Saturday 25 January 2020

चला, मुलगे घडवूया (भाग सहा)

मुलगा आणि मुलगी यांच्यात भेद न करता त्यांना वाढवायचं वगैरे विचार करायला मुळात मुलं लहान असताना वेळच नव्हता. मुलगी चार वर्षांची आणि मुलगा ६ महिन्यांचा असताना कोल्हापूरला बदली झालेली. नवं गांव, नवं वातावरण यात स्वत:ला अन मुलांना फिक्स करणं ही एक टास्क होती हे आता कळतंय. सुरूवातीला मुलांना सांभाळणारी मदतनीस शोधणं, मुलांना हवाबदलाचा त्रास होणं, ताराबाई पार्कांत रोज सायंकाळी ६ ते ९ लोडशेडींग असणं, या अशा संपूर्ण ब्लॅकआऊट वर काहीतरी उतारा शोधणं, रोज ऑफिसमध्ये गेल्यावर कुणीतरी सांगावं आज आमच्या घरात इथं साप निघाला... आज तिथं निघाला... हे ऐकल्यावर मी संध्याकाळी घरी गेल्यावर साप हुडकावा (खरंच सापडला असता तर काय केलं असतं कोण जाणे) असो .... असे छोट्या छोट्या टेररचे दिवस होते. त्यामुळे चार वर्षांच्या लेकीवर जबाबदारी पडली... लहान भावाला खेळवणं, त्याच्यावर लक्ष ठेवणं, थोडंसं माझीही कधी आई कधी मैत्रिण होणं. तोपर्यंत मुलगा मुलगी हा विषय घरात नव्हताच. मुलांना परक्या गावात नीट सांभाळून आपली नोकरी करणं इतकच होतं. मात्र मुलं जसजशी मोठी व्हायला लागली तसं तसं मुलगा मुलगी समान हा कायदा सुरूवातीला कामाच्या बाबतीत घरात लागू झाला. या कायद्याचा फायदा असा झाला की दोन्ही मुलं मन लावून छोटी छोटी कामं करू लागली. पुढे भांडी घालणं, अंथरूणं घालणं, कुकर लावणं, कधीतरी युट्यूबवर बघून एखादा पदार्थ करणं हे ही करू लागली. मुलांशी गप्पा, त्यांना पुस्तकं वाचून दाखवणं हे तर सुरू होतच. बोक्या सातबंडे, एक होता कार्व्हर, प्रेमळ भूत अशी कितीतरी पुस्तकं मुलांनी मन लावून आवडीने ऐकली ... बसून कधी मुलांचा फार अभ्यास घेतला नाही. तसं टेंपरामेंट नव्हतंच. घरातलं वातावरण खूपच मनमोकळं असल्याने अभ्यासाच्या बाबतीत असली तरी आणि मार्कांच्या बाबतीत विशेष आग्रही भूमिका नव्हतीच कधी. मुलांच्या बाबाचा तर कमी मार्क मिळवणारी मुलंच जग बदलतात असा विश्वास असल्याने त्याबाबतीत खूप लवचिकता होती. मात्र विविध विषयांवर मुलांची मतं जाणून घेत रहाणं हे बरोबरीने जाणीवपूर्वक होत होतं. तुला काय वाटतं असं विचारूनच एखाद्या सहज चर्चेची सुरूवात घरात होत असे. मुलांच्या तऱ्हेतऱ्हेचेच्या प्रश्नांना उत्तरं देणं हे ही कित्त्येकदा मजेचं असे. अशाच गप्पांमध्ये एक दिवशी मुलाने आई तुम्ही दोघी पॅड पॅड काय म्हणत असता असं विचारलं. गडबडून न जाता ( कधीतरी हा प्रश्न येणार याचा अंदाज होताच कारण या विषयावर घरात गुपचुप वगैरे बोलणं नसेच. ) मग शांतपणे पॅड का कशासाठी हे समजावून सांगितलं. पुढे पाळी हा काही विशेष औत्सुक्याचा भाग न रहाता स्त्री आरोग्याचा एक महत्त्वाचा संदर्भ इतकं मुलाला कळलं. तोपर्यंत नववीत लैंगिक शिक्षणाचा अभ्यासक्रमात असलेला धडा आलाच. तो मी आणि मुलाने आम्ही दोघांनी मन लावून वाचला. जितकं समजावता येणं शक्य होतं तितकं समजावलं. 
हळूहळू लक्षात येत गेलं की न ठरवताही पालक म्हणून योग्य मार्गावर आहोत. व्हाॅट्स ॲपवर स्त्रियांवर होणारे जोक्स कुणी उत्साहाने ऐकवले तर मुलगा थंड प्रतिक्रिया देऊन हवाच काढून टाकतो हे लक्षात येऊन बरं वाटलं. एकुणच स्त्री जीवनाबद्दलचं त्याचं आकलन प्रगल्भ होत आहे हे कळायला लागलं. यात लेकीचा वाटा मोठा. सातत्त्याने मैत्रिणींच्या जगातल्या न मनातल्या घडामोडींबद्दल बोलत राहून या नव्या तरूणाईबद्दल आम्हाला नकळत सजग करत रहाणं हे आपोआप झालं. तिला पाश्चात्त्य संगीताची आवड आहे. त्या गाण्यांमध्येही लोकांच्या वेगळ्या जगण्याचे संदर्भ कसे येतात हे तिच्याकडूनच कळलं. लेडी गागाचं बलात्कार पिडितांच्या बद्दलचं when it happens to you किंवा एलजीबीटी बद्दलचं I was born this way ही गाणी त्याबद्दल ती वेळोवेळी करत असलेलं तिचं sharing यामुळे मुलालाच हे विषय वेगळ्या पातळीवर समजले असं नव्हे तर आम्हालाही समजले.
प्रियांकाच्या बाबतीत जे भयानक घडलं त्याचं कारण काय असं तुम्हाला वाटतं असं विचारलं तर मुलगा म्हणाला लहानपणापासुन मुलाला आणि मुलीला वेगळ्या पद्धतीने वागवतात. ते आधी दुरूस्त व्हायला हवं. आपल्या देशात इतर देशांच्या तुलनेत स्त्रियांच्या बाबतीत किती गंभीर परिस्थिती आहे याबद्दल अनेक गोष्टी स्कॅंनडिनेव्हियन देशांचं वगैरे उदाहरण देऊन त्याने सांगितल्या. मुलं या गोष्टींचाविचार सतत करतात हे कळून ठीकच वाटलं. एरवी राजकारणातली सद्यस्थिती, आपल्या देशातला सेक्युलॅरिझम, ताश्कंद फाईल्स किंवा पिंक सारख्या सिनेमांवर मुलं बोलत असतातच. पण स्त्रियांचा सजग, संवेदनशील विचार करतात हे बरं वाटतं. आणखी एक आवर्जुन सांगावं वाटतं आपल्या आईचं रोजचं जगणं बघतानाही मुलं स्त्रीजीवनाचा खूप संवेदनशील पद्धतीने विचार करतात हे अनेकदा जाणवलं. आई तू बिनधास्त जा आम्ही बघुन घेऊ, आई तू जास्त विचार करू नकोस, आई आता स्वत:साठी करायला शिक वगैरे ... आईचा असा विचार करणारी मुलं, सगळ्या गोष्टींना तर्कावर घासून बघण्याची सवय लावून घेतलेल्या स्वभावामुळे त्यांच्याकडून माणुसकीचं वर्तन नेहमी होईल याचा विश्वास वाटतो.


- उमा दीक्षित

No comments:

Post a Comment