Wednesday 31 January 2018

कहाणी घुंगरापलीकडली..

भंडारा जिल्ह्यातल्या आसगावच्या रोहितची ही गोष्ट. वय १५. अंगकाठीने अगदी सुदृढ आणि गोबऱ्या गालांचा. सर्वांचा लाडका. एकुलता एक. त्यामुळे आई-वडिलांचाही लाडका.
'वाजले की बारा' या गाण्यावर त्याने शाळेचा मंच दणाणून टाकला. चिमुकला रोहित आनंदराव कोरे एका दिवसात पंचक्रोशीत प्रसिद्ध झाला.
त्याला लहानपणापासून नृत्याची आवड. तो पाचवीत असतानाच त्याच्या पहिल्या लावणीला लोकांची वाहवा मिळाली. तिथूनच सुरु झाला त्याच्या लावणीनृत्याचा प्रवास. कुठलंही प्रशिक्षण न घेता ठसकेबाज लावणीच्या स्पर्धात तो भाग घेऊ लागला. लावणी हा प्रकार मुलीनींच करावयाचा असतो असा संकेत असलेल्या समाजात त्याने लावणी करण्यास सुरुवात केली.
छोट्या मोठ्या कार्यक्रमातून स्टेजवर येत राहिला. एक-एक करत त्याच्या तब्बल एकवीस लावण्या तयार झाल्या. २०१४ च्या जिल्हा ग्रंथोत्सवात शहरातल्या मान्यवर शाळांच्या सादरीकरणात रोहितला लावणीचं विशेष पारितोषिक मिळालं.
स्त्रीपात्र रंगवणाऱ्या एखाद्या पुरुष कलावंतात जाणवणारे कोणतेही बदल रोहितमध्ये कधीच दिसले नाहीत. पण लो्कांचं नावं ठेवणं, कुजकट बोलणं, चिडवाचिडव या सगळ्याला रोहितला कोवळ्या वयात सामोरं जावं लागलं. मात्र, शिक्षिका स्मिता गालफाडे यांची शाब्बासकीची आणि मायेची थाप त्याला मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आत्मविश्वासाने पुढं जाण्याचं बळ त्याला मिळालं.
घरातली हलाखी, वडील आजारपणामुळे अंथरुणावर खिळलेले, आई मोलमजुरी करून घरखर्च भागवत असे. रोहितच्या लावणीसादरीकरणातून घरात पैसे येऊ लागले. बाहेर खिल्ली उडवणं सुरूच होतं. लोक घरात येऊन ‘तो उद्या नाच्या होईल’ असं सांगून आईला विचलित करू लागले. याची धास्ती घेऊन एक दिवस आईने घुंगरू आणि नृत्याचे सर्व साहित्य रागाच्या भरात जाळून टाकलं. रोहित हतबल झाला, रडला, खचून गेला. त्याची सगळी स्वप्नं जळून खाक झाली होती.
रोहितला त्याच्या धमन्यांतलं नृत्य जपायचं होतं. आईच्या हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या मृत्यूचं खापरही रोहितच्या माथी फुटलं. घराचा आधारच गेला. वडील अंथरुणावर. खर्च भागवायचा कसा? वडीलांची जबाबदारी रोहितवर आली. या सगळ्यातून रोहित पुन्हा उभा राहिला आहे. भीक मागण्यापेक्षा अंगी असलेल्या कलेचा सन्मान करत उदरनिर्वाह करायचा निर्णय आता त्याने घेतला आहे.
रोहितचं हे दहावीचं वर्ष. तो म्हणतो, “अभ्यास करून चांगले गुण मिळवून दहावी उत्तीर्ण होईन. आणि पुढचं शिक्षण घेत कलेच्या क्षेत्रातच मी उंच भरारी घेईन”. त्याची हिंमत निश्चितच दाद देण्यासारखी आहे. 

- हर्षा रोटकर.

कौशल्याची डोळस गोष्ट

कौशल्या बीएच्या दुसऱ्या वर्षाला होत्या. व्हायरल इन्फेक्शनचं निमित्त झालं आणि अंधत्व आलं. ऑपरेशननंतर एका डोळ्यांने दिसू लागलं. नंतर एक दिवस डोळ्यावर टेबल धडकलं. पुन्हा दृष्टी गेली. आता मात्र खरोखरच डोळ्यासमोर अंधार पसरला. शिक्षण थांबलं. २००९ मध्ये पुण्याच्या अंधशाळेविषयी कळलं. मग तिथं प्रवेश घेऊन त्यांनी ब्रेल लिपी शिकून घेतली. एमए पूर्ण केलं. व्यावसायिक प्रशिक्षणही तिथून घेतलं.
त्यांचं पूर्ण नाव कौशल्या साठे. वय ३२. सोलापूर येथील माळशिरस तालुक्यातील खंडाळी हे त्यांचं गाव. “मी अंध झाले नसते तर काहीच करू शकले नसते”, असं त्या सांगतात. कलाकुसरीची पूर्वीपासून आवड असल्याने त्यांनी तेही शिक्षण घेतलं. दाराचं तोरण, झूटच्या बॅग्ज, झूला, लग्नाच्या रूखवताला लागणारं सर्व साहित्य त्या बनवतात. त्यांचा मुख्य व्यवसाय हा डिझाईनच्या कँडल बनवणं. स्वेटर, मफलर विणायचं मशीन त्या स्वतःच चालवतात. दिवाळीत मेणबत्ती व्यवसायात त्यांनी ३२ हजार रूपयांची गुंतवणूक केली. आणि त्यातून ५७ हजार रूपये निव्वळ नफा मिळवला. इतर कलाकसुरीच्या वस्तूविक्रीतून २५ ते ३० हजार रूपये, तर स्वेटर, मफलर या थंडीच्या हंगामातील कपडे विकून ३० ते ४० हजार रूपये वार्षिक निव्वळ नफा त्यांना मिळतो.
वस्तूही त्याच तयार करतात आणि त्याचं मार्केटींगही. आपल्या वस्तू विकण्यासाठी फिरणं गरजेचं आहे. मार्केटींग करणं गरजेचं आहे, असं त्या सांगतात. गेल्या तीन वर्षांपासून त्या हा व्यवसाय करत आहेत. “अंधत्व नसतं, तर माझ्यात जिद्द निर्माण झाली नसती. अंध असल्याचं दुःख वाटत नाही”, असं त्या आत्मविश्वासाने सांगतात. “सुरूवातीला कसं होणार याचा तणाव होता. पण आता डोळे नसूनही डोळस झाले आहे”, असं त्यांचे म्हणणं आहे. सध्या पुणे येथील वेद वासुदेव प्रतिष्ठान संचलित ‘जिव्हाळा’ या अंध मुलामुलींच्या शाळेत मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचं काम कौशल्या करत आहेत.

- गणेश पोळ.

Sunday 28 January 2018

अनाथ प्राण्यांची ‘सृष्टी’

"एकदा एक जखमी वानरी आमच्याकडे उपचारासाठी हाेती. सर्व शुश्रृषा करुन तिला जंगलात सोडलं. तर दुसऱ्या दिवशी ती दारात हजर. पुन्हा काही दिवस ठेऊन तिला जंगलात सोडलं. तरी दोन दिवसांनी ती प्रकल्पावर आलीच. शेवटी तिला ठेऊनच घेतलं. बसंती आता आमच्या कुटुंबाची सदस्यच झाली आहे. असाच प्रकार आखुड कानाच्या घुबडाच्या बाबतीत घडला. उपचारानंतर त्याला जंगलात सोडलं. त्यालाही आता तीन वर्ष झाली. तरी दरवर्षी हे घुबडं थेट प्रकल्पावर येेतं. हे विश्वास बसण्यासारखं नाही. मुके जीव असा लळा लावतात. माणसं विसरली, तरी प्राणी प्रेम विसरत नाहीत". ‘सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राच्या सृष्टी सोनावणे सांगत होत्या.



जस्त्र अजगर असो की आईपासून दुरावलेलं पाडस, देवीच्या आजाराने अंध झालेला मोर किंवा जखमी कोल्हा हे सगळे प्राणी एकत्र नांदताना पाहायला मिळाले, तर?
पाणी, भक्ष्य याच्या शोधात मानवी वस्तीत आल्याने जखमी झालेल्या आणि आईपासून दुरावून अनाथ झालेल्या वन्य जीवांची ‘सृष्टी’ म्हणजे तागडगाव (ता. शिरुर जि. बीड) येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र! सिद्धार्थ आणि सृष्टी सोनवणे या निसर्गप्रेमी दांपत्याने हे वन्य प्राण्यांचे अनाथालय उभं केलं आहे. 
सर्पमित्र असलेल्या सिद्धार्थ यांनी 2001 मध्ये ‘वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड सेक्युअरी असोसीएशन’ (WPSA) संस्था सुरु केली. साप पकडण्याची प्रशिक्षण कार्यशाळा घेताना त्यांची ओळख सृष्टीशी झाली. निसर्गप्रेमी असलेल्या दोघांचे बंध जुळले, 2010 साली. तेही अनोख्या पद्धतीने. हारांऐवजी एकमेकांच्या गळ्यात साप घालून आणि अक्षतांऐवजी वऱ्हाड्यांनी फेकलेल्या विविध झाडांच्या बियांचे आशीर्वाद घेऊन. सृष्टी सांगतात, “सर्पमित्र ओळख मिळाल्यावर परिसरात कुठंही साप निघाला की फोन येत आणि सिद्धार्थ ते पकडून त्यांना पुन्हा जंगलात सोडत.”



बीड जिल्ह्याने पाच वर्ष दुष्काळ सोसला. जंगलातील पाणीसाठे संपले. आणि वन्यप्राणी मानवी वस्तीत येऊ लागले. पाण्याच्या शोधात कोल्हा विहिरीत पडून जखमी होण्याच्या, हरिण रस्त्यावर आल्याने वाहनाच्या धडकेत जखमी होण्याच्या घटना वाढल्या. सिद्धार्थ म्हणाले, “अशा घटनांची माहिती लोक फोन करुन द्यायला लागले. या प्राण्यांनाही आम्ही घरी आणून त्यांच्यावर उपचार सुरु केले. यातूनच वन्यजीव पुनर्वसन केंद्र सुरु करायचं सुचलं. आणि 2012 मध्ये ते उभं राहिलं. आतापर्यंत माकड, मोर, उदमांजर, घोरपड, कोब्रा, अजगर, घुबड, गरुड, खोकड अशा अनेक प्राण्यांवर आम्ही प्रकल्पात उपचार केले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे या प्राण्यांची नोंद करुन पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार होतात. सर्पराज्ञी केंद्र आता जखमी प्राण्यांचे माहेरघर झालं आहे”. 
2013 च्या दुष्काळी परिस्थितीत ‘डब्लूपीएसए’ने ‘मूठभर धान्य पक्ष्यांसाठी, एक रुपया पाण्यासाठी’ हा उपक्रम राबवला. त्यातून 50 क्विंटल धान्य आणि 70 हजार रुपये जमा झाले. या निधीतून जिल्हाभरात 500 पाणवठे तयार केल्याचं सोनवणे सांगतात. तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी गारपीट झाली. त्यावेळी शेकडो पक्षी गारांच्या माऱ्याने जखमी झाले. त्यावेळी शक्य तितक्या पक्ष्यांवर सोनवणे दांपत्यांनी उपचार केले. संक्रांतीच्या काळातही मांजाने जखमी झालेले पक्षी सापडतात. कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय हे केंद्र सोनवणे दांपत्य चालवत आहे. वनविभाग आणि पशूवैद्यकीय विभागाचे अधिकारी या दांपत्याची धडपड पाहून प्राण्यांवर उपचार करतात. आजवर सिद्धार्थ यांची सापांवर दोन पुस्तके, एक माहितीपट प्रसिद्ध झाला आहे. 



