Saturday 25 January 2020

आर्किऑलॉजी (पुरातत्व शास्त्र) (आखुडबुद्धी बहुशिंगी)

जे जुने सांगाडे बघून कुणालाही कसलाही बोध होत नाही त्याबद्दल आपल्याला फार समजते अशी समजूत करून देणारे शास्त्र म्हणजे पुरातत्त्व शास्त्र. हे शास्त्र इतर कुणालाच कळत नसल्याने पुरातत्त्व शास्त्रज्ञ सहसा चुकीचे ठरत नाहीत.
झांबियातल्या एका उत्खननात सापडलेली मातीची भांडी, माणसाचं माकडहाड आणि झेब्र्याचं शिंग यांना जोडून एका आर्किऑलॉजिस्टनं आफ्रिकेतल्या मूळ मानवाला शिंग होते, कासवासारखी पाठ आणि माकडासारखी शेपूट होती असे निष्कर्ष काढले होते. त्याच्याकडं पाहिल्यावर कुणीही संशोधनाबद्दल शंका घेतली नाही. आणखी एका पुरातत्त्वज्ञाने रशियात डायनोसॉरची अंडी सापडली असा दावा केला होता. त्याच्या शोधानुसार ही अंडी रंगीबेरंगी नक्षीची असून त्यावर धार्मिक चित्रे काढलेली होती. यावरून त्याकाळचे डायनोसॉर हे आस्तिक होते असा निष्कर्ष काढला गेला. डायनोसॉरची अंडी साधारण कोंबडीच्या अंड्याइतकी असायची, त्या अर्थी हे प्राणी फारसे मोठे नसावेत असेही अनुमान मान्य झाले.
जगभरातल्या पुरातत्त्वसंशोधकांत फू शिन चेचे हा चिनी संशोधक सर्वात अधिक नावाजला गेलेला आहे. चीन, जपान, भारत, इजिप्त, सीरिया, ग्रीस या देशातल्या बऱ्याच ठिकाणी त्याचे संशोधन प्रसिद्ध आहे. हा संशोधक आपल्या निष्कर्षाच्या नेमकेपणासाठी प्रख्यात आहे. आफ्रिकेतल्या टांगानिका प्रदेशात सुमारे सहाशे एकोणीस फूट आणि सव्वातीन इंच खोल खोदून सुमारे तीन हजार दोनशे बावीस वर्षांपूर्वी या ठिकाणी मानव राहात नव्हता असा खळबळजनक निष्कर्ष त्याने जाहीर केला. याचबरोबर ग्रीसमधल्या उत्खननात कचरा सापडल्यावर इ०स०पूर्व ३३४ मध्ये तिथे डंपिंग ग्राऊंड असणार असे संशोधन त्याने जाहीर केले होते. अथेन्स येथील उत्खननात जुनी जीन्स सापडल्यावर प्राचीन मानवासही जीन्सबद्दल माहिती होती हे आजवर दडून राहिलेले रहस्य उघड झाले. याला पुष्टी मिळाली ती "ज्याची जीन्स असेल त्याने ओळख पटवून दहा दिवसांत घेऊन जावे." असे आवाहन केल्यावरही कुणी पुढे आले नाही त्यावरून. अर्थात, या जीन्सचा मालक अडीचतीन हजार वर्षांपूर्वीच निवर्तला होता हे उघड आहे. जीन्सबद्दलची माहिती मानवाच्या जीन्समध्येच असावी.
भारतातही ठिकठिकाणी प्रवास करून त्यांनी संशोधन केले आहे. राजा भोजच्या जुन्या महालाच्या पायऱ्या उत्खननात सापडल्या त्यामागे फू शिन चेचेचेच अथक प्रयत्न होते. तीनशे फूट खोल सापडलेल्या या पायऱ्यांच्या दगडांवर 'बाळू लव्ह चमेली' असे लिहिलेले सापडले. त्यावरून शिळालेख लिहिण्याच्या भारतीय परंपरेचा उगम इतका प्राचीन आहे इतका बोध मिळतो. चीनमध्ये संशोधन करताना 'चिनी लोक पूर्वी सरडे खात नसत.' असा शोध लावल्यावर चिडलेल्या चिनी जनतेने त्याला चाळीस फूट खोल खड्ड्यात ढकलून वर माती लोटून दिली.
आता आणखी अडीच हजार वर्षांनी तत्कालीन पिढी फू शिन चेचेचा शोध लावेल तेव्हा आपणांस त्याच्याबद्दल आणखी माहिती मिळेल.
साधारणतः उत्खननासाठी वापरली जाणारी हत्यारे- एक्सकाव्हेटर (माती खणण्यासाठी), डंपर (माती वाहून नेण्यासाठी), आणखी डंपर (माती परत आणून खड्ड्यात भरण्यासाठी), आणखी आणखी डंपर (बाकीचे डंपर नादुरुस्त झाल्यास बदली म्हणून), सेबलहेअर ब्रश (उत्खननातून नाजूक सांगाडे वेगळे करण्यासाठी), मोठी लोखंडी चाळण (छोटे तुकडे चाळून घेण्यासाठी. परंतु ही रात्री डास चावू नयेत म्हणूनही वापरता येते), चमचे (पुरातत्वशास्त्रज्ञाना जेवण करण्यासाठी. कैकदा सिमेंट मिसळण्यासाठीही वापरतात.)


- ज्युनिअर ब्रह्मे

No comments:

Post a Comment