Tuesday 7 January 2020

विद्याचे जीवनगाणे

मोठी दिदी शाळेत सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी असताना तिला शाळेतून काढून बोहल्यावर चढविण्यात आलं. तेव्हा तिचं वय तरी काय होतं? माझ्याच वयाची असेल ती. कदाचित, तेरा वर्षाची! शाळेतील हुशार विद्यार्थिनी असूनही तिला या जबरदस्तीच्या लग्नापासून स्वत:चा बचाव करता आला नाही. त्यावेळी तिच्यावर झालेला मानसिक, शारिरीक अत्याचार किती वाईट होता! माझ्याही प्राक्तनात दिदीसारखंच दु:ख, वेदना नियतीने लिहून ठेवल्या असतील काय? या विचारांनी विद्याची तंद्री लागली होती. डोळ्यांमधील अश्रू ओसरले तेव्हा विद्याने आपली कहाणी पुढे नेली… विद्या जालना जिल्ह्यातील पोर्तूल मंडळातील सतरा वर्षांची तरूणी. महाराष्ट्रातील मराठवाडा भागात आजही बालविवाहाची कुप्रथा सुरू आहे. त्यासाठी जालना जिल्हा कुप्रसिद्ध. या जिल्हयात बहुतांश ऊसतोड कामगार आहेत. हे लोकं वर्षातील जेमतेम चार महिने घरी आणि इतरवेळेस ऊसतोड टोळ्यांसोबत सतत फिरस्तीवर असतात. अशावेळी घरात वयात आलेली मुलगी असणे म्हणजे या पालकांना जाम चिंतेची गोष्ट वाटते. त्यावर उपाय म्हणजे, अगदी १४, १५ वर्षांच्या मुलींना येथे स्थळं चालून येतात आणि त्यांची चक्क लग्नंही लावून दिली जातात. येथील भौगोलिक परिस्थिती, परंपरांचा पगडा, दारिद्र्य, आर्थिक स्थिती आणि मुलींच्या इभ्रतीची चिंता ही कारणे या मागे आहेत. लैंगिक हिंसाचाराच्या सततच्या भीतीपासून हे बालविवाह सुरक्षा देतात, असा तर्क येथील पालक मांडतात. या प्रथेमागे काही अर्थाजनाची कारणेही आहेत. ते म्हणजे, ऊसतोड करणाऱ्या एकट्या कामगारास मिळणाऱ्या मजुरीपेक्षा विवाहित जोडप्यास मिळणारी मजुरी अधिक आहे. यास ‘कोयता’ प्रथा असेही म्हटले जाते. बालविवाहाच्या या प्रथेने जालना जिल्ह्यात मात्र मोठी सामाजिक विषमता निर्माण झाली आहे.
विद्या, चार बहिणींपैकी सर्वात धाकटी. तिच्या तिन्ही मोठया बहिणींचे अनुक्रमे ११, १२ आणि दहाव्या वर्षी लग्न झाले होते. विद्याने मात्र त्याच मार्गाने चालायला ठाम नकार दिला. आपल्या बहिणींप्रमाणेच वयाच्या तेराव्या वर्षी आपले बालपण हिरावले जाऊ नये म्हणून ती लग्न न करण्याच्या विचारावर ठाम राहिली. परंतु, विद्याला हे सामर्थ्य कुठे मिळाले? तर, ती १२ वर्षाची असताना याची सुरूवात झाली. युनिसेफ समर्थित स्वराज विकास प्रतिष्ठानच्या सहकार्याने ग्रामीण बाल संरक्षण समिती (व्हीसीपीसी) द्वारा तिच्या परिसरात आयोजित केलेल्या किशोरवयीन मुलींसाठी समुदायावर आधारित कार्यक्रमांमध्ये तिने भाग घेण्यास सुरवात केली तेव्हा तिला बालकांच्या अधिकारांबद्दल माहिती मिळाली.
