Tuesday 4 February 2020

या दिव्यांग शाळेचे जवळपास ९० %विद्यार्थी यशस्वीपणे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत


संतोष वाघमारे, प्रमोद बिराजदार, जयश्री जाधव, स्नेहा कोकाटे, प्रयाग पवळे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोहारा तालुक्यातल्या सास्तूरच्या निवासी दिव्यांग शाळेचे विद्यार्थी. आपापल्या कलागुणांनी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत.
शाळेनंतर अभियांत्रिकी, विधी, नर्सिंग अशा विविध शाखांमध्ये प्रवेश मिळालेले अनेक विद्यार्थी. शासकीय, निमशासकीय सेवेबरोबरच उद्योगव्यवसाय करणारे. शाळेचे जवळपास ९० %विद्यार्थी यशस्वीपणे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. दिव्यांग म्हणजे परावलंबी या धारणेला या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी छेद दिला आहे.
१९९३ चा किल्लारी भूकंप. परिसरातल्या ५२ गावांवरची मोठी आपत्ती. अनेक जण अपंग झाले. विशेषतः ६ ते १८ वयोगटातली मुलंमुली. त्यांच्या पुनर्वसनाचं महत्त्व श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाला उमगलं. त्यातूनच १० मार्च १९९५ ला दिव्यांगांसाठी निवासी शाळा आणि व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू झालं. शाळेत काही अनाथ विद्यार्थीही आहेत.
शाळेचा परिसर विविध झाडांनी बहरलेला. समर्पित वृत्तीचे शिक्षक आणि कर्मचारी. त्यामुळे मूल एकदा शाळेत आलं की शाळा त्याला घरच वाटते.
शाळेचा निकाल बहुतांश करून १००%. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परिक्षांची माहिती शाळा देते. त्याची पूर्वतयारी करून घेते. डॉ. होमीभाभा स्पर्धा परीक्षा , शिष्यवृत्ती , एम टी एस, नवोदय , इतिहास प्रज्ञा शोध परीक्षा, एलिमेंटरी - इंटरमिजीएट चित्रकला परीक्षा, यासाठी मुलांना प्रोत्साहन दिलं जातं. ई लर्निंग,संगणक प्रशिक्षण आहेच. कला, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर मुलांनी गुणवत्ता सिद्ध केली आहे.
काही प्रमाणात शासकीय अनुदान आणि प्रामुख्यानं मोठ्या शहरातल्या दानशूर व्यक्तींकडून मिळणारं साहाय्य यावर संस्थेचा गाडा चालला आहे.
समस्येला आत्मविश्वासानं,हिमतीनं सामोरं जाण्याचं बाळकडू इथं मुलांना मिळतं. 

- गिरीश भगत, उस्मानाबाद. 

No comments:

Post a Comment