जीएम ब्रँड यशस्वी होईल, असा विश्वास अश्विनी बोरस्ते व्यक्त करतात.
-प्राची उन्मेष.

Saturday 7 April 2018

लोकल- ग्लोबलचा ताळमेळ साधणारी सुमठाणा शाळा

“वाढीच्या वयातल्या मुलांना एका जागी बसणं नकोसं होतं. त्यांच्या हाताला सतत काहीतरी काम हवं असतं. त्यामुळे पारंपारिक शिक्षणपद्धतीपेक्षा त्यांना हालचालींना वाव देणारी ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धत विद्यार्थ्यांना अर्थातच जास्त आवडते. पण त्यासोबत आमच्या शाळेत मी ओरिगामीसारख्या कागदी घड्यांनी आकृत्या बनविण्याची चिनी ‘टॅग्राम’ कार्यानुभव पद्धती वापरतो. शिवाय चुंबकीय मणी एकमेकांना जोडून वेगवेगळे आकार तयार करण्याची ‘ब्रेनी क्यूब’ ची साधनंही आवर्जून वापरतो. हे सगळं करण्यात विद्यार्थी अगदी दिवसभर रमून जातात आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला पर्यायाने मेंदूविकासालाही चालना मिळते”, संतोष लोहारे उत्साहात माहिती देत होते. लातूरच्या सुमठाणा जिल्हा परिषद शाळेत ते मुख्याध्यापक आहेत.
खरोखर, त्या दिवशी माझ्यासमोर तिथल्या विद्यार्थिनीने ब्रेनी क्यूबच्या चुंबकीय मण्यांच्या माळा आणि कानातली कर्णफुलं तयार करुन घातली. हे करताना तिला खूप मजा येत होती.
सुमठाणा शाळेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या शाळेत विद्यार्थ्यांची गणिताची भीती कमी करण्यासाठी त्यांना ‘अबॅकस’चे धडेही दिले जातात. अगदी अंध मुलांनाही सर्वोत्तम शिक्षण मिळावं म्हणून, लोहारे सरांनी ब्रेल लिपी शिकून घेतली आहे. इतकं नाही, तर त्यांच्या शाळेतील काही सामान्य मुलांनासुद्धा ब्रेल लिपी चांगल्या प्रकारे येते.


शाळेत दरवर्षी स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिनाला ग्रामपंचायतीसमोर भाषण स्पर्धा होतात. 2012 सालचा विषय होता, ‘दारुबंदी’. दारुचे तोटे, त्याचा आरोग्यावर आणि कुटुंबावर होणारा दुष्परिणाम अतिशय परिणामकारकपणे विद्यार्थ्यांनी मांडला. गावातील महिलांना यांतून प्रेरणा मिळाली. आणि त्यांनी डीवायएसपी कार्यालयावर मोर्चा नेला. त्यानंतर पोलिस पथकासोबत गावातील तीन तांड्यांवरचे हातभट्टी दारु कारखाने त्यांनी उद्धवस्त केले. महिलांमध्ये अचानक झालेल्या या जागृतीने डीवाएसपीसुद्धा चकित झाले होते. त्यावेळी महिलांनी सगळे श्रेय शाळेतील विद्यार्थिनींनी केलेल्या दारुबंदीवरच्या भाषणाला दिलं.
मुलांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी रुजाव्यात यासाठी शिक्षक आग्रही असतात. त्यातून उघड्यावर शौचाला जाऊ नये, जेवण्यापूर्वी आणि शौचानंतर हात साबणाने धुवावेत, नखं वेळेवर काढावीत या गोष्टी शिकवल्या जातात. शिक्षकांनी दिलेल्या शिकवणीमुळे विद्यार्थी आपल्या घरीही शौचालय हवं यासाठी कमालीचे आग्रही आहेत. 2015- 2016 साली लोहारे सरांच्या कल्पनेतून ‘पालकांना पत्र’ हा एक अनोखा उपक्रम घेतला गेला. त्यात विद्यार्थ्यांनी आपल्या आई- वडिलांना पोस्टकार्डवर पत्र लिहून घरी शौचालय बांधण्याची विनंती केली आणि खरोखरच्या टपालाने ही पत्रं पालकांना पाठवली गेली. त्यामुळेच आज गावातील 90% घरांमध्ये शौचालय बांधलं गेल्याचं लोहारे सर सांगतात. तसेच सुमठाणा ग्रामपंचायतीनेही, ‘ज्याच्या घरी शौचालय त्यालाच नळजोडणी’ असं अभियान राबवलं. आता सुमठाणा 100% स्वच्छतागृह असलेले गाव होण्याच्या मार्गावर आहे.

- स्नेहल बनसोडे-शेलुडकर

ऍलेक्सा आली....


