Saturday 25 January 2020

चार वर्षांत दीड हजार बालविवाह.. (बातम्या मुलांच्या तुमच्या आणि आमच्या)

नेहा घरात असलेल्या मदतनीस मुलीची, लक्ष्मीची कहाणी सांगत होती. घरातील अडचणींमुळे लक्ष्मीने शाळा सोडली. लक्ष्मी गावात एकत्र कुटुंबात वाढलेली मजूर शेतकऱ्याची मुलगी. घरात ९ मुलं, घरातील मोठी माणसं मजुरीसाठी इतरत्र गेलेली. फक्त पोट भरणं हाच महत्त्वाचा प्रश्न; तिथं शिक्षण दुय्य्मच. मुलांकडे पाहायला घरात कुणीच नसतं. मुलं गावातील शाळेत कसबसं पहिली दुसरी पर्यंत शिक्षण होतं. शिक्षण घेणं महत्त्वाचं किंवा गरजेचं हे आजूबाजूला कुठंच दिसत नव्हतं. त्यामुळे ९ ते १२ वयाच्या मुली कामासाठी हाताला आल्या की त्यांना गावातील जवळचाच नातेवाईक घरकामासाठी शहरात नेतो. मुलीचं तात्पुरतं पालकत्व स्वीकारतो, पुढे तिला मिळणाऱ्या पगारातून काही रक्कम आपल्याला ठेवतो, उरलेला पगार गावी तिच्या पालकांना पाठवतो. अश्या लक्ष्मीसारख्या मुलींचं पुढे जाऊन काय भविष्य असेल, ते न सांगता कळून येतं. 
लक्ष्मी सारख्या अनेक मुलींची शाळेतील गळती ह्या समस्येची अनेक कारणं आहेत, मात्र त्याचं मूळ तळापर्यंत शिक्षण न मिळणं हेच आहे. मुलींची शाळेतील गळती म्हणजे पालकांची मुलींनी शिक्षण घेण्याबद्दलची उदासीनता. पालकांची मुलींनी शिक्षण घ्यावंच याबद्दलची कमी पडणारी इच्छाशक्ती. सरकारकडून सुविधा मिळत नाहीत म्हणून मुली शिक्षण मध्येच सोडून घरी थांबतात. वयात आलेल्या मुलीची जबाबदारी नकोसे समजणारे पालक तिचं लग्न कमी वयात करून मोकळे होतात. हे एक दुष्टचक्र आहे जे मोडीत काढणं अनेक वर्षे कठीण होऊन बसलंय.
२०१३ ते २०१७ या कालावधीत देशभरात बालविवाहाची दीड हजारांहून अधिक प्रकरणे उघड झाली असल्याची माहीती महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी गुरुवारी 28 तारखेला राज्यसभेत दिली.
एका प्रश्नाच्या उत्तरात इराणी यांनी बालविवाहांबाबतची गेल्या पाच वर्षांतील माहिती सादर केली. बालविवाहाची सर्वाधिक प्रकरणे सन २०१७मध्ये (३९५) उघड झाली. सन २०१६मध्ये हे प्रमाण ३२६, सन २०१५मध्ये २९३, २०१४मध्ये २८० आणि २०१३मध्ये २२२ इतकं होतं, असं इराणी यांनी 'नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो'च्या माहितीच्या आधारे सांगितलं.
सन २०१७मध्ये सर्वाधिक बालविवाह कर्नाटकात झाले. त्यााधीच्या चार वर्षांमध्ये त्याबाबत तमिळनाडू आघाडीवर होते, असंही इराणी म्हणाल्या.
बालविवाह या समस्येवर सरकारी उपाय योजना कमी पडत आहेत. बेटी पढाओ, बेटी बढाओ असं फक्त म्हणून चालणार नाही. परंतु, त्याकरीता ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे. सामाजिक कार्यकर्ते त्याकरिता झटतातचं. परंतु, प्रत्येक नागरिकांनी, पालकांनी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या बालविवाहावर लक्ष ठेवून थांबवणं किंवा त्याची माहिती पुरवणं गरजेचं आहे.

- लता परब

No comments:

Post a Comment