सिद्धार्थ सोनवणे यांचा संपर्क क्र.: 9923688100

ग्रीन सिग्नल

मुख्याध्यापिका आरती परब शाळेत आल्यावर बालवाडीतल्या एका बछडीने सांगितलं, “बाई, मी काल खूप मार खाल्ला, पण भीक नाही मागितली.” बछडीने मार खाल्ला यामुळे आरतीताई कळवळल्या, पण त्यांना तिच्यातल्या बदलामुळे समाधानही वाटलं. 
आपण येताजाता रेड सिग्नलला थांबतो. या एक-दीड मिनिटाच्या अवधीत बरीच लहान मुलं वस्तू विकायला येतात. चित्र रंगवण्याची पुस्तकं विकणाऱ्या या मुलांना, यातलंच एखादं पुस्तक घेऊन रंगवावसं वाटलं तरी ते हे करू शकत नाहीत. कारण अपेक्षित रक्कम हातात नाही आली, तर त्यादिवशी उपवास ठरलेला असतो. आपण क्षणभर त्यांच्या शिक्षणाबद्दल विचार करतो, सिग्नल सुटल्यावर ते विचार तिथेच थांबतात. पण ठाण्याच्या तीन हात नाक्याचा सिग्नल जरा वेगळा आहे. या सिग्नललाही लहान मुलं विक्रेती आहेत, पण संध्याकाळी शाळा सुटल्यावर. या मुलांकरता तीन हात नाक्याच्या पुलाखालीच एका मोठ्या कंटेनरमध्ये शाळा भरवली जाते. हीच सिग्नल शाळा. गेले दीड वर्ष समर्थ व्यासपीठातर्फे आणि ठाणे महापालिकेच्या मदतीने हा उपक्रम सुरू आहे. या शाळेत आज बालवाडी ते दहावी इयत्तेतली 50 मुलं शिक्षण घेत आहेत.
राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेला पारधी समाज या सिग्नलपाशी वसला आहे. या समाजाची ही चौथी पिढी.
अहमदनगरमध्ये दुसरीपर्यंत शिक्षण झालेला किरण सिग्नल शाळेत यंदा पाचवीत आहे. त्याला शिक्षक व्हायचं आहे आणि गावी एक शाळा उघडायची आहे. याचं कारण विचारल्यावर तो सांगतो, “गावी सर खूप मारतात, इथं आम्हांला मारत नाहीत. छान समजावून सांगतात. इथं शिकण्यासोबत राहायला, खायला, खेळायला मिळतं. आमच्या शाळेतल्या बाई आणि ‘उंबटू’मध्ये कसे सर आहेत तसं मी पण होणार”. आणि हे सांगून झाल्यावर मला उंबटू चित्रपटाची पूर्ण कथाच ऐकवली पठ्ठ्याने. त्याच्यामते गावात चांगल्या शाळा असल्याच पाहिजेत. वडिलांनी आईला सोडल्यावर, तो आईसोबत ठाण्यात आला. आई मोगऱ्याचे गजरे, चाफ्याची वेणी बांधते आणि हा ते विकतो.



सहावीत शिकणारा शंकर सांगतो, “शाळेमुळे मी वाचलो. शाळा नसती तर मी आता नसतो. मी आधी आठ दिवसांनी आंघोळ करायचो. आता रोज करतो. स्वच्छ राहायला मला आता आवडतं. रविवारी पण शाळा हवी, सुट्टी नको”. शाळेबद्दल शंकर अतिशय भरभरुन बोलतो. त्याला कारणही तसंच आहे. एका रात्री ट्रकने शंकरला उडवलं. ट्रकवाला पळून गेला. सिग्नल शाळेतल्या मित्राने भटू सावंतांना फोनवरून अपघाताची माहिती दिली. शंकरला लगेचच सिव्हिल हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. शंकरच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. ऑपरेशन्स, प्लॅस्टिक सर्जरी साधारण तीनेक महिने हॉस्पीटलमध्ये काढावे लागले. समर्थची टीम, डॉक्टर मित्र यांच्या सहाय्याने त्याच्यावर उपचार झाले. शाळेमुळे शंकर आपल्या पायावर परत उभा राहू शकला. या सर्व कालावधीत त्याला पौष्टीक आहार, त्याचा अभ्यास, त्याला एकटेपणा वाटू नये याकरता भरपूर पुस्तकं या सर्वाची काळजी शाळेतल्या सर्वांनी घेतली. बीडमधून तो ठाण्यात आला तेव्हा त्याला इथं आवडायचं नाही. पण शाळेमुळे त्याला आता ठाणं आपलसं वाटतं. आईवडील कधी गावी गेले तरी तो जात नाही. कारण त्याला एकही दिवस शाळा चुकवायची नाहीये. चार भावंडांमध्ये शंकर थोरला. आजही तो शाळा सुटल्यावर चाफा, गजरे विकतो. सिझनप्रमाणे वस्तू बदलतात. रात्री तो शाळेतच झोपतो. शाळेने अवांतर वाचनासाठी पुस्तकांची सोय केली आहे. मोठं झाल्यावर त्याला पत्रकार व्हायचं आहे. कारण आपल्याला जशी मदत मिळाली, तशीच आणखी कोणाला लागणारी मदत उभारता येईल, असा विश्वास शंकरला आहे. 
दशरथ आणि मोहन दहावीत. हे दोघही सिग्नल शाळेत जाणं जास्त पसंत करतात. कारण इथं या दोघांकडेही वैयक्तिकरित्या लक्ष द्यायला, शिकवायला त्या त्या विषयांचे शिक्षक आहेत. मोहन सातवीपर्यंत उस्मानाबादमध्ये, तर दशरथ लातूरमध्ये नववीपर्यंत शिकला. विशेष बाब म्हणून ठा.म.पा. आयुक्तांच्या प्रयत्नांमुळे त्यांना नियमित दहावीच्या परिक्षेला बसता येत आहे. विविध खाजगी शाळांमधून निवृत्त झालेले नामवंत शिक्षक या दोघांनाही दहावीचा अभ्यास शिकवत आहेत. त्यांच्या शंका, अडचणी दूर करतात. 



आज ही मुलं-मुली शाळेत छान रुळली आहेत. पण त्यांना शाळेत आणणं एवढं सोपं नव्हतं. मुलं शाळेत गेली तर धंदा कमी होणार, म्हणून पालकांचा शाळेत पाठवायला खूप विरोध होता. मग मुलांना दोन वेळचं खाणं, कपडे मिळतील, संध्याकाळी ते धंद्यावर येतील अशी विनवणी करून पालकांचं मन वळवलं. मुलं शाळेत आल्यावर त्यांचं हरवलेलं बालपण परत मिळवून देण्याकरता आधी प्रयत्न सुरू केले. त्यांना स्वच्छता आणि आरोग्याच्या चांगल्या सवयी लावण्याकडे आधी भर दिला गेला. काउन्सलर्स, बालरोगतज्ज्ञ यांची मदत घेऊन मुलांचं विडी-तंबाखूचं व्यसन सोडवलं. भीक मागायची नाही स्वाभिमानाने कसं जगावं याबाबत मुलांना गप्पांच्या माध्यमातून सांगितलं गेलं. 
त्यांना नेहमीप्रमाणे अ- अननस, आ-आई किंवा फळ्यावर अंकगणित शिकवणं कठीण नाही तर अशक्य होतं. कारण त्यांची मातृभाषा आणि प्रमाणित मराठीत असणारा फरक. पारधी भाषेत आजा म्हणजे आई, मग आ- आजा, ‘च’ चमचा न सांगता ‘च’- चोखा (भात), द – दांतो (ससा) असा शब्दसंग्रह बनू लागला. हातवारे आणि चित्रांच्या माध्यमातून शिक्षक आधी मुलांची भाषा शिकले, मग मुलांना हळूहळू प्रमाणित भाषेकडे वळवलं. नोटांचा हिशोब करण्यात ही मुलं पटाईत, पण फळ्यावरील अंकगणित जमेना. मग गणिताशी गट्टी जमवायला नोटा आल्या. 
सकाळी 10 ते 4 शाळा. 6.30 पर्यंत तिथंच थांबून गृहपाठ आणि उजळणी केली जाते. एकाग्रता वाढवण्यासाठी मुलांकरता आठवड्यातून दोन तास योगवर्ग असतो. समर्थचा बचतगटच या मुलांकरता पौष्टीक जेवण बनवतो. कॉम्प्युटरपासून पथनाट्यापर्यंत अनेक गोष्टी या मुलांना शिकवल्या जातात. मुलं भावनिकदृष्ट्या शाळेशी चांगलीच बांधली गेली आहेत.
आजही मुलं शाळा सुटल्यावर आपल्या पालकांना वस्तू विकायला मदत करतात. पण भीक मागत नाहीत. “आम्हीही छान शिकून मोठे होणार, उपाशी राहू पण भीक नाही मागणार” असं आता मुलं म्हणतात. या मुलांमधली उपेक्षेची भावना जाऊन आम्हीही या समाजाचा भाग आहोत हा विश्वास सिग्नल शाळेमुळे आला आहे. परिस्थितीमुळे रेड सिग्नल मिळून बालपण कोमजून गेलं होतं, पण आज सिग्नल शाळेच्या ग्रीन सिग्नलमुळे सुजाण पिढी घडवली जातेय.

विद्यार्थी रमले आहेत पुस्तकांत!!

'वाचेल तो वाचेल’ या सूत्रावर विश्वास ठेवणारे आपण. पण सध्या कुमार वयात असलेले किती विद्यार्थी पुस्तकं वाचतात? ज्यांच्या घरात सुशिक्षित, वाचनाचा छंद जोपासणारे आणि पुस्तके विकत घेऊ शकणारे पालक आहेत, असेच विद्यार्थी वाचनवेडाकडे वळतात. बाकीच्यांना मोहवून टाकण्यासाठी टीव्ही, इंटरनेट, मोबाईल आणि गेम्स यांचे मायाजाल आहेच. 
म्हणूनच मुलांना वाचनाच्या मोहमयी दुनियेत रमविण्यासाठी मी शाळेतील वाचनालयाचा वापर करून घ्यायचे ठरविले. वाचनालयातील पुस्तकांचे वयोगटानुसार वर्गीकरण केले, लहान मुलांसाठी परीकथा, बडबडगीते, भरपूर चित्रे असलेली पुस्तके, कोडी, बोधकथा अशी पुस्तके तर जरा मोठ्या वयोगटासाठी देशभक्त, समाजसेवक, शास्त्रज्ञ, लेखक अशा थोर व्यक्तींची आत्मचरित्रे, चरित्रे, पर्यावरण, अंतराळ, वैज्ञानिक कथासंग्रह, गाजलेल्या कथा- कादंबऱ्या, कवितासंग्रह अशा पुस्तकांचा संच वेगळा काढला.



शिवाय वाचनालयात मुलांना वाचत बसता येईल अशी आसनव्यवस्था, पुरेशा प्रकाश येईल याचीही सोय केली. दर दिवशी दोन वर्ग वाचनालयात जाऊन एक तास वाचन करतील असं वेळापत्रक आखून दिलं. दोन्ही वर्गांच्या वेळाही वेगवेगळ्या ठेवल्या. मी वर्गशिक्षिका असलेल्या वर्गाला जेव्हा प्रथमच वाचन तासिकेसाठी वाचनालयात नेलं, तेव्हा पुस्तकांची उघडी कपाटे आणि टेबलवर काढून ठेवलेली पुस्तकं पाहून मुलं खुशच झाली. पुढचा एक तास कपाटातील कोणतंही पुस्तक स्वत:च्या हाताने घ्यायची त्यांना मुभा आहे, हे कळल्यावर ती थेट टेबल आणि कपाटाकडे पळाली.




एवढ्या वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं त्यांना प्रथमच हाताळायला मिळत होती. माझ्या शाळेत येणारी बहुतांश मुलं ही शेतकरी, शेतमजूर आणि कामगार कुटुंबातील आहेत. त्यांच्या घरी म्हणावं तसं शैक्षणिक वातावरण नाही, त्यामुळे घरात पुस्तकं असण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. पाठ्यपुस्तकं वाचण्याचा कंटाळा करणारीही मुलं या अवांतर वाचनाच्या पुस्तकात मात्र अगदी सुरुवातीपासून रमून गेली. जादूच्या- पऱ्यांच्या जगात आणि हेलन केलर, नसीमा हुरजूक यांच्यासारख्या शारीरिक समस्यांवर मात करीत कर्तृत्त्वाची शिखरं गाठणाऱ्यांची चरित्रे वाचताना मुलांचे डोळे विस्फारत होते. मुलांना हा वाचनाचा तास फारच आवडू लागल्याने आता मुलं पुस्तकं वाचण्यासाठी घरी नेतात आणि त्याच्या नोंदीही तेच ठेवतात.
या सगळ्याचे फार सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले. अभ्यासात फारशी गती नसणाऱ्या वैष्णवीने उल्कापातामुळे तयार झालेल्या बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचे फोटो आणि माहिती आणली होती. ती माहिती मी वैष्णवीलाच वाचायला लावली. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर असून हजारो वर्षांपूर्वी झालेल्या उल्केच्या आघाताने बेसॉल्ट खडकात तयार झालेले सरोवर आहे. यात अनेक अनोख्या दुर्मिळ वनस्पती तसेच परिसरात वेगळे प्राणी- पक्षी आढळत असल्याने देशोदेशीचे अभ्यासक इथे भेट देतात, हे ऐकून वैष्णवीसाठी वर्गाने टाळ्या वाजविल्या. आमच्या वाचन तासिकेच्या उपक्रमामुळे मुलं दररोजचे वर्तमानपत्रसुद्धा रस घेऊन डोळसपणे वाचू लागली आहेत.
वाचनामुळे त्यांचा शब्दसंग्रह वाढतोय, त्यांना स्वत:ची लेखनशैली सापडू लागली आहे, आता निबंध लिहिण्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांना कुठल्याच गाईडची गरज पडत नाही, त्यांची कल्पनाशक्ती आता बहरू लागली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थी चौकस बनत चालले आहेत, हेच मला वाचन तासिकेचे सर्वात मोठे यश वाटते.
रत्नागिरी जिल्हा परिषद शाळेतील या वाचनवेडाच्या प्रयोगाबद्दल आमखी जाणून घेण्यासाठी क्लिक करा: http://samata.shiksha/…/students-discover-the-joy-of-readi…/

I am because of you!

