Showing posts with label Nanded. Show all posts
Showing posts with label Nanded. Show all posts

Monday, 23 April 2018

अडचणी सोडवण्यासाठी धाव घेणारे हरीभाऊ

वासुदेव पांडुरंग उर्फ हरीभाऊ जोशी यांची नांदेड जिल्ह्यातल्या भोकर तालुक्यातल्या बल्लाळ गावी वडिलोपार्जित शेती. उमरीला राहणारे हरीभाऊ मार्च 2014 मध्ये राज्य विद्युत वितरण कंपनीमधून सहायक लेखापाल पदावरून निवृत्त झाले आणि बल्लाळला आले. कडक उन्हाळ्याचे दिवस. लोकांना पिण्यासाठी पाणी नव्हतं. हरिभाऊंनी स्वतःच्या शेतात बोअर खणली. त्याला भरपूर पाणी लागलं. हरीभाऊंनी स्वखर्चाने बोअरवेलला पाईपलाईन केली आणि पाणी गावच्या विहिरीत सोडलं. त्या उन्हाळ्यात बल्लाळच्या लोकांचा पाण्याचा प्रश्‍न मिटला. सरकारी अधिकार्‍यांना याबाबत कळलं . बोअरवेलचे अधिग्रहण करून त्याचा मोबदला देण्याचा प्रस्ताव ठेवला. बोअरवेलच्या अधिग्रहणाला हरीभाऊंनी परवानगी तर दिलीच पण पैसेही नाकारले.
2015 च्या ग्रामपंचायत निवडणुकीत हरीभाऊ स्वतः निवडणुकीसाठी उभे राहिले नाहीत पण सात अपक्षांचं त्यांनी उभं केलेलं पॅनल सत्तेत आले. सत्तेत आल्याबरोबर 91 हजार रूपये खर्च करून गावातील रस्त्यांवर एलसीडी लाईट बसले. गावातील ओढयाकाठी असलेल्या स्वतःच्या शेतातील दोन गुंठे जमीन देऊन जिल्हा परिषदच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंर्तगत मोठी विहीर खोदून घेतली. विहीरीला भरपूर पाणी लागलं. त्यावर जलवाहिनी बांधली. बल्लाळ गावातील 1300 घरात या नळयोजनेचं पाणी पोहोंचत असून गाव टँकरमुक्त झालं. त्यामुळे आजूबाजूच्या दोन तांड्यांनाही नळ योजनेव्दारे पाणीपुरवठा झाला.


गावातील पाणीप्रश्‍न कायमचा संपवण्यासाठी हरीभाऊंच्या सल्ल्यानुसार पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणाला गंगाधर बलिलवाड, बाजाजी राचेवाड, दत्ता, लक्ष्मण पाटील, मारोती पुवडवाड गेले. लोकसहभागातून पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी बल्लाळ गावाने घेतलेल्या पाणी ग्रामसभेला जिल्हा परिषद, पंचायत समितीचे अधिकारी व 400 लोक उपस्थित होते.
स्वतःच्या शेताजवळ हरीभाऊंनी स्वखर्चाने नाला खोदून वन्यप्राण्यांच्या पाण्याचीही सोय केली आहे. भोकर इथल्या उपजिल्हाधिकारी दीपाली मोतियाळ यांनीही पाहणी करून त्यांच्या कामाचं कौतुक केलं.
कोणाच्याही कोणत्याही अडचणीबद्दल कळलं की हरीभाऊ तिथे धाव घेतात. गरीब, आदिवासींच्या मनात त्यांना विशेष स्थान आहे. सरकारी योजना, कागदपत्र याबाबत मार्गदर्शन मिळण्यासाठी हक्काचं माणूस म्हणजे हरीभाऊ. सर्व समुदायांमध्ये सलोखा राहावा यासाठी वेगवेगळ्या उपक्रमातून ते कार्यरत असतात. गावाच्या तंटामुक्त समितीचे ते अध्यक्ष आहेत. गावाच्या विकासाच्या ध्यासानं ते झपाटलेले आहेत. जिल्हा परिषद , पंचायत समितीच्या काही अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा त्यांचा आरोप आहे. त्याविरोधात ते स्वखर्चानं लढा देत आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री , पंतप्रधान कार्यालयाकडे त्यांनी तक्रार केली असून पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांना सकारात्मक प्रतिसादही लाभला आहे.
पुत्रशोक, स्वतःचं ब्रेन हॅमरेज , शस्त्रक्रिया अशा वैयक्तिक दुःख-अडचणींवर मात करत हरीभाऊ खंबीरपणे उभे आहेत. स्वतःच्या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णालयात येणाऱ्या इतर रुग्णांची विचारपूस करून त्यांचं मनोबल उंचावत असत. आपल्याला बोनस आयुष्य मिळालं असून त्याचा जास्तीत जास्त लोकांसाठी वापर करण्याचं हरीभाऊंनी ठरवलं आहे. 
- उन्मेष गौरकर.

Monday, 12 March 2018

विज्ञानप्रसारक बापमाणूस

एकुलती एक गुणी मुलगी कविता. तिला रक्ताचा कर्करोग झालेला. तिचं कोमात जाणं. महिनोन् महिने चालणारे उपचार. या मुलीचा बाप डॉ शंभुनाथ कहाळेकर, तंत्रग्राम संकल्पनेचे जनक. विज्ञानप्रसारक म्हणून सर्वपरिचित झालेले. त्यांच्या लेकीचा आजार सुरू झाला १९९२ साली. ती आजारातून बरीही झाली. तेव्हा तिचं लग्न झालं. शंभुनाथांना नातही झाली. पण नंतर कविताचा आजार बळावला. या सर्व काळात या दुःखी, व्यथित बापाने मन गुंतवण्यासाठी विज्ञानप्रसाराचा मार्ग शोधला.
गेल्या २५ वर्षात विज्ञानरंजनाचे तीन हजार प्रयोग, 



विज्ञानेश्वरी,विज्ञानबोध,विज्ञानवेध,विज्ञानगीता,विज्ञानपुराण,विज्ञानकविता, वीजविज्ञान, खेड्यासाठी विज्ञान, घर पहावं बांधून,विज्ञानातील गमतीजमती,वैद्यकीय उपकरणे हे त्यांच्या नावावर जमा आहे.अलिकडे विज्ञानरंजन आणि तंत्रग्राम प्रदर्शन असा कार्यक्रम ते करतात. विज्ञानाच्या अनेक गंमतीजमती, छोट्या प्रयोगातून विज्ञान समजून देणं, भोंदूगिरीवर आघात आणि रोजगारमार्गदर्शन असा हा कार्यक्रम. सारं विनामूल्य.
       पाचपाचशे घरं असलेली, निवघा बाजार आणि चीमेगाव ही त्यांनी केलेली नांदेड जिल्ह्यातली तन्त्रग्रामं. या कामासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांना 20 लाखाचा निधी दिला. या कामात त्यांना तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी, आमदार डी.पी सावंत यांचं मोलाचं सहकार्य झालं. इथे महिलांना पाचशे रुपये भांडवलावर निर्धूर चूल बनविण्याचं तंत्र शिकविण्यात आलं. त्यावर या महिलांची पोटापुरती कमाई होते. महिलांना कचऱ्यापासून कोळसा बनविण्याची यंत्रंदेखील देण्यात आली आहेत. तंत्रज्ञानाधारित असे शंभर उद्योग करायला कहाळेकर मार्गदर्शन करतात.
कहाळा गावी जन्मलेले डॉ शंभुनाथ कहाळेकर. १९७७ मध्ये आयआयटी, खरगपूरहून एमटेक पदवी, टाटा कन्सल्टिंगमध्ये काही वर्ष नोकरी, १९८७ पासून नांदेडच्या एसजीजीएस अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापकी, पीएचडी मार्गदर्शक, मराठी विज्ञान परिषदेचे सक्रीय सदस्य, आहेत. विज्ञानप्रसाराच्या कार्यासाठी आणि पुस्तकलेखनासाठी पुरस्कार ही त्यांची ओळख. कहाळेकरांची मुलगी कविता आज हयात नाही. २०१७ मध्ये ३६व्या वर्षीच तिचं निधन झालं. नात कीर्ती आणि पत्नी सुनीता यांच्या मदतीने ते दुःखातून बाहेर पडत आहेत. आज वयाच्या ६६ व्या वर्षीही विज्ञान तंत्रज्ञानप्रसाराचं त्यांचं कार्य सातत्याने सुरूच आहे.

- सु.मा. कुळकर्णी.

