Saturday 25 January 2020

शून्य ( आखुडबुद्धी बहुशिंगी)

भारतीयांचे गणितातील योगदान काय असे कुणी विचारले तर उत्तर असेल शून्य!
शून्याचा शोध भारतीयांनी लावला. इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकात भारतात शून्याचा उल्लेख झालेला आढळतो. पण त्याकाळी हे शून्य रिकामे असल्याने त्याची किंमत युरपात कळायला अकरावे शतक उजाडले. या शून्याच्या योगे रोमन अंकांत दशमान पद्धत सुरू झाली. परंतु इतक्या उशीरा या शून्याची माहिती युरप आणि अरब गणितवेत्त्यांना मिळाल्याने भारतीयांनी शून्यासंबंधी केलेले इतर विचार शून्याच्या पोकळीतच राहून गेले. मधल्या काळात शून्य नसल्याने युरपमध्ये भलतीच पंचाईत झाली होती. एखाद्याकडं बघताना शून्य नसल्यानं वजा एक नजरेनं बघावं लागे, गरीबीतून श्रीमंतीकडे जाणारे लोक नुसतंच आपले विश्व उभं करत, एखाद्या अपघाती स्थळाला फक्त ग्राऊंड म्हटलं जाई, इतकंच काय जेम्स बाँडचा सिक्रेट नंबर ओओसेव्हन असा सांगितला जाई. याउलट भारतात मात्र शून्याचा उपयोग माहीत असल्यानं एकशून्यशून्यसारख्या सिरीयल्स बनवल्या जात.
युरपियन लोकांची ही अडचण भारतीयांनी दूर केली. पूर्वीपासूनच भारतीयांना शून्याबद्दल शून्य माहीती होती. अनेकांना याचं श्रेय दिलं जातं. पण सर्वात खात्रीशीर पुराव्यांनुसार हा मान ब्रह्माचार्यांना द्यावा लागेल. त्यांनी शून्याचा शोध लावला नसल्याचा आजवर एकही पुरावा अस्तित्वात नाही. ब्रह्माचार्य हे इ०स० तिसऱ्या शतकातले प्रसिद्ध गणितज्ञ होते. भास्कराचार्यांनी काव्यांतून गणितं रचली तर हे गणितांतून कविता रचत. सातवाहन राजांच्या कारकिर्दीत पैठणच्या नैऋत्येला असलेल्या पुण्यपत्तननामक गावी ते कोषाध्यक्ष होते. या ब्रह्माचार्यांनी शून्याची फोड करून -०, +० आणि ±० असे शून्याचे तीन घटक शोधून काढले. याशिवाय या सर्व चार शून्यांची बेरीज, वजाबाकी अथवा गुणाकार केला तरी उत्तर शून्यच येते हेही त्यांनी सिद्ध केले. यानंतर जवळपास साडेतीन वर्षे अथक प्रयत्न करून त्यांनी शून्याची सतरा दशांश स्थानांपर्यंतची किंमत शोधून काढली. (आजच्या अतिप्रगत मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये कोणतेही गणित केवळ पंधरा दशांश स्थानांपर्यंत केले जाते, हे पाहता ब्रह्माचार्यांचे योगदान किती मोठे आहे हे लक्षात येईल.) शून्याला शून्याने भागताना आधी -० ने भागावे की +० की ±० याबद्दल चिंतन करत असताना त्यांना गणितातील निरपेक्ष अंक ही संज्ञा सुचली. मग त्यावर त्यांनी ।०। ही शून्याची नवी किंमत शोधून काढली.
त्यांचे हे शून्याचे अपरिमित वेड पाहून वैतागलेल्या सातवाहन राजांनी त्यांना सूळी दिले. त्यांच्यावर राजकोषात शून्य ताम्रमुद्रांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता.
- ज्युनिअर ब्रह्मे

No comments:

Post a Comment