Tuesday 4 February 2020

आता चढाओढ लग्नसमारंभातला खर्च टाळण्यासाठी व्हावी ...


ना वाजंत्री, ना पंगत, ना मानपान, केवळ पाहुण्यांना पेढा भरवत मंदिरात घंटेच्या साक्षीनं झालेल्या एका साध्या विवाहाची चर्चा सध्या खान्देशात होत आहे.
लग्न होतं सागर आणि अर्चना यांचं. अर्चना शहादा तालुक्यातल्या कवठळ इथली. रसायनशास्त्रात एम एस्सी. सागर मूळचा गोगापूरमधला. नोकरीनिमित्त आता बडोद्याला. तिथल्या एका कंपनीत मार्केटिंग मॅनेजर. या कंपनीचे मालक स्मिताबेन आणि संजय चौधरी. सागरच्याच नात्यातले.
चौधरी दांपत्य वेगळ्या विचारांचं. 'चालीरीती, मानपान , दागदागिने , मंडप , जेवणावळ,थाटमाट यावर लग्नात विनाकारण भरमसाठ पैसा खर्च केला जातो. निव्वळ वाजंत्रीवरच लाख तरी खर्च होतात. जेवणावळीसाठी लाखो रुपये खर्च होतात. क्षमतेपेक्षा जास्त अन्न वाढल्यानं ते वाया जातं. युवा पिढीनं पुढाकार घेऊन या सर्वाला काळानुसार बगल दिली पाहिजे, ' असं त्यांना वाटतं. लग्नसमारंभावर होणारा खर्च टाळून हा पैसा मुलंमुली स्वतःच्या घरासाठी, त्यातल्या वस्तूंसाठी वापरू शकतात. भविष्याची सोय म्हणून बचत करू शकतात. त्यातून उद्योगधंदा सुरू करू शकतात.'
आपले हे विचार सागर आणि स्मिताबेन कंपनीतल्या, आजूबाजूच्या मुलांकडे व्यक्त करतात. सागरला ते पटले. चौधरी दांपत्याशी बोलल्यावर सागरचे आईवडील वंदना आणि गणेश पाटील, अर्चनाचे वडील अशोक पाटील यांनीही ते उचलून धरले.
शहादा तालुक्यातल्याच पिंगाणे इथल्या नागेश्वर मंदिरात दीड महिन्यापूर्वी लग्न झालं. लग्नाला फक्त ५० माणसं. आदल्या दिवशी हळदीसाठीही सागरकडे ४०-५० माणसं होती. लग्नसमारंभावरचा खर्च टाळल्यामुळे झालेल्या बचतीतून सागर आणि अर्चना बडोद्याच्या घरासाठी अनेक संसारोपयोगी वस्तू खरेदी करू शकले. या विवाहाची चर्चा समाजात आणि खान्देशात होत आहे.
लग्न आता अशीच झाली पाहिजेत. किमान सामुदायिक पद्धतीनं तरी झाली पाहिजेत, असं संजय आणि स्मिताबेनना वाटतं. त्यासाठी ते प्रबोधन करत आहेत. 


- रुपेश जाधव, नंदुरबार 

पद्मश्री पुरस्कार विजेत्यांच्या कर्तृत्त्वाला उजाळा...

अहमदनगर जिल्ह्यातल्या बीजमाता राहीबाई पोपेरे आणि पोपटराव पवार. दोघांनाही यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तुत्वाला दिलेला उजाळा.
अकोले तालुक्यातील पश्चिम भागातल्या आदिवासी पट्ट्यातलं कोंभाळणे. तिथल्या राहीबाई सोमा पोपेरे. महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाईचं शिखर, हरिचंद्रगड, कोकणकडा, साम्रदची सानंद, अशी उंचचउंच कातळ शिखरं याच भागातील.
राहीबाईंच्या वडिलांकडची परिस्थिती गरिबीची असल्याने शाळा शिकता आली नाही. वयाच्या बाराव्या वर्षी लग्न. आदिवासी भागात देशी बियाणाचा वापर करुनच पिके घेतली जातात. त्यामुळे या भागातील बहूतांश कुटूंबे देशी वाणाचे संवर्धन करतात. राहीबाईंचं कुटूंबही तीन- चार पिढ्यापासुन देशी बियाणांचे संवर्धन करणारं. 2014 साली आदिवासी भागात महिलांसाठी काम करणाऱया बायफ या संस्थेच्या संपर्कात त्या आला. संस्थेचा महाराष्ट्र जनूककोश प्रकल्प या भागात सुरू झाला होता. संस्थेचे नाशिक विभागाचे समन्वयक जितीन साठे एकदा राहीबाईंच्या घरी गेले. तब्बल 54 पिकांचे 116 वाण आणि त्यात वाल आणि पावट्याच्या 20 वाणाचं संवर्धन त्या करत असल्याचं समजलं. 2016 मध्ये बायफच्या पुढाकारातून संस्थेचे अध्यक्ष गिरीष सोहनी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बियाणे बॅक सुरू केली. त्यांना ‘मदर ऑफ सीड’, बीजमाता अशी ओळख मिळाली. त्यांच्यामुळे दुर्मिळ देशीवाणांचे जतन होत आहे.
अकोले तालुक्यात महिला बचतगटाच्या माध्यमातून वाणांची विक्री होते. अनेक महिलांसाठी हे रोजगाराचे साधन बनलं आहे. परसबाग संकल्पनेच्या माध्यमातून देशी बियाणं राज्यभर पोहोचत आहे.
याच जिल्ह्यातले पोपटराव पवार. तीस वर्षापुर्वी नगर जिल्ह्यामधील सहा ते सात तालुके दुष्काळी. हिवरेबाजार नावाचे गाव त्यातील एक. दुष्काळाने पिचलेल्या आणि त्यामुळेरोजगाराच्या शोधात गाव सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. पण शहरात उच्च शिक्षण घेतलेले पोपटराव मात्र परतले.
नोकरीच्या शोधात असतानाच त्यांना गावांतील स्थिती मात्र स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे
त्यांनी नोकरी न करता गावी येऊन गावांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला आणि 1990 मध्ये गावांतील तरुणांना एकत्र केलं वृक्षलागवडीतून इतिहास घडवला.
जलसंधारणाची कामे केली. अल्प पाऊस पडूनही दुष्काळी हिवरेबाजार पाणीदार झाले. गावच्या शाळेतील मुल उपलब्ध झालेल्या पाण्याचा ताळेबंद मांडु लागले. एकेकाळी रोजगारासाठी दुसऱया गावांत जाणारे येथील शेतकरी आता शेकडो लोकांना
आपल्या गावांत रोजगार उपलब्ध करून देत आहेत. कोट्यावधीचं शेती उत्पन्न काढत आहेत. समस्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आदर्श घेऊन तीस वर्षापुर्वी गावातील व्यसनमुक्तीचा लढासुरू केला. ही चळवळ यशस्वी झाल्यानंतर त्यांना गावातील लोकांनी सरपंच होण्याचा आग्रह केला. सरपंच झाल्यानंतर त्यांनी पीकपद्धतीतबदल केला. कमी पाण्यावर येणारी पिकांना त्यांनी प्राधान्य दिलं. शेजारील डोंगरावर वृक्षलागवड केली. तसेच जागोजागी पाणलोटाची कामेकेली. त्यातून मोठ्याप्रमाणात पाण्याचा संचय झाला. त्यातून गाव खऱ्या अर्थाने हिरवे झाले. गावाचे उत्पन्न वाढले. तरूणांच्या हाताला
गावातच काम मिळाले. चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, कुपनलिका बंदी असे विशेष प्रयोगही त्यांनी केले. वीस वर्षापर्वीचगाव हागणदारीमुक्त केलं.गावातील सर्वच घरे महिलांच्या नावावर
आहेत. सर्व निर्णय ग्रामसभेला विचारात घेऊनच होतात. हिवरेबाजारला आतापर्यत दहा लाखापेक्षा अधिक लोकांनी भेटी दिल्यात. येथील कामाचा आदर्श घेऊन
राज्यात आणि देशात अनेक गावे समृद्ध झाली आहेत.
- सूर्यकांत नेटके, नगर
#नवीउमेद #अहमदनगर