वयाच्या 5 वर्षांपासून तो मुंबईच्या रस्त्यावर आणि रेल्वे स्टेशनवर वाढला. त्याच्या वाटेला कोवळ्या वयात जे काही वाट्याला आलं ते त्याने भोगलं आणि कटुता न ठेवता त्यातून तो बाहेर पडला. त्याचा परिणाम म्हणजे आताचं त्याचं सकारात्मक व्यक्तिमत्त्व. त्याचं नाव आहे अमीन शेख. त्याच्याशी बोलतानाच जाणवतं, की तो माणसातल्या माणसाचा आदर करतो. त्याच्या बोलण्यात आपण माणूस आहोत हे आपल्या प्रत्येक कृतीतून दिसायला हवं, असा आग्रह होता. अमीन म्हणतो, “माझं नाव मुस्लिम असल्यामुळे मला कित्येकजण नमाज पढण्याविषयी विचारतात, मी त्यांना सांगतो, असं काही करण्यात वेळ घालवण्यापेक्षा मी माझ्या कामावर अधिक लक्ष देईन आणि कोणाला उपयोगी पडेन याची काळजी घेईन”.

पाच ते नऊ या वयात तो मुंबईच्या रस्त्यावर, स्टेशनवर अनाथासारखा राहिला. त्याकाळात त्याच्यावर अनेक कोवळया वयात आघात झाले. कुणी मारलं, कुणी फुकट कामं करून घेतली, कुणी शारीरिक अत्याचार केले. अगदीच किळसवाणी गोष्ट म्हणजे त्याच्यावर बलात्कारही झाला. पुढं ‘स्नेहसदन’ आश्रमात आल्यानंतर त्याच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं. रस्त्यांवर, स्टेशनवर वाढला असल्याने भूक काय असते, याची त्याला जाणीव आहे. भूक शमवण्यासाठी त्याला काय काय करावं लागलं होतं हेही त्याला आठवतं. तेव्हाच मोठे झालो की आपलं एक रेस्टॉरंट असेल. तिथे लहान गरीब, गरजू मुलांना जेऊ घालू असा त्याने पण केला होता. त्याप्रमाणे तो गरीब मुलांना मोफत खाऊ घालतो.
‘Life is life I am because of you'हे अमीनच्या आतापर्यंतच्या अनुभवांचं पुस्तक. आजवर हे पुस्तक नऊ भाषांत भाषांतरीत झालं आहे. मुंबईच्या झोपडपट्टीत राहिलेला, म्युनिसिपल शाळेत मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेला अमीनने निव्वळ वाट्याला आलेल्या साऱ्या भोगाकडे सकारात्मक विचारातून पाहिल्यामुळे तो या यशापर्यंत पोहचू शकला. क्षणाक्षणाला तो मुंबईचे आभार मानतो व म्हणतो I am because of you!



स्वतःची प्रगती तर त्याने साधलीच. शिवाय आपल्या सारख्या अनेकांना त्याने आपल्या व्यवसायात सामावून घेतले. त्याच्या कॅफेमध्ये काम करणारी मुलं-मुली अशीच भूतकाळ पीडित होती. आता मात्र त्यांना पाहताच असं बिल्कुल जाणवत नाही, त्या मुलांचे अस्खलित इंग्रजी संभाषण आपल्याला अचंबित करतं. त्याच्या या प्रवासात त्याला जाणवलं की भरपूर वाचन आणि अभ्यास हा पुढं जाण्याचा मार्ग आहे. म्हणून त्याने आपल्या Bombay to Barcelona कॅफेमध्ये छोटेखानी वाचनालय उघडलं. वाचनालय पाहताच त्याचं शिक्षण किती विचारताच कळलं की अमीन सातवी पास आहे. फॉर्मल शिक्षण घेण्यात काडीचाही रस नसल्यामुळे त्याने शाळा सोडली. त्यानंतर वर्तमानपत्र घरोघरी टाकणे पुढे त्याची agency चालवणे, ड्रायव्हर म्हणून काम केले.

स्वतःचं स्वप्न साकारताना आपलं कुटुंब त्याचबरोबर आपले सहकारी यांची त्याने जाणीवपूर्वक काळजी घेतली. अमीन म्हणतो, “निसर्गाच्या नियमानुसार आपण सारे एक आहोत, आपल्या साऱ्यांच्या भावना सारख्याच आहेत. मी माझ्यापरीने या विश्वात प्रेम वाटण्याचे काम अवरीत करीत राहीन. कारण I am because of you!”

Wednesday 24 January 2018

एजाजला बालशौर्य पुरस्कार



30 एप्रिल 2017, दुपारची वेळ. पार्डी गावातील आफरीम बेगम, तब्बसुम, सुमय्या, आणि अफसर बेगम या चौघी गावाजवळील बंधा-यावर कपडे धुऊन परतत होत्या. बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला उथळ पाण्याची एक जागा होती. तिथं कमरेइतक्या पाण्यात तिघीजणी खेळू लागल्या. खेळण्याच्या नादात पलीकडे २०-२५ फूट खोल पाण्याचा डोह आहे, हेही विसरून. १४ वर्षाची सुमय्या अचानक खोल पाण्याकडे गेली. आणि बुडायला लागली. जवळच्या आफरीनला तिने पकडण्याचा प्रयत्न केला पण ती हाताला येत नव्हती. हे सगळं काठावरून अफसर बेगमने बघितलं. लगेचच ती मदतीसाठी वाकली. पण, तिचाही तोल गेला. पाणी खूपच खोल असल्याने दोघी बुडू लागल्या. आता त्यांना वाचवायला तब्बसुम आणि आफरिम दोघीही खोल पाण्यात शिरल्या. पोहता मात्र कुणालाच येत नव्हतं. त्यामुळे गटांगळ्या खाऊ लागल्या. “वाचवा, वाचवा” या त्यांच्या आवाजाने लोक बंधाऱ्याकडे धावले. पण कोणीही खोल पाण्यात उतरेना.  दरम्यान एका लग्नात जेवण करून शेताकडे परतणाऱ्या सोळा वर्षाच्या एजाजनंही हा आवाज ऐकला. लोकांना बाजूला सारत तो पुढं झाला. आणि क्षणभरात त्याने पाण्यात उड़ी घेतली. तेव्हा बघ्यापैकी एक म्हणाला, “हा कशाला मरायला पाण्यात गेला?” पण दुसरा लगेच म्हणला, “तो चांगला पोहणारा आहे. मुलींना तो बाहेर काढील”.
दरम्यान आफरिम बेगम एक गटांगळी खाऊन वर आली होती. ती गळ्याला पडण्याचा धोका ओळखून अंतर ठेऊन एजाजने तिला पकडलं. काठावर सोडलं.
पुन्हा सुळूक मारून एजाज तब्बसुम जवळ पोचला. नाकातोंडात बरंच पाणी गेल्याने ती गुदमरत होती. त्याने तिच्या हाताला मजबूत पकडले. आणि स्वत: पाण्यात बुडून तिचं डोकं वर राहील याची काळजी घेत काठाकडे येऊ लागला. तेवढ्यात राजेश्वर देशमुख आणि पुंजाराम मदने यांनी एक साडीचे टोक एजाजच्या दिशेने फेकले. ते पकडून एजाजने तिला वाचविलं.
आता मुली बुडत असल्याची बातमी गावभर पसरली होती. सारा गाव बंधाऱ्यावर जमला होता. काही जण पाण्याबाहेर काढलेल्या मुलींच्या पोटातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले. एजाज पाण्याबाहेर येणार; तेवढ्यात काठावर उभी असलेली शन्नो एजाजला म्हणाली, “बाबा, मेरी बहन अफसर बेगमभी डूब गई है, उसेभी बाहर निकाल.”
एजाज परत फिरला. पुन्हा खोल पाण्यात जाऊन तिसरीचा शोध घेऊ लागला. इतक्यात केसांची हालचाल दिसली आणि त्याने जोरात सूर मारून केस पकडून तिला काठाच्या दिशेने खेचून आणलं. पुंजाराम मदने, भास्कर कल्याणकर, राजेश्वर देशमुख यांनी तिला बाहेर काढायला मदत केली. कोणी तरी म्हणाले, “और एक अंदर है सुमय्याSS”. आपली वर्ग मैत्रीण सुमय्या पण या बंधाऱ्यात बुडाली आहे, हा एजाजाला पण धक्का होता.
२५ फूट खोल पाण्यात एजाज सुमय्याचा शोध घेत राहिला. तो वेगवेगळ्या ठिकाणी तळ गाठायचा. पण सुमय्या दिसत नव्हती. अखेरचा प्रयत्न म्हणून त्याने पुन्हा एकदा तळ गाठला. तेव्हा पायाला काही जाणवलं. श्वास रोखून तिला वाचवायला त्यानं पुन्हा डुबकी मारली. तिचे पाय धरून वर आणलं खरं पण तोवर सुमय्या सर्वांना सोडून खूप दूर गेली होती. एजाजने तब्बसुम आणि आफरीनचे प्राण वाचवले. अफसर आणि सुमय्याला मात्र तो वाचवू शकला नाही. याची त्याला आजही खंत वाटते आहे.
अतिशय कठीण प्रसंगी साहस दाखवून दोन मुलींचे प्राण वाचविणाऱ्या एजाजचा गावाने सत्कार केला. आता त्याच्या या साहसाची नोंद राष्ट्रीय पातळीवरही झाली आहे. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याला बालशौर्य पुरस्कार दिला गेला. 7 मुली आणि 11 मुले अशा एकूण 18 बालकांना 2017 साठीचा राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार दिला गेला. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात एकट्या एजाजची निवड करण्यात आली आहे.
खेळात हुशार असलेला एजाज अब्दुल नदाफ पार्डी येथील राजाबाई कनिष्ठ महाविद्यालयात १० व्या वर्गात शिकतो. अतिशय गरीबीमुळे कुणाचे ट्रक्टर रोजंदारीवर चालवून, पडेल ते काम करून तो कुटुंबाला आर्थिक मदत करतो.
दहावी झाल्यावर ड्रायव्हरची नोकरी करावी या एजाजचा विचाराला बालशौर्य पुरस्काराने नवी दिशा दिली आहे. आता त्याला सैन्यात जाऊन देशाची सेवा करायची आहे.
 - सु.मा.कुळकर्णी.