Wednesday, 24 January 2018

एजाजला बालशौर्य पुरस्कार



30 एप्रिल 2017, दुपारची वेळ. पार्डी गावातील आफरीम बेगम, तब्बसुम, सुमय्या, आणि अफसर बेगम या चौघी गावाजवळील बंधा-यावर कपडे धुऊन परतत होत्या. बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला उथळ पाण्याची एक जागा होती. तिथं कमरेइतक्या पाण्यात तिघीजणी खेळू लागल्या. खेळण्याच्या नादात पलीकडे २०-२५ फूट खोल पाण्याचा डोह आहे, हेही विसरून. १४ वर्षाची सुमय्या अचानक खोल पाण्याकडे गेली. आणि बुडायला लागली. जवळच्या आफरीनला तिने पकडण्याचा प्रयत्न केला पण ती हाताला येत नव्हती. हे सगळं काठावरून अफसर बेगमने बघितलं. लगेचच ती मदतीसाठी वाकली. पण, तिचाही तोल गेला. पाणी खूपच खोल असल्याने दोघी बुडू लागल्या. आता त्यांना वाचवायला तब्बसुम आणि आफरिम दोघीही खोल पाण्यात शिरल्या. पोहता मात्र कुणालाच येत नव्हतं. त्यामुळे गटांगळ्या खाऊ लागल्या. “वाचवा, वाचवा” या त्यांच्या आवाजाने लोक बंधाऱ्याकडे धावले. पण कोणीही खोल पाण्यात उतरेना.  दरम्यान एका लग्नात जेवण करून शेताकडे परतणाऱ्या सोळा वर्षाच्या एजाजनंही हा आवाज ऐकला. लोकांना बाजूला सारत तो पुढं झाला. आणि क्षणभरात त्याने पाण्यात उड़ी घेतली. तेव्हा बघ्यापैकी एक म्हणाला, “हा कशाला मरायला पाण्यात गेला?” पण दुसरा लगेच म्हणला, “तो चांगला पोहणारा आहे. मुलींना तो बाहेर काढील”.
दरम्यान आफरिम बेगम एक गटांगळी खाऊन वर आली होती. ती गळ्याला पडण्याचा धोका ओळखून अंतर ठेऊन एजाजने तिला पकडलं. काठावर सोडलं.
पुन्हा सुळूक मारून एजाज तब्बसुम जवळ पोचला. नाकातोंडात बरंच पाणी गेल्याने ती गुदमरत होती. त्याने तिच्या हाताला मजबूत पकडले. आणि स्वत: पाण्यात बुडून तिचं डोकं वर राहील याची काळजी घेत काठाकडे येऊ लागला. तेवढ्यात राजेश्वर देशमुख आणि पुंजाराम मदने यांनी एक साडीचे टोक एजाजच्या दिशेने फेकले. ते पकडून एजाजने तिला वाचविलं.
आता मुली बुडत असल्याची बातमी गावभर पसरली होती. सारा गाव बंधाऱ्यावर जमला होता. काही जण पाण्याबाहेर काढलेल्या मुलींच्या पोटातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले. एजाज पाण्याबाहेर येणार; तेवढ्यात काठावर उभी असलेली शन्नो एजाजला म्हणाली, “बाबा, मेरी बहन अफसर बेगमभी डूब गई है, उसेभी बाहर निकाल.”
एजाज परत फिरला. पुन्हा खोल पाण्यात जाऊन तिसरीचा शोध घेऊ लागला. इतक्यात केसांची हालचाल दिसली आणि त्याने जोरात सूर मारून केस पकडून तिला काठाच्या दिशेने खेचून आणलं. पुंजाराम मदने, भास्कर कल्याणकर, राजेश्वर देशमुख यांनी तिला बाहेर काढायला मदत केली. कोणी तरी म्हणाले, “और एक अंदर है सुमय्याSS”. आपली वर्ग मैत्रीण सुमय्या पण या बंधाऱ्यात बुडाली आहे, हा एजाजाला पण धक्का होता.
२५ फूट खोल पाण्यात एजाज सुमय्याचा शोध घेत राहिला. तो वेगवेगळ्या ठिकाणी तळ गाठायचा. पण सुमय्या दिसत नव्हती. अखेरचा प्रयत्न म्हणून त्याने पुन्हा एकदा तळ गाठला. तेव्हा पायाला काही जाणवलं. श्वास रोखून तिला वाचवायला त्यानं पुन्हा डुबकी मारली. तिचे पाय धरून वर आणलं खरं पण तोवर सुमय्या सर्वांना सोडून खूप दूर गेली होती. एजाजने तब्बसुम आणि आफरीनचे प्राण वाचवले. अफसर आणि सुमय्याला मात्र तो वाचवू शकला नाही. याची त्याला आजही खंत वाटते आहे.
अतिशय कठीण प्रसंगी साहस दाखवून दोन मुलींचे प्राण वाचविणाऱ्या एजाजचा गावाने सत्कार केला. आता त्याच्या या साहसाची नोंद राष्ट्रीय पातळीवरही झाली आहे. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याला बालशौर्य पुरस्कार दिला गेला. 7 मुली आणि 11 मुले अशा एकूण 18 बालकांना 2017 साठीचा राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार दिला गेला. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात एकट्या एजाजची निवड करण्यात आली आहे.
खेळात हुशार असलेला एजाज अब्दुल नदाफ पार्डी येथील राजाबाई कनिष्ठ महाविद्यालयात १० व्या वर्गात शिकतो. अतिशय गरीबीमुळे कुणाचे ट्रक्टर रोजंदारीवर चालवून, पडेल ते काम करून तो कुटुंबाला आर्थिक मदत करतो.
दहावी झाल्यावर ड्रायव्हरची नोकरी करावी या एजाजचा विचाराला बालशौर्य पुरस्काराने नवी दिशा दिली आहे. आता त्याला सैन्यात जाऊन देशाची सेवा करायची आहे.
 - सु.मा.कुळकर्णी.

Monday, 21 August 2017

आधी शिवावी वाकळ, मग मिळते भाकर


“चिंध्या द्या, जुने कपडे द्या, गोधडी, वाकळ शिवून घ्या” असं ओरडत दोन बाया गल्लीत आल्या. कालही आल्या होत्या पण आज त्यांना काम मिळालं.
नांदुसा येथील पद्मीनबाई रामजी आंतळकर आणि लोहा येथील रुक्मिणी बाबुराव मोरे, या सख्या दोन बहिणी. माहेर लोहा. दोघींची बालवयातच लग्ने झालेली. आज पद्मिनबाई ४० तर रुक्मिणीबाई ६० वर्षाच्या. पतीला, मुलांना हाताला काम नाही. या दोघी आणि त्यांच्या सुनाही गोधडी ,वाकळी शिवून संसारांचा गाडा ओढत आहेत.
पद्मीनबाई सांगत होत्या, “आम्ही सात बहिणीं गोधडी, वाकळी शिवतो. आमच्या आई, सासूने आम्हाला हे काम शिकविलं. तेच काम आम्ही आमच्या लेकीसुनांना शिकवलं. हा आमचा परंपरागत व्यवसाय आता दुष्काळातही साथ देत आहे”. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा काहीही असो, या दोघींचं हेच काम अखंड सुरू आहे. पद्मीनबाई म्हणतात, “वयाच्या बारा वर्षापासून लांब सुया आणि जाड दोरा आमची सोबत करतो आहे. मुक्त भटके जीवन जगत, कधी शाळॆत, पारावर, तर कधी मोकळी जागा बघून आश्रय घेतो. कधी पाल टाकून मुक्काम करतो. आकाशाचं पांघरून आणि जमिनीचं अंथरून करून आम्ही जगत आहोत. विहीर, आड, नदीचं पाणी घेऊन आंघोळ करायची. तीन दगडांची चूल मांडून भाकरी बडवायच्या, तांदूळ शिजवायचे. कधी जे शिळेपाके मिळेल त्यावरच गुजराण करायची. आणि पोटाची खळगी भरायची”.
वाकळ आणि गोधडीतला फरक रुक्मिणीबाई समजावून सांगतात. त्या म्हणतात, यात फारसा फरक नसतो. शिवणीत अंतर असते. वाकळ एकदा फाटली की पुन्हा शिवता येत नाही. रुक्मिणीबाईंचा मुलगा मोलमजुरी करतो. तर मुलीचं लग्न झालेलं आहे. या दोघी बहिणी एकमेकांसोबत महाराष्ट्र पालथा घालतात. कष्टांची कमाई आणतात. मुलीचे लग्न, आजारपण, घर बांधकामासाठी घेतलेली सावकाराची कर्जे या कमाईमधूनच फेडतात.
सध्या गावात काम नाही. दुष्काळामुळे शेतीची कामं मिळत नाहीत. पद्मीनबाईचे पती, तीन मुलं घरीच बसून आहेत. त्यांच्या दोन्ही सुना सध्या भोकर तालुक्यात वाकळ, गोधड्या शिवण्याचं काम करीत फिरत आहेत. शेतात दिवसभर राबून १०० रुपये रोज मिळतो तिथे एका गोधडीचे दीडशे ते अडीचशे रुपये मिळतात. पण रोजच हे काम मिळत नाही. कधी लगेच तर कधी चारचार दिवस काम मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं.
औरंगाबाद, पुणे, सोलापूर, लातूर इत्यादी महाराष्ट्रातील बहुतेक जिल्हे या दोघीनी पालथे घातले आहेत.
दारिद्रयरेषेखाली येत असल्याने स्वस्त धान्य दुकानावर धान्य मिळतं पण महिन्याला चार पायल्या गहू आणि चार पायल्या तांदूळ घरातील तेरा माणसाना पुरत नाही. या गल्लीत चार गोधड्या शिवून “चरैवती चरैवती चालू लाग बाई ..” हा मंत्र जपत दोघी बहिणी उदगीरला निघाल्या ...


- सु.मा.कुळकर्णी.

Sunday, 30 July 2017

केल्याने मार्केटिंग...


पॉम..पॉम...पॉम... हॉर्नचा आवाज येतो. घरा-घरातील स्त्री-पुरूष ताजी भाजी खरेदी करण्यासाठी गडबडीने घराबाहेर येतात. चवळी, गवार, वांगी, टमॉटो, भेंडी, कोथींबीर अशी ताजी, स्वच्छ भाजी आणणाऱ्या गोविंद पांडुरंग गणगे यांच्या सायकलभोवती क्षणात गर्दी होते. आणि पाहता पाहता सगळी भाजी संपून जाते. 
नांदेड शहराच्या जवळच वसलेलं सायाळ गाव. येथील गोविंद पांडूरंग गणगे वीस वर्षापासून शेती आणि भाजीविक्रीचा व्यवसाय करत आहेत. सुरुवात झाली ती केवळ दीड एकर जमिनीतून. तुटपुंज्या उत्पन्नावर गोविंदरावांचे आई-वेडील, भाऊ, पत्नी, मुलं असं आठ-दहाजणांचं कुटुंब जगत होतं. गोविंदराव थोरले, त्यामुळे कुटुंबाला हालाखीतून बाहेर काढण्याची त्यांची तळमळ. पण दीड एकर शेतीतून किती आणि काय होणार? एकदा त्यांचे मामा हैद्राबादला निघाले होते. सोबत गोविंदालाही घेतलं. आंध्रप्रदेशच्या राजधानीत जायचा अनुभव गोविंदासाठी नवाच ठरला. मामाचं काम चालू राहिलं आणि सोबत महानगरातील लोकांच्या हालचाली, उद्योग-धंदा गोविंदाला पाहायला मिळाला. एका ठिकाणी काही लोक सायकलवर टोपलीतून भाजी विकताना दिसले. गोविंदाला कळलं की, ते शेतकरी आहेत आणि त्यांच्या शेतातील भाजी ते सायकलवर आणून विकत आहेत. यात त्यांना चांगला फायदाही होतो. ही कल्पनाच गोविंदाला मनापासून भावली. आपणही आपल्या दीड एकरात भाजी लावायची आणि ती नांदेडला जाऊन विकायची, हे तिथंच ठरलं. घरीही सगळ्यांनी कल्पना उचलून धरली. सगळं घर झटून कामाला लागलं. 

