Tuesday 4 February 2020

आता चढाओढ लग्नसमारंभातला खर्च टाळण्यासाठी व्हावी ...


ना वाजंत्री, ना पंगत, ना मानपान, केवळ पाहुण्यांना पेढा भरवत मंदिरात घंटेच्या साक्षीनं झालेल्या एका साध्या विवाहाची चर्चा सध्या खान्देशात होत आहे.
लग्न होतं सागर आणि अर्चना यांचं. अर्चना शहादा तालुक्यातल्या कवठळ इथली. रसायनशास्त्रात एम एस्सी. सागर मूळचा गोगापूरमधला. नोकरीनिमित्त आता बडोद्याला. तिथल्या एका कंपनीत मार्केटिंग मॅनेजर. या कंपनीचे मालक स्मिताबेन आणि संजय चौधरी. सागरच्याच नात्यातले.
चौधरी दांपत्य वेगळ्या विचारांचं. 'चालीरीती, मानपान , दागदागिने , मंडप , जेवणावळ,थाटमाट यावर लग्नात विनाकारण भरमसाठ पैसा खर्च केला जातो. निव्वळ वाजंत्रीवरच लाख तरी खर्च होतात. जेवणावळीसाठी लाखो रुपये खर्च होतात. क्षमतेपेक्षा जास्त अन्न वाढल्यानं ते वाया जातं. युवा पिढीनं पुढाकार घेऊन या सर्वाला काळानुसार बगल दिली पाहिजे, ' असं त्यांना वाटतं. लग्नसमारंभावर होणारा खर्च टाळून हा पैसा मुलंमुली स्वतःच्या घरासाठी, त्यातल्या वस्तूंसाठी वापरू शकतात. भविष्याची सोय म्हणून बचत करू शकतात. त्यातून उद्योगधंदा सुरू करू शकतात.'
आपले हे विचार सागर आणि स्मिताबेन कंपनीतल्या, आजूबाजूच्या मुलांकडे व्यक्त करतात. सागरला ते पटले. चौधरी दांपत्याशी बोलल्यावर सागरचे आईवडील वंदना आणि गणेश पाटील, अर्चनाचे वडील अशोक पाटील यांनीही ते उचलून धरले.
शहादा तालुक्यातल्याच पिंगाणे इथल्या नागेश्वर मंदिरात दीड महिन्यापूर्वी लग्न झालं. लग्नाला फक्त ५० माणसं. आदल्या दिवशी हळदीसाठीही सागरकडे ४०-५० माणसं होती. लग्नसमारंभावरचा खर्च टाळल्यामुळे झालेल्या बचतीतून सागर आणि अर्चना बडोद्याच्या घरासाठी अनेक संसारोपयोगी वस्तू खरेदी करू शकले. या विवाहाची चर्चा समाजात आणि खान्देशात होत आहे.
लग्न आता अशीच झाली पाहिजेत. किमान सामुदायिक पद्धतीनं तरी झाली पाहिजेत, असं संजय आणि स्मिताबेनना वाटतं. त्यासाठी ते प्रबोधन करत आहेत. 


- रुपेश जाधव, नंदुरबार 

पद्मश्री पुरस्कार विजेत्यांच्या कर्तृत्त्वाला उजाळा...

