Wednesday 29 January 2020

सिनेमा (ब्रह्मेपीडीयातील एक नोंद) (आखुडबुद्धी बहुशिंगी)

शीतकपाट (रेफ्रीड्जरेटर)मध्ये ज्याप्रमाणे कामप्रेस केलेला फ्रीऑन वायू खेळवून तापमान खाली उतरविले जाते त्याच्या विरुद्ध तत्वावर चालणारे यंत्र. या यंत्राची कल्पना लिओनार्दो दा विंचीला प्रथम सुचली असावी. त्याने याचे संकल्पचित्र बनवून त्याला हेलिकापतर असे नाव दिले. काम्प्रेसरमधून वायू फिरवून थंड केला जातो तद्वत एका मोठ्या प्रोजेक्टरमध्ये माणसांना छोटे करून त्या प्रतिमा वेगात फिरवून दाखवल्या जातात. या कलेचा शोध नवयुगात एडिसन प्रयोगशाळेने लावला. तदनंतर स्फूर्ती घेऊन फ्रान्सच्या ल्युमिएर बंधूंनी १८९५ साली सिनेमाचा पहिला प्रयोग केला. त्याच सुमारास भारतात हरिभाऊ ब्रह्मे यांनी पुणे येथे गणपती उत्सवात पहिला सिनेमा १८९३ साली दाखवला असे समजले जाते. हा सिनेमा रंगीत, आवाजासहित आणि ल्युमिएर बंधूंसारखा फिल्मवर चित्रीत केलेला नसून जिवंत होता. या सिनेमात बंदूकीच्या गोळीने समोरच्या माणसाच्या शरीराला छिद्र पाडण्याचा एक प्रसंग दाखवला जायचा. शुभारंभाच्या प्रयोगांनंतर या सिनेमाचे प्रयोग (पात्रांअभावी) होऊ शकले नाहीत. या सिनेमाच्या फिल्म कुठेही उपलब्ध नसल्याने पहिलेपणावर ल्युमिएर बंधूना हक्क सांगता आला.
ल्युमिएर बंधूंच्या यशाने प्रभावित होऊन जगभर सर्वत्र सिनेमाची पाळेमुळे रुजली. रात्रभर चालणाऱ्या लांबलचक नाटकांपेक्षा आटोपशीर असलेला हा प्रकार लवकरच लोकप्रिय होऊन सगळीकडे सिनेमा दाखवणारी थिएटरे उभी राहू लागली. अमेरिकेत क्यालिफोर्निया, भारतात कोल्हापूर, ब्राझीलमध्ये ॲमेझॉन, चीनमध्ये शांघाय आणि रशियात सायबेरीया या निसर्गरम्य ठिकाणी नवनव्या सिनेमांचे शूटींग धडाक्याने होऊ लागले.
सुरुवातीला, सिनेमा पाहणाऱ्या लोकांना आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून मूक सिनेमे बनवले जात. चारली चापलीन नामक नट या काळात अमेरिकेत प्रसिद्धीस पावला. या काळात सबटायटल्स (उपशीर्षकां)शिवाय सिनेमा पाहण्याची लाट असल्याने त्याचे इंग्रजी सिनेमे लोकांना न कळून इतरत्र त्याची लोकप्रियता फारशी झाली नाही. लारेल हार्डी नावाचा कधी जाड तर कधी बारीक असणारा नटही याच सुमारास उदयाला आला. सिनेमा पाहणाऱ्यांना विडीकाडीसाठी अथवा शेंगागंडेरीसाठी वेळ देता यावा म्हणून सिनेमात मध्येमध्ये गाणी वाजवण्याची प्रथा सुरु झाली. लोकांनी चहापाणी करण्याऐवजी गाणी ऐकत बसू नये म्हणून वाईट आवाजाच्या लोकांकडून गाणी म्हणवून घेण्याचा प्रघात होता. (हे लोण भारतात उशीराने पोचल्याने किमान शब्बीरकुमार, मुन्ना अजीझ आदी गायकांची सोय झाली.) गाणी वाजविता यावीत यासाठी सिनेमाला आवाज देण्याच्या कलेचा शोध लावला गेला. जाझ सिंगर या बोलपटापासून बोलपटांचे (टाकीज) युग सुरु झाले. केवळ वक्र भृकुटीच्या सहाय्याने अभिनय करणाऱ्या नटांची पंचाईत होऊन, स्टेजप्रमाणे आपली भाषणेही चोख पाठ करणे क्रमप्राप्त बनले. बरेच मूक अभिनेते या काळात पडद्याआड लुप्त झाले.
तत्कालिन कृष्णधवल रंगांमुळे पडद्यावर कृष्णकृत्ये करणारे खलपात्र दाखवण्यास अडचण येत असलेने सिनेमे रंगवण्यास सुरुवात झाली. सुरुवातीस एकएक चित्र स्वतंत्र रंगवले जाई. चंद्रावर स्वारी (१९०५) हा फ्रेंच सिनेमा कृष्णधवल कॅमेऱ्याचे चित्रीत करून नंतर रंगवला गेला. पुढे रंगीत कॅमेऱ्यांचा शोध लागल्याने रंगीत सिनेमे बनवणे सोपे झाले.
भारतात या कलेचा प्रसार बहुतच वेगाने झाला. नाटकांप्रमाणे सिनेमांसाठी अभिनयाची गरज नसलेने नुसते पडद्यावर उभे राहू शकणारे नट नायक म्हणून उदयास आले. पियानोवर भाकरी थापटल्यासारखे हात हलवणे, कॅमेरासमोर स्थितप्रज्ञासारखे उभे राहणे, हृदयविकाराचा झटका आला आहे असा चेहरा करून प्रेमगीत गाणे या अभिनयबळावर अनेक अभिनेते भवसागर तरून गेले. ७०च्या दशकात, आशा पारेख नामक नटीचा उदय झाला. तिचे दोन्ही डोळे एकाचवेळी कॅमेराच्या फिल्डमध्ये मावत नसलेने ७० एमएम वाईडस्क्रीनचा शोध लावावा लागला. कालांतराने भलत्याच भरीव अंगाच्या दाक्षिणात्य नटींना नीट न्याहाळण्याची सोय म्हणून थ्रीडी सिनेमाचीही सुरुवात झाली. जेव्हा बहुतांश सुस्वर गायक काळाच्या पडद्याआड लुप्त झाले तेव्हा गाणी सहनीय व्हावी म्हणून डॉल्बी नावाचे तंत्रज्ञान वापरले जाऊ लागले. यामुळे, गाणे सुसह्य वाटत नसले तरी नवीन तंत्रज्ञान असल्याने गाणे चांगले वाटते अशी समजूत लोक करून घेतात.
सध्या भारत देशात सर्वाधिक सिनेमे दरवर्षी बनवले जातात (हे सिनेमे प्रेक्षागारात दाखवून प्रेक्षकांनाही बनवले जाते.)

- ज्युनिअर ब्रह्मे

No comments:

Post a Comment