हा काळ होता 20 वर्षापूर्वीचा. लोक तेव्हा आठवडी बाजारातून भाजी खरेदी करत. नांदेडची तेव्हाची लोकसंख्याही तशी कमीच. पण शहर वाढू लागलं होतं. मोठ्या कुटुंबांची संख्या कमी होऊन ‘हम दो, हमारे दो’ संस्कृती नांदेड शहरात उदयास येत होती. नोकरदारांना बाजारहाटासाठी सवड मिळत नव्हती. त्याचवेळी गोविंदने नवी कोरी सायकल खरेदी केली. त्यावर टोपली ठेवण्यासाठी कॅरिअर बसवलं. शेतातल्या ताज्या भाज्या भरल्या आणि गल्लीतून भाजी विक्रीस सुरूवात केली. सायकलवर भाजी ही कल्पना नांदेडवासीयांसाठी नवीनच. त्यामुळे लोक कुतुहलाने पाहत. पण त्याची रोज ताजी, स्वच्छ भाजी पाहतापाहता गृहिणींमध्ये लोकप्रिय झाली. 
भाजीविक्रीच्या कमाईतून गोविंदने आणखी दीड एकर जमीन घेतली. घर बांधलं. गाडी घेतली. त्यांचा मोठा मुलगा शुभमं पुण्यात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतो आहे. तर धाकटा वैभव बारावीला आहे. मुलांच्या शिक्षणाचा खर्चदेखील ते शेती आणि भाजीच्या व्यवसायावर समर्थपणे पेलत आहेत.
गोविंद गणगे म्हणाले, “मी पहाटे चार वाजता कामाला सुरुवात करतो. एक एकरात सिझनप्रमाणे भाज्या लावतो. देखभालीचं काम आई-वडिल, पत्नी, भाऊ सांभाळतात. भाजी तोडण्यासाठी दोन बाया 100 रूपये रोजाने आहेत. पहाटे सर्व भाजीपाला घेऊन नांदेडला येतो. जास्तीचा भाजीपाला बिटावर विकून टाकतो. आता माझे स्वतःचे काही ग्राहक आहेत. या भाजीपाला विक्रीत मला खर्च वजा जाता रोज 700 ते 800 रूपये इतका फायदा मिळतो. तसंच उर्वरित दोन एकरात गहु, ऊस, केळी यासारख्या पिकांचं चांगलं उत्पादन मिळतं. वर्षाकाठी सात-आठ लाखाची उलाढाल होते. तर तीन-चार लाख रूपयांचा फायदा मिळतो.”
शेती व्यवसायाला जोड म्हणून गणगे यांनी भाजी विक्री सुरु केली. कल्पकता, जिद्द, चिकाटी, मेहनतीमुळे या सामान्य शेतकर्‍याचं सगळं जीवन बदलून गेलं. एक साधा शेतकरी मार्केटींगची कौशल्यं शिकून प्रगती करतो, हे उत्तम उदाहरण ठरावं.


- उन्मेष गौरकर, नांदेड

Sunday, 18 June 2017

सर्पमित्र संजय


‘‘एकदा मित्राच्या गावावरून येत होतो. रस्त्याच्या कडेला लोकं जमलेले दिसले. हातात दगड, काठया. ते सगळे एका छोटया बिनविषारी सापाला दगडाने ठेचून मारण्याच्या तयारीत होते. तो बिचारा जिवाच्या आकांताने सरपटत होता. मी पटकन समोर गेलो आणि त्याला उचलून खिशात टाकलं. आणि जंगलात सोडलं’’, नांदेड येथील सर्पमित्र संजय नरसिंग अडगुलवार सांगत होते. हे सांगतानाही त्यांना भरून आलं. ते पुढं म्हणाले, ‘‘माझ्या जीवनातील हा अविस्मरणीय प्रसंग. त्या मुक्या प्राण्याची धडपड, सरपटत, दगड चुकवत पुढं जात राहणं आठवलं की माझा कंठ दाटून येतो. साप दिसला की लोक त्याच्या जीवावर उठतात. त्यांनाही संवेदना असतात. निसर्ग चक्रातील तो महत्त्वाचा घटक’’.
संजय यांना लहानपणापासून मुक्या प्राण्यांचं प्रेम. त्यातूनच त्यांनी सापांना वाचवणं सुरु केलं. घरातून विरोध झाला. नंतर मात्र सापांविषयीचं प्रेम, त्यांना वाचवण्याची तीव्र इच्छा बघून त्यांनी विरोध करणं सोडून दिलं.
नांदेड शहराच्या आसपास वस्तीत निघणार्यां सापाचा जीव वाचवून, वनविभागाच्या मदतीनं जंगलात सोडायचं काम संजय अनेक वर्षापासून करत आहेत. वर्षाकाठी साधारण 400-500 साप ते जंगलात नेऊन सोडतात. नांदेड येथील अबचलनगरात त्यांचं किराणा दुकान आणि घर. 1990 पासून ते सर्पमित्र म्हणून काम करू लागले. मित्रांसह त्यांनी ‘सर्पमित्र सेवा संस्था’ स्थापन केली आहे. या संस्थेमार्फत ते सापांविषयीचे समज गैरसमज दूर करण्याचे, निसर्गातील त्यांचे महत्व लोकांना समजावून सांगतात. त्यांना संजना आणि मंथन अशी दोन मुले. मुलगी संजना लहानपणापासून वडिलांनी पकडलेल्या सापांना जंगलात सोडण्यापूर्वी त्यांची काळजी घेण्यात मदत करते.
साप पकडल्यानंतर 24 तासात त्याचे जंगलात पुनर्वसन करणं कायद्याने बंधनकारक आहे. हा नियम ते कटाक्षाने पाळतात. आजपर्यंत पकडलेल्या सापांची नोंदही त्यांनी ठेवली आहे. संजय म्हणतात, ‘‘साप पकडणं जिकिरीचं असतं. सापाच्या विषारी, निमविषारी आणि बिनविषारी जाती आढळतात. बिनविषारी साप चावला तरी तो उंदीर, बेडूक असं खाद्य खात असतो. त्यामुळे त्याच्या तोंडात अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात. त्यामुळे संसर्ग होऊ शकतो. त्यासाठी औषधोपचार हवेतच’’.
या कामासाठी सरकारकडून कुठलीही मदत मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं. संजय सांगतात, ‘‘2012 साली नांदेडमधल्या अजयसिंह बिसेन या नगरसेवकाच्या पुढाकाराने साप पकडण्यासाठी अवजारं मिळाली होती. नांदेड मनपाने सर्पमित्र म्हणून ओळखपत्र दिलं होतं. पण मानधन, मदत, विमा मिळत नाही. एका सर्पमित्राला, विषारी साप चावला. अनेक दिवस त्याला दवाखान्यात राहावं लागलं आणि उपचारही बराच काळ चालले. खूप खर्च झाला. मदतही मिळाली नाही. अशी बिकट परिस्थिती आमच्यावर कधीही येऊ शकते’’.
मनपाला मदत मागितली तर ते म्हणतात, तुम्हाला साप पकडायला आम्ही सांगितलं का? घरात साप निघाला की ते लोक संजय यांना बोलावतात. संजय म्हणतात, ‘‘आम्ही लोकांकडून मानधन, फी घेतली तर ते आम्हाला बोलावणार नाहीत. आणि सापाला मारून टाकतील. तेच नको आहे. ते पर्यावरणाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यांना वाचवणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. तीच जबाबदारी मी घेतली आहे’’.
सर्पमित्र संजय अडगुलवार संपर्क क्र. - 9763123485


- उन्मेष गौरकर.

