Tuesday 4 February 2020

महिलांसाठी पोलिसांचे ‘सुरक्षा कवच’, सुरक्षेत आता हद्दीचा नाही अडसर


‘रात्री अकराची वेळ. बीड शहरापासून दूर खंडेश्वरी मंदिर परिसर. दोन मुलींची दुचाकी बंद पडते. महिला हेल्पलाइन १०९१ वर त्या फोन करतात. बीड पोलिसांच्या नियंत्रण कक्षात त्यांचा संपर्क होतो. घरी जाण्यासाठी त्या पोलिसांची मदत मागतात. अवघ्या सात मिनिटांत या मुलींजवळ पेठ बीड पोलिसांची व्हॅन, पुरुष आणि महिला पोलिस कर्मचारी हजर होतात. बऱ्याचदा उपाययोजना, उपक्रम जाहीर होतात. पण स्थानिक पातळीवर त्याची व्यवस्थित अंमलबजावणी झाली तरच त्याचा उपयोग. पोलीस सुरक्षा कवच उपक्रमाबाबत शहरातल्या पत्रकारांनी मिळून याबाबत पडताळणी केली. त्यात आलेला हा समाधानकारक अनुभव. महिला, मुलींच्या मदतीसाठी रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत बीड पोलिसांनी सुरु केलेला हा उपक्रम चर्चेचा ठरत आहे.
हैदरबाद, उन्नावच्या घटनांनी देशात संतापाची लाट उसळली. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. हैदराबाद घटनेत रात्री नऊच्या सुमाराला डॉक्टर तरुणीवर दुर्देवी प्रसंग ओढावला होता. ही बाब लक्षात घेऊन बीडचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी बीड जिल्ह्यात ‘पोलिस सुरक्षा कवच’ उपक्रम सुरु केला आहे.
या उपक्रमाविषयी सांगताना एसपी हर्ष पोद्दार म्हणतात, ''महिला मग त्या अधिकारी, कर्मचारी असोत अथवा मजूरी करणाऱ्या कामगार ; घरी परतण्यासाठी अनेकदा उशीर होतो. त्यावेळी त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. रात्रीच्या वेळी रिक्षा, बस मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन त्यांच्या मदतीसाठी सुरक्षा कवच उपक्रम सुरू केला आहे. रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत कोणत्याही महिलेला मदतीची गरज असेल तर १०० क्रमांकावर अथवा पोलिसांच्या नियंत्रण कक्षात ०२४४२-२२२३३३, २२२६६६ अथवा महिला मदतीसाठीच्या १०९१ या क्रमांकावर संपर्क करावा. महिला, युवती जिथे असेल तिथे जवळच्या ठाण्याचे पोलीस तात्काळ पोहचतील आणि महिलेला पोलीस वाहनातून थेट तिच्या घरी सोडण्यात येईल. महिला दुसऱ्या जिल्ह्यातील, लांब राहणारी असेल तर रात्रभर तिला सुरक्षित वाटेल अशा ठिकाणी तिची राहण्याची व्यवस्था करण्यात येते. सकाळी तिला इच्छितस्थळी पोहचवण्याची व्यवस्था केली जाते. यासाठी रात्र गस्तीवर असलेल्या पोलिस वाहनांचा आधार घेतला जात आहे. सर्व वाहनांना जीपीएस असल्याने महिला जिथे आहे त्या भागात कोणते वाहन लवकर पोहचू शकते हे पाहून तशा सूचना दिल्या जातात. यात पोलिस ठाण्याच्या हद्दीचा प्रश्नच शिल्लक ठेवलेला नाही. याबाबत सर्व ठाणे प्रमुखांना सूचना दिल्या असून नागरिकांनाही आवाहन केले आहे. याला प्रतिसाद मिळत आहे.''
ग्रामीण भागातूनही तक्रारी येत असून त्यांचं निराकरण केलं जात आहे. सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मुलीला दोन मुलांनी त्रास दिला. तिने आधी याबाबत कुणाला सांगितला नाही. पण सुरक्षा कवचबाबत माहिती मिळताच तिने नियंत्रण कक्षात प्रकार कळवला. त्यानंतर सिरसाळा पोलिस तिच्या घरी पोहचले आणि सर्व प्रकार समजून घेऊन दोन टवाळखोरांवर गुन्हा दाखल झाला.
अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे म्हणाले, ''रात्री मदतीसोबतच दिवसा महिला, मुलींची छेडछाड होऊ नये यासाठी जिल्ह्यात शक्ती पथक स्थापन केले असून हे पथक महिला अधिकारी, कर्मचारी चालवतात. सार्वजनिक ठिकाणे, शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्गांच्या परिसरात गस्त घालून टवाळखोरांवर पथकाकडून कारवाई केली जाते.''
पोलिस सुरक्षा कवच
इथे करा संपर्क
१०० क्रमांकावर फोन करा
१०९१ - महिला हेल्पलाइन
बीड पोलिस नियंत्रण कक्ष
(०२४४२) २२२३३३, २२२६६६

- अमोल मुळे, बीड

No comments:

Post a Comment