Saturday 25 January 2020

चला, मुलगे घडवूया (भाग दहा)

मला पाच वर्षांचा नातू आणि तीन वर्षांची नात आहे. माझी मुलगी त्या दोघांना कसं वाढवते याचे निरीक्षण मी देत आहे.
मुलांशी बोलताना ती तू मुलगा आहेस म्हणून किंवा तू मुलगी आहेस म्हणून अशी वाक्याची सुरूवात वा शेवट कधीही करत नाही. प्राण्यांमध्ये जसे त्यांचे वर्गीकरण असते तसेच ते मनुष्यामध्ये असते हे उदाहरणं देऊन ती त्यांच्या लक्षात आणून देते. खेळणी आणताना भातुकली आणि क्रिकेटची बॅट चेंडू हे दोघांकरता आणते. त्यांच्याशी भातुकली खेळताना नातवालाही स्वैंपाक करायला सांगून तो सगळ्यांनी एकत्र बसून खायचा हे शिकवते.
मानसशास्त्रामध्ये फ्रॉईडने ज्या संकल्पना मांडल्या त्यानुसार मुलांच्या वाढीच्या अवस्था असतात आणि त्या त्या अवस्थेमध्ये मूल असताना पालकांचा त्याच्याशी असलेला व्यवहार हा त्या मुलाच्या मानसिक आरोग्यात अतिशय मोठी भूमिका बजावतो.
मुलांना स्वत:च्या लैंगिक अवयवाविषयी उत्सुकता असते. एका विशिष्ट वयात हात लावून किंवा बरोबरीच्या मुलामुलींना स्पर्श करायला सांगून किंवा एकमेकांच्या अवयवांना स्पर्श करून मुलं ही उत्सुकता शमवत असतात. त्यावेळी ती काही गुन्हा करत आहेत किंवा चूक करत आहेत असं दाखवून पालकांनी कडक शिक्षा केली किंवा त्याविषयी बंधन घातलं तर मूल आत्मविश्वास गमावून बसतं. माझ्या मुलीने नातवाला मुलगा आणि मुलगी दोघांच्या लैंगिक अवयवाची माहिती त्याला समजेल अशा पध्दतीने दिली.
एक अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पर्श. आपल्या समाजात काही काळानंतर सख्ख्या नात्यातील माणसांनीही एकमेकांना स्पर्श करणं किंवा सहज प्रेमानं आलिंगन देणं ह्या गोष्टी निषिध्द मानल्या जातात. माझ्या नातवासमोर त्याचे आईवडील सेक्सच्या कुठल्याही उत्तान क्रिया निश्चित करत नाहीत पण हलकंसं आलिंगन किंवा गालावर एखादं चुंबन या क्रिया सहज वाटू शकतील अशा आविर्भावात जरूर करतात.
माझा नातू मुलगा आहे म्हणून तो श्रेष्ठ आहे, किंवा तो म्हणेल ती पूर्वदिशा आहे असा त्याचा समज होऊ न देता त्याच्या रास्त मागण्या आणि हट्ट पुरवले जातात. घरातली छोटीमोठी कामं त्याला आत्तापासून करायला सांगितली जातात जेणेकरून घर ही सर्वांची जबाबदारी असते ही गोष्ट त्याच्या मनावर ठसवता येते. माझा जावई माझ्या मुलीच्या बरोबरीनं घरातली कामं किंवा मुलांना वाढवण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेतो.
मुलाला असं घडवण्यामागे त्याच्या आईवडिलांचा विचार इतकाच आहे की स्त्रीपुरूष भेद हा फक्त शारिरिक पातळीवरच असावा बाकी कर्तृत्व क्षमता किंवा कर्तव्य जबाबदाऱ्या ह्या बाबतीत स्त्रीपुरुष समान पातळीवर असतात हे मुलाला नीटपणानं समजावं. आजी म्हणून हे बघताना मला निश्चितच समाधान वाटतं. मानसिकरित्या मुलगा असा तयार व्हावा की पुरूष म्हणून स्त्रीवर बळाचा वापर करावा अशा साच्यात तो वाढता कामा नये तर माणूस म्हणून समोरचा पुरूष असो वा स्त्री त्याचा आदर करायला त्यानं शिकायला हवं, यासाठी मुलीचे प्रयत्न सुरू असतात. 

- शाल्मली गोखले

No comments:

Post a Comment