डोक्यावरील हंडा आता नको...

उन्हाळा सुरू होण्यास महिनाभराचा कालावधी असला तरी आदिवासी महिलांच्या डोक्यावर हंडा येण्यास सुरूवात झाली आहे. पाणी भरण्यासाठी आदिवासी महिलांना कुठेतरी खोल दरीतील विहिरीवर, झऱ्यावर पाणी भरण्यासाठी ये-जा करावी लागते. एका फेरीत दोन दोन भरलेले हंडे डोक्यावर घेत दरड चढतांना त्यांची दमछाक होते. मानेचे, कमरेचे विकार सुरू होतात ते वेगळेच.
आदिवासी महिलांमागे लागलेले हे दुष्टचक्र भेदण्यासाठी सुलगाणा तालुक्यातील ठाणगाव परिसरात व्हेल्स अ‍ॅण्ड व्हिल्स या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने शाहज मेमन यांच्या सहकार्याने येथील महिलांसाठी ‘वॉटर व्हील ड्रम्स’ मोफत वितरीत करण्यात आले. हे ड्रम बाजारात दोन ते तीन हजारांपर्यंत मिळतात. एका ड्रमात ४५ लीटर पाणी बसते. हा ड्रम एक माणूस जमिनीवरून सहज ढकलत आणू शकतो. या ड्रममुळे आदिवासी महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरण्यास मदत होईल.
#नवीउमेद

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी: २० (वाचक : मेधा कुलकर्णी)

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=2384334025172485

ओळख नव्या आमदारांची : आमदार राम सातपुते (भाजप)


स्कील डेव्हलपमेंटवर भर देईन :
राम सातपुते हे मुळचे जिल्हा बीड येथील आष्टी तालुक्यातील धामणगावचे रहिवासी. वडील विठ्ठल आणि आई जिजाबाई आणि त्यांच्या तीन मुली असा त्यांचा परिवार. गावाकडे वडिलांचा पारंपरिक चप्पल तयार करण्याचा व्यवसाय. आजही त्यांचे गावाकडे दुकान आहे. माळशिरस तालुक्यातील भांबुर्डी कायम दुष्काळी गावात त्यांचे लहानपण गेले. घरची परिस्थिती बेताची होती. वडील विठ्ठल सातपुते यांनी ऊस तोडणीचे कष्टप्रद काम करुन मुलांना शिक्षण दिले.
माळशिरस येथील शंकर सहकारी साखर कारखान्याकडे विठ्ठल सातपुते हे 1990 ते 1995 पर्यंत ऊस तोडणीचे काम करत होते. त्यानंतर भांबुर्डे येथील मदने यांच्या शेतामध्ये चाकरी केली तेव्हापासून राम यांची माळशिरस तालुक्याशी नाळ जुळली.
संघाच्या बालसंस्कार वर्गातून त्यांची जडणघडण झाली. शाळा- महाविद्यालय जीवनापासून ते सामाजिक कार्याकडे वळले. गावी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी पुणे गाठले.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांचा विद्यार्थी संघटनेशी संपर्क आला. तेथूनच त्यांनी विद्यार्थी संघटनेच्या चळवळीला सुरुवात केली. ग्रामीण भागात वाढल्यामुळे अनेक प्रश्नांची जाण होती. त्यांना विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या प्रश्नातले गांभीर्य लवकर उमजत होते. त्यातूनच विविध आंदोलने उभारताना आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रशासनाकडून यशस्वीपणे सोडून घेताना त्यांचे नेतृत्व विद्यार्थ्यांमध्ये, युवकांमध्ये प्रस्थापित झाले.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कामाची दखल घेऊन गेल्या वर्षी राम सातपुते यांना भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आले. पक्षाचे काम करत असताना त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अनेक गरजू लोकांना मदत केली. भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, शिक्षणाचे बाजारीकरण विरोधात आंदोलन, सामाजिक प्रश्नांचे जागरण या माध्यमातून राम यांनी देशभर प्रवास केला. युवा मंत्रालयातर्फे दक्षिण कोरियात नेतृत्व केले होते. नॉर्थ इस्ट त्यांच्या अभ्यासाचा विषय.
राम यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 'थॉट्स ऑन पाकिस्तान' तसंच डॉ. संजीव सोनवणे यांची अहिल्यादेवी होळकर यांच्यावर लिहिलेली पुस्तके खूप आवडतात. ते मुळात सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळे जनतेशी त्यांचा चांगला संपर्क होता. त्यांचे काम पाहून हाय प्रोफाइल माळशिरस विधानसभा राखीव मतदार संघातून महायुतीचे उमेदवार म्हणून राम यांना निवडणुकीचे तिकीट मिळाले. यात त्यांनी उत्तम जानकरांचा पराभव करून विजय मिळवला.
सातपुते म्हणाले, माळशिरस तालुक्यामध्ये रस्त्यांची मोठी समस्या आहे. ती समस्या मार्गी लावीन. तालुका पातळीवर रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. ती भरती व्हावी या संदर्भात प्रयत्न करीन. शेती सिंचनाच्या सोयी सुविधा वाढविण्यावर माझा भर असेल. नगरपंचायत परिसरात एमआयडीसी असणे आवश्यक आहे. त्यामुळे युवकांना रोजगार प्राप्त होईल. स्कील डेव्हलपमेंटवर भर देईन. लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांना शासनाकडून अर्थसाह्य मिळवून देण्याचा प्रयत्न करीन. मोदी सरकारने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अनेक चांगली कामे केली आहेत. तीच कामे तालुका पातळीवर सुरू अाहेत.
सर्वसामान्य नागरिकांची कोणतीही कामे पैसे दिल्याशिवाय होत नाहीत. ही आर्थिक लूट थांबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन. ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी पुणे मुंबईला जावं लागतं, मतदारसंघात त्यांच्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र सुरू करण्याचा उद्देश आहे. अभ्यासिका अाणि दर्जेदार मार्गदर्शक या केंद्रात उपलब्ध असतील. कुस्ती प्रशिक्षणाचे आंतरराष्ट्रीय केंद्र सुरू करायचं अाहे. माती परीक्षण केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करेन
आणि राहुरी कृषी विद्यापीठाचे उपकेंद्र मतदारसंघात आणण्याला माझे विशेष प्राधान्य राहील.

