Friday 31 January 2020

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी: ६ (वाचक : मेधा कुलकर्णी)

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=1209380345914119

आदर्श आंबेडकरांचा..... मोठा माणूस होण्याचं स्वप्न झालं साकार

सोलापूरमधलं रमाबाई आंबेडकर नगर. तिथे राहणारे नंदा आणि कुमार वाघमारे. दोघे सोलापूर महानगरपालिकेत सफाई कामगार. त्यांचा मुलगा कुणाल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्याचे आदर्श. त्यांच्याप्रमाणेच मोठं होण्याचं त्याचं लहानपणापासूनच स्वप्न होतं. मुलाचं स्वप्न साकार व्हावं यासाठी आईवडिलांनीही रात्रंदिवस मेहनत केली. शिक्षणात काही कमी पडू दिलं नाही. कुणालनीही आईवडिलांच्या कष्टाचं चीज केलं. 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१८ मध्ये दिवाणी न्यायाधीश(क) स्तर आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी या पदासाठी १९० जागांकरिता जाहिरात दिली होती . यासाठी ७ एप्रिल २०१९ ला पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा १ सप्टेंबरला आणि ६ डिसेंबरला मुलाखत झाली. डिसेंबर २०१९ च्या शेवटच्या आठवड्यात निकाल जाहीर झाला. त्यात कुणाल संपूर्ण राज्यातून १० वे तर अनुसूचित जातींमधून पहिले आले . २०० पैकी १५८ गुण त्यांना मिळाले.
कुणाल यांचं शालेय शिक्षण महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक २१ आणि २ मध्ये झालं. दयानंद महाविद्यालयातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण. भाई चन्नुसिंह चंदेल महाविद्यालयातून एमएसडब्ल्यू.
याच दरम्यान त्यांच्या जमिनीचा खटला उभा राहिला. खटल्याच्या सुनावणीदरम्यानच वकिलाचा मृत्यू झाला. या घटनेतूनच कायद्याचा अभ्यास सुरू झाला. त्यातला रस वाढत गेला आणि दयानंद विधी महाविद्यालयातून वर्ष २०१४ मध्ये एलएलबी पूर्ण केलं . एलएलबीला सोलापूर विद्यापीठात प्रथम आणि २०१६ मध्ये एलएलएमला दुसरा क्रमांक. ''संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही.'' अॅड. कुणाल सांगतात. ''स्वप्न नुसतं पाहण्यात कमी वेळ घालवला. ते पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ दिला. रोज घरीच ७-८ तास अभ्यास केला. माझ्या यशात आईवडील, ४ बहिणी आणि पत्नीचं मोठं योगदान आहे.''
-अमोल सीताफळे, सोलापूर

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी: ५ (वाचक : अश्विनी जोग)

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=1284203571703718

ओंकारच्या रसवंतीची गोष्ट...



सांगली जिल्ह्यातल्या औदुंबर या तीर्थक्षेत्राजवळचं बावची गाव. इथल्या ओंकार खोत या तरूणाने हायवेलगत माऊली रसवंती आणि छोटंसं किराणा दुकान सुरू केलंय. ओंकार ११वीत शिकत असताना त्याला ही कल्पना सुचली. वडील प्रकाश खोत यांच्याकडे हट्ट करून त्याने हा व्यवसाय सुरू केला. पर्यटकांची भरपूर ये-जा सुरू असलेला हा रस्ता असल्याने ओंकारची रसवंती तेजीत असते. किराणा टपरीवर तो रसायनविरहित गूळ विकतो. गेल्या वर्षभरात लाखभर रुपयांची कमाई झाल्याचं ओंकारने सांगितलं.
नवी उमेदच्या वाचक सुमन दिवाकर यांनी हा व्हिडिओ खास नवी उमेदसाठी करून पाठवला. ओंकारला शुभेच्छा आणि सुमनताईंना धन्यवाद.
व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=453788288837107

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी: ४ (वाचक : दिनेश अडावदकर)

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=411741936209322

खासगी शाळांतील ३० टक्के मुले लठ्ठ ! (बातम्या तुमच्या आमच्या मुलांच्या)

अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफ.डी.ए.) इंडियन डायबेटीस असोसिएशनसोबत केलेल्या संयुक्त सर्वेक्षणात हा प्रकार निदर्शनास आला आहे.
हल्ली धकाधकीच्या जीवनात आहार संतुलन ठेवणं कठीण होऊन बसलं आहे. त्यात शाळेतील लहान मुलं ही आलीच. ही शाळकरी मुलं फक्त शाळेतच जात नसून ते वेगवेगळे क्लासेस, ट्युशन्स व एक्स्ट्रॉ क्लासेसला जात असल्यामुळे ही मुलं घरातून बराचवेळ बाहेर असतात. त्यामुळेच बाहेर जे काही मिळेल, जे समोर असेल ते खातात. अश्यावेळी कमी वेळात जे खाता येईल, थोडक्यात भूक शमेल हेच लक्षात ठेऊन मुलं जंक फूडच्या आहारी जातात.
शाळा, कॉलेजमध्ये कॅण्टीनमधून चिप्स, तळलेले पदार्थ, पिझ्झा, बर्गर, चॉकलेट्स असे जंक फूडचे पदार्थ सहज उपलब्ध असतात. आणि असे चमचमीत पदार्थ कुणालाही सहजच आवडतात. यातून त्यांच्या पोषण गरजा भागवल्या जात नाहीत. एका सर्वेक्षणानुसार दिल्लीच्या शाळांमधील मुलांच्या लठ्ठपणाचे प्रमाण २००२मध्ये १६ टक्के होते तर २००६ मध्ये ते २४ टक्क्यांनी वाढले.
विद्यार्थ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी कशा पद्धतीचा आहार आवश्यक आहे, याची माहिती पालकांना देणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळास्तरावर नियुक्त होणाऱ्या समितीकडून ‘मास्टर शेफ’ स्पर्धांसह इतरही उपक्रम राबवून पालकांना, विद्यार्थ्यांना आवडेल असे नावीन्यपूर्ण खाद्यपदार्थ तयार करणे गरजेचे आहे.
- लता परब
बातमी लिंक : Nashik News: ‘जंक फूड’विरोधात विद्यार्थीप्रबोधन! - student awareness against 'junk food'! | Maharashtra Times - http://mtonline.in/qKGena/lmy

आमचा खारीचा वाटा

नुकतीच झालेली सावित्रीमाईची जयंती आणि आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त 10 सुकन्या खाती आमच्या वतीने पहिलं डिपॉजिट भरून काढण्यात आली. ही खाती कुसळंब व दाजी पेठ पोस्ट ऑफिस इथं काढण्यात आली. त्यामध्ये विविध सामाजिक व आर्थिक घटकातील कुटुंबांचा समावेश होता. 
बऱ्याच वेळी परिस्थितीमुळे मुलींना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं, शिक्षणाचा खर्च परवडणारा नसल्यामुळे मधेच शिक्षण सोडून द्यावं लागतं. लातूर जिल्ह्यातील जढाळा येथील स्वाती पिटले प्रकरण व पंढरपूरमधील पॉलिटेक्निकचं शिक्षण घेणाऱ्या मुलीने आपल्या वडिलांना शिक्षणाचा खर्च परवडणारा नसल्याने परिस्थितीला कंटाळून केलेली आत्महत्या.
अशा घटना घडू नयेत म्हणून मुलींच्या आई- वडिलांना तिच्या लहानपणापासूनच तिच्यासाठी बचतीची सवय लागावी यासाठीचा आमचा हा छोटासा प्रयत्न. यामुळे मुलींकडे एक प्रकारचं ओझं म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलणारा नाही. परंतु यामुळे तिला तिच्या गरजेच्या वेळी शिक्षणासाठी नक्कीच मदत होईल अशी आशा आम्ही बाळगतो.
- पूजा कांबळे, दत्ता चव्हाण

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी: ३ (वाचक : सायली राजाध्यक्ष)

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=878738262523408

तस्नीमच्या शाळेची गोष्ट

तस्नीम असद बॉम्बेवाला. शिक्षणाने आर्किटेक्ट. सर्वसामान्य गृहिणी. पहिल्या अपत्याच नाव ‘अस्मा’. अस्मासाठी मोठी स्वप्नं पाहणं सुरू झालं. ती अडीच वर्षांची झाली आणि इतर सामान्य मुलांपेक्षा ती वेगळं वागते आहे, सर्व सामान्य मुलांच्या आकलनापेक्षा अस्माची आकलन क्षमता कमी आहे हे तस्नीम यांना लक्षात यायला लागलं. लगेचच त्यांनी नागपूर-मुंबई अशा अनेक ठिकाणी अनेक डाँक्टरकडे अस्माला दाखवलं. पण तिला झालाय काय हे निश्चित कुणालाच सांगता येईना. या सगळयात प्रचंड पैसे खर्च झाला, पण आजाराचं निदान होईना. अस्मा सहा वर्षांची असताना मुंबईतल्या एका डॉक्टरांनी अस्माला Niemann Pick-type-C हा आजार असल्याचं सांगितलं. या आजाराचे भारतात केवळ ४ रुग्ण आहेत तर जगभरात २००. या आजारावर कुठलाही औषधोपचार उपलब्ध नाही. कारण त्यावर फारसं संशोधनच झालेलं नाही. या आजारात रुग्णाचा मेंदू हळूहळू क्षीण होत जातो व एकदिवस काम करणं बंद करतो. असे रुग्ण फार तर २०-२५ वर्षे जगतात.
स्वतः मुलीच्या मृत्यूचं वय माहित असलेल्या आईला काय वाटत असेल हे शब्दात सांगणं कठीण. अशा परिस्थितीत सामान्य पालक खचून जातील. आपल्याच नशिबात असं मूल का? असा दोष स्वतःला देत राहतात. सर्वथा मानसिक निराशा येते पण तस्नीमने या परिस्थितीतून जात स्वतःला व परिवाराला सांभाळलं, सावरलं. हिंमत बांधली, अस्मा आहे तेवढा काळ सर्वोत्तम स्थितीत तिचा सांभाळ करायचा तिने निर्धार केला. इतक्यावरच तस्नीम थांबलेल्या नाहीत.
‘अस्मा’च्या असाध्य आजाराबद्दल कळल्यावर तिची योग्य काळजी घेणं त्यांनी सुरू केलंच. शिवाय, अशा मुलांना कसं सांभाळायचं, त्यांना ट्रेनींग काय व कसं द्यायचं, त्यांना कसं शिकवायचं याबद्दल त्यांनी अमेरिकास्थित एक संस्थेतून विशेष शिक्षण घेतलं.
तस्नीमच्या लक्षात आलं की यवतमाळ सारख्या आडवळणाच्या गावात वैद्यकीय सोयी फारशा नाहीत. आणि सगळ्यांनाच नागपूर-पुणे-मुंबई येथे आर्थिक दृष्ट्या जाणे अशक्य आहे. स्वतःच्या मुलीसाठी त्यांनी मुंबई पुण्याच्या केलेल्या वाऱ्या कमी नव्हत्या. तेव्हा अशा special kids साठी यवतमाळ येथे विशेष शाळा सुरू करायचं त्यांनी ठरवलं आणि २०१६ मध्ये छोट्याशा जागेत शाळा सुरु केली. त्यानुसार त्यांनी ‘नवदीन एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली. त्याच नावाने यवतमाळ शहरात शाळा सुरू केली. आज त्यांच्याकडे १५ ते २० विद्यार्थी आहेत. ADHA, LD, Autism, Slow Learner, Cerebral palsy, Dyslexia, multiple disability, Mental retardation, down syndrome, etc. अशा विविध आजाराने ग्रस्त असे ३ ते १६ वयोगटातील दिव्यांग त्यांचे विद्यार्थी आहेत. साधारण मुलांपेक्षा यांना शिकवणं अत्यंत कठीण आहे. दोन अधिक दोन हे शिकायला बरेचदा मुलांना दोन महिने लागतात. पण तस्नीम हिम्मतीने सगळं करत आहेत. मुलांना अक्षर ओळख देणे, काम स्वतःहून करायला शिकवणे, खेळ व त्यातून शिकवण, योगा, व्यायाम असं सगळं तस्लीम मुलांना शिकवतात.
तस्नीम यांना हे सगळं का करावसं वाटलं? असं विचारलं. त्या म्हणतात, “आजार माणसाची आर्थिक परिस्थिती पाहून येत नाही. यवतमाळच्या आजूबाजूला असे काही पालक आहेत जे अशा special child च्या वैद्यकीय आणि शैक्षणिक बाबतीत फार खर्च करू शकत नाही. तेव्हा अशा पालकांच्या पाल्यांसाठी काहीतरी करावं, अस्माची आई म्हणून जे काही सोसलंय ते इतर पालकांच्या वाट्याला येऊ नये, आणि अशा दिव्यांग, मतिमंद मुलांना शिक्षण मिळावं म्हणून शाळा सुरू केली आहे.” मुलांना कसं सांभाळावं, 'अशा' पाल्यांचा सांभाळ करताना स्वतःला कसं तयार करावं, या विषयावर त्या पालकांचं समुपदेशन करतात.
या कामात त्यांचे पती असद त्यांना व्यवसाय सांभाळून मदत करतात. आज नवदीन शाळा असद यांच्याच दुकानातील वरच्या मजल्यावर सुरू आहे.
सर्व सामान्य मुलांना सांभाळताना पालकांच्या नाकी नऊ येतात. मग अशा विशेष मुलांना सांभाळणं, त्यांची काळजी घेणं किती अवघड असेल. तरी हे काम तस्नीम यांनी आव्हान, जबाबदारी म्हणून स्वीकारलं आहे.
तस्नीम असद बॉम्बेवाला
nvdeen education society,
A shool for special kids,
www.navdeen-education.webnode.com
nvdeen.edu@gmail.com
mb 9970 1516 52
- निखिल परोपटे, यवतमाळ

