Friday 10 January 2020

स्वरूपाच्या कुत्रा प्रशिक्षणाची गोष्ट


 रत्नागिरीतील साळवी स्टॉप इथं राहणाऱ्या स्वरूपा माईनकरची ही गोष्ट. स्वरूपा काही वर्ष पुण्यात शिक्षणासाठी होती. 2015 च्या दरम्यान सुट्टीसाठी रत्नागिरीत आली. त्या वेळी तिच्या वडिलांचं हृदयविकाराने निधन झालं. नंतर स्वरूपाच्या आईची तब्येत बिघडली. लहान भाऊ ऋषीकेश आणि आईला सोडून पुन्हा पुण्याला जाणं स्वरूपासाठी अवघड होतं. म्हणून तिने रत्नागिरीतच राहण्याचा निर्णय घेतला.तिची आई सुजाता माईनकर या चिपळूण इथं जि.प.पाथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत.
रत्नागिरीत राहायचं ठरलं. पण, पुढं काय? सीएमए इंटरमेजेंट पर्यंत तिचं शिक्षण झालं होतं. आता नोकरी शोधणं भाग होतं. पण इथंच स्वरूपाचं वेगळेपण जाणवतं. आई वडिलांना असलेली पाळीव प्राण्यांची आवड स्वरूपाकडेही आली होतीच. मग नोकरीच्या शोधात वेळ वाया न घालवता श्वान ट्रेनिंग सेंटर सुरू करायचं ठरवलं.
कुत्र्यांची काळजी घेता घेता ती हळूहळू त्यांना उठ म्हटल्यावर उठायचं, बसायचं, कॉलर पट्टा लावून कसं चालायचं या सगळ्या प्राथमिक बाबींवर ट्रेनिंग देण्याचं काम तिनं सुरू केलं. आतापर्यंत तिने 17 कुत्र्यांना ट्रेन केलं आहे. आज स्वरूपा कोणत्याही ठिकाणी गेली तरी कुत्र्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते. इतकंच नव्हे तर कुत्रीही तिच्याजवळ विश्वासाने येतात. तिच्या या वेगळ्या धाडसी करीयरचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वर्षभरापूर्वी स्वरूपाचे मामा राजापूरहून त्यांचा कुत्रा उपचारासाठी रत्नागिरीत घेऊन आले. त्याला टयूमर झाला होता. त्यामुळे मामा त्याला स्वरूपाच्याच घरी ठेवून गेले. जवळपास 3 महिने तिने त्याची काळजी घेतली. यावेळी प्राण्यांवर उपचार करणारे डॉ.अविनाश भागवत यांच्या क्लिनिकमध्ये स्वरूपा त्याला घेऊन वारंवार जात होती. तीन महिन्यात या कुत्र्याविषयी स्वरूपाच्या मनात काळजीची भावना अधिक वाढली. स्वरूपा सांगते, "डॉ.भागवत यांच्यामुळेच आज मी नवजात कुत्र्यांना चांगलं ट्रेनिंग देऊ शकते. त्यांनी मला कुत्र्यांना कसं हाताळायचं, कसं ट्रेनिंग द्यायचं उत्तमपकारे शिकवलं. तोपर्यंत आमचा कुत्रा बरा झाला होता."
मामा त्याचा कुत्रा घेऊन गेला. मग मात्र आईसह आम्हा सगळ्यांना करमत नव्हतं. इतका जिव्हाळा त्याने आम्हाला लावला होता. म्हणून मी आमच्या घरात एक छोटं पिल्लू आणलं. ते दीड वर्षाचे असून त्याचं नाव मिश्का आहे. त्याचबरोबर इतर पिल्लांना ट्रेनिंग देण्याचं प्राथमिक काम ती सध्या करते आहे. आपण ज्या पध्दतीने आपल्या घरातील लहान मुलांची काळजी घेतो, शिस्त लावतो अगदी त्यापध्दतीने या कुत्र्यांना ट्रेनिंग दिल्यास कोणत्याही त्याचा त्रास होत नाही. उलट हेच प्राणी आपल्या दारात आपले संरक्षक म्हणून उभे राहतात असेही स्वरूपाचे म्हणणे आहे.
स्वरूपा सांगते, "युट्युब, इंस्टाग्राम यावर अनेक नामांकित तज्ञ पाळीव प्राण्यांना ट्रेनिंग देतानाचे व्हिडीओ उपलब्ध आहेत. अशा तज्ञांचे व्हिडिओ पाहून अनेक गोष्टी मी शिकले. यातून नवनवीन बाबी शिकायला मिळाल्या."
ट्रेनिंगचे वय 2 महिन्यापासून 6 महिन्यांपर्यंत चांगले असते.याविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे. कुत्र्यांना योग्य ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. कोणता कुत्रा घ्यायचा, त्याला ट्रेनिंग कशापध्दतीने दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार नागरिकांनी केला पाहिजे. केवळ आवड आहे म्हणून कुत्र्याला घरी आणलं आणि जबाबदारी संपली असं होत नाही तर त्याची जबाबदारी खरी याचवेळी सुरू होते. जसे आपण आपल्या घरातील सदस्यांची काळजी घेतो लहान मुलांवर संस्कार करतो अगदी त्यापध्दतीने या कुत्र्यांबरोबर वागावं लागतं असं स्वरूपाने सांगितलं.
ती म्हणते, "कुत्र्यांसाठी रत्नागिरीत खूप काही करायचं आहे. ते मी टप्याटप्याने करणार आहे. आपण भटक्या कुत्र्यांच्या नजरेला नजर देऊन पाहायचं नाही, यामुळे ते अग्रेसिव्ह होतात, प्रत्येक वेळी दगड उचलून त्यांना मारणे हा उपाय नाही. दगड घेतल्यावर ती भुंकूलागतात."

- जान्हवी पाटील, रत्नागिरी

No comments:

Post a Comment