साजिदाला मिळाली ओळख

मुंबई स्पेशल
साजिदा बेगम मिर्झापूर, उत्तर प्रदेशची. लग्न झाल्यावर 1989 साली ती मुंबईत आली. 1995 पर्यंत सायनच्या वस्तीत राहिल्यानंतर ती कुटुंबासह मानखुर्दच्या वस्तीत राहायला आली. सायनला असताना तिच्या शेजारी राहणारी एक मुलगी शाळेत नापास झाली. तिला अभ्यासात मदत करायचं साजिदाने ठरवलं. आणि आश्चर्य म्हणजे दुसऱ्या वर्षी ती मुलगी वर्गात चक्क पहिली आली! ही घटना साजिदाला 'आपण शिकवू शकतो' असा आत्मविश्वास देऊन गेली. त्यातूनच ती मुलांना उर्दू आणि अरबी प्राथमिक पातळीवर शिकवू लागली.
परंतु तिची शिक्षिका म्हणून व्यापक ओळख मानखुर्दमध्ये (पश्चिम) निर्माण झाली. ते 1997-98 चं वर्ष असावं. 'प्रथम'चे काही कार्यकर्ते त्या भागात 'सर्व्हे' करीत होते. त्या भागात किती मुलं आहेत हे बघायचं, त्यानुसार तिथल्या बालवाड्यांची संख्या निश्चित करायची आणि संबंधित महिलांना प्रशिक्षित करून त्या सुरु करायच्या, असं ठरलं होतं. वस्त्यांमधली बरीच मुलं शाळेबाहेर आणि 3 ते 5 वयोगटातील मुलं पहिलीत जाण्याआधी कोणतीही सोय नाही. ही नव्वदच्या दशकातील मुंबईतील शिक्षणाची अवस्था. बालवाडी सुरु करून ही पोकळी भरून काढायची जबाबदारी साजिदासारख्या काही महिलांवर होती. तिथला अजून एक प्रश्न महत्त्वाचा होता. ही शाळा असणार होती, मानखुर्दच्या पूर्व भागात, आणि पश्चिमेकडून तिथं जायचं तर रेल्वेरूळ ओलांडून जावं लागायचं. साहजिकच कोणतेही पालक आपल्या लहान मुलांना तिथं पाठवत नसत. आणि आपल्या व्यापात अडकल्यामुळे मुलांना शाळेत सोडायलाही जात नसत. मग हीच जबाबदारी साजिदाने उचलली.
मुलं साजिदासोबत शाळेत जाऊ लागली. आणि घरी आल्यावर आई-वडिलांशी बोलायला लागली. त्यामुळेच तिथल्या पालकांना शिक्षणाचं महत्त्व कळू लागलं. पुढं साजिदाने आणखी 6 महिला तयार केल्या. बघता बघता त्या वस्तीत 7 बालवाड्या तयार झाल्या. आज, मानखुर्दच्या त्या वस्तीत जवळ जवळ सगळी मुलं शाळेत जातात. आता गरज आहे, ती मुलांना योग्य पद्धतीने शिकविण्याची. कारण, शाळेत जात असली तरी मुलांना शिकण्याची, लिहिण्या-वाचण्याची गोडी लागली पाहिजे.
तिने एकदम सुरुवातीला शिकविलेली मुलं आता मोठी झाली आहेत, काही नोकरी देखील करतात. काहींनी तर शिक्षक म्हणून नोकरी स्वीकारली. अधून मधून त्यांची भेट होते. काही विद्यार्थ्यांना ओळखणं अवघड होऊन जातं, पण त्यांनी वाकून नमस्कार केला की तिला लक्षात येतं, 'हा आपला विद्यार्थी!' 'शिक्षिका' म्हणून स्वतःची ओळख निर्माण झाल्यामुळे साजिदा आज समाधानी आहे.
- आशय गुणे.

Tuesday 23 January 2018

"ज्या शेतकर्‍याकडे गाय आहे, तो आत्महत्या करूच शकत नाही."

परभणीतीला गोसेवक : डॉ राजेश चौधरी
"ज्या शेतकर्‍याकडे गाय आहे, तो आत्महत्या करूच शकत नाही." सरकारी नोकरी सोडून 113 गायींचा स्वखर्चातून सांभाळ करत असलेले परभणीतील डॉ. राजेश चौधरी सांगतात. कुठलंही दान अथवा अनुदान न घेता ते हे काम करत आहेत. एकदा सहज गोरखपूर प्रकाशनचा गोसेवा विशेषांक त्यांच्या वाचनात आला. त्यामुळे गायीचं महत्त्व पटत गेलं आणि त्यांनी मिळेल तिथून गायी विकत घेत त्यांचा सांभाळ सुरू केला.
डॉ. राजेश रेणुकादास चौधरी मानवत तालुक्यातील वांगी (थार) येथील मूळ रहिवासी. आयुर्वेदात एम.डी. झालेले. 2009 मध्ये कुष्ठरोग सहाय्यक संचालक पदावरून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. तेव्हापासून ते गायींची सेवा करीत आहेत. विशेष म्हणजे एका खाजगी महाविद्यालयात शिकविण्यासाठी मिळणारं मानधन तसंच 30 एकर शेतीतून मिळणारं उत्पन्नही ते गोसेवेसाठीच वापरत आहेत.



घरी पूर्वापार गायींचा सांभाळ आणि आजोबांच्या पिढीपासून शेती. वांगी शिवारात असलेल्या 30 एकरावर निरनिराळी पिकं घेताना डॉ. चौधरी यांनी सेंद्रीय पद्धत अवलंबली. परभणीत दर गुरुवारी भरणार्‍या खंडोबा बाजारातून त्यांनी तब्बल 25 गायी कसायांच्या तावडीतून सोडवून घेतल्या. आजूबाजूचे शेतकरीही त्यांच्याकडे गायी आणून सोडतात. या गायींचा चारापाणी तसंच इतर व्यवस्था करण्यासाठी त्यांनी शेतामध्ये मोठा गोठा बांधला असून 5 माणसंही देखरेखीसाठी ठेवली आहेत. सुमारे 100 गायी आणि वासरं वांगी येथे शेतात असून परभणीतल्या घरी 13 गायी आहेत.
डॉ. चौधरी यांनी मुलीच्या वाढदिवसासाठी मोबाईल घेण्याकरीता तिला 8 हजार रुपये दिले होते. त्या दिवशी बाजारात पाहिलेली गाय विकत घेण्याचा विचार असूनही पैसे नसल्याने ते घरी परत आले. त्यावेळी मुलीने आपल्याकडीत पैसे देऊन ती गाय घरी आणण्यास सांगितलं. मुलानेही आपल्या वाढदिवसाला कोणतेही गिफ्ट न घेता गाय विकत घ्यायला लावली.
डॉ. चौधरी यांनी गोक्रांतीकारण गोपालमुनी महाराज लिखित 'धेनुमानस' या 700 पानी हिंदी ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला आहे. तसंच गोसेवा प्रदर्शन भरविण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला आहे. गोसेवा नावाचा ग्रंथही त्यांनी लिहिला आहे.

-बाळासाहेब काळे.

शेतकरी कट्टा!

मुंबई स्पेशल
हास्य कट्टा, मालवण कट्टा इ. नाव आतापर्यंत ऐकली होती, पण शेतकरी कट्टा? काहीतरी वेगळं वाटलं. संध्याकाळी चालणं संपवून घरी परत येताना कोपऱ्यावर एका टेम्पोभोवती गर्दी दिसली. पुढं जाऊन चौकशी केली तेव्हा कळलं की दोन मित्रांनी शेतकरी कट्टा हा नवा उपक्रम चालू केला आहे. त्यांच्या मते सर्वसाधारणपणे जी भाजी, शेतकऱ्याकडून विकत घेऊन ग्राहकाला दहा रुपयाला देणं शक्य आणि योग्य असतं, ती मधल्या दलालांमुळे ऐंशी रुपयाला पडते. ना शेतकऱ्यांना फायदा ना ग्राहकाला! म्हणूनच शेतकऱ्यांच्या शेतातील केमिकल्सचा वापर शक्यतो टाळून उगवलेला भाजीपाला, पाणी न मारता, ताजाच व रास्त भावात ग्राहकांना मिळून, शेतकरी आणि ग्राहक दोघांचाही फायदा व्हावा यासाठी कैलास शेट्ये (मुंबई)आणि पंकज शेवाळे (नाशिक) या दोघांनी सुनील पवार सारखी पंचविशीतली तरुण मुलं हाताशी धरून सुरू केलेल्या ह्या उपक्रमाची माहिती त्यांच्याच शब्दात:-

अधिक माहितीसाठी संपर्क क्र. :-
कैलास शेट्ये (मुंबई ) - 9769342145
पंकज शेवाळे (नाशिक ) - 9820954815

घोराडचे शेतकरी इथं घडवताहेत भविष्य

जिल्हा वर्धा. तालुका सेलू. इथलं घोराड गाव. येथील काही युवकांनी एकत्र येत ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली आहे. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत 25 डिसेंबर 2016 रोजी त्यांनी ‘केजाजी ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी’ची स्थापना केली. कंपनीचा उद्देश आहे, कृषी व्यवसायात खर्च कमी आणि अधिक उत्पादन मिळावं. कृषी पदवीधर व कृषी डिप्लोमाधारक युवकांनी एकत्रित होऊन कृषी उद्योग सुरू केला. यात 300 शेतकऱ्यांनी भाग घेतला. त्यांनी 10 हेक्टर शेती 25 वर्षांसाठी लीजवर घेतली आहे. त्यात सामूहिक शेती करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. धान्याची सामूहिक सफाई व प्रतवारी केंद्र त्यांनी सुरू केलं आहे. शेतकऱ्यांना लागणारी सामुग्री कमी दरात उपलब्ध करून देणे. कृषी केंद्रातून रासायनिक खतं, बियाणं स्वस्त दरात उपलब्ध करून देणे, अमोनिया ऍसिड तयार करून देणे असे कार्यक्रम त्यांनी या कंपनीतून सुरू केले आहेत. शेतकऱ्यांचा धान्य घेऊन ते ग्राहकांना देत त्यांना अधिक लाभ देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आता शेतकरीही त्यांना सहकार्य करू लागले आहेत.
 
 नुकतंच कंपनीला एक वर्ष पूर्ण झालं. आता शेतकऱ्यांना व्यवसायाच्या माध्यमातून थेट लाभ देण्याकरीत धान्याची विक्री करण्यात येणार आहे. सामूहिक रेशीम उद्योग, कृषी उद्योगास जिल्हाधीकारी शैलेश नवाल, तहसीलदार महेंद्र सोनावणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भरती, तहसील कृषी अधिकारी बाबुराव वाघमारे यांनी या कंपनीला भेट देऊन त्यांच्या कामाची प्रशंसा केली आहे. ऍग्रो प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विवेक माहुरे, सचिव शैलेश राऊत यांनी ही कंपनी सुरु केली. विवेक माहुरे म्हणतात, “शासनाच्या वतीने असा प्रोजेक्ट तयार करण्याकरीता प्राथमिकता देण्यात येते. असे काही प्रोजेक्ट सुरू आहेत. याची माहिती आम्ही ‘आत्मा’चे पावन देशमुख यांच्याकडून घेतली. त्यांनी योग्य मार्गदर्शन केले. आणि येथील प्रसिद्ध देवस्थान संत केजाजी महाराजांचे यांचे नाव देऊन आम्ही कंपनी सुरु केली. शासनाकडून 13 लाख 50 हजार अनुदान मिळालं. 4 लाख 50 हजार आम्ही जमा केले. आणि 18 लाखात कंपनी सुरू केली. शेड आणि मशीन घेतल्या. यानंतर कामाला सुरवात झाली. इतरत्र कुठं काम करण्यापेक्षा स्वतःचा उद्योग सुरु करण्याची संधी यातून मिळाली. गटात आज 300 शेतकरी आहेत. कृषी डिप्लोमाधारक पियुष तेलरांधे हा युवक आमच्यासोबत आहे. कंपनीच्या मालाला शहरात मागणी आहे. भावही चांगला मिळतो आहे. तालुक्यात सुरू झालेली ही शेवटची ऍग्रो कंपनी. पण, एका वर्षातच कंपनीने भरारी घेतली आहे”. ते पुढं म्हणाले, “वर्धा येथे सावंगी डॉक्टर कॉलनी, बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, रेल्वे स्टेशन येथे मॉल सुरु करण्यात येणार आहे. येथे महिलांना काम करण्याची संधी देत नवीन उत्पादने तयार करण्यात येणार आहे”.
 - सचिन म्हात्रे.