ओळख नव्या आमदारांची : श्वेता महाले (भाजप)

चिखलीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे : आमदार श्वेता महाले
२०१९ च्या निवडणुकीनंतर गठित झालेल्या विधानसभेत २४ महिला आमदार आहेत, मागच्या विधानसभेतल्या महिला आमदारांहून दोन जास्त. यापैकी १२ भाजपच्या आहेत. श्वेता महाले या भाजपच्या विदर्भातल्या एकमेव महिला आमदार. आणि पहिल्यांदा निवडून आलेल्या १२ महिला आमदारांपैकी आहेत. ३६ वर्षाच्या, तरूण आहेत.
त्यांच्या माहेरी (पाटील) आणि सासरी (महाले) दोन्ही कुटुंबांमध्ये सामाजिक – राजकीय काम करणारे नातलग असल्याने श्वेता यांच्यासाठी हे क्षेत्र परिचयाचं होतं. लग्न झाल्यावर संसार आणि मुलाला वाढवण्यात श्वेता यांची सुरूवातीची वर्ष गेली. २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारांत त्यांनी पंतप्रधान मोदी यांचं भाषण ऎकलं. आणि भारावून जाऊन राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात बुलढाणा जिल्हा परिषदेवर निवडून येण्यापासून झाली.
त्या म्हणाल्या की, महिला-बालकल्याण विभाग कुणाला नको असतो. पण मी त्या विभागाची जबाबदारी आवडीने घेतली. महिला-बालकल्याण सभापती म्हणून त्यांनी जिल्हा परिषद महिला सदस्यांच्या प्रशिक्षणात लक्ष घातलं. प्रशिक्षणासाठी राखीव असलेला नि्धी वापरला. आदर्श अंगणवाड्या असा उपक्रम सुरू करून अंगणवाडी सेविकांना प्रेरित केलं, त्यांच्या कामाची पावती दिली. गावातल्या आणि तालुक्यातल्या निवडून आलेल्या स्त्रियांच्या हाती पहिल्यांदा माईक मिळाल्यावर त्यांना कसा आत्मविश्वास वाटतो, हे अनुभवणं खूप छान वाटल्याचं श्वेता म्हणाल्या.
आता आमदार झाल्यावर महिलांच्या समस्यांना प्राधान्य देणं सुरूच राहाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महिलांच्या, गावांच्या विकासाशी जोडलेला मूळ विषय पिण्याचं पाणी हा आहे. चिखली मतदारसंघातल्या सर्वच्या सर्व १४६ गावांना आणि चिखलीतल्या गरीब श्रीमंत सर्व कुटुंबांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावतो आहे. तो सोडवायचा, हे माझ्या यादीतलं पहिलं काम आहे, असं श्वेता महाले यांनी सांगितलं. 

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी : २ (वाचक : माधवी कुलकर्णी)

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=740725789733356

रद्दीच्या पैशातून मुलांच्या संगोपनाला आधार

नागपूरमधले नागेश पाटील. सामाजिक क्षेत्रात गेली २० वर्ष कार्यरत. गरीब,अनाथ पण हुशार मुलांना उत्तम शिक्षण मिळावं आणि ती स्वतःच्या पायावर उभी राहावीत, यासाठी ते काम करतात. २०१२ मध्ये त्यांनी 'जिव्हाळा' ही संस्था यासाठी सुरू केली.
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’‘रद्दी देई बुद्धी’ या त्यांच्या संस्थेच्या ब्रीदवाक्यातून देशालाही बेटी बचाओचा संदेश मिळाला. सध्या त्यांच्या संस्थेत एकूण ४२ मुलं. त्यापैकी १५ मूलं आणि १९ मुली अरूणाचल प्रदेशमधल्या तर ८ मूली विदर्भातील. ५ वी ते पदवीपर्यंत शिक्षण घेणारी. भरतनाटयमपासून अभियांत्रिकीपर्यंत वैविध्यपूर्ण शिक्षण घेणारी. नर्सिंगचं प्रशिक्षण पूर्ण करून ९ मुली नोकरीही करत आहेत.
नागलोक बुद्धिस्ट सेंटरमध्ये अरुणाचल प्रदेशातला चकमा नावाचा युवक शिकायला होता. त्याची पाटील यांच्याशी भेट झाली. त्याला त्यांच्या कार्यविषयी समजलं. आपल्या बहिणीच्या शिक्षणाची आणि संगोपनाची जबाबदारी घेण्याची विनंती चकमानं पाटील यांना केली. तिच्याबरोबर १३ मुली आल्या. असं करतकरत अरुणाचल प्रदेशमधली मुलं संस्थेत येऊ लागली.
मुलं आणि मुलींसाठी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था. मुलींसाठी एक वॉर्डन. जेवण स्वतः पाटील यांच्या पत्नी करतात. मदतीला एक आचारी. मुलांना शहरातल्या प्रतिष्ठित शाळांमध्ये घातलं आहे. पाटील यांच्या कामात त्यांच्या पत्नीचा न बँकेत काम करणाऱ्या बहिणीचा मोठा वाटा आहे. पाटीलही पूर्वी नोकरी करायचे. पण मुलांकडे पुरेसं लक्ष देता येत नसल्याचं वाटल्यानं त्यांनी नोकरी सोडली.
आईवडिलांशी भेट घालून देण्यासाठी ते दरवर्षी मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत अरुणाचल प्रदेशला घेऊन जातात. या कामासाठी पाटील यांना दरवर्षी २५ ते ३५ लाख रुपये खर्च येतो. यासाठी काही दानशूरांची साथ त्यांना आहे. काही दाते नियमितपणे रद्दी देतात. ही रद्दी विकून मिळणारे पैसे ते मुलांसाठी वापरतात.
राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून अनेक मान्यवरांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्र भूषणसह ७० पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.

- नीता सोनवणे, नागपूर

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी : १ (वाचक : नीना कुळकर्णी)

लिंक : https://www.facebook.com/watch/?v=395853391333371

कल्पकतेला वाव अन‌् मिळाली जगण्याची उमेद

ही सुंदर, कल्पकतेने घडवलेली शुभेच्छापत्रं पाहताय? यासह टाकाऊ वस्तूपासून बनवलेल्या आकर्षक पिशव्या पण. कोणी बनवल्यात माहितीये? त्या बनवल्यात पाली (ता.बीड) येथील इन्फंट इंडिया आनंदवनातील युवती अन‌् महिलांनी.
एचआयव्ही बाधितांचे जगणे म्हणजे व्यक्तीगत आयुष्यातील संघर्ष अन समाजाकडून होणारी उपेक्षा. अशा स्थितीत जीवनात आनंद यावा, तरी कसा. याच विचारांतून इन्फंट इंडियातील महिला, युवती, मुलांसाठी दोन वर्षांपूर्वी कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात आलं. अभ्यासाविषयी फारशी उत्सुक नसलेली व काहीशी आत्ममग्न असलेली आसमा शेख. तिला शुभेच्छापत्रे बनवायला, टाकाऊ वस्तूंपासून विविध शिल्प बनवायला, कापडी बॅग बनवायला आवडायचं. इन्फंट इंडियाचे संचालक दत्ता बारगजे आणि संध्या बारगजे यांनी आसमासह प्रकल्पातील सर्व महिला, मुलींना त्यांची कल्पकता वापरता यावी, यासाठी कौशल्य विकास केंद्राची संकल्पना मांडली. त्याला समाजातील मान्यवरांचे पाठबळ मिळाले अन‌् हे केंद्र सुरुही झाले.
आज आसमासह १८ मुली फावल्या वेळेत पिशव्या, शुभेच्छापत्र बनवतात. विविध ठिकाणी असलेल्या उपक्रमांच्या निमित्ताने स्टॉल लावून त्याची विक्रीही करतात. यातून या कामाचा मोबदलाही मिळतो अन‌् आपल्या हातून काहीतरी घडत आहे, त्याचे समाधानही. नव्या वर्षात आता या मुली, महिलांनी बनवलेले साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत कसे जाईल, याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या प्रकल्पातील सर्वांच्या जगण्याला, कल्पकतेला नवे आयाम देणारा हा उपक्रम उत्तरोत्तर बहरत जात आहे.
- अनंत वैद्य, बीड

केम छो? मजा मा!

बरेच वर्षापासून मस्कुलर डिस्ट्रॉफी सारख्या असाध्य रोगाने ग्रस्त आहे त्यामुळे मी चालणे काय उभाही राहू शकत नाही. अशा परिस्थितीत कोणीही नैराश्यग्रस्त होऊ शकतो. पण नेहमी सकारात्मक दृष्टिकोन आणि नवीन गोष्टींबद्दल जिज्ञासा यामुळे मी कायम आनंदी असतो.
मला गुजराती माणसांची एक गोष्ट खूप आवडते दोन गुजराती माणसं एकमेकांना भेटली की एक संवाद हमखास होतो; 'केम छो?' आणि दुसरा म्हणणार 'मजा मा' म्हणजे मजेत. किती छान! नुसतं ठीक म्हटलं की चाललंय आपलं कसंतरी असं वाटतं.
शारीरिक अस्वास्थ्यामुळे मी बाहेर जाऊ शकत नाही पण कोणी मला विचारलं "काय कसं काय?"तर मी लगेच 'मजा मा' असंच म्हणतो. कारण खरंच मी नेहमी मजेत असतो.
रोज जरी बाहेर जात नसलो तरी महिन्या दोन महिन्यात एकदा विवियाना मॉलला जातो आणि केएफसी चिकन खातो. जमलं तर एखादा चित्रपट सुद्धा पाहतो.
तुम्हाला खोटं वाटेल पण मी आठ वेळा अमेरिकेला जाऊन आलो आहे आणि एकदा तर एकटा जाण्याचं धाडस सुद्धा केलं आहे.
तिकडे मुलाने एक स्कूटरपण घेतली आहे माझ्यासाठी. मग मी स्कूटरवरून मॉलमध्ये किंवा एखाद्या दुकानात जाऊन खरेदी सुद्धा करतो. माझा मुलगा आणि सून मला सगळीकडे म्हणजे हॉटेलमध्ये किंवा बर्थडे पार्टीमध्ये आवर्जून घेऊन जातात. तिकडे अशी सोय सर्व ठिकाणी असते. एकदा तर सुनेने ब्युटी पार्लरमध्ये नेऊन माझं पॅडिक्यूअर आणि मॅनिक्युअर सुद्धा करून आणलं आहे. अशा रीतीने तीन-चार महिने राहून भरपूर मजा करून आणि अमाप पॉझिटिव्हिटी घेऊन परत येतो. या सर्वांमध्ये माझ्या पत्नीची सक्रिय साथ असते म्हणूनच हे शक्य होते. ही पॉझिटिव्हिटी मला पुढच्या वारी पर्यंत पुरते.
घरी असलो तरी मला कधीही कंटाळा येत नाही कारण सकाळी उठल्यावर संपूर्ण पेपर वाचून काढतो. नंतर एखादे चांगले पुस्तक सुद्धा वाचतो घरातल्या स्मार्ट टीव्ही वर अँग्री बर्ड, quizup वगैरे गेम सुद्धा खेळतो. तसेच गुगल स्ट्रीट व्ह्यू वर वेगवेगळ्या शहराची सफर सुद्धा करतो. व्हाट्सअपवर मुलांशी आणि नातलगांशी व्हिडिओ चॅट करतो. मागे एकदा मुलगा नवीन घर घेणार होता तेव्हा गुगलवर वेगवेगळी घरं बघून त्याला नवीन घराबद्दल माहिती पण देत असे. शिवाय टिव्हीवर नॅशनल जिओग्राफिक ऍनिमल प्लॅनेट आणि मराठी सिरीयल तर पाहतोच त्यामुळे घरात असून सुद्धा वेळ कसा जातो कळतच नाही.
आता सांगा कोणी गुजराथी माणसानं मला जर विचारलं 'केम छो' तर मी 'मजा मा' असंच म्हणणार ना?
- सुधीर शेवडे, ठाणे

