Wednesday 29 January 2020

चला, मुलगे घडवूया (भाग १५)

दुपारी चारची वेळ असेल. मी आणि माझी चुलत बहीण खेळत आहोत. थोड्या वेळाने आम्ही एक सरबत ब्रेक जाहीर करतो. किचनमध्ये असलेल्या आजीला त्याची चाहूल बहुदा आधीच लागलेली असते. त्यामुळे आम्ही किचनमध्ये येतो तेव्हा दोन ग्लासात सरबत ओतलेले असते. आणि त्या सरबताच्या पातळी पर्यंत आपली नजर नेत आजी हे बघत असते, की मला आणि माझ्या बहिणीला समान वाटणी मिळाली आहे का? लहानपणीचे हे दृश्य मी माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात फ्रेम करून ठेवले आहे. आता लक्षात येते की 'स्री-पुरुष समानता' ह्या विषयातील तो पहिला धडा होता. आता विचार करतो तेव्हा हे लक्षात येतं की मुलगा म्हणून माझा नैसर्गिक हक्क घरातील कोणत्याही वस्तूवर (किंवा कशावरही) नाही हे ही छोटी पण महत्वाची उदाहरणं मनात बिंबवतात. त्यामुळे माझ्यातला मुलगा घडत गेला तो ही सर्वसमावेशकता घेऊनच!
आज देखील भोवती अशी बरीच कुटुंब आहेत जी कोणत्याही नवीन गोष्टीचा पहिला मान मुलाला देतात. मी लहान असताना काही कुटुंब अशी होती जी मोबाईल, सायकल किंवा दुचाकी वाहन हे पहिले मुलांसाठी घेत. आपण कुणीतरी विशेष आहोत हे मुलांना वाटतं ते अशा कृतीतून. घरात आपल्याला मान आहे, सर्व गोष्टींवर पहिला अधिकार आपला आहे हे वाटण्याची सुरुवात इथून आहे. स्री-पुरुष समानतेची दुसरी शिकवण मला मिळाली ती माझ्या आई-वडिलांकडून. पालकांचे घरातील वर्तन हे देखील मुलगे घडविण्यासाठी जबाबदार असते. मी घरातील सर्व निर्णय आई आणि बाबांच्या चर्चेनंतर घेतलेले बघितले आहेत. त्यात दोघांची चर्चा, मतं जाणून घेऊन मगच निर्णय घेतला जात असे. पण गोष्टी इथेच थांबत नाहीत. घरात कुणी आलं की त्यांच्या समोर बायकोला ओरडणे, सतत धाकात ठेवणे, तिने काही मत व्यक्त केलं की लगेच त्याची खिल्ली उडवणे किंवा तिच्यावर डाफरणे हे मी काही घरात बघितले आहे. त्यामुळे केवळ निर्णय घेण्यात बायकोचे मत जाणून घेणे हे न होता एकूणच तिच्या अस्तित्वाचा सन्मान झाला पाहिजे ही शिकवण मला अगदी घरीच मिळाली आणि मुलगा म्हणून घडण्यात मला त्याची मदत झाली. कोणत्याही मुलाला आपला स्रीवर 'हक्क' आहे ह्याची जाणीव वरील उदाहरणं पाळली गेली तर मनात खोल रुतून बसू शकते.
ही झाली लहान असतानाची काही उदाहरणं. तिथे मुलांची भूमिका निरीक्षण करण्याची असते. पण खरी कसोटी असते teen-ages मध्ये (वय वर्ष १३ ते १९). मी लहान असताना मुलं आणि मुली एकमेकांना फारसा स्पर्श करत नसत. आता परिस्थिती थोडी बदललेली जाणवते आणि वातावरणात अधिक खुलेपणा दिसतो. मात्र हा 'स्पर्श' चांगला की वाईट ह्याची शिकवण द्यायची गरज आहे. "सतत मुलींना हात लावू नकोस, त्यांना ते आवडत नाही", असं प्रत्येक 'गेट-टुगेदर'च्या वेळेस माझी आई सांगायची. परंतु जर 'हक्क' गाजविण्याचे संस्कार घेऊन तो मुलगा मोठा झाला असेल तर? असं असल्यास त्या स्पर्शात देखील 'हक्क' डोकावेल आणि त्याचे रूपांतर अहंकाराच्या भावनेत होईल. आणि मग समोरच्या मुलीने तो स्पर्श स्वीकारण्यास नकार दिला तर लहानपणापासून मनात रुजलेला हक्क आणि अहंकार दुखावून त्याचे रागात रूपांतर होईल. मला वाटतं मुलगे घडवताना ह्या सर्व गोष्टींचा नीट विचार झाला पाहिजे. Good Touch आणि Bad Touch ह्यातला फरक मुलग्यांना शिकविला पाहिजे.
त्यामुळे मुलगे घडवताना ह्या सर्व गोष्टींचा विचार झाला पाहिजे असं मला वाटतं - लहानपणी घरात मुलगा आणि मुलगी समान आहेत असे वातावरण घडविणे, आपल्याला प्रत्येक गोष्टीचा 'नैसर्गिक हक्क' आहे असं मुलग्यांना वाटू न देणे, चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श ह्यातला फरक त्यांना समजावणे आणि त्यांना नकार पचविण्याची सवय लावणे. ह्या एवढ्याच गोष्टी पाळल्याने गोष्टी सुधारतील असा माझा मुळीच दावा नाही. हा विषय आणि त्याचे परिणाम खूप व्यापक आहेत हे देखील मला माहिती आहे. मात्र मुलग्यांच्या मानसिक जडणघडणीत हे उपाय काही मौलिक बदल घडवू शकतील हे मात्र नक्की!

- आशय गुणे

No comments:

Post a Comment