Tuesday, 16 May 2017

शेतकरी झाला विक्रेता



नांदेडच्या आठवडी बाजारातली ही गोष्ट. दुरून आवाज येत होता, ‘फक्त दहा रुपयात टरबूज...दहा रुपयात टरबूज’. एक दहा-बारा वर्षाचा मुलगा आणि त्याचे वडील टरबूज विकायला बसले होते. समोर ट्रॅक्टरभर हिरव्यागार टरबूजांचा ढीग. डोक्यावरच्या रणरणत्या उन्हाची पर्वा न करता लोकही दोन-चार टरबूज खरेदी करून जात होते. विशेष म्हणजे, प्रत्येकाला टरबूजाच्या गोडीविषयी माहिती बाप-लेक आवर्जून सांगत होते. एखाद्याचं टरबूज गडबडीत हातातून पडून फुटले तर त्याला म्हणत होते, ‘राहू द्या साहेब, दुसरे बदलून घ्या, हा शेतकऱ्याचा माल आहे, दलालाचा नाही.’ हा उमदा शेतकरी आहे, पुरभाजी माधवराव तिडके. तिडके नांदेड जिल्ह्यातील दिग्रस (नांदला) गावचे.
 त्यांची सात एकर शेती. त्यात दोन बोअर. त्यामुळे पाण्याची चांगली सोय. गहू, ज्वारी, सोयाबीन, ऊस, हळद ही पारंपरिक पिकं ते घेतातच. यावर्षी प्रयोग म्हणून त्यांनी टरबूज हे 75 दिवसाचं उन्हाळी घ्यायचं ठरवलं. सुरुवातीला 30 गुंठे जमिनीवर हे पीक घेतलं. आणि खर्च वजा करून त्यांना एक लाखाचा नफाही मिळाला. तिडके सांगतात, ‘सकाळी आणि संध्याकाळी एक तास ठिबकने पाणी दिले. पहिला बहार 18 टन निघाला. तो शेतातून 8.50 प्रति किलोने विकला. आता दुसरा बहार 8 टन निघाला आहे’.
पहिल्या बहराचा माल वजनाने जास्त भरत होता. पण या पिकाचा काहीच अनुभव नसल्याने वाहतुकीचा प्रश्न होता. म्हणून तो शेतातून विकला. दुसर्‍या बहाराचा माल आकाराने लहान. त्याला दलालांकडून नगण्य भाव मिळू लागला. कष्टाने पिकविलेले टरबूज जवळपास फुकटच द्यायचे. दलाल ते तिप्पटीनं विकून चांगला नफा मिळवणार हे तिडके यांना पटले नाही. शेवटी हे टरबूज स्वतःच विकायचा त्यांनी निर्णय घेतला.
एक उत्पादक शेतकरी स्वतःच्या मालाचा विक्रेता झाला. नांदेड हे जिल्हयाचं शहर जवळच. तिथल्या आनंदनगर, तरोडा नाका भागात टरबूज विक्री सुरू झाली. मालाची किंमत ठरवून 1 ते 1.5 किलो वजनाचं एक टरबूज 10 रुपयांना विकलं. ग्राहकांनीही भरघोस प्रतिसाद दिला. यावर्षी टरबूज शेतीत मिळालेल्या यशाने तिडके यांना आत्मविश्वास मिळाला आहे. त्यामुळेच पुढील वर्षी दोन एकरात टरबूज आणि खरबूज लावण्याचे ठरविले आहे. अर्थात पुढील वर्षी विक्री आपणच करणार हेही ते आत्मविश्वासाने सांगत होते.
सध्या अनेक शेतकऱ्यांनी टरबूजाचे पीक घेतले आहे. त्यांचा माल 5 ते 8 रूपये किलोने विकत असतानाच पुरभाजी तिडके यांनी दहा रूपये किलोने टरबूज विकून उत्तम नफा मिळवून दाखवला आहे. सर्वच टरबूज उत्पादकांसमोर त्यांनी उदाहरण ठेवले आहे. हा मार्ग बाकीच्यांनीही चोखाळायला हवा.
पुरभाजी तिडके संपर्क क्र.- 9011733287

- उन्मेष गौरकर.

समाजसेवेची जाण, वाढवते वर्दीची शान



तेलंगणा आणि कर्नाटक सीमेलगत वसलेला नांदेड जिल्ह्यातला देगलूर तालुका. इथं, श्रीदेवी पाटील या प्रशिक्षणार्थी पीएसआय म्हणून २०१३ मध्ये रुजू झाल्या. महिला सबलीकरण आणि बालमजुरी निर्मूलन यात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. पाटील यांनी आत्तापर्यंत ५१ बालकामगारांची सुटका करून त्यांना शाळेची वाट दाखवली आहे. देगलूर तालुक्यातल्या आदिवासी आश्रमशाळांतल्या गैरप्रकारांना रोखण्यासाठी त्या तिथे अचानक भेट देतात. तिथे नीट जेवण आणि अन्य सुविधा आहेत की नाही याची तपासणी करतात.
मार्केटमध्ये फिरताना, सिव्हिल ड्रेसवरही त्या रोड रोमियोंचा समाचार घेतात. त्या देगलूरला हजर झाल्याबरोबरच एक प्रसंग घडला. आणि त्यांच्या कामाची चर्चा सुरु झाली. रस्त्यावर मुलींची छेड काढणाऱ्या दोनतीन सडकसख्याहरींना पाटील यांनी पकडून काठीचा प्रसाद देत पोलीस ठाण्यापर्यंत नेलं. यामुळे रोडसाईड रोमियोंना वचक बसला. महिन्यातून एकदा त्या महिलांना पोलीस ठाण्यात आमंत्रित करतात. आणि गप्पांमधून कायद्याचं पालन, रक्षण महिला कसं करू शकतात, हे समजून देतात.
शेजारच्या तेलंगणा राज्यातल्या मुलांशी इथल्या मुलींची लग्नं लावून देणं इथे चालतं. श्रीमंती, जमीनजुमला बघितलं जातं. मात्र मुलाची चौकशी केली जात नाही. मग महिनाभरात या मुली माहेरी परततात. संसार मोडतात आणि परित्यक्ता महिलांचे प्रश्न तयार होतात. पाटील यांनी गुन्हे दाखल न होऊ देता पती-पत्नी, सासर-माहेरची माणसं यांचं समुपदेशन करून अनेक संसार जुळवले आहेत. यासाठी त्यांनी जवळपास ८० कार्यक्रम घेतले.
आणीबाणीच्या प्रसंगात महिलांना तातडीने मदत मिळावी यासाठी पोलीस खात्याने 'प्रतिसाद' नावाचं मोबाईल ऍप तयार केलं आहे. पाटील यांनी शाळा-कॉलेजं आणि महिला मंडळात कार्यक्रम घेऊन त्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आज अनेक विद्यार्थिनी, महिला हे ऍप वापरतात. यातला नंबर फिरवला की संकटात सापडलेल्या महिलेच्या चार नातेवाईकांच्या मोबाईलवर मेसेज जातो. पोलिसांनाही लोकेशन कळतं आणि तत्काळ मदत मिळू शकते.
जनतेला पोलीस आपले मित्र वाटावेत यासाठी त्या विविध कार्यक्रमात भाग घेतात. पोलीस-नागरिक संबंध विश्वासाचे व्हावेत म्हणून सोशल पोलिसिंगचे अनेक उपक्रम त्यांनी सुरू केले. सोशल पोलिसिंग फायद्याविषयी श्रीदेवी पाटील म्हणतात, "अनेकदा लोक बंदोबस्तात, गुन्ह्याच्या तपासात मदत करतात. त्यांना सामील करून घेतल्याने त्यांचा खाकीबद्दलचा विश्वास वाढतो आणि गुन्हेगारांना तातडीने गजाआड करता येतं".
त्यांचं पोलीस खात्यात येणं, तळमळीने काम करणं याविषयी त्यांनी सांगितलं, "‘माझे वडील बळीराम पाटील मुख्याध्यापक होते. त्यांनी आम्हा भावंडात, मुलगा-मुलगी असा कधीच फरक केला नाही. बुलढाणा जिल्ह्यातलं मोताळकर पोफळी हे माझं गाव. नवोदय विद्यालयात मी शिकले. आयएएस व्हायचं माझं ध्येय होतं. म्हणून बारावीनंतर मी पुण्याला आले. एलएलबी केलं. पीएसआय परीक्षा दिली आणि निवडली गेले."
महिला पोलीस अधिकारी म्हणून त्या कुठल्याच सवलती घेत नाही. मृत देहाचा पंचनामा, खुनाचा तपास, पोलीस बंदोबस्त, गुन्हेगारांशी सामना अशी कामं त्या आव्हान म्हणून स्वीकारतात. या नोकरीत कामाची वेळ ठरलेली नसते. नेहमी अलर्ट राहावं लागतं. रोजच झोपायला बारा-एक वाजतो. तरीही या कामात समाधानी असल्याचं त्या सांगतात.
श्रीदेवी पाटील
- सु.मा.कुळकर्णी.

