Wednesday 31 October 2018

पुरस्काराच्या रकमेतून शाळेची केली रंगरंगोटी

परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातील खंडाळी इथलं श्री रोकडोबा माध्यमिक विद्यालय. लातूर आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवर डोंगराळ भागातली ही शाळा. शाळेतले एक शिक्षक माधव शिवहरी केंद्रे. केंद्रे सर 2004 पासून शिक्षकी पेशात. 14 वर्षांपैकी फक्त 39 किरकोळ रजा त्यांनी वापरल्या. त्यातली 5 वर्ष तर एकही रजा नाही. गरीब आणि अनाथ मुलांना मदत करण्यासाठी ते वर्षातलं एक महिन्याचं वेतन राखून ठेवतात. गेल्या वर्षी या रकमेतून त्यांनी 10 मुलं आणि 5 परित्यकत्यांना मदत केली. "माझ्या शिक्षणासाठी आईवडिलांनी रानोमाळ भटकंती करून काबाडकष्ट केले. मुलांसाठी रोजंदारीवर काम करून काय अवस्था होते, हे मी स्वतः पाहिलं आहे म्हणूनच होतकरू मुलांच्या शिक्षणाला हातभार लावतो"; असं सर सांगतात.
शैक्षणिक उपक्रम आणि लोकसहभागातून केलेल्या विकासकामांसाठी त्यांना यंदा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराची रक्कम 1 लाख 10 हजार.
केंद्रे हाडाचे आदर्श शिक्षक. जबाबदारीचं भान स्वस्थ बसू देईना. शाळा रंगरंगोटीला आलेली. सरांनी पुरस्काराच्या रकमेतून 21 हजार रुपयांची देणगी दिली. गावकऱ्यांनीही सरांचा आदर्श ठेवला. विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थ्यांनी खारीचा वाटा उचलला. वर्गणी जमा झाली आणि त्यातून शाळेच्या रंगरंगोटीचं काम पूर्ण झालं. संपूर्ण तालुक्यात सरांचं कौतुक होत आहे.
मुख्याध्यापक मारोती पिंपळे, शेख अली अजिमोद्दीन, शिवाजी पवार, सोमप्रकाश सुर्यवंशी, माधव जाधव यांचं मार्गदर्शन तसंच शिक्षक विष्णूदास भोसले, रोहिदास मोरताटे, राजाभाऊ जुबरे, नरसिंग स्वामी यांचे सहकार्य मिळाल्याचे केंद्रें यांनी सांगितले.
-बाळासाहेब काळे

सॅनिटरी पॅड्सचं पाकिट लपवून न्यायची काय गरज?

"मासिक पाळीकडे आपण कटकट म्हणून पाहत असू, त्यासाठी महिन्याचे चार दिवस वाया घालवणार असू, तर महिला सक्षमीकरण, समानता या मुद्यांवर आपण कसं बोलू शकतो?" मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस विचारत होत्या.स्थळ नाशिकमधलं महाकवी कालिदास कलामंदिर. अहिल्या फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेचा कार्यक्रम: 'संकल्प स्त्रीत्वाच्या सन्मानाचा, तिचे आरोग्य, तिच्या निरोगी जीवनाचा’. गेलमार्क कंपनीच्या मदतीनं 1,064 शाळांमधल्या दीड लाख विद्यार्थिनींना 10 लाख सॅनिटरी नॅपकिन्सचं वाटप. या उपक्रमाची वंडर बुक ऑफ लंडनकडून दखल घेतली गेली.
इथे एक घडलं.
कार्यक्रमात, मुली स्टेजवर मिळत असलेलं पॅडचं पाकीट लपवून नेत होत्या. अमृता यांना ही बाब खटकली. त्यांनी मुलींशी संवाद साधला. "सॅनिटरी पॅड्सचं पाकिट लपवून न्यायची काय गरज? मासिक पाळी ही नैसर्गिक प्रकिया आहे. निसर्गाने बहाल केलेल्या स्त्रीत्वाचा सन्मान करा. आज अनेक मुली वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमवत आहेत. कारण त्या मासिक पाळीचं चक्र भेदून पुढे गेल्या, हे त्यांनी वेगवेगळ्या उदाहरणातून पटवून दिलं. आयुष्यात एक ध्येय बाळगा आणि ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला अमृता यांनी मुलींना दिला. त्यानंतर, मात्र मुलींनी हातातच पाकीट ठेवून रांगेतून पुढे जाणं पसंत केलं.
अहिल्या फाऊंडेशनचे प्रमुख माजी आमदार जयंत जाधव यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. "ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यविषयक समस्या जवळून पाहिल्या आहेत. मलाही मुलगी आहे. तिच्या वयाच्या मुलींच्या अडचणी दूर व्हाव्यात, त्यांचे गैरसमज दूर व्हावेत, यासाठी उपक्रम हाती घेतला," त्यांनी सांगितलं. 
- प्राची उन्मेष.

Monday 29 October 2018

ना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं यासाठी

आकाशकंदील, पणत्या, रंगरांगोळ्या, उटणी, शुभेच्छापत्र, सजावटीच्या असंख्य वस्तू..... दिवाळी आलीच. रत्नागिरीतल्या अविष्कार संस्थेतही या वस्तू तयार आहेत. सहानुभूती, मदत यापेक्षा प्रौढ गतिमंद व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं यासाठी 32 वर्षांपूर्वी डॉ शाश्वत शेरे यांच्या घरात स्थापन झालेली संस्था. 

गतिमंदांसाठी सौ.सविता कामत विद्यामंदिर, श्री शामराव भिडे कार्यशाळा, वर्षा चोक्सी बालमार्गदर्शन केंद्र, कै.प्रताप मंगेश कानविंदे शीघ्र उपचार केंद्र, आविष्कार उत्पादन केंद्र अशा विविध माध्यमातून संस्था कार्यरत.
संस्थेच्या श्री शामराव भिडे कार्यशाळेत प्रौढ दिव्यांग
व्यक्तींना व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जातं. गतिमंद व्यक्तींमध्येही सुप्त कलागुण दडलेले असतात. त्यांना वाव दिला तर या व्यक्तीही उत्पादनकर्ते होऊ शकतात आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतात. या विचारातून 26 वर्षांपूर्वी कार्यशाळा सुरू झाली. यातून आतापर्यंत 37 व्यक्तींचं व्यावसायिक पुनर्वसन झालं आहे. आपल्या कुटुंबाला ते आर्थिक हातभार लावत आहेत. सध्या सुमारे 180 व्यक्ती या कार्यशाळेत प्रशिक्षण घेत आहेत.
स्टेशनरी, मेणबत्ती, ज्वेलरी मेकिंग, शिवण,हस्तकला, गृहशास्त्र, प्राथमिक सुतारकाम, मेणबत्ती, असे विभाग यासााठी आहेत.

गेल्या 10 वर्षांपासून दिवाळी उपक्रम. पुण्यातील लक्ष्य फाउंडेशन आणि आविष्कारचे हितचिंतक अशोक कुलकर्णी यांनी यंदा मोठी ऑर्डर दिली असल्यानं संस्थेत लगबग दिसत आहे. अध्यक्ष नीला पालकर, सचिव डॉ .उमा बिडीकर, शामराव भिडे कार्यशाळा समिती अध्यक्ष नितीन कानविंदे आणि व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर यासाठी अपार मेहनत घेत आहेत. 
सर्वसामान्यांनाही लाजवेल अशा कलाकृती या निरागस मुलांनी केल्या आहेत. या वस्तू केल्यावर त्यांच्या चेहऱयावरील आनंद पाहून पालकही आनंदित होत आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह मुख्य प्रवेशद्वार इथं 1 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान संध्याकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत मुलं स्वतः या वस्तूंची विक्री करणार आहेत. मुलांच्या जिद्दीला हातभार लावण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे. अधिकाधिक स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी नफ्यातली 60 टक्के रक्कम मुलांना दिली जाणार आहे. 
-जान्हवी पाटील.

वंदनाची गोष्ट - भाग ४ -कशाला हवा हा नवरा, ज्यानं कधी प्रेमाचा एक क्षण नाही दिला.


पुढे, आणखी दोन वर्षांनी, २५ सप्टेंबर२००७ ला माझा धाकटा मुलगा श्री जन्माला आला. मी कामाला जात होते, त्या लोकांनी मला स्वत:चं घर विकत घेण्याचा सल्ला दिला. लोकांकडून पैसे घेऊन मी सध्या राहत असलेली जागा विकत घेतली. घरात मी आणलेल्या वस्तू विकण्याचे त्याचे उद्योग सुरू होते. मी पोलिस स्टेशनमध्ये पाच सहा वेळा तक्रार दिली. सणासुदीला घातलेली रांगोळी पुसणं, फराळ फेकणं, दारू पिऊन दिवसदिवस झोपून राहाणं, असे बाबूचे उद्योग सुरू होते. श्री झोळीत असायचा. मोठ्या साईला घेऊन दिशा ट्युशनला जायची. तिच्या शिक्षिकेच्या बाजूला राहणारी तिची जाऊ साईला सांभाळायची.
जगात चांगले लोकही आहेत याचा पदोपदी अनुभव मला येत होता. नवर्‍याने जीवाचे हाल केले तरी आजुबाजूला अनेक भली माणसं होती, आहेत. तान्ह्या श्रीला झोळीत ठेऊन त्याच्यासाठी दूध पोळी मिक्सरमधून काढून ठेवत असे. मी कामावरून दुपारी दीडच्या सुमारास परत यायची. तोपर्यंत बाळाला सांभाळायला त्याला सांगितलेलं. एक दिवस, दुपारी मी परतले तेंव्हा बाळ जोरजोरात रडत होते. त्याच्यासाठी बनवलेलं खाणं तसंच होतं. मला बघवेना, मीही जोरजोरात रडू लागले.
या काळात, मी सायनची खोली विकून मुलूंडमध्येच आणखी एक खोली घेतली. त्या ठिकाणी तो दारूचा धंदा घालायची भाषा करु लागला. तू कामं सोड आणि दारुच्या गुत्त्यावर बस, असं तो मला सांगू लागला. ज्या दारूमुळे माझ्या आयुष्याची माती झाली, ती दारू मी विकणार नाही, असं मी त्याला सुनावलं. आज दारुच्या गुत्यावर बसवतोयस, उद्या मलाच धंद्याला बसवशील. यावर तो म्हणाला, त्यात वाईट काय? माझा स्वत:चा नवरा या भाषेत बोलत होता. मी आतल्या आत मरत होते, खरंच मेले असते. पण मला आता मुलांची साथ होती. मी त्याला बधणार नव्हते. मी विकत घेतलेली दुसरी जागा एका कुटुंबाला भाड्याने दिली.
मला स्वयंपाकाची कामं मिळू लागली. दिशा दहावीची परिक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाली. बारावीनंतर तिने फिजियोथेरेपीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. काही झालं, तरी मुलांना शिकवणारच, हे आधीपासूनच मी ठरवलं होतं. इतकी वर्ष बाबूच्या टारगेटवर मी होते. आता तो दिशाला घाणघाण बोलू लागला, शिव्या द्यायला लागला. तेव्हा, मी सुनावलं की, माझ्या मुलांना जर काही झालं, तर तुला मी जागेवर ठेवणार नाही. माझं काहीही झालं तरी चालेल. त्यानंतर मी आणि दिशाने पोलिस स्टेशनवर जाऊन त्याच्याविरुध्द तक्रार दिली. पोलिस स्टेशनला दिशा खूप रडली. ज्या लेकीला तळहातावरच्या फोडासारखं जपलं, तिला असं रडताना बघून माझ्या जीवाचं पाणीपाणी झालं.
आताही, बाबूचं छळ करणं चालूच आहे. घरात आम्ही मी आणि तीन लेकरं एका बाजूला आणि तो एका बाजूला असा सीन आहे. तो कामावर जातो. कामाचा पैसा मला न देता उडवणं, दारू पिऊन घरी येऊन मला, मुलाबाळांना घाणघाण बोलणं, शिव्या देणं सुरूच.. मी आणि मुलं त्याला कंटाळून माळ्यावर जाऊन झोपतो. मुलांना तरी शिव्या देऊ नकोस असं मी सांगते, पण तो ऐकत नाही. त्यामुळे, रात्री माझी झोप पुरी होत नाही.रोज सकाळी कामाला जायला निघाले, की माझ्यामागे येऊन रस्त्यात दिसणार्‍या प्रत्येक माणसावरुन संशय घेऊन बोलतो. इतकी वर्षं ज्या भागात राहिले, त्या भागातल्या लोकांसमोर अशी बदनामी मी कशी सहन करते, हे मलाच ठाऊक. तरी, मी फक्त बायकांशी बोलते. तरी हा छळ थांबत नाही. शिव्याशाप, मारहाण याला मी कंटाळले आहे. आता मुलं मोठी होताहेत. त्यांच्यासमोर हे शिव्याशाप मला नको आहेत. आता मला कुणाची डर नाही, ना लोकांची, ना बाबूची. कशाला हवा हा नवरा, ज्यानं कधी प्रेमाचा एक क्षण नाही दिला. ज्यानं कधी मुलांना प्रेमानं जवळ घेतलं नाही. आता मला आजाद व्हायचंय. नवरा नसला, तर काही बिघडत नाही माझं. मला ना कपड्यांचा शौक, ना कुठं फिरायला जायचा. दिवसभर राबराब राबते. इतक्या घरचा स्वैपाक करते. स्वैपाकाच्या आगीच्या धगीनं डोळे जळजळ करतात, मला चष्मा लागलाय. पोळ्या लाटून लाटून मनगट इतकं दुखतं, की हातापासून वेगळं करावसं वाटतं. अंग दिवसभर ठणकत असतं.
एकच गोष्ट माझ्याजवळ आहे, माझं हसू. ते मला गमवायचं नाहीए. मी हसणार.
..............
बाबूपासून घटस्फोट घेण्यासाठी वंदनाने शासनाच्या कायदा सहाय्यता विभागाची मदत घेतली आहे. तिला योग्य मदत मिळून एक दिवस त्याच्या छळापासून तिची सुटका होईल अशी, तिला आशा आहे.
 (शब्दांकन: भक्ती चपळगावकर)