Wednesday 29 January 2020

वाडीचा प्रसाद होणार न्यायाधीश

बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यातील वाडी. ८५० घरांची वस्ती असलेलं खेडेगाव. इथला प्रसाद ठाकरे. वय २७. राज्य लोकसेवा आयोगाची दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) आणि न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला आहे.
प्रसाद सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला. प्राथमिक शिक्षण नगर परिषदेच्या मराठी प्राथमिक शाळेत. १० वीला ६० टक्के. १२ वीत ५१ टक्के. गुण कमी असल्यानं डॉक्टर होण्याचं स्वप्न बारगळलं. प्रसाद काहीसा हिरमुसलाच. घरची शेती करायची ठरवलं. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात एकूणच पाऊस अनियमित. त्यामुळे शेतीतून उत्पन्न कमालीचं घसरलेलं. प्रसादनं तीन वर्ष शेती केली. त्यातच दीड लाखांचं कर्ज झालं.
त्याने एलएलबीला प्रवेश घेत वकिली करण्याचे ठरवलं. एलएलबीला ५७ टक्के तर एल एल एम ला 70 टक्के. शेतीतून घर आणि शिक्षण खर्च निघणं अशक्य होतं. प्रसादने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. दररोज किमान ७ ते ८ तास अभ्यास.
२५० गुणांच्या परीक्षेत प्रसादला लेखीमध्ये १०९ आणि मुलाखतीमध्ये ३२ गुण मिळाले.. या परीक्षेसाठी राज्यभरातून जवळपास १५ हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. मात्र, अंतिम यादीत फक्त १९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.  ''परिस्थितीचा बाऊ करण्यात अर्थ नसतो. संघर्ष करावाच लागतो. जिद्द मात्र सोडायची नाही. कुठे ना कुठे यश मिळतंच.'' असं तो आत्मविश्वासानं सांगतो. वडील साहेबराव यांची प्रेरणा आणि अखंड साथ यामुळे जिद्द कायम राहिली, असं प्रसाद सांगतो.


-दिनेश मुडे, बुलडाणा

सिनेमा (ब्रह्मेपीडीयातील एक नोंद) (आखुडबुद्धी बहुशिंगी)

शीतकपाट (रेफ्रीड्जरेटर)मध्ये ज्याप्रमाणे कामप्रेस केलेला फ्रीऑन वायू खेळवून तापमान खाली उतरविले जाते त्याच्या विरुद्ध तत्वावर चालणारे यंत्र. या यंत्राची कल्पना लिओनार्दो दा विंचीला प्रथम सुचली असावी. त्याने याचे संकल्पचित्र बनवून त्याला हेलिकापतर असे नाव दिले. काम्प्रेसरमधून वायू फिरवून थंड केला जातो तद्वत एका मोठ्या प्रोजेक्टरमध्ये माणसांना छोटे करून त्या प्रतिमा वेगात फिरवून दाखवल्या जातात. या कलेचा शोध नवयुगात एडिसन प्रयोगशाळेने लावला. तदनंतर स्फूर्ती घेऊन फ्रान्सच्या ल्युमिएर बंधूंनी १८९५ साली सिनेमाचा पहिला प्रयोग केला. त्याच सुमारास भारतात हरिभाऊ ब्रह्मे यांनी पुणे येथे गणपती उत्सवात पहिला सिनेमा १८९३ साली दाखवला असे समजले जाते. हा सिनेमा रंगीत, आवाजासहित आणि ल्युमिएर बंधूंसारखा फिल्मवर चित्रीत केलेला नसून जिवंत होता. या सिनेमात बंदूकीच्या गोळीने समोरच्या माणसाच्या शरीराला छिद्र पाडण्याचा एक प्रसंग दाखवला जायचा. शुभारंभाच्या प्रयोगांनंतर या सिनेमाचे प्रयोग (पात्रांअभावी) होऊ शकले नाहीत. या सिनेमाच्या फिल्म कुठेही उपलब्ध नसल्याने पहिलेपणावर ल्युमिएर बंधूना हक्क सांगता आला.
ल्युमिएर बंधूंच्या यशाने प्रभावित होऊन जगभर सर्वत्र सिनेमाची पाळेमुळे रुजली. रात्रभर चालणाऱ्या लांबलचक नाटकांपेक्षा आटोपशीर असलेला हा प्रकार लवकरच लोकप्रिय होऊन सगळीकडे सिनेमा दाखवणारी थिएटरे उभी राहू लागली. अमेरिकेत क्यालिफोर्निया, भारतात कोल्हापूर, ब्राझीलमध्ये ॲमेझॉन, चीनमध्ये शांघाय आणि रशियात सायबेरीया या निसर्गरम्य ठिकाणी नवनव्या सिनेमांचे शूटींग धडाक्याने होऊ लागले.
सुरुवातीला, सिनेमा पाहणाऱ्या लोकांना आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून मूक सिनेमे बनवले जात. चारली चापलीन नामक नट या काळात अमेरिकेत प्रसिद्धीस पावला. या काळात सबटायटल्स (उपशीर्षकां)शिवाय सिनेमा पाहण्याची लाट असल्याने त्याचे इंग्रजी सिनेमे लोकांना न कळून इतरत्र त्याची लोकप्रियता फारशी झाली नाही. लारेल हार्डी नावाचा कधी जाड तर कधी बारीक असणारा नटही याच सुमारास उदयाला आला. सिनेमा पाहणाऱ्यांना विडीकाडीसाठी अथवा शेंगागंडेरीसाठी वेळ देता यावा म्हणून सिनेमात मध्येमध्ये गाणी वाजवण्याची प्रथा सुरु झाली. लोकांनी चहापाणी करण्याऐवजी गाणी ऐकत बसू नये म्हणून वाईट आवाजाच्या लोकांकडून गाणी म्हणवून घेण्याचा प्रघात होता. (हे लोण भारतात उशीराने पोचल्याने किमान शब्बीरकुमार, मुन्ना अजीझ आदी गायकांची सोय झाली.) गाणी वाजविता यावीत यासाठी सिनेमाला आवाज देण्याच्या कलेचा शोध लावला गेला. जाझ सिंगर या बोलपटापासून बोलपटांचे (टाकीज) युग सुरु झाले. केवळ वक्र भृकुटीच्या सहाय्याने अभिनय करणाऱ्या नटांची पंचाईत होऊन, स्टेजप्रमाणे आपली भाषणेही चोख पाठ करणे क्रमप्राप्त बनले. बरेच मूक अभिनेते या काळात पडद्याआड लुप्त झाले.
तत्कालिन कृष्णधवल रंगांमुळे पडद्यावर कृष्णकृत्ये करणारे खलपात्र दाखवण्यास अडचण येत असलेने सिनेमे रंगवण्यास सुरुवात झाली. सुरुवातीस एकएक चित्र स्वतंत्र रंगवले जाई. चंद्रावर स्वारी (१९०५) हा फ्रेंच सिनेमा कृष्णधवल कॅमेऱ्याचे चित्रीत करून नंतर रंगवला गेला. पुढे रंगीत कॅमेऱ्यांचा शोध लागल्याने रंगीत सिनेमे बनवणे सोपे झाले.
भारतात या कलेचा प्रसार बहुतच वेगाने झाला. नाटकांप्रमाणे सिनेमांसाठी अभिनयाची गरज नसलेने नुसते पडद्यावर उभे राहू शकणारे नट नायक म्हणून उदयास आले. पियानोवर भाकरी थापटल्यासारखे हात हलवणे, कॅमेरासमोर स्थितप्रज्ञासारखे उभे राहणे, हृदयविकाराचा झटका आला आहे असा चेहरा करून प्रेमगीत गाणे या अभिनयबळावर अनेक अभिनेते भवसागर तरून गेले. ७०च्या दशकात, आशा पारेख नामक नटीचा उदय झाला. तिचे दोन्ही डोळे एकाचवेळी कॅमेराच्या फिल्डमध्ये मावत नसलेने ७० एमएम वाईडस्क्रीनचा शोध लावावा लागला. कालांतराने भलत्याच भरीव अंगाच्या दाक्षिणात्य नटींना नीट न्याहाळण्याची सोय म्हणून थ्रीडी सिनेमाचीही सुरुवात झाली. जेव्हा बहुतांश सुस्वर गायक काळाच्या पडद्याआड लुप्त झाले तेव्हा गाणी सहनीय व्हावी म्हणून डॉल्बी नावाचे तंत्रज्ञान वापरले जाऊ लागले. यामुळे, गाणे सुसह्य वाटत नसले तरी नवीन तंत्रज्ञान असल्याने गाणे चांगले वाटते अशी समजूत लोक करून घेतात.
सध्या भारत देशात सर्वाधिक सिनेमे दरवर्षी बनवले जातात (हे सिनेमे प्रेक्षागारात दाखवून प्रेक्षकांनाही बनवले जाते.)

- ज्युनिअर ब्रह्मे

चला, मुलगे घडवूया (भाग १६)