Sunday, 14 May 2017

बोंढारची शाळा


नांदेड तालुक्यातलं नेरली कुष्ठधाम. इथून जवळच बोंढार इथं जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा. २०१० पासून नांदेड जिल्ह्यातल्या ११ शाळा ब्रिटीश कौन्सिलशी जोडल्या गेल्या. विशेष म्हणजे, बोंढारमधल्या या शाळेने राज्यातील ४२ शाळांशी स्पर्धा करीत, 'ब्रिटीश कौन्सिल इंटरनॅशनल अवार्ड (२०१०) मिळविलं. याचं श्रेय आहे, मुख्याध्यापक राजाराम राठोड, सहकारी अश्विनी कौरवार, केशवराव अरसुळे, सरपंच देऊबाई बैकरे, शिक्षक आणि ग्रामस्थांना.
पहिली ते पाचवीपर्यंतची ही शाळा. विद्यार्थी आहेत केवळ ४२. एक मुख्याध्यापक, दोन शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याकडे व्यक्तिगत लक्ष देतात. ज्ञानरचनावादावर आधारित इथली शिक्षणपद्धती. गाणी, चित्रकला आणि खेळातून इथली मुलं शिकतात. बालाजी कछवे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'ब्रेनजिम' अर्थात मेंदूच्या व्यायामशाळेत मुलं अनेक भाषा शिकत आहेत. अगदी १५० पर्यंतचे पाढेही तयार करतात. उलटी सुलटी उजळणी इथल्या मुलांना मुखोद्गत आहे. सुटीच्या दिवशी, शाळा सुटल्यावर मुले गटागटाने अभ्यास करतात. मोठी मुले लहान मुलांचा अभ्यास घेतात. एकत्र मिळून खेळतात, असे शालेय समितीचे अध्यक्ष चंदू बागल सांगत होते.
ब्रिटीश कौन्सिलच्या इंटरनॅशनल स्कुल अवार्डच्या तयारीविषयी शाळेचे माजी-आजी मुख्याध्यापक गोविंद उपासे आणि राजाराम राठोड यांनी समजावून सांगितले. या अवार्डची नामांकन फी २० हजार रुपये आहे. ही फी राठोड सरांनी भरली. 
युकेमधील मँचेस्टर शहरापासून ६५ किलोमीटरवरील लिव्हरपूल येथील 'हाटन हिल प्रायमरी स्कुल' आणि बोंढार येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळा यांच्यात विविध ऍक्टिव्हिटी संदर्भात सतत मेल, पोस्ट, भेटीगाठीद्वारे व ऑन लाईन आंतरक्रिया सुरु असते. तसंच वर्षभर विद्यार्थी, शिक्षक, पालक, अधिकारी यांच्यात देखील या प्रकल्पाचे उद्दिष्टानुरूप तारखेनुसार नियोजन, अंमलबजावणी, अधिकारी, पालक यांच्या भेटी, परीक्षण, तपासण्या असा भरगच्च कार्यक्रम असतो.
विद्यार्थ्यांत पर्यावरण विषयक जाणीवजागृतीसाठी आंतरराष्ट्रीय निकष आहेत. त्यानुसार वृक्षारोपणापूर्वी, विद्यार्थ्यांना जवळच्या जंगलात नेतात. झाडांचे महत्त्व निरीक्षणातून, चर्चेतून, नेट सर्चिंग, भाषण, निबंध, चित्रकला आणि फोटोच्या स्पर्धा घेऊन पटविले जाते. नंतर झाडे लावणे, रोपे दत्तक घेणे, ती जोपासणे वनस्पती व विविध वृक्षांचा अभ्यास, भारतातील व यू केमधील वृक्ष, फुले,फळे, पाने, हवामान, आदींचा तुलनात्मक अभ्यास, यावर लेखी-तोंडी परीक्षा, प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतल्या जातात. परितोषिकेही दिली जातात. म्हणूच बोंढार शाळेत, परिसरात, गावात लावलेली सुमारे हजार झाडे जगली आहेत. विद्यार्थ्यांचे हे प्रकल्प यु केच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना व त्यांचे प्रकल्प येथील विद्यार्थ्यांना मेल, पोस्ट यांच्याद्वारे पाठविले जातात. 

बालचित्रकलेची प्रदर्शने दोन्हीकडे भारतात. स्पोर्ट्स, लाईफ स्टाइल, ऐतिहासिक वारसा, रुढी परंपरा, सण उत्सव, सांस्कृतिक जीवन, भविष्यातील गरजा असे विविध उपक्रम चालतात. 
राठोड सर आणि दिलीप बनसोडे (सध्या मनपाचे शिक्षणाधिकारी), अश्विनी कौरवार यांनी यु केच्या हाटन हिल प्रायमरी शाळेला भेट दिली आहे. प्रत्येक वर्गात मुलांनी तयार केलेली शैक्षणिक साधने, प्रोजेक्टर एल सी डी संगणक, फरशीवर काढलेले रंगीत खेळ याद्वारे शास्र, कला, भाषा, गणित, भूगोल विषय हे विद्यार्थी शिकत असतात.
शिक्षण फक्त शाळेपुरतं मर्यादित राहिलं नाही. मुलांनी गावही बदलून टाकलं आहे. बोंढार गावात आणि रस्त्याच्या दुतर्फा १६०० झाडे लावली आहेत. विद्यार्थी, शिक्षक व गावकऱ्यांनी एकत्र येत आसना नदीवर जिल्ह्यातील सर्वात मोठा चाळीस फुटांचा वनराई बंधारा बांधला आहे. त्यामुळे बोंढार गाव टॅंकर मुक्त झाले आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही शेती पिकू लागली आहे.
या शाळेला २००८-२००९ मध्ये जिल्हा परिषदेचा सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार, २०११ मध्ये सानेगुरुजी स्वच्छता शाळा पुरस्कार मिळाला आहे. ग्रामपंचायतीला मिळालेला सौरऊर्जेवर चालणारा विद्युतपंप शाळेला दिल्याने ही शाळा ग्रीन स्पॉट बनली आहे.
- सुरेश कुलकर्णी, नांदेड

Wednesday, 5 April 2017

विसाव्याची भेळपुरी

दरवर्षी अनेक मुलं-मुली ही भेळ खाऊनचं दहावी-बरावीचे पेपर देण्यासाठी जातात. सध्या परीक्षा सुरू आहेत. आजही भेळ खाण्यासाठी अनेक विद्यार्थी येत होते. त्यांची भेळेची ऑर्डर पुरी करून त्यांना बेस्ट लक देण्यात वेळ कसा गेला, ते कळलंच नाही. माझी भेळ खाल्ली की त्यांचा पेपर चांगला जातो, असं मुलं म्हणतात....” नांदेडच्या विसावा उद्यानातील भेळपुरी सेंटरचे उत्तमराव मोतीराम वाघ सांगत होते. 
गेल्या ३६ वर्षापासून नांदेड शहरातील महानगर पालिकेच्या विसावा उद्यानात ते ‘विसावा भेलपुडी सेंटर’ चालवित आहेत. भेळ सगळीकडे मिळते. पण उत्तमरावांच्या भेळेची चव मात्र गेल्या तीन दशकांपासून नांदेडवासियांना भूरळ पाडते आहे. ही भेळ खाल्ल्यावर यश मिळतं, हे विद्यार्थ्यांचं म्हणणं किती खरं, किती खोटं हे माहित नाही. पण या भेळने उत्तमराव वाघ यांना मात्र १०० टक्के यश दिलं, हे निश्चित.
उत्तमराव अभिमानाने सांगतात, “एकदा 7-8 वर्षाच्या मुला-मुलीने माझी भेळ खाल्ली की त्यांचं महाविद्यालयीन शिक्षणपूर्ण होईपर्यंत, ते भेळ खायला येत राहातात. माझ्या भेळेचे असंख्य फॅन आज सातासमुद्रापार गेले आहेत. परंतु ते जेव्हा नांदेडला येतात तेव्हा त्यांच्या मुला-बाळांसह माझी भेळ खाल्ल्याशिवाय वापस जात नाहीत.” 
नाशिक तालुक्यातील एका अदिवासी खेडयातून चाळीस वर्षापूर्वी पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उत्तमराव वाघ हा तरूण नांदेडात आला. अस्थिरतेमुळे वडलोपार्जित शेती, गाव, घर सोडावं लागलं. काही दिवस खाजगी गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम केलं. एका सहकाऱ्याने त्यांना ते आज तयार करत असलेली भेळ शिकवली. तेव्हा पुसटशीही कल्पना नव्हती की, ही भेळ आपलं आयुष्यच बदलून टाकणार आहे. 
वाघ सांगतात, “१९८० मध्ये नांदेडला विसावा उद्यानाची उभारणी करण्यात आली. विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल विसावा उद्यानात उभे राहात होते. आजची फास्ट फुड लाईफ स्टाईल आली नव्हती. नांदेडमध्ये भेळ बनवणारे फारसे लोकही नव्हते. त्यात पुन्हा व्यवसायिक भेळ बनवणारे तर फारचं कमी. याच संधीचा फायदा घेत विसावा उद्यानात भेळचा स्टॉल सुरू करण्याचं मी ठरवलं. मी बनवलेल्या भेळची चव नांदेडमधल्या लोकांना खूप आवडली. पाहाता पाहाता माझी भेळ लोकप्रिय झाली. सुरूवातीला ५० पैसे, १ रु, २-३-५-८-१० रूपये करत आज २० रू प्लेट दरात मी भेळ देतो. आता दिवसाला हजार- दीड हजार रुपयांची कमाई होते. कधी अगदी ४० -५० प्लेट भेळ विकली जाते. तर कधी कमी. गेल्या ३६ वर्षांत भेळेचा दर्जा मी कधीही खालावू दिला नाही. भेळेसाठी लागणारे शेव, कांदा, कोथींबीर, नांदेडी मुरमुरे, चिंच, गूळ वगैरे उत्कृष्ट दर्जाचेच वापरले. ग्राहकांमध्ये भेदभाव नाही. एकाच चवीची भेळ सगळ्यांना. माझ्या भेळेच्या प्रतिष्ठित चाहात्यांची यादी खूप मोठी आहे.
 मी अनेक लग्नाकार्यात भेळचे स्टॉल लावतो. ही चविष्ट भेळ बनवण्याची कला मी माझ्या मुलाला देखील शिकवली आहे.
काही वर्षापूवी नांदेडमधले एकजण दुबईला लेकीकडे निघाले होते. तुझ्यासाठी काय घेवून येवू? असं लेकीला विचारल्यावर विसावा उद्यानातील भेळ घेवून या, असं तिने सांगितलं. माझी भेळ आज विदेशात देखील गेली आहे.
उत्तमराव वाघ, मो.8698691072
 - उन्मेष गौरकर.