Saturday 27 October 2018

इथं अंगणवाडीच्या मुलीही सांगतात जिल्ह्यांची नावं

लातूर जिल्ह्यातील ढोकी येथील जिल्हा परिषद शाळा. ढोकीची शाळा पहिली ते चौथीचीच आहे. ढोकी शाळेचे शिक्षक किरण साकोळे सांगतात, ‘मी उस्मानाबादहून आंतरजिल्हा बदली होऊन इथं रुजू झालो. शाळा सुरू झाल्यानंतरच्या दुसऱ्या आठवड्यात मी सहज कुतूहल म्हणून विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्यात किती तालुके आहेत, त्या तालुक्यांची नावं सांगा असा प्रश्न विचारला. एकाही विद्यार्थ्याला एकूण तालुके किती हे सांगता आलं नाही. काही विद्यार्थ्यांनी एक–दोन तालुक्यांची नावे सांगितली, पण बहुतेकांनी तालुक्यांऐवजी बीड, औरंगाबाद अशी आपल्याला आठवतील त्या शहरांची नावंच ठोकून दिली.’
सर पुढे सांगतात, ‘एकाही विद्यार्थ्याला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची नावे सांगता येत नाहीत हे बघून मी जरा अस्वस्थच झालो. निदान सामान्यज्ञान म्हणून तरी आपल्या जिल्ह्यात किती तालुके आहेत हे सांगता यायला हवे. उद्या एखाद्या अधिकाऱ्याने सहज या विद्यार्थ्यांना तालुके विचारले आणि त्यांना तेही सांगता आले नाहीत, तर ते शिक्षक म्हणून आपले अपयश असेल, असे विचार डोक्यात येऊ लागले. मुलांना जिल्ह्याचा भूगोल आला तर पाहिजे पण तो पारंपरिक घोकंपट्टीतून नको तर खेळातून, समजून घेऊन लक्षात राहायला हवा. त्या दृष्टीने मी विचार सुरू केला.’
फक्त एखाद्या वर्गाला शिकविण्यापेक्षा संपूर्ण शाळेचाच उपक्रम घेऊ, असं सरांनी ठरवलं. त्यांनी प्रथम भूगोलातील लातूर जिल्ह्याचा नकाशा मुलांना दाखविला. लातूर जिल्ह्यात 10 तालुके आहेत, नकाशाची दिशावार कशी रचना आहे ते सांगितलं. मग शाळेच्या मैदानात ते मुलांना घेऊन गेले. लातूर जिल्ह्याचे तालुके ज्या दिशांना आहेत, त्याप्रमाणे मुलांना उभं केलं. प्रत्येक विद्यार्थ्याला चाकूर, रेणापूर, शिरूर–अनंतपाळ, उदगीर अशी तालुक्यांची नावे दिली. प्रत्येकाने मोठ्याने ते नाव म्हणायचं. मग समोर बसलेल्या प्रेक्षक विद्यार्थ्याने तालुकास्वरूप उभे असलेल्या विद्यार्थ्यांच्या हातावर टाळी मारून त्या तालुक्याचं नाव सांगायचं, हा खेळ सुरू केला. या खेळामुळे अगदी काहीच दिवसांत विद्यार्थ्यांचे तालुके तोंडपाठ झाले. अगदी शाळेतील अंगणवाडीची मुलगीसुद्धा राज्यातील 36 जिल्ह्यांची नावे सांगते.
मग सरांनी लातूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांविषयीही असाच प्रयोग केला. लातूरमधून वाहणारी मुख्य नदी मांजरा. एका मुलीला मांजराचे नाव देऊन उभे केले. ती मुलगी मग नदीची माहिती देते. उदा. ‘मी लातूरची जीवनवाहिनी आहे. माझा उगम बालाघाटच्या डोंगररांगात होतो. पुढे वाहताना रेणा, तावरजा, घरणी या नद्या माझ्यात येऊन मिळतात‘ असं ती सांगते. मग बाकीच्या मुलींपैकी कोणी रेणा, कोणी तावरजा बनतं. मांजरा नदीला पुढे उस्मानाबादहून वाहत येणारी तेरणा नदी मिळते आणि त्या पुढे कर्नाटकात वाहत जातात. त्यामुळे आणखी एका मुलीला तेरणेचे नाव दिले आणि मग त्या सगळ्या एकमेकींचा हात धरून वर्गाबाहेर निघून गेल्या, म्हणजे कर्नाटकात पोहोचल्या असे मानण्यात येते.

- स्नेहल बनसोडे–शेलुडकर

वंदनाची गोष्ट - भाग ३-त्याला आयुष्यात उभं करण्याचा नाद मला आयुष्यातून उठवत होता.


बाळंतपणानंतर तान्ह्या दिशाला एकटं सोडून मी दुकानावर काम करे. आणि बाबू पैसे घेऊन गायब व्हायचा. माझे खूप हाल झाले. तान्ह्या दिशाला मला दूधही पाजता यायचं नाही. मी रडत बसायचे. दिशा अडीच महिन्याची असताना बाजूला राहणार्‍या माणसाने, याला दहा हजार रुपये ठेवण्यासाठी दिले. बाळ लहान असल्यामुळे मी कामावर जात नव्हते. दुकानातले पैसे थोडे थोडे जमा करत घरात पाचेक हजार जमा झाले होते. शेजार्‍याकडून घेतलेले दहा हजार आणि माझे पाच हजार घेऊन तो तीन दिवसघरातून गायब झाला. मी वेड्यासारखी दारूची दुकानं शोधत राहिले. एका दारुच्या दुकानावर तो सापडला. त्याला घरी आणलं. त्याच काळात दिशाची तब्येत बिघडली. तिला हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलं. पुन्हा कर्ज घेऊन दुकान चालू करुन दिलं. शेजार्‍याचे पैसे मी कर्ज काढून परत दिले. पुन्हा दारू - जुगाराचं चक्र सुरु झाले.
सतत घ्याव्या लागणार्‍या कर्जाला कंटाळून मी त्याला पैसे देणं बंद केलं. माझं व्हीटीचं काम सुटलं. दिशा दीड वर्षांची झाल्यानंतर मी मुलुंडला आले. पुन्हा म्हाडा कॉलनीत त्याला दुकान घालून दिलं. काही झालं तरी आपण बाबूला आयुष्यात उभं करायचं, त्याला लाईनीवर आणायचं, असा माझा निश्चय. पण मला हे कळत नव्हतं की, त्यालाआयुष्यात उभं करण्याचा नाद मला आयुष्यातून उठवत होता.
पुन्हा हेच चक्र. मी कर्ज काढून त्याला सपोर्ट करणार आणि तो सगळे पैसे दारू जुगारात घालवणार. मी त्यावेळी आईकडे राहत होते. तिथे तो मला मारहाण करत होता. आई अन् भावाने मला आता तू तुझी व्यवस्था कर असं सांगितलं. मी भाड्याने रूम घेतली आणि घरी एंब्रॉयडरीचं काम करु लागले. त्यात पोटापुरते पैसे मिळत. दिशा तीन वर्षांची झाली. तिला शाळेत पाठवायची वेळ झाली. त्याने मुलीला शाळेत घालायला नकार दिला. मी घरोघरी फिरून काम मागितलं.
एका ठिकाणी नोकरी मिळाली. त्या बाईंनी मला शाळेची बॅग, बूट विकत घेऊन दिले, पगारही दिला आणि दिशा शाळेला जाऊ लागली. यानंतर मला बर्‍यापैकी स्वयंपाकाची कामे मिळू लागली. बाबूचं वागणं आणखीच बिघडलं. तो रात्री उशिरा येऊन मला लाथा मारून घराबाहेर काढे. मी दिशाला घेऊन रात्ररात्र एखाद्या दुकानाच्या बाहेर बसत असे. सकाळी एखाद्या मैत्रिणीकडे तोंड धुवून दिशाला घेऊन कामाला घेऊन जाई. तिथूनच तिला शाळेत सोडत असे.
पुढे तो व्हीटीला कामाला जायला लागला. मी त्याला डबा करुन देई. त्याला पैसे मिळू लागले. पण त्याने एक रुपयाही घऱी खर्चाला दिला नाही. लग्नाला आता सात वर्षं झाली होती. मी पुन्हा गरोदर राहिले. त्याला हे कळल्यापासून हे मूल माझं नाही, असं तो बोलू लागला.
नववा महिना चालू असताना एकदा तो दारूच्या नशेत पोटावर पडला. माझ्या पोटात खूप दुखू लागलं. पुढचे पंधरा दिवस माझे खूप हाल झाले. बाळंतपणाला आठ दिवस उरलेले असताना त्याने मला मारहाण करुन मला आणि दिशाला बाहेर काढले. या काळात मी काम करुन पैसे साठवून पुन्हा दागिने केले होते. ते दागिनेही त्याने हिसकावले.
.................
पुढे आठ दिवसांनी १० मे २००५ ला मला मुलगा झाला. त्याचं नाव साई. त्यावेळी, नवर्‍याने माझे दागिने गहाण ठेवून वस्तीला पेढे वाटले.

-  (शब्दांकन: भक्ती चपळगावकर)

Friday 26 October 2018

गुन्हेगारी सोडण्याचा त्यांनी केला संकल्प

बीडचं जिल्हा कारागृह. एरवी कारागृहाच्या आवारात फारसे कोणी जात नाही. पण, बीडमधील काही संवेदनशील तरूण एकत्र आले. आणि त्यांनी कैद्यांमध्ये सुधारणा व्हावी, त्यांनी गुन्हेगारी सोडून द्यावी म्हणून प्रयत्न करायचे ठरवलं. सुरूवात झाली, कीर्तनमहोत्सवाने. श्रावणात सलग सात दिवस हा कीर्तनमहोत्सव केला. यात, सात दिवस मान्यवर कीर्तनकारांनी कीर्तनं सादर करून कैद्यांना उपदेश दिला. कारागृहाच्या आतील भागात शेवटच्या दिवशी ग्रंथदिंडी निघाली. टाळ-मृदंगाचा आणि विठू नामाचा जयघोष करत २८१ बंदी दिंडीत सहभागी झाले. काहींनी तर देहभान विसरून पाऊली, फुगडी असे वेगवेगळे खेळ खेळत मनसोक्त आनंद लुटला. ग्रंथदिंडीची प्रदक्षिणा कारागृहातच पूर्ण करण्यात आली.
दिंडी मिरवणुकीनंतर नाना महाराज यांनी, कारागृहात जन्माला आलेले भगवान श्रीकृष्ण कर्माने श्रेष्ठ कसे बनले, हे त्यांच्या चरित्रातील काही प्रसंगांचे दाखले देत सांगितलं. संतविचारांच्या सानिध्यात भक्तीचा आनंद मिळतो. क्षणिक सुखासाठी आयुष्याचा नाश करू नका. इथून पुढे असं चांगलं काम करा, की आयुष्यात पुन्हा कारागृहाची पायरी चढायला नको, असं सांगितलं. मानवी जीवनाचं मुख्य प्रयोजन काय, हे लक्षात घ्या. भरकटलेलं आयुष्य जगून कुटुंब उध्वस्त करू नका. स्वतः उध्वस्त होऊ नका असं सांगितलं.
यावेळी कैद्यांनी चांगलं वागण्याचा संकल्प करत, गुन्हेगारी सोडण्याची शपथ घेतली. कीर्तनमहोत्सवातून मन परिवर्तन झाल्याची पावती देत २५ कैद्यांनी नाना महाराज नेकनूरकर यांच्या हस्ते तुळशीची माळ घालून घेत, गुन्हेगारी सोडून देण्याचा संकल्प केला. तसंच व्यसन करणार नाही, कोणाला नाहक त्रास देणार नाही, परोपकार करू ही ग्वाही दिली. हे कीर्तनमहोत्सवाचे फलितच.
कीर्तनानंतर उपस्थित मान्यवर मंडळीच्या हस्ते गोपाळकाल्याची दहीहंडी फोडण्यात आली. तो प्रसाद बंदी बांधवांना वाटप करण्यात आला.
कीर्तनकार सुरेश महाराज जाधव म्हणाले की, “सुधारणा आणि पुनर्वसन हे कारागृहाचं ब्रीद आहे. ‘जे खंळांची व्यंकटी सांडो’ या पसायदानातील उल्लेखाप्रमाणे दुष्ट प्रवृत्तीचा नाश होऊन कारागृहातील कैद्यात सुधारणा व्हावी, समाजातील गुन्हेगारी थांबावी यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न होता.” .
कारागृह अधिक्षक महादेव पवार म्हणाले, “कारागृहात कीर्तनमहोत्सव झाल्यानंतर वातावरण बदललं आहे. भजन- कीर्तनाचे कार्यक्रम कारागृहात घ्यावेत, अशी मागणी आता कैदी करत आहेत. इथलं वातावरणही शांत आहे. इथून बाहेर पडल्यानंतर आम्ही पुन्हा गुन्हेगारीकडे वळणार नाही, असा संकल्प कैद्यांनी केला असून जवळपास सर्व कैद्यांच्या वागण्या-बोलण्यात सुधारणा झालेली आहे.”
सुरेश महाराज जाधव, कीर्तनकार 
- दिनेश लिंबेकर.

