Saturday 25 January 2020

चला, मुलगे घडवूया (भाग आठ)

'मेरे दो अनमोल रतन' असं गमतीने म्हणते मी, माझ्या दोन्ही मुलांना. पण ते खरंच आहे. माझी दोन्ही मुलं उच्चशिक्षित, मोठ्या पदावर कार्यरत आहेत. आणि अत्यंत नम्र शहाणी आणि समजूतदार आहेत.
माझ्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या माझ्या मैत्रिणी मला विचारायच्या, कसं वाढवलं तुम्ही मुलांना? कसे संस्कार केलेत? एवढी समजूतदार कशी तुमची मुलं? तेव्हा मला वाटायचं खरंच कसे संस्कार केले आपण? संस्कार काही पाढ्यांसारखी, व्याकरणा सारखी शिकवायची किंवा कुठल्या संस्कार क्लासमध्ये जाऊन शिकण्याची गोष्ट नाही. ज्या घरात वडील आईला मारत असतील शिव्या घालत असतील पदोपदी अपमान करत असतील त्या घरातील मुलं आईचा किंवा पर्यायाने कुठल्याही स्त्रीचा कसा आदर करतील?
माझे पती सेवानिवृत्त झाले तेव्हा माझी नोकरी चालू होती. मी शाळेत शिक्षिका होते. एक वाजता मी शाळेतून घरी येत असे. तेव्हा ते गरम-गरम जेवण तयार करून माझी वाट बघत असत. ते म्हणत, सकाळी सहा वाजता उठून तू स्वयंपाक करू नकोस. मी नंतर करीन. मुले हे बघतच होती. त्यामुळे लग्न झाल्यावर मुले बायकोबरोबर घरातील सर्व काम करतात. मुलांचे करतात. माझ्या सुनाही उच्चशिक्षित नोकरी करणाऱ्या आहेत. घर दोघांचं आहे आणि दोघांनी मिळून चालवायचं आहे, हा विचार त्यामागे आहे. 
आम्ही पूर्वी खूप वाचन करायचो‌. घरात अनेक चांगली पुस्तके आहेत. पुस्तक वाचून झाल्यावर अर्थातच त्यावर मुलांसोबत चर्चा व्हायची. आनंदी गोपाळ वाचल्यावर गोपाळरावांच्या विक्षिप्तपणापेक्षा त्याकाळात त्यांनी पत्नीला शिकवायचं ठरवलं आणि त्यासाठी वाटेल ते सोसलं हे ठसवलं. लंडनच्या आजीबाई अशिक्षीत असूनही त्यांनी एवढा मोठा व्यवसाय उभा केला. अशी चांगली उदाहरणं मुलांच्या समोर ठेवली तर स्त्रियांच्या बद्दल त्यांच्या मनात आदराची भावना निर्माण होईलच ना?
मुलांनी कधी मला उलट उत्तर दिले नाही किंवा आवाज चढूनही कधी माझ्याशी बोलले नाहीत. मीही कधी लहानपणी सुद्धा त्यांना चापट मारली नाही. मुले ऐकत नाहीत किंवा वाटेल तशी वागतात अशी तक्रार करताना पालकांनी आधी आपले वागणे तपासून पाहिले पाहिजे.
माझ्या मोठ्या मुलाची बायको पंजाबी आहे. तिच्या श्रद्धेप्रमाणे करवा चौथचे व्रत करते. पहिल्यावेळी गरोदर असताना तिने दिवसभरचा उपास करू नये, असे मुलाला वाटत होते. तिचे मन ते मानायला तयार नव्हते. तिला माझ्या मुलाने सुचवलं, तुझ्याऐवजी मी उपास करतो आणि त्याने तो केलाही. खरं म्हणजे तो कुठले उपासतापास करत नाही त्याचा त्यावर विश्वास नाही. परंतु तिच्यावरील प्रेमासाठी आणि तिच्या श्रद्धेचा, मताचा आदर करण्यासाठी त्याने ते केले.
धाकट्या मुलाच्या लग्नाचे बघत होतो. मुलीला भेटण्यासाठी तो गेला होता. समोरच्या पार्किंगमध्ये एक बाई स्कूटर चालू करण्याचा प्रयत्न करत होती पण तिला जमत नव्हतं. माझ्या मुलांने तिची स्कूटर चालू करून दिली. खरं म्हणजे खूप छोटी गोष्ट ही. त्याने आम्हाला सांगितलीही नव्हती. त्याठिकाणी लग्न ठरले नाही तरीदेखील त्या मुलीने तिच्या आईला आणि तिच्या आईने फोन करून मला आवर्जून ही गोष्ट सांगितली. ती म्हणाली, मदत करताना कुठलाही पुरूषी मोठेपणा किंवा आविर्भाव नव्हता त्याचा. अगदी सहज केले त्याने ते. स्त्रियांच्या बद्दल त्याच्या मनात असलेला आदरच तिला दिसून आला.
स्त्रीला देवीही बनवू नये आणि दासीही बनवू नये. तिच्या मतांचा आदर करावा. दोघांनीही एकमेकांच्या मागे किंवा पुढे राहण्यापेक्षा एकमेकांबरोबर राहावे एकमेकांना साथ द्यावी. अशी शिकवण असल्यामुळे बातम्यांमध्ये आज जे ऐकू येते आहे ते ऐकून त्यांना भयंकर चीड आली. आई बायको, बहिणच नाही तर समाजातील सर्वच स्तरातील स्त्रियांचा आदर करायला शिकवले.आज आम्हाला आनंद आहे, केलेले संस्कार योग्य ठिकाणी रुजले.
- मैत्रेयी शेवडे

No comments:

Post a Comment