Friday 10 January 2020

आठवणीतली पोलीस परेड


  स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनाला होणाऱ्या पोलिसांच्या शिस्तबद्ध संचलनाचं आकर्षण सर्वानाच असतं. पण १५ नोव्हेंबरला बीड पोलिसांनी खास परेड आयोजित केली होती. इन्फन्ट इंडियातल्या चिमुकल्यांसाठी.
बीड शहराजवळ पाली इथं दत्ता आणि संध्या बारगजे यांचा हा प्रकल्प. एचआयव्हीची लागण झाल्यामुळे कुटुंब, समाजानं नाकारलेल्या मुलांना दत्ता आणि संध्या यांनी मायेची ऊब दिली आहे. २००७ मध्ये सुरू केलेल्या या प्रकल्पात ७० विद्यार्थी आहेत. मुलांच्या राहण्याखाण्यासोबतच शिक्षण, स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण, त्यांची लग्न, त्यांची मुलं एचआयव्ही बाधित होऊ नयेत यासाठी त्यांना उपचार मिळवून देण्यापर्यंतची काळजी हे दोघे घेतात.
दिवाळीनिमित्त बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार कुटुंबासह प्रकल्पात आले होते. त्यांनी मुलांशी गप्पा मारल्या. पोलीस होण्याचं स्वप्न काही मुलांनी सांगितलं. मुलांनी अजून पोलीस परेडच बघितली नसल्याचं गप्पांमधून त्यांना समजलं.
''चिमुकल्या वयात मुलांना अस्पृश्यतेचा सामना करावा लागणं, दुर्दैवी आणि वेदनादायी आहे.'' हर्ष पोद्दार सांगतात. ''एचआयव्हीबाबत समाजात अजूनही गैरसमज आहेत. या मुलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलावा यासाठी पुढाकार घेण्याचं ठरवलं. यातूनच खास त्यांच्यासाठी परेड आयोजित केली.''
दत्ता बारगजे म्हणतात, ''सामाजिक प्रबोधनासाठी पोलिसांची भूमिका यातून अधोरेखित झाली. आमच्या प्रकल्पातल्या मुलांना अनेकदा शाळेत जायलाही स्थानिकांचा विरोध सहन करावा लागला आहे. परेड बघण्याचा आनंद तर मुलांना मिळालाच. याशिवाय पोद्दार यांच्या पुढाकारामुळे , आपणही आजार विसरून शिक्षण घ्यावं, असंच अधिकारी व्हावं, ही जिद्द, प्रेरणा निर्माण झाली, जी खूप आवश्यक होती.''
या उपक्रमसाठी अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, पोलिस उपअधीक्षक राहुल धस, पोलिस उपअधीक्षक विजय लगारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत यांनी पुढाकार घेतला.

-अमोल मुळे , बीड 

No comments:

Post a Comment