वंदनाची गोष्ट: भाग २ -दागिन्यांचा डबा गायब झाला होता. त्यात माझे झुमके, फुलं, रिंगा, गळ्यातलं होतं.


ज्याच्यावर भरोसा करुन आपण घरदार सोडून आलो त्या माणसाची संगत अशी खराब आहे, हे पाहून मला फार राग आला. त्याला मी तावातावाने बोलले, 'असे कसे तुझे मित्र? तू तरी नीट रहा. अशा लोकांसोबत राहू नकोस'. बाबूने हो हो केले आणि मला काही दिवसांनी माझ्या घरी आणून सोडले. लोक काहीही बोलले, तरी धाकटी बहीण घरी परतली म्हणून माझ्या मोठ्या भावाला खूप आनंद झाला. त्याचा खूप जीव माझ्यावर. मी लगेचच परत येतो, असं सांगून बाबू नाहिसा झाला. त्याला लग्न नको होतं, मला फक्त फितवायचं होतं, हे माझ्या लक्षात आलं. पण मी हार मानायला तयार नव्हते. भाऊ म्हणाला, 'चांगला नाही तो, कशाला त्याच्याबरोबर राहायचंय तुला? तू इथेच राहा.' पण मी वेडीपिशी झाले होते.
आता वाटतं, नशिबानं संधी दिली होती, ती मी घालवली. नसते त्याच्या मागे लागले, तर आज आयुष्य फार वेगळं असतं.
एकदा एकानं सांगितलं, बाबू मुलूंड टोलला दिसला. कामधाम सोडून तिथे गेले. तो दिसला. त्याला पकडून नातेवाईकांकडे घेऊन आले.
मी बाबू पुजारीबरोबर २४ जून १९९६ रोजी कोर्ट मॅरेज केलं. आमचा प्रेमविवाह होता. मी घरकाम करत होते, त्यांच्याकडून कर्ज काढून सायन कोळीवाड्यात जागा विकत घेतली. बावीस हजार कर्ज काढलं, दहा हजार रुपये मोकळ्या जागेसाठी दिले. उरलेले बारा हजार नवर्‍याला घर बांधण्यासाठी दिले. त्याने चार हजार त्यावर खर्च केले. उरलेले पैसे हरवले, असं खोटं सांगितलं.
तिथे राहत असताना मी व्हीटीला काम करायला जात असे. त्याच्यासाठी त्या जागेत दुकान काढण्याचा माझा विचार होता. त्यासाठी मी पैसे जमा करत होते. मी कामावर गेल्यावर, बाबू तिथे मित्रांना घेऊन जुगार खेळत बसे. मला याची कल्पना नव्हती. दुकानासाठी मी तीन हजार रुपये घरात साठवले होते. एकदा, ते पैसे घ्यायला मी गेले असताना, त्यात फक्त सहाशे रुपये शिल्लक राहिलेले बघून मला धक्का बसला. नवर्‍याला जाब विचारायला गेल्यावर, त्याने उलट हात उगारला. मला तू विचारणारी कोण,असं म्हणाला. त्यानंतर मी पैसे घरात साठवणं बंद केलं आणि जिथे कामाला होते, तिथे पैसे साठवायला सुरूवात केली.
१९९७ साली मी गरोदर राहिले. याच काळात एक दिवस त्याने मला भीती दाखवली की, तीन हजार रुपये दिले नाहीस, तर माझा भाऊ मला गावी घेऊन जाईल, तू मला तीन हजार रुपये दे. मी घाबरले, माझा त्याच्यावर विश्वास बसला. मी त्याला पुन्हा दागिने गहाण ठेऊन त्याला पैसे दिले. माझे सगळे दागिने आता गहाण ठेवलेले होते. मी पुन्हा कामाच्या पगारातून थोडे थोडे पैसे साठवले, पैसे जमवले आणि ते दागिने सोडवले. माझ्याकडून घेतलेले पैसे त्याने कुठे उडवले, हे माहीत नाही.
दागिन्यांचा डबा घरात होता. तोही गायब झाला. त्या डब्यात माझे झुमके, फुलं, रिंगा, गळ्यातलं होतं. त्याला मी जाब विचारला, तर तो उलट तूच नीट ठेवलं नसशील, असं मला म्हणाला. मी म्हणाले, मी कामावर जाते, घरातले दागिने असे कसे गेले, असं पुन्हा म्हणाल्यावर, मी इकडे तिकडे गेलो होतो तेव्हा गेले असतील, असं काहीबाही म्हणाला. तरीही मी कामावर साठवलेले पैसे आणि कामावर घेतलेले कर्ज याच्या मदतीने त्याला किराणा दुकान घालून दिलं. त्यावेळी मला सहावा महिना सुरू होता.
तो सुरूवातीला दुकान चांगलं बघत असे. महिन्याला दीडेक हजार कमाई होत असे. माल आणायला जातो, असं सांगून रात्री उशिरा जाई. माल न आणता रात्री बेरात्री परत यायचा. परत आल्यावर पैसे गायब झालेले असायचे. त्याच्या एका मित्राने, माझी दया येऊन मला एक दिवस सांगितलं, की तो लेडीज बारमध्ये आणि दारूच्या गुत्त्यावर जातो, जुगार खेळतो आणि पैसे उडवतो. हे चालूच राहिलं.
.........
मी गरोदरपणातही नऊ महिने काम करत होते. 

 (शब्दांकन: भक्ती चपळगावकर)

Thursday 25 October 2018

‘ड्रॅगन’मुळे फुलली शेती

ड्रॅगन फ्रुट. थायलंड, व्हिएतनाम या देशातील हे फळ. आपल्या देशातील काटेरी निवडुंगा्सारखं दिसणारं. या फळाचं आरोग्यविषयक महत्त्व अधोरेखित झालं. आणि त्याची मागणी प्रचंड वाढत गेली. पौष्टिक मानलं जाणारं, अनेक आजारांवर गुणकारी, कुठल्याही खता-औषधांशिवाय वेगानं वाढणारं, कमी पाण्यावर येणारं हे फळ.
पुण्या-मुंबईत ड्रॅगन फ्रुटला खूप मागणी आहे. सध्या त्याचा दर तब्बल ४०० ते ५०० रूपये किलो आहे. हे ड्रॅगन फळ मराठवाड्यातील उस्मानाबादसारख्या मागास भागात प्रथमच बहरून आलं आहे. जागजी या उस्मानाबाद येथील गावात राम आणि नितीन सावंत भावंडांनी पारंपरिक शेतीला फाटा देत ३२ गुंठ्यावर ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. साधारण वर्षभरापूर्वी लागवड केलेल्या या झाडाला आठ महिन्यातच फळ
आलं. विशेष म्हणजे पूर्णपणे जैविक पद्धतीने या फळाची जोपासना करण्यात आली आहे. याविषयी राम सावंत म्हणाले, “पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात २०-२५ वर्षापासून ड्रॅगन फ्रुटची शेती केली जात आहे. त्यात लोकांना आलेलं यश तपासून आम्हीही शेतात ड्रॅगन फ्रुटची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्यावर्षी सांगली जिल्ह्यातून १६०० रोपं आणून लागवड केली. झाडे म्हणजे पानांना पानांची जोड असते. त्यामुळे दोन पानांमध्ये आधार द्यावा लागतो. त्यासाठी सिमेंटचे ४०० खांब उभारले. पिकासाठी ठिबक सिंचनाचा उपयोग केला. लागवडीसह एकूण दीड लाख रूपये खर्च आला. एरव्ही या फळाला १५० ते २०० रूपये प्रति किलो दर मिळतो. मात्र, सध्या स्वाईन फ्ल्यू आणि डेंग्यूच्या साथीमुळे मुंबई, पुणे, नागपूर या महानगरात ड्रॅगन फ्रुटची मागणी वाढली असून, ४०० ते ५०० रूपये प्रती किलो दराने व्यापाऱ्यांकडून मागणी येत आहे.”
हे फळ दोन प्रकारामध्ये आहे. काटेरी निवडुंगाशी साधर्म्य सांगणारं ड्रॅगन फ्रुट नैसर्गिक वातावरणात वाढतं. त्याला कुठल्याही किटकनाशक औषधांची किंवा खतांची गरज भासत नाही. थायलंडचे फळ लाल तर व्हिएतनामचं फळ पांढरं आहे. दोन्हीची चव सारखीच आहे. डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू, हिवताप, मधूमेह आदी आजारांवर गुणकारी आहेत, असं मानलं जातं. मात्र, त्याला वैद्यकीय दृष्ट्या पुष्टी मिळालेली नाही. सुमारे ४२ अंश सेल्सिअस तापमानातही फळ येऊ शकते, असं सावंत बंधू सांगतात.
लागवडीनंतर वर्षात फळ येण्याची शक्यता असते. मात्र, आठ महिन्यातच फळ आल्याने सावंत बंधुंचा मोठा फायदा झाला. चार महिन्यात त्यांनी ५ वेळा फळांची तोडणी केली. साधारण साडे चार ते पाच टन उत्पादन निघालं. त्यातून ५ ते ६ लाख रुपये मिळाल्याचा दावा ते करतात. फळाचं सरासरी वजन ५०० ते ८०० ग्रॅम आहे. झाडांचं आयुर्मान २५ वर्षे आहे. विशेष म्हणजे, सावंत यांनी ड्रॅगन फ्रुटच्या मधोमध सफरचंदाच्या झाडांची लागवड केली आहे. पुढच्या वर्षापर्यंत त्यातूनही उत्पादन मिळेल, असा त्यांना विश्वास वाटतो. दुष्काळी पट्ट्यात सावंत यांनी केलेला प्रयोग प्रेरणादायी आहे. त्यांच्या वेगळ्या प्रयत्नांना यश मिळालं आहे. वेगळी वाट धरली तरच शेतीत राम आहे, असं म्हणायला वाव आहे.
- चंद्रसेन देशमुख.