नवी उमेदवर सध्या 'चला, मुलगे घडवूया' ही मालिका सुरू होती. मला दोन्ही मुली आणि मला सख्खा भाऊ नाही. त्यामुळे मुलामुलीतला भेद आमच्या घरी आमच्या वाट्याला आलाच नाही. घरात मुलगाच नसल्यामुळे जी सो कॉल्ड कामं मुलांनी करायची ती सगळी आम्ही मुलीचं करत होतो.
आता मात्र माझ्या मुली लहान आहेत आणि आजूबाजूच्या आयांकडून आणि कित्येकदा मुलांकडूनही मुली हे करत नाहीत, ते करत नाहीत हे ऐकायला मिळायचं. ही मुलं एकत्र खेळताना मुली नर्स व्हायच्या तर मुलगे डॉक्टर. एकदा मधे पडून मला सांगावं लागलं की मुलीही डॉक्टर असतात.
नुकतंच धाकटीला एक वाढदिवसाला जायचं होतं. गिफ़्ट आणायला गेलो. दुकानदाराने लगेच 'लडकेको देना है या लडकीको' असं विचारलं. मुलींसाठी गिफ़्ट दाखवली ती गळ्यातलं, कानातलं बनवायचं खेळणं, क्विलींगचा सेट, आर्टिफिशियल नखं आणि दुसरं खेळणं होतं अर्थातच भातुकली. पुन्हा 2 ते 3 दिवसांनी मुलीला पाण्याची बाटली हवी होती. पुन्हा एकदा तोच प्रश्न - 'बॉटल लडकी के लिये या लडके के लिये' या वेळी मात्र हा प्रश्न ऐकून त्याला म्हटलं, 'अरे, पाण्याच्या बाटलीत काय आहे मुलगी आणि मुलगा?' तर दुकानदार म्हणे, 'है ना । लडकीयोंके लिए पिंक ओर बार्बीकी पिक्चर्सवाली बोटल्स है । ओर लडकोके लिए अव्हेनजर्स, स्पायडरमॅन । ' हे ऐकूनच खरंतर चिडचिड झाली. त्याला म्हटलं हा फरक तुम्ही करताय. सगळ्याच मुलींना पिंक कलर, बार्बी आणि भातुकली आवडते असं नाही. तुम्ही वेगळं काही दाखवलंत तर तेही त्यांना आवडू शकतं.
अशी उदाहरणं बघितली की वाटतं, हे मुलगा मुलगी प्रकरण इतकं खोलवर झिरपलं आहे की हे बदलण्यासाठी काय करावं, कसं करावं हा प्रश्नच पडावा.
सरकारी शाळांत मीना राजू मंच हे काम करतो आहे. पण उच्च मध्यमवर्गीय शाळांचं आणि घरांचं काय?
उमेदवर मालिका सुरू केली तेव्हा हैदराबाद प्रकरण ताजं होतं. पोलिसांनी आरोपींचं एन्काऊंटर केलं तेव्हा काहीजण याविरुद्ध बोलले तर काही लोक बाजूने. विरुद्ध बोलण्याऱ्या लोकांना गलिच्छ भाषेत सुनवायला कुणालाच लाज वाटली नाही. आपल्या नावात आईचं नाव लावणाऱ्या काहींनी इथं आपण मनातून कसे आहोत हेही दाखवून दिलं.
तेव्हा मात्र हे सगळं बदलण्यासाठी काय करायला हवं हा विचार आमच्या उमेद टीमच्या मनात घोळू लागला. आणि आशय गुणे या उमेद टीममधल्या समंजस मुलाने 'चला, मुलगे घडवूया' हा विषय सुचवला. टीममधल्या काहींनी याविषयी लिहिलंच शिवाय उमेदसाठी म्हणून बऱ्याच जणांनी या विषयावर त्यांच्या घरात काय चर्चा झाली, त्यांच्या घरातील मुलांचे स्त्रियांविषयी विचार काय आहेत, ते घडवण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले ते लिहून पाठवलं.
या सगळ्यातून बऱ्याच टीप्स समोर आल्या. ज्यांच्या घरात लहानगी मुलं मुली दोघेही मोठी होताहेत त्यांच्यासाठी या टीप्स नक्कीच उपयोगी ठरतील.
मुलांशी मोकळा संवाद हवा.
शंका, प्रश्न न टाळता समजतील अशी उत्तरं द्यायला हवीत.
घरात आई बाबा दोघांनी मिळून कामं केली तर मुलांवरही ते बघून असंच करायला हवं हे संस्कार सहज होतात. वेगळं सांगावं लागत नाही.
खेळाबाबतही हे खेळ मुलींचे, हे मुलांचे असं वर्गीकरण न करता मुलालाही भातुकलीची आवड कशी निर्माण होईल हे पाहायला हवं.
वाईट वाटलं, मन भरून आलं तर रडलं तरी चालतं, पण मन मोकळं करायला हवं हे मुलांनाही आवर्जून सांगायला हवं.
मुलांचे मित्रमैत्रिणी कोण हेही पालकांना माहीत हवं.
निर्णयही आईचं मत विचारात घेऊन घेतले जातात हे मुलांसमोर घडायला हवं. कुटुंबातल्या पुरूषांना सर्व स्त्रियांविषयी आदर असणं. रंगरूपापेक्षा गुण, कतृत्त्वाला महत्व.
या मालिकेत एकूण 17 पोस्ट्स प्रसिद्ध झाल्या. पुरुष पालकांपैकी 5 बाबा लोकांनी मालिकेसाठी लिहिलं. तर 9 आयांनी लिहिलं. विशेष म्हणजे एका आजींनी त्यांच्या नातवंडांविषयीही लिहिलं. मालिकेतलं सर्वच जण विविध क्षेत्रातले आहेत. काही वकील आहेत, चळवळीतले कार्यकर्ते आहेत, पत्रकारितेतले आहेत तर डॉक्टर आईही आहेच.
हैद्राबाद रेपवरच्या प्रतिक्रियांत हे रोखण्यासाठी काय कारावं, कसं करावं यावर चर्चा खूप झाली. पण, आम्ही पालक म्हणून काय जबाबदारी पार पाडलीये याबद्दल चर्चा व्हायला हवी असं आम्हाला वाटलं. कारण, आम्ही चांगली बाजू लोकांपुढे आणत असते. आमच्याच टीममध्ये मृणालिनी, लताचा नवरा संदीप परब, जालन्याचे उमेद प्रतिनिधी अनंत साळी, नाशिकची चारूशीला, मुंबईची मेघना असे कितीतरी जागरूक पालक आहेत, हे जाणवलं. त्यांनीही लिहिलं आणि ही मालिका सिद्ध झाली. यातून नव्या पालकांना मुलं वाढवताना मदत झाली आणि मुलं वयात येणाच्या टप्प्यातल्या पालकांना दिशा मिळाली हा हेतू साध्य व्हावा, हीच इच्छा.
- वर्षा जोशी - आठवले

चला, मुलगे घडवूया (भाग १५)

दुपारी चारची वेळ असेल. मी आणि माझी चुलत बहीण खेळत आहोत. थोड्या वेळाने आम्ही एक सरबत ब्रेक जाहीर करतो. किचनमध्ये असलेल्या आजीला त्याची चाहूल बहुदा आधीच लागलेली असते. त्यामुळे आम्ही किचनमध्ये येतो तेव्हा दोन ग्लासात सरबत ओतलेले असते. आणि त्या सरबताच्या पातळी पर्यंत आपली नजर नेत आजी हे बघत असते, की मला आणि माझ्या बहिणीला समान वाटणी मिळाली आहे का? लहानपणीचे हे दृश्य मी माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात फ्रेम करून ठेवले आहे. आता लक्षात येते की 'स्री-पुरुष समानता' ह्या विषयातील तो पहिला धडा होता. आता विचार करतो तेव्हा हे लक्षात येतं की मुलगा म्हणून माझा नैसर्गिक हक्क घरातील कोणत्याही वस्तूवर (किंवा कशावरही) नाही हे ही छोटी पण महत्वाची उदाहरणं मनात बिंबवतात. त्यामुळे माझ्यातला मुलगा घडत गेला तो ही सर्वसमावेशकता घेऊनच!
आज देखील भोवती अशी बरीच कुटुंब आहेत जी कोणत्याही नवीन गोष्टीचा पहिला मान मुलाला देतात. मी लहान असताना काही कुटुंब अशी होती जी मोबाईल, सायकल किंवा दुचाकी वाहन हे पहिले मुलांसाठी घेत. आपण कुणीतरी विशेष आहोत हे मुलांना वाटतं ते अशा कृतीतून. घरात आपल्याला मान आहे, सर्व गोष्टींवर पहिला अधिकार आपला आहे हे वाटण्याची सुरुवात इथून आहे. स्री-पुरुष समानतेची दुसरी शिकवण मला मिळाली ती माझ्या आई-वडिलांकडून. पालकांचे घरातील वर्तन हे देखील मुलगे घडविण्यासाठी जबाबदार असते. मी घरातील सर्व निर्णय आई आणि बाबांच्या चर्चेनंतर घेतलेले बघितले आहेत. त्यात दोघांची चर्चा, मतं जाणून घेऊन मगच निर्णय घेतला जात असे. पण गोष्टी इथेच थांबत नाहीत. घरात कुणी आलं की त्यांच्या समोर बायकोला ओरडणे, सतत धाकात ठेवणे, तिने काही मत व्यक्त केलं की लगेच त्याची खिल्ली उडवणे किंवा तिच्यावर डाफरणे हे मी काही घरात बघितले आहे. त्यामुळे केवळ निर्णय घेण्यात बायकोचे मत जाणून घेणे हे न होता एकूणच तिच्या अस्तित्वाचा सन्मान झाला पाहिजे ही शिकवण मला अगदी घरीच मिळाली आणि मुलगा म्हणून घडण्यात मला त्याची मदत झाली. कोणत्याही मुलाला आपला स्रीवर 'हक्क' आहे ह्याची जाणीव वरील उदाहरणं पाळली गेली तर मनात खोल रुतून बसू शकते.
ही झाली लहान असतानाची काही उदाहरणं. तिथे मुलांची भूमिका निरीक्षण करण्याची असते. पण खरी कसोटी असते teen-ages मध्ये (वय वर्ष १३ ते १९). मी लहान असताना मुलं आणि मुली एकमेकांना फारसा स्पर्श करत नसत. आता परिस्थिती थोडी बदललेली जाणवते आणि वातावरणात अधिक खुलेपणा दिसतो. मात्र हा 'स्पर्श' चांगला की वाईट ह्याची शिकवण द्यायची गरज आहे. "सतत मुलींना हात लावू नकोस, त्यांना ते आवडत नाही", असं प्रत्येक 'गेट-टुगेदर'च्या वेळेस माझी आई सांगायची. परंतु जर 'हक्क' गाजविण्याचे संस्कार घेऊन तो मुलगा मोठा झाला असेल तर? असं असल्यास त्या स्पर्शात देखील 'हक्क' डोकावेल आणि त्याचे रूपांतर अहंकाराच्या भावनेत होईल. आणि मग समोरच्या मुलीने तो स्पर्श स्वीकारण्यास नकार दिला तर लहानपणापासून मनात रुजलेला हक्क आणि अहंकार दुखावून त्याचे रागात रूपांतर होईल. मला वाटतं मुलगे घडवताना ह्या सर्व गोष्टींचा नीट विचार झाला पाहिजे. Good Touch आणि Bad Touch ह्यातला फरक मुलग्यांना शिकविला पाहिजे.
त्यामुळे मुलगे घडवताना ह्या सर्व गोष्टींचा विचार झाला पाहिजे असं मला वाटतं - लहानपणी घरात मुलगा आणि मुलगी समान आहेत असे वातावरण घडविणे, आपल्याला प्रत्येक गोष्टीचा 'नैसर्गिक हक्क' आहे असं मुलग्यांना वाटू न देणे, चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श ह्यातला फरक त्यांना समजावणे आणि त्यांना नकार पचविण्याची सवय लावणे. ह्या एवढ्याच गोष्टी पाळल्याने गोष्टी सुधारतील असा माझा मुळीच दावा नाही. हा विषय आणि त्याचे परिणाम खूप व्यापक आहेत हे देखील मला माहिती आहे. मात्र मुलग्यांच्या मानसिक जडणघडणीत हे उपाय काही मौलिक बदल घडवू शकतील हे मात्र नक्की!

- आशय गुणे

Saturday 25 January 2020

गोष्ट जत्रेची, जत्रा घोड्यांची (भाग चार)

हौसेला मोल नसते असं म्हणतात... याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर आपल्याला सारंगखेड्याच्या घोडे बाजारात रपेट मारावी लागेल. या घोड्यांच्या बाजारात लाखो रुपये किमतीचे घोडे आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. यात सर्वाधिक वेड लावले आहे ते कल्याणी आणि राजवीर या घोड्यांच्या जोडीने.
यंदा लोकसहभागातून सुरू झालेला सारंगखेड्याचा घोड्यांचा बाजार या वर्षी अतरंगी अश्वानी सजला आहे. या घोडे बाजारात यंदा २२०० घोडे दाखल झाले आहेत. पहिल्या तीन दिवसात या बाजाराची उलाढाल कोटीच्या वर गेली. या सर्व अश्वांमध्ये लक्षवेधी ठरते आहेत ती कल्याणी नावाची घोडी. काळा रंग आणि पांढऱ्या रंगाचे पाय यामुळे कल्याणीचे सौंदर्य अधिकच उठून दिसते. त्यामुळेच कल्याणी या यात्रेत सर्वाधिक पसंतीला उतरणारी ठरली आहे. कल्याणीने देशांतर्गत घोड्याच्या स्पर्धेत सलग सहा वेळा विजयी मिळवला आहे. अस्सल मारवाड जातीची कल्याणी ही ब्लड लाईनची (उत्तम वंशावळीची) असून एका उत्तम अश्वात असावे ते सर्वगुण तिच्यात आहेत. तिचा आहार विहार पाहिल्यावर अवाक व्हायला होते. तिची निगा राखण्यासाठी स्वतंत्र नौकरांचा ताफा काम करतो. १० लिटर दूध, तूप असा कल्याणीचा खुराक असून ती अदन्त प्रकारात मोडते. नाशिकच्या एक अश्व शौकीनाने कल्याणी २१ लाख रुपयांना मागितली आहे. मात्र ५१ लाखात ही घोडी विकायची असल्याचे तिचे मालक पवनसिंह चोप्रा सांगतात.
कल्याणीला या यात्रेत साजेसा दिसतो तो राजवीर हा पांढऱ्या रंगाचा घोडा. राजवीर हा आपल्या उंची आणि पांढऱ्या शुभ्र रंगाने सेल्फी काढणाऱ्यांना आपल्याकडे मोहित करीत आहे. राजवीरला ११ लाख रुपयांना मागितले गेले आहे. मात्र बाळू पाटील यांनी हा घोडा विकलेला नाही. राजवीरची सेवा करण्यासाठी २४ तास ४ मजूर असतात. त्याच्या खानपानाची विशेष काळजी घेतली जाते. त्याला दररोज पाच लिटर दूध, एक किलो गावरान तूप आणि चणा डाळ, गहू आणि बाजरी त्या सोबत कोरडा आणि सुका चारा दिला जातो. राजवीरमध्ये भुजबळ नावाचं शुभ लक्षण आहे. लाखो घोड्यातून एकातच ते असते. या घोड्यात असल्यामुळे त्यांची किंमत आसमंताला गवसणी घालत असल्याचे बाळू पाटील हे राजवीरचे मालक सांगतात.
हे महागडे घोडे विकत घेणे अनेक अश्व शौकींना शक्य नसले तरी बहुतांश या अश्वांसोबत फोटो जरूर काढून दुधाची तहान ताकावर भागवतात. एकाहून एक सुंदर आणि रूबाबदार घोडे पाहण्याचा हा दुर्मिळ योग दरवर्षी लाखो अश्व शौकीन साधतात. कल्याणी... राजवीर हे अश्व आपल्या अदांनी आणि किमतीने अवाक करणार असले तरी त्यांना पाहणे ही देखील एक मोठी पर्वणी आहे. ही पर्वणी साधण्यासाठी आणि या अश्वांप्रमाणे अनेक नामी अश्व पाहण्यासाठी आपल्याला एकदा सारंगखेड्याच्या या अश्व पंढरीची एक वारी अवश्य करावी लागेल. 
- कावेरी परदेशी, धुळे