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी : १९ (वाचक : अश्विनी जोग)

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=2505692006421300

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी : १८

व्हिडीओ लिंक : 
https://www.facebook.com/sampark.net.in/videos/417411649153580/

मंगेशच्या निबंधानं अनेक मुलांना मदत मिळण्याची शक्यता


मंगेशसारख्या विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष तीन हजार रुपये शिष्यवृत्ती सरकारकडून देता यावी यासाठी प्रस्ताव तयार करा, अशा सूचना शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यामुळे अनेक मुलांना मदत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मंगेशच्या निबंधाची दखल कडू यांनी घेतली. २३ जानेवारीला त्यांनी मंगेश, त्याची आई आणि शिक्षिका नजमा शेख यांना विधानभवनात बोलावलं होतं.
बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातल्या देवीनिमगाव जवळ वाळकेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. वाळकेवस्ती , अनारसे वस्ती इथल्या मुलांसाठी ती आहे. या शाळेत चौथीच्या वर्गात मंगेश शिकतो.
सप्टेंबर २०१९ मध्ये मंगेशचे वडील वारले. त्याची आई शारदा वाळके. शारदाताई दिव्यांग. कसाबसा त्या घराचा गाडा हाकतात. शाळेत मुख्याध्यापिका आणि मंगेशच्या वर्गशिक्षिका नजमा शेख यांनी मुलांना आपले वडील या विषयावर निबंध लिहायला सांगितलं होतं. आपलं दुःख, वडिलांच्या पश्चात झालेली घराची व्यथा मंगेशनं निबंधात व्यक्त केली. 'माझे पप्पा काही दिवसांपूर्वी टीबीच्या आजाराने वारले, मी पाण्यात बुडत असलेली गाय कशीबशी बाहेर काढली, आम्हाला कोणीही मदत करत नाही, मला आणि आईला चोरांची भीती वाटते, पप्पा मला तुमची खूप आठवण येते'. अशा अत्यंत भावनिक शब्दात मंगेशने आपली व्यथा लिहिली होती. निबंध वाचून कवयित्री असलेल्या शेख मॅडमना गहिवरून आलं. आपल्या काही शिक्षक सहकाऱ्यांना त्यांनी मंगेशचा निबंध दाखवला . त्यांच्या मदतीनं तो सोशल मीडियावर प्रसारित केला. विविध माध्यमात याची जोरदार चर्चा सुरू झाली.


राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यापर्यंतही हा निबंध पोहोचला. त्यांनी 19 जानेवारीला तात्काळ समाजकल्याण विभागामार्फत 'दिव्यांग बीज भांडवल योजनेअंतर्गत 1.5 लाख रुपये स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य , जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण निधीतून शेष ५%, बस पास, यु. डी. आय.डी. कार्ड, तसंच दिव्यांग महामंडळामार्फत रोजगारासाठी अर्थसाहाय्य अशा योजना लागू केल्या. मुंडे यांनी वाळके परिवाराला भरीव आर्थिक मदत करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
आष्टी तहसील कार्यालयातील तहसीलदार वैभव महिंद्रकर , नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे , निलिमा थेऊरकर , शारदा दळवी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धान्य , कपडे आणि रोख रकमेची मदत केली . गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनीही शाळेला भेट देऊन मदत केली .
बीड येथील स्नेह सावली प्रकल्पाचे संचालक निलेश मोहिते यांनी तर मंगेशसह त्या वस्तीवरील पाच मुलींना शिक्षणासाठी सर्व सुविधा देण्याची तयारी दाखवली .
कडा येथील डॉ सचिन टेकाडे आणि डॉ मंजुश्री टेकाडे यांनी मंगेश आणि शारदाताईंना मोफत आरोग्यसुविधा देण्याची जबाबदारी घेतली . याशिवाय अनेक ठिकाणाहून शारदाताईंच्या बँक खात्यात मदत करण्यासाठी विचारणा झाली .