वंदनाची गोष्ट : भाग १

का ताई? नाव का नाही लिहिणार माझं? लिहा की - जरुर लिहा - लोकांनाही कळू दे, वंदनानं आयुष्यात कसा दु:खाचा डोंगर उचलला ते. मला भीती नाही. जन्मल्यापासून झगडतीए, आता पुढे काय होणार माहीत नाही. पण मला आजाद व्हायचंय. त्यासाठीच माझी लढाई. 
ताई, लहानपणापासूनच मी अशीच जोरजोरात हसते. मला हळूहळू हसता येतच नाही. माझी लेक दिशा मला म्हणतेसुध्दा, आई तू काय लहान आहेस का? किती मोठ्याने हसतेस! पण तेवढीच गोष्ट माझ्यात राह्यलीय. माझं हसणं. माझी दिशा कशी हुशार आहे, तशीच माझ्या लहानपणी मी हुशार होते. शाळेत जायची मला हौस. पण म्हणतात ना, कधीकधी जवळची माणसंच तुमची दुश्मन असतात. तसंच झालं. बारा तेरा वर्षांची असेन मी. माझी मोठी बहीण तिच्या मुलाबाळांना घेऊन आमच्याकडे राहत होती. माझी सकाळची शाळा. मी रात्री दप्तर भरून ठेवायची, माझी बहीण रात्रीतून ते गायब करायची. माझं लहान वय. मला कळायचं नाही, मी दप्तर शोधत बसायची पण ते मिळायचं नाही, माझी शाळा बुडायची. मग बहीण मला ढिगभर कपडे धुवायला द्यायची. पाण्याचा नळ घरापासून लांब. तिथवर कपड्याचा ढीग उचलून न्यायचा, कपडे धुवायचे आणि घरी आणून वाळत घालायचे. धुणी-भांडी करायची. तिच्या लेकरांना भरवायचं. माझं आयुष्य म्हणजे काम काम काम. शाळा सुटली. मी आयुष्याला जाम वैतागलेले. अशात मला बाबू भेटला. मी सोळाएक वर्षांची असेन. ताई, खरं सांगतेय, या घरच्या कामापासून सुटका होईल, या आशेनेच मी त्याचा हात धरून पळून गेले.
यानं मला दिव्याला नेलं. तिकडं आम्ही दोघं एक झोपडी बांधून राहू लागलो. जे मिळत होतं, त्यात सुख मानून राह्यलो. मी वयानं लहान मुलगीच होते की. पण एक दिवस असा प्रसंग झाला, तो मी काही विसरले नाही. बाबूचे दोन थोराड मित्र एका तेरा-चौदा वर्षांच्या मुलीला घेऊन आले. मला वाटलं, असलं एखाद्याची मुलगी. पण बाबू चपापला. मला म्हणाला, तू त्यांना इथून हाकलून लाव. त्या पोरीचं काही खरं दिसत नाही. त्याचं बोलणं ऐकून माझ्या जिवाचा थरकाप झाला. लक्षात आलं, तिला खराब करायला त्या दोघांनी तिला आणलं होतं. कचरा वेचणारी मुलगी होती. त्यातल्या एकानी तिला प्रेमाच्या थापा देऊन लग्नाचा वायदा केला होता. आपलं लग्न होणार आहे, या विचारानं बिचारी खुश होती. मी तिला आंधोळीचं पाणी काढून दिलं, माझे कपडे दिले. स्वैपाक केला. बाबू आणि ते दोघं घरात आले. त्यातल्या एकाला तीन मुली आहेत, हे मला माहीत होतं. त्याला ओरडून म्हणाले, का हो, तुमच्या मुलीबरोबर असं कुणी वागलं, तर चालंल का तुमाला? तो गप्प बसला पण बधला नाही. त्या पोरीला नंतर कुठे तरी धेऊन जायचा विचार असेल त्यांचा. जेवण झाल्यावर मला म्हणाले, चटई द्या आम्ही तिघं दुसरीकडं झोपू. मी म्हटलं, खबरदार. मी पोरीच्या शेजारी झोपन. तुम्ही पलीकडे पसरा. रात्रभर लाईट सुरू ठेवला. काळजातली धडधड कमी होत नव्हती. ती तेरा वर्षांची, मी सोळा-सतरा. पण तिला सोडलं नाही. पहाटे तिला हळूच उठवलं. बाकीचे झोपले होते. तिला घेऊन रेल्वे स्टेशन गाठलं. ती घाटकोपरला राहत होती. तिचं तिकिट काढलं आणि गाडीत बसवलं. घरी आल्यावर, ते दोघं विचारू लागले, ती कुठं गेली. मी म्हटलं, पाठवलं मी घरी तिला. आता तुम्ही निघायचं.
........
बाबूचे मित्र असे, हे लक्षात आल्यावर मी त्याच्याशी भांडभांड भांडले. एका पोरीच्या आयुष्यात नासाडी करायला निघालेले तुझे मित्र असे कसे, म्हणून त्याच्यावर खूप ओरडले. पण माझ्या आयुष्यात पुढं काय वाढून ठेवलंय याची कल्पना आली नाही मला. 
शब्दांकन: भक्ती चपळगावकर.

… आणि गुंता अलगद सुटत गेला

“तुम्ही बसने जात आहात आणि अचानक शेजारी बसलेल्या व्यक्तीने तुमच्या मांडीवर हात ठेवला”, काय कराल?...
“तुला, समोरची व्यक्ती आवडते... आवडते की तिच्या विषयी आकर्षण आहे...”
“समोरच्याला ‘लाईन’ देणं म्हणजे काय?” …
असे प्रश्न आपल्याला कुणी विचारले तर आपण त्या व्यक्तीकडे रागाने बघत सरळ निघून जाऊ. पण नाशिक येथील रचना विद्याालयाच्या सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी मात्र आरोग्य भान चळवळीच्या वतीने भरविण्यात आलेल्या ‘अभिरूप न्यायालयात’ या सर्व प्रश्नांची अगदी मोकळेपणी उत्तरं दिली. 
या संवादातून मुलांमध्ये लैंगिक शिक्षण, आरोग्य तसेच स्व-विषयीचे भान यामध्ये झालेला गुंता अलगद सुटत केला. याला निमित्त ठरले ते पुणे येथील डॉ. मोहन देस यांच्या ‘आरोग्य भान’ चळवळीच्या वतीने आयोजित ‘दुसरे दशक’ कार्यक्रमाचे. वयात येणाऱ्या मुलांना शरीरात आणि मनात होणारे बदल समजावून सांगणं हे नेहमीच कसोटीच काम असतं. पालक आणि शिक्षकांपुढे हा नेहमीच प्रश्न असतो की, मुलांना मासिक पाळी, प्रजनन, गर्भधारणा, बाळाचा जन्म, प्रेम, आकर्षण, बाल लैंगिक शोषण या गोष्टी कशा समजावून सांगायच्या. नुसता ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ सांगून भागत नाही. मुलांच्या हातात गॅजेट्स आहेत. या आधुनिक गुरूला हातात घेत ही मंडळी वेगळ्याच विश्वाात रममाण होतात. अशावेळी 'लैंगिक संवाद' ही सगळ्यात कठीण गोष्ट असते. ही गुंतागुंत सोडविण्यासाठी आरोग्यभानने पुढाकार घेत विद्यार्थ्यांना अभिरूप न्यायालय आणि कार्यशाळेच्या माध्यमातून बोलते केले. 
नाशिक येथील ‘रचना विद्यालय’ यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्यानिमित्त शाळेच्या माजी विद्यार्थी संस्थेचे सहकार्य घेऊन सन १९९३ मधील दहावीच्या बॅचने शाळेला ‘गुरूदक्षिणा’ देण्याचे ठरवले. त्यानुसार सर्वांनी एकत्र येत शाळेतील किशोरवयीन मुलामुलींसाठी संवादातून लैंगिक शिक्षण द्यायचं ठरवलं. 
‘रचना विद्याालय माजी विद्यार्थी संस्थे’च्या सहकार्याने आणि १९९३ साली दहावी झालेल्या बॅचने यासाठी पुढाकार घेतला. शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाविषयी फारशी माहिती नसल्याने किशोरवयीन मुलं-मुली कुतुहलाने तर कधी अजाणतेपणी वेगळ्याच अडचणीत सापडतात. त्यांना योग्य माहिती योग्य व्यक्तीकडून मिळावी यासाठी हा उपक्रम घेण्यात येत असल्याचे माजी विद्याार्थी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. त्याची सुरूवात नुकतीच ‘दुसरे दशक’ शिबिराच्या निमित्ताने झाली. दुसरे दशक म्हणजे ११ ते २० वयोगटातील मुलांशी संवाद. या अंतर्गत वयात येतांना होणारे शारीरिक बदल, आकर्षण म्हणजे काय, शरीर संबंध, समलैंगिकता, ब्रेकअप नंतर काय करायचं अशा विविध विषयावर प्रशिक्षण देण्यात आलं. या विषयांना न्याय देता यावा पण मुलांनीही मनमोकळेपणाने यात सहभागी व्हावे यासाठी कार्यशाळेची ठराविक चौकट मोडली गेली. 
डॉ. देस यांनी कार्यशाळेचे औपचारिक उद्घाटन टाळत मुलांना एखादा आकृतीबंध तयार करायला सांगितलं. मुलांनीही एकत्र येत एक आकृतीबंध तयार केला. मुलांशी संवाद साधतांना आपलं नाव आणि आपण निसर्गातील कुठल्या गोष्टीशी साधर्म्य ठेवतो ही ओळख देण्यास सांगितलं. मुलांनाही हे काहीतरी वेगळं आहे, असं जाणवलं. आणि त्यांची कळी नकळत खुलत गेली. दोन ते चार मिनिटांमध्ये मासिक पाळी म्हणजे काय, आपण लहान असताना आणि आता पालकांच्या वर्तनात झालेला बदल, जबाबदारी घेणे म्हणजे काय अशा वेगवेगळ्या विषयांवर छोटी नाटकं बसविण्यास सांगण्यात आली. यातून आनंद, दुःख, ताण, शरीरात होणारे बदल म्हणजे काय अशा विषयांवर मुलं बोलती झाली. या सर्व विषयांशी संबंधित प्रश्न अभिरूप न्यायालयात विचारले गेले. कार्यशाळेचा विशेष म्हणजे त्याचा शेवटचा भाग म्हणायला हवा. कारण या समारोपात मुलांनीच पालकसभा घेतली. आणि कार्यशाळेत आपण नेमके काय शिकलो याची माहिती त्यांच्याच शब्दात पालकांना दिली.
- प्राची उन्मेष.

Tuesday 23 October 2018

इतिहासाचं पुस्तक आणि नवा व्यापार, सापशिडीचा खेळ

 बीडमधल्या श्रद्धा आणि श्रुती गंगाधर मुंडे. गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये आठवीत शिकणाऱ्या दोघी बहिणी. त्यांनी एनसीईआरटीचा 7वी आणि 8 वीचा इतिहासाचा अभ्यासक्रम खेळात रूपांतरित केला आहे. सापशिडी आणि नवा व्यापार या खेळांच्या धर्तीवर त्यांनी इतिहासाचं पुस्तक बोर्डगेममध्ये बदललं आहे. यामुळे इतिहासातल्या महत्त्वाच्या घटना, विशेषतः सनावळ्या लक्षात ठेवणं सोपं जात आहे. उदाहरणार्थ 1857 चा उठाव. या धडयातील प्रत्येक घटना, सनावळ्यांसह त्यांनी सापशिडीच्या खेळाप्रमाणे चौकटीत मांडल्या आहेत. सापशिडीप्रमाणेच फासे पाडून सोंगटी हलवायची. सोंगटी ज्या घरात जाईल त्या घरात कुठली घटना लिहिलीय ते खेळणाऱ्यानं सांगायचं, ती लक्षात ठेवायची आणि पुढच्या डावालाही सांगायची. अशा प्रकारे 7 वीच्या 8 धड्यांचं आणि 8वीच्या 6 धड्यांचं रूपांतर त्यांनी खेळात केलं आहे.
मुलांमधल्या संशोधक वृत्तीला वाव देण्यासाठी गेल्या वर्षी बियाणी डिजिटल स्मार्ट कोचिंग या संस्थेनं विज्ञान प्रदर्शन आयोजित केलं होतं. बीडमधल्या सर्व शाळांमधले चौथी ते 10 वीचे सुमारे 600 विद्यार्थी यात सहभागी झाले होते. श्रद्धा आणि श्रुती यांनी त्यात भाग घेतला होता. हसतखेळत शिक्षण या संकल्पनेवर संस्थेचे प्रवीण बियाणी, पूजा कदम आणि माधुरी कासट यांनी मुलींना मार्गदर्शन केलं. त्यांच्या शोधाचं जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्यासह अनेकांनी कौतुक केलं आहे.
या खेळाचं पेटंट मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं श्रद्धा आणि श्रुती सांगतात.
श्रद्धा आणि श्रुती जात्याच हुशार असून त्यांनी अनेक बक्षिसं मिळवली आहेत.
-बीड

Sunday 21 October 2018

तेरावा आणि गंगापूजनाचा खर्च टाळून शिक्षणासाठी मुलींच्या पालकांना केलं प्रोत्साहित

जालना जिल्हा. अंबड तालुका. शहागड गाव. इथलं वलेकर कुटुंब. कुटुंबातल्या आईचं, उषा शिवाजीराव वलेकर यांचं गेल्या महिन्यात निधन झालं. उषाताईंना तीन मुलं. मोठा मुलगा शांताराम स्पर्धापरिक्षेची तयारी करतोय. मधला धनंजय रशियातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून आलेला तर धाकटया अमोलनं औषधनिर्माण शाखेचा अभ्यासक्रम केलाय. आईच्या मृत्यूचं दुःख होतंच. आईच्या स्मृतिसाठी समाजोपयोगी असं काही करायचं होतं.
तीन मुलांनी मिळून तसं ठरवलं. रूढीपरंपरा टाळून वेगळं काही करायचं ठरवलं. त्यांनी दिवंगत आईचं तेरावं आणि गंगापूजन याचा खर्च टाळला. गावातल्या 3 ते 5 वर्ष वयोगटातल्या सर्वधर्मीय 24 मुली निवडल्या. आणि प्रत्येक मुलीच्या नावे सुकन्या समृद्धी योजनेत प्रत्येकी 1 हजार रुपये भरले. पालकांना शिक्षणाचं महत्त्व सांगितलं. मुलींच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी नियमित बचत करण्यासाठी पालकांना प्रोत्साहित केलं.
शासनाच्या असंख्य योजना येतात परंतु त्या गरजूंपर्यंत पोहचत नाहीत, हे लक्षात घेऊन आम्ही पैशाचा सदुपयोग करण्याचं ठरवलं,असं वलेकर बंधू सांगतात.
वलेकर कुटुंबीयांचं हे समाजभान आणि त्याला अनुसरून त्यांनी आईच्या मृत्यूनंतर केलेली कृती अनुकरणीय आहे, नाही का?
-अनंत साळी.