सविता बदलली; बोलू लागली

मुंबई स्पेशल
वडाळा रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला साधारण ३ किलोमीटरवर गणेश नगर नावाची एक मोठी वस्ती आहे. मुंबईतल्या या मोठ्या वस्ती म्हणजे जणू एक नगरच! इथं असंख्य लोकं स्थायिक होतात, छोटी मोठी दुकानं असतात, कुणी मोबाईल रिपेअर करतं, काही भाजी विकतं, कुणी टॅक्सी चालवतं आणि अशाप्रकारे या विशाल शहराला विविध सेवा पुरविणारे सारेच असतात. अशा वेळेस एक प्रश्न पडतो, तो म्हणजे, इथं शिक्षणाचं वातावरण कसं निर्माण करायचं? कारण इथल्या समस्याही तितक्याच जटिल असतात.
२००७ मध्ये जेव्हा 'प्रथम'ने गणेश नगरचा 'सर्व्हे' केला. त्यात आढळलं की, इथली मुलं शाळेत जाऊ लागली आहेत. पण त्यांना वाचण्याची गोडी लागायला हवी आणि त्यांनी शाळेत योग्य पद्धतीने शिक्षण घेतलं पाहिजे. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना पुस्तकं आणि त्यांना शिकण्यात रुची निर्माण होईल अशी सामग्री देणारा 'लायब्ररी कार्यक्रम' तिथं सुरु करायचं ठरलं. आणि नुकतीच बारावी झालेली सविता धानवे त्यांना भेटली. "त्या वेळेस मी कुणाशी जास्त बोलत नसे, इतकंच काय, मी हा आसपासचा परिसर देखील पूर्णपणे बघितला नव्हता", ती सांगते.
'सर्व्हे'मुळे सविताचा आत्मविश्वास वाढू लागला. कारण त्यात लोकांशी प्रत्यक्ष बोलणं होत असे. तेव्हा इतकं कळलं की गणेश नगरमध्ये इंग्रजी पुस्तकांची मागणी वाढत होती आणि लोकांचा एकंदर कल हा मुलांना खाजगी इंग्रजी माध्यम शाळांमध्ये पाठविण्याकडे होता. मात्र, इंग्लिश माध्यमात जाणाऱ्या बऱ्याच मुलांना शाळेत प्रगती करण्यात बरेच अडथळे येत होते. त्यामुळे सवितावर अशा मुलांना विशेष शिकवणी देण्याची जबाबदारी देण्यात आली. कुणाशी फार न बोलणारी सविता आता मुलांशी, त्यांच्या पालकांशी आणि महानगरपालिकेच्या शाळा-शिक्षकांशी बोलू लागली होती. अगदी आत्मविश्वासाने! हे काम करताना मात्र, तिला आणि प्रथमला अजून एका गोष्टीची जाणीव झाली. अनेक पालकांनी आपल्या मुलांसाठी खाजगी इंग्लिश माध्यमातील शाळांची वाट धरली होती खरी, पण सुरुवातीला मुलांना एका इंटरव्हूला सामोरं जावं लागायचं. आणि इथं इंग्लिश व्यवस्थित नसल्यामुळे बऱ्याच मुलांना इथं प्रवेश मिळत नसे. ह्या पार्श्वभूमीवर सविताला बालवाडी सुरु करण्यास सांगितलं गेलं.
"मी बालवाडी सुरु करते आहे असं लोकांना सांगितलं तेव्हा माझ्याकडे पहिल्याच दिवशी ६० मुलं दाखल झाली! मग मला त्यांच्या दोन तुकड्या कराव्या लागल्या,” ती आनंदाने सांगते. पण ह्या बालवाडीचा मुलांना फायदा मात्र झाला. तिथं शिकणाऱ्या मुलांना खाजगी इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये प्रवेश मिळू लागला. कारण, आता ते इंटरव्ह्यूसाठी योग्य पद्धतीने तयार झाले होते.
सविताने २०१७ ह्या वर्षी 'प्रथम' मध्ये काम करायची १० वर्ष पूर्ण केली. मात्र, आता ती स्वतःची बालवाडी सुरु करणार आहे. दहा वर्षांपूर्वी कुणाशी विशेष न बोलणारी आणि आजूबाजूचा परिसरही नीट माहिती नसणारी सविता आज स्वतःची बालवाडी सुरु करणार आहे.
- आशय गुणे, मुंबई

सहा हजार कुटुंब धूरमुक्त !


महिला सुखी झाली की तिचं कुटुंब सुखी समाधानी होत. म्हणूनच चुलीच्या धुरात कोंडमारा होणाऱ्या गावाकडील महिलांना बायोगॅसच महत्त्व भगीरथ प्रतिष्ठानने पटवून दिलं. भगीरथचे संस्थापक डॉ. प्रसाद देवधर सांगतात, “आजचा युवक खेडं सोडून शहराकडे जातो. तो शेती दुय्य्म मानतो. आपली जमीन विकून नोकरीसाठी शहराकडे धावणाऱ्या युवकांना आपल्याच गावी रोजगार मिळाला पाहिजे. गावागावातील युवकांनी आपलं गाव समृद्ध केलं पाहिजे. आहे त्या साधन सामुग्रीचा वापर करून आपणच आपल्यासाठी आर्थिक स्रोत निर्माण केला पाहिजे. निसर्गाने कोकणाला भरभरून दिलंय. ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि या निसर्गाचाच आपलं जीवनमान उंचावण्यासाठी उपयोग केला पाहिजे”, या विचाराने भगीरथ प्रतिष्ठान प्रेरित झाले आहे.
कुडाळ तालुक्यात गावोगाव फिरून भगीरथने युवकांना एकत्र केलं. त्यांना केवळ तत्वज्ञानाचे डोस न पाजता त्यांनी कुक्कुट, शेळी आणि गोपालन यासाठी आर्थिक मदतही केली आहे. इथंच न थांबता त्यांनी गावातील गवंड्याना बायोगॅस बांधणीचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिलं. त्यामुळे आज प्रतिष्ठानकडे पन्नास प्रशिक्षित बायोगॅस बांधणारे गवंडी आहेत. दर दिवशी गावोगावी जाऊन बायोगॅस बांधणीचे काम ते करतात.
दोन गायी वा दोन गुरे असतील तर त्यांच्या मलमूत्रांपासून बायोगॅस निर्मिती करता येते. त्यातून पाच माणसांचं जेवण तयार होऊ शकतं. आणि उरलेलं मलमूत्र शेणखत म्हणून शेतीसाठी वापरता येतं. म्हणजेच गुरे-ढोरे ही शेती आणि दुधासाठीच नाही तर माणसांसाठी बारमाही उपयुक्त आहेत. हेच देवधर यांनी लोकांच्या लक्षात आणून दिलं. हे पटलं त्या दिवसापासून बायोगॅससाठी सबसिडी किती? असा प्रश्न लोक विचारत नाहीत; तर आम्हाला बायोगॅससाठी कर्ज किती देताय? हा प्रश्न विचारला जात असल्याचं देवधर सांगतात. हाच कोकणी माणूस सरकारच्या सबसिडीला न भुलता कर्ज घेऊन बायोगॅस बांधतो; ही कोकणचा माणूस स्वावलंबी होण्याची नांदी आहे, असंही ते पुढं म्हणतात.
बायोगॅसचं महत्त्व लोकांना आणि महिला वर्गाला पटलेलं आहे. लोक जागृतीचं काम भगीरथ प्रतिष्ठानने केलेलं आहे. त्यामुळे लोक आता स्वतःहून पुढाकार घेऊन आपलं घर धूरमुक्त करताना दिसतात. येत्या काही वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व गावं धूरमुक्त होतील. तो दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा असेल असं भगीरथ प्रतिष्ठानला वाटतं.
 - विजय पालकर.

तो राजहंस एक

मुंबई स्पेशल
आपलं विशेष मुलसुद्धा इतर मुलांप्रमाणे काही तरी करू पहातंय, स्वत:ला शोधू पहातंय, निर्मितीचा आणि स्वकमाईचा आनंद घेऊ पहातंय ह्या जाणीवेचं सुखं मनिषाताईच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून जाणवतं. सोहम, मनिषा सिलम यांचा मुलगा ऑटीस्टीक आहे. ऑटीझम म्हणजे स्वमग्नता. या मुलांची समस्या म्हणजे व्यक्त होता न येणे. समोरच्यांच्या डोळ्यात डोळे घालू न शकणे. समाजाची आज सुद्धा ह्या मुलांकडे बघण्याची ना दृष्टी बदलली आहे ना दृष्टीकोण.
ठाण्यात राहणारं चार-चौघांसारखंच सिलम कुटुंब. सोहमचे वडील ओएनजीसीमध्ये तर मनिषाताई खासगी नोकरीत. सोहमचा जन्म झाला आणि पहिली चार वर्ष व्यवस्थित गेली. नंतर नंतर तो प्रतिसाद देत नाही, बोलत नाही हे जाणवू लागलं. डॉक्टर्स, वेगवेगळ्या चाचण्या, स्पेशलीस्ट या सर्व चक्रातून निदान झालं ऑटीझमचं. तोपर्यंत या कुटुंबात हा शब्दसुद्धा त्यांनी ऐकला नव्हता. सोहमची मोठी बहिण मानसी नॉर्मल होती. त्यामुळे हे काय, कसं स्वीकारावं, कसं सामोरं जावं काहीच कळत नव्हतं, असं मनीषाताई सांगतात. पण मार्ग तर शोधायला हवा, मग साधी शाळा ते विशेष शाळा करत सोहम दहावी झाला. सोहमची बुद्धिमत्ता उत्तम. पाढे, येणाऱ्या वर्षांची कॅलेन्डेर्स अगदी लीप वर्ष लक्षात घेऊन त्याने अगदी लहानपणी लिहून ठेवली होती. संगणक तर आज त्याचा मित्र झाला आहे. अत्यंत कुशलतेने तो क्विलींगच्या वस्तू बनवतो. सोहम आज २१ वर्षाचा आहे. ऑटीस्टीक ते डॉल हाउस बनवणारा कलाकार हा त्याचा प्रवास खूप काही सांगून जातो. त्याने बनवलेल्या राख्या, बाहुल्या आता साता-समुद्रापलीकडे पोहचल्या आहेत.


आपल्याला असलेली ऑटीझमची माहीती, अनुभव, इतर ऑटीस्टीक मुलं, त्यांचे पालक यांच्यापर्यंत पोहोचावी हे मनीषा यांना जाणवू लागलं. त्यातूनच २०१३ मध्ये त्यांनी फेसबुकवर 'तो राजहंस एक' हा ऑटीझम अवेअरनेस ग्रुप सुरू केला. ग्रुपने वर्कशॉपमधून मुलांना चॉकलेटस, बॉक्स, पेपर bags, ब्लॉक पेंटिंग अशा अनेक गोष्टी शिकवल्या. शाडुचे गणपती बनवून विकले. पालकांसाठीही त्यांनी शिबीर घेतलं.
यातूनच पुढं संस्था स्थापन करायची गरज जाणवली. त्यातून ‘राजहंस फाऊंडेशन’ अस्तित्वात आलं. मनीषाताईंनी या मुलांना हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं. व्यवसायाभिमुख प्रशिक्षण, enter व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर सुरू केलं. ह्यात चॉकलेटस, बेकिंग, पाकीट, फ्रेम्स, करंडे, क्विलींगच्या वस्तू हे सर्व शिकवलं जातं. संगणक प्रशिक्षण दिलं जातं. मुलांनी बनवलेल्या वस्तूंचं नंतर प्रदर्शन भरवलं जातं. या मुलांनी इतरांसारखं आयुष्य जगावं म्हणून सहल, संगीत वर्ग, रेस्टॉरंट, सुपरमार्केट भेट, फनफेअर असे विविध उपक्रम घेतले जातात. विविध क्षेत्रातल्या तज्ञ, थेरपिस्टना बोलावून पालकांचं समुपदेशन केलं जातं.
ऑटीस्टीक मुलांच्या हरविण्याच्या बातम्यानंतर ठाणे पोलीस आयुक्तालयाला ऑटीस्टीक मुलांचे रेकॉर्ड पोलीस स्टेशनमध्ये असायला हवं असं निवेदन त्यांनी दिलं. त्यासाठी ठाण्यातील सर्व स्पेशल शाळांना भेटी देऊन ६५ च्या वर मुलांचं रेकॉर्ड पोलीसांच्या हवाली केलं.
एप्रिल महिना जगभर ऑटीझमविषयी जागृती करणारा महिना मानला जातो. दरवर्षी याबद्दल जनजागृती व्हावी म्हणून विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. आपण आपल्या मुलाला कसं स्वीकारतो, वागवतो तसं जग त्याला वागवतं. म्हणून आपल्या मुलाला नेहेमी प्रेमाने, आदराने वागवावे. या मुलांचं जग वेगळ असतं. या मुलांना त्यांच्या पालकांना सामाजिक, भावनिक आधाराची गरज असते. ऑटीझम जागरूकता ही आजची गरज आहे, दया नको; तर मुलांचा स्वीकार ही समाजाची जबाबदारी आहे, हे मनिषाताई कळकळीने सांगतात.
- मेघना धर्मेश, मुंबई

Friday 19 January 2018

प्रयोगातून आली जलसाक्षरता

उपलब्ध असलेल्या पाण्याचे सुयोग्य नियोजन हा पाणीबचतीचा मूलमंत्र आहे. जसे नळातून वाया जाणारे पाणी आम्ही वाचविले त्याचप्रमाणे पावसाळ्यात कोसळणारे पावसाचे पाणीही जमा करायला हवे, या विचाराने डोक्यात ठाण मांडले. पावसाचे पाणी ‘जलपुर्नभरण योजने’तून जमिनीखाली साठविता येते, हे माहिती होते.

हीच योजना नाशिकमधील बागलाण तालुक्यातील आमच्या शाळेत राबविण्याचे निश्चित केले. त्यासाठी शाळेच्या छताचे क्षेत्रफळ, आमच्या क्षेत्रात अंदाजे पडणारा पाऊस याचा अंदाज घेतला. सुमारे एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार लीटर पाणी या प्रयोगाद्वारे एका वर्षात जमा होऊ शकते असा आम्ही कयास बांधला.
त्यानुसार 2016 च्या ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण सेवा योजनेद्वारे आर्थिक मदत घेतली आणि अठरा हजार रुपयांत आमच्या शाळेत जलपुर्नभरण योजना कार्यान्वित झाली.