अहमदनगर जिल्ह्यातल्या बीजमाता राहीबाई पोपेरे आणि पोपटराव पवार. दोघांनाही यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तुत्वाला दिलेला उजाळा.
अकोले तालुक्यातील पश्चिम भागातल्या आदिवासी पट्ट्यातलं कोंभाळणे. तिथल्या राहीबाई सोमा पोपेरे. महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाईचं शिखर, हरिचंद्रगड, कोकणकडा, साम्रदची सानंद, अशी उंचचउंच कातळ शिखरं याच भागातील.
राहीबाईंच्या वडिलांकडची परिस्थिती गरिबीची असल्याने शाळा शिकता आली नाही. वयाच्या बाराव्या वर्षी लग्न. आदिवासी भागात देशी बियाणाचा वापर करुनच पिके घेतली जातात. त्यामुळे या भागातील बहूतांश कुटूंबे देशी वाणाचे संवर्धन करतात. राहीबाईंचं कुटूंबही तीन- चार पिढ्यापासुन देशी बियाणांचे संवर्धन करणारं. 2014 साली आदिवासी भागात महिलांसाठी काम करणाऱया बायफ या संस्थेच्या संपर्कात त्या आला. संस्थेचा महाराष्ट्र जनूककोश प्रकल्प या भागात सुरू झाला होता. संस्थेचे नाशिक विभागाचे समन्वयक जितीन साठे एकदा राहीबाईंच्या घरी गेले. तब्बल 54 पिकांचे 116 वाण आणि त्यात वाल आणि पावट्याच्या 20 वाणाचं संवर्धन त्या करत असल्याचं समजलं. 2016 मध्ये बायफच्या पुढाकारातून संस्थेचे अध्यक्ष गिरीष सोहनी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बियाणे बॅक सुरू केली. त्यांना ‘मदर ऑफ सीड’, बीजमाता अशी ओळख मिळाली. त्यांच्यामुळे दुर्मिळ देशीवाणांचे जतन होत आहे.
अकोले तालुक्यात महिला बचतगटाच्या माध्यमातून वाणांची विक्री होते. अनेक महिलांसाठी हे रोजगाराचे साधन बनलं आहे. परसबाग संकल्पनेच्या माध्यमातून देशी बियाणं राज्यभर पोहोचत आहे.
याच जिल्ह्यातले पोपटराव पवार. तीस वर्षापुर्वी नगर जिल्ह्यामधील सहा ते सात तालुके दुष्काळी. हिवरेबाजार नावाचे गाव त्यातील एक. दुष्काळाने पिचलेल्या आणि त्यामुळेरोजगाराच्या शोधात गाव सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. पण शहरात उच्च शिक्षण घेतलेले पोपटराव मात्र परतले.
नोकरीच्या शोधात असतानाच त्यांना गावांतील स्थिती मात्र स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे
त्यांनी नोकरी न करता गावी येऊन गावांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला आणि 1990 मध्ये गावांतील तरुणांना एकत्र केलं वृक्षलागवडीतून इतिहास घडवला.
जलसंधारणाची कामे केली. अल्प पाऊस पडूनही दुष्काळी हिवरेबाजार पाणीदार झाले. गावच्या शाळेतील मुल उपलब्ध झालेल्या पाण्याचा ताळेबंद मांडु लागले. एकेकाळी रोजगारासाठी दुसऱया गावांत जाणारे येथील शेतकरी आता शेकडो लोकांना
आपल्या गावांत रोजगार उपलब्ध करून देत आहेत. कोट्यावधीचं शेती उत्पन्न काढत आहेत. समस्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आदर्श घेऊन तीस वर्षापुर्वी गावातील व्यसनमुक्तीचा लढासुरू केला. ही चळवळ यशस्वी झाल्यानंतर त्यांना गावातील लोकांनी सरपंच होण्याचा आग्रह केला. सरपंच झाल्यानंतर त्यांनी पीकपद्धतीतबदल केला. कमी पाण्यावर येणारी पिकांना त्यांनी प्राधान्य दिलं. शेजारील डोंगरावर वृक्षलागवड केली. तसेच जागोजागी पाणलोटाची कामेकेली. त्यातून मोठ्याप्रमाणात पाण्याचा संचय झाला. त्यातून गाव खऱ्या अर्थाने हिरवे झाले. गावाचे उत्पन्न वाढले. तरूणांच्या हाताला
गावातच काम मिळाले. चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, कुपनलिका बंदी असे विशेष प्रयोगही त्यांनी केले. वीस वर्षापर्वीचगाव हागणदारीमुक्त केलं.गावातील सर्वच घरे महिलांच्या नावावर
आहेत. सर्व निर्णय ग्रामसभेला विचारात घेऊनच होतात. हिवरेबाजारला आतापर्यत दहा लाखापेक्षा अधिक लोकांनी भेटी दिल्यात. येथील कामाचा आदर्श घेऊन
राज्यात आणि देशात अनेक गावे समृद्ध झाली आहेत.
- सूर्यकांत नेटके, नगर
#नवीउमेद #अहमदनगर

डोक्यावरील हंडा आता नको...

उन्हाळा सुरू होण्यास महिनाभराचा कालावधी असला तरी आदिवासी महिलांच्या डोक्यावर हंडा येण्यास सुरूवात झाली आहे. पाणी भरण्यासाठी आदिवासी महिलांना कुठेतरी खोल दरीतील विहिरीवर, झऱ्यावर पाणी भरण्यासाठी ये-जा करावी लागते. एका फेरीत दोन दोन भरलेले हंडे डोक्यावर घेत दरड चढतांना त्यांची दमछाक होते. मानेचे, कमरेचे विकार सुरू होतात ते वेगळेच.
आदिवासी महिलांमागे लागलेले हे दुष्टचक्र भेदण्यासाठी सुलगाणा तालुक्यातील ठाणगाव परिसरात व्हेल्स अ‍ॅण्ड व्हिल्स या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने शाहज मेमन यांच्या सहकार्याने येथील महिलांसाठी ‘वॉटर व्हील ड्रम्स’ मोफत वितरीत करण्यात आले. हे ड्रम बाजारात दोन ते तीन हजारांपर्यंत मिळतात. एका ड्रमात ४५ लीटर पाणी बसते. हा ड्रम एक माणूस जमिनीवरून सहज ढकलत आणू शकतो. या ड्रममुळे आदिवासी महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरण्यास मदत होईल.
#नवीउमेद

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी: २० (वाचक : मेधा कुलकर्णी)

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=2384334025172485

ओळख नव्या आमदारांची : आमदार राम सातपुते (भाजप)