चला, मुलगे घडवूया (भाग १४)

मुलांचं बालपण आठवायचं म्हणजे आयुष्यातली 25 आणि 27 वर्षं rewind करायची. सौरभ आणि मिहीर यांचं बालपण म्हणजे "पालक" म्हणून आमच्या दोघांचा घडण्याचा काळ !
एकत्र कुटुंबात असल्यामुळे आजी आजोबांचे अनुभव मुलांच्या दुखण्याखुपण्यात नेहमीच उपयोगी ठरत. त्यांच्या मायेची अगदी आजीने स्वतः शिवलेल्या गोधडीची ऊब मुलांना मिळाली. खाऊ, खेळणी आणि मुलग्यांसाठी त्यातल्या त्यात जे काही फॅशनचे टी शर्ट, शर्ट पॅन्ट, जोधपुरी, धोती वगैरे खरेदी करून आमची हौस आम्ही भागवत असू. छान छान गोष्टी आणि बालगीतांच्या कॅसेट्स लावत असू. माझी रेडिओची नोकरी असल्याने दिवसाची सुरुवात गाणी, भाषणं, मुलाखती यांनी होत असे, आजही तसंच सुरू आहे. त्यामुळे चांगलं ऐकणं हा एक अविभाज्य भाग होता. चांगली व्याख्यानं ऐकणं, कविता, गाणी, नाटक अधिक प्रमाणात आणि कधीतरी सिनेमा बघायला जात असू.
मुलांना मराठी आणि पुढे सेमी इंग्लिश माध्यमात शिकवण्याचा निर्णय आम्ही दोघांनी एकमताने घेतला. त्याचबरोबर इंग्रजी अक्षर ओळख, मराठी आणि सोप्या इंग्लिशमधली चित्रगोष्टींची पुस्तकं वाचन असं सुरू असायचं. मुलांशी गप्पा माझ्या तर खूपच कारण आज रेकॉर्डिंगला कोण मोठी व्यक्ती आली होती, त्यांनी काय सांगितलं, त्यांचे काही अनुभव मी तेव्हा आणि आजही सांगत असते. मोठ्या लोकांचा साधेपणा, अभ्यासपूर्ण बोलणं याचे किस्से मुलंही मनापासून ऐकायची. मात्र शाळेत काय झालं त्याविषयी बोलण्यात त्यांना रस नसे. विशेषतः मुलींच्या आया सांगायच्या, ती वर्गात घडणारी प्रत्येक गोष्ट सांगते. ही दोन्ही मुलं त्याबाबतीत अतिशय अनुत्साही. शाळेतल्या स्पर्धांमध्ये, कार्यक्रमात दोघेही भाग घ्यायचे. त्यासाठी नेहमीच त्यांना प्रोत्साहन दिलं, तयारी करून घेतली. पुढे सौरभ कराटे शिकू लागला आणि मिहीर गाणं. सौरभने कराटेच्या परीक्षा दिल्या. मिहिरने मात्र 3 परीक्षा झाल्यावर परीक्षा न देता गाणं शिकणं सुरू ठेवणार असं सांगितलं. त्यालाही आमची ना नव्हती. शाळेचा अभ्यास दोघांचाही व्यवस्थित होता. मिहीर वर्गात साधारण पहिल्या पाचात आणि सौरभ पहिल्या पंधरात. एकाला दोन्ही स्कॉलरशिप मिळाल्या, एकाला नाही. शाळेचा अभ्यास सातवी पर्यंत घरीच घेतला. स्कॉलरशिपची तयारी बाबा करून घेत असे.
घरात संख्येने पुरुषांची majority होती. सासरे, नवरा, दीर आणि दोघे मुलगे. तरीही काहीही ठरवताना सासुबाई आणि माझा विचारही नेहमीच घेतला जातो. महत्त्वाचं काही असलं की, कालनिर्णय घेऊन गोलमेज परिषद भरते, असं आम्ही गमतीने म्हणतो. पुढे चर्चेत मुलंही सहभागी होऊ लागली. त्यांचंही ऐकलं जातं.
माझी एक मैत्रीण म्हणायची, नोकरी करणाऱ्या आईची मुलं adjustive असतात. त्याचा प्रत्ययही आलाच. पण हे केवळ नोकरीमुळे नसेल तर एकूणच घरकाम हे फक्त बाईनेच करायचं असं वातावरण नसल्याने मुलंही शिकत गेली. भांडी घासणारी मावशी आली नाही तर त्यांचे आता 85 वर्षांचे असलेले आजोबा हे पूर्वीपासून आपलं ताट आपण घासायचे. साहजिकच बाबा आणि मिहीर सुद्धा आपापलं ताट वाटी घासून इतर कॉमन भांडी घासायला सुरूवात करतात. फरशी पायाला चिकट लागली की फिनेलच्या पाण्याने अख्खं घर कुणीही न सांगता मुलं पुसून काढतात.
एकाला स्वच्छतेची तर दुसऱ्याला स्वयंपाकाची आवड आहे. गंमत म्हणून किंवा नवीन डिश ट्राय करताना एकजण जिन्नस आणून देईल आणि दुसरा पदार्थ करेल. मिहीरचं सुरीने भाजी चिरणं, डिश सजवणं अतिशय सुबक काम. बाकी त्याला पसारा घालण्याची आणि सौरभला आवराआवर करायची आवड आहे. त्यावरून वाद व्हायचे. शिस्त, नीटनेटकेपणा यावरून एकमेकांना बोलणं सुरू असायचं. भांडण होऊन परत एक होणं ठरलेलंच असे.
घरात मुलगीच नसल्यामुळे मुलगे काम करतात, असं कुणी म्हणतात. पण ते खरं नाही. घर हे सगळ्यांचं आहे, हे त्यांच्या बाबाने आपल्या कृतीतून शिकवलंय. आज सौरभ चार्टर्ड अकाऊंटंट होऊन एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करतो आहे. तो फ्रेंच अनुवादक म्हणून नोकरी करणाऱ्या त्याच्या पत्नीला, अदितीला घरकामात मदत करतो. मिहीर एमबीबीएस झाला. आता एमडीची तयारी सुरू आहे.
मुलींनी शिकून उत्तम करिअर केलं पाहिजे, असा त्यांचा दृष्टिकोन आहे. प्रियांका रेड्डीची बातमी आल्यावर मिहीर खूप अस्वस्थ झाला. "हिम्मतच कशी होते यांची? किती घाणेरडी, बेकार वृत्ती आहे ही. कडक आणि कठोर शिक्षा लगेच व्हायला हवी या गुन्हेगारांना," असं म्हणत तरूण रक्त सळसळलं. सौरभ म्हणाला, " हे फार घाणेरडं आहे. भयंकर आहे. ह्याने देशाची प्रतिमाही किती वाईट होते."
दोघांनाही मित्र मैत्रिणी आहेत. कधीतरी बाहेर फिरायला, जेवायला जाणं वगैरे अगदी नॉर्मल मैत्रीचं नातं आहे. एकमेकांना मदत करणं हे अगदी सहज होतं. पण एकूणच आजच्या कॉर्पोरेट जगात मुलगे आणि मुली यांचं वागणं थोडं अधिक स्वैर होताना दिसतंय, असं सौरभचं मत आहे.
माझ्या रेडिओतल्या कामाबद्दल दोघांनाही आदर, प्रेम आहे. सौरभ तर गमतीत एकदा म्हणालाही होता, I am proud of you.
ह्या दोघांच्या वाढण्या घडण्यात बालमोहन शाळा, चाळ कम ब्लॉक मधला उत्तम शेजार हे सारंच मोलाचं आहे. हे सगळं लिहिणं खूप आनंदाचं आहे.

- नेहा खरे

गोष्ट जत्रेची, जत्रा घोड्यांची (भाग तीन)

पंचकल्याण, देवमान, कंठळ, जयमंगल, पद्य, श्यामकर्ण, भुजबळ असे एक ना अनेक गुण असलेले घोडे केवळ याच बाजारात पाहायला आणि विकत घ्यायला मिळतात. त्यामुळे सारंगखेड्याचा हा घोडे बाजार देशातल्या नामवंत अश्व शौकिनांना नेहमीच भुरळ घालत आला आहे. पांढ-या आणि काठियावाड घोड्यांची या बाजारात हुकूमत आहे. या वर्षी या यात्रेत मारवाडी आणि कुमेड अश्वांचा बोलबाला आहे.
सारंगखेड्याचा घोडे बाजार नेहमीच वेगवेगळे विक्रम प्रस्थापित करत आलाय. आता सारंगखेड्यात आंतरराष्ट्रीय घोड्यांविषयी माहिती देणारं ग्रंथालय आणि संग्रहालय उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संपूर्ण जगातील अश्व प्रेमींना सारंगखेड्यात आकर्षित करण्यासाठी आणि सारंगखेड्याला ग्लोबल अभ्यास केंद्र बनविण्यासाठीही कष्ट घेतले जात असल्याचे जयपालसिंग रावल सांगतात.
एकाहून एक आरस्पानी सौंदर्याचे धनी असलेल्या जातिवंत घोड्यांचं हे आगळं वेगळं विश्व आपल्यालाही वेड लावेल असे आहे. सोबतच ऐतिहासिक सारंगखेड्याला लाभलेला तापीचा विस्तीर्ण किनाराही आपल्याला साद घालतो.
सारंगखेडा गावाला तापी नदीनं भरभरुन वैभव दिलंय. सारंगखेड्यात नदीवर ब्यॅरेज बांधण्यात आला असून अथांग पाणी या प्रकल्पात आहे. तापीचं पात्र पाणी साठवण्यासाठी अव्वल का आहे हे सारंगखेडा ब्यॅरेज पाहिल्यानंतरच लक्षात येतं. हा ब्यॅरेज या गावालाच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरालाही सुजलाम सुफलाम ठेवतोय. ऊसाचे मळे आणि शेतातल्या हिरवळीचं वैभव याच ब्यॅरेजनं दिलंय. ऊस, कापूस, गव्हाची हिरवीगार शेतं तर आपल्याला भुरळ पाडतात. सातपुड्याच्या डोंगररांगांच्या भव्यतेची आणि तापीच्या पुण्याईची चुणूक दाखवणा-या सारंगखेडा गावात आपल्याला आपलंसं करण्याची खासियत आहे. अथांग पाणी आपल्या कुशीत घेऊन बसलेल्या पण शांत तापी नदीच्या किनारी वसलेल्या सारंगखेडा गावाला निसर्गानं भरभरुन दिलंय. 
- कावेरी परदेशी, धुळे