-राजेश राऊत , बीड

माने सरांच्या शाळेतला प्रत्येक विद्यार्थी आनंदी का आहे




माने सर मूळचे अंबाजोगाईचे. गेली १४ वर्ष ते शिक्षक आहेत. त्यातली ११ वर्ष आदिवासी, नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यातली.अनेक आदिवासी गोंडी विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणलं. सध्या परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातल्या पारडी इथल्या जिल्हा परिषद शाळेत. त्यांचं स्वतःचं शिक्षण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत झालं. लहानपणी मनातले गुरुजी न लाभल्याची खंत ते दूर करत आहेत.  त्यासाठी, अमृतकण, मित्र माझा आरसा,,वाचनाचा आनंद सोहळा,बालसभा,वर्ग दैनंदिन अहवाल, परीक्षण,प्रश्न आमचे उत्तर तुमचे, मला बोलू द्या, लेखक आपल्या भेटीला, आम्ही असे घडलो,जागर शिक्षणाचा, उत्कृष्ट वाचक पुरस्कार, शाळा रत्न पुरस्कार, निवड एकलव्याची, बालकुमार मेळावे, पुस्तक भिशी, एक क्षण स्वच्छतेचा,माझा वर्ग माझी रांगोळी,प्रश्नपेटी,माझा वाढदिवस,थीम फलक,चालता बोलता,चला मुलाखत घेऊया, शिवार भ्रमंती,सीड बँक,कानगोष्ट,पुस्तक पासबुक,माझी सखी रोजनिशी,एक सप्ताह एक विद्यार्थी भेट,मान्यवरांशी चलभाषेवरून संवाद,ग्रामसभेत सहभाग असे अनेक कल्पक उपक्रम.
या उपक्रमांमुळे विद्यार्थी वाचनाबरोबरच लेखनाकडे वळतात. पेन मित्रमुळे राज्यातले जिल्हाधिकारी, साहित्यिक,समाजसेवक असे १५० जण विद्यार्थ्यांचे मित्र झाले आहेत. २०० पत्रं विद्यार्थ्यांकडे जमली आहेत. बाहेरच्या जगाशी विद्यार्थी जोडले गेले आहेत.
ज्ञानपोईच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते. मुलांना कोणाशीही निर्भीडपणे संवाद साधता यावा यासाठी बालसभा.
अभ्यासातली सर्वांची गती सारखी नसते. अभ्यासात आपला मित्र मागे असेल तर त्याला सोबत घेतलं पाहिजे, आपण जिंकलं पाहिजे न सोबत आपला मित्रही, ही भावना निर्माण व्हावी यासाठी जिंकू जिंकू. दर महिन्याला एक लेखक ते शाळेत बोलावतात.शाळेला गावकऱ्यांचा हातभार लागावा यासाठी वर्षातून तीन वेळा जागर शिक्षणाचा.
आबा महाजन यांच्या पुस्तकाचं बंजारा भाषेत पारडीच्या मुलांनी अनुवादित केलेलं 'आनंदेरो झाड' हे पुस्तक नोव्हेंबरमध्ये मुंबईत ग्रंथालीच्या दिनकर गांगल यांच्या हस्ते प्रकाशित झालं.
''विद्यार्थ्यांनी मला श्रीमंत केलं आहे विद्यार्थी यशस्वी झाला की शिक्षकाच्या श्रमाचं चीज होतं.'' असं माने सर म्हणतात.



''प्राथमिक शिक्षण म्हणजे भविष्याचं बीज. शिक्षण मुलांच्या जीवनात आनंद फुलवणारं असलं पाहिजे आणि त्याचं माध्यम म्हणजे शिक्षक.'' युवराज माने सर सांगत होते.

मुख्याध्यापिका...

मागील ५ वर्षांपासून आम्ही आमच्या शाळेत परिपाठात मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्याचा उपक्रम राबवित आहोत. यामुळे विद्यार्थ्यांना लहान वयातच संविधानाची माहिती मिळत आहे.
- उर्मिला पाटील, मुख्याध्यापिका,
वसंतदादा पाटील हायस्कूल, लोहारा,
जिल्हा उस्मानाबाद
व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=179334716489827

गेल्या पाच वर्षांपासून मुलं वाचताहेत संविधान उद्देशिका

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोहारा येथील वसंतदादा पाटील हायस्कूल ही १ ते १० वी पर्यंतची शाळा. शाळा विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी अनेक उपक्रम आखत असते. यापैकीच एक, परिपाठात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन. मागील ५ वर्षांपासून हा उपक्रम दररोज सुरू आहे.
२६ जानेवारीपासून प्रत्येक शाळेत परिपाठाच्या वेळी दररोज संविधानाच्या उद्देशिकेचे समूह वाचन घेण्यात यावे असा शासन निर्णय नुकताच झाला. मात्र, लोहारा येथील ही शाळा मागील ५ वर्षांपासून हअसं वाचन करतच आहे. सोम-मंगळ मराठी भाषेत, बुध-गुरु हिंदीत तर शुक्र-शनि इंग्रजीमधून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात येते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना लहानपणापासून संविधानाची माहिती होत आहे.
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली. या निमित्ताने प्रत्येक वर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वांची व्याप्ती व सर्वसमावेशकता सर्व नागरिकांना समजावी आणि घटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुता ही मुलतत्वे मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय होणे आवश्यक आहे.
भारतीय संविधानातील मूलतत्त्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये यांची रूजवणूक शालेय मुलांच्या मनात झाली की मोठं झाल्यावर ते जबाबदार, सुजाण नागरिक घडती, असा विश्वास वाटतो.
.-गिरीश भगत, उस्मानाबाद


व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=272696227026968

स्वेटर



डिसेंबर महिना सुरू झाला आणि स्टेशन जवळील रस्त्यावर स्वेटरचे ढीग दिसायला लागले. नेपाळी आणि तिबेटी विक्रेते लोकांना स्वेटर दाखविण्यात मग्न झाले. या स्वेटर विकणार्‍यांच वैशिष्ट्य म्हणजे ते "स्वेटर लेलो भाई! स्वेटर लेलो" असं कधी म्हणत नाहीत आजूबाजूला असणारे रंगीबिरंगी स्वेटर जणू ते काम करत असतात. काही लोक म्हणतात हे स्वेटर प्युअर लोकरीचे नसतात. पण मला वाटतं हे स्वेटर गरीब लोकांची थंडी पळवण्याचे काम नक्कीच करतात.
लहानपणी मला डून स्कूल किंवा तत्सम उच्चभ्रू शाळेत जाणाऱ्या मुलांच्या मरून किंवा लालसर रंगाच्या स्वेटर बद्दल खूप आकर्षण होते. किती रुबाबदार दिसायची ती मुलं! नंतर क्रिकेटची आवड निर्माण झाल्यावर क्रिकेटपटूच्या पांढऱ्या रंगाचे, निळ्या रंगाची बॉर्डर असणारे स्वेटर खूप आवडायचे.
पूर्वीच्या हिंदी चित्रपटांचे नायक तर वेगवेगळ्या डिझाईनचे स्वेटर घालायचे ते पण छान दिसायचे.
मला मात्र फुल शर्ट घालून वर हाफ स्वेटर घालायला आवडतो.

