Saturday 25 January 2020

आतोणे शाळेतल्या ५९ + अंगणवाडीतल्या ३७ मुलांसाठी तुमचं योगदान हवं आहे

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात घडणार्‍या विधायक घटना आणि त्या घडवणारी माणसं यांचा सोशल मिडिया प्लॅटफॉर्म म्हणजे नवी उमेद. शिक्षणक्षेत्र नवी उमेदसाठी अग्रक्रमाचं. त्यामुळेच नवी उमेदशी जोडल्या गेलेल्या भल्या शिक्षकांपैकी एक गजानन जाधव, चिंचवलीतर्फे आतोणे आदिवासीवाडी, ता.रोहा, जि.रायगड इथल्या जिल्हा परिषद शाळेतले. वय ३४. मूळचे लातूरचे. डीएड केल्यानंतर, वयाच्या २२ व्या वर्षी रुजू झाले, रायगड जिल्ह्यात, कातकरी आदिवासी वाडीतल्या शाळेत. तेव्हापासून कातकरी शाळांतच शिकवत आलेत. मुलांबद्दलच्या तळमळीतून त्यांनी कातकरी भाषा अवगत करून घेतली, मुलांच्या आवडत्या मराठी गोष्टी कातकरी भाषेत अनुवादल्या. आज, कातकरी भागातल्या सुमारे बाराशे शाळांत जाधव सरांच्या पुस्तकाची मदत घेतली जाते. या पुस्तकाविषयीची पोस्ट ३ फेब्रु २०१८ रोजी नवी उमेदने प्रकाशित केली होती. (फोटो क्र २)
महिन्यापूर्वी, ३१ ऑक्टोला नवी उमेदने लिहिलं होतं की, आतोणे शाळेची मूळ इमारत वापरण्याजोगी न राहिल्याने वाडीच्या समाजमंदिरात शाळा भरते आहे, पहिली ते चौथीचे विद्यार्थी एकत्रच बसून शिकताहेत, दोन वर्गखोल्यांची गरज आहे. (फोटो क्र १,४,५) त्यावर आमचे एक वाचक राजीव पांडे यांनी शाळेला मदत म्हणून क्राउड फंडिंग करावं असं सुचवलं. अन्य वाचक सीमा प्रधान कर्णिक, चेतन AC यांनीही प्रतिसाद दिला. नवी उमेदच्या आणि हा मंच चालवणार्‍या आमच्या संपर्क संस्थेच्या सदस्यांनाही हे रास्त वाटलं. आम्ही जाधव सरांशी चर्चा केली. १४ नोव्हेंला, बालदिनी ओताणे इथं दिवसभर जाऊन, शाळा बघून, वाडी फिरून, विद्यार्थ्यांशी गप्पा करून आलो. मुलांना दिलं जाणारं मध्यान्ह भोजनही पाहिलं. त्यांच्यासोबत खाऊ, वह्या-पुस्तकं वगैरेंसह आम्ही बालदिन साजरा केला. (फोटो क्र ३,४,५) या शाळेचा स्टाफ दोन शिक्षकच, गजानन जाधव आणि जगन्नाथ अब्दागिरे. वाडीतली अंगणवाडी सांभाळणार्या सेविका आहेत कल्पना बुरूमकर.‍
या मुलांच्या आईबापांकडे स्थानिक मजुरी आणि ती न मिळाल्यास कामासाठी स्थलांतर एवढेच पर्याय आहेत. वाडीत ९० घरं. लोकसंख्या ५००. जवळपास ५० टक्के कुटुंब हंगामी स्थलांतर करतात. काही मुलांसह जातात, तर काही शिक्षण चालू राहावं, म्हणून मुलांना वाडीतच ठेवून जातात. तर, अशा या शाळेला मदत करण्याचा जाधव सरांशी चर्चा करून ठरवलेला आराखडा नवी उमेदच्या वाचकांशी शेअर करत आहोत. (विद्यार्थीसंख्या ५९. मुली २८, मुलगे ३१. फोटो क्र ६,७,८,९)
नवी उमेद वाचकांच्या सहकार्याने या शाळेला मदत करण्याची जबाबदारी सध्या, डिसें १९ पासून एप्रिल २० पर्यंत, एकूण ५ महिन्यांसाठी घेत आहे. (पुढील काळाचा निर्णय तुमचा प्रतिसाद पाहून घेणार आहोत.)
१) शाळेसाठी दोन वर्गखोल्या, सध्या झोपडीत भरणार्‍या अंगणवाडीसाठी खोली
ग्रामपंचायत आणि शाळाव्यवस्थापनसमिती यांनी यासाठी अर्ज केला आहे. ही शासनाची जबाबदारी असल्याने, त्यासाठी संबंधित यंत्रणा, लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा संपर्क करेल. त्यात कुणी मदत करत असल्यास स्वागत आहे.
२) स्वच्छता किट