स्कील डेव्हलपमेंटवर भर देईन :
राम सातपुते हे मुळचे जिल्हा बीड येथील आष्टी तालुक्यातील धामणगावचे रहिवासी. वडील विठ्ठल आणि आई जिजाबाई आणि त्यांच्या तीन मुली असा त्यांचा परिवार. गावाकडे वडिलांचा पारंपरिक चप्पल तयार करण्याचा व्यवसाय. आजही त्यांचे गावाकडे दुकान आहे. माळशिरस तालुक्यातील भांबुर्डी कायम दुष्काळी गावात त्यांचे लहानपण गेले. घरची परिस्थिती बेताची होती. वडील विठ्ठल सातपुते यांनी ऊस तोडणीचे कष्टप्रद काम करुन मुलांना शिक्षण दिले.
माळशिरस येथील शंकर सहकारी साखर कारखान्याकडे विठ्ठल सातपुते हे 1990 ते 1995 पर्यंत ऊस तोडणीचे काम करत होते. त्यानंतर भांबुर्डे येथील मदने यांच्या शेतामध्ये चाकरी केली तेव्हापासून राम यांची माळशिरस तालुक्याशी नाळ जुळली.
संघाच्या बालसंस्कार वर्गातून त्यांची जडणघडण झाली. शाळा- महाविद्यालय जीवनापासून ते सामाजिक कार्याकडे वळले. गावी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी पुणे गाठले.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांचा विद्यार्थी संघटनेशी संपर्क आला. तेथूनच त्यांनी विद्यार्थी संघटनेच्या चळवळीला सुरुवात केली. ग्रामीण भागात वाढल्यामुळे अनेक प्रश्नांची जाण होती. त्यांना विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या प्रश्नातले गांभीर्य लवकर उमजत होते. त्यातूनच विविध आंदोलने उभारताना आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रशासनाकडून यशस्वीपणे सोडून घेताना त्यांचे नेतृत्व विद्यार्थ्यांमध्ये, युवकांमध्ये प्रस्थापित झाले.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कामाची दखल घेऊन गेल्या वर्षी राम सातपुते यांना भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आले. पक्षाचे काम करत असताना त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अनेक गरजू लोकांना मदत केली. भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, शिक्षणाचे बाजारीकरण विरोधात आंदोलन, सामाजिक प्रश्नांचे जागरण या माध्यमातून राम यांनी देशभर प्रवास केला. युवा मंत्रालयातर्फे दक्षिण कोरियात नेतृत्व केले होते. नॉर्थ इस्ट त्यांच्या अभ्यासाचा विषय.
राम यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 'थॉट्स ऑन पाकिस्तान' तसंच डॉ. संजीव सोनवणे यांची अहिल्यादेवी होळकर यांच्यावर लिहिलेली पुस्तके खूप आवडतात. ते मुळात सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळे जनतेशी त्यांचा चांगला संपर्क होता. त्यांचे काम पाहून हाय प्रोफाइल माळशिरस विधानसभा राखीव मतदार संघातून महायुतीचे उमेदवार म्हणून राम यांना निवडणुकीचे तिकीट मिळाले. यात त्यांनी उत्तम जानकरांचा पराभव करून विजय मिळवला.
सातपुते म्हणाले, माळशिरस तालुक्यामध्ये रस्त्यांची मोठी समस्या आहे. ती समस्या मार्गी लावीन. तालुका पातळीवर रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. ती भरती व्हावी या संदर्भात प्रयत्न करीन. शेती सिंचनाच्या सोयी सुविधा वाढविण्यावर माझा भर असेल. नगरपंचायत परिसरात एमआयडीसी असणे आवश्यक आहे. त्यामुळे युवकांना रोजगार प्राप्त होईल. स्कील डेव्हलपमेंटवर भर देईन. लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांना शासनाकडून अर्थसाह्य मिळवून देण्याचा प्रयत्न करीन. मोदी सरकारने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अनेक चांगली कामे केली आहेत. तीच कामे तालुका पातळीवर सुरू अाहेत.
सर्वसामान्य नागरिकांची कोणतीही कामे पैसे दिल्याशिवाय होत नाहीत. ही आर्थिक लूट थांबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन. ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी पुणे मुंबईला जावं लागतं, मतदारसंघात त्यांच्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र सुरू करण्याचा उद्देश आहे. अभ्यासिका अाणि दर्जेदार मार्गदर्शक या केंद्रात उपलब्ध असतील. कुस्ती प्रशिक्षणाचे आंतरराष्ट्रीय केंद्र सुरू करायचं अाहे. माती परीक्षण केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करेन
आणि राहुरी कृषी विद्यापीठाचे उपकेंद्र मतदारसंघात आणण्याला माझे विशेष प्राधान्य राहील.

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी : १९ (वाचक : अश्विनी जोग)

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=2505692006421300

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी : १८

व्हिडीओ लिंक : 
https://www.facebook.com/sampark.net.in/videos/417411649153580/