Saturday 25 January 2020

चला, मुलगे घडवूया (भाग १२)

तुम्ही तुमच्या मुलाला वाढवताना कसे वाढवले की जेणेकरून त्याचा स्त्री विषयक पारंपारिक दृष्टिकोन राहिला नाही याबाबत 'नवी उमेद' साठी लिहा असा उमेदमधून मेसेज आला. त्यावेळी उन्नाव, हैद्राबाद दुर्घटना ताज्याच होत्या. मनामध्ये विचित्र हताशपणा भरून राहिला होता. या पार्श्वभूमीवर अनिमिषने आणि मी आमच्या मुलासाठी म्हणजे अमनसाठी याबाबत नक्की काय वेगळे केले का आणि काही केले असेल तर काय केले हे आठवण्याची एक संधी मिळाली.
अनिमिष आणि मी विद्यार्थी दशेपासून त्यावेळेच्या पुरोगामी चळवळीशी संबंधित असल्यामुळे आणि वाचनामुळे आमच्या स्त्री- पुरुषविषयक जाणीवा योग्य वयात अपारंपारिक झाल्या. त्यामुळे खरे तर खूप आवर्जून अमन साठी फार काही वेगळे करावे लागले असे प्रथमदर्शनी तरी मला वाटले नाही. अर्थात् याबद्दल काहीच विचार करावा लागला नाही इतकेही सोपे गेले नसले तरी बऱ्याच पालकांत स्त्री पुरुष भुमिकांबद्दल मतमतांतरे असल्याने एकमतासाठी जो वेळ गेला असता तो तुलनेने कमी गेला हे निश्चित! याला काही अंशी आम्ही दोघेही मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करत असल्याचा फायदाही मिळाला.
हा लेख लिहिण्याआधी त्यात अमनचा उल्लेख आहे म्हणून अमनशी बोलावं वाटलं. त्याला मी विचारले "तुला आपल्या घरात स्त्री पुरुष नात्याविषयी जे वातावरण आहे त्याबद्दल काय वाटतं रे?" तर आजकालची एकविशीतील मुलं उत्तर देतात तसे त्याचं उत्तर आलं, "chill असता की तुम्ही !" "तरी रे?" इति आई, जी की चिकाटी सोडत नसते!
"अगं.. इतर बऱ्याच मित्र मैत्रिणींच्या आई बाबांसारखं नसतं ना तुमचं.. फ्री असतात माझे मित्र मैत्रिणी आपल्याकडे" ह्म्म्म...
मग आता मला तो शाळा व ज्युनियर कॉलेजच्या उंबरठ्यावर असतानाची एक घटना आठवते... त्या वयात जसं बऱ्याच जनतेच्या आयुष्यात फुलपाखरी वळण येतं तसे एक वळण आले होते त्याच्या पण आयुष्यात. त्यावेळी त्या मुलीचे वडील अगदी घाबरेघुबरे , किंचित् रागात आणि अर्थात् स्वाभाविक काळजीत येऊन आमच्याशी बोलते झाले. सध्याच्या फास्ट पिढीनुसार प्रकरण चिठ्ठ्याचपाट्यांवर न राहता SMS वगैरे वर पोचले होते. सर्वप्रथम त्या मुलीच्या वडिलांना आश्वस्त केले. 'याने सुरुवात केली की तिने' या हेरगिरीच्या फंदात न पडता एक NON THREATENING ( हे ठळक अक्षरांत वाचावे!) वातावरण निर्माण करण्याचे महत्त्व सांगून मदतीची तयारी दाखवली. आणि या निमित्ताने अमनशी बोलण्याची संधी साधली. यावेळी अशा आडनिड्या वयातील स्वाभाविक आकर्षण आणि एकूणच लाँग टर्म कमिटमेंट, नात्यांमधील आनंद, प्रेम, जबाबदारी याविषयी कोणताही आडपडदा न ठेवता थेट भाषेत बोलणे केले. यात कोणालाच दोषी न धरता अगदी नात्यांमधील आनंदाबरोबरच त्यातील मुलामुलींचे लैंगिक, भावनिक शोषण इथपर्यंत बोलणे झाले. हा गुंता अगदी हळूवारपणे सोडवला तर गेलाच पण मुख्य म्हणजे आपण आई- बाबाशी कोणत्याही गोष्टीवर बोलू शकतो हा विश्वास अमनच्या मनात दृढ झाला. यावेळी पुढेही जेव्हा कोणत्याही मुलीशी प्रेमाचे नाते जोडण्याची वेळ येईल त्यावेळी ते विश्वास, प्रामाणिकपणा, परस्परआदर आणि जबाबदारी या निकषांवर तपासून घेणे महत्वाचे आहे. यात कुणाचेही शारीरिक, आर्थिक, मानसिक शोषण असेल तर ते नाते जाचक होते हे सांगितले. प्रेमाच्या नात्यात शारीरिक सुखाबरोबर या गोष्टी लक्षात घ्याव्यात ही आमची भूमिका मांडली. आता तुम्हाला प्रश्न पडेल की न रागावणे