Friday 31 January 2020

आदर्श आंबेडकरांचा..... मोठा माणूस होण्याचं स्वप्न झालं साकार

सोलापूरमधलं रमाबाई आंबेडकर नगर. तिथे राहणारे नंदा आणि कुमार वाघमारे. दोघे सोलापूर महानगरपालिकेत सफाई कामगार. त्यांचा मुलगा कुणाल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्याचे आदर्श. त्यांच्याप्रमाणेच मोठं होण्याचं त्याचं लहानपणापासूनच स्वप्न होतं. मुलाचं स्वप्न साकार व्हावं यासाठी आईवडिलांनीही रात्रंदिवस मेहनत केली. शिक्षणात काही कमी पडू दिलं नाही. कुणालनीही आईवडिलांच्या कष्टाचं चीज केलं. 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१८ मध्ये दिवाणी न्यायाधीश(क) स्तर आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी या पदासाठी १९० जागांकरिता जाहिरात दिली होती . यासाठी ७ एप्रिल २०१९ ला पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा १ सप्टेंबरला आणि ६ डिसेंबरला मुलाखत झाली. डिसेंबर २०१९ च्या शेवटच्या आठवड्यात निकाल जाहीर झाला. त्यात कुणाल संपूर्ण राज्यातून १० वे तर अनुसूचित जातींमधून पहिले आले . २०० पैकी १५८ गुण त्यांना मिळाले.
कुणाल यांचं शालेय शिक्षण महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक २१ आणि २ मध्ये झालं. दयानंद महाविद्यालयातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण. भाई चन्नुसिंह चंदेल महाविद्यालयातून एमएसडब्ल्यू.
याच दरम्यान त्यांच्या जमिनीचा खटला उभा राहिला. खटल्याच्या सुनावणीदरम्यानच वकिलाचा मृत्यू झाला. या घटनेतूनच कायद्याचा अभ्यास सुरू झाला. त्यातला रस वाढत गेला आणि दयानंद विधी महाविद्यालयातून वर्ष २०१४ मध्ये एलएलबी पूर्ण केलं . एलएलबीला सोलापूर विद्यापीठात प्रथम आणि २०१६ मध्ये एलएलएमला दुसरा क्रमांक. ''संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही.'' अॅड. कुणाल सांगतात. ''स्वप्न नुसतं पाहण्यात कमी वेळ घालवला. ते पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ दिला. रोज घरीच ७-८ तास अभ्यास केला. माझ्या यशात आईवडील, ४ बहिणी आणि पत्नीचं मोठं योगदान आहे.''
-अमोल सीताफळे, सोलापूर

No comments:

Post a Comment