Monday, 3 April 2017

वाचनगोडी लावणारे कडगे काका

वाचनसंस्कृती जपली पाहिजे..मराठी भाषा जगली पाहिजे.. वाचेल तो वाचेल.. वगैरे बोलणारे अनेक. पण पदरमोड करून, वाचकांना पुस्तकं विनामूल्य घरपोच पुरवत गेल्या २० वर्षापासून वाचनसंस्कृती जपणारा एखादाच. तोही सत्तरीचा ‘तरुण’. नांदेडचे बसवराज शंकरअप्पा कडगे. फुफ्फ्साची शस्त्रक्रिया, श्वास घेण्याचा त्रास, खांदेदुखी हे सारे विसरून आपल्या सायकलवर पुस्तकांचा गठ्ठा घेऊन लोकांना वाचनगोडी लावणारे. 
बसवराज उदगीरचे. शासनाच्या सिंचनविभागात ड्राफ्टमन म्हणून नोकरी मिळाल्याने नांदेडला स्थायिक झाले. नोकरीला १५ वर्षे शिल्लक असताना स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांनी पत्नीसोबत गुंतवणूक सल्लागार व्यवसाय सुरू केला. सुखसंपन्न आयुष्य जगत असताना आपल्याकडील पैशाचा आणि वेळेचा सदुपयोग करण्याचे ठरवून सायकलवर घरपोच पुस्तकसेवा देणे सुरू केले. आणि नांदेडमधल्या वाचकांचे कडगेकाका बनले.
“पालक-मुले टीव्हीचे वेडे झाले आहेत. ते काहीच वाचत नाहीत. त्यांना चांगली पुस्तके वाचायचा आग्रह धरून वाचनसंस्कार जपण्याचा आणि समाजऋण फेण्याचा प्रयत्न करावा असं ठरवून मी हे काम सुरु केलं,” ते सांगतात. 
१९९८ साली परळीला भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातल्या पुस्तक प्रदर्शनातून तीन हजार रुपयांची दोनशे पुस्तके विकत घेऊन ते नांदेडला परतले. “माझी हौसमोज करायला तुमच्याकडे पैसे नसताना ही पुस्तके घ्यायला कुठून पैसे आले?” पत्नीने जाब विचारला. त्याकडे दुर्लक्ष करत ते कामाला लागले. 
लोकांना सांगू लागले, “तुमच्याकडे धन आहे. आरोग्यधनही आहे. पण चांगलं विचारधन साठवायला तुम्ही काय केलं आहे? तुम्ही काय वाचता? तेव्हा लोक म्हणायचे, “आम्ही काहीच वाचत नाही. त्याने काय फरक पडतो?”
कडगे सांगत, “गांधीजींनी ‘अन टू दी लास्ट’ हे पुस्तक वाचलं आणि त्यांचं जीवन बदललं. विवेकानंदांचं चरित्र वाचून एक सैनिक समाजसेवक अण्णा हजारे झाला. विनोबा भावे, वि.दा.सावरकर अशा थोरामोठ्यांच्या जीवनावर झालेले वाचनसंस्कार माहीत नाहीत का? विचारधनाची शिदोरी नसेल तर तुम्ही खरे समाधान मिळवू शकणार नाही. मी तुम्हाला मोफत चांगली पुस्तके घरपोच देतो. ती वाचून मला परत करा.” सुमारे तीनशे कुटुंबाना ते चांगली पुस्तके पुरवत आहेत. याखेरीज त्यांच्या तीन हजार दर्जेदार पुस्तकांच्या ग्रंथालयाचा लाभ सुमारे दोन हजार लोक नियमितपणे घेत आहेत. सरकार सार्वजनिक ग्रंथालय काढायला अनुदान देते. पण कुठलीच सरकारी मदत न घेता कडगेकाका हे काम करत आहेत. कोणी आपल्याजवळचे चांगले ग्रंथ आणून दिले तर ते दान म्हणून स्वीकारतात. नांदेडमधल्या सर्वात जुन्या, स्वातंत्र्यसेनानींनी स्थापलेल्या विचार विकास वाचनालयाला अनेक दानशूर लोकांकडून त्यांनी ग्रंथ मिळवून दिले आहेत.
 “हे काम कष्टाचे आहे. पण वाचकांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून मला समाधान मिळतं. तीच माझ्या जगण्याची उर्जा आहे”, कडगेकाका सांगतात.
कडगेंचा दिवस जिथे सुरू होतो त्या अंबिका योग कुटीर मधले साधक, नांदेडमधले विद्यार्थी, सामाजिक संस्था, उद्योगपती, बूटपॉलीश आणि चप्पलदुरुस्तीचं काम करणारा धीराजी देशमाने, कपडेधुलाईचं काम करणारा शेख गणी, एटीएमचे सुरक्षारक्षक असे अनेकजण कडगे काकांच्या पुस्तकसेवेचा लाभ घेत आहेत.
- सु. मा. कुळकर्णी.

Wednesday, 22 February 2017

हेल्प किसान अभियान





नांदेडमधील मधुमेहतज्ञ डॉ. महेश तळेगावकर यांनी हेल्प किसान अभियान सुरु केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे काम ते करत आहेत. खोऱ्याने पैसे ओढणाऱ्या डॉक्टरांच्या रांगेत हा कोण वेडापीर शेतकरी मित्रांसाठी धडपडतो आहे, असा प्रश्न पडल्याने डॉ. महेश तळेगावकर याबद्दल विचारले.
डॉ. महेश तळेगावकर म्हणाले, ‘नुकतीच नांदेड जिल्ह्यातील अनेक गावामध्ये, मी आरोग्य तपासणी शिबीरे घेतली. तेव्हा जाणवलं की अनेक मधुमेही रुग्णांनी उपचारासाठी पैसे नसल्यामुळे उपचार बंद केले आहेत. हा दुष्काळाचा परिणाम. अनेक रुग्णांच्या रक्तांमध्ये जेवणानंतरच्या साखरेचे प्रमाण ६०० च्यावर गेल्याचे आढळून आले आहे. या गंभीर प्रकारामुळे मधुमेही रुग्णांची शुगर चेकअपसहीत वर्षभर मोफत तपासणी करायचे ठरवले."
नांदेड जिल्ह्यातील जवळपास १२५ दुष्काळग्रस्त गावांतील मधुमेही रुग्णांना डॉ. तळेगावकर आज मोफत वैद्यकीय सुविधा देत आहेत. सुट्टीच्या दिवशी वेगवेगळ्या गावात ते चेकअप कँपचे आयोजन करतात. 
यासाठी काही औषध कंपन्यानी मोफत औषधे उपलब्ध करून दिली आहेत. दानशूर व्यक्तीही मदत करत असतात. ‘जिथे कमी तिथे आम्ही’ या न्यायाने तळेगावकर आपला खिसा आनंदाने रिकामा करायला तयार असतात.
डॉ तळेगावकर म्हणतात, "बदलत्या ऋतूचक्रामुळे ग्रामीण अर्थचक्र पूर्णपणे कोलमडून पडले आहे. आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहेच. मात्र, दुष्काळाची तीव्रता मोठी असल्यामुळे समाजानेदेखील प्रयत्न करणे गरजेचे आहे. बळीराजा एकटा नाही, संपूर्ण समाज त्याच्या पाठीशी उभा आहे. हा आत्मविश्वास त्यांच्यात जागृत करण्यासाठीच 'हेल्प किसान अभियान' राबवत आहोत. मराठवाड्यातील प्रत्येक डॉक्टराने एक तरी गाव दत्तक घेऊन त्या गावातील आपल्या स्पेशालिटीच्या रुग्णांची मोफत तपासणी करावी."
डॉ. महेश तळेगावकर -
- सु.मा.कुळकर्णी

Saturday, 11 February 2017

उत्तम शेती : झिरोबजेट शेतीनं सावकारी कचाटा सुटला

नांदेड जिल्हा. लोहा तालुक्यातील दापशेड येथील विश्वनाथ गोविंदराव होळगे यांच्या झिरोबजेट शेतीची ही गोष्ट. विश्वनाथ होळगे यांचं एकत्र कुटुंब. घरची १४ एकर शेती. रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके वापरून शेती नापीक बनलेली. प्रत्येक पिकाचा उत्पादन खर्च वाढत गेल्याने तोट्यात चालणारी. गावातील अॅड.उदय संगारेड्डीकर आणि केशव राहेगावकर हे पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या बार्शी येथील शिबिरातून शून्य खर्चाच्या नैसर्गिक शेतीचे तंत्र शिकून आलेले. त्यांनी गावातील शेतकऱ्यांना या शेतीचे तंत्र समजावून दिले. होळगे यांनीही हे तंत्र शिकून घेतलं आणि घरच्या शेतीत हा प्रयोग करायचं ठरवलं. झिरोबजेट नैसर्गिक शेती म्हणजे काय तर कोणतंही पीक घेताना मुख्य पिकात त्याच हंगामात येणारी आंतरपिके घ्यायची. या आंतरपिकाच्या उत्पन्नातून मुख्य पिकाचा पेरणी, बियाणे, मशागत असा सर्व खर्च निघत असल्याने, मुख्य पिक शून्य खर्चात म्हणजेच झिरोबजेट होते. 
बिजामृत, जीवामृत, आच्छादन आणि वापसा ही झीरोबजेट शेतीची चतु:सूत्री. 
यापद्धतीत कोणतीही खते, कीटकनाशके, औषधे शेतात टाकावी लागत नाहीत. एका गावरान देशी गायीपासून या पद्धतीत 30 एकर शेती करता येते. केवळ १० टक्के विजेची गरज असते. त्यामुळे वीज आणि पाणीबचत. महागड्या ठिबक सिंचनाची, शेततळ्याची कटकट नाही. उत्पादित शेतमाल विषमुक्त, पौष्टिक, दर्जेदार आणि स्वादिष्ट असतो.
होळगे यांनी हेच तंत्र वापरलं. आणि शेतात गतवर्षी पाच एकर डाळींब लागवड केली. पाण्याचा दुष्काळ असल्याने बोअरच्या तुटपुंज्या पाण्यातून त्यांनी डाळींबाची १५०० झाडे जगविली. यावर्षी यातल्या दोन एकर डाळींबाच्या शेतात बटाटे, काऱ्हाळ, लसूण आणि मोहरी ही आंतरपिके घेतली. सध्या डाळींबाची झाडे लहान असल्याने त्यांचे उत्पन्न नाही. त्यामुळे यावर्षी मुख्य पीक बटाटा हेच आहे. या पिकाचा खर्च आंतरपिकांत वसूल झाला आहे. केवळ देशी गाईच्या शेण-गोमुत्रापासून शेतातच बनविलेल्या जीवामृताच्या फवारण्या यामुळे बटाटे पीक उत्तम आलेले आहे. 
दुसरीकडे तीन एकर डाळींबाच्या शेतात गव्हाचे मुख्य पीक घेतले आहे आणि त्यात हरभरा आणि मोहरी, कोथिंबीर, गवार ही आंतरपिके घेतली आहेत. तिथे साठ क्विंटल गव्हाचे उत्पादन अपेक्षित आहे.
बाजूच्या शेतकरी मित्रांकडे प्रचंड रासायनिक खते, कीटकनाशके आणि औषधांच्या फवारण्या करून फक्त गव्हाचे एकच पीक असल्याचे होळगे सांगतात. होळगे यांच्या गव्हाची ओंबी मोठी आहे आणि गव्हाच्या दाण्याची संख्याही जास्त आहे. गव्हाआधी याच तीन एकरात त्यांनी खरीपात २२ क्विंटल सोयाबीन आणि पाच क्विंटल तुरीचे उत्पन्न मिळवले आहे. होळगे म्हणतात, ‘हे तंत्र वापरून शेतीला सुरुवात केल्यानंतर आमच्या मागचा सावकार सुटला. दरवर्षी पेरणीच्या वेळी ३० हजारांची रासायनिक खते लागायची, पुन्हा चांगल्या पिकासाठी दहा हजाराचे डी.ए.पी. खत लागायचे. शिवाय कीटक आणि तणनाशके लागायची ती वेगळीच. त्यातून ५०-६० हजारांची उधारी व्हायची. नगदी पैसे नसल्यामुळे दुकानदार उधारीत जो भाव लावेल तो मुकाट्याने द्यावा लागायचा. मग कापूस किंवा अन्य पिके येताच दुकानदार सव्वापट रक्कम वसूल करायचा. सुमारे ७० ते ८० हजार रुपये उत्पादनातून दुकानदार म्हणजेच सावकाराला द्यावे लागत’. हा भुर्दंड या तंत्राने वाचवला आणि सावकार सुटला आहे.
- सु. मा. कुळकर्णी.

