Tuesday 4 February 2020

मंगेशच्या निबंधानं अनेक मुलांना मदत मिळण्याची शक्यता


मंगेशसारख्या विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष तीन हजार रुपये शिष्यवृत्ती सरकारकडून देता यावी यासाठी प्रस्ताव तयार करा, अशा सूचना शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यामुळे अनेक मुलांना मदत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मंगेशच्या निबंधाची दखल कडू यांनी घेतली. २३ जानेवारीला त्यांनी मंगेश, त्याची आई आणि शिक्षिका नजमा शेख यांना विधानभवनात बोलावलं होतं.
बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातल्या देवीनिमगाव जवळ वाळकेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. वाळकेवस्ती , अनारसे वस्ती इथल्या मुलांसाठी ती आहे. या शाळेत चौथीच्या वर्गात मंगेश शिकतो.
सप्टेंबर २०१९ मध्ये मंगेशचे वडील वारले. त्याची आई शारदा वाळके. शारदाताई दिव्यांग. कसाबसा त्या घराचा गाडा हाकतात. शाळेत मुख्याध्यापिका आणि मंगेशच्या वर्गशिक्षिका नजमा शेख यांनी मुलांना आपले वडील या विषयावर निबंध लिहायला सांगितलं होतं. आपलं दुःख, वडिलांच्या पश्चात झालेली घराची व्यथा मंगेशनं निबंधात व्यक्त केली. 'माझे पप्पा काही दिवसांपूर्वी टीबीच्या आजाराने वारले, मी पाण्यात बुडत असलेली गाय कशीबशी बाहेर काढली, आम्हाला कोणीही मदत करत नाही, मला आणि आईला चोरांची भीती वाटते, पप्पा मला तुमची खूप आठवण येते'. अशा अत्यंत भावनिक शब्दात मंगेशने आपली व्यथा लिहिली होती. निबंध वाचून कवयित्री असलेल्या शेख मॅडमना गहिवरून आलं. आपल्या काही शिक्षक सहकाऱ्यांना त्यांनी मंगेशचा निबंध दाखवला . त्यांच्या मदतीनं तो सोशल मीडियावर प्रसारित केला. विविध माध्यमात याची जोरदार चर्चा सुरू झाली.


राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यापर्यंतही हा निबंध पोहोचला. त्यांनी 19 जानेवारीला तात्काळ समाजकल्याण विभागामार्फत 'दिव्यांग बीज भांडवल योजनेअंतर्गत 1.5 लाख रुपये स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य , जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण निधीतून शेष ५%, बस पास, यु. डी. आय.डी. कार्ड, तसंच दिव्यांग महामंडळामार्फत रोजगारासाठी अर्थसाहाय्य अशा योजना लागू केल्या. मुंडे यांनी वाळके परिवाराला भरीव आर्थिक मदत करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
आष्टी तहसील कार्यालयातील तहसीलदार वैभव महिंद्रकर , नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे , निलिमा थेऊरकर , शारदा दळवी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धान्य , कपडे आणि रोख रकमेची मदत केली . गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनीही शाळेला भेट देऊन मदत केली .
बीड येथील स्नेह सावली प्रकल्पाचे संचालक निलेश मोहिते यांनी तर मंगेशसह त्या वस्तीवरील पाच मुलींना शिक्षणासाठी सर्व सुविधा देण्याची तयारी दाखवली .
कडा येथील डॉ सचिन टेकाडे आणि डॉ मंजुश्री टेकाडे यांनी मंगेश आणि शारदाताईंना मोफत आरोग्यसुविधा देण्याची जबाबदारी घेतली . याशिवाय अनेक ठिकाणाहून शारदाताईंच्या बँक खात्यात मदत करण्यासाठी विचारणा झाली .

-राजेश राऊत , बीड

No comments:

Post a Comment