Tuesday 4 February 2020

ओळख नव्या आमदारांची : सरोज आहिरे (राष्ट्रवादी काँग्रेस)

मतदारसंघ देवळाली, जिल्हा नाशिक
महिला आणि युवकांच्या हाताला काम मिळवून द्यायचं आहे
"वडिल बाबुलाल आहिरे आमदार होते. या गोष्टीला ४० वर्ष झाली आणि त्यांना जावून ३० वर्ष. मात्र त्यांनी त्यांच्या मतदार संघात केलेली कामे-लोकांशी असलेला त्यांचा जनसंपर्क यामुळे आज त्यांची मुलगी म्हणून लोकांनी मताच्या स्वरूपात दिलेला आशिर्वाद माझ्यासाठी लाखमोलाचा आहे हीच आजवरच्या प्रवासाची शिदोरी", अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदार सरोज आहिरे आपल्या भावना व्यक्त करतात.
देवळाली मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला. माजी मंत्री बबन घोलप यांचे वर्चस्व असतांना चार वेळा निवडून आलेल्या तत्कालिन सेनेचे आमदार योगेश घोलप यांना शह देत आ. सरोज यांनी देवळा मतदार संघात विजय संपादन केला. राजकीय परिभाषेत त्या ‘जायंट किलर’ ठरल्या. नगरेसवक असतांनाही त्यांनी सेनेच्या माजी महापौर नयना घोलप यांचा पराभव करत नगरसेवक म्हणून काम करण्यास सुरूवात केली. नगरसेवकची पहिली टर्म पूर्ण होण्याआधीच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले. त्यांनी आमदारकीसाठी भारतीय जनता पक्षाकडे मागणी केली. मात्र युतीमुळे तो मतदार संघ सेनेला सुटला. सरोज यांनी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करत देवळा मतदार संघात निवडून लढविण्याचा निर्णय घेतला. आमदारकीच्या निवडणुकीसाठी बदलती राजकीय समीकरणे-आर्थिक जुळवाजुळव सरोज यांना परवडण्यासारखी नव्हती. सरोज यांच्यासाठी मतदार संघातील लोकच पुढे आले. प्रचारासाठी येणाऱ्या सरोज यांना आर्थिक मदत त्यांनी केली. नगरसेवक म्हणून सरोज यांचे काम पाहता त्यांना आमदार म्हणून काम करण्याची संधी जनतेने दिली. या ॠणातून मुक्त व्हायचे नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
कौटुंबिक अडचणीमुळे अर्धवट राहिलेले शिक्षण सरोज सध्या पूर्ण करत आहेत. कला शाखा पदवीच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा त्या देणार आहेत. भटकंती हा त्यांचा छंद असल्याने मतदार संघातील दौरा हा त्यांच्या आवडीचा भाग आहे.
आमदार म्हणून सूत्रं हाती घेतांना मतदार संघातील बंद असलेला साखर कारखाना आणि कधीही बंद होऊ शकेल असा एकलहरा वीज प्रकल्प सुरू कसा राहिल यासाठी त्यांना प्रामुख्याने काम करायचे आहे. या माध्यमातून महिला, युवक यांना काम मिळेल. ‘हाताला काम मिळालं’ की पुढचे प्रश्न गौण ठरतात असे सरोज सांगतात. या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच कामाला सुरूवात होईल. मतदार संघातील बहुतांश भाग हा ग्रामीण व आदिवासी असल्याने या ठिकाणी शिक्षणाचा अभाव आहे. येथील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देता येईल अशी शाळा उभारायची असा सरोज यांचा ध्यास आहे. आरोग्याच्या अडचणी पाहता प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात गुणवत्तापूर्ण सुविधा देण्यावर त्यांचा भर आहे. स्वच्छतेसाठी सद्य स्थितीत प्रबोधनावर भर देण्याकडे सरोज यांचा कल आहे. मतदार संघातील पाण्याचा प्रश्न कसा सुटेल यासाठी त्या आग्रही आहेत. गावागावात स्वच्छ पाणी कसे पोहचेल यासाठी त्यांचा अभ्यास सुरू आहे.
महिला-युवती व बालकांच्या सर्वांगिण विकासासासाठी त्यांना स्वसंरक्षण महत्त्वाचे वाटते. समुपदेशन, स्वसंरक्षण कार्यशाळा, जिल्हा परिषदेच्या शाळांचे रुप बदल बालकांना शिक्षणातून आनंद कसा मिळेल यासाठी काय करता येईल यासाठी माहितीची जमवाजमव सुरू आहे. सर्व कामांची रुपरेखा तयार असून पाच वर्षात त्या सॉर्टआऊट कशा होतील यासाठी पाऊले टाकण्यास सुरूवात झाली असल्याचे सरोज यांनी नमूद केले.
दुसरीकडे, पक्षाच्या जाहिरनाम्यानुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी, बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट होणार नाही, त्यांच्या मालाला योग्य भाव कसा मिळेल याकरता चर्चेपेक्षा कृतीवर भर देण्याचा त्यांचा मानस आहे.
#नवीउमेद #देवळाली #नवेआमदार #नाशिक #सरोजआहिरे

No comments:

Post a Comment