Tuesday 4 February 2020

ओळख नव्या आमदारांची : आमदार राम सातपुते (भाजप)


स्कील डेव्हलपमेंटवर भर देईन :
राम सातपुते हे मुळचे जिल्हा बीड येथील आष्टी तालुक्यातील धामणगावचे रहिवासी. वडील विठ्ठल आणि आई जिजाबाई आणि त्यांच्या तीन मुली असा त्यांचा परिवार. गावाकडे वडिलांचा पारंपरिक चप्पल तयार करण्याचा व्यवसाय. आजही त्यांचे गावाकडे दुकान आहे. माळशिरस तालुक्यातील भांबुर्डी कायम दुष्काळी गावात त्यांचे लहानपण गेले. घरची परिस्थिती बेताची होती. वडील विठ्ठल सातपुते यांनी ऊस तोडणीचे कष्टप्रद काम करुन मुलांना शिक्षण दिले.
माळशिरस येथील शंकर सहकारी साखर कारखान्याकडे विठ्ठल सातपुते हे 1990 ते 1995 पर्यंत ऊस तोडणीचे काम करत होते. त्यानंतर भांबुर्डे येथील मदने यांच्या शेतामध्ये चाकरी केली तेव्हापासून राम यांची माळशिरस तालुक्याशी नाळ जुळली.
संघाच्या बालसंस्कार वर्गातून त्यांची जडणघडण झाली. शाळा- महाविद्यालय जीवनापासून ते सामाजिक कार्याकडे वळले. गावी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी पुणे गाठले.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांचा विद्यार्थी संघटनेशी संपर्क आला. तेथूनच त्यांनी विद्यार्थी संघटनेच्या चळवळीला सुरुवात केली. ग्रामीण भागात वाढल्यामुळे अनेक प्रश्नांची जाण होती. त्यांना विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या प्रश्नातले गांभीर्य लवकर उमजत होते. त्यातूनच विविध आंदोलने उभारताना आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रशासनाकडून यशस्वीपणे सोडून घेताना त्यांचे नेतृत्व विद्यार्थ्यांमध्ये, युवकांमध्ये प्रस्थापित झाले.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कामाची दखल घेऊन गेल्या वर्षी राम सातपुते यांना भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आले. पक्षाचे काम करत असताना त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अनेक गरजू लोकांना मदत केली. भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, शिक्षणाचे बाजारीकरण विरोधात आंदोलन, सामाजिक प्रश्नांचे जागरण या माध्यमातून राम यांनी देशभर प्रवास केला. युवा मंत्रालयातर्फे दक्षिण कोरियात नेतृत्व केले होते. नॉर्थ इस्ट त्यांच्या अभ्यासाचा विषय.
राम यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 'थॉट्स ऑन पाकिस्तान' तसंच डॉ. संजीव सोनवणे यांची अहिल्यादेवी होळकर यांच्यावर लिहिलेली पुस्तके खूप आवडतात. ते मुळात सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळे जनतेशी त्यांचा चांगला संपर्क होता. त्यांचे काम पाहून हाय प्रोफाइल माळशिरस विधानसभा राखीव मतदार संघातून महायुतीचे उमेदवार म्हणून राम यांना निवडणुकीचे तिकीट मिळाले. यात त्यांनी उत्तम जानकरांचा पराभव करून विजय मिळवला.
सातपुते म्हणाले, माळशिरस तालुक्यामध्ये रस्त्यांची मोठी समस्या आहे. ती समस्या मार्गी लावीन. तालुका पातळीवर रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. ती भरती व्हावी या संदर्भात प्रयत्न करीन. शेती सिंचनाच्या सोयी सुविधा वाढविण्यावर माझा भर असेल. नगरपंचायत परिसरात एमआयडीसी असणे आवश्यक आहे. त्यामुळे युवकांना रोजगार प्राप्त होईल. स्कील डेव्हलपमेंटवर भर देईन. लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांना शासनाकडून अर्थसाह्य मिळवून देण्याचा प्रयत्न करीन. मोदी सरकारने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अनेक चांगली कामे केली आहेत. तीच कामे तालुका पातळीवर सुरू अाहेत.
सर्वसामान्य नागरिकांची कोणतीही कामे पैसे दिल्याशिवाय होत नाहीत. ही आर्थिक लूट थांबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन. ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी पुणे मुंबईला जावं लागतं, मतदारसंघात त्यांच्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र सुरू करण्याचा उद्देश आहे. अभ्यासिका अाणि दर्जेदार मार्गदर्शक या केंद्रात उपलब्ध असतील. कुस्ती प्रशिक्षणाचे आंतरराष्ट्रीय केंद्र सुरू करायचं अाहे. माती परीक्षण केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करेन
आणि राहुरी कृषी विद्यापीठाचे उपकेंद्र मतदारसंघात आणण्याला माझे विशेष प्राधान्य राहील.

No comments:

Post a Comment