बालविवाह थांबवण्यासाठी गावोगावी घेतले मेळावे


साधारण 1980-82 च्या काळात आम्ही स्त्री आधार केद्रातर्फे वेगवेगळ्या गावात, झोपडपट्टीत महिलांच्या सभा घेतल्या. महिलांमध्ये जागृती करण्याचा आमचा प्रयत्न चालू होता. रमेश शेलार गुरूजी स्त्री आधार केंद्राने बालविवाह थांबवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची गोष्ट सांगत होते. 
पुण्याजवळंच फुरसुंगी गाव. या गावातही बैठक झाली. सरपंच बाकी गावातील लोक असे बरेचजण यावेळी उपस्थित होते. 18 वर्षांच्या आत मुलीचं आणि 21 वर्षांच्या आत मुलाचं लग्न करायचं नाही. असा कायदाही असल्याचं आम्ही लोकांना सांगत होते. असं का तर 18 वर्षांच्या आत मुलीचं मन, शरीर लग्नासाठी तयार झालेलं नसतं. त्यामुळे पुढे मग अल्पवयीन मातेचा, बाळाचा मृत्यू अशा घटनांना सामोरं जावं लागतं. यासाठीच मुलीला किमान 18 वर्ष पूर्ण करू द्यावीत. असं आम्ही सांगत होतो. हे सांगून आम्ही वस्तीतून बाहेर पडलो. त्याच वस्तीत दोन बहिणी होत्या. त्यातल्या एकीचं 16 व्या वर्षीचं लग्न ठरलं. हे आमच्यापर्यंतही आलं. पण, तोपर्यंत नुकत्याच झालेल्या बैठकीचा फायदा झाला. जिचं लग्न ठरलं होतं तिनंच मुलाकडच्यांना सांगितलं, “माझं वय 16 वर्ष आहे आणि आई-वडील माझ्या इच्छेविरोधात माझं हे लग्न करत आहेत. आणि अजून दोन वर्ष मला लग्न करायचं नाही.” अशा तऱ्हेने हे लग्न थांबलं. यावेळी मुलगीच बोलायला पुढं आली हे पाहून स्त्री आधार केंद्राने मग वेगवेगळ्या शाळा, महाविद्यालयात असे बालिका जागृती मेळावे घेतले.
जन्माला आल्यानंतर समान हक्क आहेत, आहाराविहाराचं स्वातंत्र्य आहे आणि 18 व्या वर्षाच्या आत तुमचं कुणी लग्न ठरवलं, फसवून करून द्यायचं ठरवलं तर त्याला तुम्ही विरोध करू शकता हा तुमचा नैतिक अधिकार आहे असंही या जागृती मेळाव्यात सांगितलं. असे जवळपास 130 मेळावे आम्ही घेतल्याचं शेलार गुरूजींनी सांगितलं.
2016 सालची ही गोष्ट. आळंदीमध्ये बरेच विवाह होतात. असाच एक अल्पवयीन मुलीचा विवाह तिथं होत असल्याचं आम्हांला कळलं. तिथं सविता लांडगे म्हणून केंद्राच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांनी आणि पिंपळेगुरवच्या इंदू ढाले या कार्यकर्त्यांनी आम्हांला फोन केला. आमच्या कार्यकर्त्या पोलीस ठाण्यात गेल्या. तिथं विवाहाची माहिती दिली. अगदी विवाहाच्या पत्रिकाही त्यांनी मिळवल्या होत्या. त्याही दाखवल्या. मग पोलीस, कार्यकर्ते असे सर्वचजण त्या कार्यालयात गेले. तिथं त्या लग्नाचं बुकींग केलेलं त्यांनी बघितलं. लगोलग त्यांनी मुलीच्या आणि मुलाच्या पालकांना कळवलं. आई-वडील आणि मुलाकडचे लोक यांच्याशी बोलून, त्यांना समजावून सांगितल्यानं हा विवाह थांबला.
उरळीकांचनची अशीच एक घटना. थेऊरला ऊस कारखाना. ऊसतोडणी कामगाराची सविता ही मुलगी. 13 व्या वर्षी वयात आली आणि लगेचच तिचं ठरवलं गेलं. तिथल्या स्त्री आधार केंद्राच्या कार्यकर्त्यांनीच ही बातमी आणलेली. प्रतिभाताई कांचन या तेव्हा तिथल्या दूध डेअरीच्या प्रमुख होत्या. शेलार गुरूजी सांगतात, या ताईंशी फोनवर बोलणं केलं. त्यांना या विवाहाची माहिती दिली.” मग मुलीच्या पालकांना ग्रामपंचायतीत बोलावलं गेलं. मुलीची आई म्हणाली, “मुलगी सातवी शिकली. बास झालं. आम्हांला काही तिला पुढं शिकवायचं नाही. आमची तिला शिकवण्याइतकी परिस्थितीही नाही.” मुलीनंही पुढं शिकायची इच्छा व्यक्त केली. मग ते लग्न तिथंच थांबलं आणि संस्थेने तिच्या राहण्यासाठी वसतीगृहाची व्यवस्था केली आणि शिक्षणाचीही व्यवस्था केली. विशेष म्हणजे या मुलीचं तेव्हा लग्न थांबलं आणि तिला शिकायला मिळालं. नंतर गावी परतल्यावरही ती काकांच्या घरी राहिली. शिक्षण पूर्ण करूनच विसाव्या वर्षी तिचं लग्न झालं.
बालविवाह थांबवल्याच्या अगदी 1982-85 पासूनच्या अशा अनेक घटना सांगूनही आजही बालविवाह सुरू असल्याचं शेलार गुरूजी नमूद करतात. आणि आजही असे विवाह थांबावेत म्हणून आमचे प्रयत्न सुरू असल्याचं ते सांगतात.
वाचकहो, तुम्ही या मालिकेतल्या स्टोरीज वाचून, अधिकाधिक शेअर करून आमच्या या मोहिमेत सहभागी व्हावं, हेच कळकळीचं सांगणं. कारण, नकोच करूया लगीनघाई! 

Friday 19 October 2018

पालकांकडून लिहून घेतलं की, गजाला १८ वर्षांची होईपर्यंत तिचं लग्न करणार नाही

 

भांडुप उपनगरातली एक शाळा. दहावीचा वर्ग. अवखळ, वयात आलेल्या मुली आणि त्यांचा एकच गलका. आज गजाला मात्र कोपऱ्यातल्या बाकावर मान खाली घालून गप्प बसली होती. वर्गात सर आले तरी ती उभी राहिली नाही. हे पाहून मुली तिची थट्टा करू लागल्या. गजाला मात्र उदास होती. आता मात्र तिच्या मैत्रिणीही गप्प झाल्या. काहीतरी गंभीर बाब असावी हे सरांच्याही ध्यानात आलं.
शाळा सुटल्यावर गजाला टीचर्स रूमच्या बाहेर सरांना भेटली. तिचं शाळेत येणं बंद होणार होतं . तिची सावत्र आई तिचं लग्न लावून देत होती पण गजालाला लग्न न करता पुढे शिकायचं होतं. सरांनाही ऐकून धक्का बसला. तशी ती अभ्यासातही हुशार होती. तिची हुशारी वाया जाणार म्हणून त्यांनाही वाईट वाटलं. गजाला सरांना विनवणी करत होती की तुम्ही घरी येऊन अम्मीला समजवा की मला पुढे शिकायचं आहे. सरांनी तात्पुरता दिलासा देऊन तिला घरी जायला सांगितलं.
दुसऱ्या दिवशी सर गजालाच्या घरी गेले. गजालाच्या अम्मीला समजावलं. पण ती ऐकायला तयारच नव्हती. गजालाची जबाबदारी घेणार नसल्याचं, तिला शिक्षण देण्यास असमर्थ असल्याचं स्पष्टपणे सांगितलं. तिच्या शिक्षणाची जबाबदारी शाळा घेईल, असं सांगूनही अम्मी तिच्या निर्णयावर ठाम होती. सर निराश होऊन परतले.
त्यानंतर गजाला शाळेत आली नाही. वर्गातील मुलींनी गजलाचं लग्न ठरल्याची बातमी आणली. सर अस्वस्थ झाले त्यांना मार्ग सुचत नव्हता. त्यांनी परिसरातील जनवादी महिला संघटनेकडे संपर्क साधला. एका 15 वर्षाच्या मुलीचं लग्न 37 वयाच्या पुरुषाबरोबर लावलं जात असल्याचं संघटनेच्या सुगंधी फ्रांसिस यांना कळलं. त्या ताबडतोब गजालाच्या घरी गेल्या. तिथे त्यांना असं काही होणार नाही याची खात्री दिली गेली.
तरीही, सुगंधीताई त्यांच्यावर लक्ष ठेवून होत्या. एके दिवशी गजालाच्या घरात पाहुणे दिसू लागले, गडबड जाणवू लागली. सुगंधीताईंना खबर लागली. कुसुम आणि विद्या या कार्यकर्त्यांसह त्या गजालाच्या घरी पोचल्या. लग्न लावण्यासाठी काजीदेखील हजर होता. हा बालविवाह असून कायद्यानुसार गुन्हा असल्याचं त्यांनी सर्वांसमक्ष पुन्हा गजालाच्या कुटुंबाला बजावलं. तिथे आलेल्या पाहुण्यांना मुलगी फक्त 15 वर्षाची आहे, याची कल्पना नव्हती. तेही विरोधात उभे राहिले. गजाला, तिचे पालक, लग्नाचं वऱ्हाड यांना पोलीसठाण्यात नेलं. तिथे पालकांकडून लिहून घेतलं की, 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत गजालाचं लग्न लावण्यात येणार नाही. या अटीवर मुलीच्या पालकांवर केस दाखल झाली नाही. समजुतीने प्रश्न सोडवला.
हे गेल्या वर्षी घडलं. आज, गजालाचं शिक्षण सुरळीत सुरू आहे. सुगंधीताई सांगतात, ''तिची अम्मी नाराज दिसते. पण ती संघटनेला वचकून आहे.''
वाचकहो, तुम्ही या मालिकेतल्या स्टोरीज वाचून, अधिकाधिक शेअर करून आमच्या या मोहिमेत सहभागी व्हावं, हेच कळकळीचं सांगणं. कारण, नकोच करूया लगीनघाई!

- लता परब.