Friday, 3 February 2017

‘डासमुक्त गाव’ - शक्य वाटतं का?


नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी हे शक्य करून दाखवलं. एखाददोन नाही,५००च्या वर गावात! आता तिथं डासच काय, पण दुर्गंधीयुक्त पाण्यामुळं निर्माण होणारे रोगराईचे जंतूही नाहीत. हिमायतनगर तालुक्यातील टेंभुर्णी गावातील सरपंच प्रल्हाद पाटील यांचा मूळ प्रयोग. त्यात भर घालून काळे यांनी तो देशपातळीवर नेला.
हा प्रयोग हिमायतनगर, हदगाव, भोकर, लोहा आदी तालुक्यांतील पाचशेहून अधिक गावांमध्ये पोचला आहे. संपूर्ण जिल्हा डासमुक्त करण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. हेही शक्य आहे? असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी मला त्यांचे पीआरओ मिलिंद व्यवहारे यांच्या सोबत डासमुक्त गावांना पाठवलं. 
नांदेडचा कहरी उन्हाळा. सर्वच गावं टँकरचं पाणी पीत होती. भालकी, कारवाडी, माळेगाव आदी गावात मात्र प्रत्येक घराची सांडपाणी वाहून नेणारी मोरी शोषखड्ड्यांना जोडलेली दिसत होती. मला सिंधू संस्कृतीतल्या मोहेंजोदरो आणि हडप्पा या नगरांची जलसंधारणव्यवस्था आठवली. मे महिना असूनही या गावातील हापसे चालू होते. विहिरींत पाणी होतं. आमचं गाव टँकरमुक्त झालं आणि हा चमत्कार या शोषखड्ड्यांमुळे घडला असं, सरपंच परमेश्वर गोपतवाड सांगत होते.
शोषखड्ड्यांची योजना पूर्वीही महाराष्ट्रात होती. त्यामध्ये वाळू, विटा, मोठे दगड भरले जात. मात्र ते गाळाने लवकर भरत आणि पाणी मुरण्याऐवजी वर येऊन रस्त्यावर वाहत असे. हे दोष पाटील यांनी दूर केले आणि काळे यांनी तिला आधुनिक रूप दिलं. तिचं नामकरण केलं ‘मॅजिक पिट’. यात चार बाय चार वर्तुळाकार खड्डा घेऊन सिमेंटची टाकी बसवतात. टाकीच्या बाजूचा भाग दगडगोट्यांनीच भरला जातो. मोरीचा पाइप टाकीत सोडून ती बंद केली जाते आणि त्यावरून मातीचा थर दिला जातो. त्यामुळे आत मॅजिक पिट आहे हे समजत नाही. वरच्या बाजूला छिद्रातून पाणी जमिनीत मुरतं. गाळ खाली बसतो. तीन-चार वर्षांनी टाकी स्वच्छ केली म्हणजे झालं. अत्यंत कमी खर्चात खूप मोठा परिणाम ‘मॅजिक पिट’मुळं साधला जात आहे. हा उपक्रम काळे यांनी शासकीय योजनेत बसवला. त्यासाठी प्रत्येक घरटी दोन हजार रुपये अनुदानही दिलं. 

सांडपाणी जमिनीत मुरवल्यानं बोअरवेल आणि विहिरीचं पाणी वाढलं; पण ते पिण्या-वापरण्यायोग्य आहे का? असा प्रश्न अर्थातच पडला. ही शंका दूर करण्यासाठी नांदेडच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे (जीएसडीए) अभियंता एच. एम. संगनोर यांच्याशी चर्चा केली. टेंभुर्णीतील पाण्याच्या त्यांनी चाचण्या घेतल्या. हे पाणी केवळ वापरण्यायोग्यच नव्हे, तर पिण्यायोग्यही होतं. मात्र तरीही गावकऱ्यांच्या मनात शंका राहू नये म्हणून ‘मॅजिक पिट’ योजना राबविणाऱ्या ४१० गावांमध्ये ‘आरओ वॉटर प्युरिफायर’ दिले आहेत. एका ‘मॅजिक पिट’मुळे किती फायदे झाले पाहा. डास गेले, आजार पळाले, गटारांची गरज संपली, त्यावरील लाखोंचा खर्च आणि गैरव्यवहार टळला आणि पाणीसमस्यादेखील सुटली. ही क्रांतीच नाही का? 
काळे यांनी ग्रामसेवक, सरपंच, ग्रामस्थ सर्वांनाच सोबत घेतलं. गावागावात रात्री मुक्काम करून लोकांचं मतपरिवर्तन घडवून आणलं.
या कामाची दखल केंद्र सरकारनंच नव्हे, तर महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा इत्यादी राज्यांनी घेतली आहे. त्यांचे प्रतिनिधी डासमुक्त गावांना भेटी देऊन‘मॅजिक पिट’ पॅटर्न आपल्या राज्यांकडे घेऊन गेले.
काळे म्हणाले, “या पिट्‌सचं सादरीकरण दिल्ली, मुंबई आदी ठिकाणी केलं. सर्वांच्या बुद्धीला पटायचं; परंतु कोणी विश्वासच ठेवायला तयार नसे. ग्रामविकास खात्याचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांनी डासमुक्त गावांचा दौरा केला. अन्य अधिकाऱ्यांच्या भेटी, चर्चा सुरू झाली. अखेरीस सरकारनं दखल घेतली आणि ‘मॅजिक पिट पॅटर्न’चा महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये समावेश करण्यात आला. तसंच चौदाव्या वित्त आयोगाच्या मार्गदर्शक सूचीमध्येही त्याचा समावेश झाला.”
- सु. मा. कुळकर्णी.

Monday, 2 January 2017

'छोटा भीम' संकल्पनेने घडवला बदल

नवजात बालकांच्या वजनाचा राज्यात उच्चांक : नांदेडमध्ये 'छोटा भीम' संकल्पनेने घडवला बदल

उत्तरं शोधण्याचा ध्यास असला की प्रश्नही आपलेसे वाटू लागतात. त्यातून मग जे घडते ते अनेकांना समाधान देणारे आणि प्रशंसा करायला भाग पाडणारे असते.
नांदेड जिल्हा हा तीन राज्यांच्या सीमांना स्पर्श करणारा, आदिवासीबहुल आणि भटक्या विमुक्त समाजाची बहुसंख्येने वस्ती असलेला. गरिबी, दारिद्रय, अशिक्षितपणाचे प्रमाणही जिल्ह्यात बर्‍यापैकी आहे. 
कमी वजनाच्या नवजात शिशुंच्या जन्माचे प्रमाण जिल्ह्यात बरेच आढळून येई. जन्मल्याबरोबर ज्या बाळाचे वजन अडीच किलोपेक्षा कमी भरते अशा बाळाला कमी वजनाचे बाळ म्हणतात. कमी वजनाचे बालक जन्माला येण्याची अनेक कारणे असतात. एक तर गर्भधारणेचे ३७ आठवडे पूर्ण होण्याच्या आधीच जन्मलेले नवजात शिशु, आनुवंशिक किंवा गर्भाशयाचीच वाढ खुंटल्यामुळे कमी वजनाचे जन्मते.


