Tuesday 7 January 2020

डुबाकीलाल अँड सन्स (आखुडबुद्धी बहुशिंगी)


"सर, मी प्रणाली बोलत्येय. दोन मिनिटं वेळ आहे का?"
खरंतर अजिबात वेळ नव्हता. मी सिग्नलला होतो. पण तो मधाळ आवाज ऐकून अभावितपणे हो म्हणून गेलो.
"सर, मी डुबाकीलाल स्कॅमिंग कंपनीमधून बोलत्येय..."
"कसलं स्कॅन करता तुम्ही मॅडम?" माझ्या चिकित्सक वृत्तीनं अचानक उचल खाल्ली. कदाचित मधाळ आवाजामुळं असावी.
"स्कॅन नाही सर, स्कॅम करतो आम्ही. घोटाळे घोटाळे..."
"पहिल्यांदाच ऐकतोय हे नाव."
"खूप विश्वासू कंपनी आहे साहेब. सव्वाआठ महिन्यांची प्रदीर्घ आणि उज्ज्वल परंपरा आहे..."
"अरे वा! इतकी छोटी?"
"हो सर, त्याआधी कंपनीचं नाव वेगळं होतं. पण काळानुरूप राहिलं पाहिजे म्हणून हे थोडं फॅन्सी नाव ठेवलंय."
"अच्छा. काय करते तुमची कंपनी?"
"सर, काय करत नाही ते विचारा!"
"बरं, काय करत नाही तुमची कंपनी?"
"काहीच करत नाही सर! आमची स्पेशालिटी घोटाळे करणं ही असली तरी आम्ही घोटाळे न करून आमच्या ग्राहकांच्या पैशांचा पुरेपुर मोबदला दिलाय.”
“अहो, पण घोटाळे न करून तुम्ही गुंतवणूदारांची फसवणूक केल्यासारखं होत नाही का?”
पलीकडून दोन मिनिटं शांतता. कदाचित प्रणाली विचारात पडली असावी.
“नाही सर. फसवणूक करणं हेच आमचं मूळ ध्येय असल्यानं फसवणूक झाली तर एकाअर्थी आम्ही ग्राहकांचा विश्वास सार्थ केला असंच म्हणता येईल ना?”
“हो, पण अशी फसवणूक केल्यावर काहीच करत नाही असं कसं म्हणता तुम्ही?”
“सर, त्याचं असं आहे की आम्ही फसवणूक केली की ग्राहकांची फसवणूक केली नाही आणि फसवणूक केली तर ग्राहकांची फसवणूक केलीय असं हे दुष्टचक्र आहे.”
“हं. तुम्हांला माझ्याकडून काय हवंय?”
“सर, तुम्ही आमच्या नव्या पिरॅमिड स्कीममध्ये पैसे गुंतवा ना.”
“कसला पिरॅमिड?”
“ते तुम्हांला काय करायचंय सर? तो बुडवायचाच आहे ना शेवटी?
”हो पण तरीही, यावर विश्वास कसा ठेवायचा?”
“सर, आमचं नाव हाच आमचा विश्वास आहे…”
“मघाशी तुमचं नाव प्रेरणा की प्रतिमा की कायतरी म्हणाला होतात ना?”
“सर, मी आमच्या कंपनीबद्दल बोलतेय. आमच्या कंपनीचे मूळ संस्थापक…”
“संस्थापक हे मूळच असणार ना?”
“सर, आमची कंपनी घोटाळेबाज असल्यानं मूळ संस्थापक वेगळे, लोकांना सांगायचे वेगळे, सरकार दप्तरी नोंद असलेले वेगळे, खरे वेगळे असे बरेच संस्थापक आहेत. तर, त्यातले मूळ संस्थापक शेठ किरोडीमल यांनी एकोणिसशे बत्तीस साली स्टेट बॅंक ऑफ भोवाळपूरमध्ये पाच हजार रूपयांचा घोटाळा केला होता.”
“अरे वा. म्हणजे गुंतवणूकदारांना भोवळच आली असणार.”
“तर काय? ही आमच्या कंपनीनं बुडवलेली पहिली बॅंक. तेव्हापासून आजवर आमच्या शेटजींनी मागं वळून पाहिलं नाही कधी.”
“हो का?”
“हो. तशीही त्यांची मान आखडली असल्यानं त्यांना वळता येत नाही. तर सर, मी काय म्हणत होते की आमची एक नवीन स्कीम आलीय. त्यात पैसे गुंतवा, हमखास डुबवू आम्ही. कमीतकमी पन्नासहजार रूपये गुंतवलेत तर त्याचे रिटर्न्स खूप छान येतात.”
“काय येतात रिटर्न्स?”
“काहीच येत नाहीत. पण सर, आम्ही तुम्हांला एक छानसं सर्टीफिकेट देतो. ते तुम्ही फ्रेम करून दिवाणखान्यात लावू शकता.”
“आणि नाही मिळालं तर?” मी थोडा चाणाक्ष प्रश्न केला.
“तर सर, आमच्या कष्टमय केअर सेंटरला फोन करा. ते आपल्याला कष्ट… आपलं सर्टीफिकेट देतील. मग सर, कधी येऊ पैसे घ्यायला?”
“पैसे? रोख का बुवा? आता तुम्हीही ऑनलाईन व्यवहार केले पाहिजेत.”
“सर, आमच्या ऑफीसची फक्त धनाबाद ब्रॅंचच ऑनलाईन ट्रांझाक्शन करते. पण तिथले लोकही टिकटॉकचे व्हिडीओ व्हॉटसॲपवर पाठवण्यापुरतेच असतात. बाकी सगळ्या ब्रॅंच रोखीचे व्यवहार करतात.”
“असं का?”
“सर, तुम्हांला तो फर्स्ट बॅंक ऑफ नायजेरीयाचा घोटाळा माहीत आहे का?”
“हो हो, ऐकलंय. तोही तुमच्याच कंपनीनं केला होता का?”
“नाही सर, त्यात आमची सर्वांची सॅलरी अकाऊंट होती. तेव्हापासून आमचा बॅंकींगवरचा विश्वास उडाल्यानं आम्ही सगळे व्यवहार रोखीनं करतो. उद्या सकाळी माणूस पाठवू का सर?”
“मॅडम, तुम्ही तर अगदीच गळी पडताय आता माझ्या.”
“सर, प्लीज एवढी पन्नासहजारांची दोनतीन सर्टीफिकेट्स घ्या ना. आमच्या कंपनीची अवस्था अत्यंत वाईट झालीय. दोन महीने झाले मला एकही गुंतवणूकदार मिळाला नाहीय हो.”
“मॅडम, इतकी वाईट अवस्था कशानं?”
“लोक आमच्या कंपनीला राजकीय पक्ष समजू लागल्यामुळं!”

- ज्युनियर ब्रह्मे 

No comments:

Post a Comment