दिवाळीच्या आधीच कुठला स्वेटर घ्यायचा याबद्दल विचारमंथन चालू होते. दिवाळीला दोन्ही मुलं परदेशाहून येणार होती मनात म्हटलं मुलं आल्यावर त्यांना सांगूया इथूनच स्वेटर आणायला कारण तिथून आणायला सांगितले आणि बरोबर मापाचा झाला नाही तर पंचायत व्हायची! धाकटा मुलगा आधी आला आणि आल्याबरोबर बॅग उघडून त्यातील एकेक भेटवस्तू काढून देऊ लागला. आईसाठी आणि इतर नातेवाईकांसाठी त्याने भेटवस्तू आणल्या होत्या. मनात म्हटलं, माझ्यासाठी काही आणलं आहे की नाही, तेवढ्यात एक पिशवी पुढे करून म्हणाला "बाबा! हे तुमच्यासाठी "मी म्हटलं "काय आहे?" म्हणाला, "उघडून तर बघा" आणि उघडून बघितलं तर काय चक्क स्वेटर होता माझ्या आवडीच्या रंगाचा! "अरे खूप महाग असेल ना! इथे स्वस्त मिळाला असता"
"नाही बाबा! तुमच्या सुनेने स्वतःच्या हाताने विणलेला आहे. रोज ती कामावरून आल्यावर दोन-दोन तास महिनाभर विणत होती."
माझ्या डोळ्यात टचकन पाणी आले. दर आठवड्याला मुलाचा आणि सुनेचा फोन येतो पण ती माझ्यासाठी स्वेटर विणत होती याचा थांगपत्ता त्यांनी मला लागू दिला नाही. कारण त्यांना मला सरप्राईज द्यायचे होते ना! मी मुलाला म्हटले, "अरे! हा स्वेटर महाग नाही तर अमूल्य आहे आणि उबदार सुद्धा कारण यात माझ्या मुलीचे प्रेम आहे.'
माझ्या दोन्ही सुना म्हणजे माझ्या मुलीच आहेत हे परत एकदा मला पटले.
- सुधीर शेवडे ठाणे

यशोमती ठाकूर यांच्याशी संवाद

विदर्भातील तिवसा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या काॅंग्रेसच्या यशोमती ठाकूर नुकत्याच महिला आणि बालविकास खात्याच्या मंत्री झाल्या. कालच त्यांची संपर्कच्या टीमने भेट घेतली. महिलांच्या समस्या किती वेगवेगळ्या आहेत आणि त्या सोडवण्यासाठी कसे प्रयत्न करणार ते त्यांनी या भेटीत सांगितलं.
यावेळी संपर्क प्रतिनिधींनी महिलांच्या समस्या, विशेषतः बालविवाहाच्या वाढत चाललेल्या कुप्रथेवर विधिमंडळाच्या अधिवेशनात चर्चा व्हावी, अशी मागणी केली.


व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=123905552150687

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी: १७

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=430325017645766

या दिव्यांग शाळेचे जवळपास ९० %विद्यार्थी यशस्वीपणे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत


संतोष वाघमारे, प्रमोद बिराजदार, जयश्री जाधव, स्नेहा कोकाटे, प्रयाग पवळे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोहारा तालुक्यातल्या सास्तूरच्या निवासी दिव्यांग शाळेचे विद्यार्थी. आपापल्या कलागुणांनी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत.
शाळेनंतर अभियांत्रिकी, विधी, नर्सिंग अशा विविध शाखांमध्ये प्रवेश मिळालेले अनेक विद्यार्थी. शासकीय, निमशासकीय सेवेबरोबरच उद्योगव्यवसाय करणारे. शाळेचे जवळपास ९० %विद्यार्थी यशस्वीपणे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. दिव्यांग म्हणजे परावलंबी या धारणेला या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी छेद दिला आहे.
१९९३ चा किल्लारी भूकंप. परिसरातल्या ५२ गावांवरची मोठी आपत्ती. अनेक जण अपंग झाले. विशेषतः ६ ते १८ वयोगटातली मुलंमुली. त्यांच्या पुनर्वसनाचं महत्त्व श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाला उमगलं. त्यातूनच १० मार्च १९९५ ला दिव्यांगांसाठी निवासी शाळा आणि व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू झालं. शाळेत काही अनाथ विद्यार्थीही आहेत.
शाळेचा परिसर विविध झाडांनी बहरलेला. समर्पित वृत्तीचे शिक्षक आणि कर्मचारी. त्यामुळे मूल एकदा शाळेत आलं की शाळा त्याला घरच वाटते.
शाळेचा निकाल बहुतांश करून १००%. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परिक्षांची माहिती शाळा देते. त्याची पूर्वतयारी करून घेते. डॉ. होमीभाभा स्पर्धा परीक्षा , शिष्यवृत्ती , एम टी एस, नवोदय , इतिहास प्रज्ञा शोध परीक्षा, एलिमेंटरी - इंटरमिजीएट चित्रकला परीक्षा, यासाठी मुलांना प्रोत्साहन दिलं जातं. ई लर्निंग,संगणक प्रशिक्षण आहेच. कला, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर मुलांनी गुणवत्ता सिद्ध केली आहे.
काही प्रमाणात शासकीय अनुदान आणि प्रामुख्यानं मोठ्या शहरातल्या दानशूर व्यक्तींकडून मिळणारं साहाय्य यावर संस्थेचा गाडा चालला आहे.
समस्येला आत्मविश्वासानं,हिमतीनं सामोरं जाण्याचं बाळकडू इथं मुलांना मिळतं. 

- गिरीश भगत, उस्मानाबाद. 

इथं केलं जात संशोधन...

नंदूरबार जिल्ह्यातलं शहादा. इथल्या साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचं फार्मसी कॉलेज. नवी उमेद नुकतंच इथं सोशल मीडिया वापरःतंत्र आणि मंत्र या विषयावर कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेला मुलांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यावेळी सहभागींनी काही विषयावर पोस्ट तयार केल्या. त्यातीलच ही एक व्हिडिओपोस्ट.
नंदूरबार जिल्ह्यातलं शहादा. इथल्या साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचं फार्मसी कॉलेज. फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस.पी.पवार तसंच फार्माकोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ.जी.एम.चव्हाण यांनी प्राणी प्रयोगशाळेविषयी माहिती दिली. सर सांगतात, या प्रयोगशाळेला पशू प्रयोग नियंत्रण समितीची अर्थात सीपीसीएसईएची मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे इथं प्रयोगासाठी लागणारे उंदीर, अल्बिनो उंदीर, ससे उपलब्ध असतात. या प्राण्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन केलं जातं. त्यातील मुख्य म्हणजे मेंदूचे रोग, मधुमेह व पोटाचे रोग इत्यादी आहेत.
प्राणी प्रयोगशाळेत प्राण्यांची पूर्णपणे काळजी घेतली जाते. त्यांच्या आहार- राहण्याचे वातावरण यावर नियंत्रण ठेवण्यात येते. तसंच वेळोवेळी त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. संशोधन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची यंत्रसामुग्रीही इथं उपलब्ध आहे.

