Saturday 25 January 2020

चीनच्या ड्रॅगनशी धुळ्याच्या शेतकऱ्याची टक्कर

धुळे तालुक्यातील मेहेरगाव. इथले प्रगतिशील शेतकरी गुलाबराव पाटील. तीन एकर क्षेत्रात त्यांनी ड्रॅगन फ्रुटची लागवड केली आहे. त्यातून यंदा एकरी तीन टनापेक्षा अधिक उत्पन्न. दोन ते तीन लाख रुपयांचा निव्वळ नफा. येणाऱ्या वर्षात या उत्पन्नात अजून वाढ होणार आहे. 
पाटील यांनी ऑगस्ट २०१७ मध्ये या फळाची दोन हजार रोपं लावली. एकरी पाच लाख रुपयांपर्यत त्यांना खर्च आला. या फळाला ४५ अंशांपेक्षा अधिक तापमान चालत नाही. त्यामुळे त्यांनी तापमान नियंत्रणासाठी शेवगा आणि बहुगुणीच्या झाडांची लागवड केली आहे. गेल्या वर्षी त्यांना शेवग्यानं चांगलं उत्पन्न मिळवून दिलं.
पहिल्या वर्षी ड्रॅगन फ्रुटमधून विशेष उत्पन्न मिळालं नाही. मात्र या वर्षी त्यांनी लाल रंगाच्या ड्रॅगन फ्रूटची लागवड केली . अत्यंत रसाळ आणि आइस्क्रीमसारखे मऊ असे हे फळ पाटील बाजारात २०० रुपये किलोप्रमाणे स्वतः पॅकिंग करून विकत आहेत. विशेष म्हणजे स्थानिक व्यापाऱ्यांनीही पाटील यांच्या शेतातलं ड्रॅगन फ्रुट विकायला ठेवलं आहे. ''हे फळ बहुगुणी असल्यानं बाजारात मागणी चांगली आहे.'' पाटील सांगतात. ''पण स्थानिक शेतकऱ्यांपुढे चीनमधून येणाऱ्या फळाची स्पर्धा आहे. खरं तर तुलनेनं चीनमधली फळं कमी गुणवत्तेची. पण ती स्वस्त असल्यानं विक्रेते स्थानिक फळांऐवजी चीनमधल्या फळाच्या विक्रीला पसंती देतात. ज्या ग्राहकांनी दोन्ही फळांची चव चाखली आहे ते पुन्हा चिनी फळ खरेदी करत नाहीत. ''
ग्राहकांनी पांढऱ्या रंगाच्या ड्रगन फळाऐवजी लाला रंगाच्या फळाला अधिक प्राधान्य दिलं तर स्थानिक शेतकऱ्यांचा अधिक फायदा होईल असं पाटील सांगतात.
आपल्या देशात विकसित झालेलं ड्रॅगन फ्रुटचा अधिक प्रसार व्हावा म्हणून पाटील सतत प्रयत्न करत आहेत. अन्य शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन पाटील यांनी स्वतः ड्रॅगन फ्रूटची रोपवाटिका तयार केली आहे. त्यांच्या फळबागेत येणाऱ्या शेतकऱ्यांना ते योग्य मार्गदर्शनही करतात.
गुलाबराव पाटील, ड्रॅगन फ्रुट उत्पादक, धुळे - ०९८२२४५१०८०
- कावेरी परदेशी, धुळे

No comments:

Post a Comment