Saturday 25 January 2020

कुडावळेतलं काकाकाकूंचं घर

रत्नागिरीतलं कुडावळे गाव. तिथं बांधलेलं मातीचं घर. दिलीप आणि पौर्णिमा कुलकर्णी यांचं. दिलीपकाका ६० वर्षांचे तर पौर्णिमा काकू ५३ वर्षांच्या. गेली २६ वर्ष ते इथं राहत आहेत. काकाकाकू मुळचे पुण्याचे. दिलीपकाका इंजिनिअर. टेल्कोत काही काळ नोकरी. विवेकानंद केंद्राचं काम करताना त्यांची पौर्णिमाकाकूंशी ओळख झाली. काकूंचे वडील पुण्यात विवेकानंद केंद्राचे अध्यक्ष होते. काकू आयुर्वेदिक डॉक्टर. एकमेकांचे विचार पटले आणि दोघांचं लग्न झालं. 
शहरी जीवनात आपली प्रत्येक कृती पर्यावरणाला हानी पोहोचवत असल्याची जाणीव इतकी प्रखर झाली की पुणे सोडून ते कायमचे कुडावळ्याला आले.

सूर्योदयापूर्वी उठणं, मग व्यायाम, जेवण दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर आणि संध्याकाळचं सूर्यास्तापूर्वी. लवकर निजणं।स्वतः बांधलेलं मातीचं घर उन्हाळ्यात थंडावा न थंडीत ऊब देतं, त्यामुळे पंखा नाहीच. या प्रयत्नांमुळे महिन्याला फक्त एक ते दोन युनिट वीज लागते. साबणामुळे पाणी प्रदूषित होतं म्हणून ते साबण वापरत नाहीत. भांडी घासण्यासाठी राखेचा वापर. आंघोळीचं आणि भांडी घासल्यानंतरचं पाणी झाडांमध्ये सोडलं जातं.
'' एखादी वस्तू वापरताना चार आरचा विचार करावा. पहिलं रिफ्युज (नाकारणे), रिड्युस (कमी वापर), रियुज (पुन्हा वापर), रिसायकल (पुनर्निमाण).यामुळे निसर्गातील साधनसंपत्तीचा कमी वापर होईल. '' दिलीपकाका सांगतात. प्रवास फक्त लाल एसटीनं. प्लॅस्टिकचा वापर नाही. कागदाचाही कमीतकमी न पुरेपूर वापर. तिकिटाचीही मागची बाजू ते उपयोगात आणतात. त्यांच्या कुटुंबाचा महिन्याचा खर्च ४५०० रुपये. लिखाणातून मिळणाऱ्या पैशातून चरितार्थ सहज चालत असल्याचं ते सांगतात.
निसर्गपूरक, आरोग्यदायी जीवनशैलीच्या प्रचारासाठी काकाकाकू 'गतिमान संतुलन' नावाचं मासिक चालवतात. मासिकात जाहिराती नाहीत. त्याचं वार्षिक शुल्क ३०. मासिकाचे सध्या हजार सभासद आहेत. 'निसर्गायन', 'सम्यक विकास' , 'स्वप्नाच्या गावा', 'ऊर्जा संयम' अशी २५ पुस्तकं काकांनी आतापर्यंत लिहिली आहेत. व्याख्यानांचे पैसे ते घेत नाहीत. कुडावळ्यात ते शिबीर घेतात.
''आताचा विकास शाश्वत विकास नाही. आमच्या अशा राहण्यानं किती बदल होईल माहिती नाही, पण सकारात्मकतेनं प्रयत्न सुरू ठेवायचे'' असं काका म्हणतात.
-संतोष बोबडे

No comments:

Post a Comment