व्हिडीओ लिंक :
https://www.facebook.com/watch/?v=604232960333763

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी: १५ (वाचक : दिनेश अदावडकर)

व्हिडीआे लिंक : https://www.facebook.com/watch/?v=164282681548359

मुलगा-मुलगी भेद नको; मुलगी झाली खेद नको


बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे 'मुलगा-मुलगी भेद नको; मुलगी झाली खेद नको' हा मोलाचा संदेश देण्यासाठी सामान्य रुग्णालयाच्या परिचारिका पुढाकार घेत आहेत. नुकत्याच झालेल्या मकर संक्रांतीपासून इथं कन्या जन्माचे स्वागत सुरू करण्यात आलं. मातेला साडीचोळी आणि बाळाला झबलं दिला जाईल. त्यासाठी परिचारिका स्वतः खर्च करणार आहेत. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश टापरे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम नियमित सुरू ठेवला जाणार आहे. इथून पुढे दर बुधवारी हा उपक्रम केला जाईल असं डॉ.निलेश टापरे यांनी सांगितलं.
बुलढाणा जिल्ह्यात शासनाच्यावतीने बेटी बचाव बेटी पढाव हा उपक्रम अनेक वर्षांपासून राबविला जातो. या उपक्रमाची आणखी जागृती व्हावी कन्या जन्माचे स्वागत व्हावे यासाठी आता सामान्य रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. एका बाजूला मुलींना कमी लेखणारी मुलींच्या विरुद्ध असलेली समाजरचना आणि दुसऱ्या बाजूला सहजरीत्या परवडू शकणारी गर्भलिंग परीक्षणाची सोय यामुळे स्त्री-भ्रूण हत्येत वाढ होऊन बाल लिंग गुणोत्तर प्रमाण दिवसेंदिवस कमी होत गेलेले दिसते. त्यासाठी सरकारने मुलगी वाचवा मुलगी शिकवा योजना सुरू केली आहे. मुलींच्या कमी होत जाणाऱ्या जन्मदर समस्येला तोंड देण्यासाठी ही योजना 2014च्या ऑक्टोबर महिन्यापासून सुरू केली आहे. त्यामुळे आता ही देशव्यापी मोहीम चळवळ बनली आहे. मात्र समाजात अजूनही पाहिजे तशी जागृती नाही त्यासाठी आता खामगावात जन्माचे स्वागत हा उपक्रम राबविला जाणार आहे.


- अमोल सराफ, बुलढाणा

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=164282681548359
 

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी: १४ (वाचक : सविता दामले)

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=544493509686162

ओळख नव्या आमदारांची : सरोज आहिरे (राष्ट्रवादी काँग्रेस)

मतदारसंघ देवळाली, जिल्हा नाशिक
महिला आणि युवकांच्या हाताला काम मिळवून द्यायचं आहे
"वडिल बाबुलाल आहिरे आमदार होते. या गोष्टीला ४० वर्ष झाली आणि त्यांना जावून ३० वर्ष. मात्र त्यांनी त्यांच्या मतदार संघात केलेली कामे-लोकांशी असलेला त्यांचा जनसंपर्क यामुळे आज त्यांची मुलगी म्हणून लोकांनी मताच्या स्वरूपात दिलेला आशिर्वाद माझ्यासाठी लाखमोलाचा आहे हीच आजवरच्या प्रवासाची शिदोरी", अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदार सरोज आहिरे आपल्या भावना व्यक्त करतात.
देवळाली मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला. माजी मंत्री बबन घोलप यांचे वर्चस्व असतांना चार वेळा निवडून आलेल्या तत्कालिन सेनेचे आमदार योगेश घोलप यांना शह देत आ. सरोज यांनी देवळा मतदार संघात विजय संपादन केला. राजकीय परिभाषेत त्या ‘जायंट किलर’ ठरल्या. नगरेसवक असतांनाही त्यांनी सेनेच्या माजी महापौर नयना घोलप यांचा पराभव करत नगरसेवक म्हणून काम करण्यास सुरूवात केली. नगरसेवकची पहिली टर्म पूर्ण होण्याआधीच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले. त्यांनी आमदारकीसाठी भारतीय जनता पक्षाकडे मागणी केली. मात्र युतीमुळे तो मतदार संघ सेनेला सुटला. सरोज यांनी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करत देवळा मतदार संघात निवडून लढविण्याचा निर्णय घेतला. आमदारकीच्या निवडणुकीसाठी बदलती राजकीय समीकरणे-आर्थिक जुळवाजुळव सरोज यांना परवडण्यासारखी नव्हती. सरोज यांच्यासाठी मतदार संघातील लोकच पुढे आले. प्रचारासाठी येणाऱ्या सरोज यांना आर्थिक मदत त्यांनी केली. नगरसेवक म्हणून सरोज यांचे काम पाहता त्यांना आमदार म्हणून काम करण्याची संधी जनतेने दिली. या ॠणातून मुक्त व्हायचे नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
कौटुंबिक अडचणीमुळे अर्धवट राहिलेले शिक्षण सरोज सध्या पूर्ण करत आहेत. कला शाखा पदवीच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा त्या देणार आहेत. भटकंती हा त्यांचा छंद असल्याने मतदार संघातील दौरा हा त्यांच्या आवडीचा भाग आहे.
आमदार म्हणून सूत्रं हाती घेतांना मतदार संघातील बंद असलेला साखर कारखाना आणि कधीही बंद होऊ शकेल असा एकलहरा वीज प्रकल्प सुरू कसा राहिल यासाठी त्यांना प्रामुख्याने काम करायचे आहे. या माध्यमातून महिला, युवक यांना काम मिळेल. ‘हाताला काम मिळालं’ की पुढचे प्रश्न गौण ठरतात असे सरोज सांगतात. या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच कामाला सुरूवात होईल. मतदार संघातील बहुतांश भाग हा ग्रामीण व आदिवासी असल्याने या ठिकाणी शिक्षणाचा अभाव आहे. येथील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देता येईल अशी शाळा उभारायची असा सरोज यांचा ध्यास आहे. आरोग्याच्या अडचणी पाहता प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात गुणवत्तापूर्ण सुविधा देण्यावर त्यांचा भर आहे. स्वच्छतेसाठी सद्य स्थितीत प्रबोधनावर भर देण्याकडे सरोज यांचा कल आहे. मतदार संघातील पाण्याचा प्रश्न कसा सुटेल यासाठी त्या आग्रही आहेत. गावागावात स्वच्छ पाणी कसे पोहचेल यासाठी त्यांचा अभ्यास सुरू आहे.
महिला-युवती व बालकांच्या सर्वांगिण विकासासासाठी त्यांना स्वसंरक्षण महत्त्वाचे वाटते. समुपदेशन, स्वसंरक्षण कार्यशाळा, जिल्हा परिषदेच्या शाळांचे रुप बदल बालकांना शिक्षणातून आनंद कसा मिळेल यासाठी काय करता येईल यासाठी माहितीची जमवाजमव सुरू आहे. सर्व कामांची रुपरेखा तयार असून पाच वर्षात त्या सॉर्टआऊट कशा होतील यासाठी पाऊले टाकण्यास सुरूवात झाली असल्याचे सरोज यांनी नमूद केले.
दुसरीकडे, पक्षाच्या जाहिरनाम्यानुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी, बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट होणार नाही, त्यांच्या मालाला योग्य भाव कसा मिळेल याकरता चर्चेपेक्षा कृतीवर भर देण्याचा त्यांचा मानस आहे.
#नवीउमेद #देवळाली #नवेआमदार #नाशिक #सरोजआहिरे

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी: १३

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=791285284654474

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी: १२ (वाचक : माधवी कुलकर्णी)

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=403945440529565

आतोणे शाळेतल्या मुलांचं वादन...

