Monday 29 October 2018

वंदनाची गोष्ट - भाग ४ -कशाला हवा हा नवरा, ज्यानं कधी प्रेमाचा एक क्षण नाही दिला.


पुढे, आणखी दोन वर्षांनी, २५ सप्टेंबर२००७ ला माझा धाकटा मुलगा श्री जन्माला आला. मी कामाला जात होते, त्या लोकांनी मला स्वत:चं घर विकत घेण्याचा सल्ला दिला. लोकांकडून पैसे घेऊन मी सध्या राहत असलेली जागा विकत घेतली. घरात मी आणलेल्या वस्तू विकण्याचे त्याचे उद्योग सुरू होते. मी पोलिस स्टेशनमध्ये पाच सहा वेळा तक्रार दिली. सणासुदीला घातलेली रांगोळी पुसणं, फराळ फेकणं, दारू पिऊन दिवसदिवस झोपून राहाणं, असे बाबूचे उद्योग सुरू होते. श्री झोळीत असायचा. मोठ्या साईला घेऊन दिशा ट्युशनला जायची. तिच्या शिक्षिकेच्या बाजूला राहणारी तिची जाऊ साईला सांभाळायची.
जगात चांगले लोकही आहेत याचा पदोपदी अनुभव मला येत होता. नवर्‍याने जीवाचे हाल केले तरी आजुबाजूला अनेक भली माणसं होती, आहेत. तान्ह्या श्रीला झोळीत ठेऊन त्याच्यासाठी दूध पोळी मिक्सरमधून काढून ठेवत असे. मी कामावरून दुपारी दीडच्या सुमारास परत यायची. तोपर्यंत बाळाला सांभाळायला त्याला सांगितलेलं. एक दिवस, दुपारी मी परतले तेंव्हा बाळ जोरजोरात रडत होते. त्याच्यासाठी बनवलेलं खाणं तसंच होतं. मला बघवेना, मीही जोरजोरात रडू लागले.
या काळात, मी सायनची खोली विकून मुलूंडमध्येच आणखी एक खोली घेतली. त्या ठिकाणी तो दारूचा धंदा घालायची भाषा करु लागला. तू कामं सोड आणि दारुच्या गुत्त्यावर बस, असं तो मला सांगू लागला. ज्या दारूमुळे माझ्या आयुष्याची माती झाली, ती दारू मी विकणार नाही, असं मी त्याला सुनावलं. आज दारुच्या गुत्यावर बसवतोयस, उद्या मलाच धंद्याला बसवशील. यावर तो म्हणाला, त्यात वाईट काय? माझा स्वत:चा नवरा या भाषेत बोलत होता. मी आतल्या आत मरत होते, खरंच मेले असते. पण मला आता मुलांची साथ होती. मी त्याला बधणार नव्हते. मी विकत घेतलेली दुसरी जागा एका कुटुंबाला भाड्याने दिली.
मला स्वयंपाकाची कामं मिळू लागली. दिशा दहावीची परिक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाली. बारावीनंतर तिने फिजियोथेरेपीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. काही झालं, तरी मुलांना शिकवणारच, हे आधीपासूनच मी ठरवलं होतं. इतकी वर्ष बाबूच्या टारगेटवर मी होते. आता तो दिशाला घाणघाण बोलू लागला, शिव्या द्यायला लागला. तेव्हा, मी सुनावलं की, माझ्या मुलांना जर काही झालं, तर तुला मी जागेवर ठेवणार नाही. माझं काहीही झालं तरी चालेल. त्यानंतर मी आणि दिशाने पोलिस स्टेशनवर जाऊन त्याच्याविरुध्द तक्रार दिली. पोलिस स्टेशनला दिशा खूप रडली. ज्या लेकीला तळहातावरच्या फोडासारखं जपलं, तिला असं रडताना बघून माझ्या जीवाचं पाणीपाणी झालं.
आताही, बाबूचं छळ करणं चालूच आहे. घरात आम्ही मी आणि तीन लेकरं एका बाजूला आणि तो एका बाजूला असा सीन आहे. तो कामावर जातो. कामाचा पैसा मला न देता उडवणं, दारू पिऊन घरी येऊन मला, मुलाबाळांना घाणघाण बोलणं, शिव्या देणं सुरूच.. मी आणि मुलं त्याला कंटाळून माळ्यावर जाऊन झोपतो. मुलांना तरी शिव्या देऊ नकोस असं मी सांगते, पण तो ऐकत नाही. त्यामुळे, रात्री माझी झोप पुरी होत नाही.रोज सकाळी कामाला जायला निघाले, की माझ्यामागे येऊन रस्त्यात दिसणार्‍या प्रत्येक माणसावरुन संशय घेऊन बोलतो. इतकी वर्षं ज्या भागात राहिले, त्या भागातल्या लोकांसमोर अशी बदनामी मी कशी सहन करते, हे मलाच ठाऊक. तरी, मी फक्त बायकांशी बोलते. तरी हा छळ थांबत नाही. शिव्याशाप, मारहाण याला मी कंटाळले आहे. आता मुलं मोठी होताहेत. त्यांच्यासमोर हे शिव्याशाप मला नको आहेत. आता मला कुणाची डर नाही, ना लोकांची, ना बाबूची. कशाला हवा हा नवरा, ज्यानं कधी प्रेमाचा एक क्षण नाही दिला. ज्यानं कधी मुलांना प्रेमानं जवळ घेतलं नाही. आता मला आजाद व्हायचंय. नवरा नसला, तर काही बिघडत नाही माझं. मला ना कपड्यांचा शौक, ना कुठं फिरायला जायचा. दिवसभर राबराब राबते. इतक्या घरचा स्वैपाक करते. स्वैपाकाच्या आगीच्या धगीनं डोळे जळजळ करतात, मला चष्मा लागलाय. पोळ्या लाटून लाटून मनगट इतकं दुखतं, की हातापासून वेगळं करावसं वाटतं. अंग दिवसभर ठणकत असतं.
एकच गोष्ट माझ्याजवळ आहे, माझं हसू. ते मला गमवायचं नाहीए. मी हसणार.
..............
बाबूपासून घटस्फोट घेण्यासाठी वंदनाने शासनाच्या कायदा सहाय्यता विभागाची मदत घेतली आहे. तिला योग्य मदत मिळून एक दिवस त्याच्या छळापासून तिची सुटका होईल अशी, तिला आशा आहे.
 (शब्दांकन: भक्ती चपळगावकर)

No comments:

Post a Comment