विद्यार्थी विचारतात, "ऍलेक्सा... व्हॉट टाइम इज इट ?" ऍलेक्सा उत्तर देते, "इट्स 7 : 30 am..." विद्यार्थी आणि मानवी रोबो ऍलेक्सा यांच्यातला हा संवाद. कुठे घडला? वरूडा या लहानशा गावातल्या अमरावती महापालिकाच्या प्राथमिक शाळेत. इथली मुलं रोज ऍलेक्सा हिच्याशी बोलत असतात. या बोलणार्‍या, आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार्‍या मानवी रोबोवर विद्यार्थी जाम खूश आहेत. अलेक्साला फक्त इंग्रजीच कळतं. त्यामुळे मुलं रोज घरून इंग्रजी प्रश्न तयार करूनच शाळेत येतात. हा रोबो कुणी बनवला?



अमोल भोयर या शाळेतल्या सहायक शिक्षकाने. यासाठी खर्च आला १० हजार रुपये. त्यासाठी अमोल सर आणि मुख्याध्यापिका सुषमा कापसे यांनी स्वतःचे प्रत्येकी पाच पाच हजार रु घातले. स्टॅच्यू आणि पॉवर बॅंक स्थानिक बाजारातून घेतलं. काही वस्तूंची ऑनलाईन खरेदी केली. आणि एक ते दीड महिन्यात रोबो तयार झाला. रोबोचं नाव आहे, ऍलेक्सा.
शाळेतील विद्यार्थी या रोबोला जे प्रश्न विचारतात, त्याची उत्तरं ‘ऍलेक्सा’ इंटरनेटवर शोधते. पाढे, कविता, सामान्यज्ञान, दिनविशेष, हवामान अशा सगळ्याच विषयांवर तिच्याकडून मुलांचं शंकानिरसन होतं. शाळेत इंटरेनेटसुविधा नाही. मुख्याध्यापिका सुषमामॅडम त्यांचा मोबाइल हॉटस्पॉट त्यासाठी वापरू देतात. ही सगळी तळमळ एवढ्यासाठीच की, विद्यार्थ्यांना आजच्या काळात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहिती मिळावी, शिक्षणासोबतच त्यांना आधुनिक तंत्रज्ञानदेखील हाताळायला मिळावं आणि जास्तीत जास्त मुलं शाळेत यावीत. या रोबोचे निर्माता अमोल सर म्हणतात, “सौदी अरेबिया देशाचं नागरिकत्व मिळवणारी जगातली पहिली मानवी रोबो सोफिया जेव्हा भारत दौऱ्यावर आली होती. तेव्हाच, आपणही आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अशाच प्रकारचा एक रोबो तयार करावा अशी कल्पना मला सुचली.”
सीबीएससी शाळांप्रमाणे आता महानगरपालिका शाळांमध्येदेखील डिजिटल शाळा ही संकल्पना रुजते आहे. त्यामुळे विद्यार्थी शाळेत जास्त रमताहेत, असं दिसतं. 

- अमोल देशमुख.

Tuesday 3 April 2018

चंदेरी दुनियेतील सेलिब्रिटी ‘दुर्गा’ ग्रामविकासासाठी सरसावली... पांढरी गावात घडवली जलक्रांती अन‌् पाणंदमुक्ती

'एस दुर्गा’ (बहुचर्चित मल्याळी चित्रपट) फेम राजश्री देशपांडे. चंदेरी दुनियेत वावरताना समाजाला आपला उपयोग व्हावा, ही भावना तिच्या मनात रुंजी घालत होती. राजश्री मूळची औरंगाबादची. आसपासच्या परिसरात फिरताना पांढरी गाव आढळलं. गावात 300 कुटुंब, पाण्याचं दुर्भिक्ष्य, पायाभूत सुविधांची वानवा, सार्वजनिक कामांबाबत लोकांची उदासिनता. राजश्री आणि तिच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांतून पांढरीचा गावविकास आराखडा तयार केला, सर्वांना एकत्र आणलं. राजश्रीचे पदरचे दीड लाख आणि मुंबईतल्या काही सहकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे केलेल्या मदतीतून बेमळा नदीच्या पात्राचं खोलीकरण, रुंदीकरण केलं. ग्रामस्थ एकत्र आल्याचं पाहून प्रशासनाचीही या कामी साथ मिळाली. तीन वर्षांनंतर, आज या नदीपात्रात जलसाठा झाला अाहे. भूजल पातळीही वाढली.
गावाच्या पाणंदमुक्तीबाबत जागृती करत राजश्रीनं जवळपास दोनशे कुटुंबांना स्वच्छतागृह उभारण्यास आणि ती वापरण्यासाठी उद्युक्त केलं. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, तहसीलदार सतीश सोनी, बीडीओ एस.सी.राठोड यांनीही काही दिवसांपूूर्वी राजश्री आणि तिच्या टीमचं अभिनंदन केलं.आपण त्या गावात असू - नसू, एकदा सुरू केलेलं काम स्थानिक नेतृत्वानं, लोकांनी सुरू ठेवलं पाहिजे, याची विशेष काळजी राजश्री घेते. अर्थात तिच्यासाठी हे सगळं सोपं नव्हतं. ग्रामस्थांच्या भेटीसाठी ती मुंबईहून पहिल्यांदा आली होती तेव्हा ती आपल्या गावासाठी काम करेल, याबाबत त्यांना विश्वास वाटला नव्हता. मात्र गावकऱ्यांचं शंकानिरसन करत, आपला उद्देश केवळ ग्रामविकासाचाच आहे आणि आपण ठरवलेलं काम पूर्ण करणारच, हा विश्वास राजश्रीनं ग्रामस्थांना दिला.
पांढरीच्या कायापालटानंतर राजश्रीने जालना जिल्ह्यातलं मठजळगाव हे गाव निवडलं आहे. जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्यासोबत गावाला भेट देऊन विकासआराखडा तयार केला आहे. जळगाव जिल्ह्यामधल्या काही गावांतही तिचं काम सुरू आहे.
आपण ज्या भागातून येतो, त्या भागाच्या विकासासाठी काहीतरी योगदान दिलं पाहिजे, अशी राजश्रीची भूमिका प्रशंसनीय तर आहेच. अनुकरणीयसुद्धा आहे. 