त्यासाठी पावसाळ्यात छतावरुन वाहणारे पाणी पाईप्सद्वारे जमिनीखाली एका मोठ्या खड्ड्यात सोडले. त्या खड्ड्यात विटांचे तुकडे, कोळशाचे तुकडे आणि मुरुम टाकला. पावसाळ्यात त्या पाईप्सद्वारे पाणी खड्ड्यात जाऊ लागले. खड्ड्यात टाकलेल्या विटा आणि मुरुमाच्या तुकड्यांनी त्या पाण्याचे शुद्धीकरण होते. यामुळे आमच्या जमिनीतील पाण्याचा स्तर उंचावला आहे. पूर्वी शाळेतील बोअर उन्हाळ्यात केवळ 15 ते 20 मिनिटेच चालायची. 2017 च्या उन्हाळ्यात मात्र ही बोअर सहज 45 मिनिटे चालली आणि उन्हाळ्यातही पाणी मिळाले. या पावसाळ्यात आणखी जास्त पाणी जमिनीखाली जाऊन पाण्याचा साठा वाढेल, असा अंदाज आहे.उपलब्ध पाणी जपून वापरावं तसंच पाणी प्रदूषित होऊ नये ही देखील आपलीच जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांना हेसुद्धा सप्रयोग समजावून सांगण्यासाठी गेल्या वर्षी आम्ही आणखी एक प्रयोग केला. आमच्या आसखेडा गावाजवळून मोसम नदी वाहते. गणेशोत्सवानंतर गावातील बहुतांश मूर्त्यांचे विसर्जन त्याच नदीत होते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, प्लास्टिक हार आणि निर्माल्य सर्रास नदीत फेकले जाते. यामुळे नदी प्रदूषित होते, हे अभ्यासात आपण मुलांना शिकवतोच पण ती नदी किती प्रमाणात प्रदूषित होते, हे विद्यार्थ्यांना सप्रमाण दाखविण्याचं निश्चित केलं.
2016 साली गणेशोत्सवाआधी नदीच्या पाण्याचा पीएच, क्लोरिन, नायट्रेट, फ्लुरॉईड यांची तपासणी आम्ही पर्यावरण सेवा योजनेद्वारे मिळालेल्या उपकरणांद्वारे केली. काही दिवसांनी गणेशविसर्जन झाले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी विद्यार्थ्यांनी पुन्हा या सगळ्या चाचण्या केल्या. पाण्याचा पीएच सुमारे दोन टक्क्यांनी वाढला होता, तर पाण्याचा जडपणा (हार्डनेस) सुमारे 100 अंकांनी वाढला होता. नायट्रेट, क्लोरिन, फ्लुरॉईडसचे प्रमाणही लक्षणीयरित्या वाढल्याचे विद्यार्थ्यांनी नोंदविले.
प्रत्यक्ष प्रयोगातून विद्यार्थ्यांना प्रदूषणाची गंभीर समस्या जाणवली. आपले पाणीसाठे आपण काळजीपूर्वक वापरायला हवेत, ते प्रदूषित होऊ नयेत ही आपली सामूहिक जबाबदारी आहे हे त्यांना पटले. यानंतर आम्ही गावात कृत्रिम जलाशयात मूर्तीच्या विसर्जनाचा आणि शाडू मातीच्याच मूर्तींचा आग्रह धरतो. इतकेच नव्हे तर माझ्या शाळेतले विद्यार्थी स्वत: शाडूच्या गणेशमूर्ती बनवून त्याची विक्री करतात. जलसाक्षरतेविषयी सातत्याने केलेल्या जनजागृतीमुळे माझ्या शाळेतील विद्यार्थी जबाबदार नागरिक होण्याच्या मार्गावर आहेत, याचे मला समाधान वाटते.

- जयवंत ठाकरे.

मुलांशी बोलणारी शेहनाझची बालवाडी

 मुंबई स्पेशल
बांद्रा म्हटलं की लोकांना मोठ्या इमारती, महागड्या वस्तूंची दुकानं, बॉलीवूड तारकांची घरं, हॉटेल्स वगैरे आठवतं. पण बांद्र्याची एक दुसरी बाजू देखील आहे. इथली स्टेशन बाहेरची छोटी दुकानं, मोडकळीस आलेल्या इमारती, खाटकांची दुकानं आणि झोपडपट्टी वस्तीत राहणारी, रोज मुंबईला सेवा देणारी असंख्य सामान्य माणसं हे देखील बांद्र्याचे वैशिष्ट्य. असं असताना इथल्या वस्तीत शिकण्याची वृत्ती निर्माण व्हावी म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. शेहनाज अन्सारी हे त्यातील एक नाव.
शेहनाझ राहत असलेल्या 'बाझार रोड'च्या वस्तीत टॅक्सी चालविणारे, भाजी विकणारे, खाटीक, छोट्या कारखान्यांमध्ये काम करणारे असे अनेक लोक होते. यांची मुलं म्हणजे त्यांच्या कुटुंबातील शाळेत जाणारी पहिली पिढी होती. अशा परिस्थितीत शेहनाझने २००५ ह्या वर्षी ‘प्रथम’ संस्थेच्या मदतीने बालवाडी सुरु केली. अजूनही ती सुरु आहे. आता, ज्या मुलांचे आई-वडील कधीच शाळेत गेले नाहीत, त्यांना शाळेचं सोडा, पण बालवाडीचं महत्त्व तरी कसं समजावायचं? त्यामुळे जेव्हा शेहनाझ त्यांच्या घरी जाऊन, तुमच्या मुलाला माझ्या बालवाडीत पाठवा असं सांगायची तेव्हा '३ वर्षाच्या मुलाला काय करायचं शिकवून' असे प्रश्न तिच्यासमोर उपस्थित केले जायचे.
एक तर, महानगरपालिकेची शाळा पहिलीपासून सुरु व्हायची. आणि त्याआधी शिकण्याची काही सोय नव्हती. तिथं खाजगी बालवाड्या नव्हत्या असं नाही, पण त्या सधन कुटुंबातल्या लोकांसाठी होत्या. त्यामुळे वस्तीतली मुलं जेव्हा शाळेत जायची, तेव्हा जेमतेम दोन वर्ष शाळेत टिकायची आणि नंतर काही जमत नाही, म्हणून शाळा सोडून द्यायची. शेहनाझने तिथल्या लोकांना हे लक्षात आणून द्यायचा प्रयत्न केला. पण हे समजावून सांगणं सोपं काम नव्हतं.
पहिल्या वर्षी तिच्या बालवाडीत ८ ते १० मुलं होती, आणि ही संख्या नंतरच्या वर्षांमध्ये वाढत गेली. शेहनाझच्या बालवाडीत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संवाद! ती सतत मुला-मुलींशी बोलत असते. मुलांशी बोलल्यामुळे ती खुलतात, आणि नंतर सर्व गोष्टी ती घरी जाऊन त्यांच्या पालकांना सांगतात. तिच्याच शब्दात सांगायचं तर, ती मुलांद्वारे त्यांच्या पालकांशी संवाद साधते. अक्षरं आणि अंक शिकताना जे खेळ होतात, ते मुलं घरी जाऊन सांगतात. त्यामुळे मुलं काय करत आहेत हे पालकांना समजतं. त्याशिवाय लसीकरण, पोषक आहार आणि एकूण स्वच्छता ह्या बाबत ती पालकांशी विशेष संवाद साधते. त्यामुळे झालेला एक छोटासा, पण महत्वाचा बदल ती आवर्जून सांगते. "आज मुलं त्यांच्या डब्यात घरी बनवलेलं जेवण घेऊन येतात. मी त्याचे महत्त्व सांगायच्या आधी बाहेरचे पदार्थ म्हणजे वडा-पाव, चिप्स वगैरे दिलं जायचं."
शेहनाझचं काम इथंपर्यंत सीमित राहिलेलं नाही. तिने अजून काही मुली तयार केल्या. त्यांनीही पुढं त्यांची बालवाडी सुरु केली. मदत करायला 'प्रथम' होतंच. पण शेवटी हा बदल घडवून आणला ह्या महिलांनीच!
- आशय गुणे

Thursday 18 January 2018

मिशन थॅलेसेमिया



मिलिंद लांबे हे नियमित रक्तदाते. 1999 पासून जालन्यातील जनकल्याण रक्तपेढीच्या रक्तदान शिबिरात ते भाग घेतात. अशाच एका शिबिरात त्यांना थॅलेसेमिया असणाऱ्या 100 रुग्णांची यादी मिळाली. नियमित रक्तदाते असल्यामुळे त्यांचा रुग्णांशी, त्यांच्या नातेवाईकांशी नेहमीच संबंध येतो. रक्ताच्या पिशव्यांसाठी धडपड करणारे नातेवाईक त्यांनी पहिले. आणि इथूनच कामाला सुरुवात झाली. मित्रांशी चर्चा करून त्यांनी 25 थॅलेसेमिया रुग्णांना दत्तक घेतलं आणि त्यांना दर महिन्याला 25 बॅग रक्तपुरवठा करण्याची जबाबदारी स्वीकारली. या प्रकल्पाला नाव मिळालं ते ‘मिशन थॅलेसेमिया’. थॅलेसेमिया हा खरंतर अनुवांशिक आजार. माता-पित्यांकडून मुलांमध्ये संक्रमित होणारा. लाल रक्त पेशींच्या अतिरिक्त नाशामुळे शरीराची ऍनिमियाकडे वाटचाल होऊ लागते. लाल रक्तपेशी शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करतात. आणि याच पेशी मेल्यामुळे शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्यात अडथळा निर्माण होतो. रुग्णाला वाचवायचं तर दोनच पर्याय.एक दर महिन्याला रक्त देणे. दोन - bonemarrow ट्रान्सप्लांट. यासाठी खर्च जवळपास 20 लाखाचा. बाहेरून रक्ताची पिशवी देऊन रुग्णाचा जीव वाचवायचा. आणि दवाखान्याची अगडबंब बिलं भरता भरता पेशंटच्या घरातील लोकांच्या नाकी नऊ येतात. कधीकाळी उसनवारी करून दवाखान्याची बिल चुकविता येतीलही. पण रक्त ना उसनं मिळतं, ना विकत. हे सगळं पाहूनच लांबे आणि त्यांचे मित्र पुढं झाले.
सध्या त्यांनी 180 रक्तदाते जमवले आहेत. नियमित रक्तदान करून या रुग्णांची रक्ताची गरज हा ग्रुप भागवतो. एका रुग्णासाठी 6 ते 7 जणांची टीम तयार करण्यात आली आहे. रक्तगट आणि रुग्णांची संख्या या नुसार ही टीम तयार करण्यात आली. रक्तदानासाठी हा ग्रुप वेळोवेळी जनजागृती कार्यक्रम घेतो, लग्न समारंभात बॅनर लावले जातात, शाळा-कॉलेजात शिबिरं घेतली जातात. गरजेनुसार सोशल मीडियात ही हा ग्रुप रक्तदान, थॅलेसेमिया या विषयावर जनजागृती करतो आहे. विवाहपूर्व चाचणी अतिशय आवश्यक असल्यानं विवाहोत्सुक मंडळींना ते तपासण्या करायला लावतात. जेणेकरून हा आजार पुढच्या पिढीत पसरू नये. त्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या रविवारी कॅम्प घेतला जातो. यासाठी शिक्षक मंडळी, जुना जालन्यातील स्वयंभू ग्रुप, प्रतिष्ठा ग्रुप, प्रदीप मोहरील, आनंद मुळे, संतोष रेगुडे, भूषण बेहेरे, प्रारब्ध दाभाडकर, अमोल गोरे, सुमेर ठाकूर आणि मित्रमंडळ मोलाचा वाटा उचलत आहे.

 
परभणीतील ‘थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुप’ची या कामात त्यांना खूप मदत होते. त्यांचे टेक्निशियन सॅम्पल घेतात आणि रिपोर्ट देतात. या तपासणीमधून थॅलेसेमियाग्रस्त रुग्ण सापडला तर त्याला रक्त पुरवण्यासाठी नवे रक्तदाते शोधण्याचं आव्हान हा ग्रुप लीलया पार पाडतो. सर्वसामान्य रक्तदाता दर 3 महिन्यांनी रक्तदान करू शकतो. 18 ते 60 वर्ष वयोगटातील प्रत्येक निरोगी स्त्री, पुरुष रक्त देऊ शकतो. स्वतः मिलिंद लांबे यांनी आता पर्यंत 64 वेळा रक्तदान केलं आहे. तर असं नियमितपणे रक्तदान करणारे या ग्रुपमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. सध्या जालना आणि औरंगाबादमध्ये हा ग्रुप काम करतो. जालन्यात 180 तर औरंगाबादेत 156 दात्यांचा ग्रुप तयार झाला आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये सुरु झालेली ही चळवळ रक्ताच्या नात्यापलीकडे बघणारी आहे.

