Saturday 25 January 2020

काहीही न करणारे यंत्र (आखुडबुद्धी बहुशिंगी)

मनुष्यप्राण्याच्या इतिहासाइतकाच मनुष्याच्या यंत्रकलेचा इतिहास प्रदीर्घ आहे. आपले श्रम वाचून विनासायास अवजड आणि कंटाळवाणी कामे करावी म्हणून मानवाने अत्यंत गुंतागुंतीची यंत्रे निर्मित केली आहेत. यंत्रांची एकूण कालरेखा पाहता चांक हे प्राथमिक स्तरावरचे यंत्र, दांतेरी चक्रे हे मध्यमयंत्र आणि सध्याची डिझ्झल एंजिन, फोटूक्यामिरा वगैरे तंत्रप्रगत यंत्रे अशी उत्तरोत्तर प्रगती होत गेली. आजमितीस यंत्रकला इतकी पुढारलेली आहे की या विद्येत यांपुढे आणखी काही सुधारणा करणे मनुष्यांस शक्य होणे नाही. परंतु या लोकभावनेच्या विपरीत पुणे एंथिल यंकोजी ब्रह्मे या मनुष्याने या कलेत एक प्रचंड चमत्कारीक शोध लावला आहे. असे मानण्यास जागा आहे की हे यंत्र यंत्रयुगाच्या अंताची पहाट ठरेल.
सदरहू यंत्र बनवण्यास सर्वात कठीण आणि वापरण्यास अत्यंत सोपे असून याचे वैशिष्ट्य म्हणजे हे काहीच काम करत नाही. वांफेचे एंजिन आणि धावता धोटा यांमुळे जशी औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली तद्वत या यंत्राच्या शोधामुळे जगात निरुद्यौगिक क्रांती होईल अशी आशा शोधकर्त्यांनी व्यक्त केली. या यंत्रामुळे मानवाची दैनंदिन यंत्रवत चाकोरीतून मुक्तता होऊन त्यांस पूर्वीप्रमाणे यंत्राविण काम करावे लागेल असे म्हटले जाते.
या यंत्राचा शोध ब्रह्मेंनी सुमारे सहा वर्षे अहोरात्र परिश्रम करून लावला. यातील बहुतेक काळ त्यांनी आपल्या अपेक्षित यंत्राप्रमाणे काहीही काम न करिता घालवला. या काळात त्यांनी कितीएक बंद पडलेल्या यंत्रांचा सूक्ष्म अभ्यास केला, प्रसंगी चालू यंत्रे बंद पाडली, बंद यंत्रे आणखी बिघडवण्याचा प्रयत्न करून चालू केली आणि अथक प्रयत्नांति काहीही काम न करणारे अचूक असे यंत्र बनवले. इंग्लंद, जरमनी, इतली, रशिया, फरांस एंथल्या संशोधकांनी या शोधाची बेफाट तारीफ चालविली आहे असे कळते. ऑष्ट्रीयाच्या पातशहाने तर ह्या यंत्रकारास तीनशे शिलिंग रोख आणि फाशी अशा भरघोस इनामाची घोषणा केली आहे.
हे चमत्कारी यंत्र पाहण्याचे भाग्य आंम्हांस लाभले असून सुमारे दीड यार्ड गुणिले अठरा फूट लांबीरुंदीचे आणि सव्वा पुरुष उंचीचे हे यंत्र आम्ही पाहिले तेव्हा झांकून ठेवले होते. सध्या हे यंत्र काही काम करत नसल्याने त्यांस असे झाकून ठेवावे लागते अशी माहिती ब्रह्मेंनी दिली. हे यंत्र उघड्यावर ठेवले तर याचे काही भाग खराब होऊन ते अपेक्षेप्रमाणे काम न करणे टाळायचे सोडून अकल्पितरित्या काम करू लागतील अशी भीती यंत्रकर्त्यांना वाटत होती. या यंत्रासाठी सुमारे सोळा मण लोह, साडेसोळा पौंड शिसे, सम्यक प्रमाणात तांबे आणि सोने असे मौल्यवान धातू वापरले आहेत. यंत्र गंजून त्याच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून काही महत्त्वाचे भाग पंचधातूपासून बनविले आहेत. काही नाजूक भाग वराहलोहाचे तर यंत्र चालू-बंद करण्याचे खटके कांशाचे बनवले आहेत. यंत्राची स्थिती पाहण्यासाठी त्यांस एक छोट्या काचेच्या खिडकीची रचना केली आहे, जिच्यातून पाहिले असता काहीही दिसत नाही.
या यंत्राचे प्रात्यक्षिक करून दाखवताना ब्रह्मेंनी यंत्राचा मुख्य खटका दाबून, दोन रत्तल कोळसा यंत्राच्या वांफपात्रात घालत यंत्र चालू केले. यंत्र सुरु होताच उजव्या पाखेची तरफ अजिबात वर न जाणे, मळसूत्राची रचना असलेले समांतर आसावर धावणारे चाक न फिरणे, पांपाचा दट्ट्या अजिबात पुढे न सरकणे, यंत्रातून खडखड आवाज न येणे, तसेच वाफ कोंडून शिट्टी न वाजणे हे अपेक्षित होते. खटका चालू करताच यापैकी काहीही घडले नाही.
हे अद्भूत यंत्र भविष्यात मानवजातीस मोठाच आधार होईल यात आम्हांस तीळमात्र संशय नाही.
(ब्रह्मेपीडीयाच्या प्रथम आवृत्तीतून साभार)


- ज्युनिअर ब्रह्मे

No comments:

Post a Comment