Wednesday 17 October 2018

नगरच्या 'दुर्गे'ची सजगता, रोखले १७३ बालविवाह


"ताई, मी चार वर्षांची होते. तेव्हा, चाळीशीत असलेल्या व्यक्तीसोबत माझं लग्न लावून दिलं आहे. आता तो पंचाना "माझी बायको द्या'' म्हणून सांगत आहे. पंचही मला त्याच्याकडे पाठवण्याचा दुराग्रह करत आहेत. विरोध केला, तर आम्हा कुटुंबियांना वाळीत टाकलं जातंय.'' कळती झालेली ती आशा आपली व्यथा अॅड.रंजना पगार-गवांदेंना सांगत होती. विषय गंभीर. मग काय, रंजना यांनी यंत्रणेच्या साथीने जातपंचांशी संघर्ष करत शिताफीने आशा अन् तिच्या कुटुंबियांची सुटका केली. अशा पद्धतीने आतापर्यंत तब्बल १७३ बालविवाह रोखण्याची कामगिरी रंजना गवांदेंनी पार पाडली.रंजना पगार-गवांदे संगमनेर इथं वकिली करतात. त्यांचा मूळ पिंड समाजसेवेचाचं. गेल्या ३ दशकांपासून त्या सामाजिक कार्यात असून अडल्यानडल्यांसाठी आधार आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम, भटक्‍या-विमुक्त समाजाचे प्रश्न मांडणं, सोडवणं आणि जातपंचायतीच्या जाचातून कुटुंबांची सुटका करणं, ही त्यांची विशेष कामं. रंजनाताई सांगत होत्या, "भटक्‍या समाजात मुलींचे वय आठ-नऊ वर्ष झालं की, लग्न लावण्याची परंपरा. काही मुला-मुलींची तर रांगत्या वयातच लग्नं लावली जातात. भटक्‍या समाजात बहुतांशी बालविवाह होतात. शिवाय, हा समाज कायद्यापेक्षा जातपंचायतीला अधिक महत्व देतो. लग्न जमवणं, मोडणं, दंड करणं आदी निर्णय पंच घेतात. त्यामुळेचं सन २०१५ पासून अंनिसद्वारे 'जातपंचायत निर्मूलन अभियान' हाती घेत, अन्यायकारक निर्णय, प्रामुख्याने बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले. 
‘भटक्‍यांची पंढरी’ अशी ओळख असलेलं मढी (जि.नगर). इथे होळीच्या सुमारास जातपंचायती भरतात. रंजनाताईंनी तिथे बालविवाहांना विरोध केला. २०१६ मध्ये नगरला एकाच वेळी भटक्‍या समाजातील नऊ विवाह होते. सर्वच अल्पवयीन मुलामुलींचे. हे कळताच ताईंनी यंत्रणेच्या साथीने कार्यक्रम रोखला. त्यात फक्त तीन वधूे-वरांच्या वयाचे दाखले होते. बाकीचे बालविवाह. म्हणून रोखले. मात्र, त्याच रात्री त्या लोकांनी बाहेर जाऊन लग्नं लावली. ताईंनी पुन्हा पाठपुरावा केला, महिला आयोगाकडे धाव घेतली. शेवगाव (जि.नगर) इथे एकाच वेळी होऊ घातलेले तीन बालविवाह थांबवले. लग्न थांबवल्यानंतर मुली बोलत्या झाल्या, "आम्हाला शिकायचंय, मोठं व्हायचंय, पंच लग्न लावून देत आहेत. अन्याय होतोय, पण कोणाला
सांगणार.'' मुलींच्या अशा व्यथा अंतर्मुख करतात, रंजनाताई सांगतात.
श्रीरामपुरचं एक प्रकरण. एका प्रकरणात सुमनच्या नवर्‍याला, अशोकला जेलमध्ये जावं लागलं. त्यानंतर, पंचांनी सुमनचं दुसरं लग्न लावलं. शिक्षा भोगून परतल्यावर अशोकने पत्नी सुमन हिची मागणी केली. जातपंचायतीने अशोकचा विवाह एका तीन वर्षीय बालिका अमृता हिच्याशी लावला. अमृता १२ वर्षाची होताच अशोकने मुलीला स्वतःकडे पाठवण्याची मागणी केली, पंचांनीही तसे आदेश दिले. अमृतासह तिच्या आई-वडीलांनी विरोध केल्यावर त्या कुटुंबाला अख्या जातीने वाळीत टाकलं. सलग पाच वर्ष एक लाखाचा दंड केला. तिच्या घटस्फोटाला पंच विरोध करत होते. मात्र रंजना यांनी अमृता आणि तिच्या कुटुंबासाठी वर्षभर लढा दिला. पंच आणि समाजातल्या प्रमुखांचं प्रबोधन केलं. आणि अमृताला न्याय मिळवून दिला. अशा पद्धतीने आतापर्यत नगरसह औरंगाबाद, जालना, जळगाव, बीड, भंडारा, कोल्हापुर भागात १७३ बालविवाह रोखत मोलाची कामगिरी केली.
नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कारासह २० पुरस्काराने रंजना गवांदेंचा म्हणजेच 'नगर जिल्ह्यातील दुर्गे'चा गौरव झाला आहे.
- सूर्यकांत नेटके.

शांतिवननं दिला हात म्हणून, त्या बालविवाहितांचं सावरलं आयुष्य


ऊसतोड कामगारांचा जिल्हा,बीड. वर्षातील सहा ६ महिन्यांहून अधिक काळ जिल्ह्यातील ५ लाखांवर मजूर ऊसतोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकात स्थलांतरित होतात. हेच बालविवाहाचं मूळ. अनेक मुलींचं बालपण करपून टाकणारं. शिकण्याच्या, खेळण्याबागडण्याच्या वयात संसार आणि संकटं झेलणाऱ्या या मुलींच्या कहाण्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत.
शिरुर तालुक्यातील पूजा. ऊसतोडणीसाठी जाताना मुलीला सोबत घेऊन जाणं किंवाएकटीला घरी ठेवणं, दोन्ही धोकादायक. १४ व्या वर्षी पाटोदा तालुक्यातील १९ वर्षांच्या ऊसतोड मजुराबरोबर तिचं लग्न लावण्यात आलं. लग्नानंतर हातात पुन्हा काेयताच. वयाच्या १६ व्या वर्षी पूजा गरोदर राहिली. सातवा महिना सुरू असतानाच एक दिवस पतीचं अपघाती निधन झालं. संसार म्हणजे काय हे नीट उमगायच्या आधीच तिचा संसार संपलाही होता. आईवडिलांनी माहेरी आणलं. तिला मुलगी झाली. सासरच्या मंडळींनी पूजा माहेरी असतानाच तिला सगळ्या संपत्तीतून बेदखल केलं. वंचित मुलांसाठी काम करणाऱ्या शांतिवन संस्थेकडे हे प्रकरण आलं. संस्थेचे दीपक नागरगोजे यांनी पूजाला आधार दिला.
दीपक म्हणतात, ''अवघ्या काही महिन्यांची ज्ञानेश्वरी आणि १७ वर्षांची तिची आई पूजा शांतिवनात दाखल झाल्या. अनेक प्रश्न त्यांच्यासमोर होते. सुरुवातीला तिला मानसिक आधार दिला. समुपदेशन केलं. तिच्या संपत्तीत तिला हक्क मिळावा यासाठी न्यायालयीन लढाई सुरू केली." अॅड अजय राख यांनी हा खटला मोफत चालवला. निकाल पूजाच्या बाजूनं लागला. दरम्यानच्या काळात संस्थेनं पूजाला दहावीच्या परीक्षेला बसवलं. तिला ६५ टक्के मिळाले. पूजाला स्वत:च्या पायावर उभं राहता यावं यासाठी संस्थेनं पुण्यात एका परिचारिका महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. मुलीच्या भविष्यासाठी मुलीला शांतिवनात ठेवून पूजानं प्रशिक्षण पूर्ण केलं. सध्या ती पुण्यात एका रुग्णालयात नोकरी करत आहे .
दुसरी घटना अंबाजोगाई तालुक्यातील. करुणाचं १५ व्या वर्षी गरिबीमुळे आईवडिलांनी लग्न करुन दिलं. काही दिवस चांगले गेल्यावर सासरच्या मंडळींकडून तिचा छळ सुरू झाला. चक्क वेश्याव्यवसाय करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जाऊ लागला. करुणानं माहेर गाठलं. पण काही दिवसांनी आईवडिलांनी समजून घालून तिला परत पाठवलं. पुन्हा सासरच्या मंडळींकडून तसाच दबाव. आत्महत्या करण्यासाठी निघालेली करुणा तिच्या एका शिक्षिकेच्या संपर्कात आली. त्यानंतर मानवलोकचे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. द्वारकादास लोहियांकडे हा प्रश्न गेला. त्यांनी तिला शांतिवनमध्ये पाठवलं . शांतिवननं करुणाचंही पालकत्व स्वीकारलं. सध्या ती लातूरला बारावीत शिकत आहे.
''अठराविश्व दारिद्र्य, उद्योगव्यवसायांचा अभाव यामुळे बीड जिल्ह्यात ऊसतोडणीशिवाय पर्याय नाही.'' दीपक सांगतात. ''स्थलांतरामुळे शिक्षण, आरोग्य, बालविवाह या समस्या गंभीर आहेत. बालविवाह होत नसल्याचं जरी सांगण्यात येत असलं, तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी बालविवाह होत आहेत. यावर कायम स्वरूपी उत्तर मिळण्यासाठी इथल्या मूळ प्रश्नांवर काम करणं आवश्यक आहे.''
वाचकहो, तुम्ही या मालिकेतल्या स्टोरीज वाचून, अधिकाधिक शेअर करून आमच्या या मोहिमेत सहभागी व्हावं, हेच कळकळीचं सांगणं. कारण, नकोच करूया लगीनघाई! 
- अमाेल मुळे, बीड

Monday 15 October 2018

मुलींच्या पालकांना लगीनघाईपासून दूर ठेवणार्‍या वर्षाताई

2013 सालची गोष्ट. वर्षा पवार – शिंदे यांच्या मोबाइलवर एक कॉल आला. वर्षाताई या तेव्हा जालना जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) या पदावर कार्यरत होत्या. एका गावात बालविवाह होत असल्याची माहिती देणारा तो कॉल होता. ज्या मुलीचं लग्न होणार होतं, ती नंदा. आणि तिचे खुद्द वडीलच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असल्याचंही कळालं. लगेच त्यांनी त्या गावाला भेट दिली. पण, पण कुणी बोलायलाच तयार होईना. शेवटी मिळालेल्या माहितीनुसार लग्नाच्या नियोजित तारखेला वर्षा पवार पोलीस यंत्रणेसह त्या गावात धडकल्या. लग्नतिथी असल्याने भेटवस्तू घेऊन जाणारी दोन-तीन जोडपी दिसली. थोडी अधिक चौकशी केल्यावर एका अन्य बालविवाहाची बातमी कळाली. लगेचच विशेष बाल पोलीसपथक व जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या मदतीने त्या विवाहस्थळी गेल्या. आणि तो बालविवाह पुढं ढकलण्यात त्यांना यश आलं.मुळात कॉलद्वारे त्यांना ज्या मुलीच्या नियोजित बालविवाहाची माहिती मिळाली होती आणि त्या मोहिमेवर निघाल्या होत्या, ती नंदा मामाच्या गावी असल्याचं एव्हाना त्यांना कळलं होत. त्यांनी मामाचं गाव गाठलं. नंदाच्या लग्नाची तयारी चालू होती. इथंही अर्थातच वधू-वरांच्या पालकांचं समुपदेशन केलं गेलं. आणि हाही बालविवाह पुढं ढकलण्यात यश आलं. 
वर्षा पवार म्हणतात, “या दोन्ही प्रसंगातून जाणवलं की, बालविवाह विषयाबद्दल पुरेशी प्रसिद्धी, प्रचार, बालविवाहाचे दुष्परिणाम, सर्वच यंत्रणांची या विषयाकडे पाहण्याची उदासीनता लक्षात आली. आणि इथून पुढं बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सुरुवात करायची हे मनाशी निश्चित करूनच नंदाच्या मामाचं गाव सोडलं.”
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राधाकृष्णन, नंतर प्रेरणा देशभ्रतार यांच्या मार्गदर्शनाखाली मग बालविवाह प्रतिबंधक कार्याच्या मोहिमेला जोर आला. जिल्ह्यात बालविवाह होत असेल, तर त्या बाबतची पूर्वकल्पना देण्यासाठी एक नंबर प्रसिद्ध करण्यात आला. आणि त्यावर माहिती देण्याचं आवाहन लोकांना करण्यात आलं. माहिती मिळाली की, आधी मुलगी अल्पवयीन असल्याची खात्री केली जायची. त्यानंतर तिच्या आईवडिलांना भेटून समुपदेशनाने त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न जिल्हा बालसंरक्षण कक्षाद्वारे केला जायचा. काहीवेळा तर समुपदेशनानंतरही बालविवाह केल्यामुळे 4 पोलीस केस दाखल करण्याचा कठोर निर्णय देखील घ्यावा लागला. पण बालविवाह थांबवलेच. याचा एक फायदा झाला की पोलीस कारवाईची जाणीव झाल्याने बऱ्याच पालकांनी स्वतःहून मुलींचे जमलेले विवाह पुढे ढकलले. 18 वर्ष पूर्ण झाल्यावरच तिचा विवाह करून दिला. 
त्या सांगतात, “बालविवाह थांबवतांना असंख्य अडचणींना तोंड द्यावं लागलं. शासकीय यंत्रणेला या समस्येत नेमकी आपली भूमिका काय हेच माहीत नव्हतं. त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. अंगणवाडी ताई, सरपंच, ग्रामसेवक, बालविकास प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, विशेष बाल पोलीस पथक या यंत्रणांना त्यांची भूमिका व कार्य करण्यासाठी लेखी स्वरूपात माहिती दिली. बालविवाहाची माहिती झाल्यावर अनुसरायची प्राथमिक कार्यपद्धती, मार्गदर्शक सूचना लेखी स्वरूपात देण्यात आल्या. या एसओपीची दखल घेत तत्कालीन आयुक्त नागरगोजे साहेबांनी घेतली. पुढं संपूर्ण महाराष्ट्रात जालना जिल्ह्यात अवलंबलेली एसओपी अर्थात मार्गदर्शक सूचना अमलात आणण्यासाठीच्या सूचना सर्व जिल्ह्यांना दिल्या गेल्या.”
या चार वर्षाच्या काळात सर्वांच्या सहकार्याने 172 बालविवाह प्रशासनाने पुढं ढकलल्याचं समाधान वर्षा पवार व्यक्त करतात. फोटोग्राफर असोसिएशन, सर्व धर्माचे पंडित, मौलावी, भन्तेजी यांनी या कामी खूप सहकार्य केल्याचं त्या सांगतात. प्रिंटिंग प्रेस, किराणा दुकानदार, मंडप डेकोरेटर इत्यादी सर्वांपर्यंत बालविवाहात सहभाग नोंदवल्यास गुन्हा दाखल होतो या बाबतचा प्रचार, प्रसार केल्याने याविषयी जागृती होत गेली. त्यामुळे बालविवाह थांबवण्यात मोठं यश आलं. 
बालविवाह थांबवण्यात आलेल्या मुलींपैकी चौघींचे आईवडील त्यांना शिक्षण देऊ शकत नव्हते. मग या मुलींना कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात प्रवेश देण्यात आला. त्यापैकी एकीने पुढे जाऊन भारतीय फुटबॉल संघात स्थान मिळवत भारताचं प्रतिनिधित्व केलं, हे विशेष. 
वर्षा पवार- शिंदे यांच्या कार्याची दखल ‘लेक लाडकी अभियाना’च्या वर्षाताई देशपांडे यांनी घेत वेळोवेळी कायदेशीर मार्गदर्शन केले. बालविवाहास प्रतिबंध केलेल्या कार्याबद्दल राज्याने त्यांना ‘सावित्रीबाई फुले संघर्ष पुरस्कार’ देत सन्मानित केले.

