Tuesday 7 January 2020

यंदाच्या दिवाळीत आणखी एक नवा ड्रेस घेऊ


नाशिकमधल्या २० जणींचा हा आत्मजा ग्रुप. कोणी नोकरदार तर कोणी गृहिणी. स्व ते समाज’ या शीर्षकाखाली एकमेकींशी जोडलेला . स्वत:चे व्यक्तीमत्व खुलवत असताना आपण समाजा काही देणं लागतो, या प्रेरणेतून साधारण दोन वर्षांपूर्वी सुरू झालेला. महिन्याकाठी शहर परिसरातील वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना भेट द्याायची, तेथील समस्या समजून घ्यायच्या त्यावर काम करायचे.
यंदा दिवाळी वेगळ्या पद्धतीनं साजरी व्हावी यासाठी काय करता येईल यावर विचार सुरू होता. तेव्हा मयुरी शुक्ला यांनी कल्पना मांडली. दिवाळीसाठी आपल्या मुलांना नवा ड्रेस घेताना आणखी एक नवा ड्रेस घेऊया. सर्व जणींनी ती उचलून धरली.
दरम्यानच्या काळात मयुरी यांनी ज्ञानदीप गुरुकुल आश्रमाला भेट दिली. आश्रमात ५० अनाथ मुलं-मुली. आश्रमात एरवी जुन्या कपड्यांचा ढीग नित्याचाच. मुलं हे कपडे वापरतात. बऱ्याचदा ते लहान तरी होतात किंवा ढगळ. मयुरी यांनी संस्थेकडे नव्या ड्रेसची संकल्पना मांडली. त्यावर सारख्या रंगाचे कपडे आणावेत, जेणेकरून मुलांना कुठे बाहेर नेलं तर त्यांची ओळख सहज पटू शकेल, अशी सूचना आश्रमानं केली. मयुरी यांनी मुलांची मापं घेतली. ग्रुपमधल्या प्रत्येकीनं ५० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत जमेल तशी मदत केली. संस्थेनं १० दिवसांपूर्वी मुलांना आश्रमात जाऊन कपडे दिले.
''आपल्या मुलांसाठी खरेदी हा दिवाळीतला मोठा आनंद.'' संस्थेच्या यशश्री रहाळकर सांगतात. ''पण त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन एखाद्या गरीब मुलाला नवा कोरा ड्रेस दिला तर त्या चिमण्या जीवाच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही देऊन जातो. ''

नाशिकमधला किंग्स फाऊंडेशनचा ज्ञानदीप गुरुकुल आश्रम. मुलं रांगेनं शिस्तीत बसली होती. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे दीप उजळले होते. ''यंदाच्या दिवाळीत आमची मुलं नवे कोरे ड्रेस घालणार. '' संस्थाप्रमुख सोनू समाधानाने म्हणाले. संस्थेच्या भेटीवर आलेल्या आत्मजाही आनंदानं निःशब्द झाल्या होत्या.

-प्राची उन्मेष 
 #नवीउमेद #नाशिक

No comments:

Post a Comment