रोहा तालुक्यातल्या आतोणे गावातल्या शाळेतली ही मुलं. आम्ही मध्यंतरी मुलांना शाळेत खाऊ, खेळणी दिली. त्यातच हे डफलीसारखं वाद्यही होतं. मुलांना बाकी खेळाचा आनंद तर लुटलाच, पण हे आगळं वाद्यही त्यांना मनापासून आवडलं. हे साथीला घेऊन मुलंमुली गाण्याचा आनंद लुटत आहेत. हा व्हिडीओ पाठवला आहे गजानन जाधव या त्यांच्या सरांनी.

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/sampark.net.in/insights/?section=navPosts

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी: ११ (वाचक : मृणालिनी जोग)

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/sampark.net.in/insights/?section=navPosts

विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेलं सेवा किचन


बुलडाण्यातलं राजर्षी शाहू औषध निर्माण महाविद्यालय. या महाविद्यालयात अंतिम वर्षाला असलेले पवन, ऋषिकेष, राजेश, शाहदान,सोहेल, हर्षदा, किशोर आणि त्यांचे इतर मित्रमैत्रिणी. ग्रामीण भागातून आलेली ही मुलं. त्यांना इनोस्पायर या विभागीय स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळालं. या रकमेतून काही तरी चांगलं करावं, विशेषतः गरजू विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं असं वाटत होतं. त्यातून तीन महिन्यांपूर्वी सुरू झालं सेवा किचन.
चिखली रोडवर हे हॉटेल आहे. सुट्टीच्या दिवशी म्हणजे दर रविवारी इथं विद्यार्थ्यांना पोटभर जेवण दिलं जातं. इथं मेन्यू आणि रेट कार्ड नाही. बेत ठरलेला. फ्रुट कस्टर्ड, पालकपुरी, छोले आणि कढीखिचडी. विशेष म्हणजे इथं पैसे द्यायची सक्ती नाही. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही मदत करू शकता. मुलांना यातून गरजू मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची तरतूद करायची आहे. या हॉटेलमध्ये सुविचारांबरोबर एक पाटी आहे . त्यावरच लिहिलं आहे , 'सेवा किचन'मध्ये या.. अन् मोफत पोटभर जेवा!
किचनमध्ये अनेक विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत. हॉटेलमधे काम करणारी मुलं विविध जातीधर्माची आहेत. सर्वांनी आपले आडनाव हे भारतीय ठेवलं आहे. त्यामुळे हे कुण्या एकाचं नाही, सर्वांचं आहे असा संदेश दिला जात आहे. जास्तीत जास्त ग्राहक येतील आणि त्यातून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागेल असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. 


-दिनेश मुडे, बुलडाणा 

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी: १० (वाचक दिनेश अदावडकर)

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=2391746347746670

एका बापाचे लेकरास पत्र

आत्महत्येच्या बातम्यांनी अस्वस्थ झालेल्या लेकरास या बातम्या वाचून अस्वस्थ झालेला एक बाप लेकराला पत्र लिहितो . त्या पत्राचा प्रवास एका लघुपटापर्यंत झाला .डिप्रेशन ही एक जागतिक समस्या . आपल्या अनेकविध आजारांच्या कारणातली ४० टक्के कारणं ही खिन्नमनस्कतेशी निगडित .आपल्या जगण्याला व्यापून टाकणारी समस्या .. काही जणांच्या आत्महत्येपर्यंतच्या प्रवासाला कारणीभूत ठरणारी.उत्तर शोधायची .. कुठे .. केव्हा ... आणि कुणी ...न संपणारे प्रश्न ..पण शांतपणे विचार केला की लक्षात येतं , या प्रश्नांची उत्तर आपणच शोधायची आहेत .ती उत्तर आपल्याच जगण्यात दडलेली आहेत.अगदी आपल्या जन्मापासूनच नव्हे तर जन्माची चाहूल लागल्यापासूनच.हा लघुपट म्हणजे ..स्वत:चा शोध घेण्याचा धडा .स्वत:लाच समजावून सांगण्याचा एक आत्मशोध आनंदाने जगण्याचा आनंदाने जगवण्याचा आनंदाने जगू देण्याचा. रुद्रेश , अनिरूध्द आणि सचिन यांनी माझी संकल्पना तितक्याच तरलतेने मांडली आहे.
असोशीने आणि कसोशीने जगण्याचा आनंद घेण्याची आणि देण्याची वृत्ती हा लघुपट पाहून निर्माण व्हावी हीच तीव्र इच्छा .आनंदाने जगण्याची उमेद जागवण्यासाठी,स्वतः आत डोकावून पाहिलं तरी पुरेसे आहे; हे लक्षात आणून देण्यासाठी ही फिल्म.
-डाॅ. श्रीकांत कामतकर
drkamatkar@gmail.com
9822215118
  

व्हिडीओ लिंक : https://www.youtube.com/watch?v=1kjYhQeQIJo&feature=youtu.be&fbclid=IwAR04CnDONeRi5UGia1saFHKpVaQdojUI0XSe1fy-0yawCPe8s6HcveLzHmA