मिलिंद लांबे यांचा संपर्क क्र. - 9423460876
- अनंत साळी.

कृष्णा पुजारी आणि त्याची टीम. मुक्काम: धारावी.

मुंबई स्पेशल

स्लम टुरिजमविषयी ऎकलंय का तुम्ही? मुंबईनगरीतली गेट वे ऑफ इंडिया, ताजमहाल, मरीन ड्राइव्ह ही टुरिस्टांची आवडती ठिकाणं आहेत. यात आणखी भर पडली आहे स्लम टुरिझमची. मुंबईत माहीम, माटुंगा, सायन, वांद्रा, कुर्ला, बीकेसी – इथे येता-जाताना धारावीशी गाठ पडते. आता, खरं तर, तिचं वर्णन कुणी पूर्वीसारखं झोपडपट्टी म्हणून करतच नाही. आणि नकोच करायला. पण टूरिझमसाठी मात्र ती अजूनही ‘स्लम’ आहे.
धारावीत स्लम टुरिझम सुरू करणारी संस्था ‘रिॲलिटी टूर्स आणि ट्रॅव्हल’. तिचा एक संस्थापक कृष्णा पुजारी. माहीम रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडून नव्वद फुटी रस्त्यालगतच्या गल्लीत, कुंभारवाड्याजवळ रिॲलिटी टूर्सचं ऑफिस आहे. २००८-०९ मध्ये ऑस्करविजेता ‘स्लमडॉग मिलियनेअर’ चित्रपट गाजला होता. मुंबईतल्या झोपडपट्टीत जगणार्‍या मुलांची ती कथा होती. खुद्द कृष्णाचीच जीवनकहाणी एखाद्या सिनेमाच्या कथेहून कमी नाहीये.
कन्नड मातृभाषा असलेला कृष्णा मराठी नीट बोलतो, परदेशी पर्यटकांशी सफाईदार इंग्लीशही बोलतो. तेरा वर्षांचा असताना कर्नाटकातल्या आपल्या गावाहून, काम करण्यासाठी तो मुंबईत आला. वडाळ्याच्या प्रतीक्षानगर वस्तीत राहिला. कृष्णाने बावीसाव्या वर्षी धारावीत काम सुरू केलं. मग स्वतःचा कॅफेटेरिया काढला. २००५-०६ च्या दरम्यान त्याला मूळचा बर्मिंगहॅमचा असलेला ख्रिस वे हा माणूस भेटला. ख्रिसने लॅटिन अमेरिकन समाजाचा अभ्यास केलेला. ब्राझीलमध्ये रिओ शहरात त्याने वस्त्यांमधलं पर्यटन पाहिलेलं. ‘बाहेरच्या’ लोकांना अशा वस्त्यांत आणल्याने वस्त्यांचा विकास व्हायला मदत होऊ शकते, अशी त्याची धारणा झाली होती. धारावीत स्लम टुरिझम सुरू करण्याची हीच प्रेरणा ठरली.
धारावीत हे काम करण्यासाठी स्थानिक माणूस म्हणून त्याने स्मार्ट, तरूण कृष्णाला हेरलं. आणि २००४ मध्ये ‘रिॲलिटी टूर्स आणि ट्रॅव्हल’ची जमवाजमव सुरु केली. कृष्णा तेव्हा फक्त पंचवीस वर्षांचा होता. ख्रिसने त्याला तयार केलं. आता ख्रिसने स्वतःला धारावीतल्या कामातून मुक्त करून घेतलंय. तो आता फिलिपिन्स, मनिला वगैरे ठिकाणी याच प्रकारचं मॉडेल सुरू करण्याच्या प्रयत्नांत आहे. कृष्णा आणि त्याची देशी-परदेशी सदस्यांची टीम भारतातल्या मुंबई, दिल्लीसह विविध शहरांतले स्लम टुरिजम प्रकल्प सांभाळतात.
धारावीत हे पर्यटन सुरू केलं, तेव्हा स्थानिकांनी विरोध केला. प्रवाशांना इथे कशाला आणताय, इथे बघण्यासारखं आहे तरी काय, असं लोक म्हणायचे. पण कृष्णाने त्यांना मनवलं. विरोध हळुहळु मावळला.
टूर कंपनीबरोबरच त्यांनी ‘रिॲलिटी गिव्ह’ या नावाची एनजीओही सुरू केली आहे. टूर्समधून मिळालेल्या नफ्याचा काही हिस्सा या एनजीओतर्फे समाजसेवेची कामं करण्यासाठी वापरला जातो. ‘रिॲलिटी गिव्ह’तर्फे धारावीतल्या मुलामुलींसाठी इंग्लीश, कंप्युटर वगैरे विषयांचे क्लासेस चालवले जातात. या क्लासेसचं सगळं व्यवस्थापन धारावी, माटुंगा लेबर कँप परिसरातलीच मुलं-मुली बघतात.
धारावीतच जन्मले-वाढलेले चेतन-राजेशसारखे काही स्मार्ट गाइड्स तयार झालेत. ते पर्यटकांना धारावी दाखवतात. कचर्‍याचं हातांनी केलं जाणारं वर्गीकरण, गारमेंट्सशिलाई, प्लॅस्टिक रिसायकलिंग, धातू वितळवण्याचं प्रचंड धोक्याचं काम, चामड्याचं कटिंग आणि त्यापासून स्त्री-पुरुषांसाठी बॅग्ज, पर्सेसची निर्मिती, कुंभारवाड्यात माती रगडून मडकी, पणत्या घडवणं, लिज्जत आणि अन्य कंपन्यांचे पापड लाटणं, वाळवणं, वेफर्स, चिवडा वगैरे बनवणं – धारावी ही उद्योगनगरी असल्याची साक्ष देणारी ठिकाणं. राजेश-चेतन चटपटीतपणे इंग्लिश बोलतात. ते १२वी पास आहेत. रिॲलिटी टूर्स कंपनीच्या स्टाफवर आहेत. त्यांना महिना १५ हजार पगार आहे. त्याखेरीज पर्यटकांकडून टिप मिळते. अडचणीच्या काळात मोठी मदत देणारे प्रवासीही भेटतात. पैशाच्या मिळकतीहून बरंच काही मिळतं, असं ते सांगतात. प्रतिष्ठा मिळते, समज वाढते. आमच्यातल्या काहींना परदेशी जायची संधीही मिळाली आहे. आमच्यातला मयूर तर फुटबॉल खेळायला ऑस्ट्रेलियालाही जाऊन आलाय.
या टूर्स गरिबीचं प्रदर्शन करणार्‍या असतात, असा आक्षेप घेतला जातो. पण यावर मतंमतांतरंही आहेत. मुळात धारावी गरीब आहे का, हा मुद्दा आहे. अनेक व्यावसायिक तिथे राहातात. करोडोंची उलाढाल होते. धारावीत कोणी रिकामं, निरुद्योगी बसलेलं दिसतच नाही. तुम्ही धारावी बघायला म्हणून जाता. पण तिथल्या कुणाचं तुमच्याकडे लक्षही नसतं. प्रत्येक जण बाराबारा, सोळासोळा तास आपापल्या कामात मग्न. घरं लहान आणि दाटीवाटीने असली तरी घराघरात आवश्यक ते सारं सामानसुमान आहे. शौचालयं वगैरे अपुरी आहेत. पण सुधारणाही होत आहेत.
स्वतः कृष्णा आणि त्याच्या स्टाफमधले सगळेच सांगतात, की गेल्या पंधरा वर्षांत धारावी खूप बदललीये. घरोघरी एकाहून अधिक कमावणारे लोक आहेत. या टुरिझमने धारावीचं काहीच नुकसान नाही. महाराष्ट्र आणि भारतभरातले लोक इथे आहेत. प्रचंड उत्पादन होतं. सगळे असंघटित उद्योग इथे चालतात. मुंबईच्या आर्थिक वाढीत धारावीचं मोठं योगदान आहे. मुंबईत येणार्‍या पर्यटकांना याची जाणीव करून द्यायलाच हवी, असंही एक मत. मुंबईत याल तेव्हा स्लम टुरिझमचा अनुभव तुम्हीही घेऊ शकता.

मुलं शिकली; वाचू लागली

मुंबई स्पेशल
मुंबईच्या चेंबूर उपनगरात 'सह्याद्री नगर' नावाची एक वसाहत आहे. चेंबूर-सीएसटी फ्रीवे च्या नजीकच्या टेकडीवर राहणाऱ्या अनेक स्त्रियांनी इथल्या शैक्षणिक परिवर्तनात मोलाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे त्यांचे हे कार्य, आठवणींमध्ये लुप्त होण्याआधी सर्वांसमोर आणणे गरजेचं ठरतं.
छाया पंचभाई या त्यातल्याच एक. त्यांचं घर 'सह्याद्री नगर' च्या टेकडीच्या एकदम वरती आहे. आणि टेकडीवर पसरलेल्या अनेक घरांना कापत जाणारा एक अरुंद रस्ता आपल्याला तिथं घेऊन जातो. इथली बहुतांश वस्ती ही मजूरवर्गाची. एरवी ज्यांना सवय नाही ते अगदी धापा टाकतच त्यांच्या घरी पोहोचतात. त्यांच्या ह्या घरातच पहिली बालवाडी सुरु झाली. बालवाडीतून त्यांनी स्वतःला ह्या कार्यात झोकून दिल्यामुळे वस्तीतले सगळे त्यांना 'ताई' म्हणू लागले.
छायाताई सांगतात की, “९० च्या दशकाच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये ह्या भागात शिक्षणासंबंधित काहीच जागरूकता नव्हती. घरांपासून शाळा अगदी लांब, त्यामुळं बरीच मुलं शाळेत जात नसत किंवा गेली तरी काही वर्षांनी शाळा सोडून देत. शिवाय 'शिकून काय करायचंय, नंतर असंही नोकरीच करायची आहे’ असा विचार सगळी लोकं करत होती.” अशा पार्श्वभूमीवर 'प्रथम' ने तिथल्या स्त्रियांना लक्ष्य केलं. त्यांना साक्षरतेचं महत्व पटवून दिलं, आणि हेच त्यांना पुढं इतरांना पटवून द्यायला सांगितलं. हळू-हळू ह्या भागातली मुलं आणि प्रौढ, दोघंही शिकू लागली, लिहू-वाचू लागली. त्यांच्या बालवाडीत देखील मुलं येऊन शिकू लागली. "माझ्या बालवाडीमुळे बऱ्याच मुलांच्या मूळ संकल्पना पक्क्या झाल्या", असं त्या आनंदाने सांगतात. बालवाडी नंतर त्यांनी घरी वाचनालय सुरु केलं आणि त्यामुळे तिथल्या मुलांमध्ये वाचनाची आवड देखील निर्माण झाली. अशाप्रकारे अगदी लहानमुलांपासून सर्वच मुलांमध्ये लिहिण्या-वाचण्याची प्रवृत्ती निर्माण झाली. आज त्यांच्या बालवाडीत शिकून गेलेल्या आणि नंतर वाचनालयात वाचून गेलेल्या बऱ्याच मुलांना चांगल्या नोकऱ्या लागल्या आहेत. ही सारी मुलं ह्याबद्दल त्यांना धन्यवाद देतात.
९० च्या दशकाच्या सुरुवातीला 'शाळेत पाठवायचं की नाही' हा इथला चर्चेचा विषय होता. आता मात्र शाळेत गेलं पाहिजे हे सर्वांनी मान्य केलं आहे. आता चर्चेचा विषय, 'महानगरपालिकेच्या शाळेत जायचं की खाजगी शाळेत' हा आहे. हेच महत्वाचं आणि मोलाचं परिवर्तन आहे.
छायाताईंकडे अमोल नावाचा एक मुलगा यायचा. त्याचं अभ्यासात फारसं लक्ष नसायचं. इतरांप्रमाणे त्याचं अभ्यासात मन रमावं म्हणून त्या त्याला सांगायच्या की जर अभ्यास केलास तर तुला मोठेपणी विमानात बसायला मिळेल. थोडा मोठा झाल्यावर अमोलने त्यांना बोलून दाखवलं की तुम्ही हे खोटं बोलत आहात. परंतु त्याच्या नकळत त्याला अभ्यासाची गोडी लागल्यामुळे अमोलने पुढे खूप प्रगती केली आणि त्याला नोकरीसाठी परदेशात जायची संधी मिळाली. त्याचा प्रवास विमानाने होणार होता. साहजिकच, त्याला छायाताईंची आठवण झाली. तो त्यांना भेटायला आला. "तुम्ही लहानपणी सांगितलं होतं, तसं मला विमानात बसायला मिळालं. धन्यवाद", असं त्याने बोलून दाखवलं. ही कहाणी संपवताना छायाताईंना अश्रू आवरणं अवघड झालं होतं.
तुम्ही शिकवलेली मुलं आता कुठे राहतात, असं त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी वसती बाहेर बांधलेल्या बिल्डिंगचा उल्लेख केला. "त्यांचं आयुष्य चांगलं झालं ह्यात मला आनंद आहे", असं त्या म्हणाल्या. परंतु इतकी आयुष्य चांगल्या मार्गाला लावणाऱ्या ह्या शिक्षिका अजून देखील त्याच छोट्या झोपडीत राहतात. शिक्षकांचा हा त्याग बहुतेकदा दुर्लक्षित केला जातो.
- आशय गुणे

