Saturday 25 January 2020

वारसा वाचनाचा, नव्या पिढीकडे हस्तांतरित

चंद्रपूर येथील व्यंगचित्रकार मनोहर सप्रे. आज वय वर्षे ८८. कौटुंबिक जबाबदारी निभावतानाच स्वतःतील कलावंतही जगला पाहिजे, त्याला न्याय मिळाला पाहिजे, या भूमिकेतून सप्रे यांनी तरुणपणापासूनच लेखन, व्यंगचित्रे रेखाटणे व वाचनाची आवड जोपासली. आजही ते या वाचनात गढून गेलेले असतात. 'जोवर कोरा कागद वाचता येत नाही, तोवर मी वाचत राहणार', असे ते सांगतात.
या वाचन प्रेमामुळे सप्रे यांचे व्यक्तिमत्त्व घडले, शिवाय त्यांच्या संग्रहात शेकडो पुस्तके जमा झाली. दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर येथील श्रीकांत साव या युवकाने सप्रे यांची भेट घेतली. श्रीकांतला वाचनाची आवड आल्याने सप्रे यांनी आपल्या संग्रहातील अनेक मौल्यवान पुस्तके त्याला भेट दिली. वाचन चळवळ म्हणजे सप्रे यांच्या शब्दांत 'आत्मशोधाचा मार्ग'. या मार्गावर प्रत्येकाने गेले पाहिजे, आपण कोण आहोत, आपण काय केले पाहिजे याचा शोध वाचनातून लागतो, असे सप्रे सांगतात. सप्रे यांच्याकडून मिळालेली पुस्तकांची भेट श्रीकांतसारख्या सामाजिक कार्यात सहभागी होणाऱ्या तरुणांसाठी खजिन्यापेक्षा कमी नाही. विशेष म्हणजे या कृतीतून एक संदेश मोलाचा आहे, पुस्तके ही अडगळीत पडून राहण्यापेक्षा ती कुणाच्या तरी वाचनात यावीत. आपल्याकडील पुस्तके एका युवकाला देत सप्रे यांनी तो पायंडा पाडला आहे. तुम्ही,आम्हीही तो पुढे नेला तर वाचन चळवळ जोमात पुढे जाईल यात शंका नाही.
- अनंत वैद्य

No comments:

Post a Comment