दहावी ते पीएचडी व्हाया ३० ‘सेट’ नेट

सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातील कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरचे तोळणूर गाव. इथले धानय्या गुरुलिंगय्याकवटगीमठ. वय 37. 24 राज्यांच्या सेट, 3 नेट आणि 3 टीईटी उत्तीर्ण होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
धानय्या यांचे वडील शेतमजूर आणि आई गृहिणी. निरक्षर कुटुंबात जन्म. इंग्रजीत दहावीला ३६ तर बारावीला ३७ गुण. तोळणूरमधल्याच जिल्हा परिषद कन्नड शाळेत सातवी तर सिद्धेश्वर प्रशालेत दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण. अकलूजमधल्या महात्मा फुले महाविद्यालयातून बी. एड. २००८ मध्ये अक्कलकोटच्या मंगरुळे प्रशालेत शिक्षक म्हणून रूजू. तिथे ते मुलांना कन्नड भाषेतून इतिहास -भूगोल शिकवत. शाळा सांभाळून सोलापूर विद्यापीठातून ते एम. ए. झाले. 
याच दरम्यान त्यांची सांगलीतल्या आटपाडी इथल्या प्रकाश स्वामी या प्राथमिक शिक्षकांशी भेट झाली. स्वामी नुकतेच सेट पास झाले होते. त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली. २०१२ महाराष्ट्राच्या सेट परीक्षेची तयारीला सुरुवात. शाळा सांभाळून सकाळी ३ तास आणि संध्याकाळी ४ तास अभ्यास. 
सुरुवात अपयशाने झाली. यशानं दोन वर्षं हुलकावणी दिली. याच दरम्यान त्यांनी आपल्या अभ्यासाची तयारी किती झाली आहे हे जाणून घेण्यासाठी केरळ राज्याची सेट परीक्षा दिली. त्यात यश मिळालं. मग त्यांनी इतर राज्यांच्या परीक्षा देण्यास सुरुवात केली. 
२०१५ साली ३५० पैकी २७० गुण मिळवत महाराष्ट्राच्या सेट परीक्षेत ओबीसीमधून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.
आपल्या विषयातील खोलवर ज्ञान मिळविण्यासाठी आणि इंग्रजी लिटरेचरमध्ये प्रत्येक राज्यात काय वेगळेपण असते हे जाणून घेण्यासाठी त्यांनी इतर राज्यांच्या सेट परीक्षा देण्याचाही पायंडा सुरू केला. ज्या-ज्या राज्यात परीक्षा देण्यास गेले. तिथल्या मुख्य विद्यापीठाला भेट देऊन ३७ विषयांचा अभ्यासक्रम गोळा केला. देशातल्या१४ मुक्त विद्यापीठ आणि ५० केंद्रीय विद्यापीठांना भेट दिली. हे सारे करत असतानाकर्जाचा डोंगर डोक्यावर उभा राहिला. पण अभ्यासात त्यांनी खंड पडू दिला नाही. 
केरळ, गुजरात, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, ईशान्येकडल्या सात राज्यांची मिळून गुवाहाटी विद्यापीठाची परीक्षा दोनवेळा देऊन धानय्या उत्तीर्ण झाले. मात्र यावर समाधान न मानता सोलापूर विद्यापीठातून सुधा मूर्तींचे साहित्य चरित्र याविषयावर डॉ. प्रा. तानाजी कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएच. डी. करण्यास सुरुवात केली.
ब्रिटिश कौन्सिल, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, प्राथमिक शिक्षा अभियान यासाठी रिसोर्स पर्सन म्हणून ते कामही करत आहेत. देशातल्या विविध विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतात. त्यांनी मार्गदर्शन केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ३८ विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे. 
वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर रिपब्लिक इंग्लंड, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया, युनिव्हर्सल रेकॉर्ड फोरम अमेरिका, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड हॉंगकॉंग, गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, आस्ट्रेलिया तसेच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी त्यांचं नामांकन झालं आहे. यूजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ.भूषण कुमार पटवर्धन यांच्या हस्ते त्यांचा यूजीसीत सत्कार झाला. 
धानय्या यांनी नेटसेटवर नऊ पुस्तकं लिहिली असून चार प्रकाशित झाली आहेत. नॅशनल बुक ट्रस्टची पुस्तकं, इंडिया इअर बुक, कुरुक्षेत्र आणि योजना मासिकं, केंद्र सरकारच्या प्रकाशन विभागाची पुस्तकं, एम्प्लॉयमेंट न्युज यांचा परीक्षेसाठी खूप उपयोग झाल्याचं धानय्या सांगतात.

-अमोल सीताफळे, सोलापूर 

गोष्ट जत्रेची, जत्रा घोड्यांची (भाग दोन)


 नाथ संप्रदायातील एकमुखी दत्ताचं मंदिर, ऐटदार घोडे बाजार आणि अथांग भरलेली तापी नदी असा आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक त्रिवेणी संगम म्हणजे सारंगखेडा. बाजारात पंजाबी नुकरा, काठियावाड, मारवाड, सिंध आणि गावठी अशा सर्व प्रकारचे घोडे एकाचवेळी पहायला मिळतात. बादल, बिजली, दरबार अश्या राजबिंड्या घोड्यांकडे पाहिलं की त्यांची श्रीमंती आपसूकच डोळ्यात भरते.
ऑडी, मर्सिडीज घेणं सोपं पण हे घोडा घेणं अवघड. सर्व भेदाभेद आणि अर्थिक स्तर या यात्रेत मिटून जातात. अश्व प्रेम आणि आकर्षण याच रंगात या यात्रेत येणारा प्रत्येक जण लीन होतो. इथं होणारी उलाढालही कोट्यवधींच्या घरात असते. सारंगखेड्याच्या बाजारात पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेशातून घोडे व्यापारी आणि खरेदीदार येतात. या घोडे बाजाराला भेट देणा-यांची संख्या वर्षागणिक लाखोंनी वाढते आहे.
आजघडीला या बाजाराला आधुनिक फेस्टिव्हलचं रूप आलं आहे. सारंगखेड्यात होणाऱ्या घोड्यांची रेस, डान्स कॉम्पिटीशन, चेतक फेस्टिव्हल. एक ना अनेक, घोड्यांशी निगडीत उत्सव आणि प्रदर्शन इथंच आपल्याला अनुभवता येतं. वीर योद्धा महाराणा प्रताप यांचा घोडा चेतक आणि शिवरायांची घोडी कृष्णा या नावांवरून सारंगखेड्याच्या स्पर्धेत बक्षीस दिलं जातं. यावर्षी या यात्रेत २३०० अश्व विक्रीसाठी आले असून सुरुवातीच्या काही दिवसात दीड कोटी रुपयांची अश्व खरेदी विक्रीतून उलाढाल झाल्याचे या यात्रेचे आयोजक जयपालसिंग रावल सांगतात.
गेल्या चार शतकांपासून ही यात्रा स्थानिक आयोजन समितीकडून भरवली जात होती. गेली दोन वर्षं या यात्रेला पर्यटन विभागाने मदत केली होती. यावर्षी मात्र ही यात्रेला आणि चेतक फेस्टिवल लोकसहभागातून आयोजित करण्यात आल्यासह या यात्रेचे प्रमुख जयपालसिंग रावल सांगतात. येणाऱ्या काही वर्षात या यात्रेला जागतिक स्तरावर स्थापित करण्याचा संकल्प सारंगखेडा यात्रेला आयोजन समितीने केला आहे. 
- कावेरी परदेशी, धुळे

दुष्काळ पडला तरी घोडे कुटुंबाला एक वर्ष पाणी पुरेल...

अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातलं गाव बारी. महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर असलेल्या कळसूबाईच्या पायथ्याशी हे गाव. पावसाचं प्रमाण जास्त परंतु उताराची जमीन अन कातळ खडक यामुळे पावसाळ्यानंतर दोन महिन्यांनी पाण्याच दुर्भिक्ष जाणवतं. पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन जावं लागे. 
बाळू घोडे हे तेथील प्रयोगशील शेतकरी. पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्याचं त्यांनी ठरवलं. 
जानेवारी 2019 ला घराच्या बाहेरील बाजूस त्यांनी खड्डा काढून पाण्याची टाकी बांधली. विशेष म्हणजे टाकीची रचना त्यांची स्वतःचीच. ८ फूट लांब, ६ फूट रुंद, ६ फूट खोल. खर्च ५० हजार रुपये. ही टाकी सुमारे २००० लीटर पाणी साठवते.
पावसाळ्यात समोरचं घरआणि स्वतःच्या घराच्या पत्र्यावरचं पाणी पाईपद्वारे साठवून पिंपात सोडलं जातं. मग ते टाकीत सोडलं जातं. पावसाचं पाणी एकत्र करून ते पिंपात सोडताना पाईपच्या मुखावर कापड बसवून पाणी गाळतात . पाण्यात किडे होऊ नये म्हणून त्यात मासे आणि ग्रामपंचायतीतून मिळणारे निर्जंतुक औषध टाकलं जातं . पाणी घेताना त्यावर सूर्यप्रकाश पडू नये याची काळजी घेतली जाते,सूर्यप्रकाश पडल्यास त्यात किडे होण्याची शक्यता असते.
बाळूभाऊ म्हणतात,जर एखाद्या वर्षी दुष्काळ पडला तर,माझ्या कुटुंबाला वर्षभरासाठी पुरेल इतके पाणी टाकी साठवते. बाळूभाऊंमुळे गावतील इतर मंडळी टाकी बनवण्यास उत्सुक आहेत.
यासोबतच काळी नाचणी,काळी वरई,कालभात,कारले,दोडका,दुधी,उडीद,पावटा,राजमा अशा सुमारे ४० देशी वाणांच्या बियाणांचं जतन त्यांनी केलं आहे. गेली चार वर्षे झाले ते सेंद्रिय शेती करतात. कृषी विद्यापीठातले अनेक विद्यार्थी, पर्यटक त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येतात.
बाळू घोडे- ९४२३७ ४०५१६ 

- संतोष बोबडे

गोष्ट जत्रेची, जत्रा घोड्यांची

देशातील क्रमांक दोनचा आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा असलेल्या सारंगखेड्याच्या अश्व (घोड्यांची) यात्रेची ऐटीत सुरुवात झाली आहे. एकमुखी दत्ताचे मंदिर, जातिवंत अश्वांचे नेत्रदीपक विश्व आणि तापी नदीच्या किनारी पर्यटनाचा आंनद अशी त्रिवेणी मेजवानी येथे येणाऱ्या प्रत्येकाला अनुभवता येते. याच सारंगखेड्याचा यात्रेची रपेट आपण येणाऱ्या आठवड्यात करणार आहोत.
अश्वांचे आकर्षण भारतीय समाजाला खूप आधीपासून आहे. एकेकाळी ग्रामीण भागात अनेकांकडे स्वतःचे घोडे राहत. मात्र काळ बदलला... शौक बदलले... पण घोडयांप्रती असलेलं आकर्षण मात्र समाजात तसंच आहे. त्यामुळेच नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीच्या किनारी भरणाऱ्या सारंगखेड्याच्या घोडे बाजाराला दरवर्षी लाखो अश्व शौकीन हजेरी लावतात. गेल्या वर्षी तब्बल १३ लाखाहून अधिक लोकांनी या यात्रेला भेट दिली होती.
शौक बडी चीज है... असं नेहमीच म्हटलं जातं. कुणाला गाड्यांचा तर कुणाला सुसाट धावणाऱ्या बाईकचा... पण रुबाबदार, ऐटबाज आणि आरस्पानी रुपडं लाभलेल्या घोड्यावर स्वार होऊन जग जिंकायला निघण्याचा शौक त्यापेक्षा काही निराळाच, वेगळीच झिंग आणणारा... आणि हा शौक पूर्ण करण्याची संधी देतो सारंगखेड्याचा घोडे बाजार... अतरंगी आणि जातिवंत घोड्यांचं हे आगळंवेगळं विश्व... घोड्यांचा शौक असणाऱ्यांपासून सर्वसामान्यांना आकर्षित करणारी अश्व पंढरी म्हणजे 'सारंगखेडा'.
छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते इंग्रज घोडदळासाठी जिथून घोडे खरेदी करत तोच हा सारंगखेड्याचा ऐतिहासिक घोडे बाजार. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेल्या या घोडे बाजाराला चारशे वर्षांची परंपरा आहे. सारंग हे घोड्याचं समानार्थी नाव असल्यामुळे त्यावरूनच गावाचं नाव सारंगखेडा पडल्याचं गावातली जुनी जाणती मंडळी सांगतात. दरवर्षी कोटीच्या कोटी उड्डाणं घेणारा हा घोडेबाजार श्री दत्त जयंतीला सुरू होतो.
तापीच्या किनारी वसलेलं आणि महानुभाव पंथाचं श्रद्धास्थान असलेलं सारंगखेडामधलं एकमुखी श्री दत्ताचं मंदिर. या एकमुखी दत्ताच्या या मंदिरामुळेच राज्यात सारंगखेड्याची वेगळी ओळख आहे.
२० दिवस चालणा-या या उत्सवासाठी लाखो भाविक देश विदेशातून इथं येतात. घोडेबाजार हे इथलं मुख्य आकर्षण. त्याचबरोबर शेती आणि संसारोपयोगी वस्तूंसाठी हा बाजार नावाजलेला. कधी काळी इथं मोठा बैल बाजारही भरत असे. कालौघात तो नामशेष झाला. इथं पार पडणारे सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक उपक्रम सारंगखेड्याला येणाऱ्या प्रत्येकाच्या लक्षात राहतील असेच आहेत.
- कावेरी परदेशी, धुळे

आर्किऑलॉजी (पुरातत्व शास्त्र) (आखुडबुद्धी बहुशिंगी)

