Tuesday 7 January 2020

तुमच्या शाळा, कॉलेजात व्हावेत 'असे' कल्पक उपक्रम (बातम्या : तुमच्या आमच्या मुलांच्या)

शेजारची सॊलिया कॉलेजमधून घरी येताच धावत माझ्याकडे येऊन म्हणाली "आंटी ये महिनेका रद्दी आप बेचो मत मुझे चाहिये" मीही मस्करीत म्हटलं "क्यू रद्दी का दुकान खोल रही है क्या"? गंमतीत संवाद होत असताना तिच्याकडून कळलं कि कॉलेजमध्ये त्यांना प्रोजेक्ट दिलाय,त्याच नाव 'Waste to knowledge'. प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येकी २५ किलो रद्दी जमा करून कॉलेजमध्ये जमा करायची आहे. गमतीत तिला म्हटलं काय हे कॉलेजची इतकी परिस्थिती वाईट कि त्यांना रद्दी विकून चालवावं लागत. गंमतीचा भाग सोडला तर प्रोजेक्टमध्ये काहीतरी नाविन्य होत म्हणून मीही थोडी खोलवर जाऊन त्याचा हेतू काय आहे याची माहिती घेतली.
तिलाही या प्रोजेक्टचा हेतू नक्की काय तो समजत नव्हता, ती हि या ढिसाळ शिक्षणव्यवस्थेची बळी असल्याकारणाने मी समजू शकत होते. बरच बोलल्यानंतर कळलं कि कोणीतरी कॉलेजमध्ये एक दीदी येते ती जी आपल्या संस्थेतून गरजू मुलांना शिक्षणउपयोगी वस्तू पुरवण्यासाठी त्याकरिता पैसे गोळा करत होती. त्या दिदीची आयडिया भन्नाट होती.जी मुलं शिकत आहेत, जी स्वतः आपल्या पालकांवर अवलंबून आहेत, त्या मुलांकडून तिने मदत घ्यायची ठरवली व घेतली ही.ती कशी? तर दिदीने मुलांकडून रद्दी घेतली, ती विकली. त्या पैशातून गरजू मुलांकरिता शिक्षणउपयोगी वस्तू पुरवल्या. या भन्नाट कल्पनेतून काय काय साध्य झालं ते पहा. पहिलं त्या विद्यार्थ्यांचा प्रोजेक्ट पूर्ण होऊन त्याचे मार्क्स ऍड झाल्याचा आनंद. दुसरं यामध्ये त्या विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट करिता आपल्या पालकांकडून पैसे घ्यावे लागले नाहीत. तिसरं त्या विद्यार्थ्यांना आपण गरजू विद्यार्थ्यांना मदत केली याचा आनंद. चौथं हा प्रोजेक्ट कुणाचीही मदतीशिवाय प्रोजेक्ट करण्याचा आनंद. पाचवं विद्यार्थ्यांना न कमवताही इतरांच्या मदतीस येता येत ही शिकवण मिळाली. सहावा शिक्षण घेताना इतरांनाही शिक्षण मिळावं म्हणून प्रयत्न केल्याचा आनंद. सातवं, आपण जगताना इतरांनाही चांगलं जगता येण्यासाठी केलेला सकारात्मक प्रयत्न केल्याचा आनंद. मुख्य म्हणजे शिक्षण घेता घेता इतर गरजू विद्यार्थ्यांना आपल्याला मदत करता येते हा धडा. प्रोजेक्टचा खरा हेतू टाकाऊ पासून उपयोगी गोष्टी साधने होय आणि विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात ते उतरवलं देखील.
सगळ्यात अतिशय महत्त्वाचे म्हणजे अश्या प्रकारच्या शिक्षणातून आपली मुलं समाजाशी जोडली जात आहेत. जी पूर्णतः गॅजेटच्या आहारी गेली आहेत. मोबाईल, लैपटॉप या गोष्टींच्या पलीकडे ते पाहण्यास तयार नाहीत. 'एखादी वस्तू दुसऱ्याकडे मागणे तीही तिसऱ्यासाठी' हे जवळपास दिसेनासे झाले होते ते चित्र माझ्या शेजारच्या सोलियाने पुन्हा नव्याने समोर आणले. गरजू मुलांना आपण मदत करतोय, समाजकार्य करतोय काहीतरी वेगळं करतोय हे त्या सोलिया च्या चेहर्यावर दिसत होते. यासाऱ्या कृतीतून तिचा विश्वास द्विगुणीत होताना दिसत होता. आपल्या मुलांच्या शारीरिक उपासमारीची आपल्याला चिंता वाटते तशीच मानसिक घडामोडींची देखील चिंता करणं गरजेचं आहे. त्यांना हेतुपूर्वक सकारात्मक घडवणं गरजेचे आहे.
- लता परब
Lata Parab Swati Mohapatra UNICEF india
#आनंदीशिक्षण #समाजभान #education

No comments:

Post a Comment