-अनंत वैद्य.

सोनालीच्या जिद्दीने ठोकला शड्‍डू, परिस्थिती झाली चीतपट

‘'आष्टीच्या कन्याशाळेत नववीत पहिल्यांदा शड्डू ठोकून उभी राहिले. पुढे जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत गेले. प्रत्येक वेळी मी ठोकलेला शड्डू हा प्रतिस्पर्ध्यांपेक्षा, परिस्थितीच्या विरोधात जास्त जोरात होता!" सिंगापूरमध्ये २०१६ साली झालेल्या स्पर्धेची रौप्यपदक विजेती सोनाली तोडकर सांगत होती.सोनाली, बीड जिल्ह्यातल्या कायम दुष्काळी असलेल्या आष्टी तालुक्यातल्या बाराशे लोकवस्तीच्या मंगरुळ गावची. घरची अवघी दोन एकर शेती, वडील महादेव आणि आई कुसूम इतरांच्या शेतात मजूरी करणारे. मोठी बहीण राणी हिच्या लग्नाचं कर्ज अात्ता कुठे फिटलं आहे, मोठा भाऊ सचिन पदव्युुत्तर शिक्षण घेतोय. घरात कुस्तीचा कोणताही वारसा नाही. सोनालीला पोहण्याची खूप आवड. पण मुलींनी काय पोहायचं, म्हणून घरातून विरोध झालेला. कुस्तीबाबत मात्र शेजाऱ्यांनी सोनालीच्या वडिलांचं मन वळवलं. आळंदीच्या दिनेश गुंड यांच्या जोग महाराज महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्रात ती दाखल झाली. त्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धांमधून पदकांची लयलूट सुरूच राहिली. पुण्यातल्या महापौर करंडकानं तिला नाव मिळवून दिलं. राष्ट्रीय स्तरावर पदकांची एकविशी तिने गाठली. हे यश मिळवताना तिला प्रचंड संघर्ष करावा लागला. २०१६ मध्ये राष्ट्रकुलसाठी निवड झाली, तो क्षणही सोनालीसाठी अत्यंत कसोटीचा होता. आतापर्यंतच्या कष्टांचं चीज होण्याची संधी येऊन ठेपली होती. पण सिंगापूरला जाण्यासाठी फेडरेशननं दोन दिवसात दीड लाख रुपये भरायला सांगितलं. सोनालीसमोर प्रश्नांचा डोंगर उभा राहिला. मात्र वडिलांनी धीर दिला, ''तू खेळावर लक्ष दे , पैशांचं मी पाहतो.'' आष्टीकरांनी मदतफेरी काढून रुपया रुपया गोळा केला आणि सोनालीने त्यांचा विश्वास सार्थ ठरवला. 
आता २०२० च्या टोकियो ऑलीम्पिकसाठी ती तयारी करत आहे. पुण्यातल्या कुस्तीप्रशिक्षक अश्विनी बोऱ्हाडे तिला मार्गदर्शन करत आहेत. सोनाली राजगुरुनगरमध्ये एफवायबीए करत आहे. खांद्याची शस्त्रक्रिया झाल्यामुळे ४ एप्रिलपासून ऑस्ट्रेलियात सुरू होत असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ती सहभागी होऊ शकली नाही. दिवसभराच्या अभ्यासाबरोबर रोज पहाटे पाच ते साडेसात आणि संध्याकाळी चार ते साडेसात या वेळेत ती सराव करत आहे. ती सांगते, "राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक मिळवलं, ऑलिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याची जिद्द पूर्ण केल्याशिवाय हा डाव संपणारा नाही!’'
कुस्तीची सुवर्णकन्या होण्यासाठी सोनालीला शुभेच्छा! 
- अमोल मुळे.