जे जुने सांगाडे बघून कुणालाही कसलाही बोध होत नाही त्याबद्दल आपल्याला फार समजते अशी समजूत करून देणारे शास्त्र म्हणजे पुरातत्त्व शास्त्र. हे शास्त्र इतर कुणालाच कळत नसल्याने पुरातत्त्व शास्त्रज्ञ सहसा चुकीचे ठरत नाहीत.
झांबियातल्या एका उत्खननात सापडलेली मातीची भांडी, माणसाचं माकडहाड आणि झेब्र्याचं शिंग यांना जोडून एका आर्किऑलॉजिस्टनं आफ्रिकेतल्या मूळ मानवाला शिंग होते, कासवासारखी पाठ आणि माकडासारखी शेपूट होती असे निष्कर्ष काढले होते. त्याच्याकडं पाहिल्यावर कुणीही संशोधनाबद्दल शंका घेतली नाही. आणखी एका पुरातत्त्वज्ञाने रशियात डायनोसॉरची अंडी सापडली असा दावा केला होता. त्याच्या शोधानुसार ही अंडी रंगीबेरंगी नक्षीची असून त्यावर धार्मिक चित्रे काढलेली होती. यावरून त्याकाळचे डायनोसॉर हे आस्तिक होते असा निष्कर्ष काढला गेला. डायनोसॉरची अंडी साधारण कोंबडीच्या अंड्याइतकी असायची, त्या अर्थी हे प्राणी फारसे मोठे नसावेत असेही अनुमान मान्य झाले.
जगभरातल्या पुरातत्त्वसंशोधकांत फू शिन चेचे हा चिनी संशोधक सर्वात अधिक नावाजला गेलेला आहे. चीन, जपान, भारत, इजिप्त, सीरिया, ग्रीस या देशातल्या बऱ्याच ठिकाणी त्याचे संशोधन प्रसिद्ध आहे. हा संशोधक आपल्या निष्कर्षाच्या नेमकेपणासाठी प्रख्यात आहे. आफ्रिकेतल्या टांगानिका प्रदेशात सुमारे सहाशे एकोणीस फूट आणि सव्वातीन इंच खोल खोदून सुमारे तीन हजार दोनशे बावीस वर्षांपूर्वी या ठिकाणी मानव राहात नव्हता असा खळबळजनक निष्कर्ष त्याने जाहीर केला. याचबरोबर ग्रीसमधल्या उत्खननात कचरा सापडल्यावर इ०स०पूर्व ३३४ मध्ये तिथे डंपिंग ग्राऊंड असणार असे संशोधन त्याने जाहीर केले होते. अथेन्स येथील उत्खननात जुनी जीन्स सापडल्यावर प्राचीन मानवासही जीन्सबद्दल माहिती होती हे आजवर दडून राहिलेले रहस्य उघड झाले. याला पुष्टी मिळाली ती "ज्याची जीन्स असेल त्याने ओळख पटवून दहा दिवसांत घेऊन जावे." असे आवाहन केल्यावरही कुणी पुढे आले नाही त्यावरून. अर्थात, या जीन्सचा मालक अडीचतीन हजार वर्षांपूर्वीच निवर्तला होता हे उघड आहे. जीन्सबद्दलची माहिती मानवाच्या जीन्समध्येच असावी.
भारतातही ठिकठिकाणी प्रवास करून त्यांनी संशोधन केले आहे. राजा भोजच्या जुन्या महालाच्या पायऱ्या उत्खननात सापडल्या त्यामागे फू शिन चेचेचेच अथक प्रयत्न होते. तीनशे फूट खोल सापडलेल्या या पायऱ्यांच्या दगडांवर 'बाळू लव्ह चमेली' असे लिहिलेले सापडले. त्यावरून शिळालेख लिहिण्याच्या भारतीय परंपरेचा उगम इतका प्राचीन आहे इतका बोध मिळतो. चीनमध्ये संशोधन करताना 'चिनी लोक पूर्वी सरडे खात नसत.' असा शोध लावल्यावर चिडलेल्या चिनी जनतेने त्याला चाळीस फूट खोल खड्ड्यात ढकलून वर माती लोटून दिली.
आता आणखी अडीच हजार वर्षांनी तत्कालीन पिढी फू शिन चेचेचा शोध लावेल तेव्हा आपणांस त्याच्याबद्दल आणखी माहिती मिळेल.
साधारणतः उत्खननासाठी वापरली जाणारी हत्यारे- एक्सकाव्हेटर (माती खणण्यासाठी), डंपर (माती वाहून नेण्यासाठी), आणखी डंपर (माती परत आणून खड्ड्यात भरण्यासाठी), आणखी आणखी डंपर (बाकीचे डंपर नादुरुस्त झाल्यास बदली म्हणून), सेबलहेअर ब्रश (उत्खननातून नाजूक सांगाडे वेगळे करण्यासाठी), मोठी लोखंडी चाळण (छोटे तुकडे चाळून घेण्यासाठी. परंतु ही रात्री डास चावू नयेत म्हणूनही वापरता येते), चमचे (पुरातत्वशास्त्रज्ञाना जेवण करण्यासाठी. कैकदा सिमेंट मिसळण्यासाठीही वापरतात.)


- ज्युनिअर ब्रह्मे

चला, मुलगे घडवूया (भाग १३)

"कोण रे ही?"
"पप्पा मागच्या वर्षी माझ्या क्लासमध्ये होती आता तिची डिव्हिजन बदलली.आम्ही बोलतो चांगले." 
मानस मागच्या आठवड्यात टिटवाळ्याला शाळेच्या ट्रीपला गेला होता,रात्री त्याला आणण्यासाठी मी गेलो तेंव्हा ट्रॅव्हल्स मधून उतरल्यानंतर मुलं एकमेकांना बाय करत होती. मानसला घेऊन निघतांना 2 बारीक हात हलले म्हणून मी वळून पाहिलं, छोटीशी मुलगी मानसला बाय करत होती म्हणून मी विचारलं. कारण सकाळी जाताना यांच्या क्लासमध्ये मला ती मुलगी दिसली नव्हती. मुलामुलींमधला भेद दूर झाल्याचं मला प्रकर्षाने जाणवलं ते इथे. आमच्या शालेय जीवनात असं चित्र नव्हतं. मुलं मुली बोलत नव्हते,एकत्र बसत नव्हते, हा दहावीत गेल्यावर काही वर्ग मैत्रिणींशी बोलल्याचं मला आठवतं. त्यामानाने मानस यंदा 6 वी लाच.
प्रथमेश आणि मानस माझी 2 मुलं. प्रथमेश 10 वी ला तर मानस 6 वीला. दोघ अभ्यासासोबतच संगणक, फुटबॉल, स्केटिंग, फोटोग्राफीमध्ये परफेकट. मुलामुलींचा भेद न पाळणारी ही पिढी, यांच्या रोजच्या फुटबॉलच्या खेळात मुलीसुद्धा आहेत आणि सगळे गुण्यागोविंदाने खेळतात-राहतात. त्यामुळे माझ्या दोन्ही मुलांत मुलगा मुलगी हा भेद आलाच नाही. अर्थातच घरात मोठ्या भावाची मुलगी आणि माझ्या बहिणीच्या यांच्यापेक्षा वयाने मोठया असलेल्या मुली यांच्यातील सुसंवादाने हे लवकर रुळले असावेत. त्यामुळे स्केटिंग, फुटबॉल, शाळा किंवा गणपती, नवरात्र, नववर्षाचे कार्यक्रम असो आजूबाजूच्या मुलामुलींसोबत ते रुळले आहेत. त्यामुळे कुणा मुलामुलींशी त्यांचं भांडण झालेलं आम्हाला तरी आठवत नाही.
गुगल, युट्यूब वरून मुलं आपल्या ज्ञानात भर घालत असली तरी माझ्या बायकोचं दिपालीच मुलांवर लक्ष असतंच. वेळेवर अभ्यास करून मुलं खेळायला जास्त जातात ही तिची एकमात्र तक्रार असली तरी मुलं मुली एकत्र खेळतात, गप्पाटप्पा मारतात त्यामुळे त्या सर्वांत सुसंवाद आहे, ते खेळासोबतच अभ्यासवरही चर्चा करतात, नवरात्र, गणपतीमध्ये एकत्र कार्यक्रम साजरे करतात, स्टेज ऍक्टिव्हिटी करतात. त्यामुळे त्यांच्यात मुलामुलींचा भेदभाव आला नाही. त्यांना एकमेकांबद्दल सुरक्षित वाटतं हे दिसतंय.
प्रथमेश 10 वीला असून 'स्कुल कॅप्टन' आहे त्यामुळे त्याचा शाळेतल्या टीचर्सशी चांगला सुसंवाद आहे सोबतच विद्यार्थ्यांशी सुद्धा. शाळेतली जबाबदारी तो व्यवस्थित पार पाडतो आणि हुशार असल्याने त्यांचं याच्यावर लक्ष असत. बाकी या पिढीतले कॉम्प्युटर,लॅपटॉप,मोबाईलचे ज्ञान माझ्याही मुलांनी कोळून प्यायले आहे. लॅपटॉप- मोबाइलच्या माझ्या समस्यांचं निराकरण त्यांच्याच कडून होत असतं. जेव्हढा प्रथमेश तेवढाच मानस सुद्धा परफेकट. कपडे इस्त्री करणं, आईला कामात मदत करणं, फिरायला गेल्यावर फोटो काढणं आणि तेवढ्यासाठी पप्पांच्या मागे लागणं ही मानसची खासियत. शाळेच्या फुटबॉल टीममध्ये असून स्पोर्ट डे ची साहेबांची तयारी चालू आहे. याचा फुटबॉलचा खेळ पाहून त्याला ग्राउंडवर मोठी मागणी असते. दोन्ही मुलांच्या या भरीव कामगिरीने मी आणि दिपाली समाधानी आहोत. 10 वीत चांगले यश मिळावे आणि त्या पाठोपाठ मानसची प्रगती सुद्धा होत राहो. सोबत त्यांचं सोशल लाइफ सुद्धा निरपेक्ष असावं ही मनोकामना.
शालेय जीवनातच दोघांच्या मनातून मुलगा मुलगी हा भेद नाहीसा झालाय. त्यांचं लाजणं बुजण दूर झालं, संकोच दूर झाला तर त्यामुळे पुढील आयुष्यात ते निकोप जीवन जगतील, सामाजिक जीवनात यशस्वी राहतील यात वाद नाही.
- अनंत साळी

चला, मुलगे घडवूया (भाग १२)

