Saturday 25 January 2020

एड्सची लागण झालेला लहानगा आज आनंदात जगतोय

राणू (नाव बदललेले ) आज जालन्यातल्या एका शाळेत ९ वीत शिकत आहे. आनंदात जगत आहे. त्याला आईवडील नाहीत. 
नऊ वर्षांपूर्वी बालकामगारांचं सर्वेक्षण करताना राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प आणि इंडस प्रकल्पाचे संचालक मनोज देशमुख यांना तो सापडला. राणूचे आईवडील दुर्धर आजाराने वारले होते. त्यामुळे तो मुंबईहून जालन्यात आजीकडे आला होता. त्याच्या आजीचं समुपदेशन केलं. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याची तपासणी केली. त्यालाही लागण झाली होती. तो जास्त दिवस जगणार नाही, अशी शक्यता डॉक्टरांनी वर्तवली.
प्रकल्पानं त्याला २०१० मध्ये दत्तक घेतलं. त्याच्यावर जालना शहरातल्या एआरटी सेंटरमध्ये नियमित आरोग्यतपासणी, औषधोपचार सुरू केले. मनोज आणि त्यांच्या मित्रांनी राणूला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं. राणू भेटला तेव्हा तो शाळेत जात होता पण त्याला काहीच येत नव्हतं. प्रकल्पानं खेळातून ,आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातून अक्षरओळख,संख्यामोड त्याला शिकवली. त्याला अभ्यासाची गोडी लावली. सुरुवातीला भाषेचा अडथळा होता तो शिक्षकांनी मेहनतीनं दूर केला. राणू आज समाजाच्या प्रवाहात आला आहे. त्याची तब्येत सुधारली असून सामान्य जीवन तो जगत आहे.
''गेली १५ वर्ष आम्ही झोपडपट्टी, वीटभट्टी वस्त्यांमध्ये काम करत आहोत. ९ ते १४ वर्ष वयोगटातल्या आरोग्यविषयक समस्याग्रस्त बालकामगारांचा अभ्यास करत आहोत. गंभीर आजारांकडे दुर्लक्ष करण्याची इथली मानसिकता असते.'' मनोज देशमुख सांगतात. इंडस हा भारत आणि अमेरिकेच्या श्रम मंत्रालयाचा प्रकल्प असून देशातल्या २१ जिल्ह्यात २००९ मध्ये तो सुरू झाला. जालन्यात प्रकल्पांतर्गत ३०० स्वयंसेवी शिक्षक काम करत आहेत.
- अनंत साळी, जालना

No comments:

Post a Comment