इतपत ठीक आहे पण इतक्या लहान वयात एवढ्या पुढच्या गोष्टी कशाला बोलायच्या? तर 'पुढील पिढी मागच्या पिढीच्या बोटाला धरून नव्हे तर खांद्यावर उभी असते' हे सार्वत्रिक सत्य पालक म्हणून समजून घेणे आम्हाला महत्त्वाचे वाटते. मुलांच्या प्रश्नांना प्रामाणिक, स्पष्ट व वास्तवाला धरून उत्तरे देण्याची सवय इथे उपयोगी पडली. एखादे उत्तर माहित नसेल तर थातूरमातूर सांगून वेळ मारून नेली नाही की अकारण कल्पनारंजित विश्वात गुंगवून ठेवलं. उदा. Whisper किंवा कंडोमची जाहिरात लागली की टीव्ही चॅनल बदलले नाही की प्रश्नाला खुबीने (असे आपल्याला वाटते!) बगल दिली नाही.
या सर्वामध्ये माझा नवरा अनिमिष Psychiatrist असल्याचा जेवढा फायदा होतो त्यापेक्षा अधिक फायदा खरं तर तो कमालीचा प्रामाणिक, तर्कनिष्ठ आणि सहृदय व्यक्ती असल्याचा होतो. 'मुलांवर संस्कार बोलून कमी आणि पालकांच्या वर्तनातून जास्त होतात' हे त्याचे मत. अमनने त्याला कधीही घरातील कोणत्याच स्त्रियांना त्या स्त्रिया आहेत म्हणून कमी लेखलेलं, हेटाळणी केलेली असं पाहिलं नाही. कोणतेही काम पुरुष आहे म्हणून करायचे नाही हा भाग कधी आला नाही. घरातील निर्णय फक्त पुरुषांनीच घेतलेत असे पण त्याने पाहिले नाहीत. तसेच स्त्री-दाक्षिण्याचा सोयीस्कर पोकळ देखावाही कधी त्याच्यासमोर आला नाही.
बऱ्याचदा सक्सेस स्टोरीज आपल्यासमोर येतात. आम्ही पालक म्हणून १००% परिपूर्ण आहोत का? तर नाही. पण इतर कोणाही मानवाप्रमाणे आम्हीही अपूर्ण असू शकतो हे स्वीकारले. आपण भले एखादी मुलाच्या हिताची गोष्ट सांगतो म्हणून त्याने ती ऐकलीच पाहिजे आणि लगोलग अमलात आणलीच पाहिजे या पालकहट्टापासून शक्यतो लांब राहण्यासाठी विशेषतः मला जास्त प्रयत्न करावे लागले. उदा. लैंगिकता शिक्षण देण्याच्या वयात आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्याशी या विषयावर बोलावे यासाठी बरेच प्रयत्न केले. आश्चर्य म्हणजे त्याने हे प्रयत्न नीटच धुडकावून लावले! हे म्हणजे अगदी दाराशी गंगा वाहते आहे आणि आम्ही तिच्या पाण्यात पाय पण बुडवणार नाही हा प्रकार झाला! अशा वेळी आम्हाला थोडे वाईट जरूर वाटले पण त्याला आवर्जून सांगितले की तुला आयुष्यात कोणत्याही गोष्टीवर काहीही बोलायचे असेल तर आमच्याशी तू कधीही बोलू शकतोस. अर्थात् आम्ही काही सांगितलं नाही म्हणून त्याला काही माहिती मिळणारच नाही असं काही नव्हतच! पण अशा माहितीमध्ये धोके असू शकतात हे सांगणे आणि मुख्यतः परस्पर संवादासाठी दारे नेहमी खुली असतील याची खात्री देणे हेच करणे शक्य होते ते केले!
अजून एक गोष्ट मात्र आवर्जून केली ती म्हणजे अमली पदार्थांच्या वापराला नकार देणे हे स्वतःच्या वर्तनातून समोर आणणे. गंभीर गुन्हे आणि अमली पदार्थांच्या सेवनाच्या घनिष्ट नात्यांबद्दल वास्तववादी माहिती निर्भया ते दिशा दुर्घटनेच्या निमित्ताने देत आलो.
आजमितीला त्याच्या ग्रुपमध्ये भरपूर मित्र मैत्रिणी आहेत. त्यांचे एकमेकांशी जे मनमोकळे वागणे, बोलणे, स्पर्श करणे असते ते पाहून एका परीने खरं तर बरं वाटतं. या सर्वांचे आमच्याशी सुद्धा जवळीकीचे नाते आहे. "अमन बरोबर असल्यावर आम्हाला कसलेही टेन्शन नसते." असं त्याचे मित्रमैत्रिणीच नव्हे तर त्यांचे आई बाबा सुद्धा जेव्हा आमच्याशी बोलतात तेव्हा मन त्याच्याविषयीच्या अभिमानाने आणि आनंदाने भरून येते.
- वैशाली चव्हाण,
भूलशास्त्रतज्ञ
विवेकनिष्ठ मानसोपचारतज्ञ, 
सातारा

No comments:

Post a Comment