तुम्ही तुमच्या मुलाला वाढवताना कसे वाढवले की जेणेकरून त्याचा स्त्री विषयक पारंपारिक दृष्टिकोन राहिला नाही याबाबत 'नवी उमेद' साठी लिहा असा उमेदमधून मेसेज आला. त्यावेळी उन्नाव, हैद्राबाद दुर्घटना ताज्याच होत्या. मनामध्ये विचित्र हताशपणा भरून राहिला होता. या पार्श्वभूमीवर अनिमिषने आणि मी आमच्या मुलासाठी म्हणजे अमनसाठी याबाबत नक्की काय वेगळे केले का आणि काही केले असेल तर काय केले हे आठवण्याची एक संधी मिळाली.
अनिमिष आणि मी विद्यार्थी दशेपासून त्यावेळेच्या पुरोगामी चळवळीशी संबंधित असल्यामुळे आणि वाचनामुळे आमच्या स्त्री- पुरुषविषयक जाणीवा योग्य वयात अपारंपारिक झाल्या. त्यामुळे खरे तर खूप आवर्जून अमन साठी फार काही वेगळे करावे लागले असे प्रथमदर्शनी तरी मला वाटले नाही. अर्थात् याबद्दल काहीच विचार करावा लागला नाही इतकेही सोपे गेले नसले तरी बऱ्याच पालकांत स्त्री पुरुष भुमिकांबद्दल मतमतांतरे असल्याने एकमतासाठी जो वेळ गेला असता तो तुलनेने कमी गेला हे निश्चित! याला काही अंशी आम्ही दोघेही मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करत असल्याचा फायदाही मिळाला.
हा लेख लिहिण्याआधी त्यात अमनचा उल्लेख आहे म्हणून अमनशी बोलावं वाटलं. त्याला मी विचारले "तुला आपल्या घरात स्त्री पुरुष नात्याविषयी जे वातावरण आहे त्याबद्दल काय वाटतं रे?" तर आजकालची एकविशीतील मुलं उत्तर देतात तसे त्याचं उत्तर आलं, "chill असता की तुम्ही !" "तरी रे?" इति आई, जी की चिकाटी सोडत नसते!
"अगं.. इतर बऱ्याच मित्र मैत्रिणींच्या आई बाबांसारखं नसतं ना तुमचं.. फ्री असतात माझे मित्र मैत्रिणी आपल्याकडे" ह्म्म्म...
मग आता मला तो शाळा व ज्युनियर कॉलेजच्या उंबरठ्यावर असतानाची एक घटना आठवते... त्या वयात जसं बऱ्याच जनतेच्या आयुष्यात फुलपाखरी वळण येतं तसे एक वळण आले होते त्याच्या पण आयुष्यात. त्यावेळी त्या मुलीचे वडील अगदी घाबरेघुबरे , किंचित् रागात आणि अर्थात् स्वाभाविक काळजीत येऊन आमच्याशी बोलते झाले. सध्याच्या फास्ट पिढीनुसार प्रकरण चिठ्ठ्याचपाट्यांवर न राहता SMS वगैरे वर पोचले होते. सर्वप्रथम त्या मुलीच्या वडिलांना आश्वस्त केले. 'याने सुरुवात केली की तिने' या हेरगिरीच्या फंदात न पडता एक NON THREATENING ( हे ठळक अक्षरांत वाचावे!) वातावरण निर्माण करण्याचे महत्त्व सांगून मदतीची तयारी दाखवली. आणि या निमित्ताने अमनशी बोलण्याची संधी साधली. यावेळी अशा आडनिड्या वयातील स्वाभाविक आकर्षण आणि एकूणच लाँग टर्म कमिटमेंट, नात्यांमधील आनंद, प्रेम, जबाबदारी याविषयी कोणताही आडपडदा न ठेवता थेट भाषेत बोलणे केले. यात कोणालाच दोषी न धरता अगदी नात्यांमधील आनंदाबरोबरच त्यातील मुलामुलींचे लैंगिक, भावनिक शोषण इथपर्यंत बोलणे झाले. हा गुंता अगदी हळूवारपणे सोडवला तर गेलाच पण मुख्य म्हणजे आपण आई- बाबाशी कोणत्याही गोष्टीवर बोलू शकतो हा विश्वास अमनच्या मनात दृढ झाला. यावेळी पुढेही जेव्हा कोणत्याही मुलीशी प्रेमाचे नाते जोडण्याची वेळ येईल त्यावेळी ते विश्वास, प्रामाणिकपणा, परस्परआदर आणि जबाबदारी या निकषांवर तपासून घेणे महत्वाचे आहे. यात कुणाचेही शारीरिक, आर्थिक, मानसिक शोषण असेल तर ते नाते जाचक होते हे सांगितले. प्रेमाच्या नात्यात शारीरिक सुखाबरोबर या गोष्टी लक्षात घ्याव्यात ही आमची भूमिका मांडली. आता तुम्हाला प्रश्न पडेल की न रागावणे इतपत ठीक आहे पण इतक्या लहान वयात एवढ्या पुढच्या गोष्टी कशाला बोलायच्या? तर 'पुढील पिढी मागच्या पिढीच्या बोटाला धरून नव्हे तर खांद्यावर उभी असते' हे सार्वत्रिक सत्य पालक म्हणून समजून घेणे आम्हाला महत्त्वाचे वाटते. मुलांच्या प्रश्नांना प्रामाणिक, स्पष्ट व वास्तवाला धरून उत्तरे देण्याची सवय इथे उपयोगी पडली. एखादे उत्तर माहित नसेल तर थातूरमातूर सांगून वेळ मारून नेली नाही की अकारण कल्पनारंजित विश्वात गुंगवून ठेवलं. उदा. Whisper किंवा कंडोमची जाहिरात लागली की टीव्ही चॅनल बदलले नाही की प्रश्नाला खुबीने (असे आपल्याला वाटते!) बगल दिली नाही.
या सर्वामध्ये माझा नवरा अनिमिष Psychiatrist असल्याचा जेवढा फायदा होतो त्यापेक्षा अधिक फायदा खरं तर तो कमालीचा प्रामाणिक, तर्कनिष्ठ आणि सहृदय व्यक्ती असल्याचा होतो. 'मुलांवर संस्कार बोलून कमी आणि पालकांच्या वर्तनातून जास्त होतात' हे त्याचे मत. अमनने त्याला कधीही घरातील कोणत्याच स्त्रियांना त्या स्त्रिया आहेत म्हणून कमी लेखलेलं, हेटाळणी केलेली असं पाहिलं नाही. कोणतेही काम पुरुष आहे म्हणून करायचे नाही हा भाग कधी आला नाही. घरातील निर्णय फक्त पुरुषांनीच घेतलेत असे पण त्याने पाहिले नाहीत. तसेच स्त्री-दाक्षिण्याचा सोयीस्कर पोकळ देखावाही कधी त्याच्यासमोर आला नाही.
बऱ्याचदा सक्सेस स्टोरीज आपल्यासमोर येतात. आम्ही पालक म्हणून १००% परिपूर्ण आहोत का? तर नाही. पण इतर कोणाही मानवाप्रमाणे आम्हीही अपूर्ण असू शकतो हे स्वीकारले. आपण भले एखादी मुलाच्या हिताची गोष्ट सांगतो म्हणून त्याने ती ऐकलीच पाहिजे आणि लगोलग अमलात आणलीच पाहिजे या पालकहट्टापासून शक्यतो लांब राहण्यासाठी विशेषतः मला जास्त प्रयत्न करावे लागले. उदा. लैंगिकता शिक्षण देण्याच्या वयात आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्याशी या विषयावर बोलावे यासाठी बरेच प्रयत्न केले. आश्चर्य म्हणजे त्याने हे प्रयत्न नीटच धुडकावून लावले! हे म्हणजे अगदी दाराशी गंगा वाहते आहे आणि आम्ही तिच्या पाण्यात पाय पण बुडवणार नाही हा प्रकार झाला! अशा वेळी आम्हाला थोडे वाईट जरूर वाटले पण त्याला आवर्जून सांगितले की तुला आयुष्यात कोणत्याही गोष्टीवर काहीही बोलायचे असेल तर आमच्याशी तू कधीही बोलू शकतोस. अर्थात् आम्ही काही सांगितलं नाही म्हणून त्याला काही माहिती मिळणारच नाही असं काही नव्हतच! पण अशा माहितीमध्ये धोके असू शकतात हे सांगणे आणि मुख्यतः परस्पर संवादासाठी दारे नेहमी खुली असतील याची खात्री देणे हेच करणे शक्य होते ते केले!
अजून एक गोष्ट मात्र आवर्जून केली ती म्हणजे अमली पदार्थांच्या वापराला नकार देणे हे स्वतःच्या वर्तनातून समोर आणणे. गंभीर गुन्हे आणि अमली पदार्थांच्या सेवनाच्या घनिष्ट नात्यांबद्दल वास्तववादी माहिती निर्भया ते दिशा दुर्घटनेच्या निमित्ताने देत आलो.
आजमितीला त्याच्या ग्रुपमध्ये भरपूर मित्र मैत्रिणी आहेत. त्यांचे एकमेकांशी जे मनमोकळे वागणे, बोलणे, स्पर्श करणे असते ते पाहून एका परीने खरं तर बरं वाटतं. या सर्वांचे आमच्याशी सुद्धा जवळीकीचे नाते आहे. "अमन बरोबर असल्यावर आम्हाला कसलेही टेन्शन नसते." असं त्याचे मित्रमैत्रिणीच नव्हे तर त्यांचे आई बाबा सुद्धा जेव्हा आमच्याशी बोलतात तेव्हा मन त्याच्याविषयीच्या अभिमानाने आणि आनंदाने भरून येते.
- वैशाली चव्हाण,
भूलशास्त्रतज्ञ
विवेकनिष्ठ मानसोपचारतज्ञ, 
सातारा

चला, मुलगे घडवूया (भाग अकरा)

It's all about respect. तुमच्या वागण्याबोलण्यात आणि विचारांत तुम्ही इतरांचा किती आदर करता हे महत्वाचे, मग स्त्रीपुरूष, गरीबश्रीमंत असे भेद होतच नाहीत. हा आदर माझ्यात असावा यासाठी मी कसोशीने प्रयत्न करते. सुदैवाने मी आणि माझा साथीदार, आमच्या दोघांचीही मते याबाबतीत सारखी आहेत. आणि आमची ही मते मुलांमध्ये उतरवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. 
खरं तर त्याला कधी मुलगा म्हणून वेगळं वाढवलंच नाही. माझ्या मोठ्या बहिणींना मुलीच होत्या. घरात मुलींचंच राज्य. याचा कल लहानपणापासून गाड्या, क्रिकेट अशा गोष्टींकडे. पण त्याचबरोबर पुस्तकांची फार फार आवड. बरं ती पुस्तकं गोष्टीची नाही तर माहिती देणारी. त्यामुळे माहिती कुठलीही असली तरी स्पंजप्रमाणे आत्मसात करत असे. तो दहा वर्षांचा झाला तेंव्हा मी त्याला जस्ट फॉर बॉईज नावाचं पुरूष शरीराची, वाढत्या वयात होणा-या बदलांची ओळख करुन देणारं पु्स्तक आणलं. तेही त्याने अतिशय चिकित्सकपणे वाचून काढलं. कदाचित इतक्या वाचनामुळे त्याचे विचार स्पष्ट झाले असावेत. असं म्हणतात की अहंगंड कित्येकदा न्यूनगंडातून येतो. वाचनामुळे आणि स्वच्छ विचारांमुळे आपण कुणापेक्षा श्रेष्ठ नाही याची जाणीव त्याला असावी.
निस्सीम नुकताच पंधरा डिसेंबरला चौदा वर्षांचा झाला. सध्या तो टिपिकल टीन फेजमध्ये आहे. त्यामुळे शाळेतून आल्यानंतर फारसा संवाद होत नाही. त्याचा माईनक्राफ्ट, त्याचा कीबोर्ड (त्याला पियानो वाजवायला आवडतो) आणि अखंड हेडफोन संगीत साधना हा त्याचा दिनक्रम आहे. दिवस फार गंमतीचे आहेत, तसेच ट्रिकी पण आहेत. या वयात पोरं स्वतःला फार मोठी समजतात, त्यांना मित्रमैत्रिणी आईवडलांपेक्षा हुशार वाटू लागतात. (असतीलही…), पण त्यामुळे ते कोणत्या संगतीत आहे, हे लक्षात आले पाहिजे. त्याचा अंदाज येत नाही कारण संवाद कमी होतो. पण काही क्षण सोनेरी असतात. उदाहरणार्थ हैदराबाद प्रकरणानंतर महिलांनी, मुलींनी कसे वागावे याचे सल्ले सोशल मिडियावर सुरू झाले. त्याला मी विरोध केला. त्यावर प्रतिक्रिया सुरू झाल्या. मी कुणाशी तरी बोलत असताना निस्सीमने हे ऐकले आणि म्हणाला, काय वेडेपणा आहे, क्रिमिनलला पकडा, व्हिक्टिमला का अडवता. माझ्या मनातले विचार माझा लेकच अधिक स्पष्टपणे मांडत होता.
त्याची लहान बहिण एक पात्रच आहे, आणि तिच्या मैत्रिणी तिच्याएवढ्या किंवा तिच्यापेक्षा आगाऊ. वय वर्षे सहा. एकदा त्या भातुकली खेळत असताना माझ्याकडे तक्रार घेऊन आल्या, निस्सीमदादा आम्हांला त्रास देतोय. मी म्हणाले का रे तु कशाला त्यांच्यात खेळतोस. शिवाय सगळा संसार मांडला आहे त्यांनी, किती ती बाळं त्यांची. इतपर्यंत ठीक होते पण माझ्या तोंडून निघून गेले, तू काय मुलगी आहेस का. यावर त्याने मला जेंडर सेन्सिटिव्हिटी याविषयावर भाषण दिले आणि वरून म्हणाला, तू अशी बोलतेस म्हणून शरयूच्या मनात मुलगा आणि मुलगी असा भेद आहे. असं बोलत जाऊ नकोस. मी बोलतानाच जीभ चावली होती, त्याच्या बोलण्याने मी अजून खजील झाले.
खरी लढाई तिला वाढवताना आहे, पण तीही गंमतीची आहे. मी मोठेपणी हाऊस वाईफ होणार आहे, अशी तिने परवा घोषणा केली. आता हाऊस वाईफ म्हणजे काय असे विचारल्यावर ती म्हणाली, जिने तिच्या घराशी लग्न केले आहे, आणि त्यामुळे ती ते सांभाळते. म्हणून ती घरातील सगळी कामं करते. यात कोणत्याही पुरूषाचा उल्लेख झाला नाही. त्याआधी काही महिने तिला फक्त आई व्हायचं होतं, पण त्यात शारिरीक कष्ट असतात हे कळल्यावर (ही माहिती तिच्या मैत्रिणीची) ती मी डॉक्टर होेते, म्हणजे इतर बाळांना जन्म देईन असे म्हणाली. पण तिच्या दृष्टीने स्त्रिया ठराविक काम करतात आणि पुरूष ठराविक. निस्सीम तिला सध्या स्त्री पुरुष समानतेचे धडे देतोय. 
- भक्ती चपळगावकर