Thursday 9 January 2020

शाळा इमारत मोडकळीस, समाजमंदिराचा आधार, संघर्षातून ५९ आदिवासी विद्यार्थी काढताहेत वाट

शाळा, नीटनेटकी असली आणि भौतिक सुविधा असल्या अन् हसत-खेळत शिक्षण मिळालं की विद्यार्थ्यांचे मन रमते. ज्ञानदान प्रभावी ठरते. मात्र, यापैकी एकही घटक नसला की अडथळे वाढतात. अशीच गत झालीये आतोणे (ता.रोहा, जि.रायगड) येथील झेडपी शाळेची. ३ वर्षांपासून ही शाळा भरतेय एका समाजमंदिरात. पाऊस आला की फरशी ओली होते, वारे सुटले की वह्या, पुस्तके फाटतात. आदिवासी समाजातील मुले शिक्षण प्रवाहात येण्याचा प्रयत्न करताहेत, मात्र भौतिक असुविधा अडचण बनून येताहेत. तरीही २ शिक्षकांच्या जिद्दीमुळे ही शाळा सुरु आहे.
रोह्यापासून २३ किमी पूर्वेला सह्याद्री डोंगररांगांच्या कुशीत असणारे आतोणे हे छोटेसे गाव. या गावातील झेडपी शाळेत ५९ विद्यार्थी आहेत, तेही कातकरी आदिवासी समाजाचे.
गावात पूर्वी शाळेची इमारत होती; पण गेल्या ३ ते ४ वर्षांपासून ती इमारत मोडली. चिंचवली तर्फे आतोणे आदिवासी वाडीवरील एका समाजमंदिरात आता ही शाळा भरतेय. ५९ विद्यार्थी इथे गमभन गिरवतात. कोकणात जवळपास ३ महिने पावसाळा असतो व या समाज मंदिरात अनेकदा पत्र्यातून व खिडक्यांना दारे नसल्याने पाणी येते व मुलांना बसण्यापासून ते दुपारचे पोषण आहार खान्या पर्यंत कसरत करावी लागते. स्वच्छतागृहाअभावी सर्व मुलांना व शिक्षकांना उघड्यावर शौचास जावे लागते आणि किचन शेड नसल्याने एका झोपडीत माध्यान्ह भोजन शिजवून दिले जाते. जिथे ३० मुलं मोकळेपणाने बसू शकत नाहीत त्या जागेत आज ५९ विद्यार्थी शिकतात, ते ही वेगवेगळ्या वर्गातील. नवीन शाळा बांधकाम व्हावे, यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, ग्राम पंचायतीने अनेकदा प्रस्ताव दिले आहेत पण अजून त्यात यश नाही. अशा अडचणीच्या स्थितीतही आदिवासी मुलांच्या शिक्षणात खंड येऊ नये, यासाठी गट शिक्षण अधिकारी साधुराम बांगारे व केंद्र प्रमुख प्रमोद चवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक गजानन जाधव, जगन्नाथ अब्दागिरे हे दोन शिक्षक जीवाचे रान करताहेत, एक एक अडथळ्यावर मात करत दिवस काढताहेत, त्यांना हक्काची शाळा मिळाली तर दुर्गम पाड्यावर ज्ञानगंगा विना अडथळा पोहोचण्यास मदत होईल अन् उद्याची पिढी सक्षमपणे घडवता येईल. अडथळे असले तरी शिक्षण सुटू द्यायचे नाही, असा निर्धारच या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी केलायं.

नवी उमेद प्रतिनिधी, रायगड

No comments:

Post a Comment