अनंत साळी.

Friday 12 October 2018

आज नयना-नितिन त्यांच्या दोन लेकरांसोबत मजेत जगत आहेत.


नयना दिसायला अतिशय सुंदर. तिचं सौदर्यच तिचा जणू घात करू पाहत होतं. नयनाच्या बालपणीच तिची आई मरण पावली. ते कमी म्हणून की काय, तिचे स्वतःचे वडील नयनाकडे वाईट नजरेने पाहू लागले. आजीने परिस्थितीचं भान राखून नयनाला मराठवाड्यातल्या एका आश्रमात ठेवलं. तिथेही जमेना. म्हणून आजीने नयनाला एका ओळखीच्या बाईकडे, तिला दीदी म्हणूया, आश्रयाला ठेवले. आश्रयाला म्हणून ठेवलेल्या नयनाला खरं तर आजीने 'विकलं' होत. 'विकलं' शब्द वापरताना मनाला यातना होताहेत. आजीलाही झाल्या असाव्यात. दीदीकडे आणखीही मुली होत्या. दीदीचा व्यवसाय निराधार मुलींच्या जिवावर कमाई करणं, हा होता.
एकदा असं झालं, दीदी नयनाला दाखवायला कर्जत इथं घेऊन आली. त्या मुलाला, त्याच्या कुटुंबाला नयना पसंत पडली. आणि बाईला 5 लाख द्यायचं ठरलं. साखरपुडा झाला. ठरल्यानुसार तिने अडीच लाख आधी घेतले. गावी जाऊन येतो. आल्यावर लग्न करू, असं मुलाकडच्यांना सांगितलं. पण, मुलाचे आईवडील लगेचच लग्न करायचं म्हणून हटून बसले.
मात्र, यावेळी बाईचा प्लॅन फसला. नयनाला तो मुलगा, नितिन त्याचं नाव, आवडला. आणि तिने नितिनकडच्या लोकांना सांगून टाकलं की, या बाईने सांगितलं असलं, तरी ती पुन्हा येणार नाही. झालं, बाईचा प्लॅन उघडकीस आला. आता हे प्रकरण पोलिसांकडे गेले. पोलिसांनी नयनाला बालकल्याण समिती रायगड (महाराष्ट्र शासन) पुढं आणलं. 'स्त्रीशक्ती संघटना रायगड'च्या अध्यक्षा आणि तत्कालीन समितीसदस्य स्मिता काळे यांना कळवलं. पोलिसांनी समितीला सांगितलं की, नयनाला ताब्यात घ्यावं. नयना अजून १८ वर्षांच्या आतली आहे. तिला १८ वर्ष पूर्ण होण्याकरिता ६ महिने बाकी आहेत. त्यानंतरच तिचं लग्न करून द्यावं.
प्रथमदर्शनी ही बालविवाह केस असावी, असंच त्यांना वाटलं.
स्मिताताई म्हणतात, "नयनाशी बोलल्यावर सत्य समोर आलं. नयनाच्या सौंदर्याचा, असहायतेचा फायदा घेऊन, दीदी अनेक मुलांना तिचं तुमच्याशी लग्न लावते म्हणून पैसे उकळायची. आणि नंतर ते गाव सोडून नयनाला दुसऱ्या शहरात नेत असे. दीदीने नयनाला मुंबई,औरंगाबाद, गुजरात आणि राजस्थान इथे नेऊन पैसे कमावले होते. अनेकांकडून पैसे घेऊन लग्न ठरवत साखरपुडा करून, लग्न नंतर, म्हणून पैसे घेऊन गंडवलं होतं."
नयनाला आणि नितिनच्या कुटुंबाला विश्वासात घेऊन बालकल्याण समितीने तिला ६ महिने बालगृहात सांभाळलं. त्याचवेळी रायगड मुख्य पोलीस अधीक्षक आणि स्मिताताईं यांनी मराठवाड्यातील संबधित पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार त्या दीदीेविरुदध तक्रार नोंदवली. अशा रीतीने, हे रॅकेट उघडकीस आणलं गेलं. नयनाबरोबर अनेक मुली मुक्त झाल्या. नयना ६ महिन्यानंतर १८ वर्षांची झाली. त्यानंतर नयनाचं नितिनशी लग्न लावून दिलं गेलं. आज नयना-नितिन त्यांच्या दोन लेकरांसोबत मजेत जगत आहेत.
- लता परब

ऐन वेळी रद्द झालेला एक (बाल) विवाह असाही..!


लग्न मंडपात गुंजत असलेले सनईचे मंगल सूर, आप्तेष्टांची लगबग, मंडपात येणाऱ्या पाहुण्यांच्या हातावर अक्षता ठेवून त्यांचे होत असलेले स्वागत, मंडपामागून येणारा पंचपक्वान्नांचा सुवास, मारुती मंदिराकडून येणारा बँडचा आवाज… आरतीच्या लग्नाची अशी जय्यत तयारी झाली होतीे. नवरी मुलगी आरती नखशिखांत नटली होती. भरजारी शालू, हातावर मेंदी. बोहल्यावर चढायची वेळ झाली. तेवढ्यात.... पोलीस आणि काही अधिकारी मंडपात पोहचले. उपस्थितांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. “पोरगी नाबालिग हाये वाटते, तवाच त् पोलीस आले!” आणि ते खरंच होतं. ‘कुमारी’ आरती ‘सौ’ होणार असल्याची चाहूल लागताच एका समाजसेवकाने या बालविवाहाची खबर ‘चाईल्डलाईन’ला दिली.
यवतमाळ जिल्ह्यात आर्णी तालुक्यात असलेलं भंडारी हे गाव. गावात नाथजोगी समाजाची मोठी वस्ती. हा समाज भटकंती करून उपजीविका करतो. कुटुंबातील पुरूष सतत फिरतीवर राहत असल्याने घरात मुलगी वयात आली की तिचं लग्न लावून देण्याची परंपरा समाजात रूळली. ही प्रथा आजही सुरू आहे. ही घटना मार्च 2018 मधील. आरतीने नुकतीच वयाची 16 वर्षे पूर्ण केली होती. तत्पूर्वी, इयत्ता सातवीपासूनच तिने शाळा सोडली होती. त्यामुळे तिच्यासाठी नवऱ्या मुलाचा शोध सुरू झाला. नजिकच्याच दिग्रस तालुक्यात असलेल्या सावंगा इथल्या याच समाजातल्या एका मुलाचं स्थळ आरतीसाठी तिच्या नातेवाईकांनी शोधलं. पाहण्याचा कार्यक्रम झाला. मुलगी पंसत पडली. बोलणी झाली आणि 17 व्या वर्षीच आरतीचं लग्न ठरलं. 28 मार्च 2018 रोजीचा मुहूर्त पक्का झाला. आरतीच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची. त्यामुळे नवऱ्या मुलाच्या गावी हा लग्न सोहळा ठरला. दोन्ही कुटुंबांकडून लग्नाची तयारी झाली. आरतीचं कुटुंब 27 मार्चला तिला घेऊन सावंगा इथे लग्नघरी पोहचले.
‘ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट’ या गावांमध्ये काम करते. या संस्थेच्या आणि चाईल्डलाईन 1098 च्या जिल्हा समन्वयक अपर्णा गुजर म्हणाल्या, “एका कार्यकर्त्याला आरतीचा बालविवाह होत असल्याची माहिती मिळाली. त्याने लगेचच ही माहिती ‘चाईल्डलाईन हेल्पलाईन 1098’ वर कळवली. यवतमाळ चाईल्डलाईनच्या सदस्य नलिनी यांनी ही माहिती देणाऱ्या कॉलरसोबत संपर्क साधला. नंतर महिला व बालविकास अधिकारी, बालकल्याण समिती, बालसंरक्षण अधिकारी यांना या बालविवाहाची कल्पना दिली. नलिनी भगत आपल्या टीमसह आरती सातवीपर्यंत शिकत असलेल्या भंडारी गावातल्या जिल्हा परिषद शाळेत पोहचली. शाळेच्या मुख्याध्यापकांना लग्नाबाबत माहिती देऊन आरतीच्या शाळेच्या दाखल्याची झेरॉक्स मिळविली. दाखल्यामुळे कळलं की आरती 18 वर्षांच्या आतलीच आहे. तिचा विवाह बेकायदेशीर असल्याचा पुरावा टीमला मिळाला. हा दाखला घेऊन टीमचे सदस्य दिग्रस पोलीस ठाणे आणि तहसीलदारांकडे पोहचले. तिथे आरती 18 वर्षा आतील आहे आणि तिचं लग्न होत असल्याची माहिती दिली. या माहितीने प्रशासन खडबडून जागं झालं. चाईल्डलाईन टीम सदस्यांसह ठाणेदार आर.डी. शिससाठ, तहसीलदार एस.डी. राठोड, ग्रामसेवक जी.एच. चतूर, प्रकाश चहानकर, महिला पोलीस कर्मचारी हे सारे सावंगा गावात पोहचले. तिथे पोलीस पाटील शरद शिंदे आणि सरपंच लक्ष्मीबाई खडके यांना गाठून गावात होत असलेल्या बालविवाहाची माहिती दिली. ज्या विवाहास आपण पाहुणे म्हणून जाणार तो बालविवाह असल्याचे ऐकून पोलीस पाटील आणि सरपंचही अवाक झाले. सर्वांनी वेळ न दवडता लग्नमंडपाकडे धाव घेतली. तिथे लग्नाची सर्व तयारी झाली होती. घटनेची माहिती कळताच जिल्हा बालसंरक्षण अधिकारी रवी आडे हेसुद्धा पोहचले होते. सर्व अधिकारी वर्गाने आरतीचे आई-वडील आणि नवऱ्या मुलाच्या आई-वडिलांकडे लग्नाबाबत अधिक विचारपूस केली. वधू-वरांसह त्यांच्या पालकांचं समुपदेशन करून त्यांनी हा विवाह रद्द करावा, असा प्रस्ताव ठेवला. बालविवाह हा कायद्याने गुन्हा असून तो सिद्ध झाल्यास दोन वर्षांपर्यंत शिक्षा आणि एक लाख रूपये दंडाची तरतूद असल्याची माहिती दिली.
प्रयत्नांना यश आलं. वधू-वरांच्या पालकांनी त्यांची मुलं कायद्याने सज्ञान झाल्यावर हा विवाह करण्यास अनुमती दिली. उपस्थितांनीही टाळ्या वाजवून या निर्णयाचं स्वागत केलं. बालविवाह होत असल्याची माहिती मिळाली, त्याच दिवशी तो विवाह थांबवून चाईल्डलाईन आणि प्रशासनाने आपलं कर्तव्य चोख बजावलं. हा बालविवाह तर थांबला, पंरतु आलेले वऱ्हाडी मात्र पंचपक्वानांचा आस्वाद घेऊन आणि बालविवाह विरोधातील जनजागृतीने तृप्त होऊनच मंडपाबाहेर पडले!
वाचकहो, तुम्ही या मालिकेतल्या स्टोरीज वाचून, अधिकाधिक शेअर करून आमच्या या मोहिमेत सहभागी व्हावं, हेच कळकळीचं सांगणं. कारण, नकोच करूया लगीनघाई!
- नितीन पखाले

ज्या वयात मुलींच्या हातात पेन, पुस्तक हवं, त्या वयात त्यांच्या हातात पाळण्याची दोरी होती!