मुलांना प्रत्येकी एक स्वच्छता किट दिल्यास बरं राहील. यात टूथपेस्ट, टूथब्रश, साबण, शांपू, तेल, कंगवा, नॅपकिन या वस्तू असाव्यात.
II ५९ मुलांसाठी हे स्वच्छता किट टीम #नवीउमेद च्या अर्थिक योगदानातून पुरवणार आहोत II
३) बाकं
आत्ताची १० बाकं ५९ मुलांना बसण्यासाठी कमी पडत होती. मात्र, उर्वरित २० बाकांचा पुरवठा शासनाकडून होऊ घातला आहे, असं समजतं. त्याची वाट बघूया.
४) शैक्षणिक खेळाचं साहित्य
मुलांना शिक्षणासाठी खेळाच्या साहित्याची गरज आहे. हे कुणी देणगीदाखल दिल्यास स्वागत.
५) टॅब
शाळेला १० ते १५ टॅब उपलब्ध झाल्यास चांगलं होईल. स्वतः जाधव आणि अब्दागिरे सर तंत्रज्ञानाचा कल्पक उपयोग मुलांना शिकवण्यासाठी करत असतात. देणगीदाखल टॅब देणार्‍यांचं स्वागत आहे.
६) वैद्यकीय तपासणी
शासनातर्फे जाने १९ मध्ये मुलांची तपासणी झाली आहे. त्यानंतर आजपर्यंत झाली नाही. यासाठी कुणी डॉक्टर्स पुढाकार घेत असतील, तर खूप चांगलं होईल. अशांचंही स्वागत.
७) पोषण आहार शाळेतील ५९ विद्यार्थी + अंगणवाडीतील ३७ बाळं यांच्यासाठी (फोटो क्र १०,११)
सद्यस्थिती अशी -
शाळेला शासनाकडून प्रति विद्यार्थी २० ग्रॅम कडधान्य, १०० ग्रॅम तांदूळ आणि थोडा मसाला पुरवला जातो. प्रति विद्यार्थी १.५७ रु भाजीपाला, इंधन खर्च यासाठी दिले जातात. आठवड्यातून एक दिवस प्रत्येक मुलाला ३ बिस्कीटं किंवा १ केळं पुरवलं जातं. अंगणवाडीत भात वा खिचडी, उसळ, लाप्शी हे आलटून पालटून आणि अधनंमधनं गोड भात हे पदार्थ दिले जातात.
उघडच आहे की, शाळेत आणि अंगणवाडीत दिला जाणारा हा आहार पुरेसा नाही. जाधव सरांच्या आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नांतून आठवड्यातले २-३ दिवस काही व्यक्ती, संस्था आहार जरूर पुरवतात.
**यात सातत्य राखण्यासाठी नवी उमेदच्या वाचकांची मदत मागत आहोत**
आठवड्यातले ३ ते ४ दिवस अंडी, केळी वा अन्य फळं आणि ग्लुकोज बिस्किटं ९६ मुलांना मिळण्यासाठी रु २ हजार रु पुरेसे आहेत. म्हणजे महिन्याला ८ हजार रु.
सध्या ठरवलेल्या ५ महिन्यांसाठी आत्ता ४० हजार रु. जमा करणं गरजेचं आहे.
II म्हणजे, फक्त ४० व्यक्तींनी प्रत्येकी एक हजार रु दिले तर या ९६ मुलांच्या पाच महिन्यांच्या आहाराची सोय सहज होईल. आणखी व्यक्तींनी मदत केल्यास या ९६ मुलांच्या वर्षभराच्या आहार-पुरवठ्याची जबाबदारी आपण घेऊ शकतो II
आहारासाठीची रक्कम संपर्ककडे जमा करावी. प्रत्येक रकमेची पावती संपर्ककडून पाठवली जाईल. आणि देणगीदारांची नावं आणि त्यांनी दिलेली रक्कम इथे शेअरदेखील केली जाईल. अकाऊंटचा तपशील असा:
Account name: SAMPARK
Bank of Baroda, BACKBAY RECLAIMATION BRANCH
Account no: 03820100004549
IFSC code BARB0BACKBA (मधला आकडा शून्य आहे)
Type of Account: Saving
पैसे पाठवल्यानंतर इथेच कमेंटमध्ये रक्कम कळवावी. इनबॉक्समध्येही संपर्क करू शकता.
शैक्षणिक खेळाचं साहित्य, टॅब आणि वैद्यकीय तपासणी यात मदत करू इच्छिणार्‍यांनी कृपया इथेच कमेंटमध्ये तसं लिहावं.
आपले विश्वासू,
- वर्षा जोशी आठवले, लता परब, मृणालिनी जोग, हेमंत कर्णिक आणि मेधा कुळकर्णी. (नवी उमेद आणि संपर्क)
#आतोणेशाळेसाठीयोगदान #नवीउमेद 

No comments:

Post a Comment