Tuesday 16 January 2018

बकेटमधून मिळवा वर्षभर भाजीपाला




आजपर्यंत आपण परस बाग, टेरेस गार्डन, किचन गार्डन याबद्दल खूप काही ऐकलं असेल पाहिलं असेल आणि क्वचित प्रत्यक्षात उतरवलंही असेल. पण हे सगळं खर्चिक, अडचणीचं; प्रत्येकाला जमलं असेलच असं नाही. पण, आता सगळ्यांनाच उपयोगी ठरू शकेल असं एक गार्डनचं नवं स्वरूप उदयाला आलंय ते म्हणजे 'बकेट किचन गार्डन.'होय; या भन्नाट संकल्पनेच्या निर्मात्या आहेत, औरंगबादच्या वैशाली देशमुख. औरंगबादच्या एमजीएम महाविद्यालयातील कृषी विज्ञान केंद्रात त्या प्राध्यापक म्हणून काम करतात. इथंच त्यांनी हा प्रयोग केला. सुरुवातीला दहा बकेट आणून त्यात त्यांनी टोमॅटो, वांगे, भेंडी, कोथिंबीर, मेथी, दोडका, दुधी आणि मिरच्या या भाजीपाल्यांची लागवड केली. काही दिवसातच त्यांना याचा रिझल्टसुद्धा मिळाला. सुरुवातीला मेथी, कोथिंबीर चांगली आली. त्यानंतर टोमॅटो, वांगे आणि मिरच्यांची सुरुवात झाली. त्यांचे बहर चांगले होऊन फळधारणा चांगली झाली. विशेष म्हणजे या फळबाज्यांचा भर तब्बल सहा महिने कायम राहिला. पन्नास रुपयांच्या बकेट, मातीसोबत गांडूळ खतांचा वापर केला, कुठलीही रासायनिक खतं, फवारणी नाही. कीड पडली तेव्हा आंबवलेलं ताक, किंवा गांडुळपाणी याचा फवारणीसाठी वापर केला आणि कीड नियंत्रणात ठेवली. यामुळे पिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढली. त्यामुळे फळधारणा चांगली झाली. आणि उत्पादन चांगलं मिळालं.  वैशाली देशमुख म्हणाल्या की, “दहा बकेटच्या माध्यमातून चार माणसांच्या कुटुंबाला वर्षभर सहज भाजीपाला पुरवठा होऊ शकतो. विशेष म्हणजे त्यासाठी अत्यल्प खर्च येतो आणि मेहनत खूप कमी करावी लागते. त्याचबरोबर हे सगळे ऑरगॅनिक पदार्थ आपल्याला घरातच उपलब्ध होतात. त्यामुळे वर्षभर भाजीपाल्यावर होणारा खर्चही कमी होतो.” बकेट गार्डन शहरी भागात नागरिकांना तयार करता येऊ शकते. गॅलरीत किंवा ऊन लागेल अशा ठिकाणी या बकेट ठेऊन भाजीपाला घेता येऊ शकतो. शहरी महिलांना सोपं पडावं यासाठी त्या आता बकेट गार्डनचं स्वतंत्र किटच उपलब्ध करून देणार आहेत. ज्यात बी बियाणे, गांडूळ खत, बकेट आणि संभाव्य कीटनियंत्रणासाठी आवश्यक माहिती पुस्तिका असं त्याचं स्वरूप असणार आहे. अशी युझर फ्रेंडली बकेट गार्डन अधिक लोकांपर्यंत पोचली तर पालेभाज्यांच्या क्षेत्रात नवा अध्याय सुरू होऊ शकतो.
- दत्ता कानवटे.

शांतीवनमुळे शेतीत नंदनवन

जिल्हा बीड. तालुका शिरूर. इथल्या आर्वी गावातलं ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी काम करणारं शांतिवन आता बरंच प्रसिद्ध आहे. गेली १७ वर्षे शांतिवनात हे काम सुरु आहे. यासोबतच शांतिवनने आता ‘मनोबल’ प्रकल्प सुरु केला आहे.
‘मनोबल’विषयी संचालक दीपक नागरगोजे सांगतात, “सातत्याने अवर्षणचा सामना करणाऱ्या परिसरातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात होणारी घट, त्यातून कायम हाती ऊसतोडणीसाठी असलेला कोयता, ऊसतोडणीसाठी स्थलांतर, मुलींच ओझं नको म्हणून बालविवाह, मुलांच्या शिक्षणावर कोयता असा प्रश्नांचा गोतावळा शेतीशी निगडीत होता हे ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काम करताना लक्षात आलं.” ते पुढं म्हणाले, “२०१३ साल असावं, प्रचंड दुष्काळ, संपूर्ण तालुका टँकरवर अवलंबून. शांतिवनमध्ये ३०० च्या जवळपास मुलं, अक्षरश: पाणी विकत घ्यावं लागलं, शासकीय मदतीविना चालणाऱ्या प्रकल्पाला हा खर्च परवडणारा नव्हता. म्हणून जलसंधारणाची कामं हाती घेतली. २०१४ मध्ये ८० बाय ५० मिटरचं शेततळे खोदलं, दोन विहिरी खोदल्या, पुढच्या वर्षीच्या पावसाने चित्रच पालटलं. विहिरी भरल्या, शेततळे पूर्ण भरलं. पाच कोटी लिटर पाण्याची ही ‘वॉटरबँक’ झाली. आणि शांतिवन दुष्काळमुक्त झालं.”
पाण्याची चिंता मिटली अन् शेतीत प्रयोग सुरु झाले. यंदा दोन एकरवर बेड, मल्चिंग करुन टोमॅटोची लागवड केली. जुलै, ऑगस्टमध्ये प्रचंड पीक आलं. पुणे, मुंबई, चंद्रपूरच्या बाजारपेठांमध्ये विक्रमी भाव मिळाला. त्यामुळे शांतीवनला दहा लाखांचं उत्पन्न मिळालं. यात सात ते साडेसात लाख निव्वळ नफा होता. यानंतर त्याच दोन एकरावर त्यांनी प्रयोग केला तो फुलशेतीचा. झेंडू फुलशेतीतूनही दोन लाखांचं उत्पन्न मिळालं. नागरगोजे म्हणतात, “प्रयोग यशस्वी झाल्यानंतर ते शेतकऱ्यांनाही करायला लावले, भाजीपाल्याची गटशेती केली.”
शेती करायची तर पाणी हवं, दुष्काळी तालुक्यात वॉटरबँकेशिवाय पर्याय नाही. म्हणून ११ शेतकऱ्यांना गतवर्षी शांतीवनने मोफत शेततळे दिलं. ३० बाय ३० मिटर आकार आणि दीड कोटी लिटर साठवण क्षमतेची ही शेततळी आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना यंदा दुप्पट उत्पन्न मिळालं. यंदाही २५ शेतकऱ्यांनी शांतिवनच्या मदतीने शेततळी बांधली आहेत. दोन वर्षात ४०० एकर क्षेत्र ओलीताखाली आलं असून १०० शेतकऱ्यांना शेततळे देऊन एक हजार एकर क्षेत्र ओलीताखाली आणण्याची इच्छा दीपक नागरगोजेंनी व्यक्त केली.
मनोबल प्रकल्पाचे लाभार्थी गोरक्ष मोहिते म्हणाले, “पारंपािरक शेती नेहमी तोट्यातच. शेततळ्यानंतर टोमॅटोला विक्रमी भाव मिळाला, आता झेंडूही लावला आहे. तंत्रशुद्ध शेतीचे फायदे कळत आहेत. शिवाय, पाणी कितीही असलं तरी ते वापरायचं ठिबक सिंचनानेच हे पथ्यही सर्वांनी पाळलं. यामुळं आता आयुष्यच बदलल्यासारखं वाटतयं.”

- अमोल मुळे.

आता संपली रोजची स्मशानवारी


मुंबई स्पेशल
भांडाभांडीत कधी एकजण दुसर्‍या व्यक्तीला रागारागाने म्हणतो, तू माझ्यासाठी मेलास. किंवा मर जा. पुन्हा तोंड दाखवू नकोस. आणि समजा एखाद्याला खरंच नेहमी, जिवंतपणीच, अगदी रोजच स्मशानात जावं लागत असेल, तर? पण रोजच स्मशानात कुणाला कशासाठी जावं लागत असेल?

ही गोष्ट मुंबईतली. कांदिवली पूर्व इथल्या चव्हाण वाडी, वडारपाडा, हनुमान नगर या वस्त्यांची. इथल्या रहिवाशांना, जास्त करून स्त्रियांना रोज प्रातर्विधीसाठी जवळच्या स्मशानात जावं लागायचं. स्मशान म्हटलं की दुःख आणि भय. अशा ठिकाणी रोजच्या रोज नाईलाजाने जावं लागणं किती क्लेशकारक! या मुंबई शहरात लोकांना असंच काय काय भोगावं लागतं, कशाकशाला सामोरं जावं लागतं. 





६०० ते ७०० लोकवस्तीचा हा विभाग. १९७२ पासून हे लोक इथे राहात आहेत. तेव्हापासूनच शौचालय व्यवस्था नव्हती. बारा वर्षांपूर्वी इथे हिंदू स्मशानभूमी बांधल्यापासून महिला स्मशानभूमीतल्या शौचालयांचा वापर करु लागल्या. त्या आधी या लोकांना उघड्यावरच जावं लागायचं. कार्यकर्ते सुनिल शिंदे यांनी सांगितलं की उघड्यावर गेलेले रहीवासी प्रभाकर आचार्य यांना साप चावला. ते जखमी झाले. वडारपाड्याच्या स्त्रियांकडून समजलं की त्यांना रात्री-अपरात्री नैसर्गिक विधींसाठी खूप काही सोसावं लागायचं. त्या म्हणाल्या, “काही वर्षं तर आम्ही चार फूट उंच भिंत पार करून शौचालयासाठी जात असू. घरात आलेल्या पाहुण्यांनाही शौचालय, अंघोळीसाठी स्मशानात नेणं, याहून लाजीरवाणी गोष्ट कोणती?
अनेक लोकप्रतिनिधी आले, गेले पण लोकांसाठी साध्या शौचलयाची सोय नव्हती. मात्र, २१ नोव्हेंबरला, या रहिवाशांना त्यांच्या हक्काचं टॉयलेट मिळालं. कांदिवली पूर्व मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांच्या आमदारनिधीतून ही सुविधा उभी राहिली.
अतुल भातखळकर म्हणाले, “ही समस्या घेऊन लोक आले, तेव्हा मनाला चटका बसला. वस्तीतल्या महिला आणि लहान मुलांचा विचार करून मन खंतावलं. कोणत्याही परिस्थितीत इथे टॉयलेट बांधायचं, लोकांची या त्रासातून सुटका करायची असा निश्चय केला. कार्यकर्ते कामाला लागले. आमदारनिधीतून आम्ही इथे टॉयलेट उभारलं. लोकांची रोजची स्मशानवारी आता संपली. आणखी एका चांगल्या कामाचं पुष्प जनता जनार्दनाच्या चरणी अर्पण केल्याची भावना माझ्या मनात आहे.”
इथं राहाणारे लोक देशाच्या वेगवेगळ्या राज्यांतून पोटापाण्यासाठी मुंबईत आलेले. यातले ६० टक्के रिक्षाचालक आहेत. काहीजण वाशी-ठाणे खदन कामात मजुरी करणारे, ट्रकचालक आहेत. “१९७२ पासून आमच्या विभागात अनेक पक्ष आले, गेले. पण आमचा शौचालयाचा प्रश्न कोणी विचारात घेतला नाही. आमदार अतुल भातखळकर यांनी आमची निकड समजून आमच्या वस्तीकरीता सार्वजनिक शौचालय बांधून दिलं”, रहिवासी समाधानाने सांगतात.
- लता परब.