तिचं नाव जयश्री. घरची परिस्थिती बिकट. आई-वडील मजूर. 2008-09 मध्ये त्यांनी तिला पहिलीत दाखल केलं. त्या वयातही घरचं काम आटपून ती शाळा शिकू लागली. 2012 च्या चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ती जिल्ह्यात गुणवत्ता यादीत झळकली. आता स्वप्न माध्यमिक शिक्षणाचं. शाळा सुरू झाली. पण... ती वयात आली. आणि घरच्यांनी लगीनघाई केली. तिच्या ऐन उमेदीच्या शिकण्याच्या वयात तिचं लग्न लावून दिलं. नुकताच मी तिचा शोध घेतला. तेव्हा असं समजलं की, दोन वर्षांपूर्वी जयश्रीचं लग्न झालं. आणि आता ती एका मुलाची आई आहे. शिक्षण घेऊन अधिकारी व्हायचं स्वप्न पाहणारी जयश्री आज घरात मुलाला सांभाळत बसली आहे.
ही घटना रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातली. इथल्या पाले खुर्द या आदिवासी वाडीवर मी 2006 साली शिक्षक म्हणून नोकरीला लागलो. ती शाळा चौथीपर्यंत. सलग 10 वर्ष त्याच ठिकाणी काम केलं. या 10 वर्षात आदिवासी लोकांचा जगण्याचा, त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा संघर्ष जवळून पाहण्याची संधी मिळाली. मुलांना कोणत्या परिस्थितीतून शिक्षण घ्यावं लागतं. त्यातही आई-बाप कामावर गेल्यावर धाकट्या भावंडांना सांभाळणाऱ्या मुलींनी शिक्षण घेणं किती संघर्षाचं असतं ते पाहिलं. 2006 ते 2016 या काळात चौथीच्या10 तुकड्या शिक्षण घेऊन पुढे गेल्या. आपण एवढं तयार करून, शिकवून विद्यार्थी पुढं पाठवतो. या मुलांचं नंतर काय होतं? हे माझे विद्यार्थी सध्या काय करत आहेत, ते बघावंसं वाटलं. आणि सुरू झाली शोधमोहीम. याच शोधमोहिमेत ही जयश्री सापडली.
मी अगोदर 10 वर्षातील सर्व विद्यार्थ्यांची यादी काढली. त्यांची नावं शोधली, मुलं आणि मुलींची स्वतंत्र माहिती घ्यायला सुरवात केली. आणि धक्कादायक माहिती मिळत गेली. मन सुन्न होत गेलं. ज्या वयात मुलींच्या हातात पेन हवं, पुस्तक हवं, त्या वयात त्यांच्या हातात पाळण्याची दोरी होती.
या पाड्यात 30 ते 35 घरं. 2006 ते 2012 या वर्षात चौथीला शिकत असलेल्या माझ्या 19 विद्यार्थिनींची ही आकडेवारी. 2006 साली चौथीला असणारी मुलगी आज 2018 ला पदवीशिक्षण घेत असली पाहिजे. तर 2012 साली चौथीला असणारी मुलगी 10 वीला असली पाहिजे, पण इथे काय परिस्थिती आहे पहा.
2006 ते 2012 पर्यन्त 19 मुलींचा शोध घेतला.
19 पैकी 17 मुलींना शिक्षण दहावीच्या अगोदर सोडावं लागलं.
19 पैकी फक्त 2 मुली 12 पर्यंत शिकल्या.
19 पैकी 15 मुलींचा बालविवाह झाला. त्यातील बऱ्याच मुलींना आज मुलं आहेत.
म्हणजे,
7 वर्षात 89% मुलींना घरची आर्थिक परिस्थिती, गरिबी यामुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. अवघ्या 11% मुली 12 वी पर्यंत शिक्षण घेऊ शकल्या. उच्च शिक्षण तर खूप लांब राहिलं.
ही आकडेवारी एका छोट्याशा 30 घरांच्या आदिवासी पाड्यावरची आहे. राज्यात असे हजारो आणि देशात लाखो पाडे आहेत. तर मुलींच्या शिक्षणाबाबतचं देशातलं वास्तव काय असेल?
दोष कोणाचा, जयश्रीचा? पालकांचा? गरिबीचा? की जयश्री एक मुलगी आहे याचा...?

- गजानन पुंडलिकराव जाधव.

Wednesday 10 October 2018

बालविवाह या विषयावर एक छोटी मोहीम

नवी उमेदवर बालविवाह या विषयावर एक छोटी मोहीम करायचं ठरवलंय, असं मित्रमैत्रिणींना सांगितल्यावर त्यांच्या प्रतिक्रिया - असला काही प्रश्नच अस्तित्वात नसल्यासारख्या होत्या. असेलंच बालविवाहाचा प्रश्न, तर तो तिकडे दूर उत्तरेत, बिहार-राजस्थानात असं त्यांचं म्हणणं. 
मी मोहिमेसाठी माहिती, स्टोरीज जमवत होते. तर किशोर पाटील या धुळ्याच्या जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकाशी बोलणं झालं. शाळेविषयी, विद्यार्थ्यांविषयी भरभरून बोलणार्‍या या शिक्षकाकडून जे कळलं, त्याने माझं मन विचलित झालं. सरांनी सांगितलं ते असं: 4 वर्षापूर्वी त्यांच्या गावातील एक मुलगी, सविता सहावीत शिकत होती. 12 वर्षांची हसरी, खेळती मुलगी. या अवघ्या 12 वर्षाच्या कोवळ्या मुलीचा विवाह 22 वर्षीय तरुणाशी लावला गेला. मुलगा मोलमजूरी करणारा. सरांनी या कुटुंबाशी संपर्क साधला, त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण, ऐकेल कोण? तरीही किशोर सर प्रयत्न करत राहिले. शेवटी मुलीच्या कुटुंबियांनी त्यांना सांगितलं, की फक्त लग्न लावू. मुलगी इथेच राहील, शिकेल. 18 वर्षांची झाली की सासरी पाठवू. पण तसं झालं नाही. तिला सासरी जावंच लागलं. सविता हुशार होती. तिने शिकण्याची जिद्द सोडली नाही. दहावीची परीक्षा तर तिने पोटातल्या बाळासोबत दिली. तिची शिकण्याची धडपड पाहिली की वाटतं, बालविवाहाची ही वाईट प्रथा कायद्याने बंद केलीच आहे. ती प्रत्यक्षातही बंद व्हावी. माणसाला माणूस म्हणून जगू देत नाहीत, अशा प्रथा काय कामाच्या? मुली या आधी माणूस आहेत. त्यांना देखील स्वप्न, इच्छा-आकांक्षा आहेत. ”
सरांनी जे सांगितलं ते वास्तव आहे. आपल्या, सुधारणावादी महाराष्ट्रातलं, देशातलं तिसरं श्रीमंत राज्य म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रातलं वास्तव. मुलींच्या बाबतीत महाराष्ट्र अजूनही मागासच आहे.
बालविवाहाची महाराष्ट्रात काय स्थिती हे बघितलं, तर हबकायला होतं.
- महाराष्ट्रात ३० ते ४० टक्के मुली १८ वर्षाच्या होण्याआधीच विवाहित झालेल्या असतात. या बाबतीत महाराष्ट्राचा नंबर बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान व पश्चिम बंगाल यांच्या नंतर लागतो.
- बालविवाहांचं वाढतं प्रमाण असणार्‍या देशभरातल्या ७० जिल्ह्यांच्या यादीत महाराष्ट्रातले पुढील १६ जिल्हे आहेत: अहमदनगर, भंडारा, चंद्रपूर, धुळे, पुणे, सांगली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातुर, मुंबई, मुंबई उपनगर, परभणी, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे.
- भंडारा जिल्ह्यात २००१ ते २०११ या दहा वर्षांत मुलींच्या बालविवाहात पाच पट आणि मुलांच्या बालविवाहात २० पट वाढ झाली आहे. 
- मुलग्यांचे बालविवाह अधिक प्रमाणात होणार्‍या देशातल्या १४ राज्यांच्या यादीतही महाराष्ट्राचा समावेश आहे. 
- राज्यातल्या २०-२४ वयोगटातल्या स्त्रियांपैकी २५% स्त्रियांचे बालविवाह झालेले असतात.
- बालविवाहांचं प्रमाण हे, ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरांमध्ये वाढतं आहे. 
- राज्यात 15 वर्षाखालील मुलींची संख्या 1 कोटी 48 लाख 40 हजार इतकी असणं. त्यापैकी 63 हजार 468 मुलांचे बालविवाह झाल्याचं निदर्शनास आल्याबद्दलचा प्रश्न विधानपरिषदेत 2011, 12, 13 साली उपस्थित झाला आहे.
- अशा बालविवाहामुळे मुलींच्या शरीराचं काय नुकसान होतं त्याचाही विचार केला जात नाही. विवाहानंतर मुलीला लगेच गर्भ राहण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराची नैसर्गिक वाढ होत नाही. वाढ खुंटते. जन्माला येणारं बालक कमी दिवसांचं, कमी वजनाचं, कुपोषित असण्याची शक्यता वाढते. नंतरच्या काळात बालकाचं हे नुकसान भरून निघत नाही. कोवळ्या वयातील लग्नानंतर येणाऱ्या विविध जबाबदाऱ्यांमुळे मुलीची मानसिक वाढही निकोप होत नाही. लहान वयात लग्न झालेल्या पुरुषालादेखील जबाबदारीचं दडपण जाणवतं.
हे वास्तव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठीच ‘नको लगीनघाई’ ही मालिका आम्ही सुरू करत आहोत. बालविवाहाचं वास्तव आहे. पण, जबाबदार नागरिक म्हणून बालविवाह थांबवण्यातही अनेकांनी पुढाकार घेतलेला आहे. यामध्ये स्मिता काळे मुंबई, गजानन जाधव रायगड, रमेश शेलार पुणे, वर्षा पवार जालना, ॲड रंजना गवांदे अहमदनगर आहेत. काही आमदार-खासदारांना आम्ही बोलायला सांगतो आहोत. नयना, सुगंधी, सविता, जयश्री अशा मुलींच्या खर्‍याखुर्‍या स्टोरीज मालिकेत वाचायला मिळतील. 
वाचकहो, तुम्ही या मालिकेतल्या स्टोरीज वाचून, अधिकाधिक शेअर करून आमच्या या मोहिमेत सहभागी व्हावं, हेच कळकळीचं सांगणं. कारण, नकोच करूया लगीनघाई!
- वर्षा आठवले

Tuesday 9 October 2018

मादळमोही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतली मुलं आता इंग्रजीतून सुरेख बोलतात...

बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातलं मादळमोही. इथल्या जिल्हा परिषदेतल्या प्राथमिक शाळेतली मुलं इंग्रजीतून सुरेख बोलतात. श्रेय त्यांच्या शिक्षिका सुरेखा चिंचकर यांचं. राज्य सरकार, टाटा ट्रस्ट आणि आणि ब्रिटिश कौन्सिल यांचा तेजस प्रकल्प. प्राथमिक शाळांमधली इंग्रजी भाषेच्या अध्यापन पद्धतीची गुणवत्ता सुधारणं हा उद्देश. प्रकल्पामुळे चिंचकर यांच्यासारख्या राज्यातल्या १३ हजार शिक्षकांच्या इंग्रजी बोलण्या-लिहिण्या-वाचण्यात चांगला बदल घडून आला आहे. 



पथदर्शी स्वरूपात बीड,औरंगाबाद, हिंगोली, नंदुरबार, नाशिक, यवतमाळ, गडचिरोली, नागपूर आणि अमरावती या नऊ जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी प्रकल्प सुरू झाला. प्रत्येक जिल्ह्यात साधारणपणे ३० टीचर्स अॅक्टीव्हिटी ग्रुप (टॅग) समन्वयक. या समन्वयकांची दर महिन्यातून एकदा बैठक. प्रभावी अध्यापनासाठी आणि भाषा सुधारण्यासाठी तज्ञांचं मार्गदर्शन. टीचर्स अॅक्टीविटी ग्रुपमध्ये मिळालेलं दिशादिग्दर्शनशन ‘टॅग’ समन्वयक त्यांच्या विभागात तीन ‘टॅग’ बैठका घेत ७५ शिक्षकांपर्यंत पोचवतात.
ऑगस्ट २०१८ मध्ये ब्रिटीश कौन्सिलच्या टीमने विविध शाळांना भेट दिली. विद्यार्थ्यांशी बोलणं केलं. विद्यार्थ्यांचा इंग्रजी शब्दसंग्रह, शब्दनियोजन, इंग्रजीचं आकलन, बोलणं यात चांगली सुधारणा झाल्याचं त्यांनी नोंदवलं.
''प्रकल्पात इंग्रजी अध्यापनाचा अगदी सूक्ष्म पद्धतीनं विचार केला आहे.'' सुरेखा चिंचकर सांगतात. ''कृतीवर भर देत विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलणं-लिहिणं-वाचणं शिकवलं जातं. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भाषेची आवड निर्माण झाली आहे. टॅग मिटींगमध्ये आम्ही विविध कल्पनांची देवाणघेवाण करतो. त्याचा निश्चितच उपयोग होत आहे.''
ब्रिटीश कौन्सिल टीमने प्रकल्प सुरू करण्यापूर्वी शाळांची गुणवत्ता तपासली होती. वर्षभरानंतर टॅग समन्वयक आणि विद्यार्थ्यांचं इंग्रजी भाषेचं ज्ञान जाणून घेतलं. त्यानंतर यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अंतिम स्थिती तपासली. आता हा प्रकल्प राज्यातल्या सर्वच जिल्ह्यांत राबविण्यात येत आहे.
-अनंत वैद्य.