Saturday 25 January 2020

माझा प्रवास (आखुडबुद्धी बहुशिंगी)

परवाच पुण्याहून कोल्हापूरला जायचा प्रयत्न केला. खरंतर गेली कित्येक वर्षं मी हा प्रवास टाळतो. काकीनाडा ते जगदलपूर, पांडातराई ते सिल्पी, कारगिल ते लेह, खार्टूम ते औगादूगू या मार्गांपेक्षाही हा रस्ता जास्त रोमहर्षक आहे. माझ्या माहितीनुसार पुण्याहून कोल्हापूरला जायचा मूळ मार्ग पुणे- मुंबई- गोवा (बोटीनं किंवा विमानानं)- बेळगांवमार्गे कोल्हापूर असा असून सातारा- कराडमार्गे जाणारा रस्ता हे याचं एक डायव्हर्शन आहे.
या रस्त्याला लागलो की मनातल्या मनात पाच टप्पे करून घेतो. घर ते कात्रज हा पहिला टप्पा. या टप्प्यात सहसा ब्रेकवरच पाय असल्यानं ब्रेकवर मन- उत्तम मन यासारखे सुविचार मनात असतात. गाडी हळू चालव असं सुनावायची संधी मिळत नसल्यानं बायको फुरंगटून आजूबाजूच्या ट्रॅफिककडं बघत असते. पोरं मोबाईलवर खेळत असतात.
दुसरा टप्पा शिरवळ. हा रस्ता पाहून जे विचार मनात येतात ते पाहता कुणीतरी या गावाचं नाव बदलून शिवराळ ठेवलं पाहिजे. यातल्या टोलनाक्याच्या संरक्षणाला दोन्ही बाजूनं जयविजयसारखे लावलेले डायव्हर्शन पाहता प्रवाशांनाच टोल मिळाला पाहिजे. या रस्त्यावर टोल मागणाऱ्या टोळभैरवांना रोज विठ्ठल कामतांच्या हॉटेलमध्ये नाश्ता करायची शिक्षा सुनावली पाहिजे. या रस्त्यावर असताना 'निर्वाणाच्या हायवेवर आयुष्यरुपी खड्डे पदोपदी असतात.' यासारखे वैराग्याचे विचार मनात येत असतात. एका डायव्हर्शनवर ८० स्पीड लिमिटचा आकडा पाहिल्यावर हायवे ऑथॉरिटीच्या दूरदर्शीपणाचं कौतुक वाटलं. बायको भोळी असल्यानं तिला ही खड्ड्यांची संख्या वाटली. तिनं जमेल तितके खड्डे मोजायचा प्रयत्न करून पाहिला. या टप्प्यात बायको जीव मुठीत धरून तर पोरं मोबाईल घट्ट मुठीत पकडून बसलेली असतात.
साताऱ्यापर्यंतचा रस्ता हा फसवा तीनलेनचा आहे. म्हणजे यातली एक लेन ट्रकवाल्यांना आंदण दिलेली असते तर एक बाईकवाल्यांनी बळकावलेली असते. अशावेळी आपण रिकाम्या सर्व्हिसरोडवरून लवकर पोहोचू असं वाटतं. या रस्त्यावर बायको गाडीपेक्षा वेगात सूचना देत असल्यानं जपून गाडी चालवावी लागते. पोरांना भूक लागलेली असल्यानं ती मोबाईलवर हॉटेल शोधत असतात.
सातारा ते कराड हा मुलूख बायकोच्या बालपणीच्या आठवणींशी निगडित असल्यानं या टप्प्यात सतत ऐतिहासिक दाखले ऐकावे लागतात. इथं मी अमुक साली आले होते, इथून बारा मैल गेलं की एका गावात आम्ही श्रमदानाला आलेलो होतो, माझी एक मैत्रीण पूर्वी इथं राहायची अशा सत्राशे आठवणी काढत असते. गेल्यावेळेला बायको म्हणाली, "तो डोंगर दिसतोय का?"
"हं. दिसतोय."
"रस्त्यावर लक्ष दे. डोंगर कशाला बघतोस?"
"तूच म्हणालीस ना बघ म्हणून? बरं, काय आहे त्या डोंगरावर?"
"काही नाही."
"मग?"
"मग काय? त्या डोंगराच्या पलीकडं एक गाव आहे ना, त्यात माझ्या मैत्रिणीच्या सासूचं माहेर होतं."
"जायचंय आपण तिथं?" मुलं घाबरून विचारतात. पोरं अग्दी बापावर गेलीत असा कटाक्ष बायको माझ्याकडं टाकते. हा संपूर्ण टप्पा मी जीवाचे कान करून ऐकत असतो आणि पोरं मोबाईलवर मॅप लावून अजून किती अंतर राहिलंय हे पाहत असतात.
कराडनंतरच्या टप्प्याला कंटाळा म्हणतात. कोल्हापूर काही येता येत नसतं. नुसतं शिये-भुये-वडगाव-वाठार येत असतात. आपल्या साईडने विरुद्ध दिशेने बाईकवाल्यांऐवजी ट्रॅक्टरवाले- टेंपोवाले येऊ लागले की कोल्हापूर जवळ आलं असं समजावं. हा संपूर्ण वेळ बायको मोबाईलवर असते आणि पोरं कारचार्जर घरी विसरल्यामुळं मोबाईलसारखी डिसचार्ज होऊन बसलेली असतात.
बरं, हे झालं जाताना. येताना पुन्हा हाच क्रम उलटा. प्रवासाला जायच्या विचारानंच रात्री थंडी वाजून ताप आला. आणि ‘कसला भित्रट आहेस रे तू?’ असं म्हणत बायकोनं कोल्हापूर फेरी कॅन्सल केली. हाच इलाज आता नाशिक, नगर, सोलापूर, औरंगाबादसाठीपण वापरेन म्हणतो.

- ज्युनिअर ब्रह्मे

No comments:

Post a Comment