Friday 10 January 2020

शेक्सपीअरकालीन मराठी (आखुडबुद्धी बहुशिंगी)


शेक्सपीअरच्या काळात इंग्लडांत मराठी भाषाही बोलली जाई. नारविच, नवा किल्ला, कांतुरबरी या गावात ही मराठी विशेष प्रचलित होती. फ्रेंच भाषा ही मुत्सद्देगिरीची, लॅटीन भाषा कायद्याची, जर्मन भाषा सैन्याला हुकूम देण्यासाठी आणि इटालियन भाषा प्रेमासाठी वापरली जायची तद्वत, मराठी भाषा ही उपहासात्मक किंवा खवचट बोलण्यासाठी सर्वात उत्तम आहे असा तेव्हा समज होता.
भाषेला असे वलय लाभले असल्याने बऱ्याच ग्रंथांचे मराठीत भाषांतर करण्याचा प्रघात त्या काळी होता. सालिसबरीचे बिशप जानराव राले यांनी कांतुरबरीच्या गोष्टी, गुराख्याचे पंचांग, वैद्यराज फाऊस्टबुवा यांचबरोबर शेक्सपीअरच्या नाटकांचेही भाषांतर लोकांस उपलब्ध करून दिले होते. त्याचा एक मासला-
मित्र, रोमणे आणिक माझे सखये।
आपुला कान द्यावा गा इकडये।
म्या आलो येथ ना करण्यास स्तुति।
प्रन्तु गाडेंन आज यांस ही निश्चिती॥
चांगुळे ते कुणा बोलो न वाटे।
बोलितो जे अधिकची वोखटे।
जाहले हे तैसेचि सीझरास।
ऐसे बोले सरदार ब्रुतस॥
जाहली तृष्णा फार तयास।
षड्रिपुंची जैसी धरली कास।
याचे एकचि उत्तर संसारी।
गिळोनि आपणा होई परी॥
ब्रुतस म्हणे आलो बोलायासि।
ब्रुतस ठेंवि इमान मानसि।
मराठी भाषेची ही अतीव लोकप्रियता पाहून शेक्सपीअरच्या मनी कैक नाटके मराठीतून लिहावी असा विचार आला होता. व्हेनिसच्या वाण्याची गाथा, वरूणाच्या दोन पुरुषांची गोष्ट, चुक्यांची कौमुदी, रोमिओज्युलिएटाख्यान, हेन्री सहा साहेबांची बखर, गाव तसं चांगलं पण राजपुत्राला टांगलं ऊर्फ ह्याम्लेट (वगनाट्य) ही नाटके त्याने लिहावयास घेतली होती. ती लिहिण्यासाठी त्याने दिक्षणरी ऑफ मऱ्हाटा लँग्वेजची सुधारीत प्रतही नारविचहून मागविली होती. परंतु त्याचे हे कार्य अधुरे राहिले. मराठीमुळे शेक्सपीअरची लोकप्रियता वाढण्याचा धोका ओळखून इंग्रज सरकारने मराठी भाषेचा वापर करण्यावर बंधने आणली. सरकारी अधिकाऱ्यांनी छापखान्यांत घुसून मराठी भाषेत सर्वाधिक वापर असलेल्या ञ, लॄ आणि ॠ या अक्षरांचे खिळे पोत्यात भरून टेम्समध्ये बुडवले. मराठी पेपरांच्या रद्दीचा भाव कमी केला. मराठी छापखान्यांना मुद्दाम जुना पिवळा कागद पुरवला जाऊ लागला. मराठी पेपरना सरकारी जाहीराती देणे बंद करून केवळ टेंडर नोटीसा छापणे सुरु केले.
अशा प्रकारच्या सरकारी प्रयत्नांना यश पावून लोक आपोआप इंग्रजी भाषेकडे वळू लागले. अर्थात, हळूहळू मराठीभाषिक लोकांची संख्या कमी होत गेली. आजमितीस, केवळ लंदनशहरी मराठी बोलणारे मोजकेच लोक बचावले आहेत.
(ब्रह्मेपीडीयाच्या प्रथम आवृत्तीतून साभार)

- ज्युनिअर ब्रह्मे 

No comments:

Post a Comment