जि.प. शाळातील विद्यार्थ्यांसाठी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवत्ता वाढ अभियान' जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येते. त्याबरोबरच जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे यांनी कमी वजनाच्या बालकांचा जन्मदर अधिक वजनाच्या जन्मदरामध्ये परावर्तित करण्यासाठी ‘छोटा भीम’ ही आगळीवेगळी संकल्पना जिल्ह्यात राबवली. या संकल्पनेअंतर्गत आशा वर्करनी जननक्षम जोडप्यांची माहिती संकलित करून गरोदर मातांची जिल्हाभर नोंदणी केली. ग्रामआरोग्य व पोषणदिनी गावनिहाय मातांची तपासणी केली.
पुढील टप्पा होता तो गरोदर महिलांना योग्य आहारविषयक सल्ला देण्याचा आणि तिच्या कुटुंबियांना गरोदर महिलेची कशी काळजी घेतली पाहिजे याबाबत त्यांचे समुपदेशन करण्याचा. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी दर बुधवारी 'मातृत्व दिन' साजरा करण्यात आला. त्याठिकाणीही समुपदेशन करण्यात आले.
या प्रयत्नांतून गरोदर महिलांनी स्वतः आणि त्यांच्या कुंटुंबियांनी आहारविषयक व अन्य आरोग्यविषयक काळजी घेतल्यामुळे २०१६ वर्षात मेपर्यंत जन्मलेल्या एकूण बालकांमध्ये केवळ ५.९२ टक्के बालकेच कमी वजनाची जन्माला आली. म्हणजेच साधारणतः ९४ टक्के बालकांचे वजन हे सामान्य/ सुदृढ या निकषात बसणारे म्हणजेच २५०० ग्राम(अडीच किलो) इतके भरले तर या ९४ टक्के मधील ४८ टक्के बालकांचे वजन हे सर्वसाधारणपणे तीन किलो किंवा त्यापेक्षा जास्त भरले.
आत्तापर्यंतच्या राज्यातील सरासरीनुसार २५ ते ३० टक्के बालके कमी वजनाची असतात. पण नांदेड जिल्ह्यात अनेक पॅटर्न निर्माण करणार्‍या जि.प. सीईओ काळे यांनी बाल आरोग्याचाही नांदेड पॅटर्न निर्माण केला आहे. जानेवारी ते मे २०१६ या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील एकूण १६ तालुक्यात जन्मलेल्या नवजात बालकांची एकूण संख्या ९ हजार ६२० इतकी आहे. यापैकी ४ हजार ५६९ बालकांचे वजन तीन किलो किंवा त्यापेक्षा जास्त आहे. तर ४ हजार ४८१ बालकांचे वजन अडीच किलोपर्यंत आहे.
नांदेड जि.प. चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, त्यांच्या विभागातील सर्व सहकारी आणि कर्मचारी आणि अर्थातच आशा वर्कर यांच्या परिश्रमातून राज्यात उच्चांक निर्माण करणारे हे कार्य घडले.
सुदृढ बालक जन्माला येणं महत्वाचं का? सुदृढ़ असण्या-नसण्याने त्या बालकाच्या पुढील आयुष्यावर चांगला - वाईट परिणाम होत असतो. म्हणूनच चांगला परिणाम घडवून आणण्याच्या या प्रशासकीय प्रयत्नांचे कौतुक!
 -रमेश मस्के, नांदेड

Thursday, 29 December 2016

पाच हजार बालमजूरांना आणले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात

२००४ साल. एकट्या नांदेड जिल्ह्यात १ हजार २५२ इतके बालमजूर धोकादायक उद्योगात आढळून आले. या गंभीर परिस्थीतीतून सुरू झाला बालमजुरीत अडकलेल्यांना शिक्षण देणारा राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प. हे कसं घडलं? कुणी घडवलं?
पाच हजार बालमजूरांना आणले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात
बालकामगार किंवा बालमजूर हे कोणत्याही समाजावरील एक मोठा कलंकच असतो. देशाचे हे भावी आधारस्तंभ योग्य मार्गावर आणून देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम अनेक द्रष्ट्या व्यक्ती आणि संस्था करतात. त्यातीलच एक म्हणजे नांदेड येथील ‘परिवार प्रतिष्ठान’ ही संस्था आणि त्याचे प्रमुख डॉ. पी.डी. जोशी पाटोदेकर.
वय वर्ष ६ ते १४ या वयोगटातील जे बालक / बालिका कुटुंबासाठी किंवा स्वतःसाठी पैसे कमवायला घराबाहेर पडते आणि ज्यामुळे त्याचे शिक्षण संकटात सापडते अशा बालकाला सर्वसाधारणपणे बालकामगार म्हटले जाते. पण कामगारांना ठराविक वेतन असते, ते आपल्या हक्कासाठी भांडू शकतात, संप करतात, त्यांना कायद्याचे संरक्षण आहे. बालकांना कामावर ठेवणारे लोक त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त कामे करून घेतात आणि नगण्य मोबदला देतात. बहुतेकदा तर १२ ते १६ तास काम करून घेतले जाते. त्याबदल्यात त्यांना फक्त जेवण दिले जाते. तेथेच काम आणि तेथेच राहणे-झोपणे असे कामाचे स्वरूप असते.
ही एक शोषणाची प्रक्रिया असते.
बालमजुरीच्या विरोधात १९८६ साली कायदा अस्तित्वात आला. हा मुख्य कायदा मानला जातो. त्यानंतर वेगवेगळ्या खात्याअंतर्गत बालकामगारविरोधी वेगवेगळे कायदे अस्तित्वात आले. जी अस्थापना किंवा कारखानदार बालमजूर ठेवतो त्याला एक वर्षाचा सश्रम कारावास, २० हजार रूपये दंड व पीडित बालकामगाराला ५ हजार रूपये द्यावे लागतात.
डॉ. पी.डी. जोशी हे २००४ मध्ये बालकामगार या विषयाशी जास्त जवळीकतेने आणि सक्रियतेने जोडले गेले. त्यांनी नांदेड जिल्ह्यात आपल्या सहकार्यांसह बालकामगारांचे सर्वेक्षण घडवून आणले. त्यात एकट्या नांदेड जिल्ह्यात १ हजार २५२ इतके बालमजूर धोकादायक उद्योगात आढळले. ही परिस्थिती गंभीर होती. त्यावर त्यांनी एक प्रकल्प तयार करून केंद्र शासनाला पाठवला. केंद्र सरकारने बालमजूरांच्या या पुनर्वसन प्रकल्पाला मंजूरी दिली. ‘राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प’ या नावाने सरकारने तो लागू केला. नांदेडसह महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यात धोकादायक उद्योगव्यवसायात बालमजूर सापडले. म्हणून त्या 17 ही जिल्ह्यात हा प्रकल्प राबवण्यात आला.
बालकामगार हा विषय कामगार आयुक्त या कार्यालयाच्या अख्त्यारीतला. त्यामुळे बालकामगार शोधणे व त्यांच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करणे हे या कार्यालयाच्या निरीक्षकांचे काम. पण राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पामुळे त्यापुढे जाऊन बालकामगार शोधणे आणि पुनर्वसनासाठी त्यांना शाळेत टाकणे अशी जबाबदारी निश्चित झाली आहे.
राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक ५० बालकामगारांसाठी एक शाळा मंजूर केली जाते. नांदेड जिल्ह्यात ४ डिसेंबर २००४ ला पहिली बालकामगार शाळा सुरू झाली. याच वर्षी नांदेड जिल्ह्यात एकूण २५ बालकामगार शाळा सुरू झाल्या. तत्कालीन जिल्हाधिकारी तानाजी सत्रे यांनी या कामात अतिशय मोलाची कामगिरी केली. ‘परिवार प्रतिष्ठान’ ने जिल्ह्यात सात शाळा चालवण्याची जबाबदारी उचलली. तर इतर एनजीओ ने 18 शाळा चालवायला घेतल्या. ‘परिवार प्रतिष्ठान’च्या सातपैकी सहा शाळा अद्याप सुस्थितीत चालू आहेत. तर एनजीओच्या १८ पैकी केवळ ३.
‘परिवार प्रतिष्ठान’ने बालकामगारांना इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत शिक्षण दिले आणि त्यापुढे सामान्य शाळांमध्ये त्यांचे प्रवेश करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. आजपर्यंत पाच हजार बालकामगारांना त्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले.
डॉ. पी.डी. जोशी यांचं असं म्हणणं आहे की, अज्ञान हे बालमजूर प्रश्नाचं मूळ आहे. त्याबरोबरच दारिद्र्य, लोकसंख्या याचाही मोठा प्रभाव आहे. नुकतेच १७ मे २०१६ रोजी भोकर या तालुक्याच्या ठिकाणी डॉ. जोशींनी तेथील परिविक्षाधिन आय.पी.एस.पोलीस अधिकारी लोहीत मतानी यांच्या
मार्गदर्शनाखाली आणि काही पोलीस व चाईल्ड लाईनचे कर्मचारी यांच्या समवेत बालकामगार सर्वेक्षण केले. यात एका रस्त्यावरील साधारण १३ दुकानातून ६० बालमजूर आढळून आले. त्यातील २० जण पळून जाण्यात यशस्वी झाले. तर हाती गवसलेल्या ४० जणांपैकी सर्वच्या सर्व मुले होती. एका रस्त्यावरील दुकानात बालमजूरांची एवढी संख्या आणि घनता आहे. यावरून या विषयाचे गांभीर्य लक्षात यावे.
यामध्ये मुस्लीम बालकामगारांची संख्या लक्षणीय म्हणजे ३८ इतकी होती. ६ ते १० वयोगटातील १, ११ ते १४ वयोगटातील १३ तर १५ ते १८ वयोगटातील २६ बालकांचा समावेश आहे. यात शाळेत जाऊन काम करणारे १०, शाळेत न जाणारे २६ जण तर शाळेत कधीच न गेलेले ४ बालमजूर होते. यातील ३५ बालकामगार अर्थार्जनासाठी काम करीत होते तर पाच जण आपल्या कुटुंबातील व्यक्तीसह कामावर होते.
ही सर्व परिस्थिती भयावह आणि चिंता निर्माण करणारी आहे.
अशा परिस्थितीत ‘परिवार प्रतिष्ठान’ चे काम हे आशेचा किरण निर्माण करणारे काम आहे.
बालकांना त्यांचे हक्क मिळायलाच हवेत, यासाठी तुम्ही काय करू शकता?
वाचा रमेश मस्के