Tuesday 7 January 2020

नाती पुन्हा घट्ट होऊ शकतात


पतीपत्नीमधल्या वादापासून वृद्धांकडे दुर्लक्ष, अशा अनेक प्रकारच्या कौटुंबिक वादाच्या किरकोळ तक्रारी पोलिसांकडे दाखल होतात. गुन्हे दाखल होतात आणि दोन्ही बाजूकडून न्यायाची प्रतीक्षा. पती-पत्नीतल्या वादाचा परिणाम मुलांवरही होतो.
अशा तक्रारींच समुपदेशनातून निवारण झाल तर... नाती पुन्हा घट्ट होऊ शकतात. त्यासाठी नगर पोलिसांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाशेजारी 15 ऑगस्ट 2017 ला ‘दिलासा सेल' सुरू केली.
कुटुंबांत वाद झाल्यास महिला पोलीस ठाण्यात न जाता, "दिलासा सेल'मध्ये येते. "दिलासा सेल'चे कर्मचारी दोन्ही बाजूंच्या लोकांना बोलावतात. दोन्ही बाजू ऐकल्यावर त्यांचे समुपदेशन करतात. त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्यानंतरही किमान आठ दिवस ते एक महिन्याने पुन्हा बोलवतात. वाद समुपदेशनाने मिटतो. सुखी संसार पुन्हा सुरू होतो.
गेल्या दोन वर्षांत दिलासाने तब्बल 1,194 जोडप्यांचा तुटू पाहणारा संसार सावरला. 3,639 पैकी 864 तक्रारदारांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला, तर 486 तक्रारी संबंधित व्यक्ती पुन्हा न आल्याने दफ्तरी पडून आहेत. 383 तक्रारदारांनी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. एकूण तक्रारींच्या तुलनेत हे प्रमाण अगदी 10 टक्के आहे. दिलासा सेलकडे दोन वर्षांत महिलांसोबत 466 पुरुषांच्या तक्रारीही आहेत. त्यात 18 ते 25 वयोगटातील विवाहित तक्रारदार जास्त आहेत. 26 ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी, 40 ते 60 वयोगटातील 155 तक्रारी आल्या. त्यात उच्चशिक्षितांच प्रमाण सर्वांत जास्त आहे.
संसारात पालक आणि नातेवाईकांचा वाढता हस्तक्षेप, सतत मोबाईलवर बोलणे आणि त्यातून गैरसमज निर्माण होणे, एकमेकांना समजून घेण्याची तयारी नसणे. दोघांच्या शिक्षणात तफावत, घरातील वृद्धांकडे दुर्लक्ष, अशी बहुतांश तक्रारीची कारणे होती..
पोलीस अधीक्षक ईशू सिंधू आणि अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली "दिलासा सेल'चे काम सुरू आहे. ‘’प्रत्येक तक्रारदाराला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो.’’ दिलासा सेलच्या पोलीस उपनिरिक्षक कल्पना चव्हाण सांगतात. ‘’त्यासाठी सर्व कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात. त्यामुळे आम्हाला दुभंगलेले संसार सावरता आले आहेत.’’
-

सूर्यकांत नेटके

#नवीउमेद #अहमदनगर

No comments:

Post a Comment