Saturday 25 January 2020

एचआयव्हीबाधितांची लग्न लावणारे पुंडलिक सपकाळे

दिवस एक डिसेंबरचा. नंदुरबार जिल्ह्यातलं शहादा उपविभागीय कार्यालय. जागतिक एड्स दिनाचं औचित्य साधून ५ जोडप्यांचे विवाह लावण्यात आले. उपविभागीय पोलीस अधीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी गेल्या ११ वर्षात २२ एचआयव्हीबाधितांची लग्न करून दिली आहेत.तेही शासकीय निधीशिवाय. सपकाळे दरवर्षी १ डिसेंबरला या विवाहसोहळ्याचं आयोजन करतात. १९८९ मध्ये उपनिरीक्षक पदावर ते पोलीस खात्यात भर्ती झाले. 
''२००८ च्या मुंबई हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाले. मी खचलो होतो तेव्हा मित्राने समजावलं, खचू नको, साहेबांनी दाखवलेल्या मार्गावरून वाटचाल कर.'' सपकाळे सांगत होते. ''१९९२ ला करकरे चंद्रपूरला पोलीस अधीक्षक असताना आमची ओळख झाली. तेव्हा चंद्रपूरमध्ये महाकाली मंदिराच्या मागच्या बाजूच्या मोठी वेश्यावस्ती होती. तिथे गुंडांचा मोठ्या प्रमाणात वावर असे. गुंडांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना नेहमीच तिथे जावं लागे. या वस्तीत गुन्हेगारी नियंत्रणासह व्यसनमुक्ती मोहीम राबवण्याचे, वेश्यांच्या मुलांसाठी काहीतरी उपक्रम राबवण्याचा विचार करकरे यांनी मांडला. यातून सर्वप्रथम अशा मुलांसाठी शालेय शिक्षणाची सोय केली. त्यानंतर सामाजिक संस्थांच्या मदतीने आरोग्य शिबीर, एड्सबाबत जनजागृती, असे उपक्रम सुरू केले.''
सपकाळे यांनी लग्न लावलेली ही सर्व जोडपी सुखानं संसार करत आहेत. दरवर्षी आयोजित विवाहसोहळ्यात त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला जातो. आपण या समाजाचे घटक आहोत आणि सर्वसामान्यांप्रमाणे जगण्याचा आपल्यालाही अधिकार आहे. ही भावना एचआयव्हीबाधितांच्या मनात निर्माण व्हायला या उपक्रमातून मदत होते, जनजागृती होते, असं सपकाळे सांगतात. एचआयव्हीबाधित अनुरूप तरुणतरुणींचा शोध घेतला जातो. त्यांचा परिचय करून दिल्यावर त्यांच्या संमतीनं विवाह करून दिला जातो.
अनेक दानशूर व्यक्ती, संस्था या उपक्रमाला मदत करतात. यंदाही या उपक्रमाला अनेकांची मदत लाभली. अवंतिका फाउंडेशनच्या अध्यक्ष पल्‍लवी प्रकाशकर यांनी नववधूला पैठणी आणि वराला पोशाख दिला.
माजी शिक्षण सभापती शामराव जाधव यांनी वधूला मणीमंगळसूत्र केलं.
-रुपेश जाधव, नंदुरबार

No comments:

Post a Comment