Saturday 25 January 2020

चला, मुलगे घडवूया (भाग तीन)

आपण मुलांना जे देतो, तेच मुलं समाजाला देत असतात.आपण मुलांवर प्रेम केलं तर ते समाजावर प्रेम करतात, आपण त्यांना समजून घेतलं तर ते इतरांना समजून घेतात, एखादी चूक केल्यावर त्यांना समजून घेऊन माफ केलं तर ते इतरांशीही तसेच वागतात.
आपण त्यांना मारलं, तर ते इतरांना मारतात,आपण त्यांना समजून घेतलं नाही तर ते इतरांना समजून घेत नाहीत,आपण त्यांचा द्वेष केला, तर ते इतरांचा द्वेष करतात.
याच विचाराने आम्ही, आमचा लेक समिक याचं पालकत्व करतोय. आता तो १७ वर्षांचा आहे. त्याचा मुलींकडे बघण्याचा दृष्टीकोन निर्मळ आहे. जन्मापासून त्याच्या मानसिक, शारीरिक, भावनिक गरजा पूर्ण करून त्याला आम्ही जास्तीत जास्त प्रेम
देण्याचा प्रयत्न करतोय.
मुलांना पुरेसं प्रेम मिळालं नाही की ते विघातक कृत्यांकडे वळू लागतात. प्रेमासाठी उपाशी असलेल्या मुलांचा मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन विकृत होऊ शकतो.
आम्ही आणि समिकच्या प्रेमळ संबंधांमध्ये शालेय अभ्यास आडवा येण्याची शक्यता होती. पालकांनी मुलांवर अभ्यासासाठी दडपण आणल्यास नातेसंबंध बिघडतात. मुलं मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आणि रोगट होतात. समिकवर अभ्यासाचं
दडपण राहू नये म्हणून, त्याला आम्ही मराठी माध्यमातून मुंबईतील महानगरपालिकेच्या शाळेतून शिकवलं. पहिली ते नववीपर्यंत त्याच्या अभ्यासात कधीच लक्ष घातलं नाही. अभ्यासाच्या बाबतीत माफक अपेक्षा ठेवल्या. त्यामुळे आमचे नातेसंबंध सुदृढ राहिले. अभ्यास आणि नातेसंबंध यापैकी नातेसंबंधाला आम्ही प्राधान्य दिले.
समिकचा प्रत्येक छंद जोपासण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न केले. दहा वर्षांचा असल्यापासून त्याला चित्रपट बघण्याची आवड निर्माण झाली. त्याने सांगितलेल्या प्रत्येक चित्रपटाची डीव्हीडी आम्ही त्याला आणून दिली. तो पाचवीत असताना बाजारात स्मार्टफोन आले. आम्ही तेव्हाच त्याला स्मार्टफोन घेऊन दिला. व्हिडिओ गेम्सची त्याला आवड आहे. व्हिडीओ गेम्स खेळण्यापासून त्याला कधीच अडवलं नाही. गायन, पेंटिंग, नृत्य, संगीत, कराटे, स्विमिंग इत्यादींचं प्रशिक्षण त्याच्यावर लादलं नाही. त्याला जसं जगायचं तसं जगू दिलं. वयाचा प्रत्येक टप्पा परिपूर्ण आणि मनसोक्तपणे जगण्यासाठी आम्ही त्याला मदत केली.
स्पर्धा आणि महत्वाकांक्षेऐवजी त्याच्यामध्ये सहकाराची भावना रुजवण्याचा आणि जोपासण्याचा प्रयत्न केला. स्पर्धेतून मुलांमध्ये मत्सर,भीती, शत्रुत्व, राग अशा भावना निर्माण होतात. याउलट सहकारातून करुणा, प्रेम, मैत्री, समाधान अशा भावना निर्माण होतात.
थोडक्यात, कमीतकमी अपेक्षा ठेवून समिकच्या जास्तीत जास्त गरजा पूर्ण करण्यावर भर दिल्यामुळे तो मानसिकदृष्ट्या सुदृढ, शांत आणि समाधानी आहे. त्यामुळे केवळ मुली आणि महिलांकडेच नाही, तर संपूर्ण समाजकडेच तो सुदृढ दृष्टिकोनातून बघतो. त्याला अनेक मैत्रिणी आहेत. या मैत्रिणींचे पालक त्यांना समिक सोबत असेल तर बिनधास्त फिरायला पाठवतात. समिकला आम्ही जसं सांभाळतो, तसाच तो त्याच्या मित्रमैत्रिणींना सांभाळतो.

- संदीप परब 

No comments:

Post a Comment