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी : ९

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=701057860407529

महिलांच्या दराऱ्यानं हातभट्ट्या बंद

दारू पिणाऱ्याला १० हजार दंड .. विक्री करणाऱ्याला २० हजार रुपये दंड ... गाव शिवारात गावठी दारू निर्मिती करणाऱ्याला ५० हजार रुपये दंड आणि जो दारू निर्मिती करणाऱ्याला पकडून देईल त्याला आकर्षक बक्षीस .. समशेरपूरमधल्या महिलांनी हा ठराव केला आहे.
समशेरपूर, आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यातलं गाव. वस्ती साधारण दीड हजार. गावात २५ बचतगट. हैदराबाद घटनेनंतर या महिलांमध्येही चर्चा सुरू झाली. चकमकीत संशयित मारले गेले. पण महिलांवर होणारे अत्याचार, शोषण संपेल का? ते संपवण्यासाठी मूळ समस्येवर काम करणं आवश्यक आहे, असं या महिलांना वाटलं. महिलांच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषणाचे सर्वात मोठे कारण आहे, व्यसन. मद्य आणि अंमली पदार्थांपासून मुक्त समाज घडवला तर महिलांच्या शोषणात मोठी घट होईल. बचतगटांच्या विकासातही व्यसनी लोकांकडून अडथळे येत होते. संघटित असूनही हे थांबवता येत नसेल तर काय उपयोग... या मंथनातूनच निर्धार पक्का झाला. सरपंच गीतांजली पाटील यात अग्रणी होत्या.
दारूबंदीसाठी महिलांनी ग्रामसभा घेतली. सुरुवातीला प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नव्हतं. मग महिलांनी स्वतःच आचारसंहिता तयार केली. तीन किलोमीटरच्या शिवारात दारू विक्री आणि पिणाऱ्यांना दंड. या निर्णयाची माहिती देणारे बॅनर गावात लावण्यात आले. मग महिलांनी गस्त सुरू केली. या निश्चयी आणि संघटित महिलांचा दरारा एवढा आहे की या परिसरातल्या हातभट्ट्या जवळपास बंदच झाल्या आहेत.
गावातल्या अनेक पुरुषांचा पाठिंबा त्यांना आहे आणि आता पोलिसांचीही साथ त्यांना आहे. या उपक्रमाची जिल्ह्यातही चर्चा होत आहे.

- कावेरी परदेशी, नंदुरबार

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी : ८ (वाचक : लता परब)

व्हिडीओ लिंक :  https://www.facebook.com/watch/?v=945973885760423

महिलांसाठी पोलिसांचे ‘सुरक्षा कवच’, सुरक्षेत आता हद्दीचा नाही अडसर


‘रात्री अकराची वेळ. बीड शहरापासून दूर खंडेश्वरी मंदिर परिसर. दोन मुलींची दुचाकी बंद पडते. महिला हेल्पलाइन १०९१ वर त्या फोन करतात. बीड पोलिसांच्या नियंत्रण कक्षात त्यांचा संपर्क होतो. घरी जाण्यासाठी त्या पोलिसांची मदत मागतात. अवघ्या सात मिनिटांत या मुलींजवळ पेठ बीड पोलिसांची व्हॅन, पुरुष आणि महिला पोलिस कर्मचारी हजर होतात. बऱ्याचदा उपाययोजना, उपक्रम जाहीर होतात. पण स्थानिक पातळीवर त्याची व्यवस्थित अंमलबजावणी झाली तरच त्याचा उपयोग. पोलीस सुरक्षा कवच उपक्रमाबाबत शहरातल्या पत्रकारांनी मिळून याबाबत पडताळणी केली. त्यात आलेला हा समाधानकारक अनुभव. महिला, मुलींच्या मदतीसाठी रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत बीड पोलिसांनी सुरु केलेला हा उपक्रम चर्चेचा ठरत आहे.
हैदरबाद, उन्नावच्या घटनांनी देशात संतापाची लाट उसळली. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. हैदराबाद घटनेत रात्री नऊच्या सुमाराला डॉक्टर तरुणीवर दुर्देवी प्रसंग ओढावला होता. ही बाब लक्षात घेऊन बीडचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी बीड जिल्ह्यात ‘पोलिस सुरक्षा कवच’ उपक्रम सुरु केला आहे.
या उपक्रमाविषयी सांगताना एसपी हर्ष पोद्दार म्हणतात, ''महिला मग त्या अधिकारी, कर्मचारी असोत अथवा मजूरी करणाऱ्या कामगार ; घरी परतण्यासाठी अनेकदा उशीर होतो. त्यावेळी त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. रात्रीच्या वेळी रिक्षा, बस मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन त्यांच्या मदतीसाठी सुरक्षा कवच उपक्रम सुरू केला आहे. रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत कोणत्याही महिलेला मदतीची गरज असेल तर १०० क्रमांकावर अथवा पोलिसांच्या नियंत्रण कक्षात ०२४४२-२२२३३३, २२२६६६ अथवा महिला मदतीसाठीच्या १०९१ या क्रमांकावर संपर्क करावा. महिला, युवती जिथे असेल तिथे जवळच्या ठाण्याचे पोलीस तात्काळ पोहचतील आणि महिलेला पोलीस वाहनातून थेट तिच्या घरी सोडण्यात येईल. महिला दुसऱ्या जिल्ह्यातील, लांब राहणारी असेल तर रात्रभर तिला सुरक्षित वाटेल अशा ठिकाणी तिची राहण्याची व्यवस्था करण्यात येते. सकाळी तिला इच्छितस्थळी पोहचवण्याची व्यवस्था केली जाते. यासाठी रात्र गस्तीवर असलेल्या पोलिस वाहनांचा आधार घेतला जात आहे. सर्व वाहनांना जीपीएस असल्याने महिला जिथे आहे त्या भागात कोणते वाहन लवकर पोहचू शकते हे पाहून तशा सूचना दिल्या जातात. यात पोलिस ठाण्याच्या हद्दीचा प्रश्नच शिल्लक ठेवलेला नाही. याबाबत सर्व ठाणे प्रमुखांना सूचना दिल्या असून नागरिकांनाही आवाहन केले आहे. याला प्रतिसाद मिळत आहे.''
ग्रामीण भागातूनही तक्रारी येत असून त्यांचं निराकरण केलं जात आहे. सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मुलीला दोन मुलांनी त्रास दिला. तिने आधी याबाबत कुणाला सांगितला नाही. पण सुरक्षा कवचबाबत माहिती मिळताच तिने नियंत्रण कक्षात प्रकार कळवला. त्यानंतर सिरसाळा पोलिस तिच्या घरी पोहचले आणि सर्व प्रकार समजून घेऊन दोन टवाळखोरांवर गुन्हा दाखल झाला.
अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे म्हणाले, ''रात्री मदतीसोबतच दिवसा महिला, मुलींची छेडछाड होऊ नये यासाठी जिल्ह्यात शक्ती पथक स्थापन केले असून हे पथक महिला अधिकारी, कर्मचारी चालवतात. सार्वजनिक ठिकाणे, शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्गांच्या परिसरात गस्त घालून टवाळखोरांवर पथकाकडून कारवाई केली जाते.''
पोलिस सुरक्षा कवच
इथे करा संपर्क
१०० क्रमांकावर फोन करा
१०९१ - महिला हेल्पलाइन
बीड पोलिस नियंत्रण कक्ष
(०२४४२) २२२३३३, २२२६६६

- अमोल मुळे, बीड

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी : ७ (वाचक : दिनेश अदावडकर)

व्हिडीओ लिंक :  https://www.facebook.com/sampark.net.in/videos/1254698651388867/?v=1254698651388867