Friday 10 January 2020

बिनभिंतीची स्पर्धापरिक्षेची शाळा


  ''बिनभिंतीच्या शाळेमुळेच आज मी नोकरीला लागलो.'' एसटी कर्मचारी मोहन कासार सांगत होते.
सोलापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली किल्ला खंदक बाग. गेल्या पाच वर्षांपासून इथं दररोज बिनभिंतीची स्पर्धापरिक्षेची शाळा भरते. वेळ साडे नऊ ते साडेदहा दरम्यान. बसण्यासाठी खुर्च्या नाहीत, डोक्यावर छप्पर नाही, बागेतल्या लिंबाच्या झाडाखाली बसून विद्यार्थी इथे स्पर्धापरिक्षेची तयारी करतात.
गणेश माने कोणताही मोबदला न घेता ही शाळा चालवतात. माने सर ३० वर्षांचे. एमए बीएड. रेल्वेची परीक्षा तीन वेळा पास झाले. पण शारीरिक पात्रता परिक्षेत त्यांना यश मिळालं नाही. अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या विषयातील अडचणी घेऊन माने सरांकडे यायचे. सरही त्यांना उत्तम मार्गदर्शन करायचे. यातूनच बिनभिंतीची स्पर्धापरिक्षेची शाळा साकारली. स्पर्धापरिक्षेशी संबंधित रोज एका विषयावर माने सर मार्गदर्शन करतात. विद्यार्थी एमपीएससी, जिल्हा निवड समिती, जिल्हा न्यायालय, रेल्वे, बँक संबंधित परिक्षेचा अभ्यास चर्चात्मक पद्धतीने करतात. पावसाळ्यात या शाळेला सुट्टी असते. एका वेळेस साधारण १५ विद्यार्थी शाळेत असतात.
विद्यार्थी आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातले. किराणा दुकानात, मेडिकल स्टोअर, पानपट्टी या जागी काम करणारे, सेल्समन, पेपर टाकणारे, सुरक्षारक्षक, खासगी कंपनीत काम करणारी मुलं या शाळेत येतात. शासकीय नोकरीत यश मिळवणारे शाळेचे विद्यार्थी पुढे इथेच येऊन इतर मुलांना मार्गदर्शन करतात. मुलांचा आत्मविश्वास वाढवतात. पुस्तकं , स्टेशनरी साहित्य देतात.
आतापर्यंत या शाळेतले ५२ विद्यार्थी शासकीय सेवेत दाखल झाले आहे.
''प्रत्येक आठवड्याला होणाऱ्या टेस्ट सिरीजमुळे आत्मविश्वास वाढला आणि रेल्वेत नोकरीला लागलो,'' हरिभाऊ कांबळे सांगतात. ''ग्रुप स्टडीमध्ये अनेक संकल्पना स्पष्ट होतात. वारंवार होणाऱ्या चुका दुरुस्त होतात.''
शाळेला साईनाथ सामाजिक संस्था, दशभुजा गणपती युवक प्रतिष्ठान यांचं साहाय्य लाभतं. दुर्बल घटकातल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रमोद कारंडे आणि तय्यब शेख या शिक्षकांची साथही माने सरांच्या या उपक्रमाला आहे.

-अमोल सीताफळे, सोलापूर 

No comments:

Post a Comment