केवळ बालविवाहाविरूद्धच्या कायद्यांबद्दलच नव्हे तर समाजातील संघर्ष आणि अस्मितेचा भाग राहिलेल्या पारंपारिक रूढी, प्रथांना आव्हान देण्यासही या कार्यक्रमामध्ये प्रोत्साहित केलं गेलं. या सत्रांमधून तिला स्वत:च्या अधिकारांसोबतच शिक्षणाचं महत्व कळलं. आपले बालपण, आपली स्वप्न, भविष्य आणि आपलं आयुष्य हे महत्वाचं आहे. लग्न ही तरूण वयातील अखेरची गोष्ट आहे, असं बरंच काही विद्या या सत्रात शिकली.
परिसरात माध्यमिक शाळेचा आणि वाहतूक व्यवस्थेचा अभाव असल्याने विद्या पाचव्या इयत्तेत असताना तिच्या वडिलांनी तिचं लग्न लावून द्यायची इच्छा व्यक्त केली. विद्याला हे कळलं तेव्हा तिने व्हीसीपीसी, बालमित्र (ज्या मुलांकडून इतर मुलांसाठी उभे राहण्याचे प्रशिक्षण दिले जाते) तसेच स्वराज ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधून आपबिती सांगितली. संस्थेच्या प्रतिनिधींनी तिच्या घरी येऊन तिच्या वडिलांना समजावून सांगितलं. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि समुपदेशनानंतरच्या अनेक फेऱ्यांनंतर तिच्या वडिलांनी तिला कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात प्रवेश घेऊन दिला. ही निवासी शाळा विद्याच्या गावापासून काही अंतरावरच होती. विद्याच्या शाळा शिकण्याच्या या दृढ निर्णयास तिची मोठी बहीण सवितानेही पाठींबा दिला. सविताचं लग्न बालवयातच लावून देण्यात आलं होतं. शिक्षण नसेल आणि बालवयात लग्न झालं तर नवऱ्याचे काय अत्याचार सहन करावे लागते, हे सविताला चांगलेच माहिती होते. आपण शिकलो असतो तर आपल्याला आयुष्यभर असा त्रास सहन करावा लागला नसता, हे तिने जाणले होते. विद्यावर ही वेळ येऊ नये म्हणून ती विद्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली.
नवीन शाळेत विद्याला अभ्यासाबरोबरच गायनाचीही आवड निर्माण झाली. गाण्यातील तिची रूची लक्षात घेऊन शिक्षकांनी तिची आवड जोपासली, त्याला योग्य वळण दिले. संगीताची भाषा व्यक्तीचा दृष्टीकोन बदलवते. जीवनाकडे सकारात्मक पद्धतीने पाहण्यास शिकवते. स्वप्नं पूर्ण करण्याचे आणि आव्हानं पेलण्याचे बळ व्यक्तीला आवडीच्या गोष्टी करण्यातून मिळते, हे विद्या संगीतातून शिकली. गेल्या वर्षी विद्याने ‘आयबीएन-लोकमत’ टॅलेंट स्पर्धेत भाग घेतला आणि दुसरे स्थान पटकावले तेव्हा पुण्यातील लोकांनी विद्याच्या दमदार, धैर्यवान आणि गतिशील कामगिरीची दखल घेतली. स्वत:चे जीवनगाणे भव्य मंचावर मांडण्याचा तिचा पहिलाच अनुभव अनेकांसाठी प्ररेणादायी ठरला. प्रेक्षकांच्या टाळ्या आणि कौतूकाने तिचा आत्मविश्वास अधिकच वाढला. विद्याची कहाणी जालना जिल्ह्यातील बालविवाहाच्या प्रथेत बदल घडविणारा मैलाचा दगड ठरली. जे स्वत:च्या जगण्याची, संघर्षाची कहाणी जगाला ओरडून सांगतात, त्यांचा आवाज नक्कीच ऐकला जातो. विद्यासारख्या अशा धैर्यवान मुलींना ऐकण्याची प्रतीक्षा जग करत असतं, त्यासाठी फक्त बोलण्याचं, व्यक्त होण्याचं धाडस करावं लागते, जे विद्याने केले!
- नितीन पखाले
नवीउमेद नकोलगीनघाई

No comments:

Post a Comment